"अहो, हे पत्र जरा देउन याल का"? मला रस्त्यात मिळाले आहे. घरात शिरताना पहिले वाक्य. मी पत्ता बघितला. नीटसा कळला नाही. माझा गोंधळ बघुन लगेच कुटूंब उद्गारले., "गेट्मधुन बाहेर पडल्यावर उजव्या हाताला दुस-या गल्लीत चवथी बिल्डींग, १७ माळ्याचा टॉवर आहे.". बहुतेक प्रिमियम ची नोटीस होती. "जाताच आहात तर इंटीरियर पण बघुन या". कीचन जरा नीट बघा. आता पोस्ट्मनला किचन दाखवायची नविन सिस्टीम सुरु झाल्याची मला कल्पना नव्हती.
उच्च्च मध्यमवर्गियांचा टॉवर होता तो. दरवाजा उघडला. समोर मालकिण बाई उभ्या. मी पत्र हातात दिले. पुढे काय बोलणार इतक्यात त्याच म्हणाल्या. " ओह, व्हॉट ए प्लेझंट सरप्राईज,प्लीज कम इन." आंतरमनाने धोक्याचा इशारा दीला.
"रमेश, लुक हु इज विथ अस टू डे, प्रभु सर."
आतुन रमेश अवतीर्ण झाला, हींदी सिनेमाच्या टीपीकल 'तेजा सेठ' टाईप च्या गाउन मधे.
नंतर लक्षात आले ही मंडळी मला ओळखतात. रमेश आपल्या भाचीकरता माझ्या एका मिटींगला हजर होता.
रात्रीचे जवळ जवळ साडे नउ झाले होते. जेवण झालेले नव्हते. तेंव्हा कॉफी वगैरे नको म्हणुन मी निरोप घ्यायची तयारी केली. श्री व सौ रमेश काय सोडायला तयार नव्हते.
सोफावर साधारण ५ वर्षाचे गोजिरवाणे पेंगत्या डोळ्याने कार्टून बघत होते. माझी नजर जाताच सौ. रमेश लगेच म्हणाल्या, "संपल्याशिवाय झोपणार नाही तो. खुप आवडती सिरीयल आहे त्याची".
कुठ्ल्या शाळेत जातो-मी (लगेच लक्षात आले -घोड्चुक झाली)
नंतर सुमारे १५ मिनीटे श्री व सौ रमेश ह्यानी शिक्षण पद्धतीवर माझे बौद्धिक घेतले.
आजकाल किती कॉम्पीटीशन वाढली आहे हे वाक्य आलेच. ह्या वाक्यावर सौ. रमेश उठल्या व जवळ जवळ झोपलेल्या मुलाच्या कानात काही पुट्पुटल्या. पुढे काय वाढुन ठेवले आहे ते माझ्या लक्षात आले.
त्यांनी त्या मुलाला उचलले आत नेले. जाताना " सर, प्लीज डोन्ट गो हं "चा दम पण दिला.
सुमारे दहा मिनिटाने मुलाला त्या परत घेउन आल्या. तोंडावर पाणी मारलेले दिसत होते.
त्या मुलाकडून खास माझ्या करता सुमारे २० मिनिटे सर्व प्रकारच्या कलांचे प्रदर्शन झाले. त्यात "पप्पु कान्ट डान्स ,साला" चे नृत्य, कराटे चे प्रकार, सॅण्ट टूकारॅम ची गोष्ट वगैरे वगैरे. मी हतबल होउन सर्व प्रकार सहन केला. पडदा पडल्यावर मुलाचे कौतुक केले.
"रमेश, यु शुड मीट सर अँड लर्न सम ट्रीक्स" सौ. रमेश. मी काहीही बोललो नाही.
" युअर सन इज अ लकी बॉय" बाईने इंगलीश चे खुन करायची शपथ घेतली होती.
मी काही बोलणार इतक्यात," अ कौंसेलर लाइक यु ऍट डीस्पोजल ऑल्वेज्",व्हॉट ऑल आर्टस हॅव यु टॉट हिम". आयला घरात गेल्या गेल्या कौंसेलींग(??) केले तर बायको हाकलुन देइल.
कला आणि मी- कै च्या कै
कला अंगभुत असतात असे इतके मला माहीत होते.
छे, हो मी काहीच शिकवले नाही.-मी नम्र कबुली दिली.
आज काल कॉम्पीटीशन एवढी वाढली आहे ना त्यामूळे हे सर्व करावे लागते. -खुप वेळाने रमेशला मराठी मधुन कंठ फुटला.
टी़क आहे, आपण नंतर बोलु असे म्हणून मी "गूड नाईट" म्हटले.
