देणार्‍याचे हात घ्यावे...

मृण्मयी's picture
मृण्मयी in जनातलं, मनातलं
1 Feb 2009 - 9:36 pm

"गजाभाऊ, काय हो काय झालं?" गजाभाऊ ४-५ मुलींच्या भेदरलेल्या घोळक्याला घेऊन येताच कारेकर बाईंनी चौकशी केली.
"त्यानलाच विचारा! सांगा महालक्ष्म्यांनो, खरं सांगा. लबाड बोलायचं काम न्हाई."
पाचातल्या चार महालक्ष्म्या खाली माना घालून उभ्या होत्या. पाचवी नुस्तीच टकामका बघंत उभी राहिली.
"बोला गं कुणीतरी पटापटा! बाकी कामं आहेत मला." कारेकर बाई वैतागून म्हणाल्या.
"ह्या काय बोलतील बाई? मीच सांगतो. ह्या पोरी मधल्या सुट्टीत फाटकावरून कुदून बाहेर गेल्या बोरंवाल्या म्हातारीकडं! म्हणाल तं एकीजवळ पैसा न्हाई. उधारीचा मामला! आधीची पण उधारी हाए ह्यातल्या दोघींची. म्हातारी सोडेना. पोंक्षेबाई हापडे करून चालल्या होत्या. त्यांनी बघीतलं. म्हातारीच्या टपररीतून बाहेर काढून माझ्या हवाली केलं. घाईत होत्या."
"काय गं मुलींनो, हे खरं नं?" पाच माना नंदीबैलासारख्या निमूट हलल्या.
'कुणाला विचारून शाळेच्या बाहेर पडलात?" पुन्हा शांतता.
"शाळेची शिस्त तर मोडलीतच. पण बाहेर कुणी परस्पर पळवून नेलं असतं म्हणजे? आणि पैसे नाहीत तर घ्यावं कशाला विकंत? शिक्षा म्हणुन उद्यापासून प्रार्थनेआधी अर्धा तास शाळेत हजर रहायचं. बोकील बाईंना मदत करा वाचनालयात. तुमच्या पालकांना चिठ्ठ्या पाठवणार आहे मी आता. पुन्हा असं व्हायला नको. आलं लक्षात?" कारेकर बाईंना नक्कीच घाई असावी .नाहीतर भलं मोठं लेक्चर झालं असतं. मुली जायला निघाल्या.
"उद्या पैसे चुकते करा. गजाभाऊ, ह्यांना वर्गात पोचतं करा. शिक्षकांना सांगा ह्या उशीरा का आल्या ते. कुणाच्या गं वर्गात तुम्ही?"
"दातार बाईंच्या."
"नेतो बाई." गजाभाऊ उत्तरले. "चला महालक्ष्म्यांनो. वर्गात चला. आता घरी चिठ्ठ्या जाणार. आईबाप चांगली पुजा करणार!! मजा!! कशाला ते सडके बोरं पेरु खाता? डबे न्हाई आणंत?" गजाभाऊंनी विचारताच त्यातली एक रडयला लागली.
"रडू कशापाई अंबाबाई? खाताना तर बोरं गोड लागले असतील! जाऊ दे. नको रडू! काई नाई म्हणणार आई. सांग माऊलीला 'पुन्हा असं नाई करणार' म्हणून."
"गजाभाऊ, आई नाहीये तीला. काकुकडे रहाते. घरचा अभ्यास नाही केला म्हणून काकुनं डबा दिला नाही आज. मग मधल्या सुट्टीत हीला भूक लागली म्हणून बोरंआज्जीकडे गेलो हीच्याबरोबर."
एव्हाना लुटखुट वर्गाजवळ आलं होतं. मुली वर्गात गेल्या. दातारबाई गजाभाऊंशी बोलायला बाहेर आल्या. सगळी रामकहाणी सांगून झाली.
"बाई, रडूबाईला पाठवता का माझ्याबरोबर ५ मिनिटं? अर्ध्या दिवसाची उपाशी आहे पोर. माझ्या डब्यातले चार घास खाईल तर अभ्यासात लक्ष तरी लागेल."
त्यादिवशी त्यांच्या डब्यातली भाजी पोळी खाऊन, तृप्त होऊन त्या आईविना पोरक्या पोरीच्या अंतरात्म्यानं गजाभाऊंना खूप आशीर्वाद दिले असावेत.

