हागणदारी मुक्त खेडे

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
19 Feb 2009 - 8:49 am

काही दिवसांपुर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली होती. रायगड जिल्ह्यातल्या खेड्यांमधुन हागणदारी मुक्त खेडे ही योजना राबवायचा निर्णय सरकारने घेतला. त्याच्या अंमलबजावणीसाठी गावा गावातल्या अंगणवाडी शिक्षिकांना वेठीस धरण्यात आले. कल्पना अशी होती की गावातील अंगणवाडी सेविका पहाटे हागणदारीपाशी जावुन उभ्या राहतील आणि येणार्‍या स्त्री पुरुषांचे गुलाबाचे फ़ुल देवुन स्वागत करतील. नंतर त्या गावकर्‍यांचे फोटो काढुन वर्तमानपत्रात प्रकाशित केले जातील.

एक काल्पनिक पण जिवंत प्रतिक्रिया...

सेविका: नमस्कार या अभिनव योजनेत तुमचे स्वागत, हे गुलाबाचे फ़ुल तुमच्या साठी...

गावकरी महिला: या, बया..बायकात बी असतंय का असलं, म्या न्हाय त्यातली, सांगुन ठिवते !

सेविका: ताई, गुलाबाचं फुल घ्यायला काय हरकत आहे? नंतर आम्ही तुमचा फोटोपण काढणार आहोत. तो उद्याच्या वर्तमानपत्रात छापुन येइल.

गावकरी महिला: आगावच हायेस की गं ! आमीबी बगिटलाय त्यो पिच्चर. अबिशेक बच्चन आन जान एब्रामचा. आन हे बरंय , पहिल्यासाटनं फ़ुल देताय मग फ़ोटुबी काडताय. आन त्यो पेपरात छापनार म्हनताय. म्हंजी हाय का काडीमोड आमचा. आदीच तं न्हवरा टपुन बसलाय, त्या गंगीसंगट पाट लावायला. मंग त्येंचा रस्ता मोकळा. वा गं वा ....लै शाणी हायेस कीं..!

सेविका: (स्वगत) आता हिला कसं समजावु ? बरं खरं कारण सांगावं तर चप्पल घेवुन मागे लागायची.

तुम्हाला म्हणुन सांगते, हे फ़क्त आपल्या तुपल्यात बरं. रोज सकाळी उठुन घरं झाडा, तुळशीची पुजा करा, सगळ्यांचा चहा या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात म्हणुन सासुच्या नावे ओरडत होते (म्हणजे मनातल्या मनात हो) पण आता हे भलतंच विश्वदर्शन होतंय रोज सकाळी. आता काय करु....?

गावकरी महिला: ए बाई, मी जावु का आता, लई घाई झालीया. आन उशीर झाला तं पुन्हा न्हवरा पेटल. ती गंगी वाटच बगतीया आमी भांडायची !

सेविका: असं बघा बाई, समजा तुमी स्वयंपाक करायला बसला आहात.

गावकरी महिला: अगं माय माजे, हितं कोण स्वयंपाक करल. बरी हायेस ना ?

सेविका: तुम्ही मला पुर्ण बोलु द्या हो आधी, समजा तुम्ही स्वयंपाक करायला बसला आहात आणि कुठुन तरी घाणेरडे वास येवु लागले, कुठुन तरी घाण वार्‍यावर उडुन आली आणि तुमच्या अन्नात पडली. तर तुम्हाला काय वाटेल? हुश्श्....बोलुन टाकलं एकदाचं...!

गावकरी महिला: वाटायचय काय त्येच्यात, मस्नी म्हायीत हाये , पक्कं हे काम गंगीचंच आसणार बगा. लई चाबरी हाये ती.

सेविका: (स्वगत) अरे देवा, हिला गंगीशिवाय काही सुचतच नाही, काय करु ? कसं समजावु हिला...

तुम्हाला सांगते , काल असेच एक म्हातारबाबा आले, त्यांना गुलाब दिला तर म्हातारा लगेच केसावरनं हात फ़िरवायला लागला. फ़ोटो काढु म्हणलं तर..हे आत्ता आलो म्हणुन जो गायब झाला तो अर्ध्या तासाने नवे कपडे घालुन, नटुन थटुन आला..हातात टमरेल घेवुन. आणि म्हणतो "पोज देवु का पोज...! आणि हे कमी होतं म्हणुन पुढं विचारतो बाई, कानात फ़ाया लावलाय इत्तराचा, दिसल का वो फ़ोटुत?

नशीब अत्तराचा वास येइल का म्हणुन नाही विचारले.

