कृष्णमेघ कुंटे या एका रानवेड्याची जंगलातली मुशाफ़िरी.....! ख-याखु-या जंगलपुत्रासारखं राहून.... जे अनुभवलं ते सहजसुंदर शैलीत लेखकानं रेखाटलंय.
"काही पुस्तकं वाचायची नसतात, तर अनुभवायची असतात" असं म्हणतात ते अगदी खरंय. मिलिंदनं हे पुस्तक जरुर वाच असं सुचवलं तेव्हा ह्या पुस्तकात काहीतरी जबरी असणार ह्याची खात्री होती.... आणि झालंही तसंच ह्या पुस्तकासोबत आपण अक्षरश: जंगलात वावरतो. जंगल, निसर्ग ह्यावर मनापासून प्रेम करणा-या ह्या "कृ्ष्णमेघा"ची लेखन शैली इतकी ओघवती आहे ना...की आपण कधी त्याच्या सोबत जंगलात निघतो ते कळतंच नाही.
अतिशय मधुर आणि अलंकारिक भाषा ! आता हे बघा.....
पण फक्त त्या पळसाकडेच इतरांच्या नजरेला वेड लावायचा मक्ता नव्हता. पिवळ्या मोहरात आंधळं करणारं सोनं घेऊन झुकलेला बहावा, टपो-या लाल फुलांचे मधुरसाचे कुंभ घेऊन उभ्या ठाकलेल्या काटेसावरी, ठिणगीलाही फिक्कं पाडेल अशा रक्त-लालीच्या फुलांचे शिरपेच ल्यालेले पांगारे.. हे सारेच खांद्याला खांदे लावून उभे होते. मोयार गॉर्जच्या कपाळावर गर्दी केलेल्या बांबूची पानं सोनपिवळी पडली होती. वा-याच्या हळूच स्पर्शाबरोबर ती थरारून कापायची. सकाळी सूर्याच्या कोवळ्या किरणांनी डोंगरामागून बांबूच्या बेटाशी सलगी केली की मागच्या काळ्याशार कातळाच्या पार्श्वभूमीवर ही पानं कशी लकाकायची ! काय तो उठाव !
जागोजागी ही अशी शब्दालंकारांची उधळण....!! आपण इतकं तॄप्त होतो ना हे सगळं वाचताना....अनुभवताना.....!! प्रेमात पडल्याशिवाय शब्दांची अशी कशिदाकारी होऊच शकत नाही. लेखक सबंध एक ऋतूचक्र जंगलात उपभोगून आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक ऋतूमधला जंगलाचा साज अतिशय कलात्मकतेनी आणि आत्मियतेनी चितारलाय. त्यांच्या अनुभवात प्रचंड थरार आहे, जो वाचक अनुभवू शकतो. हे त्यांचं कथन म्हणजे, जंगलरसात न्हाऊन निघालेलं आणि वाचकांनाही रानवेडाची दीक्षा देणारं "मदुमलाई सूक्त" ! जे हातून निसटलं त्याची हुरहुर लेखकाला होते..तश्शीच वाचकालाही जाणवते.
पुस्तक उघडल्याबरोबर जाणवतं ते पुस्तकाचं देखणेपण !! गुळगुळीत, चकचकीत वेष्टनात गुंडाळलेलं गिफ़्ट उघडताना जसं वाटतं ना....तसं वाटतं हे पुस्तक उघडताना ! जिवंत चित्रं, मखमली पानं आणि जंगलातला थरार..... नितळ पारदर्शी लिखाण........ अहा..... मजा आ गया !!
अगदी वाचून अनुभवायलाच हवं असं पुस्तक !!
प्रतिक्रिया
30 Jan 2009 - 7:25 pm | आपला अभिजित
काही महिन्यांपूर्वीच वाचलं पुस्तक. परवा पुन्हा चाळलं.
अप्रतिम आहे. मुदुमलाईच्या जंगलात कृष्णमेघने घेतलेले अनुभव थरारक, रोमांचक आहेतच, पण त्याचं वर्णनही अतिशय मनोरंजक आणि उत्कंठावर्धक आहे.