***
गजाभाऊ म्हणजे शाळेतलं लाडकं व्यक्तीमत्व! तासांचे टोल देण्या, नोटिस फिरवण्यापासून शाळेच्या अखेरीस रिक्षावाल्यानं बुट्टी मारली म्हणून मुलींना घरी पोचवून देण्यापर्यंत सगळी जबाबदारी त्यांचीच. गाजाभाऊंचं शाळेवर नितांत प्रेम आणि अर्थातच शाळेचं त्यांच्यावर!
गजाभाऊंचा अवतार म्हणजे खाकी शर्टावर खाकी पँट. शर्टाच्या खिशात पाच पन्नास पेन. पायात 'भरपूर ठिकाणी खिळे ठोकून दुरुस्त केलेल्या' चपला. तोंडात समस्त विद्यार्थीनींसाठी 'अंबाबाई, महालक्षुमी, विरजाई (ही पण फार पावरफुल देवी असावी) अशी संबोधनं.
शाळेची ट्रिप, गाईडचा कँप त्यांच्याशिवाय होऊच शकायचा नाही. गाईडच्या कँपला तर एकवेळ नीळ्या साडीतल्या परबबाई नसल्या तरी चालेल पण गजाभाऊ नाही तो कँप कसला? अश्या दिवशी भल्या पहाटे डेपोतून बस आणणं हे त्यांचच काम. जमलं असतं तर त्यांनी आधल्या रात्रीच ड्रायव्हर मंडळींना स्वतःच्या घरी झोपवून सकाळी चहा नाष्ता देऊन धरून आणलं असतं. ३-४ बसेस असल्या की गजाभाऊंचं ब्लड प्रेशर हाय!
"बाई तीनातल्या २ बशी न्हाई मागं. सांगु का ड्रायव्हरला थांबायला?" किंवा "पुढली बस फार फास चाललीय. सांगू का आपल्या ड्रायव्हरला ओव्हरटेक करायला?"असल्या घालमेलीत सगळ्या 'बशी' योग्य स्थळी पोचल्या, मुली मोजून त्या बरोब्बर नंबराइतक्या भरल्या की त्यांचा जीव भांड्यात पडायचा.
त्यांच्याबरोबरच्या ट्रिपमधे 'भोजन' हा हायलाईट! स्वतःच्या डब्यातली भाजी पुरी संपवून तारामावशींनी म्हणजे गजाभाऊंच्या सौ. नी काय पाठवलंय ह्याची उत्सुकता असायची. तारामावशी त्यांच्याबरोबर शंभर दीडशे मुलींसाठी खाऊ पाठवायच्या. कधी कणकेच्या लाडवातला घास नाहीतर मुठभर चिवडा हाती मिळायचा. चवदार खाऊसाठी गजाभाऊंसमोर लाईन लागायची. आमचं खाणं पीणं आटोपलं की ते ड्रायव्हर मंडळींबरोबर जेवायला बसायचे. रिटायरमेंटला आलेल्या कर्णिकबाई मग हळूच त्यांच्या पाठीवर हात फिरवून म्हणायच्या,
"गजा, किती धावपळ करशील राजा? खाऊ घालणं पुरे आता. जेवायला बस." मग बाई हळूच गजाभाऊंच्या आवडीची डब्यात आणलेली भाजी त्यांच्या हाती द्यायच्या.
अश्याच एका सहलीला एका शेताच्या बांधाजवळ मुली डबे खायला बसल्या. शेजारी पेरुची बहरलेली बाग.
"गजाभाऊ, पेरू" मुलींचा लकडा.
"मालकाला विचारल्याबिगर कशे तोडायचे विरजायांनो! चोरी करणं पाप!" मुली गप्प बसल्या. जरा वेळानं २-३ मुली आणि दातारबाई हातात एक एक पेरु घेऊन येताना दिसल्या. मागून कुणीतरी धावत आलं.
"ओ बाई, कोणाला इचारून पेरू घेतले?"
"अहो बांधाजवळ पडलेले उचलले. तोडले नाहीत." दातारबाई म्हणाल्या.
"थी बी चोरीच!"
बाई लाजेनं अर्धमेल्या झालेल्या. तेव्हड्यात गजाभाऊ पुढे झाले.
"ओ भाऊ रंगदारी करायचं काम न्हाई. इथे बसायची परमिशन घेतली मालकाकडून तव्हाच मालकानं पेरू खायाची बी परमिशन दिली. माझ्या पोरी गुणाच्या. एकीनं आतापावतर तोंड न्हाई लावलं पेरुला. अन गोंधळ नको म्हणून मी 'मालकाची परवानगी न्हाई' म्हणालो. बाई पोटुशी! वाटलं एक पेरू खावा तर तुझा बगीचा काय ओस पडं का?"
राखणदारवजा दिसणारा तो माणूस दातारबाईंच्या मोठ्ठ्या पोटाकडे बघून खजील होऊन चालता झाला. तासाभरानं पेरुंनी भरलेली एक मोठ्ठी टोपली आमच्याकरता हजर झाली. 'माझ्या पोरींनी न विचारता पेरुला तोंड लावलं नाही' ह्याचा गजाभाऊंना कोण अभिमान!