गावकरी महिला: ए बाई, जातो ना म्या आता, आता न्हाय र्‍हावत, काय सोताशीच बोलतीया येड्यावाणी. मला कसंतरी व्हाया लागलंय आता. मला नगो तुजा फ़ोटु बिटु , म्या चालले !

सेविका : अहो, बाई...हे बघा, हा हागणदारी मुक्त खेडे या योजनेचा एक भाग आहे. तुम्हाला नाही का वाटत, तुमच्या गावात सगळीकडे शौचालये असावीत म्हणुन? रोज सकाळी एवढ्या लांब गावाबाहेर उठुन यायचं, केवढा हा त्रास असं नाही तुम्हाला वाटत.

गावकरी महिला: बाय माजे, यवडी येकच जागा हाये गं, जितं सासुचा पहारा नसतुया. दिवसातली धा - पंदरा मिन्टं मिळत्यात सुकाची तं तितं पण तुज्या पोटात दुकाय लागलं व्हय, डुचकी मेली !

सेविका: अहो, अहो बाई, असं नव्हतं म्हणायचं मला...आता कसं समजावु तुम्हाला ?

गावकरी महिला: हे बग, मस्नी काय , समजावत बसु नगो...तुज्या सायबाला जावुन समजाव. तेस्नी म्हणाव आदी घरा घरातुन संडासं त्या बांदुन आन मंग सांगा हागणदारीत नका जावु म्हुन. उटावरनं शेळ्या राकनं सोडा म्हणाव तेस्नी. गेलं मोटं लागुन. हागणदारी नसलेलं गाव म्हनं !

तुमास्नी काय जातंय गं सांगाया? हितं खायाची मारामार, एक दगडी कोळशाची शेगडी बांदुन घेयाची म्हनली तर पन्नास - पंचाहत्तर रुपडे मागत्याती. अन संडास बांदा म्हनं. आमच्या संडासासाठी मंजुर झाल्यालं पैकं सुद्धा तुजं सायेब लोक खावुन ढेकार देत्यात. त्या सरकारी फ़िरत्या संडासात जायाचं म्हनलं तर त्यो तितला कंत्राटदार लगंच दोन रुपे मागतो. आन हागणदार नको म्हनं. त्यवडी येकच जागा फ़ुकाट राहिलीय गं बाई.

सेविका: बाई, मी ..काय बोलु ...काहीच..समजत नाहीये.

गावकरी महिला: तुजी आडचण कळतीय गं बाय माजे. आमालाबी नगो हाय का संडासं मिळाली बांदुन तर. आसल्या घाणीत नाक दाबुन यायाची हौस नाये गं बाई. पण नाविलाज हाये. सरकार नुसतंच सांगतं..सुदारणा फ़ायजे म्हुन..पन सुदारना फ़ायजे असं नुसतं म्हनुनशान सुदारना नसती होत बाये...!

गरिबाच्या पोटाला दोन घास मिळालं तर सुदारनेच्या गोश्टी सुचत्यात त्येस्नी. रिकाम्या पोटी न्हाय काय सुचत बाई. आता जाते. पोरं साळंत जायाची हायत. मालकबी कामावर जायाचा हाये, त्येस्नी भाकरतुकडा करुन द्येयाचा हाये बाई. सैपाक करुन दुपारच्याला सासुबायला डागदरकडं न्याचं हाय, जाती म्या.

विशाल कुलकर्णी

विडंबनप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

त्रास's picture

19 Feb 2009 - 11:00 am | त्रास

क्लासिक! फार छान अंजन घातलेत तुम्ही.

झेल्या's picture

19 Feb 2009 - 11:10 am | झेल्या

यावर तर एक मस्त सिरिज तयार होईल.. :)

वळू मधला दिलीप प्रभावळकर चा प्रसंग आठवला.

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

किरण जोशी's picture

19 Feb 2009 - 11:27 am | किरण जोशी

लई चाबरी ... डुचकी मेली...
हा हा हा ....
लई भारी

अभिष्टा's picture

19 Feb 2009 - 11:36 am | अभिष्टा

विशाल, ये हुई ना बात !
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Feb 2009 - 11:48 am | प्रकाश घाटपांडे

