बेपत्ता बायको, आरोपी नवरा आणि शून्य खून-पुरावा !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
10 Dec 2025 - 11:46 am

15 डिसेंबर 2020 . . .
जगभरात कोविड-19ने थैमान घातलेले, बहुतेक देशांत अधूनमधून टाळेबंदीचे वातावरण आणि जनता हवालदिल झालेली. त्या दिवशी मध्यरात्री फ्रान्समधील एका गावात एक चक्रावून टाकणारी अन् मती गुंग करणारी घटना घडली.
चाळीशीतल्या Jubillar जोडप्यातली पत्नी त्या मध्यरात्रीपासून बेपत्ता होती. पुढील पाच वर्षात तिचा ठावठिकाणा लागलेला नव्हता आणि तिचे प्रेतसुद्धा मिळाले नाही - अगदी आपल्याकडचा ‘दृश्यम’ आठवला असेल ना? मात्र पोलिसांनी त्या बाईच्या नवऱ्याला अटक करून ठेवली आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

ok

काय आहे तरी काय वैशिष्ट्य या प्रकरणाचे ?
बेपत्ता स्त्रीचा ५ वर्षे ठावठिकाणा नाही अन् तिचा मृतदेह आजवर मिळालेला नाही. त्या जोडप्याच्या घरात किंवा आसपास कुठेही खुनाच्या घटनेचा सबळ पुरावा सापडला नाही. खुनाचा कुणी प्रत्यक्ष साक्षीदार असण्याचा तर प्रश्नच नाही. बरं कुठलेही प्राणघातक हत्यार देखील त्या घरात मिळाले नाही, ना कुठे रक्ताचे डाग किंवा डागाळलेले कपडे.
दुसऱ्या बाजूला आरोपी नवरा आपण निर्दोष असल्याचे वारंवार सांगत राहीला. असे हे चक्रावून टाकणारे गूढ.

पाहूया घटनाक्रम काय होता तो :
38 वर्षीय सेड्रिक आणि 33 वर्षीय डेल्फिन यांच्या बिघडलेल्या संसाराची ही कहाणी. तो आहे एक चित्रकार व सजावटकार आणि कॅनाबिसचा व्यसनी. तर डेल्फिन जवळच्याच एका रुग्णालयातील नर्स. दोघांचे पटत नव्हते. त्यात डेल्फिनने एका परपुरुषाशी इंटरनेटवरून मैत्री व नंतर जवळीक केलेली. परिणामी या जोडप्याची विभक्त होण्याची तयारी चालू झालेली. या जोडप्याला दोन मुले - घटनेच्या वेळी मोठे सहा वर्षांचे तर धाकटे 18 महिन्यांचे. 15 डिसेंबरच्या मध्यरात्री पासून डेल्फिन गायब असल्याची तक्रार खुद्द तिच्या नवऱ्याने पोलिसांना फोन करून सांगितलेली होती. सकाळी जेव्हा पोलीस त्याच्या घरी आले तेव्हा घरच्या साध्या कपड्यांतला हा गृहस्थ त्याच्या फोनवरील ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये मग्न होता.

त्यानंतर कित्येक दिवस बेपत्ता डेल्फिनचा शोध न लागल्याने पोलिसांनी तिच्या घराच्या आसपासचा प्रदेश अक्षरशः खणून काढला परंतु त्यातून प्रेत अथवा अन्य कोणताही सबळ पुरावा अजूनही मिळालेला नाही.
या प्रकरणात आतापर्यंत खुनाचा कुठलाच ठोस पुरावा न मिळाल्याने अफवा आणि कंड्यांना तर स्थानिक परिसरात उत आला आणि त्यातून अनेकांच्या डोक्यात भन्नाट गुप्तहेरकथा देखील शिजल्या.

पोलिसांनी तर त्याला खुनाच्या आरोपाखाली अटक केली . त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करता -
सेड्रिकने बायकोचा खून केला आणि नंतर कणभर सुद्धा पुरावा सापडणार नाही याची तजवीज केली. आजवर पोलिसांना अज्ञात व निर्जन जागी प्रेत पुरले. त्याच रात्री घरी परतून पोलिसांना फोनवर शांतपणे बायको बेपत्ता असल्याची माहिती दिली आणि हे सगळे नाट्य घडत असताना त्या जोडप्याची दोन्ही मुले शांतपणे आपल्या खोलीत झोपलेली होती !
ज्याच्यासमोर 'दृश्यम'चा विजय साळगावकर किस झाड की पत्ती वाटावा असा हा वास्तवातील सेड्रीक. काय म्हणावे त्याच्याबद्दल ? अत्यंत बुद्धिमान गुन्हेगार, नशीबवान व्यसनी बुद्दू की गरीब बिचारा निर्दोष नवरा?

