हे निराकारी कला क्रांतिवीरांनो
या वास्तवाला घाबरता का ?
गेली चार दशके टाळताय त्याला
अन् लपताय दीवाभीतासारखे
नुसत्या रंगसंगतीवर किती
झुलवणार आम्हाला
तुमचे पिवळे हेवेदावे आणि
काळे चौकोनी सूर्य
किती दिवस बघायचे ?
कशासाठी हा वेगळा प्रवास ?
तुमचे बाप तिथे मास्तर होते
तेंव्हा तुमचे काय चालले होते ?
तुमची लफडी, तुमची व्यसने
तुमचे स्वप्नभंग, रागलोभ,
याचे भ्रष्ट आविष्कार
त्या कॅनव्हासवर कशाला ?
तुमचीही घराणी झाली आता
अधिकारवाणी रुजली आता
दिवाळी अंकात चमकताना
ज्ञानाचे दिवे पाजळताना
तुमच्या भाटांना शब्द अपुरे पडतात
दगडातला अनावश्यक भाग
कोरणार्याला शिल्पकार म्हणतात
चित्रातला आवश्यक भाग
काढणार्याला नवचित्रकार म्हणतात