ओ राणी सरकार उठा उठा ६. ३० वाजले !
ए थांब ना प्रगती ! झोपू दे ना ५ मिनिटे अजून !
अजिबात नाही या तुझ्या अशा आळशीपणामुळे आजकाल तुला आवरायला रोजच उशीर होतो आणि मग शेवटी गडबड करत नीट न आवरता तशीच जातेस. घाणेरडी
बरं बरं असू दे !
अगं असू दे काय राणी म्हणून मिरवतेस ना ? आम्ही तुझ्या मैत्रिणी बर्या म्हणायच्या तुझ्यापेक्षा
हो बाई .बास कर तुझी वटवट. जाते मी आवरायला !
राणी आजचा दिवस लक्षात आहे ना ?
का गं?
आज आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस असतो !
कुणाचा ?
अग विसरलीस ? इंद्रायणीचा गं !
हो खरंच की ! बर झालं आठवण केलीस ते . नाहीतर रोजच्या सारखं लोणावळ्याला फक्त वडापाव घेऊन निघालो असतो दोघी. आज मस्त कापते तिला. आज जरा लवकरच पोचेन लोणावळ्याला तिच्या आधी. वडापाव बरोबर केकची पण ऑर्डर देऊन ठेवते गेल्या गेल्या.
हे बघ राणी आपल्या सर्वांतर्फे हे ग्रिटींग कार्ड दे तिला. आणि मी, सिंहगड, शताब्दी, डेक्कन सर्वांच्या तर्फे शुभेच्छा म्हणुन सांग !
हे बघ प्रगती , त्या शताब्दीचे नाव असेल तर मी नाही देणार हं ग्रिटींग. तुला माहित आहे ना आमच्यातल भांडण !
अग हो तो इतिहास झाला. पण आता लग्नानंतर तिने नाव बदलुन इंटरसिटी असं केलय ना ?. आता ती खुप सुधारलीय बरं का?
सुधारेल नाही तर काय करेल? कोण कुत्र पण विचारत नव्हतं तिला जेंव्हा नुकतीच आली होती मुंबईला फॉरेनहून . मला म्हणायची कशी तु पुण्याहून निघणारी राणी तर मी मुंबईहून निघणारी राणी. हॅ ! राणी म्हणे . लायकी तरी होती का तिची. कायम तुच्छ लेखायची सगळ्यांना. बरं झालं लोकानीच तिच्याकडे दुर्लक्ष करुन तिचा नक्षा उतरवला ते. रहा म्हणाव आता इंटरसिटी म्हणून.
हो राणी, मला ही आला होता त्यावेळेला तुझ्यासारखाच अनुभव. जाता येता अगदी शेजारून गेली तरी ओळख दाखवायची नाही. आणि जायची अशी की जणू मी म्हणजे विमानच ! सात जणाना बरोबर घेऊन जायला कसले आलेत कष्ट. पण आता लग्न झाल्यानंतरची हीच का ती ? असा प्रश्न पडतो. मी दुरुन दिसले तरी लगेच हाक मारते आता.
अग प्रगती, बरोबर आहे . आता आपल्यासारख १५-१६ जणांना घेऊन जाते ना ! आली आता बरोबर लायनीवर ! पण माझ्याशी अजून ती अशी मोकळेपणाने नाही वागत. मी लांबून दिसली रे दिसली की ही शिरलीच म्हणायची बोगद्यात. मी ही मग मुंबईहून येताना असेच करते. माणसाने कसं जशास तसं असावं !
जाऊ दे गं पण आता आपल्या ग्रुपमधे आहे ना आणी तुझी चुलत बहीण डेक्कन एक्स्प्रेस तिला ही मुंबईत रात्रीची सोबत म्हणून आहे ना तिची मदत.
होना प्रगती ! त्यामुळेच मी जरा गप्प बसते आहे. बाकी माझी बहिण एकदम गरीब हो. आवर्जून सगळीकडे थांबते, गोरगरिबांना मदत करते.खुप दिवसापासून माझ्या मागं लागलीय आपण सगळ्याजणी माथेरानला जाऊ म्हणून.
ए काय लकी आहे ना तुझी बहीण. नेरळला घटकाभर का होईना तिला थांबायला मिळतं. नाही तर आपण.
नाही तर काय ! तुम्ही निदान दादरला तरी थांबता . आमच्या नशिबात ते ही नाही !
तु पण थांबतेस की दादरला !
हो पण ऑफीसला जाताना ! ती काय वेळ असते का रानडेरोडवर फिरायची ? आणि येताना जरा लवकर निघून शॉपींग करवयाचे म्हणले तर थांबा नाही !
अग म्हणुनच तुला प्रतिष्ठीत गाडीचा सन्मान मिळाला ना ! आम्हाला नाही मिळत तो! तुझी तिकीटे संपल्यावर इलाज नाही महणून आमचे तिकिट काढतात, सगळ्यांची पहिली पसंती तुलाच. पहिले आय ए सो नामांकन मिळालेली गाडी ना तू ?
कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. प्रतिष्ठेमुळे मग समाजकंटकांच्या ताब्यात ही मीच सापडते. आठवतेय ना जो प्रकार उल्हासनगरला झाला तो ? नशीबाने साथ दिली म्हणून जिवंत आहे आज.
हो ना मी तर किती दिवस तेथून जाताना घाबरायचे !