***
गजाभाऊंची सांपत्तिक स्थिती तशी बेताचीच असावी. पाचवीत कधीतरी रिक्षेवाला आला नसताना त्यांनी सायकलवर बसवून घरी सोडलं होतं. वाटेत तारामावशींना "अंबाबाईला घरी सोडून येतो" म्हणून सांगायला ते घराशी थांबले. तेव्हा त्यांचं चंद्रमौळी तरी नीटनेटकं लावलेलं घर बघायला मिळालं होतं.
"रिक्षेवाल्याची वाट बघत पोर भुकेली झाली असेल." म्हणून मला घरातून झुणका पोळीची गुंडाळी खायला मिळाली होती. अप्रतीम चव!
आम्ही शाळेत घालवलेल्या ८-१० वर्षांत त्यांना सतत हसतमुखानं काम करताना बघीतलं होतं. शाळेतल्या विद्यार्थींनींइतकच त्यांच भिंती, टेबल खुर्च्या, फळे आणि मैदानावर प्रेम. भिंतीवर शाईचे डाग पाडले, मैदान उकरलं की 'कशापाई नुकसान करता?' हा त्यांचा कळकळीचा सवाल असे. "कुठल्या अंबाबाईचं काम ह्ये?" असं विचारत डाग स्वच्छ केला जाई, मैदानातला खड्डा माती टाकून सारखा केला जाई. खाऊचा पैसा 'संचयीका' नामक बँकेत टाकला की भविष्यात कश्शाची ददात पडणार नाही ही ठाम समजूत गजाभाऊंमुळे!!!