अखेर सप्टेंबर 2025मध्ये या खटल्याची सुनावणी सुरू झाली (Assize Court).
फिर्यादी पक्षाकडून १६,००० पानी आरोपपत्र आणि ६५ साक्षीदार सादर झाले.
त्यांचे मुद्दे असे होते :
१. या नवरा बायकोचे पटत नसल्यामुळे आणि तिने परपुरुषाशी जवळीक केल्यामुळे नवऱ्याकडे खुनाचा उद्देश (motive) आहे.
२. 15 डिसेंबरच्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या शरीरावर शारीरिक झटापटीच्या खुणा होत्या आणि तपासात एक फुटलेला चष्मा मिळाला. त्याच्या शेजाऱ्याने एका बाईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकला होता.

३. सेड्रीकच्या भूतपूर्व प्रेयसीने पोलिसांना सांगितले की त्याने तिच्याजवळ खुनाची कबुली दिली होती आणि प्रेताबद्दलही बोलला होता.
४. या जोडप्याच्या मोठ्या मुलाच्या म्हणण्यानुसार त्याने आई-वडिलांची झटापट आणि धक्काबुक्की पाहिली होती. आता तो बापाकडे रागाने बघत म्हणतो आहे,
" होय, यानेच माझ्या आईला मारले".

४. डेल्फिनच्या नातेवाईकांच्या साक्षीपुराव्यांमधून Cédric हा माणूस एक निर्दयी पती व पिता असल्याचे कोर्टासमोर मांडले गेले.

५. या सुनावणीत पोलीस दलातील तज्ञ तपासनीसांनी जो डिजिटल डेटा सादर केला त्यानुसार, डेल्फिन स्वतःहून निघून गेली किंवा प्रियकराने वा अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले, या सर्व शक्यता फेटाळल्या गेल्या . त्यामुळे या प्रकरणात तिच्या नवऱ्याचा(च) हात असावा अशी शक्यता व्यक्त केली गेली.

परंतु…
आरोपीने अर्थातच आपण निर्दोष असल्याचा पुनरुच्चार केला आणि
गेल्या पाच वर्षात प्रेत अथवा अन्य कोणताही सबळ पुरावा न मिळणे ही बचाव पक्षाची महत्त्वाची बाजू होती. त्यांच्या दृष्टिकोनातून पाहता तिचा खून हे पोलिसांनी रचलेले कुभांड होते ! बायकोशी पटत नसलेला व्यसनी सेड्रिक खरंच तिच्या खुनापर्यन्त मजल मारू शकतो का, या प्रश्नाभोवतीच खटला एकवटला गेला. यातून खुनाचा परिस्थितीजन्य पुरावा समोर येऊ शकेल का हा खरा प्रश्न होता.
अशा गुन्ह्यात जेव्हा प्रेत किंवा हत्यार मिळत नाही आणि खुनाची जागाही सिद्ध करता येत नाही तेव्हा कायद्यातील "bundle of serious and consistent evidence" या तत्त्वानुसार न्यायदान केले जाते.

न्यायालयातील चार आठवड्यांच्या सुनावणीनंतर या खटल्याचा 17 ऑक्टोबर 2025ला निकाल लागला. Cédric Jubillar ला न्यायालयाने दोषी ठरवून ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली. आरोपी अर्थातच या निकालाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील करणार आहे.
. . .
. . .
कौटुंबिक गुन्हेगारीच्या इतिहासात यापूर्वी देखील अशी अनेक प्रकरणे जगभरात घडलेली आहे त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण प्रकरणे आता पाहू :
१. प्रेत न सापडून देखील आरोपीवर खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याची अमेरिकेतली 366 प्रकरणे इथे दिली आहेत. त्यात 90% वेळा आरोपी दोषी ठरले आहेत. https://web.archive.org/web/20120712014244/http://www.nobodymurdercases....
एका प्रकरणात तर बायको बेपत्ता झाल्यानंतर 40 वर्षांनी तिच्या नवऱ्याला दोषी ठरवलं गेलं आहे. https://www.theguardian.com/australia-news/2022/aug/30/chris-dawson-verd...

