"मला हळू हळू लक्षात आलं,की जे दुसर्याला देतात तेच लोक दुसर्याकडून घेतानाही त्यांचा सन्मान ठेऊन घ्यायला शिकतात.त्यांच्या चेहर्यावरून ते त्याबद्दल ऋणी आहेत आणि आभारी आहेत हे प्रदर्शीत होत असतं "
श्रीधर केळकर बरीच वर्ष इंग्लंडमधे राहत होते.आता निवृत्त झाल्यावर परत ते भारतात कायमचे राहायला आले.इंग्लंडमधे असताना त्यांना मैलो- मैल पायी प्रवास करायची संवय होती.इथे आल्यावर त्यानी तेच करायचं ठरवलं.प्रथम प्रवासाचा मोठा पल्ला घेण्याऐवजी त्यानी मुंबईहून कोकणात आणि पुढे गोव्यात पायी प्रवास करायचं ठरवलं.
केळकर म्हणाले,
"इंग्लंडमधे राहात असताना कामावर जायच्यावेळी कुणाची ना कुणाची लिफ्ट मिळायची.त्यामुळे मी कामावर वेळेवर पोहोचायचो.रोज कुणी ना कुणी दयाळु होऊन उदार होऊन मला घ्यायचा.माझ्या मनात रोज एव्हडं यायचं की आज पण कालच्या सारखा चमत्कार होईल ना?
रोज ज्यांच्यावर लिफ्टसाठी मी अवलंबून असायचो त्याना त्यांच्या जीवनात कमी का चिंता आहेत,आणि असं असूनही एखादा तरी मला लिफ्ट द्दायचाच अगदी उदार होऊन.किती लोकानी अशी मला लिफ्ट दिली असेल याची मी काही यादी ठेवली नाही. परंतु मी त्यांच्या येण्यावर निर्भर होतो.
ह्या घटनेवरून मी माझी एक समजूत करून घेतली आहे.ती अशी. दयाळु असणं म्हणजे श्वास घेतल्यासारखं आहे.श्वास जसा एक तर तो बाहेर टाकायचा किंवा आत घ्यायचा. एखाद्दा अनोळख्याकडून भेटीची याचना करताना एक प्रकारे मन उघडं असावं लागतं.एखाद्दाकडून अत्यंत दयाळुपणा अंगिकारताना त्या अगोदर थोडी मानसिक तयारी असावी लागते. मी ही क्रिया आदान-प्रदान केल्या सारखी समजतो.ज्या क्षणी अनोळखी त्याच्या मदतीचा,चांगुलपणाचा उपहार देतो तेव्हा ज्याला तो उपहार घ्यायचा असतो तो आपल्याकडून नम्रता, आभार,आश्चर्य,विश्वास,प्रसन्नता, निश्वास,आणि तृप्तीचा उपहार त्याला देतो.
इकडे आल्यावर जेव्हा मी पायी प्रवास करायला सुरवात केली तेव्हा संध्याकाळ होताच मी ज्या गावात गेलो असेन तिकडे एखादं घर बघून दरवाजा खटखटायचो आणि मला एक रात्र तुमच्या बाहेरच्या पडवीत झोपायला मिळेल का हे विचारून घेत असे आणि मी सकाळ होताच निघून जाईन म्हणून त्याचवेळी सांगत असे.मला कुणीही नकार दिला नाही. एकदा सुद्धा.काही तर आत घरात झोपायला सांगायचे. असा क्षण आला असता कधीकधी मी त्यांना थोडावेळ माझ्या आतापर्यंतच्या झालेल्या प्रवासाचे आणि मिळालेल्या अनुभवाच्या गोष्टी सांगायचो.ही मंडळी खूप स्वारस्य घेऊन मला ऐकायची.माझ्या सारखं करायला त्यांच्या क्वचितच मनात येत असेल पण ऐकायला उत्सुकता दाखवायचे.आणि ह्या ऐकण्याच्या बदल्यात मला कधीकधी एखादी स्विट डिश आग्रहाने खायला सांगायचे.
रत्नागिरी शहर सोडल्यानंतर जेव्हा मी दक्षिणेच्या बाजूने जायायला लागलो तेव्हा वाटेत आलेल्या बर्याचश्या खेड्यात माझं प्रेमाने स्वागत व्हायचं.
मला वाटतं जेव्हा चमत्काराचा झरा वाहतो त्यावेळा तो दोन्ही बाजूने वाहत असावा.प्रत्येक भेटी बरोबर सद्भावनेचं जाळं धाग्याच्या गुंत्याने विणलं जायचं ते देणार्या आणि घेणार्या दोघामधे.
एका गावात मी जरा रात्रीच पोहोचलो.खेड्यात वीज वाचवण्यासाठी तिन्हीसांजा झाल्या की जेवण करून मोकळे होतात. शाळकरी मुलं मात्र वीज नसल्यास कंदिलाच्या प्रकाशात रात्री दहा वाजेपर्यंत अभ्यास उजळणी करीत असतात.मी दरवाजा खटखटल्यावर अशाच एका मुलाने दरवाजा उघडला.
"कोण पाहिजे आपल्याला?"
असं त्याने मला विचारलं.
मी त्याला म्हणालो,
"बाळा, तुझ्या घरात कोणी मोठं माणूस आहे का?"
त्याने आईला हांक मारली.
मी त्यांना म्हणालो,
"फक्त एक रात्रीसाठी मी आपल्या बाहेरच्या पडवीत झोपू का?"
माझी चौकशी केल्यावर त्यानी होकार दिला.
