भेट तुझी-माझी स्मरते...

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
16 Feb 2009 - 10:55 am

वैधानिक इशारा : हा लेख राजकारणाविषयीचे (जरा अतीच सविस्तर) विडंबन असून, राजकारण न आवडणार्‍या व्यक्तींनी त्याकडे न फिरकणेच त्यांच्या आरोग्यासाठी उपकारक राहील.

मीडियावाले हल्ली "टीआरपी'साठी वाट्टेल त्या बातम्या देत सुटले असल्याचा आरोप खराच आहे की काय, अशा शंकेला पुरेपूर वाव मिळण्यसारखंच मीडियाचं वागणं आहे. कोणत्याही साध्या भेटीतून, चर्चेतून, वक्तव्यातून ब्रेकिंग-एक्‍स्कुझिव्ह न्यूज शोधण्याचा प्रयत्न करण्यातूनच मीडियाची विघ्नसंतोषी, मतलबी वृत्ती ठायीठायी जाणवू लागली आहे. मध्यंतरी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. काका-पुतण्याची केवळ तब्येतीच्या चौकशीसाठी झालेली ती भेट होती. मुलायमसिंह-अमरसिंह जोडगोळीनं ज्या निरपेक्ष देशभावनेतून कॉंग्रेस सरकारला पाठिंबा दिला, तेवढीच ही भेटही पवित्र होती. तिथेही मीडियानं राजकारण शोधण्याचा प्रयत्न केला. अशोक चव्हाण यांनी नारायण राणेंची भेट घेतली, तीदेखील त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून महाराष्ट्रापुढील काही महत्त्वाच्या समस्यांविषयी मार्गदर्शन मिळविण्यासाठी होती.
प्रत्येक गोष्टीत "गॉसिप' शोधणाऱ्या मीडियानं अलीकडेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे आजी उपमुख्यमंत्री व भावी संभाव्य मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सदिच्छा भेटीचंही भांडवल करण्याचा प्रयत्न केला. या भेटीत काय घडलं, याच्या केवळ अंदाजपंची बातम्या सगळीकडे आल्या. त्याचं खरंखुरं वृत्त कुठेच आलं नाही. ते इथे देण्याचा प्रयत्न ः छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर हे सर्वजण सपत्नीक "मातोश्री' निवासस्थानी पोचले, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांची वाटच पाहत होते. रश्‍मीताईंनी सर्व वहिनींचे स्वागत केले. त्यानंतर सगळे जण बाळासाहेबांना भेटायला आत केले. नमस्कार चमत्कार झाल्यावर सगळे जण स्थानापन्न झाले.
बाळासाहेब ः बरेच दिवस लावलेत, भुजबळ!
भुजबळ ः हो ना! व्यापात जमलंच नाही यायला. तरी, मी पंकजकडून तुमच्या तब्येतीची माहिती घेत होतो वेळोवेळी. आता कशी आहे तुमची तब्येत?
बाळासाहेब ः मायमराठीचा झेंडा फडकत ठेवण्यासाठी मी व्रतच घेतलंय, भुजबळ साहेब! मी ढेपाळलो, तर कसं चालेल?
भुजबळ ः खरं आहे, साहेब. पण आता तुम्ही उद्धवच्या खांद्यावर सोपवलेय ना जबाबदारी?
उद्धव ः (मध्येच हस्तक्षेप करून) भुजबळ, राजकारणावर अजिबात चर्चा करायची नाही, असं बजावलंय बाळासाहेबांनी! आपली ही सदिच्छा भेट आहे.
भुजबळ ः अरे हो, हो, विसरलोच होतो! बाकी, औषधं वगैरे सुरू आहेत ना व्यवस्थित?
बाळासाहेब ः तर! तुम्ही पण माझ्यासाठी हा खजूर-बिजूर आणलाय म्हणे! ठेवा तो. तो खाऊन आणखी टुणटुणीत होतो आणि दोरीच्या उड्या मारायला सुरवात करतो उद्यापासून!
(सगळ्या दालनात हास्यकल्लोळ.)
बाळासाहेब ः तुमच्या नाशिकच्या फार्मवरची झाडं कशी आहेत आता?
भुजबळ ः उत्तम! काही औषधी वनस्पती पण लावल्या आहेत. तुम्हाला पाठवून देईन. काहीकाही कडू औषधांचे डोस आमच्या काही मित्रांनाही पाजायचे आहेत लवकरच!
उद्धव ः भुजबळ साहेब, मघाशी आपलं काय ठरलंय?
भुजबळ ः अहो, मी औषधांबद्दलच बोलतोय! पंकज भेटला होता ना तुम्हाला मध्यंतरी?
बाळासाहेब ः हो तर! लग्नाची पत्रिका द्यायला आला होता तो. आज सुनांशी प्रत्यक्ष भेट झाली. शर्ट छान आहे हं तुझा पंकज! देशी की विलायती?
(पंकज काहीच बोलत नाही.)
बाळासाहेब ः असू दे असू दे. बाकी, आम्हाला विलायतीच आवडतं बुवा! द्या टाळी!!
(भुजबळ टाळी देतात.)
बाळासाहेब ः अरे, विसरलोच! अंजीरवाडीच्या गणपती मंदिराची काय हकिगत? पूजाबिजा होते की नाही व्यवस्थित?
भुजबळ ः तर हो! सगळं व्यवस्थित चाललं आहे. त्याचीच कृपा आहे.
बाळासाहेब ः त्याची आणि भवानीमातेची कृपा आहे हे खरं. तुम्ही पुन्हा एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोचलात की त्यामुळेच!
भुजबळ ः हो ना! आता आपण एकत्र आलो तर...
(उद्धव पुन्हा भुजबळांना मघाचीच आठवण करून देतात.)
भुजबळ ः अरे हो रे! राजकारणाचा विषय काढायचा नाही, हे आहे माझ्या लक्षात! मी फोटोसाठी एकत्र येऊया म्हणतोय. बाळासाहेबांना फुलं देतानाचा फोटो काढायचा आहे.
उद्धव ः अच्छा, अच्छा! चला, भोजन करून घेऊया.
(सगळे जण भोजनाकडे वळतात. भोजनाच्या वेळीही हास्यविनोद आणि हवा-पाणी, तब्येत, इस्राईल-पॅलेस्टाईन युद्ध, भुजबळांच्या चष्म्याची बदललेली फ्रेम, बराक ओबामांचा शपधविधी, उद्धव ठाकरेंची नवी भटकंती, आदी विषयांवर चर्चा होतात.)
भोजन संपल्यावर भुजबळ आणि कुटुंबीय घरी जायला निघतात. इतर मंडळी पुढे गेल्यावर भुजबळ अचानक मागे फिरून पुन्हा बाळासाहेबांच्या जवळ येतात.
बाळासाहेब ः काही बोलायचं राहिलंय, का भुजबळ?
भुजबळ ः एक महत्त्वाचं बोलायचं राहिलं होतं.
बाळासाहेब ः 18 वर्षांत आपली भेट नसली, तरी मी तुम्हाला ओळखतो भुजबळ! निःसंकोचपणे बोला!
भुजबळ ः या वेळच्या निवडणुकीत...
उद्धव ः भुजबळ साहेब...
भुजबळ ः लक्षात आहे माझ्या! मला वेगळा विषय मांडायचाय.
उद्धव ः तरीही, निवडणुकीचा विषय नको.
भुजबळ ः हो. मी वेगळंच सांगतोय. या निवडणुकीतही मोठं आव्हान आहे. आमच्या सरकारची कामगिरी, युतीचा जोर, सगळंच पणाला लागणार आहे. आमचीही दमछाक खूप होणार आहे. तेव्हा...
बाळासाहेब ः तेव्हा काय?
भुजबळ ः तुमच्याकडे आज "खिमा पॅटीस' ज्यानं बनवलं, तो आचारी द्याल आमच्या दिमतीला? मग प्रचाराचं काही टेन्शन राहणार नाही!
(सगळे जण पुन्हा हास्यकल्लोळात बुडून जातात.)

