वयाच्या विशीत जेव्हा आपण काही पुस्तके वाचतो आणि ती आवडतात तेव्हा त्यांचे लेखक आपल्या मनावर गारुड करतात आणि त्यातले काही तर कायमचा ठसा उमटवतात. वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत इंग्लिश साहित्याशी काही संबंधच आला नव्हता. नंतर मेडिकलला गेल्यानंतर ब्रिटिश लायब्ररीचा सभासद झालो. खरं म्हणजे त्याचा उद्देश अभ्यासाच्या पुस्तकांसाठी होता. परंतु पहिल्याच दिवशी तिथे पाऊल टाकताच लक्षात आले की, अरेच्चा, इथे इंग्लिश गोष्टीची पुस्तके सुद्धा आहेत तर ! अशा तऱ्हेने इंग्लिश साहित्य वाचनाचा ओनामा झाला.
पुढच्या पाच वर्षांमध्ये अभ्यासाचा बोजा सांभाळत काही मोजके इंग्लिश लेखक वाचले आणि त्यापैकी एक म्हणजे सॉमरसेट मॉम. कथांचा बादशहा आणि कादंबऱ्यांचा शहेनशाह असलेल्या या गृहस्थाचे अनेक कथासंग्रह तिथे हारीने मांडून ठेवलेले असायचे. मग त्यातले एकेक वाचायला घेतले. ‘Rain’ या दीर्घकथेने मनात एक कप्पाच तयार करून ठेवला. ग्रंथालयात या कथासंग्रहांच्याच्या जोडीने त्यांच्या कादंबऱ्या देखील होत्या परंतु एकंदरीत त्यांचा आकार बघता मनात तशी धडकीच भरलेली असायची आणि त्यांना हात लावत नव्हतो. एकदा एक मित्र गप्पा मारताना म्हणाला की, अरे, माहिती आहे का, मॉमची ऑफ ह्यूमन बॉण्डेज ही जगातली नंबर दोनची कादंबरी आहे. मग त्याच्या या उद्गारांनी प्रभावित होऊन अन् धाडस करून तो ६४८ पानी मोठा ठोकळा आणला आणि नेटाने वाचला. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील एका पुस्तकाचे हे सर्वात मोठे दीर्घवाचन. पुढे पदवी मिळाल्यानंतर ग्रंथालय बंद केले आणि त्यानंतर संसाराच्या दबडघ्यात जवळपास 30 वर्षे इंग्लिश साहित्याला अगदी विसरून गेलो; किंबहुना मनातून त्याची ओढ पण वाटली नाही. पण चार वर्षांपूर्वी पुन्हा एकदा मॉम यांच्या साहित्यवाचनाकडे वळायला काय कारण घडले ते आता सांगतो.
तो 2021 चा पावसाळा होता आणि एक दोन जोरदार पाऊस आसपास पडले. त्या रिमझिम वातावरणात अचानक हुक्की आली की आपण फार पूर्वी वाचलेली मॉमची ‘Rain’ पुन्हा वाचायला घेतली तर? मग ती जालावर वाचली. डॉ. मॅकफेल हा वैद्यकीय डॉक्टर, डेव्हिडसन हा ख्रिस्ती धर्मप्रचारक आणि सॅडी ही वेश्या यांच्यातील परस्पर संबंधांवर बेतलेली ही कथा वाचकाला अस्वस्थ करणारी ही कथा उच्चभ्रूपणा, दिखाऊ सभ्यता आणि तथाकथित नैतिकता यांचा बुरखा अलगदपणे फाडते. परिणामकारक शेवटामुळे ती मर्मभेदी झाली आहे. या कथेच्या द्वितीय वाचनातून तिची काही सौंदर्यस्थळे आता बारकाईने जाणवली. सॅडीची जी दोन्ही भिन्न रुपे रंगवलीत त्याला तोड नाही. तिचा कथांतातील तिरस्कारयुक्त भाव तर अंगावर चालून येतो. डेव्हिडसनच्या धर्माच्या बुरख्याआड दडलेला विषयासक्त पुरुष हे तर कथेचे बीज व बलस्थान आहे. ही दीर्घकथा माझ्या आयुष्यभर स्मरणात राहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे, तिच्या अंतिम चरणात सॅडीने पचकन थुंकत उद्गारलेली ही दोन वाक्ये :
She answered, “You men! You filthy, dirty pigs! You’re all the same, all of you. Pigs! Pigs!”