मला म्हणाली,
"आमची सर्वांची जेवणं झाली आहेत.मी तुम्हाला पिठलं भात करून देऊ का ? "
त्यानी जेवण्याचा आग्रहच केला.तसा मी वाटेत एका छोट्याश्या हॉटेलात चहा आणि भाजीपूरी खाल्ली होती.तो उकड्या तांदळाचा गरम गरम भात आणि हिंग मोहरीची फोडणी दिलेलं कढत पिठलं खाऊन मला निवांत झोप लागली.
मे महिन्याचे दिवस जरी गरमीचे असले तरी कोकणात रात्री सुखद थंडी पडते.एका खेड्यात रात्रीचं पोहचल्यावर बाहेर शेतीच्या परड्यात काही मंडळी लाकडांना आगपेटवून शेकोटी घेत बसले होते.मला पाहिल्यावर एक मुलगा उठून माझ्या जवळ आला.
नेहमीचाच प्रश्न
"तुम्हाला कोण पाहिजे?"
मी गंमतीत म्हणालो,
"तूच हवास"
तो जरा हसला.तेव्हड्यात इतर लोक उठून माझ्या जवळ आले.मी त्यांना म्हणालो,
"तुमच्या शेकोटीची धग घ्यायला मला मिळेल का?"
"अर्थात "
असं म्हणून त्यांनी मला त्यांच्या घोळक्यात बसायला जागा दिली.आगीच्या शेकोटीत भाजलेले कणगी,करांदे आणि रताळी मला खायला दिली.आणि त्यांच्यापैकी एकाच्या घराच्या पडवीत मी रात्रीचा मुक्काम केला.
जेव्हा मी गोव्याला पोहोचलो तेव्हा मला बिचवर एक तरूण भेटला.हलो-हाय झाल्यावर आम्ही थोडावेळ वाळूत गप्पा मारीत बसलो.माझ्या पायीप्रवासाच्या स्किमचं त्याला कुतुहल वाटलं.त्याच्या अपार्टमेंटमधे मी माझ्या प्रवासाचे आठ दिवस राहिलो. त्याच्या सर्व कुटुंबियांशी माझा चांगलाच परिचय झाला.
मला हळू हळू लक्षात आलं,की जे दुसर्याला देतात तेच लोक दुसर्याकडून घेतानाही त्यांचा सन्मान ठेऊन घ्यायला शिकतात. त्यांच्या चेहर्यावरून ते त्याबद्दल ऋणी आहेत आणि आभारी आहेत हे प्रदर्शीत होत असतं.खरं पाहिलंत तर जीवंत राहिल्यानेच त्या प्रचंड भेटीच्या प्राप्तीच्या एका टोकाला आपण सर्वजण आहोत हे निश्चीत कळतं.तरीपण असहाय,नम्र आणि ऋणग्रस्त आहोत असं दाखवायला आपल्यातले बरेच तयार नसतात.भेटीच आदान-प्रदान करून घ्यायला थोडी संवय व्हावी लागते पण त्यावेळी आपण निराशाजनक असता कामा नये.
कुणी म्हणेल असली उदारता स्विकार करायला सुद्धा एक प्रकारची सहानभूती असावी लागते.उदार राहण्यातली सहानभूती.
तसं पाहिलं तर ह्या माझ्या पायीप्रवासात मला कुठेतरी हॉटेलात किंवा एखाद्दा मोकळ्या पार्कमधे राहता आलं असतं.पण रात्र झाल्यावर कुणाच्या घरी जाऊन राहाण्याचा माझा उद्देश माझ्या प्रवसाची आणि अनुभवाची त्यांना माहिती करून देणं. आणि माझी पण नवीन कुंटुबाची ओळख होते.
मात्र माझ्या ह्या पायीप्रवासाच्या संदर्भात मिळणार्या भेटींची अनावश्यक भावदर्शनात गणना करावी लागेल.
ह्या जगात जरी खराब हवामान असलं,मळकट भूतकाळ असला,नर्कात जाणारी युद्ध असली तरी ती सम्मिलीत होऊन आपल्यालाच एक प्रकारची मदत करीत असतात पण जर का आपणच विनम्र राहून त्याना मदत करू दिलीत तर.
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
14 Jan 2009 - 11:06 am | झेल्या
पायी फिरण्याचा इंटरेष्टींग उपक्रम आहे..
व्यवस्थित प्रवासवर्णन वाचायला आवडेल.
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
14 Jan 2009 - 8:46 pm | अनामिक
तुमचे स्नेही श्रीधर केळकर यांना आपण भारतातले फॉर्रेस्ट गम्प म्हणूया का?
एवढा दुरचा पायी प्रवास म्हणजे दांडगी इच्छाशक्ती आणि उत्साह असायला हवा.
हजारोंच्या संखेने पायी आणि विठ्ठलनामाचा गजर करत जाणार्या वारकर्यांची सुद्धा आठवण आली.
अनामिक
15 Jan 2009 - 7:05 am | रेवती
आपल्या स्नेह्यांची गोष्ट आवडली. लेखाचा शेवट पटला.
खरच किती मजा आली असेल पायी प्रवास करायला!
लोकांवर विश्वास ठेवणं, त्यांची मदत करणं यात आनंद असतो,
तसच दुसर्यांना आपली मदत करू देण्यातही समाधान असतं.
आपली मदत करावी असं समोरच्याला वाटणं ही भावना सुखद असते.
रेवती
15 Jan 2009 - 7:13 am | सहज
>प्रत्येक भेटी बरोबर सद्भावनेचं जाळं धाग्याच्या गुंत्याने विणलं जायचं ते देणार्या आणि घेणार्या दोघामधे.
लेख आवडला.
15 Jan 2009 - 6:54 pm | लिखाळ
उत्तम ! लेख आवडला.
श्री. केळकरांचे कौतूक वाटले.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.