***

आता शाळेतून बाहेर पडून बरीच वर्ष लोटलीत. रेगेबाई, कर्णिकबाई अश्या लाडक्या शिक्षकांइतकीच गजाभाऊंची आठवण होते.
असाच एकदा शाळेत जायचा योग आला, शाळा सोडून जवळापास १५ वर्षांनंतर! शाळेचं गॅदरिंग होतं. जिव्हाळ्याची बाब! तेव्हा 'तयारी' नामक अपूर्व सोहळा बघायला जायचं ठरवून शाळेत आले. मुख्याध्यापिकाबाईंनी त्यांच्या खोलीत बोलवलं. आम्ही शिकंत असताना जराच वर्षांपूर्वी जॉइन झालेल्या चित्रेबाई मुख्याध्यापिका झाल्या होत्या. दार उघडून, परवानगी मागून आत गेले.
"कित्ती वर्षांनी भेटतेयस गं!" नमस्कारासाठी वाकताच चित्रेबाई पोटाशी घेत म्हणाल्या. आजुबाजुचे ओळखीचे फोटो, ट्रॉफिज बघताना आठवणींचे खूप कप्पे उघडंत होते.
"जिम्नॅशियम मधे नाचाची प्रॅक्टिस जोरदार सुरू आहे. बघायचीय?" मी लागलीच होकार दिला. तेव्हड्यात टेबलावरच्या पाकीटाकडे बाईंचं लक्ष गेलं.
"अरे रामा, विसरलेच." पाकीट उघडंत त्या म्हणाल्या.
"काय झालं बाई?"
"अगं पळंत जा आणि गजाभाऊंना ही पावती देऊन ये."
"गजाभाऊ? शाळेत?" त्यांना रिटायर होऊन बरीच वर्ष झाली होती.
"हो हो. फाटकापर्यंतच पोचले असतील बघ. जा पटकन."
मी पावती घेऊन देह आवरत धावत सुटले. गजाभाऊ कुणाकुणाशी बोलंत फाटाकापर्यंत पोचलेच होते.
"गजाभाऊ!!!!!! ओळखलंत?"
"कसा विसरेन विरजाई. केव्हड्या मोठ्या झाल्या पोरी!" माहेरचं जीवाभावाचं माणुस भेटल्याचा आनंद झाला. मी कुठे असते, काय करते ह्याची गजाभाऊंनी आवर्जून चौकशी केली.
"गजाभाऊ, घरी निघालात? थांबा ऑटोरिक्षा करून देते."
"नको पोरी, घाईत आहे. जावई येतात घ्यायला."
"मग त्यांच्याबरोबर आईकडे चला. तीथे बसून गप्पा करु." मी म्हणाले.
"वेळ असता तर आलो असतो. पण आता गाडीची वेळ झाली."
"कुठे परगावी निघालात?" शिव्या खाल्ल्या तरी 'कुठे जाता' विचारायची सवय सुटत नाही.
"ह्या गावचं दाणापाणी संपलं आपलं. तारा गेली. आता पोरी एकटं र्‍हाऊ देत नाहीत. म्हणून त्यांच्याकडे मुकाम. जावई न्यायला आले. काय करावं? जावंच लागतं. पोरी जीव टाकतात माझ्यावर. त्यांना दुकवून काय करू?" एव्हाना आम्हा दोघांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. मी नमस्काराला वाकले तशी मला उठवत गजाभाऊ म्हणाले,
"सुकात रहा. आता तुम्ही, ही शाळा कधी दिसेल माहित न्हाई." तेव्हड्यात त्यांचा जावई आला. मी रिक्षात बसायला त्यांना आधार देत म्हणाले,
"गजाभाऊ, चित्रेबाईंनी ही पावती दिलीय. विसरलेच होते."
"ह्याचं काही काम न्हाई." म्हणंत त्यांनी त्याचे चार तुकडे करून खिशात कोंबले. ओझरत्या नजरेनं मी बघीतलं, बर्‍याच मोठ्या रकमेची पावती होती. गजाभाऊंचा रिक्षा डोळ्याआड झाला.
मी परत चित्रेबाईंच्या खोलीत आले.
"अगं गजाभाऊंनी शाळेतल्या सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजनेला देणगी दिलीय." चेक ड्रॉव्हरमधे घालत त्या म्हणाल्या.

***

गॅदरिंगच्या उद्घाटनाला अहवालवाचन झालं. शाळेसाठी आर्थिक मदत करणार्‍या दात्यांची नावं वाचल्या जाऊ लागली. नावं घेतलेली मंडळी जागेवर उभी राहिली. टाळ्यांचा गजर झाला..
"आणि अखेर एक महत्वाची देणगी, पंचवीसहजार रुपयांची! नाव जाहीर न करण्याची विनंती दात्यानं केलीय.."
मला पुढचं ऐकु येईनासं झालं! स्टेज अंधुक दिसायला लागलं...
शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय?

***************************************

समाजलेख

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

1 Feb 2009 - 9:48 pm | संदीप चित्रे

हा लेख वाचून छान वाटलं :)
लिखती रहो !

धनंजय's picture

3 Feb 2009 - 6:47 am | धनंजय

असेच म्हणतो. आवडले गजाभाऊ.

सांपत्तिक परिस्थिती बेताची असून गजाभाऊ एकटेच नव्हे, तर ताराबाईसुद्धा मुलींसाठी प्रेमाने खपायच्या, म्हणजे शाळेशी नाते गहिरेच.

प्राजु's picture

1 Feb 2009 - 9:59 pm | प्राजु

शब्द संपले..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

2 Feb 2009 - 3:54 pm | विसोबा खेचर

हेच बोल्तो..!

सुरेख लिहिलं आहे.. जियो..!

तात्या.

शक्तिमान's picture

1 Feb 2009 - 10:03 pm | शक्तिमान

जबरदस्त!

यशोधरा's picture

1 Feb 2009 - 10:59 pm | यशोधरा

किती गो छान मृण ह्या! कदीही वाचल्यार डोळ्यांत पाणी येताच गो! :)

अवांतरः पिडांकाकांनी पैज मारल्यान माझ्यावांगडा की कोकणीतूनच अभिप्राय लिवन दाखय, तेह्वा आता कोकणीतूनच लिवतय!

