आपण सगळे एकमेकासाठी शिक्षक आहोत.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
18 Feb 2009 - 7:57 am

प्रो.देसायांच्या घरी आज आम्ही चर्चा करण्यासाठी जमलो होतो.चर्चेचा विषय होता "शिक्षक".
भाऊसाहेबानी बर्‍याच विद्वानाना ह्या चर्चेसाठी बोलावलं होतं.नेहमी प्रमाणे काही लोक शिक्षक म्हणून आपला अनुभव सांगून गेले.काहीनी शिक्षक झाल्यामुळे आपल्या जीवनात काय काय समस्या आल्या त्याचे पाढे वाचले.काहीनी शिक्षक आणि मुलांमधल्या पारस्पारिक प्रभावाबद्दल मनोरंजक माहिती सांगितली.भाऊसाहेबानी आपले पण रुईया कॉलेजमधले गमतीदार अनुभव सांगितले.
मात्र एका वयस्कर व्यक्तिने "शिक्षक" म्हणजे फक्त शाळेत किंवा कॉलेजमधे शिकवणारी व्यक्ति असं न मानता,मोठ्या दर्शनशास्त्राच्या दृष्टिने किंवा तत्वज्ञानाच्या दृष्टिने चर्चा करून सगळ्यांची खूपच करमणूक केली.मला तर ते ऐकून थोडसं,"हटके" विषयांतर केलेलं आवडलं. त्यांच नाव होतं प्रो.परांजपे.ह्या सगळं जग फिरून आलेल्या प्रो.कमला परांजपे थोडाकाळ इंग्लंडला ससेक्स शहरातल्या एका युनिव्हर्सिटीमधे शिकवत होत्या.तत्वज्ञान हाच त्यांचा तिकडे विषय होता.इकडे त्या उस्फुर्त बोलल्या.

परांजपे म्हणाल्या,
"आपल्या आयुष्यात खूप शिक्षक येतात.हे शिक्षक काही माणसं असतात,काही प्राणी, वनस्पती आणि दुसरे आपल्या जीवनातले अनुभवातून निर्माण झालेले शिक्षक असतात.
काही वस्तविक आहेत, काही नाहीत.
आपले पहिले शिक्षक म्हणजे आपले आईवडील.ते आपला मानसिक विकास करतात. जीवनातली दीशा दाखवतात.त्यांचा एखादा प्रेमळ शब्द आणि आणि एखादी सम्मति खरोखरच त्या दिवसाची दीशा बदलू शकते.कधी कधी जीवनातल्या मार्गाची पुनकृति करू शकते.बरेच वेळा मी ऐकलंय की एखादा शिक्षक नकळत येऊन ज्याची अगदी जरूरी आहे तेच देऊन जातो. माझी एक शिक्षिका आहे तिला असा विचार करायची जरूरी भासत नाही.तिच्या कडून मी शिकलेयं,की जीवित राहाण्यासाठी ह्या धरतीचा आदर असावा, पाण्याचा आदर असावा.माझ्या स्वतःच्या अनुभवाची विशिष्टता स्विकार करायला मी शिकलेयं. आणि इतरांच्या अनुभवाच्या विशिष्टतेची पण मी स्विकार करते.

त्या शिक्षिकेला अनोळख्याला आणि स्वतःच्या कुटूंबातल्याना मदत देताना मी पाहिलंय. काही निराधार लोकाना मी तिच्या दुकानाच्या बाहेर उभे राहिलेलं पाहिलं आहे.त्यांना माहित असायचं की ती त्यांना काही अन्न देणार आणि अदबीने त्यांची विचारपूस करणार.ती सर्वांशी अगदी दया करून वागते आणि तिला जमेल तेव्हडं चांगलं करण्याचा प्रयत्न करते.ती खूपच मेहनती बाई आहे.तिचं मी इथे नाव दिलं असतं तर ते पाहून तिला खूपच लाजल्या सारखं वाटलं असतं.ती खर्‍या अर्थाने शिक्षिका आहे.
एखादा /एखादी उद्धट शब्द वापरणारी किंवा दुषकर्म करणारी शिक्षिका/शिक्षक जीवनातली मनोहर्ता घालवून बसते.अशाने गुणगुण करणारं एखादं मूल पुन्हा कधीच गाणार नाही.एखादा कलाकार आपल्या वाखाण्याजोग्या प्रतिभेकडे पाठ फिरवील.प्रतिभा ही मुलांसारखी आहे.आपल्यातून जशी मुलं होतात आणि नंतर त्याची जोपासना करावी लागते तसंच प्रतिभेचं आहे.असं असूनही त्यांवर आपला हक्क नसतो.कारण असलेली प्रतिभा ही इतरांसाठी असते.ती त्याना परत द्दावी लागते.