ंरानकुत्र्यांच्या मागावर, अजगराच्या जवळून जाण्याचा प्रसंग आणि हत्तींच्या तावडीत सापडल्यानंतरचा अनुभव, सगळंच कायम स्मरणात राहणारं आहे.
मुदुमलाईच्या जंगलात तीन दिवस राहण्याची संधी मलाही मिळाली. पण मी अगदीच सुरक्षित अशा ठिकाणी, रेस्ट हाऊसवर राहत होतो. कृष्णमेघनं वर्षभर केलेली भटकंती म्हणजे थरारकच. त्यासाठी बरीच जिगर, चिकाटी आणि जिद्द लागते.
सर्वांना या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद, जयश्री!
29 Jan 2009 - 9:43 pm | संदीप चित्रे
अजून वाचणं व्हायचंय.... आता लवकरच वाचीन.
(अवांतर : 'निशाणी डावा अंगठा' हे भन्नाट पुस्तक वाचलं मध्यंतरी... त्याबद्दल लिहितो लवकरच.)
29 Jan 2009 - 10:49 pm | आपला अभिजित
त्यावर त्याच नावाचा सिमेमा येऊ घातलाय.
पुरु बेर्डेचा!
30 Jan 2009 - 10:50 pm | संदीप चित्रे
मकरंद अनासपुरे आणि अशोक सराफ आहेत.
पुरू बेर्डेनं नीट हाताळला तर एक माईल स्टोन सिनेमा तयार होईल.
31 Jan 2009 - 10:48 am | जयवी
मज्जा येणार म्हणजे :)
30 Jan 2009 - 12:24 am | शितल
जयवी ताई,
सुंदर पुस्तकांची ओळ्ख करून दिल्या बद्दल धन्यवाद !
त्यातील एक परिच्छेद येथे देऊन पुस्तकातील अलंकरीत भाषेने नटलेले असेल ह्या बद्दल शंकाच नाही. :)
30 Jan 2009 - 1:42 am | प्राजु
सुंदर ओळख करून दिली पुस्तकाची..
मिळवेन आणि नक्की वाचेन..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Jan 2009 - 6:30 pm | विसोबा खेचर
मिळवेन आणि नक्की वाचेन..
हेच बोल्तो!
तात्या.
30 Jan 2009 - 6:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिळवेन आणि नक्की वाचेन..
30 Jan 2009 - 1:52 am | चतुरंग
भारतभेटीत आणायच्या पुस्तकांच्या यादीत अजून एक भर.
लोकसत्तेतल्या लोकरंग पुरवणीत वाचण्याजोगं काही ह्या सदरात ह्या पुस्तकाचंही परीक्षण आलं आहे.
चतुरंग
30 Jan 2009 - 6:51 pm | अनंत छंदी
जयवीताई
हे पुस्तक प्रसिद्ध झाल्याबरोबर माझ्या वाचनात आलं होतं, आणि बेहद्द आवडलं होतं.
स्मृती ताजी केल्याबद्दल आभार!
2 Feb 2009 - 9:18 am | दत्ता काळे
ह्या पुस्तकाचं क्रमश: वाचन पुणे आकाशवाणी २/३ वर्षांपूर्वी झालं होतं. ते खूप आवडलं, म्हणून मी हे पुस्तक नंतर आणून वाचलं.
जरासे अवांतर : कृष्णमेघ कुंटे हे श्री.जगन्नाथ कुंटे ह्यांचे चिरंजीव. श्री.जगन्नाथ कुंटे हे नर्मदे हर हर ह्या अतिशय गाजलेल्या पुस्तकाचे लेखक - ज्यांनी नर्मदा परिक्रमा दोनदा केली आणि त्यानंतर परिक्रमेतील अनुभवांवरील हे पुस्तक आहे.
नागझिर्याच्या जंगलात वर्षभर वास्तव्य करुन राहिलेल्या प्रसिध्द पक्षीतज्ञ श्री. किरण पुरंदरेंच "नागझिरा" अजून एक अप्रतिम पुस्तक आहे. जंगलातल्या वास्तव्यातून दररोज आलेले - प्राणि, पक्ष्यांच्या बाबतीतले अनुभव फार सुंदर मांडलेले आहेत. वाचनिय आहे.