संपूर्ण कथेत ‘रेन’ हा शब्द तब्बल 26 वेळा आलाय आणि तो क्रमाने क्रोध, शिक्षा आणि पश्चात्ताप यांचे प्रतीक बनून येत राहतो. त्याची साद्यंत वर्णने वाचकाच्या मनात खळबळ व चिंता उत्पन्न करतात. जसा कथेचा कळसबिंदू जवळ येतो तसे पावसाचे वर्णन अधिकाधिक येऊ लागते आणि त्याची वर्णनेही अलंकारिक होतात. त्यापैकी त्याचे malignant हे विशेषण सर्वोत्तम आहे !
मॉम हे ब्रिटिश लेखकांच्या ‘एडवर्डीय’ परंपरेतील लेखक. त्यांचा मृत्यू होऊन आता साठ वर्षे उलटली आहेत. म्हणून नव्या पिढीतील वाचकांसाठी त्यांचा अल्पपरिचय प्रस्तुत ठरावा. शिक्षणाने वैद्यकीय डॉक्टर असलेल्या मॉमनी 91 वर्षांच्या आपल्या आयुष्यातील 65 वर्षांच्या अखंड लेखनकामाठीत 19 कादंबऱ्या, शेकडो लघुकथा, 31 नाटके, आठ ललित आणि चार आत्मपर अशी पुस्तके लिहिलीत. त्यांच्या साहित्याची, विशेषतः नाटकांची जगातल्या बहुतेक प्रमुख भाषांत रूपांतरे झालेली आहेत. मराठीत सुद्धा पु ल देशपांडे, माधव मनोहर आणि अन्य काही लेखकांनी मॉम-साहित्याचे रूपांतर केलेले आहे. सध्या देखील काही साहित्यिक आणि वाचकांच्या वर्तुळांत मॉम काहीसे लोकप्रिय असून त्यांची खालील चार पुस्तके आवर्जून वाचून चर्चिली जातात :

विल्यम सॉमरसेट मॉम (१८७४ - १९६५)
वाचकांचे रंजन हा मुख्य हेतू मनात ठेवूनच त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन केले. स्वतःच्या साहित्यिक स्थानाबद्दल ते म्हणतात,
“मी स्वतः लेखकांच्या दुसऱ्या पंगतीतल्या पहिल्या खुर्चीतला लेखक आहे”.
त्यांनी लेखनावर मिळवलेल्या अलोट धनसंपत्तीतील एक हजार पाउंड वेगळे काढून त्यातून सॉमरसेट मॉम प्रतिष्ठान सुरू केलं आणि त्या मुद्दलाच्या वार्षिक व्याजातून दरवर्षी एका होतकरू इंग्लिश ललित साहित्यिकाला 400 पाउंडांची पर्यटन शिष्यवृत्ती मिळण्याची सोय करून ठेवलेली आहे. स्वतः मॉम जातिवंत भटक्या होते आणि आपल्या लेखनाप्रीत्यर्थ त्यांनी भरपूर जगभ्रमंती केलेली होती. त्यांच्या भारतभेटीत अरुणाचलमच्या संत रमणमहर्षींना भेटणे हा त्यांच्या कार्यक्रमातील एक महत्त्वाचा भाग होता.
आता मॉम यांच्या गाजलेल्या उपरोल्लेखित ४ साहित्यकृतींमध्ये डोकावून पाहू.