एका माणसाची मी खूप प्रशंसा करायची.त्याचा सन्मान करायची.त्याच्या अंगात कला होत्या.त्याच्या वाडवडीलानी त्याला ज्ञानाचा साठा सुपूर्द केला होता.मला त्याच्याकडून शिकायचं होतं.वडीलधार्‍यांकडून मी नेहमीच शिकत असते.शेवटी आपल्यातला प्रत्येकजण आदल्या पिढीचा पाईक असतो आणि त्याला आपलं ज्ञान पुढच्याना प्रदान करायचं असतं.त्यामुळे ज्ञानाची वाढ होते.त्या माणसाजवळ जे होतं ते आम्हाला देण्यासाठी होतं. परंतु त्याने माझा अवमान करण्याचा प्रकार केल्याने मला त्याच्यावरच्या विश्वासाला बाधा आली.माझी कुचेष्टा झाली,मी खूपच रागावली आणि नंतर दुःखी झाली.
नंतर माझ्या लक्षात आलं.त्याच्या चारित्र्याची सत्यता माझ्याशी संवाद करीत होती पण मला तो संवाद ऐकायचा नव्हता.मला जे हवं ते मी त्याच्यात हुडकण्याचा प्रयत्न करीत होते.पण तो माणूस खराच कसा होता ते मी पहात नव्हते.

कधी कधी अतिबुद्धिमान शिक्षक आपल्यातूनच येत असतो. आपण आपल्या मनाच्या वरवरच्या थरावर एव्हडे जखडले जातो की आपल्या प्रत्येकाच्या आतल्या बुद्धिमान शिक्षिकाचा आपल्याला विसर पडतो.खरंतर तो बुद्धिमान शिक्षिक आपल्याला योग्य दीशा दाखवू शकतो.नेहमी तो खरा अर्थ सांगू शकतो.कोणत्या मार्गाने जावं ते तो सांगू शकतो. तसंच कुठचा मार्ग पत्करू नये हे पण सांगू शकतो.आणि तो आपल्याशी नेहमी बोलतो आणि दयाळूपणे मार्ग दाखवित असतो.खरंतर आपण अशा शिक्षकाला किती तरी वेळा दुर्लक्षीत केलेलं असतं हे आपल्यालाच ठाऊक नसतं.
म्हणून म्हणते,
"जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांशी,तुमच्या आईवडिलांशी,इतर नातेवाईकांशी,मित्रमंडळींशी नव्हेतर तुमच्या शत्रूशी सुद्धा बोलता, तेव्हा, किंवा उगवलेल्या नव्या दिवसाच्या नव्या समस्या आल्यावर,किंवा दिवसाच्या शेवटी माथं टेकताना हे विसरूं नका की आपण सर्व शिक्षक आहोत आणि आपण एकमेकासाठी पण शिक्षक आहोत."

प्रो.परांजपेबाईंचं हे भाषण ऐकून मला खूपच बरं वाटलं.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

शेखर's picture

18 Feb 2009 - 8:05 am | शेखर

जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांशी,तुमच्या आईवडिलांशी,इतर नातेवाईकांशी,मित्रमंडळींशी नव्हेतर तुमच्या शत्रूशी सुद्धा बोलता, तेव्हा, किंवा उगवलेल्या नव्या दिवसाच्या नव्या समस्या आल्यावर,किंवा दिवसाच्या शेवटी माथं टेकताना हे विसरूं नका की आपण सर्व शिक्षक आहोत आणि आपण एकमेकासाठी पण शिक्षक आहोत

सुंदर लेख.

शेखर

प्राजु's picture

18 Feb 2009 - 8:14 am | प्राजु

खूप आवडला.
परांजपे बाईंमध्ये प्रामाणिक शिक्षिका दिसली.
मस्त लेख.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

योगी९००'s picture

18 Feb 2009 - 11:15 am | योगी९००

आणि सामंत काकांच्या लिखाणाही तितकाच प्रामाणिकपणा जाणवतो.

खादाडमाऊ

प्रकाश घाटपांडे's picture

18 Feb 2009 - 2:20 pm | प्रकाश घाटपांडे

त्या माणसाजवळ जे होतं ते आम्हाला देण्यासाठी होतं. परंतु त्याने माझा अवमान करण्याचा प्रकार केल्याने मला त्याच्यावरच्या विश्वासाला बाधा आली.माझी कुचेष्टा झाली,मी खूपच रागावली आणि नंतर दुःखी झाली.
नंतर माझ्या लक्षात आलं.त्याच्या चारित्र्याची सत्यता माझ्याशी संवाद करीत होती पण मला तो संवाद ऐकायचा नव्हता.मला जे हवं ते मी त्याच्यात हुडकण्याचा प्रयत्न करीत होते.पण तो माणूस खराच कसा होता ते मी पहात नव्हते.

अगदी खर आहे. सुंदर लेखन सामंत साहेब
प्रकाश घाटपांडे

श्रीकृष्ण सामंत's picture

19 Feb 2009 - 10:34 pm | श्रीकृष्ण सामंत

प्रतिक्रियेबद्दल आपल्या सर्वांचे आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com