पिवळा डांबिस's picture

1 Feb 2009 - 10:59 pm | पिवळा डांबिस

शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय?
अगदी खरां बोललंय, माझ्ये बाये, अगदी खरां!!!

शितल's picture

1 Feb 2009 - 11:14 pm | शितल

लिहिले आहे.
गजाभाऊ यांच्या मनाच्या मोठेपणाला सलाम :)

शशिधर केळकर's picture

1 Feb 2009 - 11:54 pm | शशिधर केळकर

लिहायला शब्दच नाहीत. हेच खरे.
असे गजाभाऊ सर्वाना सर्वत्र लाभोत आणि '...देणार्‍याचे हात घ्यावेत' या उक्ती प्रमाणे या गजाभाऊंसारखे कधीतरी काही थोडेतरी आपल्यालाही करता वागता येवो!
सुंदर प्रकटन!

चंबा मुतनाळ's picture

2 Feb 2009 - 5:54 am | चंबा मुतनाळ

फार सुंदर लेख!
काळजाला भिडला.
गजाभाऊंना सलाम!!

- चंबा

विंजिनेर's picture

2 Feb 2009 - 7:36 am | विंजिनेर

गजाभाउंच शाळेवरचं ओबडधोबड पण सच्चं प्रेम आणि तितकाच सुंदर शेवट.
गजाभाउंची गोष्ट तर गळ्यात आवंढा दाटविणारी आहेच पण तुमच्या लेखणीतून उतलीयसुद्धा तितक्याच हळुवारपणे.
छान केलीत सुरवात दिवसाची...

परिकथेतील राजकुमार's picture

2 Feb 2009 - 4:19 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत
माझ्या मनातली प्रतिक्रिया माझ्या आधी लिहिली ह्यांनी !

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

अनिल हटेला's picture

2 Feb 2009 - 8:03 am | अनिल हटेला

छान लिहीलये गं वीरजाई !!!

:-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्रभाकर पेठकर's picture

2 Feb 2009 - 8:19 am | प्रभाकर पेठकर

अप्रतिम व्यक्तिचित्र. आपल्या लेखनशैलीला सलाम. शेवटी डोळे ओलावले.
आयुष्यात जमलेच गजाभाऊंसारखे व्हायचा प्रयत्न करू, अन्यथा इश्वराकडे दुसरा जन्म मागू.

प्रमोद देव's picture

2 Feb 2009 - 9:22 am | प्रमोद देव

पेठकर साहेबांशी पूर्णपणे सहमत!

सहज's picture

2 Feb 2009 - 9:08 am | सहज

>शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय?

मस्त!

