कशी कोण जाणे

कौतुक शिरोडकर's picture
कौतुक शिरोडकर in जे न देखे रवी...
21 Feb 2009 - 8:03 am

कशी कोण जाणे, तुझी याद आली
मुक्या पापणीतून ओलावलेली

आवर्जून मी एकेका सयीला
कुलुपबंद केले मनाच्या तळाला
वरी विस्मॄतीचा दगड रोवलेला
तरीही......
......तरीही पुन्हा आज डोकावलेली
कशी कोण जाणे......

आवरून अवघे वेदनांचे भारे
किती निग्रहाने लिंपलेले सारे
तडे, चरे अन दुभंगलेले तारे
तरीही......
......तरीही पुन्हा भेग रुंदावलेली
कशी कोण जाणे......

ना जाणे कुठे तू, कुणाच्या कुशीत
जुनी कात टाकून, निराळ्या मुशीत
अता गाठभेट, आहे स्वप्नातीत
तरीही......
......तरीही पुन्हा प्रीत आसावलेली
कशी कोण जाणे......

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

पक्या's picture

22 Feb 2009 - 3:30 am | पक्या

छान आहे काव्य.