पुस्तक परिचय In service of the republic: The art and science of economic policy

केदार भिडे's picture
केदार भिडे in जनातलं, मनातलं
9 Dec 2025 - 11:33 pm

In service of the republic: The art and science of economic policy, Penguin, 2022, Pages 500. लेखक – डॉ विजय केळकर आणि डॉ अजय शाह
या वर्षाच्या सुरुवातीला मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि हल्लीच वाचून पूर्ण झालं. पुस्तकाच्या आधी लेखकांची थोडक्यात माहिती सांगतो. विजय केळकर आणि अजय शाह दोघेही सुरुवातीचे अभियांत्रिकीचे विद्यार्थी जे नंतर अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण या क्षेत्रात आले. विजय केळकर यांनी केंद्र सरकारमध्ये अर्थ मंत्रालयात विविध पदांवर काम केले आहे. श्री गिरीश कुबेर यांनी त्यांच्यावरील एक लेख लोकसत्ता दैनिकात नुकताच लिहिला होता. जीएसटी सारखी देशाची बाजारपेठ एक करणारी करप्रणाली आणायची शिफारस करणारी समिती केळकर टास्क फोर्स या नावाने ओळखली जाते. २००० साली त्यांनी अशा कराची शिफारस केलेली होती. त्याही पूर्वी पेट्रोलियम सचिव, वित्त सचिव, वित्त आयोगाचे अध्यक्ष या पदांवर त्यांनी काम केले आहे. १९९९ सालात ओयासिस कमिटी नावाने एक कमिटी भारतीयांच्या निवृत्ती वेतनासंबंधी स्थापित करण्यात आली. या कमिटीमध्ये अजय शाह यांचा सहभाग होता. याच कमिटीतून पुढे पीएफआरडीए आणि एनपीएस (नॅशनल पेन्शन स्कीम) यांचा जन्म झाला. अकॅडेमिक संशोधनाचा अनुभव असलेले आणि केवळ अकॅडेमिक चर्चा न करता सरकारचे काम आतून पाहण्याचा अनुभव असलेले हे दोन लेखक आहेत.
सार्वजिनक धोरण या विषयावर विविध पुस्तके उपलब्ध आहेत. बऱ्याचदा विशिष्ट क्षेत्रातील धोरणांविषयी लेखन त्यात दिसते जसे की शेतीविषयी, वीज क्षेत्राविषयी, कर प्रणाली विषयी इ. या पुस्तकात मात्र अशा विशिष्ट क्षेत्रांविषयी न लिहिता सार्वजिनक धोरणा संबंधी काही मूलभूत संकल्पनांची चर्चा केली आहे. पुस्तकात आकडेवारी, आलेख अजिबात नाहीत. संकल्पना समजावताना जिथे गरज आहे तिथे नेमकी उदाहरणे थोडक्यात दिली असून आवश्यक संदर्भ दिलेले आहेत. त्यामुळे सार्वजिनक धोरणाचे फायदे/तोटे ओळखण्यासाठी आवश्यक दृष्टी देण्याचा प्रयत्न हे पुस्तक करते. ‘
पुस्तकाच्या सुरुवातीलाच self-organizing systems चा उल्लेख self-organizing system चे चांगले उदाहरण भाषा सांगता येईल. कोणत्याही केंद्रीय धोरणाशिवाय, कुणीतरी आदेश दिल्याशिवाय हजारो वर्षांपूर्वी वैयक्तिक संभाषणातून भाषा विकसित झाल्या आणि आजही आपण त्या वापरत आहोत. अशा self-organizing system ची चर्चा फ्रेडरिक बास्तियाने त्याच्या निबंधात केली आहे. त्याकरता त्याने एका सुताराचे उदाहरण घेतले आहे. पॅरिस मधील एक सुतार दिवसभर कपाटे खुर्च्या असे साहित्य तयार करण्यात घालवतो. मात्र संपूर्ण दिवसात तो विविध प्रकारच्या वस्तू इतरांनी तयार केलेल्या वापरत असतो. त्याच्या कपड्यांकरता कापूस अमेरिकेत लावला जातो, नीळ भारतीय लोक तयार करतात. त्याला मिळणाऱ्या पावासाठी दूरच्या शेतकऱ्यांनी आपली शेते नांगरली, त्यात बी पेरले.शेतकऱ्यांची अवजारे, गहू दळण्यासाठी काही यंत्रे लागली त्याकरता लागणारे पोलाद आधीच कुणीतरी तयार करून ठेवले होते. हे सर्व वर्णन केवळ सुताराला नव्हे तर अमेरिकेतला शेतकरी (अमेरिकेत तेव्हा गुलामी होती हे सध्या महत्वाचे नाही), फ्रान्समधला शेतकरी, पोलाद तयार करणारा यांनाही तसेच लागू आहे. हे सर्व एकमेकांना आयुष्यात कधीही न भेटणारे लोक हे सर्व काम सुताराला कपडे मिळावेत याकरता, त्याला पाव मिळावा याकरता याकरता अजिबात करत नसतात. शेतकरी बी पेरतो कारण त्याला धान्य विकून नंतर नवा चपलेचा जोड घ्यायचा असतो. पोलादी हत्यारे तयार करणाऱ्याला नंतर नवा सदरा घ्यायचा असतो. हे सर्वच लोक आपल्या हिताचे रक्षण करत असतात, मात्र त्यातून अनेकांचे हित साधत असतात. हे सर्व चालते कोणत्याही केंद्रीय नियोजनाशिवाय, कुणाच्या आदेशाशिवाय. बास्तियाने सांगितलेल्या self-organizing systems चे आजचे रूप म्हणजे एकमेकांशी स्पर्धेत असणाऱ्या कंपन्या, छोटे- मध्यम आकाराचे उद्योजक हेच होत. भारतीय अर्थव्यस्थेचा केंद्रीय नियोज़नाकडून