मला विरोपाद्वारे आलेली एक कविता इथे देत आहे.
"दुधवा" हे भारत-नेपाळ सरहद्दीवरील संरक्षीत अभयारण्य आहे.
त्या जंगलातील वास्तव्यात असतांना झालेल्या वाघाच्या दुर्मीळ दर्शनानंतर मला सुचलेली ही कविता...
-स्वागत
दुधवाच्या जंगलात...
दुधवाच्या जंगलात
आम्हाला एक वाघ दिसला,
पाहताच क्षणी सगळयांना
तो उंच गवतात जाऊन बसला.
पाहून त्या वाघाला
सारेच जण आनंदले,
डोळ्यात आमच्या उत्साहाचे
भाव ते दाटून आले.
पुन्हा तो दिसावा असे
सा-यांना वाटू लागले,
नि:स्तब्ध निरव शांततेत
प्रतिक्षा करू लागले.
बराच वेळ झाला तरी
बाहेर तो येईना,
दर्शनाची झलकही
तो काही देईना.
प्रतिक्षेची हद्द होऊन
एक महिला वैतागली,
दुस-या जंगलातील वाघांचे ती
मोठयाने कौतूक करू लागली.
"अमक्या तमक्या जंगलात
बरेच वाघ दिसतात,
अवती भोवती दोन जीप्सच्या
बिनधास्त सारे फिरतात."
वाघाने ते ऐकले
अन् एक डरकाळी फोडली,
मला तिथेच सोडून सा-यांनी
जीप भरधाव सोडली.
दुधवाच्या त्या रानवाटेवर
मी एकटाच उभा होतो,
वाघ लपलेल्या जागेकडे
टक लावून पाहात होतो.
माझ्यापासून वाघाचे
अंतर तसे फार नव्हते,
अंदाजाने माझ्या ते
केवळ दहा-बारा मीटर होते.
अवती भोवती सगळीकडे
माझी नजर शोधू लागली,
आसला घेण्याजोगी नव्हती
एकही तिथे जागा चांगली.
गवतामध्ये सळसळ झाली
अन् माझा श्वास थांबला,
दमदार पाऊले टाकत समोर
प्रत्यक्ष वाघच उभा ठाकला.
राजबिंडया त्या रुपाने
मनोमनी मी भारावलो,
त्याच्या त्या दर्शनाने
अंत:र्यामी मी सुखावलो.
खूप वेळ आम्ही दोघे
एकमेकांना निरखत होतो,
आता पुढे काय होईल
याचा अंदाज घेत होतो.
शब्दांची करून जुळवा जुळव
मी विचारणार त्याला काही...
...तोच म्हणाला, "घाबरू नकोस,
मी तुला खाणार नाही."
मी आनंदलो, फोटो त्याचा
काढण्यासाठी थोडा पुढे सरसावलो,
पण त्याच्या पुढील वाक्यांनी
जागच्या जागीच स्थिरावलो...
"आहेत माझे प्रश्न काही
उत्तर तू देणार का?
निसर्गाच्या विनाशाला
जबाबदार कोण तू सांगणार का?
लोकसंख्या वाढत गेली
गावे, नगरे फुगत चालली,
जंगल झाडे तुटत गेली
पक्षी कोटरे उजाड जाहली.
हिरवी कुरणे खुरटी झाली
रानफुलेही लूप्त झाली.
फुलपाखरे, किटक, प्राणी
सारी सारी बेघर झाली.
जीवनोपयोगी वृक्षांच्याही
अनेक जाती दुर्मीळ झाल्या.
मुक्त विहरणा-या वनचरांच्या
पिढयान् पिढया शिकारीत मेल्या.
अतिक्रमण केले तुम्ही म्हणोनी
आम्हीही वस्तीत शिरू लागलो,
भेकड मानवाच्या कपट चालीने
अलगद पिंज-यात अडकू लागलो.
निसर्गचक्र खंडीत करण्याचा
परिणाम पुढे होणार काय?
आम्ही आता संपत चाललो
तुमचे पुढे होणार काय?
चिऊ-काऊ, वाघ-सिंहाच्या गोष्टीच नुसत्या
पुढच्या पिढीला सांगणार काय?
प्रत्यक्ष बघण्याचा धरला जर हट्ट त्यांनी
तर तुम्ही दाखविणार काय?"