‘ऑफ ह्यूमन बाँडेज’ ही विशेष उल्लेखनीय आत्मचरित्रात्मक बृहदकादंबरी. १९१५मध्ये ती लिहिली गेली. तिचा सारांश म्हणजे, एखाद्याने एखाद्या क्षुद्र व स्वार्थी व्यक्तीवर जिवापाड प्रेम केले तर त्याच्या वाट्याला जे दुःखभोग येतात त्याची ही दीर्घकहाणी.
कादंबरीच्या तीन खंडांपैकी मधला खंड तिचा आत्मा असून त्यात कादंबरीचा नायक आणि त्याच्या प्रेयसीची धगधगती प्रेमकथा आहे. त्याचे वर्णन अत्यंत उत्कट आणि वाचकाला पिळवटून टाकणारे केलेले असून त्यामुळेच ही कादंबरी अभिजाततेच्या जवळपास पोचते. कादंबरीचा नायक दिव्यांग असून तो मेडिकलचा विद्यार्थी आहे तर त्याची प्रेयसी हॉटेलातली वेटर. तो खुळ्यासारखा तिच्या प्रेमात पडतो. परंतु ती मात्र त्याला सातत्याने फसवून त्याची लुबाडणूक करते. अखेरीस हे प्रेम असफल होते. तो त्याच्या मार्गाने जातो आणि तिचा अध:पतित मार्ग वेश्याबाजारात जाऊन पोचतो. अशा प्रकारच्या तत्कालीन आत्मचरित्रात्मक कादंबऱ्यांची काही वैशिष्ट्ये लक्षात येतात. त्यात कथानायकाचा बालपणापासून ते तारुण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यातील त्याचे प्रेमाचे अनुभव विस्ताराने येतात. त्यातून बऱ्याचदा दुःखच त्यांच्या पदरी पडते परंतु अखेर त्या दुःख पचवण्यातूनच हे नायक कणखर होताना दिसतात.
अर्थात कादंबरीचा सुरुवातीचा आणि शेवटचा बराचसा भाग निव्वळ वर्णनात्मक असून पाल्हाळीक झालेला आहे. काही वर्षांनी खुद्द मॉमना देखील ते जाणवले असावे. म्हणूनच नंतर त्यांनी या बृहद्कादंबरीची संक्षेपित आणि चटपटीत अशी दीडशे पानांची आवृत्ती साकार केली. या कादंबरीवर बेतलेला चित्रपट युट्युबवर पाहता येईल (त्यात Bette Davis या गाजलेल्या अभिनेत्रीने प्रेयसीची भूमिका केलेली आहे). या कादंबरीने माझ्या मनावर ठसा उमटवण्याचे अजून एक कारण म्हणजे या पुस्तकाच्या प्रस्तावनेतले हे वाक्य :
“For your own satisfaction and mine please read this preface”.
ते मनावर अगदी कोरले गेले. किंबहुना ते वाक्य मनात ठसल्यानंतरच मला पुस्तकांच्या प्रस्तावना वाचायची सवय लागली. जणू हा एक बोनसच.
मॉमच्या लेखनावरची इतर विद्वानांची टीकाटिपणी वाचून हे समजते की बहुतेक समीक्षकांच्या मते त्यांची ‘बॉण्डेज’ हीच कलाकृती त्यांच्या सर्व साहित्यापैकी सर्वोत्कृष्ट आहे. परंतु खुद्द मॉम यांनी त्यांच्या उतारवयात काहीसे वेगळे मत मांडले होते. जरी समीक्षकांनी सर्वोत्कृष्ट ठरवलेल्या बॉण्डेजबद्दलच्या मताशी ते तत्वतः सहमत होते, तरी त्यांच्या स्वतःच्या मते त्यांची सर्वाधिक आवडती कादंबरी म्हणजे Cakes & Ale.