self-organizing system म्हणजेच अधिक मुक्त व्यवस्थेकडे झालेला प्रवास श्रुती राजगोपालन यांच्या पपेरमध्ये अतिशय सुंदर समजावून सांगितला आहे [1]. तर अशा system चा परत परत उच्चार करत असताना शासनाची भूमिका नेमकी कुठे आहे? शासनाची भूमिका मर्यादित क्षेत्रात पण प्रभावी अशी योजना पुस्तकात सुचवली आहे. self-organizing systems प्रभावी ठरत नाहीत अशा समस्या आणि त्यावर शासनाच्या हाती असलेले उपायांचे मर्यादित मार्ग यांची चर्चा त्यापुढे केली आहे. तसेच आजपर्यंतच्या प्रयत्नांना अपयश का आले याचीही चर्चा केली आहे. सरकारी शाळेत दर विद्यार्थ्यामागे खर्च २००८-९ मध्ये ७२४५ रु पासून २०१६-१७ पर्यंत १९,२३३ रु पर्यंत वाढला (२०११ किंमतीत) मात्र त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर मात्र पाहिजे तास परिणाम झाला नाही. २०१० मध्ये इ पाचवितील ५०.७ % विद्यार्थी इ दुसरीच्या पातळीचे वाचन करू शकत होते तेच प्रमाण २०१६-१७ मध्ये ४० % वर आले. हे वाक्य परत एकदा वाचा आणि अधिक माहितीसाठी ASER च्या संकेस्थळावर उपलब्ध असलेले मागच्या सुमारे २० वर्षांचे असे सर्वे जरूर पहा. या अपयशामागचे कारण म्हणजे input, output, outcome यांची स्पष्ट मांडणी आणि मोजदाद न करणे होय. शाळेची इमारत, शिक्षकांची नेमणूक हे input, प्रत्यक्ष शिक्षक हजर राहून शिकवणे [2] हे output आणि इ पाचवीतल्या जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना किमान इ दुसरी पातळीचे वाचन करता येणे हा outcome. तर नेमणूक केलेला शिक्षक तिथे हजर राहावा, outcome साठी त्याने त्याच्या performance मध्ये सुधारणा करावी याकरता human resource policy हवी. आर्थिक सुधारणा करताना कोणत्या क्रमाने कराव्यात यालाही महत्व आहे. आयात मुक्त करण्यापूर्वी विनिमय दर हा वर खाली होणार (floating) असला पाहिजे जेणेकरून अमर्याद आयातीला घसरणारे चलन अटकाव करेल. वर खाली होणारे विनिमय दर किती महत्वाचे आहेत याकरता संदर्भातील मिल्टन फ्रीडमन यांचा केवळ अडीच मिनिटांचा विडिओ जरूर पहा. अशाप्रकारे सार्वजनिक धोरणासंदर्भात विचार करण्यास हे पुस्तक दिशा दाखवते.
आर्थिक सुधारणांसोबत कायद्याचे राज्य, अधिकारांचे विकेंद्रीकरण, विचारांची देवाणघेवाण, अधिकार वापरून थेट निर्णय घेण्यावर मर्यादा अशा राजकीय सुधारणाही आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच सार्वजनिक धोरण ठरवताना योग्य माहितीचे संकलन, त्याचा अभ्यास, संशोधन आणि त्यातून काही पर्यायांचा शोध, त्यावर विस्तृत चर्चा यांचेही महत्व पुस्तकात सांगितले आहे. प्रत्येक सार्वजनिक धोरणाच्या केंद्रस्थानी असलेला मनुष्यप्राणी हा काही ग्रह ताऱ्यांप्रमाणे समीकरणांमध्ये बांधलेला नाही. बुद्धिबळाच्या पटावरील प्याद्यांप्रमाणे त्याला कसाही चालवावा असे नाही. त्यामुळे कोणत्याही धोरणाचे परिणाम आपण कागदावर लिहिल्याप्रमाणे होतीलच असे नाही. तुम्ही गरिबांसाठी केरोसीन, धान्य स्वस्त विकाल तर तेच केरोसीन गाड्यांसाठी आणि तेच धान्य अन्य बाजारात विक्रीसाठी आलेले दिसेल. आपल्याला हे चूक आहे असे कितीही वाटले तरी मनुष्यप्राण्याला लागू असलेले समीकरण असेच आहे हे मान्य करून पुढे गेले पाहिजे. नोटबंदी एका रात्रीत करून भ्रष्टाचाराचा नायनाट होईल असे आपल्याला वाटत असले [4] तरी सार्वजनिक धोरण क्षेत्रात असे रामबाण (silver bullet) नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात एक बौद्धिक नम्रता (intellectual humility) आवश्यक असल्याचा संदेश मी या पुस्तकातून माझ्यासाठी घेतला.
संदर्भ
[1] Rajagopalan, Shruti, The 1991 Reforms and the Quest for Economic Freedom in India (December 14, 2021). Capitalism & Society, Volume 15, Issue 1 (2021)
[2] Muralidharan K, Das J, Holla A, Mohpal A. The fiscal cost of weak governance: Evidence from teacher absence in India. J Public Econ. 2017 Jan;145:116-135. doi: 10.1016/j.jpubeco.2016.11.005. PMID: 28148992; PMCID: PMC5268339.
[3] https://www.youtube.com/watch?v=oolPCZZtJc8
[4] https://www.livemint.com/Opinion/d7V9V6xUulbGWr5LLjttDJ/Six-battlefronts...

