मोगरा

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
31 Jan 2009 - 12:08 pm

काल सवडीने रमत गमत बाजारात फिरत होते. फिरता फिरता फुल मंडई लागली आणि त्या मोगर्‍याच्या सुगंधाने मला ओळख दिली. लहान पणा पासुन आवडीचे फुल म्हणजे मोगरा. त्याला मिळालेल सुगंधाच वरदान हे त्याच्या आवडीचे गुपित.

लहानपणी ह्या मोगर्‍याची आणि माझी खुप घनिष्ठ मैत्री होती. मोगर्‍याचा वेल माझ्या दारातच होता. एप्रिल मे आणि जुलै ह्या महिन्यांमधे आमचा हा मोगर्‍याचा वेल बहरुन येत असे. मग रोज संध्याकाळ झाली की कळ्या काढायच्या आणि देवाला थोडी फुल बाजुला ठेउन गजरे करायचे. हा नित्यक्रम असायचा. त्या अर्धवट फुललेल्या फुलांसोबत संध्याकाळ अगदी शांत, प्रसन्न वाटत असे.

पावसाळ्यात त्या ओल्या कळ्या रिमझिम पावसात काढतानाचा त्यांचा स्पर्श काही वेगळाच आनंद देत असे. त्यामुळे हा वास पावसाची पण आठवण ओली करतो.

माझ्या सारखा अनेक जणांना हा वास काही ना काही आठवणी देउन जात असेल. कारण बहुतेक सण समारंभात फुलांच्या उपस्थितीत ह्यांचा अध्यक्षी मान असतो. लहान बाळाच्या बारश्यात हा मोगरा बाळाच्या पाळण्यासोबत नटुन बाळाला पाळणा गित गात असतो. कुणाकडे पुजा असेल तर परडी भरुन हा पुजेत मग्न असतो. साखरपुड्यात वधु सोबत हा नविन नाते जुळवतो. लग्नात हा सगळ्या महीला वर्गाच्या केशभुषा मिरवण्यात दंग असतो.

नवरी मुलीला तर ह्याची सोबत कायमची आठवणीत राहते. कारण हाच मोगर्‍याचा सुगंध तिच्या जिवनसाथीच्या स्विकारासाठी आतुर करत असतो आणि हाच सुगंध तिच्या माहेरच्या माणसांना निरोप देताना संवेदनाशिल आधार देत असतो.

मधुमिलनाच्या प्रसंगी तर हा सुगंध अवखळ होउन दोघांनाही धुंदी चढवत असतो. नवी नवरीची सोबत करुन तो तिला नविन आयुष्याच्या स्वप्नांची उधळणच करत असतो.

असा हा मोगर्‍याचा सुगंध बर्‍याच सुख, दुखः, प्रसन्न, अवखळ, शांत प्रसंगांची आठवण आपल्या सुगंधातुन दरवळवत असतो.

ललित

मांडणीविचार

प्रतिक्रिया

जखमा कश्या सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

ज्योति's picture

31 Jan 2009 - 5:10 pm | ज्योति

गजरा म्हटले कि मोगराच डोळ्या॑समोर येतो. त्याचा सुग॑ध काही औरच.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.