वाघाच्या त्या सरबत्तीने
मला काही सुचेना,
काय त्याला उत्तर द्यावे
मजला काही उमजेना.
पाहून माझी ती अवस्था
तो वाघ मोठयाने हसला,
"माझा एक फोटो काढ."
ऐटीत तो मला म्हंटला.
पडत्या फळाची आज्ञा मानून
मी कॅमेरा हाती घेतला,
दुधवाच्या जंगलातील वाघाचा
एक फोटो अलगद टिपला.
वाघ हळूच मागे वळला
दोन पाऊले चालत गेला,
अचानक तो फिरूनी वळला
आणि हसूनी मला म्हणाला....
"जगला वाचलास तर...
हो फोटो मानवाच्या पुढच्या पिढीला दाखव...
...आणि त्यांना सांग,
दुधवाच्या जंगलात, मी एक वाघ पाहिला...
...खरंच,
दुधवाच्या जंगलात मी एक जीवंत वाघ पाहिला."
प्रतिक्रिया
12 Feb 2009 - 8:26 am | मदनबाण
फारच सुंदर कविता...:)
अवांतर :-- http://www.youtube.com/watch?v=1LjG7S8aqJg
मदनबाण.....
देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
12 Feb 2009 - 8:40 am | अनिरुद्धशेटे
वाघांच्या समस्येवर उत्तम कविता!
12 Feb 2009 - 8:54 am | यशोधरा
फोटोही द्यायचा ना इथे.
ओह, विरोपाद्वारे आली आहे होय! ते वाचलेच नव्हते... :(
12 Feb 2009 - 11:29 am | घाशीराम कोतवाल १.२
हे बघा जरा
वाघोबाच्या साम्राज्याचा अंत
फोटोही घ्या
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
12 Feb 2009 - 11:36 am | ढ
मिपाचे धोरण वाचा.
12 Feb 2009 - 2:11 pm | माझी दुनिया
अरेच्च्या ! हे लक्षातच आले नाही. संपादकहो, क्षमस्व. खरं तर दुवा देण्यापेक्षा प्रत्यक्ष वाचायला बरे वाटते. पण आपल्याला खटकत असल्यास हा विषय उडवू शकता.
____________
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
_____________
माझी दुनिया
12 Feb 2009 - 5:52 pm | वाहीदा
पाहून माझी ती अवस्था
तो वाघ मोठयाने हसला,
"माझा एक फोटो काढ."
ऐटीत तो मला म्हंटला.
आता फक्त फोटोतच दिसणार वाघोबा !
~ वाहीदा
12 Feb 2009 - 8:19 pm | टिउ
इंग्रजांच्या काळात वाघांची संन्ख्या खुपच कमी झाली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस एका इंग्रज अधिकार्याने (नाव लक्षात नाही) त्याच्या कालखंडात ९००० वाघांची शिकार केल्याची नोंद आहे.
त्याशिवाय संस्थानिक...इतर काही काम नसायचं. संस्थानाचा कारभार इंग्रजच बघायचे. मग त्यांनी भेट दिलेल्या बंदुका घेउन राजे/महाराजे दिवसभर शिकार करत.
सध्या भारतात फक्त १००० वाघ शिल्लक आहेत. वाघांची संख्या दिवसाला एक या प्रमाणात कमी होत आहे.
12 Feb 2009 - 11:39 pm | भडकमकर मास्तर
त्याशिवाय संस्थानिक...इतर काही काम नसायचं. संस्थानाचा कारभार इंग्रजच बघायचे. मग त्यांनी भेट दिलेल्या बंदुका घेउन राजे/महाराजे दिवसभर शिकार करत.
मलाही पूर्वी असेच वाटत असे...
पण एका न्यूज चेनलवरील चर्चेत असे कळाले की आता जी अभयारण्ये म्हणून जाहीर झाली आहेत ती सर्व जंगले राजे महाराजांनी सिंहाच्या / वाघाच्या शिकारीसाठी शिल्लक ठेवली होती...... राजाच्या शिकारीसाठी का होईना, जंगले टिकवून धरली गेली म्हणून निदान आहेत तेवढे वाघ तरी शिल्लक आहेत असे काहीसे निरीक्षण होते....
.. खरे खोटे वाघच जाणोत...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/