अर्थकारणआस्वाद

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

10 Dec 2025 - 2:07 pm | चंद्रसूर्यकुमार

मस्त. हा विषय माझ्या आत्यंतिक जिव्हाळ्याचा आहे. त्याविषयी लिहिल्याबद्दल धन्यवाद.

हे सर्व एकमेकांना आयुष्यात कधीही न भेटणारे लोक हे सर्व काम सुताराला कपडे मिळावेत याकरता, त्याला पाव मिळावा याकरता याकरता अजिबात करत नसतात. शेतकरी बी पेरतो कारण त्याला धान्य विकून नंतर नवा चपलेचा जोड घ्यायचा असतो. पोलादी हत्यारे तयार करणाऱ्याला नंतर नवा सदरा घ्यायचा असतो. हे सर्वच लोक आपल्या हिताचे रक्षण करत असतात, मात्र त्यातून अनेकांचे हित साधत असतात. हे सर्व चालते कोणत्याही केंद्रीय नियोजनाशिवाय, कुणाच्या आदेशाशिवाय.

याविषयी मिल्टन फ्रीडमन साहेबांचा पुढील व्हिडिओ- पेन्सिल जरूर बघावा असा आहे. तुमच्याप्रमाणे मी पण मिल्टन फ्रीडमन साहेबांचा चाहता आहे.
https://youtu.be/67tHtpac5ws?si=zy42UPPw-ekU05GQ

वर खाली होणारे विनिमय दर किती महत्वाचे आहेत याकरता संदर्भातील मिल्टन फ्रीडमन यांचा केवळ अडीच मिनिटांचा विडिओ जरूर पहा. अशाप्रकारे सार्वजनिक धोरणासंदर्भात विचार करण्यास हे पुस्तक दिशा दाखवते.

