फुस्स् ऽऽऽ

शक्तिमान's picture
शक्तिमान in जनातलं, मनातलं
29 Jan 2009 - 1:41 am

        फुस्स् ऽऽऽ

    अखेर माझ्या सायकलच्या जीर्ण टायरने पुण्यातील रस्त्यांसमोर शरणागती पत्करली (यात नवीन काहीच नव्हते). परंतु या शरणागतीमुळे एक गोष्ट माझ्या पथ्यावरच पडली... कधी नव्हे ते क्लास बुडवायची नामी संधी चालून आली होती. आणि "opportunity knocks the door once" या सुप्रसिद्ध वचनाला अनुसरून मी ती संधी गमवायचा मूर्खपणा अजिबात केला नाही.

    मी माझी सायकल घेऊन आपल्या नेहमीच्याच सायकल मार्ट मध्ये गेलो. मी घडलेला सगळा प्रसंग तेथील माणसाला सांगितला. आणि फुटलेल्या पुढच्या टायरबद्दल विचारले.

    "कधी मिळेल हो टायर-ट्यूब बदलून?", मी.
    "काही सांगता येणार नाही. आमचा मिस्त्री गावाला गेलाय", त्या माणसाने जीवावर आल्यासारखे उत्तर दिले.
    "कधी येईल तो?" (त्या आंबट चेहर्‍याच्या माणसाला बोलतं करण्याचा माझा अजून एक निष्फळ प्रयत्न.)
    "अहो मिस्त्री म्हणजे काय रेल्वे आहे का? त्याचे काही वेळापत्रक आहे का की अमूक दिवशी गेला आणि तमूक दिवशी आला. हल्ली रेल्वेचा भरवसा नाही, तर आमच्या मिस्त्रीचे काय घेऊन बसलात! या दोन-तीन दिवसांनी, तेव्हा बघू.."
त्याच्या या उत्तराने वरकरणी जरी मी आनंदी नसल्याचे दाखवले, तरी आतून मला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. अजून दोन दिवस तरी माझा क्लास हमखास बुडणार होता.

    मी सायकल घेऊन घरी आलो. आईला सर्व हकीकत सांगितली. टायर आणि रस्ता यांतील संघर्षाची परिणती टायरच्या शरणागतीत झाली हे ऐकून तिला जरा वाईट वाटले. मी मात्र आपला क्लास बुडतोय यामुळे फार दु:खी झालोय हे दाखवण्यासाठी सुतकी चेहरा करून बसलो होतो.

                                                        ***

    "टायरला पाच ठिकाणी भोकं आहेत, टूब कमजोर झालीय, वॉल-टूब बी बदलायला पायजे.
स्पोकचं अलाईनमेंट केलं पायजे, रीम पट्टी ढिली हाय... येवडं समदं केल्याबगर सायकल चालायची नाय.." इति मिस्त्री उवाच.
(अखेर मला दुकानात जावंच लागलं. त्यातल्या त्यात आईकडून जास्त दबाव पडल्यामुळे. नाहीतर मी... आणि दुकानात... ते सुद्धा सायकल टाकायला.... छे!)

हे सर्व मिस्त्री पुराण ऐकल्यावर माझा माझ्या सायकलच्या टायरबद्दलचा आदर अजूनच वाढला. रामाने चौदा वर्षाच्या वनवासात किंवा महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत जेवढे भोग भोगले असतील त्याच्या अनेकपट भोग या माझ्या सायकलच्या टायरने भोगले होते.

    "किती रूपये होतील?", मी.
    "आता बघा, येवडं समदं करायचं म्हंजी दीडशेपतोर रक्कम पोहचेल"
    "बर, आणि कधी मिळेल?"
    "अं... उद्या गुरूवार हाय ना.. या की सकाळच्याला दहाला.." (मनात म्हटले, याला पण रेल्वेची सबब का नाही सुचली!)
मी सायकल तिथेच ठेवून घरी आलो.

                                                        ***

    एक एक घटिका सरत होती. काहीतरी अशुभ घडणार अशा शंकेची पाल मनात चुकचुकली. वेळ जवळ आली होती. अशुभ म्हणजे नेमकं काय घडणार ते समजत नव्हतं. काळा बोका (शेजारच्यांचा) उगीचच मधेमधे लुडबुडत होता. मी आपला "राम राम" म्हणत होतो. आणि इतक्यात मोठा आवाज सुरू झाला. अशुभ घडायच्या माझ्या शंकेला जास्तच दुजोरा मिळाला. मी नीट ऐकलं तर तो दहाचा भोंगा होता. दिवस गुरूवारचा होता. मला तिला आणायला जायचं होतं! (सायकलला बरं का!) अशुभ अशुभ काय म्हणतात ना ते हेच!