Cakes & Ale ही कादंबरी समाजातील तथाकथित उच्चभ्रूपणाच्या बेगडी कल्पनांवर भाष्य करते. तिचे शीर्षक काहीसे कुतूहलजनक असून Cakes & Ale हा शब्दप्रयोग शेक्सपियरच्या Twelfth Night या नाटकातील संवादातून घेतलेला आहे. तसेच इसापाच्या एका कथेत केक आणि मद्य ही सुबत्तेची प्रतीके मानली गेलेली आहेत. कादंबरीचा झोत दोन महायुद्धांदरम्यानच्या काळातील लंडनमधील साहित्यविश्वावर असून त्यावर लेखकाने सडेतोड उपरोधिक भाष्य केलेले आहे. त्यातली तीन मुख्य पात्रे लेखकांचीच आहेत.
Edward हा गाजलेला व दिवंगत झालेला, Alroy हा मध्यम दर्जाचा आणि तिसरा खुद्द William हा कादंबरीचा तरुण निवेदक. एडवर्डने पहिल्या बायकोच्या मृत्यूनंतर एमी या दुसऱ्या स्त्रीशी लग्न केलेले होते आणि ती हयात आहे. ती अलरॉयला एडवर्डचे चरित्र लिहिण्यासंबंधी विनंती करते. एडवर्डची पहिली बायको रोझी ही कादंबरीतील एक महत्त्वाचे पात्र असून ती एडवर्डची लेखनासाठीची स्फूर्ति-देवता होती. रोझी हे या कादंबरीतील मुख्य स्त्रीपात्र म्हणता येईल आणि ती सामाजिक उच्चभ्रूपणाचे प्रतीक आहे. ती प्रांजळ असून मुक्त लैंगिक जीवन जगणारी असल्यामुळे त्या काळी तिच्यावरची सनातनी मंडळींची तुफान चिखलफेक समजण्यासारखी आहे. निवेदकाने तिच्याकडून शरीरसुख घेतलेले असल्यामुळे तो तिच्याकडे सहृदयतेने पाहतो. एडवर्ड आणि रोझी यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी निवेदकाने अलरॉयला सांगाव्यात अशी अलरॉयची अपेक्षा असते परंतु अखेरीस निवेदक त्या स्वतःच्या मनातच ठेवतो.
कादंबरीतील Edward व Alroy या दोन प्रमुख पात्रांचे Hugh Walpole व Thomas Hardy या दोन प्रसिद्ध इंग्लिश साहित्यिकांशी खूप साधर्म्य आढळल्यामुळे त्यांच्याच आयुष्यावर ही कादंबरी बेतल्याची टीका त्या काळी झाली होती. तसेच रोझी म्हणजे मॉम यांच्या असफल प्रेमातील प्रेयसी अशीही जोरदार वदंता होती. अर्थात मॉमनी त्याचा परिस्थितीजन्य पुराव्यासह इन्कार केला होता (कदाचित या मुद्द्यामुळेच ही कादंबरी मॉम यांची सर्वाधिक लाडकी होती का? असो).
कादंबरीच्या मुख्य शीर्षकाबरोबरच ‘The Skeleton in the Cupboard हे’ एक पर्यायी उपशीर्षक दिलेले आहे. तो एक वाक्प्रचार असून त्याचा अर्थ, एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यातील लज्जास्पद किंवा त्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या गोष्टी लोकांपासून दडवून ठेवणे, हा आहे. कादंबरीत एकेक गुपिते उत्कंठावर्धक गतीने उलगडत वाचकांसमोर येतात. त्याचबरोबर इंग्लंडच्या राजसत्तेशी जवळीक असलेले काही उपटसुंभ स्वतःला कसे लेखक म्हणवून घेतात हे दाखवून त्यांच्यावर केलेले उपरोधिक भाष्य मुळातून वाचण्यासारखे. एकंदरीत अशा प्रवृत्तीवर केलेला कठोर प्रहार हे देखील पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
‘A Writer’s Notebook’ हे पुस्तक म्हणजे लेखकाची चक्क खरडवही ! दैनंदिन जीवनातील असंख्य गोष्टींच्या नोंदवहीत केलेल्या टिपणांचेच पुढे पुस्तक केले आहे. मुळात त्यांनी ही टिपणे वयाच्या 18 व्या वर्षापासून ते थेट 70व्या वर्षापर्यंत सातत्याने केलेली होती. कुठल्याही नव्या लेखनाला प्रारंभ करण्यापूर्वी ते प्रथम त्यांच्या या टिपणवहीचा आधार घेत. या लेखनामध्ये लहानसहान वाक्यांच्या जोडीने काही मोठे परिच्छेद देखील आहेत. लेखकाचे निरीक्षण आणि त्यावरील मत असे त्यांचे एकंदरीत स्वरूप आहे. काही लहान वाक्ये बोधप्रद तर आहेतच पण त्यातील काही आपल्याला अगदी मुळापासून हलवतात.