सिद्धेश's picture

2 Feb 2009 - 10:18 am | सिद्धेश

वि.दा. च्या 'घेता' कवितेचा मतितार्थ आपल्याला चान्गला समजला

अनामिका's picture

5 Feb 2009 - 10:33 am | अनामिका

ह्या आमच्या कृतीने आंम्हा माजीविद्यार्थ्यांस मिळालेले समाधान व आनंद केवळ अवर्णनियच मॄण्मयी :)
खुप सुंदर लिहिले आहेस्..............शाळेतले शिपाई हे पद फक्त राबण्यासाठीच असते असा सर्वमान्य समज्........पण हेच शिपाई सगळ्या शाळेचा भार आपल्या खांद्यांवर समर्थपणे पेलत असतात्..........सहसा यांच्या कार्याची दखल घेतली जातेच असे नाही................
माझ्या शाळेचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे या निमित्ताने शाळेच्या मा़जी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन शाळेने दिनांक ११ जानेवारी रोजी आयोजीत केले होते...............यासाठी तयारी करताना काही तरी वेगळ करायची अनिवार इच्छा होती..............माजी विद्यार्थ्यांनी काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याचे ठरवले पण आपण देखिल आपल्या शिक्षकांसाठी कायम स्मरणात राहिल असे काही तरी करावे या प्रामाणिक भावनेने आम्ही माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आजपर्यंतच्या सगळ्या आजी व माजी शिक्षकांचे सत्कार करायचे असे ठरवले. ..............पण त्याच बरोबर सर्व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सत्कार करण्याचे देखिल ठरवले................जे माजी विद्यार्थी या स्नेहसंमेलनाला प्रेक्षक म्हणुन उपस्थित रहातील त्यांच्यातल्याच कुणाला तरी व्यासपिठावर आमंत्रित करुन त्यांच्या हस्ते या सर्वांचे सत्कार करुन घ्यावा अशी एक कल्पना सुचली व ती सर्वमान्य देखिल झाली............................तुझे जसे गजाभाऊ तसे आमचे उमाजीकाका .........शाळेत असतानासुद्धा त्यांना कधी मुलांवर रागावताना अथवा चिडताना बघितलेल नाही..............कायम हसतमुख रहाणारे उमाजीकाका खर तर मागील वर्षी निवृत्त झाले होते पण शाळेने संस्थेला विनंती करुन त्यांचा १ वर्षाचा सेवाकाल वाढवुन मागितला यात सर्वकाही आले..............त्यांचा ६० वा वाढदिवस देखिल शाळेने आणि विद्यार्थ्यांनी शाळेत साजरा केला............सतत पायी फिरणारे अगदिच वेळप्रसंगी सायकलवर जाणारे आमचे उमाजीकाका आज देखिल आहेत तसेच आहेत्................शाळेत २० वर्षांनंतर गेल्यावर बरेच काही बदलले आहे असे जाणवले पण उमाजीकाकांमधे तिळमात्र फरक नाही.................जुन्या शिक्षकांचे पत्ते व दुरध्वनी क्रमांक उमाजीकाकांना तोंडपाठ होते........जे पत्ते शब्दशः माहित नव्हते त्या सगळ्या पत्त्यांच्या आसपासच्या सगळ्या खाणाखुणा त्यांनी आंम्हाला समजावुन सांगितल्या...........त्यांच्याच मुळे आम्ही आमच्या प्राथमिक विद्यालयाच्या सर्व माजी शिक्षकांना बोलावु शकलो................सत्कारासाठी उमाजीकाकांना व्यासपिठावर बोलावताना आंम्हा सुत्रसंचालन करणार्‍यांना शब्द सुचत नव्हते ....................त्यांच्या सत्कारासाठी कुणालातरी व्यासपिठावर आमंत्रित करण्यापुर्वीच एक माजी विद्यार्थिनी धापा टाकत व्यासपिठावर आली आणि ध्वनीक्षेपक हातात घेऊन उमाजीकाकांच्या आठवणी सांगायला सुरुवात केली ...............आम्ही सगळे फक्त उमाजीकाकांच्या चेहर्‍याकडे पहात होतो .............आत्यंतिक समाधान व तृप्त भाव त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते ".............त्या मुलीचे शब्द ऐकताना आमचे डोळे मात्र अखंड पाझरत होते ..............उमाजीकाकांना दोन शब्द बोलायची विनंती केली पण ते फक्त हसले ,चेहर्‍यावर हसु आणताना त्यांचे डोळे मात्र अशृंनी डबडबलेले होते...............त्यांच ते रुप पाहुन आंम्हाला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले........त्यानंतर आमच्या वर्तकबाईंनी आपल्या भाषणात आमच्या या कृतीचे कौतुक करताना जे वाक्य वापरले ते कायमचे मनावर कोरले गेले"या माजी विद्यार्थ्यांनी कळसाच्या चकचकाटाकडे न बघता मंदिराचा पाया घालणार्‍यांना सन्मानित केले ही अतिशय आनंदाची बाब आहे"
असे लाखो उमाजीकाका आणि गजाभाऊ या देशात आहेत्...........................या सगळ्यांचे ऋण फेडणे कुठल्याही विद्यार्थ्यासाठी अशक्यच....................पण संधी मिळाली तर या गुणीजनांचे उतराई होण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्याने जरुर करावा ..........................शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय? हे मात्र अगदी खरं!!!!!!!!!!!!!

"अनामिका"

मॅन्ड्रेक's picture

2 Feb 2009 - 12:27 pm | मॅन्ड्रेक

आणखि काय लिहु.

Mandrake -
at and post : janadu.

निखिल देशपांडे's picture

2 Feb 2009 - 4:42 pm | निखिल देशपांडे

खुप सूंदर लिहिले आहे.....

लिखाळ's picture

2 Feb 2009 - 5:25 pm | लिखाळ

छान व्यक्तिचित्र. आवडले.
-- लिखाळ.