राणी, फार पुर्वी तर म्हणे काही उत्साही तरुणांनी पुणे-मुंबई कायनेटिक वरुन तुझ्याशी स्पर्धा लावली होती. आणि तुला हरवलं होतं !
हो ना. काय उत्साही मुलं होती ती . मजा आली होती. आतली बातमी सांगते त्या दिवशी कल्याणजवळ सिग्नलला ५ मिनिटे थांबायला लागलं ना म्हणून मला हरवू शकले. नाही तर आज अगदी एक्स्प्रेस हायवे असुनही मला कोणी हरवु शकणार नाही ! कळलं !
हो ना तुझा कायम द्वेश करणारी ती नीता आता त्यांच्यात सामिल झाली आहे.
बास झाल तिचं कौतुक . केंव्हा बंद पडेल काही सांगता येत नाही. हा आता काही माझे मित्र मैत्रिण मला सांगतात की त्या लोकलचा ससेमीरा टाळण्यासाठी आम्ही निताबरोबर जातो जी आम्हाला थेट बोरीवलीला सोडते.
एका दृष्टीने बरोबर आहे त्यांच ! पण राणी काहीही म्हण पुणेकरांची लाडकी राणी तूच !
चल चल बास झालं माझं कौतुक. अग आज रविवार आहे ना ?
हो मग ?
अग आपण लेणी बघायला जाणार होतो ना बोटीतून ? आठवण करणार होतीस ना तू सिंहगडला मुंबईत पोचल्यावर बुकिंग करायची !
अगं बाई विसरले की मी. ही सिंहगड पण इतक्या लवकर उठून जाते ना !
ठीक मी बघेन शिवाजी टर्मीनल्सला पोहोचल्यावर काय करायचे ते ! माझा ओळखीचा एक एजंट आहे तो करेल मदत. पण तू येशील का वेळेवर ?
म्हणजे काय ? नेहमी येतेच ना तुझ्यामागोमाग !
हो पण आज रविवार आहे. मी पोचेन वेळेवर पण तू मात्र अडकु नको मेगाब्लॉक मधे.
नाही नाही मी घेईन काळजी . चल तो बघ तुझा खास मित्र आला आहे तुला सोडायला स्टेशनवर
बाय भेटू मुंबईत
चल बाय मी येईपर्यंत कॅनन पावभाजी पार्सल घेऊन ठेव.
हो हो नक्की !
प्रतिक्रिया
20 Jan 2009 - 7:03 pm | रेवती
मजेशीर संवाद!
आधी ह्या दोन मैत्रिणी कोण हे समजलं नाही,
नंतर हळूहळू सगळं उलगडत गेलं.
रेवती
20 Jan 2009 - 7:29 pm | अमोल केळकर
धन्यवाद
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
20 Jan 2009 - 7:39 pm | संताजी धनाजी
हे हे! छान लिहीले आहे. मला पण सुरुवातीला कळालेच नाही :)
- संताजी धनाजी
20 Jan 2009 - 8:31 pm | शशिधर केळकर
छानच संवाद आहे! सुरुवातीला कळले नाही हे तर खरेच, 'पण काय चालू आहे?' अशी उत्कंठाही होतीच.
मस्त मजा आली. आणि मुख्य म्हणजे इतक्या सगळ्या गाड्या, त्यांचे टाईम टेबल, इतिहास, त्यांचा मानवी संवाद, राग लोभ यांचे दर्शन फारच मजेचे झाले आहे.
20 Jan 2009 - 8:46 pm | प्राजु
आधी वाटल्ं की हॉस्टेल वर राहणार्या दोन मैत्रीणी आहेत. मग हळू हळू उलगडत गेलं.
मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Jan 2009 - 10:05 pm | पूनम
Zakas!!
20 Jan 2009 - 11:49 pm | विसोबा खेचर
लै भारी! :)
21 Jan 2009 - 12:03 am | भाग्यश्री
अगदी झकास! सुरवातीला नाही कळलं, पण नावांवरून आला अंदाज! मस्त आयडीआ आहे ही !
http://bhagyashreee.blogspot.com/
21 Jan 2009 - 4:46 am | फारएन्ड
मस्त लिहीलंय, मजा आली. राणी आणि प्रगती म्हंटल्यावरच कळाले. 'नीता' म्हणजे वोल्वो का?
21 Jan 2009 - 5:38 am | शितल
मजेशीर आणि मस्त. :)
21 Jan 2009 - 8:19 am | अनिल हटेला
झकास !!!!! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
21 Jan 2009 - 11:26 am | पर्नल नेने मराठे
कॅनन पावभाजी
पुन्हा एकदा "अपुन्का येरिया" याद आया ;;)
चुचु
21 Jan 2009 - 12:04 pm | केवळ_विशेष
एक नं लेख... मजा आला...
डेक्कन क्वीन ची शान खरंच छान...
खरंच आधी वाचतांना काही टोटल लागेना... पण कळायला लागल्यावर गंमत वाटली...
पु.ले.शु. हे.वे.सां.न्.ल
आपला,
(डेक्कनक्वीन चा पासधारक, बोगी सी २)केवळ_विशेष
13 Feb 2009 - 9:10 pm | ब्रिटिश टिंग्या
नजरेतुन निसटला होता हा लेख! आज वाचला!
लै भारी आहे! आवडला!
रात्रीच्या पॅसेंजरचा उल्लेख विसरलास वाटतं!