याच विषयावर मिल्टन फ्रीडमन साहेबांचा थोडा अधिक विस्तारातील व्हिडिओ पुढे देत आहे.
https://www.youtube.com/watch?v=c9STBcacDIM

गेल्या अनेक वर्षांपासून मला मिल्टन फ्रीडमन साहेबांचे म्हणणे अगदी १००% पटत होते. मात्र आता १००% नाही तर अर्धेच पटते. साहेब म्हणतात ते वस्तूंसंदर्भात अधिक योग्य आहे. पण ते सेवांच्या संदर्भात तितक्या प्रमाणावर लागू पडेल का याविषयी साशंक आहे. त्यांचे हे भाषण ५० वर्षांपूर्वीचे आहे. त्यावेळेस इंटरनेटवर आधारीत सेवा पुरविणे हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. पण आता आहे. वस्तू निर्यात केल्या तर त्या आपल्याला वापरायला मिळत नाहीत तसे सेवांविषयी होत नाही. दुसरे म्हणजे साहेब म्हणत आहेत ते सेन्सिबल लोकांच्या जगात अगदी पूर्णपणे योग्य ठरेल. पण समजा ट्रम्पसारखा कोणी महत्वाच्या सत्तापदावर असेल तर कागदावर भारदस्त दिसणारे हे लॉजिक पूर्ण उलटेपालटे होऊ शकते. हे प्रकर्षाने जाणविले काही महिन्यांपूर्वी मायक्रोसॉफ्टने नायरा ऑईलला क्लाऊड सर्व्हिस द्यायला नकार दिला तेव्हा. नायरा ऑईल रशियातून तेल विकत घेत असल्याने त्या कंपनीवर निर्बंध- इतकेच नव्हे तर त्या कंपनीशी कोणतेही व्यवहार करायला अमेरिकन कंपन्यांनाही बंदी. त्यामुळे मायक्रोसॉफ्टने तसे केले. आज सगळ्या प्रकारच्या व्यवसायांमध्ये आय.टी इन्फ्रास्ट्रक्चर असणे सगळ्यात महत्वाचे आहे. मेकमायट्रीप सारख्या पोर्टलवरून आपण विमानाचे तिकिट बुक करतो तेव्हा आपण जिथे कुठे असू तिथून मेकमायट्रीप आणि विमान कंपन्या यांना जोडणारा एक आय.टी इन्फ्रास्ट्रक्चरमधील दुवा असतो. तीच गोष्ट शेअर मार्केटची. तीच गोष्ट जवळपास सगळ्या प्रकारच्या व्यवसायांची. बॅक एन्डला आय.टी. इन्फ्रास्ट्रक्चर - क्लाऊड की जे काही असेल ते किती महत्वाचे आहे हे त्यावेळेस अधिक प्रकर्षाने जाणविले. तशा क्लाऊड सेवा देणार्‍या जवळपास सगळ्या कंपन्या अमेरिकन आहेत. समजा भविष्यात अमेरिकेशी संबंध आणखी बिघडले आणि नायराप्रमाणे सगळ्या भारतीय कंपन्यांशी व्यवहार करायला तात्यांनी अमेरिकन कंपन्यांना बंदी घातली तर? आता ही हायपोथेटिकल गोष्ट वाटत आहे पण तात्यांचा लहरी स्वभाव लक्षात घेता तसे होणारच नाही याची अजिबात खात्री देता येणार नाही.