शाल्मली's picture

2 Feb 2009 - 6:58 pm | शाल्मली

गजाभाऊंवरचा लेख आवडला.
भावस्पर्शी लेखन!!

--शाल्मली.

शंकरराव's picture

2 Feb 2009 - 7:05 pm | शंकरराव

सहमत

शंकरराव

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

2 Feb 2009 - 7:25 pm | मधु मलुष्टे ज्य...

अनामिका आणि मृण्मयी

गजाभाऊ आणि उमाजीका दोन्ही खुप आवडले. लेख वाचला आणि गजाभाऊ डोळ्यासमोर उभे राहिले. मनात लगेच घर केले.

शाळेतले सुसंस्कार फक्त शिक्षकांकडून होतात असं कुठेय?
सलाम!

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

अनामिक's picture

2 Feb 2009 - 7:27 pm | अनामिक

खुप सुंदर... शब्दच नाहीत प्रतिक्रिया द्यायला.

अनामिक

शंकरराव's picture

2 Feb 2009 - 8:01 pm | शंकरराव

अनामिक पंत
कसे असे असणार शब्द तुमच्याकडे ...
ते तर सर्व "अनामिका" ने तिच्या वरिल प्रतिसादाला वापरले ना ;-)

प्रदीप's picture

2 Feb 2009 - 8:00 pm | प्रदीप

आवडला. तसेच त्याचे नावही अत्यंत समर्पक वाटले.

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील क्रिकेटसाठी प्रख्यात असलेल्या एका कॉलेजातील माजी क्रिकेटपटूंनी (ज्यात मुंबई व भारत ह्यांच्या संघांतील अनेक मोठी नावे आहेत), त्यांच्या प्रिय सरांचा सत्कार केला. त्याचबरोबर वर्षांनूवर्षे त्या कॉलेजच्या क्रिकेट संघाचा भार वाहणार्‍या गृहस्थांचाही हृद्य सत्कार केला, व सरांप्रमाणे त्यांनाही भेट अर्पण केली. त्याची आठवण झाली.

मृण्मयी's picture

2 Feb 2009 - 8:35 pm | मृण्मयी

अनामिका, उमाजीकाकांबद्दल वाचलं. फोटो बघीतला. सुरेख लिहिलंय! वर्तकबाईंचं ते वाक्य कायम लक्षात राहील!

आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रीयांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Feb 2009 - 10:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर ...

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

चतुरंग's picture

2 Feb 2009 - 10:44 pm | चतुरंग

गजाभाऊ वाचले आणि डोळ्यांनी दगा दिला नाही, ते आपसूक पाझरलेच!
असं मोठं मन आपण बर्‍याच वेळा व्यवहारिक दृष्ट्या छोट्या असलेल्या माणसांकडे अनुभवतो. ते कृतीतून शिकवून जातात जे आपल्याला आतपर्यंत स्पर्शून जातं.
आणि अनामिका उमाजीकाकांचा फोटो आणि आठवण देऊन तू एकप्रकारे लेखन पूर्णत्त्वाला नेलंस तुझेही आभार.

दिव्यत्वाची जेथे प्रचिती
तेथे कर माझे जुळती!

चतुरंग

बबलु's picture

3 Feb 2009 - 6:21 am | बबलु

गजाभाऊंचं व्यक्तिमत्व सुंदर उतरलंय तुमच्या लेखणीतून.
फारच छान.

....बबलु

घाटावरचे भट's picture

3 Feb 2009 - 6:35 am | घाटावरचे भट

फारच सुंदर लिहिलंय.

मुक्तसुनीत's picture

3 Feb 2009 - 6:47 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. लेख आवडला.

मॅन्ड्रेक's picture

4 Feb 2009 - 10:51 am | मॅन्ड्रेक

hi
I have read your experiance about गजाभाऊ
and forwarded to my friend . I am attching his reply herewith .

Great .
...........

Date: Mon, 3 Feb 2009 08:24:01 -0600
Subject: Re: गजाभाऊ
From: saundaryasohoni@gmail.com
To: abhy_ankar@hotmail.com
Dear Mahesh,
Apratim.

It took me back to my school days and atomospehere. Till I finished reading, I was totally in my school.
Very high nostalgic feelings. Very well written. Really great.

I am forwarding this to many of my school days friend and sure everybody would like it.
Keep sending.
Sanjay

at and post : janadu.