"हा, सरे...सरे...हां हां सरे.....", असे म्हणून बालाने फोन खाली ठेवला आणि मागे वळून पाहिले.
मागे त्याचा सहकारी देशपांडे उभा होता. सकाळचे अकरा वाजले होते. ही त्यांची नेहेमीची चहा पिण्याची वेळ. बाला उठला आणि दोघेही कँटीनच्या दिशेने जाऊ लागले.
"घरचा फोन काय?", देशपांडेने चहा पिता पिता विचारले.
"हो. काल फोटो दाखवला होता ना तुला? तिच्याबद्दलच! मागेच लागलेत आई बाबा", बाला म्हणाला.
"काय करते काय मुलगी?", देशपांडेने विचारले.
"मुलगी?", बाला हसत हसत म्हणाला, "आमच्यात मुलगी काय करते त्यापेक्षा मुलीचा बाप काय करतो ते जास्त महत्त्वाचं!".
"हं", देशपांडे.
"बडं प्रस्थ आहे ते गुंटूरमधील", बाला सांगू लागला, "शिक्षणसंस्था आहे त्यांची. तीन शाळा आणि एक कॉलेज. शिवाय एक चिट फंड चालवतो ते वेगळच".
"अच्छा. मग काय ठरवलयस? मुलगीही बरी दिसतेय फोटोत", देशपांडे म्हणाला.
"ठरवायच काय? ठरलय सगळ", बालाने सांगितले, "अरे आय टी मधला मुलगा मी, अमेरीकेत कामाला. शिवाय कंपनी ग्रीन कार्ड प्रोसेस करणार. माझी आमच्या बाजारात किंमत काय ठाऊक आहे तुला?".
"नाही बॉ", इति देशपांडे.
"सात आकडी रोख. शिवाय स्विफ्ट गाडी. मला हिर्याची अंगठी आणि चेन. मुलगी अंगभर स्त्रीधन घालून येईल ते वेगळेच", बालाची यादी संपत नव्ह्ती, "लग्न आणि रिसेप्शनचा दोन्हीकडचा खर्च.....".
देशपांडे बघतच राहिला. सगळ्या समाज सुधारकांना महाराष्ट्रातच जन्म घेण्याची दुर्बुद्धी का व्हावी, असाही एक विचार त्याच्या मनात येऊन गेला!
"चला निघू", चहाचा शेवटचा घोट घेऊन देशपांडे उठला.
"चला", बालाही उठला, "आजच पीएमशी बोलून घेतो रजेविषयी".
*******
बालाने घरी होकार कळवला आणि पीएमने ही दोन महिन्यांनंतर ३ आठवड्याची रजा देण्याचे मंजूर केले.
भारतात त्याच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आणि इथे बालाचीही ! नवी कोरी अकॉर्ड तर त्याने नुकतीच घेतली होती. सध्या तो तीन जणांबरोबर घर शेअर करत होता. त्यांच्याच कॉम्प्लेक्समध्ये स्वतंत्र घर घेण्याविषयी त्याच्या रेंटल ऑफीसशी त्याने बोलणी सुरू केली.
मित्रांनी बॅचलर्स पार्टीचा आग्रह घरला. बालाने त्यालाही होकार दिला.
सगळीकडे कसा आनंदी आनंद भरला होता!
*******
फोन वाजला. बालाने पाहिले तर त्याचाच दुसर्या ऑफीसमध्ये कामाला असलेला मित्र शिवा फोनवर होता.
"हाय शिवा, चप्प..", बालाने म्हटले.
बघता बघता बालाच्या चेहर्यावरील भाव झरझर पालटत गेले.
"काय म्हणतोस काय?", बालाच्या आवाजात भिती डोकावू लागली.
"बापरे", बालाने फोन खाली ठेवला आणि डोके गच्चा पकडले.
चक्क जायला सांगताहेत? आज त्याच्या कंपनीत, उद्या कदाचित आपल्या??? आपल्या लग्नाची तयारी सुरू आहे. आणि अशात आपल्यालाही जायला सांगितले तर? बालाला काय करावे काही सुचेना. तो तसाच उठला आणि बाहेर आला. समोरच्याच स्टारबक्स मध्ये शिरून त्याने डबल एस्प्रेस्सोची ऑर्डर दिली.
