स्वप्न एखादे जणू...

मिल्या's picture
मिल्या in जे न देखे रवी...
29 Jan 2009 - 2:00 pm

चार चौघांसारखे आयुष्य माझे चालले
चार चौघांसारखे त्यालाच मी ही कोसले

स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

घेतल्या काढून त्यांनी शृंखला पायातल्या
वाटले मी मुक्त झालो; पाय तोवर तोडले

दोष हा त्यांचा कसा? जर टाळले त्यांनी मला
मीच मूर्खासारखे मुद्दे विरोधी मांडले

मी किती ठोठावले पण दार ते उघडेच ना
का असे माझ्यावरी माझेच मन रागावले?

हाय! छळवादी किती आहे सुखाचे फूल हे
मी पुरा कोमेजलो तेव्हाच का ते उमलले?

पत्थराला धडकुनी फुटल्या किती लाटा जरी
भंगले नाही तरी नाते कधी त्यांच्यातले

ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा
पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले

गझलप्रतिभा

प्रतिक्रिया

राघव's picture

29 Jan 2009 - 6:46 pm | राघव

मी किती ठोठावले पण दार ते उघडेच ना
का असे माझ्यावरी माझेच मन रागावले?

हा शेर आवडला.
मुमुक्षु

चतुरंग's picture

29 Jan 2009 - 10:35 pm | चतुरंग

मी किती ठोठावले पण दार ते उघडेच ना
का असे माझ्यावरी माझेच मन रागावले?

हाय! छळवादी किती आहे सुखाचे फूल हे
मी पुरा कोमेजलो तेव्हाच का ते उमलले?

झकासच!!

चतुरंग

लिखाळ's picture

29 Jan 2009 - 10:39 pm | लिखाळ

हाय! छळवादी किती आहे सुखाचे फूल हे
मी पुरा कोमेजलो तेव्हाच का ते उमलले?

पत्थराला धडकुनी फुटल्या किती लाटा जरी
भंगले नाही तरी नाते कधी त्यांच्यातले

सुंदर गजल !

-- लिखाळ.

संदीप चित्रे's picture

30 Jan 2009 - 12:28 am | संदीप चित्रे

तुला इथेही भेटून आनंद झाला रे :)
-----
>> ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा
>>पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले
मला सगळ्यात जास्त हा शेर आवडला.

प्राजु's picture

30 Jan 2009 - 1:46 am | प्राजु

इथे भेटून आनंद झाला..
सुरेश भट डॉट इन वर वाचली होती ही गझल.
खूप सुंदर आणि नव्या आहेत सगळ्या कल्पना..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मिल्या's picture

1 Feb 2009 - 12:43 pm | मिल्या

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद..

संदीप, प्राजु मिसळपाव वर स्वागत केल्याबद्दल आभार :)