आज जवळपास सगळा आंतराराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्ये चालतो. त्याचे कारण १९७४ मध्ये रिचर्ड निक्सनने सौदीशी केलेला पेट्रो डॉलर करार. तेल सगळ्याच देशांना गरजेचे असल्याने तेल विकत घ्यायला डॉलर द्यावे लागणार असतील तर मग ते डॉलर आणायचे कुठून? तर मग इतर वस्तूंची निर्यात केली तर त्याचेही पैसे डॉलरमध्ये घेणे भाग झाले. त्यातून मग सगळा आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्येच करणे भाग झाले. ते डॉलर एका देशातील कंपनीने दुसर्‍या देशातील कंपनीला द्यायचे कसे? तर त्यासाठी परत अमेरिकेचीच स्विफ्ट यंत्रणा. आपण एका गोष्टीविषयी पूर्ण अनभिज्ञ असतो पण आपण जेव्हा परदेशात बनलेली एखादी वस्तू (समजा चीन किंवा तैवानमध्ये बनलेला लॅपटॉप) विकत घेतो तेव्हा आपल्या भारतीय बँकेतील खात्यातून पैसे लॅपटॉप विकणार्‍या कंपनीच्या खात्यात थेट जात नाहीत तर स्विफ्ट नेटवर्ककडून आपल्या (समजा) एच.डी.एफ.सी बँकेकडून त्यांचे टाय-अप असेल अशा एखाद्या अमेरिकन बँकेत (समजा बँक ऑफ अमेरिका) डॉलरमध्ये जातात, तिथून लॅपटॉप विकणार्‍याचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेचे टाय-अप असेल त्या अमेरिकन बँकेत (समजा वेल्स फार्गो) जातात आणि वेल्स फार्गो बँक ते पैसे लॅपटॉप विकणार्‍याच्या बँक खात्यात यूआनमध्ये देते. आता समजा तात्यांनी निर्बंध आणला- क्ष या कंपनीबरोबर कोणतेही व्यवहार करायचे नाहीत- स्विफ्ट नेटवर्कमधून ती कंपनी बाहेर. मग लागल्या बोंबा? स्टेट बँक ऑफ इंडिया मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यातीसाठी अशाप्रकारे स्विफ्ट नेटवर्कचा वापर करते. नायराचे रशियन कंपन्यांना पैसे देण्याचे व्यवहार एस.बी.आयकडूनच व्हायचे. आता एस.बी.आय नायराबरोबर व्यवहार करते म्हणून एस.बी.आय ला स्विफ्ट नेटवर्कमधून बाहेर केले असते तर काय ही भिती वाटून मग एस.बी.आयने नायराचे व्यवहार प्रोसेस करायला नकार दिला. मग त्यांना ते व्यवहार सेंट्रल बँक की अन्य दुसरी कोणतीतरी स्विफ्टमध्ये फार सक्रीय नसलेली बॅंक वापरून करावे लागले.

म्हणजे एकूणच काय- तर एक तर आंतरराष्ट्रीय व्यापार करा अमेरिकन चलनात, त्यासाठीचे पैसे ट्रान्स्फर करा अमेरिकन स्विफ्ट पध्दत वापरून. सगळ्या उद्योगांना लागणारे आय.टी इन्फ्रास्ट्रक्चर कोण देणार? तर अमेरिकन कंपन्या. अशावेळेस अमेरिकेत ट्रम्पसारखा कोणी माथेफिरू असेल आणि त्याचे डोके फिरले तर तो किती अडचणी निर्माण करू शकेल याची कल्पनाही करवत नाही. बाकी सगळे सोडा- समजा अगदी आय.टी इन्फ्रास्ट्रक्चरही बंद करून टाकले तर भारताची पूर्ण अर्थव्यवस्था टेकीला येऊ शकेल. नेटबँकिंग, फोन वरील सगळी अ‍ॅप्स, शेअर मार्केट पासून सगळे व्यवहार पूर्ण ठप्प होऊ शकतील.

आता या पार्श्वभूमीवर मिल्टन फ्रीडमनसाहेबांचे गणित कसे बसवायचे? त्यांच्या (आणि अ‍ॅडम स्मिथपासून सगळ्या फ्री मार्केट वाल्यांच्या) म्हणण्याचा अर्थ हा की पूर्ण साखळीत असलेले सगळे घटक आपल्या फायद्यासाठी अशा पध्दतीने वागतात की पूर्ण सिस्टीम व्यवस्थित चालते. पण आपल्याला त्रास झाला तरी बेहत्तर दुसर्‍याचे नुकसान झाले पाहिजे असे म्हणणारा एखादा माथेफिरू त्या साखळीत कुठेतरी किंवा त्या साखळीतील घटकांवर प्रभाव टाकायला आला तर? साहेबांच्या काळात असे काही होईल याची कल्पनाही कदाचित त्यांनी केली नसावी त्यामुळे त्यांच्या गणितात या प्रश्नाचे उत्तर नाही. पण आता ते उत्तर शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.