“लेखकांसाठी एक नियम : अतिस्पष्टीकरणाच्या भानगडीत पडू नका” यासारखे एखादे वाक्य लेखकांना मूलभूत लेखनसिद्धांत सांगून जाते
तर,
“ समाजातील ‘वर्ग’भेद हे नेहमीच अस्तित्वात असून त्यांचे अस्तित्व नाकारण्याऐवजी ते कबूल करण्यातच प्रामाणिकपणा आहे”
हे वाक्य सार्वकालिक जागतिक कटू सत्य अधोरेखित करते. वचनांसमान असणारी अशी अनेक वाक्ये या पुस्तकातून उतरवून घ्यायचा आपल्याला मोह होतो. पण तो न आवरल्यास सुमारे एक चतुर्थांश पुस्तकच उतरवून काढावे लागेल !
हे पुस्तक लिहिताना मॉमनी Jules Renard या फ्रेंच लेखकाचा आदर्श समोर ठेवलाय. त्या लेखकाने लिहिलेले साहित्य जरी काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्याने वीस वर्ष लिहून ठेवलेली त्याची टिपणवही मात्र एक महत्त्वाचा ऐवज असल्याचे मॉम सांगतात. अशा टिपणवहीचे पुस्तक प्रसिद्ध करण्यातून वाचकांना लेखकाच्या साहित्यिक ‘कारखान्या’चे दर्शन घडते आणि त्याची निर्मितीप्रक्रिया देखील समजते, असे त्यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलेले आहे.
मॉम यांच्यावर त्यांच्या आधीच्या पिढीतील गी द मोपांसा या लेखकाच्या शैलीचा प्रभाव होता. मॉमनी आपल्या कथालेखनातून मानवी मनांचे चलनवलन तटस्थ नजरेतून वर्णन केल्याचे आढळते. माणसामाणसांमधील संबंधातील सत्य ते परखडपणे वाचकांसमोर मांडतात. लेखन ही फार कष्टाची गोष्ट आहे असेही ते या लेखनाच्या ओघात सांगून जातात.
‘The Summing up’ हे लेखकाचे आत्मकथन. रूढार्थाने ते आत्मचरित्र नव्हे, परंतु स्वतःच्या प्रदीर्घ लेखनायुष्याचा कोलाज त्यात चितारलाय. मॉम हे बहुआयामी लेखक होते. त्यांनी आपल्या 65 वर्षांच्या लेखन कारकिर्दीत अनेक साहित्य प्रकार हाताळले. त्यात कादंबरी, लघुकथा, नाटक, ललितनिबंध, समीक्षा, चित्रपटलेखन आणि टीव्हीवरील गुप्तहेर मालिका अशा नानाविध प्रकारांचा समावेश आहे.
