कमाल आहे!

शशिधर केळकर's picture
शशिधर केळकर in जनातलं, मनातलं
3 Jan 2009 - 6:53 pm

(मित्रहो, ही खरेतर स्मृतीतील एक कथा. केव्हा कुठे वाचली, ते लक्षातही नाही. पण कथा मात्र विसरली नाही. अशा कथा खरेतर तुमच्या आमच्या सर्वांच्याच वाचनात येतात. कोणाला हिचा खरा आणि मूळ लेखक आणि मूळ कथा माहीत असेल, तर जरूर सांगावे! कारण हा कथाविषय माझा नाही. जमले आणि लोकाना आवडले, तर अशा कितीतरी स्मृतीआडच्या कथा मिपावर लिहाव्यात असा मानस आहे)

तात्याबा भर दुपारी शेतावर काम करत होते. नेहमीचीच संवय त्यांची. दुपारची शिदोरी आटपून विश्रांती वगैरे भानगडीत न पडता कामाला लागावे हाच नेम. विठाबाई कातावून म्हणे, "अहो वयाकडे लक्ष द्यावं जरा. शिदोरी झाली की अंग टाका जरा घडी दोन घडी." तसे तात्याबांचे वय काही फार नव्हते. हळूहळू शरीर थकायला लागले होते इतकेच. पण पडिले वळण! लहानपणी बापूनी शिकवण दिली होती, ती च अंगात पार मुरली होती. बापूही असेच शेतावर राब राब राबायचे. मगच म्हणत भाकर तुकड्यावर आपला हक्क आहे! थकण्याचा विचारही तात्याबाला शिवत नसे.
तात्याबाला नेहमी वाटत असे की जनूनेही - त्याचा एकमेव लाडका मुलगा - असेच शेतावर छान पैकी राबावे, मस्तपैकी घाम गाळावा - नांगरणी, पेरणी वगैरे कामात हातभार लावावा. पण जनूचा तो पिंडच नव्हता. पण कामाची हौस मात्र पिढीजात.
सकाळी उठल्यापासून त्याचे मन धावत असे काहीतरी नवनिर्मिती कडे. लहान पणापासून त्याचे छंदच काही वेगळे होते. फारशी मित्रमंडळी ही नव्हती. त्या लहानग्या खेडेगावी मित्र तरी कुठून आणणार म्हणा. तात्याबाच्याच शेतात काम करणार्‍या न्हानू महाराचा मुलगा गोट्या तेवढा जनू बरोबरीने काही बाही खटपट करत असे. आज काल जनू ने नवीन खूळ डोक्यात घेतले होते. तो म्हणे स्वयंचलित गाडी तयार करीत होता. "तात्या, जरा वाईच बाजाराला जाऊन येतो आज दुपारी" असे शनिवारी बापाला सांगून, परवानगीची वगैरे वाट न पाहाताच तो बाजाराला होऊन आला होता. शनिवारी रात्री स्वारी अवतरली ती खूपसे सामान खरेदी करून. आणि आज तर सकाळ पासूनच कुठल्याशा खटपटीत गुंतला होता.
जनू चे एक बरे होते. त्याचे सगळे उद्योग चालत ते स्वतःच्या मिळकतीतून. त्याने आतापर्यंत अनेक घरगुती उपयोगाची साधने घरच्या घरी बनवून विकली होती. इतकेच काय, तात्याबाला लागणारी विविध आयुधे ही त्याने आपले डोके लढवून कमीत कमी खर्चात घरच्या घरी बनवून दिली होती. खेड्यातले लोक - बव्हंशी पिकलेली पाने - जनूवर त्यामुळे एकदम खूश असत. अडीअडचणीला खात्रीचा आपला माणूस त्यांच्याकडे होता. प्रत्येक लहान सहान कामासाठी शहराकडे धावायची गरज नव्हती पडत. ठोक मोबदला देऊन जनूकडून हे लोक हक्काने कामे करून घेत असत.
भर टळटळीत उन्हात एकदम जनूची हाळी आली, "तत्या, वो तत्या. जरा लौकर या हितं!.
आला का वो तत्या!"
तात्याबाने डोईवरचे मुंडासे सारखे केले आणि तो हाकेच्या दिशेने उत्तरला. "अरे जन्या लेका का कालवा करतोय् रं? हितं मी ऐन राड्यात हाए. तूच जरा ये हिकडं हात लावायला."
पण तात्याबाचे शब्द संपायच्या आतच जनू पुन्हा ओरडला "अवो तत्या आला की न्हाई अजून? या लौकर! इथे बघा काय कमाल झालीये!"
आता मात्र तात्याबाला राहावेना. तो चिखलात बरबटलेले आपले शरीर तसेच घेऊन शेतातून बाहेर पडला. त्याला आपल्या लेकाबद्दल जरा जास्तच माया आणि विश्वास होता.
जनूला मात्र तात्याबा पोचेपर्यंत काही धीर नव्हता. त्याने स्वयंचलित गाडी तयार केली होती. आणि पहिली सवारी होती त्याच्या तत्याची.
तात्याबा आल्या आल्याच जनूने त्याला ओढतच आपल्या नव निर्माणाकडे नेले, आणि गाडीत बसवले कसले, ढकललेच जवळ जवळ. गाडीपुढे ठेवलेला ओंडका बाजूला सारत तो तात्याबाला म्हणाला, "तत्या, ही माझी गाडी तत्या, खास तुमच्यासाठी बनिवली हाए. हिच्या मधे बसले, की समोरच्या टपावरून हा कर्णा खाली वोढायचा. आणि त्याच्यात जोरात ओरडायचे. की झाली गाडी सुरू!" आणि त्याने तो कर्णा ओढून तात्याबाच्या हातात दिला सुद्धा!
बास, झाले; तात्याबा काही प्रश्न विचारू गेला "अरे पण मला म्हातार्‍याला इचा काय उपयोग?"
हे वाक्य त्या कर्ण्यामधे शिरताच गाडी हलू लागली! गाडी कशी काय चालायला लागली याचे आश्चर्य करीत तात्याबा ओरडला,
"कमाल आहे!, कमाल आहे! अरे बाबा थांबव ही गाडी!"
आणि तात्याबाच्या त्या प्रत्येक विस्मयाच्या उद्गारासरशी गाडी पुढे पुढे धावायला लागली. तिच्या मागोमाग जनू आणि गोट्या यांची वरात!
आणि दर दोन सेकंदानी तात्याबाचे " कमाल आहे! कमाल आहे! अरे ए जन्या लेका थांबव आतातरी!"
त्या प्रत्येक वाक्यासरशी गाडी आणखीच जोरात पळू लागली!
आणि शेवटी जे घडायचे तेच घडले. हमरस्त्याच्या जवळच एका मोठ्या खड्ड्याजवळ तोल जाऊन गाडी आडवी झाली!
मुका मार लागलेले, ठेचाळलेले अंग झटकत तात्याबा ओरडला, "कमाल आहे, कमाल आहे!"
तशा त्या स्थितितही ती गाडी खरडत खरडत पुढे जायला लागली!