असो. तुमच्याप्रमाणेच मलाही या विषयांची खूप आवड आहे. श्रुती राजगोपालन ज्या जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीमध्ये मर्केटर सेंटरमध्ये आहेत तिथलेच एक प्रोफेसर डॉनल्ड बॉडरॉक्स यांचा कॅफेहायेक हा ब्लॉग पूर्वी मी नेहमी वाचायचो- हल्ली बर्‍याच महिन्यात वाचलेला नाही. कॅफे हायेक मधील हायेक हे फ्रेडरीक हायेक- लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधे एकेकाळी त्यांच्यासारखे ऑस्ट्रीयन प्रोफेसर पण होते. फ्रेडरीक हायेक, फ्रेडरीक बास्तिया, लुडविग व्हॉन मिजस वगैरेंचे एके काळी खूप वाचायचो. गेले ते दिवस आता... :)

नमस्कार,
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. प्रवासात असल्याने लिहिता आले नाही.
फ्रीडमन यांचा छोटा विडिओ अन्य मोठ्या व्हिडिओचा भाग आहे आणि त्यांची अन्य व्याख्याने पाहणे निश्चित आनंद देणारे आहे. आपल्यालाही ते आवडल्याचे पाहून बरे वाटले.
तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेशी जास्तीत जास्त जोडले जाण्यातून त्यावर होणारे अवलंबवित्व हा मुद्दा महत्वाचा आहे. युरोप -इराण व्यापारातही swift चा अडथळा झाला होता आणि त्यातून instex नावाची सिस्टिम त्यांना काढावी लागली असे वाचले. त्यामुळे हे अवलंबवित्व खरेच आहे. मात्र मी उलट्या रीतीने पाहतो कि त्या परदेशी खाजगी कंपन्यांना भारतीय बाजारपेठही हवी आहे त्यामुळे एक मर्यादेपलीकडे उलथापालथ त्यांनाही हवीय असे मला वाटत नाही. (नयराचा विषय कसा मिटला मला माहित नाही). थोडा दबाव, प्रसंगी अपमान आपल्याला सहन करावा लागेल हे खरे. पण नाईलाज आहे. पहिली ४० वर्ष बंदिस्त व्यवस्था आपण राबवून पाहिली आणि त्यातून जगाला पादाक्रांत करेल असे एकही उत्पादन तयार झालेले नाही. त्यामुळे सध्या आंतराराष्ट्रीय व्यवस्थेशी जोडून घेऊन आवश्यक ज्ञान, अनुभव आपल्या लोकांनी घेणे आपल्या फायद्याचे आहे. माझ्या बास्तिया वरील लेखात तेव्हा बाल्यावस्थेत असलेल्या संगणक क्षेत्राला बंदिस्तपणाचे जे ग्रहण लागले त्याचे वर्णन एका संदर्भात दिलेले आहे ते जरूर पहा.
तसेच आंतरराष्ट्रीय सोडा, आपल्या देशांतर्गत सुद्धा कितीतरी आर्थिक सुधारणा गरजेच्या आहेत त्यांचा अजून पत्ता नाही. उत्पादकता वाढ, त्यातून आर्थिक वृद्धी, आणि त्यातून समृद्धी याची जाणीव अजून लोकात नाही. सारा काही वाटपाचा खेळ अजून चालू आहे. पैशाला किलोभर समाजवादी विचार आज पाहायला मिळतील. अशा परिस्थितीत स्मिथ, मिसेस, हायेक, फ्रीडमन यांच्या विचारांचा प्रसार करणे आवश्यक आहे. शिक्षणासाठी थेट अनुदान, खाजगी शहरे इ सारख्या धाडसी सुधारणा आपल्याला कधीना कधी कराव्याच लागतील. नाही तर त्या न केल्याचे परिणाम तरी भोगावे लागतील. त्याकरता लोकांमध्ये जागृती घडवून आणायचे, सरधोपट समाजवादी दृष्टीपेक्षा वेगळी दृष्टी तयार व्हायला पाहिजे त्याकरता अधिक अभ्यास, अधिक लेखन केले पाहिजे.