पुस्तकात या सर्व लेखन प्रवासाबरोबरच सखोल आत्मचिंतन देखील केलेय. त्यांनी स्वतः इंग्लिश, फ्रेंच व इतरही काही भाषातील अभिजात साहित्य भरपूर वाचलं होतं. लेखन हा विचारांच्या विरेचनाचा (purgation) उत्तम मार्ग आहे अशी त्यांची धारणा होती. लेखक म्हणून त्यांनी स्वतःलाही एक शिस्त लावलेली होती. लेखनाचा पहिला खर्डा लिहून झाल्यानंतर त्यातील जो भाग कापावासा वाटेल तो ते तिथल्या तिथे कापून टाकत. त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्या सत्य घटनेवर आधारलेल्या दिसतात. परंतु निव्वळ सत्यघटना ही काही कथा होऊ शकत नाही यावर त्यांचा ठाम विश्वास होता. “Fact is a poor story teller” हे त्यांचे आवडते वाक्य. म्हणूनच त्यांनी निरीक्षणातील सत्याला नेहमीच कल्पनेची यथास्थित डूब दिलेली आहे. त्यांच्या काही लेखनावर झालेल्या टीकेमुळे व्यथित न होता त्यांनी त्यातून शांतपणे आत्मपरीक्षण केले. लेखनासाठी नवनवे विषय मिळावेत यासाठी त्यांनी जगभर भ्रमंती तर केलीच पण त्याचबरोबर समाजाच्या सर्व आर्थिक स्तरातील लोकांबरोबर ते मुद्दामहून मिसळले. तत्कालीन समीक्षकांनी त्यांची बऱ्यापैकी उपेक्षा केली असली तरी रसिक वाचकांनी मात्र त्यांच्यावर जिवापाड प्रेम केले आणि वारंवार आपल्या पसंतीची पोच त्यांना दिली.
स्वतःच्या लेखनाच्या भांडवलावरच दिगंत कीर्ती आणि भरपूर संपत्ती मिळवल्यानंतर या लेखकाला काही मूलभूत प्रश्न पडलेत, जे त्याने मोकळेपणाने वाचकांसमोर मांडलेत. जसे की,
“खरंच आपण का लिहितो? जगात एवढे दैन्य दुःख आणि असंख्य समस्या लोकांना ग्रासत असताना त्यासाठी आपण प्रत्यक्ष काही कृती करतो का? आपण जे लिहितोय त्याचे महत्त्व स्वतःखेरीज अन्य कुणाला तरी असते का?”

त्यांनी त्यांच्या परीने ईश्वराचा शोध घेण्याचा देखील बराच प्रयत्न केला होता परंतु त्यांना काही तसे पुरावे मिळू शकले नाहीत. म्हणून आयुष्याच्या अखेरीस ते स्वतःला अज्ञेयवादी समजतात. मानवी मनात सातत्याने वसलेल्या भीतीच्या भावनेतून ईश्वरी संकल्पना निर्माण झाली असावी असा त्यांचा निष्कर्ष. हे लेखक मुळात वैद्यकीय डॉक्टर. वैद्यकीय शिक्षणादरम्यान गुरुजनांकडून ज्या काही मार्गदर्शक सूचना मिळाल्या त्या वैद्यकालाच नव्हे तर आपल्या आयुष्याला देखील लागू होतात हे त्यांनी लेखनातून विशद केलेले आहे. डॉक्टर झाल्यानंतर एकदोन वर्षेच त्यांनी वैद्यकीय काम केले आणि त्यानंतर डॉक्टरकीला कायमचा रामराम ठोकला. आयुष्यात कुठले तरी एकच काम अतिशय झटून करावे हा त्यामागचा हेतू. अर्थात वैद्यकीय शिक्षणामुळेच आपल्याला मानवी मनाची जटिलता अन् व्यामिश्रता अतिशय चांगल्या प्रकारे समजली; अन्य प्रकारच्या शिक्षणातून ती तेवढी नीट समजली नसती, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केलेली आहे.