विशाल लईच भारी लिहिल राव. तुझी लेखनी चित्रच हुबी करतीया पघ.
आमच्या क हागिनदारीला गोखाडी म्हानयाची (गु+खाडी ही आमची व्युत्पत्ती) . आमच्या घरामागंच व्हती. मूळ तो जुना पडका वाडा.तिथ बायका यायच्या टमरेल घेउन. आन मिश्री लावत सुखदु:खाच्या गोष्टी बोलायच्या. गडी मान्स वढ्याव जायची. त्येन्ला टमरेल नस्ल तरी बी चालायच. वढ्यातल गोट्याव काम भागायच. अशी अलिखित ही विभागनी. बायकांची उखाळ्या पाखाळ्या काढायची गोखाडी पक्की जागा. मागं शंकराच देउळ व्हत. महाशिवरात्रीला गोखाडीतली पाय वाट निर्गुडीच्या खराट्यानी आदल्या दिवशी साफ केली जायची कारन आजोबांना त्या दिवशी पुजेला देवळात जायला लागायच. इतर वेळी मात्र आनंदी आनंदी. हमखास ग्वॉत पाय भरनार. मातीत पाय घुसळुन साफ केला कि चाल्ले पुढे इटी दांडु खेळायला. कवठाच झाड बी व्हत. खाली पडल्याल उचलून खायला कुनालाच काय वाटायच नाई.
गोखाडीत डुकरांनी दगडी मारत फिरनारा
प्रकाश घाटपांडे

टारझन's picture

19 Feb 2009 - 9:45 pm | टारझन

हमखास ग्वॉत पाय भरनार.

:) :) :) :) :) :) =))
:) :) :) :) :) :) =)) =))
:) :) :) :) :) :) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
:) :) :) :) :) :) =)) =)) =))
:) :) :) :) :) :) =)) =))
:) :) :) :) :) :) =))

मेलो ...

प्रकाश घाटपांडे's picture

20 Feb 2009 - 5:15 pm | प्रकाश घाटपांडे

प्रकाटाआ
प्रकाश घाटपांडे

फ्रॅक्चर बंड्या's picture

19 Feb 2009 - 2:16 pm | फ्रॅक्चर बंड्या

आता तर १२०० रुपये दंड घेतात..
आणी पोलिसांचे पथक स्थापन केले आहे ." good morning " पथक
पकडुन डायरेक्ट आतच ... दंड घेतल्याशिवाय घरी जायलाच मिळत नाही..
दुसर्या दिवशी ग्रामीण वर्तमानपत्रात नाव पण येनार ...

चंबा मुतनाळ's picture

20 Feb 2009 - 11:25 am | चंबा मुतनाळ

अरे पण चालू असलेले काम पुरे करुन देतात की नाही? की तसेच फरपटत घेऊन जातात पोलिस?

सातारकर's picture

20 Feb 2009 - 11:28 am | सातारकर

म्हणजे काम पूर्ण होइपर्यंत तिथेच थांबतात.

नंतर गुलाबाचे फूल देउन गाडीत घालून नेतात.

फ्रॅक्चर बंड्या's picture

20 Feb 2009 - 12:15 pm | फ्रॅक्चर बंड्या

असा काही अनुभव मला तरी अजुन आला नाहिये...
कारण आमचे गाव कागदोपत्री हागणदारी मुक्त आहे...
त्यामुळे गावात पथक येतच नाही

विशाल कुलकर्णी's picture

19 Feb 2009 - 3:09 pm | विशाल कुलकर्णी

फोटोसकट, तोही टमरेल घेवुन !!!

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

भडकमकर मास्तर's picture

19 Feb 2009 - 4:20 pm | भडकमकर मास्तर

एका गावात नाटकाच्या प्रयोगाला गेलो होतो तेव्हा एका घराच्या भिंतीवर ही घोषणा पाहिली...
मोबाईलवर फोटोही काढला.. घोषणा अतिशय उद्बोधक आहे ...

"...असेल शौचालय परसदारी
तरच करा लग्नाची तयारी.. "

म्हणजे ज्यांच्याकडे लग्न नाही त्यांना परसदारी शौचालय असण्याची गरज नाही ... !!!

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पक्या's picture

19 Feb 2009 - 11:39 pm | पक्या

मस्त.
लई चाबरी ... डुचकी मेली... :D

प्राजु's picture

20 Feb 2009 - 12:02 am | प्राजु

सुरेखच.
खूप खूप आवडलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

20 Feb 2009 - 12:13 am | बेसनलाडू

भारी आणि मार्मिक!
(हसरा)बेसनलाडू

सुचेल तसं's picture

20 Feb 2009 - 7:53 am | सुचेल तसं

मस्त रे!!!

तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो,
तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो,
मग माझं म्हणून काय असतं?
-श्याम मनोहर

प्रकाश घाटपांडे's picture

27 Jul 2009 - 12:54 pm | प्रकाश घाटपांडे

यावर चांगले पथनाट्य होउ शकेल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सूहास's picture

27 Jul 2009 - 4:13 pm | सूहास (not verified)

=)) =)) =)) =))

सुहास

सूहास's picture

27 Jul 2009 - 4:14 pm | सूहास (not verified)

=)) =)) =)) =))

सुहास