    मी शेवटी पायांचं खोबरं करत दुकानापाशी आलो. दुकान अजून उघडलं नव्हतं. या मिस्त्रीच्या रेल्वेचं काही खरं दिसत नव्हतं. मी आपला तसाच वाट पाहत उभा! बर्‍याच काळानंतर मिस्त्री महाशय आले. मोठया थाटात त्यांनी दुकान उघडले. मालक यायला अजून वेळ होता.

    मी माझ्या सायकलच्या पुढच्या टायरबद्दल विचारले.
    "ती बघा.. कोपर्‍यात लावलीय. काय खुळखुळं करून टाकलंय सायकलचं... ह्यॅ.." त्याचा तिरस्कारयुक्त कटाक्ष मला खटकला.

    "टायर बदलायला मला पाच मिनीटं पण लागत नाहीत.. पण तुझ्या सायकलने माझा एक तास घेतला." (मिस्त्री वेळेबाबत एवढा जागरूक कधीपासून झाला?)
मी गुपचूप सायकल घेतली, पैसे दिले आणि तिथून सटकलो. यथावकाश मी घरी पोहचलो. दुपारी नाईलाजाने मी क्लासला जायला निघालो.

    मधल्या या दोन-तीन दिवसांच्या काळात मला बरीचशी विश्रांती मिळाली होती. आळसावलो होतो. अखेर मनाची तयारी करून क्लासची वाट धरली. रस्त्याने जाता जाता मला ती पवित्र जागा दिसली. मी मनोमन प्रणाम केला व पुढे निघालो. क्लास जवळ येत होता. मनाची चलबिचल वाढली होती आणि अचानक....

        फुस्स् ऽऽऽ

आता आज माझ्या सायकलच्या मागच्या टायरने शरणागती पत्करली होती.
अजून एक संधी मला खुणावत होती....

कथाविनोद

प्रतिक्रिया

सुक्या's picture

29 Jan 2009 - 3:55 am | सुक्या

फुस्स् ऽऽऽ पाहिल्यावर मला सापाविषयी काही लिहिले असेल असे वाटले होते. पन फुस्स् ऽऽऽ दुसरंच निगालं राव.
बाकी कथा एकदम झकास जमलीय.

(फुकटचा) सल्ला: क्लास बुडवायचा असेल तर सायकल ला चेन पाडायला शिकवा. चेन पडली की क्लास आपोआप बुडतो. ख्रर्च ही नाही. चेन बसवण्याचा प्रयत्न केला असा घरच्यांचा विश्वास बसण्यासाठी हात काळे करुन घ्या. (तोंड काळे होण्यापासुन जपा)

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

दशानन's picture

29 Jan 2009 - 9:24 am | दशानन

हा हा !

छान !

छोटासा प्रसंग प्रण व्यवस्थीत खुलवला आहे.. आवडला बॉ आम्हाला हा प्रकार.

मस्त... कधीच टायर पंच्चर होऊ नये म्हणुन मी देवाची प्रार्थना करत असतो नेहमी... गुडगाव मध्ये देव भेटेल पण मिस्त्री नाय :(

*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

29 Jan 2009 - 9:40 am | मधु मलुष्टे ज्य...

मस्त !

चारचाकी सायकल घ्या. :)

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

शक्तिमान's picture

31 Jan 2009 - 2:14 pm | शक्तिमान

चारचाकी सायकल घ्या.

=)) =))

झेल्या's picture

29 Jan 2009 - 10:49 am | झेल्या
शक्तिमान's picture

29 Jan 2009 - 11:38 pm | शक्तिमान

मी १२वी मध्ये असताना सायकलने कॉलेज, क्लासला जात असे.
आता परत सायकलींग सुरू करावे म्हणतो..

बाकरवडी's picture

29 Jan 2009 - 4:58 pm | बाकरवडी

आवडले..
मीही सायकलने प्रवास करतो. त्यामुळे 'फुस्स् ऽऽऽ' भावले.
रोज सायकलने कॉलेजला,क्लासला जायचा कंटाळा येतो,
चागंला उपाय !

>>>(फुकटचा) सल्ला: क्लास बुडवायचा असेल तर सायकल ला चेन पाडायला शिकवा. चेन पडली की क्लास आपोआप बुडतो. ख्रर्च ही नाही. चेन बसवण्याचा प्रयत्न केला असा घरच्यांचा विश्वास बसण्यासाठी हात काळे करुन घ्या. (तोंड काळे होण्यापासुन जपा)

एक नबंर !!!!!!!!!!!!!!!!!!!!

फुस्स's picture

31 Jan 2009 - 2:21 pm | फुस्स

आपली शीक्रेट अशी उघड करायची नसतात, बाकरवडी!

लिखाळ's picture

31 Jan 2009 - 11:21 pm | लिखाळ

मजेदार :)

आम्ही हौसेने क्लासला जाऊन क्लासच्या बाहेरच्या कँटिनमध्येच मुक्कम ठेकायचो ते आठवले :)
-- लिखाळ.