राजकारणविरंगुळा

प्रतिक्रिया

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

16 Feb 2009 - 2:23 pm | मधु मलुष्टे ज्य...

मान गये अभिजीतदा झकास ! :)

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Feb 2009 - 2:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भुजबळ ः तुमच्याकडे आज "खिमा पॅटीस' ज्यानं बनवलं, तो आचारी द्याल आमच्या दिमतीला? मग प्रचाराचं काही टेन्शन राहणार नाही!

=))

सौ नंबरी!

अदिती

प्रकाश घाटपांडे's picture

16 Feb 2009 - 3:28 pm | प्रकाश घाटपांडे

आमाला अदुगर वाटल कि अरुन दातें च्या गान्याबद्दल हाय.
राजकारन न आवडनार्‍याल बी हे आवडन. खुद्द बाळासायब तुमाला वळकत नसतीन तरी बी त्यान्ला आवडन. भुजबळांन्ला बी आवडन.
लगे रहो अभिजित.
प्रकाश घाटपांडे

प्राजु's picture

16 Feb 2009 - 9:35 pm | प्राजु

खुसखुशीत..
घाटपांडे सरांशी सहमत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ब्रिटिश टिंग्या's picture

16 Feb 2009 - 9:48 pm | ब्रिटिश टिंग्या

तुमच्याकडे आज "खिमा पॅटीस' ज्यानं बनवलं, तो आचारी द्याल आमच्या दिमतीला? मग प्रचाराचं काही टेन्शन राहणार नाही!

:)

अरे सकाळमध्ये छापायला दे! सही आहे!

आपला अभिजित's picture

16 Feb 2009 - 9:53 pm | आपला अभिजित

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

लेख लिहायला जरा उशीरच झाला. ठाकरे-भुजबळ भेटीची बातमी वाचूनच बाहू फुरफुरले होते. पण लिहिणे झाले नाही. शंभर व्याप!
असो. उशिरा लिहूनही गोड मानून घेतल्याबद्दल धन्यवाद.