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Jan 2009 - 7:08 pm | बिपिन कार्यकर्ते

गंमतीशीर आहे. पण अजून थोडी मोठी करता आली असती. :)

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

5 Jan 2009 - 9:09 am | विसोबा खेचर

गंमतीशीर आहे. पण अजून थोडी मोठी करता आली असती.

हेच बोल्तो..!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jan 2009 - 7:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कथा चांगली आहे,पण जरा थोडक्यात आवरले असे वाटले !!

नुकत्याच एका मराठी चित्रपटात असे होते काही तरी, नाव विसरलो, तो असेच खेड्यात काही तरी शोध लावतो मग कोणी इंजिनियर मीच त्याचा शोध लावला असे म्हणतो, वगैरे इत्यादी.. कोणाला आठवतं काहो ?

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Jan 2009 - 7:22 pm | बिपिन कार्यकर्ते

दे धक्का... नुकताच येऊन गेलेला तद्दन टुकार बकवास चित्रपट.

बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jan 2009 - 7:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

करेक्ट ' दे धक्काच' !
लैच बकवास चित्रपट, सहमत आहे !!!
( केळकर साहेब, अवांतराबद्दल क्षमस्व)

-दिलीप बिरुटे

विनायक पाचलग's picture

3 Jan 2009 - 7:24 pm | विनायक पाचलग

सदर चित्रपटाचे नाव दे धक्का असे होते
तो झी टॉकीज ने काढला होता

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

प्राजु's picture

3 Jan 2009 - 9:09 pm | प्राजु

पण शेवट गुंडाळला का? थोडा आणखी खुलवता आला असता असे वाटले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/