असे हे बहुप्रसव परंतु दर्जेदार व लोकप्रिय लेखक. जगात जिथे जिथे म्हणून इंग्रजी साहित्य पोचले तिथे तिथे त्यांचा जयजयकार झाला. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट दिली आणि इंग्लंडच्या राणीने तर ‘कंपॅनियन ऑफ ऑनर’ हा ब्रिटिश नागरिकाला मिळणारा सर्वोच्च किताब बहाल केला. त्यांच्या असंख्य वाचकांचे त्यांना निर्व्याज प्रेम लाभले हे सुद्धा महत्त्वाचे. अर्थात या देदीप्यमान यशामागे त्यांची आयुष्यभराची कठोर मेहनत आहे हे सांगणे न लगे. ते दररोज चार तास ते बैठक मारून लेखन करीत असत. या दिनक्रमात कोणत्याही कारणाने कधी खाडा झालेला नव्हता. अशी ही लेखनशिस्त.
“व्यावसायिक लेखकाला लेखनाचा कंटाळा परवडत नाही”, असे ते म्हणायचे. लेखनाची दैनंदिन सवय केल्यावरच लेखक भरपूर लिहू शकतो आणि विपुल लेखन केल्याशिवाय चांगले लिहिता येत नाही”,
असे त्यांचे मत होते.
त्यांच्या वरील चारही पुस्तकांमध्ये त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांचे प्रतिबिंब पडलेले दिसते.
आपल्या हयातीत लोकप्रिय असणारे अनेक लेखक वा कलाकार जगात असतात. परंतु मृत्यूपश्चातही जागतिक लोकप्रियता दीर्घकाळ टिकून राहणारे लेखक तसे मोजकेच. विल्यम सॉमरसेट मॉम हे अशा मोजक्या लेखकांपैकी एक. त्यांच्या विपुल साहित्यसंपदेपैकी नमुन्यादाखल चार दिग्विजयी पुस्तकांचा परिचय वाचकांना या लेखातून करून दिला. वैयक्तिक पातळीवर त्या पुस्तकांच्या वाचनातून बरेच काही शिकायला मिळाले. लेखन हे फावल्या वेळात करायचे सोम्यागोम्याचे काम नाही परंतु ती कठोर मेहनत असते. भरपूर वाचन, चाणाक्ष निरीक्षण आणि त्याच्या नित्यनेमाने नोंदी करणे हे त्यांचे गुण अनुकरणीय वाटले. लेखनातून मिळणारे नाव आणि प्रसिद्धी या गोष्टी अल्पजीवी असतात याचे त्यांना पुरेपूर भान होते. आयुष्यभर लेखन करणाऱ्या बुजुर्ग लेखकांनी वयाच्या योग्य त्या टप्प्यावर निवृत्ती सुद्धा घेतली पाहिजे हा त्यांचा दृष्टिकोन लेखक जमातीसाठी मार्गदर्शक ठरावा.
*************************************************************************************
पूर्वप्रसिद्धी : अक्षरनामा, दिवाळी अंक.
प्रतिक्रिया
2 Dec 2025 - 11:44 am | कुमार१
मॉम यांच्या रेन आणि द लेटर या कथांचा पूर्वी स्वतंत्रपणे परिचय करून दिलेला होता. तसेच त्यांची विविध अवतरणे निरनिराळ्या विषयांच्या निमित्ताने विविध धाग्यांवर तुटक स्वरूपात लिहिली होती.
या दीर्घ लेखाच्या निमित्ताने त्यांचा सविस्तर जीवनपट आणि आजही वाचकप्रिय असणाऱ्या त्यांच्या काही नावाजलेल्या पुस्तकांचा परिचय करून दिलेला आहे.
2 Dec 2025 - 3:34 pm | Bhakti
खुप छान लेख रचना आहे.अनेक विचार करायला लावणारी वाक्ये ,त्यांचा उल्लेख उत्तम केलाय.
वैद्यकीय शिक्षण घेतलेले अनेक कलावंत माहिती आहेत,लेखक तसे कमी आहेत?. डॉ.अनिल अवचट यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
2 Dec 2025 - 4:09 pm | कुमार१
डॉक्टर लेखक
धन्यवाद !