२. इंग्लंडमधले एक प्रकरण तर भन्नाटच आहे. या खुन्याने अनेकांना मारून नंतर त्यांची हाडे ऍसिडचा वापर करून नष्ट केली होती. परंतु त्याच्या शेवटच्या खुनामध्ये संबंधित मृताचा कृत्रिम दात सापडला. तो संबंधित दंतवैद्याने ओळखला आणि हा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले व फासावर चढवले.
https://web.archive.org/web/20070710211740/http://usersites.horrorfind.c...

म्हणजेच अशा प्रकरणांमध्ये परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधाराने आरोपीला दोषी ठरवतात असे दिसते.
आतापर्यंत यासारख्या घटनांनी अनेक लेखक आणि चित्रपट दिग्दर्शकांना थरारक गुन्हेगारीपटासाठी खाद्य पुरवलेले आहे. नमुन्यादाखल अशा एका गाजलेल्या कलाकृतीचा आता कानोसा घेऊ.

Rear Window
हिचकॉकचा हा मूळ चित्रपट 1954 चा आहे.
ok
जायबंदी झालेला एक फोटोग्राफर प्लास्टरमधला आपला पाय संभाळत वेळ जाण्यासाठी खिडकीतून समोरच्या बिल्डिंग मधीलहालचाली बघत बसलेला असतो. अचानक एका माणसाच्या संशयास्पद वागण्याने त्याचं कुतूहल जागृत होतं .त्यातूनच त्या माणसाने बायकोचा खून करून तिचं प्रेत खालच्या बागेत पुरलं असावं असा त्याला संशय येतो व तो खराही ठरतो. अप्रतिम दिग्दर्शन व नायकाच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तो सिनेमा अविस्मरणीय होतो. पूर्वी हा सिनेमा ज्यांनी थेटरात पाहिला होता त्यांनी सांगितलय की, जेव्हा तो खुनी माणूस नायकाला मारण्यासाठी म्हणून त्याच्या घराकडे येऊ लागतो तेव्हा थेटरमध्ये भयाण शांतता होती आणि सगळेजण अगदी श्वास रोखून स्तब्धपणे पडद्याकडे बघत होते. हिचकॉकना उत्कंठावर्धक रहस्यपटांचा बादशहा म्हटले जाते ते उगाच नाही.

या चित्रपटाची १९९८ मधली टीव्ही आवृत्ती युट्युबवर असून तिची वास्तव कथा स्तिमित करणारी आहे. Christopher Reeve हा अमेरिकी अभिनेता त्याच्या खऱ्या आयुष्यात घोड्यावरून पडल्याने पॅरालिसीस होऊन जायबंदी होतो. हीच खरीखुरी भूमिका करत त्याने रेअर विंडोची टीव्ही आवृत्ती सादर केलेली आहे.
अप्रतिम अभिनय ! जरूर बघा : https://www.youtube.com/watch?v=cxHT2vhHDb4

वास्तवात या अभिनेत्याने दिव्यांग जीवन वाट्याला आल्यावर व्हीलचेअरवर बसून मणक्याच्या अपघातांसंबंधी संशोधन केलेले आहे, ज्यामध्ये मूळ पेशींच्या संशोधनाचा देखील समावेश आहे. हेही कौतुकास्पद !
. .
नवराबायकोतील बेबनावातून यासारख्या अमानुष घटना जगात अधूनमधून घडणे हे समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने चिंताजनक असते. अशा प्रकरणातील आरोप सिद्ध झालेल्या गुन्हेगारांना कडक शासन मिळाले पाहिजेच. एकंदरीत अशा बऱ्याच खटल्यांचे निकाल पाहता परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपींना शासन मिळालेले दिसते.
****************************************************************************
संदर्भ :
१. https://www.bbc.com/news/articles/cz69nppezlzo
२.https://www.midilibre.fr/2025/09/30/direct-proces-de-cedric-jubillar-que...

चित्रसौजन्य : 1. सरलनामा 2. विकी.

समाजलेख

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

10 Dec 2025 - 9:57 pm | खटपट्या

रोचक

मूळ खुनाची कथा जितकी रोचक आहे.. तितकेच तुम्ही ज्या पद्धतीने मांडले आहे त्यामुळे देखील लेख उत्कंठावर्धक झाला आहे....धन्यवाद सर