एक कडवट घोट घशाखाली गेला तेव्हा त्याला जरा बरे वाटले!
"छे! काहीतरीच", तो विचार करू लागला.
"पण नाही. आपल्याकडे नाही होणार असं", त्याने स्वतःचीच समजूत घातली, "आपले गेल्या क्वार्टरचे रिपोर्टस बघा. चांगला ग्रोथ आहे".
"आपल्याकडे नाही, शक्यच नाही", बाला स्वतःशीच पुटपुटला.
"आणि त्यातून समजा झालच आपल्या कंपनीत तरी मला तरी काही धोका नाही".
त्याच्या प्रकल्पाची बांधणी संपून आता तपासणी सुरू झाली होती. आणि तपासणीदरम्यान लक्षात आलेल्या चूका आणि त्रुटी दूर करण्यात बालाचा हात धरणारा कोणी नव्हता!
"आय ऍम इनडिस्पेन्सिबल", बाला पुन्हः पुन्हः स्वतःची समजूत काढत होता.
तेवढ्यात आणखी एक देशी घोळका हिंदीत गप्पा मारीत आत घुसला.
छे! "परप्रांतीयांची" घूसखोरी वाढत चाललीय इथे! त्यांचे हिंदी संभाषण ऐकून त्याही परिस्थितीत त्याच्या मनात विचार आला! काहीतरी करायलाच पाहिजे ह्या "परप्रांतीयांचे"! पण नक्की काय करावे ते सुचेना.
संकेतस्थळावर चर्चा घडवून आणू एकदा या विषयावर!!, असा विचार करून, कॉफीचा शेवटचा घोट घेऊन तो उठला.
*******
"सी बाला, इट डझ नॉट रिफ्लेक्ट ऑन यू ऑर युअर परफॉरमन्स", गोरा साहेब बोलत होता, "बट यू सी, वी जस्ट डोन्ट हॅव फन्ड्स टु सपोर्ट युअर प्रोजेक्ट्स".
बालाचे पाय लटपटत होते, हात कापत होते आणि तोंडातून शब्द फुटत नव्हता.
"थॅन्क्स फॉर ऑल युअर हेल्प", साहेबाचे बोलणे चालूच होते, "आता दहा वाजलेत. तुला साडे-दहा पर्यंत वेळ आहे वाइन्डअप करायला. गूड बाय!".
बाला साहेबाच्या केबिनबाहेर पडून आपल्या टेबलाच्या दिशेने जाऊ लागला, तसा एक सुरक्षा रक्षक त्याच्या चार पावले मागून येऊ लागला!
बाला खुर्चीवर बसला आणि तो सुरक्षा रक्षक त्याच्या क्युबिकलच्या बाहेर उभा राहिला.
काम तर काही करायचे नव्हतेच. बालाने My Documents मधील आपल्या वैयक्तिक फायलींची एक झिप फाईल बनवली आणि आपल्या जीमेल खात्यावर पाठवून दिली.
सगळ संपल होतं. त्याने पीसी बंद केला आणि खुर्चीच्या मागे अडकवलेले आपले जॅकेट उचलून बाहेर निघाला.
लॉबीत आला. लिफ्ट उभीच होती. त्याने दरवाजा उघडून पाय आत ठेवला. पायाला तळ लागेना! हे काय झाले? लिफ्ट आलीच नव्हती तरी दरवाजा उघडला गेला. तो खोल खोल अंधार्या गर्तेत जाऊ लागला!
"आईऽग", बाला किंचाळला.
*******
ढाण ढाण गजराचा आवाज झाला तसे त्याने डोळॅ उघडले!
अरेच्चा! म्हणजे आपण पाहिले ते सगळे स्वप्नच होते तर?
बालाला हायसे वाटले. पण दुसर्याच क्षणी मनात विचार आला, पहाटे पडलेले स्वप्न खरे ठरते म्हणतात! म्हणजे आज आपल्या हाती नारळ? तो कासावीस झाला.
नव्या गाडीचे हप्ते. मनात योजलेली मोठ्या टिव्ही आणि म्युझिक सिस्टमची खरेदी. आणि मुख्य म्हणजे आता आई बाबांना काय आणि कसे सांगायचे? आणि लग्नाचं काय?
त्याला घाम फुटला. कसाबसा तयार होऊन तो ऑफिसला पोचला.