इथे तुम्हाला दहा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावे मिळतील. + रशियाचे Chekov
मराठी डॉक्टर्समध्ये नरेंद्र दाभोळकर, अतुल गवांदे अरुण लिमये, उदय कुलकर्णी आणि अन्य काही.
3 Dec 2025 - 11:41 am | Bhakti
वाह, खुपच महत्वपूर्ण यादी आहे.
डॉक्टर लेखक कोण ? असं विचारल कारण,या जगाच्या अनेक रहस्यंभेदांपैकी म्हणजे मानवी शरीर यांचे पूर्ण रहस्य आकलन यांना झालेलं असते.आणि त्यावरच सतत अभ्यास सुरू असतो.लेखात उल्लेख केल्याप्रमाणे डॉ.मॉम हे लेखक अनेक चिंतनाअंती अज्ञेयवादी झाले.जिथवर डॉक्टर लोक लवकर पोहचत असावे असे मला वाटतं.अशा रहस्यभेदांनंतर ते समतोल नसलेल्या अनेक व्यक्तीरेखा, समाजव्यवस्था यावर फिक्शनल,नॉन फिक्शनल पुस्तक लिहितात ,ती वाचनीयच असतात.
डॉक्टर लेखक आठवताना मला मी नुकतेच ऑर्डर केलेले "स्वतः जागवत ठेवण्याचे प्रयोग" हे पुस्तक आठवलं.जे सध्याच्या प्रसिद्ध मराठी लेखिका डॉक्टर ऐश्वर्या रेवडकर यांनी लिहिलेले आहे.या आधीही त्यांनी त्यांच्या सामाजिक, स्त्रीवादी, विचारांवर, वैद्यकीय अनुभवांवर 'पाळीचं पॉलिटिक्स', 'विहिरीची मुलगी, बिजापूर डायरी पुस्तक लिहिले आहे.
मी मात्र पहिल्यांदाच त्यांना वाचणार आहे :)
3 Dec 2025 - 2:10 pm | कुमार१
वा ! नाव अगदी रोचक आहे.
नंतर तुम्ही परिचय करून द्यालंच. 😀
3 Dec 2025 - 2:04 pm | टर्मीनेटर
ह्या एका वाक्यासाठी Rain ही कथा/कादंबरी वाचण्याची ईच्छा झाली आहे. छापील लेखन आता अजिबात वाचत नाही, तुम्ही लेखात 'जालावर' वाचल्याचा उल्लेख केला आहे त्यामूळे डिजिटल आवृत्ती वाचेन!
---
Cakes & Ale ह्या कादंबरीतले हे वाक्य फारच आवडले आहे!
'Acceptance' चे महत्व अजिबात न समजलेले अनेक (तथाकथित उच्चशिक्षित) लोक २१व्या शतकातही काळानुरूप न होता अजूनही असल्या कालबाह्य विषयांवर चर्वित चर्वण करताना (अगदी इथेही) आढळतात हे एकप्रकारे दुर्दैवच म्हणायचे!
असो, पुढील लेखनास शुभेच्छा!
3 Dec 2025 - 2:22 pm | कुमार१
धन्यवाद !
रेन जरूर वाचून कळवा.
त्यातील धर्मगुरूचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे लेखकाने संदिग्ध ठेवले आहे. त्यावर तुमचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल 😀
. .
हे वाक्य Cakes. . . यातील नसून A Writer’s Notebook या चिंतन-पुस्तकातील आहे.
. .
सहमत ! 👊
3 Dec 2025 - 2:37 pm | टर्मीनेटर
हो... नक्कीच!
ओह... ह्यासाठीच मी मोबाईल वरून प्रतिसाद देणे टाळतो 😀
स्क्रोल करताना हे वाक्य 'Cakes & Ale' मधले असावे असा माझा गैरसमज झाला त्यासाठी क्षमस्व!