दहाची साप्ताहिक आढावा बैठक. नोटपॅड आणि प्रकल्पाच्या प्रगती विषयीचे काही प्रिन्टआऊट्स घेऊन तो बैठकीच्या कक्षाकडे निघाला. सगळे स्थानापन्न झाले. साहेब आले.
"गूड न्यूज", साहेब म्हणाले, "बिझनेसने आणखी पैसा देण्याचे मान्य केले आहे. पैशाअभावी रखडलेले काही प्रकल्प आता मार्गी लागू शकतील".
बालाचा स्वतःच्या कानावर विश्वास बसेना. त्याने हळूच स्वतःला चिमटा काढून बघितला. साहेब खरेच बोलत होते!
"इन फॅक्ट", साहेब पुढे बोलत होते, "येत्या दोन महिन्यात आपल्याला आणखी पंधरा रिसोर्सेसची गरज आहे!".
.......
.......
.......
बैठक संपवून बाला आपल्या टेबलापाशी आला तो तरंगतच!
आल्या आल्या त्याने भारतात आई वडीलांना फोन लावून आपल्या भारतात येण्याच्या नियोजित तारखेविषयी कळवले आणि सगळ्या मित्रांना आजच्या संध्याकाळच्याच बॅचलर्स पार्टीचे इ-इन्व्हाईट टाकू लागला!
******* ******* *******
(समाप्त)
प्रतिक्रिया
20 Jan 2008 - 10:53 pm | ब्रिटिश टिंग्या
छान लिहीले आहेस.....अगदी माझीच श्टोरी आहे
अवांतर : सध्या मी पण याच अवस्थेतून जात आहे.......आमच्या हपिसात ९०-१० लागू झालाय्......गोर्या सायबानी पैशे नाय म्हणून डिक्लेअर केलय....आमच्या टीम मधल्या अर्ध्याहून जास्त हमालांना भारतात परत पाठवलय अन आम्ही बाकीच्या हमालांवर टांगती तलवार ठेवलीये :((
आपला,
(हैराण झालेला) छोटी टिंगी
20 Jan 2008 - 11:08 pm | भडकमकर मास्तर
लग्नाच्या बाजारात किंमत , हुंडा ...यावर काही कन्क्ल्यूडिंग कोमेंट व्हायच्या आत गोष्ट संपली , असे वाटले........
म्हणजे मूळ गोष्ट "लेओफ़ आणि त्याबद्दल वाटणारी भीती" अशी असताना आम्ही भलतेच मनात धरून बसलो बहुतेक.........
आमचीच चूक असणार...
21 Jan 2008 - 9:29 pm | सुनील
होय, मूळ कथा ही ले-ऑफ आणि त्याबद्दल वाटणारी भिती यावरच होती. लग्न, हुंडा इ. चवीसाठी! अर्थात, त्या विषयांवरदेखील गंभीर कथा होऊ शकतात, पण इथे तरी तो प्रयत्न नव्ह्ता.
असो, पिंक स्लिप ह्या शीर्षकावरून अंदाज येण्यास हरकत नव्हती असे वाटते.
धन्यवाद!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Jan 2008 - 12:51 pm | विसोबा खेचर
सुनीलशेठ,
ही कथा तेवढी खास वाटली नाही, ठीक वाटली.
या आधीची 'गावची वारी' ही कथा खूपच छान होती...
असो, प्रामाणिक मत. राग नसावा...
पुढील लेखनकरता अनेकानेक शुभकामना...
तात्या.
21 Jan 2008 - 9:25 pm | सुनील
छे राग कसला उलट प्रामणिक मत सांगित्ल्याबद्दल धन्यवाद!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Jan 2008 - 2:11 pm | सहज
छान लिहीले आहे!!
21 Jan 2008 - 4:04 pm | पेशवे बाजीराव तिसरे
खरंच खुप मस्त लिहिले आहे
21 Jan 2008 - 4:27 pm | धमाल मुलगा
माझी पण त॑तरली होती यार हे वाचताना. मीपण थोड्याशा अशाच् प्रकारातून चाललो होतो ना मध्ये.
-(फापललेला) धमाल.
21 Jan 2008 - 4:36 pm | ध्रुव
कथा म्हणून वाचली तर छान आहे, उत्सुकता वगैरे काय असते ती वाटली.
--
ध्रुव