"कॉपीटीशन वाढली आहे म्हणजे काय"? कोणी मला सांगेल का. आणि समजा ती वाढली असेल तर मुलाचा कल न बघता एकाच वेळेला कराटे, स्विमिंग, चित्रकला, गायन वगैरे कलांच्या क्लासेस सुरु करणा-या पालकांचे काय करावे.
डोळ्यावर झोप असलेल्या मुलावर असा अत्याचार करणा-या रमेश ची पहिली संधी मिळताच बिनपाण्याने करणार ही शपथ घेतली.
प्रतिक्रिया
31 Dec 2008 - 10:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा तर इंटरव्हलपर्यंतचा पिक्चर झाला! क्लायमॅक्स अभी बाकी है दोस्त।
(कुछ साल बाद, मुलगा आता मोठा झाला आहे, कमावता आहे, आई-बाप थकले आहेत, मानसिकदृष्ट्या मुलावर फारच अवलंबून आहेत.)
"आमचे बाबा(का पप्पा/डॅडी) अजूनही पाच मजले चढून येतात, बाबा दाखवा हो!", "आमची आई(का ममी/मॉम?) अजूनही दहा माणसांचं जेवण एकटी बनवू शकते; आई, बायकोच्या मैत्रिणी आणि त्यांचे नवरे असे मिळून एकूण १५ लोकं जेवायला येतील संध्याकाळी, स्वयंपाक तयार ठेव. बाबा आहेतच सामान आणून द्यायला आणि आवराआवरी करायला!"
सूचना: अशा प्रकारचे विचार कधी-मधी "डोंबार्याचा खेळ" पाहिला की मी आणि माझा भाऊ करतो.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
31 Dec 2008 - 12:07 pm | टारझन
आम्ही आमच्या सोई प्रमाणे ट्रिक केली आणि तोच संदर्भ लागल्याने पुढच्या वाक्याला अक्षरशः फु ट लो .. स्वारी मास्तर .. बाकी तुम्ही गुलाबजांबू सारखे पडले तिथं ... फक्त स्पैलिंग मिष्टैक आहे आपल्या लेखात , ते णाव तेवढं "कौंपिटिशन" करा .
- महाप्रभू
(दोन चार ट्रिक्स आम्ही पण शिकलोय मास्तरकडूनच)
31 Dec 2008 - 10:14 am | सहज
माझे चुकत असेल सर पण एक विचारु का?
मुलांचा कल बघायला त्यांना अनेक कलांची ओळख करुन देण्यात काही गैर आहे का? लहान मुलांवर दडपण न आणता की प्रत्येक गोष्ट आलीच पाहीजे पण विविध क्लासेस ला पाठवण्यात एक एक्पोजर हा हेतु असला तर गैर आहे का?
31 Dec 2008 - 10:22 am | विनायक प्रभू
काहीही गैर नाही.
31 Dec 2008 - 10:57 am | सुक्या
मुलांचा कल बघण्यासाठी त्यांच्या डोक्यावर भाराभर गोष्टींचे गाठोडे ठेवावे लागत नाही. त्याची गरजही नसते.
५/६ वर्षाच्या वयात गायन किंवा कराटे ह्या गोष्टींचा काय उपयोग असतो? शेजारचा मुलगा क्लास ला जातो म्हणुन आपलाही मुलगा गेला पाहीजे ही भावनाच पालकांना ह्या गोष्टी करायला प्रव्रुत्त करते. कॉम्पीटीशन ही असतेच. ४/५ वर्षांच्या चिमुरड्यांमधे नाही, ती असते ती पालकांमध्ये. शेजारच्या मुलाला एखादी गोष्ट येत असेल अन् आपल्या मुलाला ते येत नाही म्हणजे आपण कमी पडलो असल्या फुटकळ गोष्टीच पालकांना हे सारे करायला प्रवुत्त करतात.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
31 Dec 2008 - 10:53 pm | नाटक्या
> कॉम्पीटीशन ही असतेच. ४/५ वर्षांच्या चिमुरड्यांमधे नाही, ती असते ती पालकांमध्ये.
हे बाकी एकदम खरं बोललात. जयंत नारळीकर एकदा एका भाषणात म्हणाले होते, "शर्यतीत घोड्याने जिंकावे असे फक्त घोड्याच्या मालकाला आणि जॉकीला वाटत असते". सर्व पालकांनी अंतर्मुख होउन विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमच्या वेळेला असली थेरं नव्हती. आमच्या वेळेला म्हणजे "आसपासच्या पोरांच्या घोळक्यात पोराला लोटून दिलं कि ते वहात वहातं शाळेला लागायचं".
या दोघांचा सुवर्णमध्य साधणं हे खरंच अवघड आहे. "धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळत" या कात्रीत आपली पिढी अडकलेली आहे. प्रभूसर या वर एक मार्गदर्शन पर लेख लिहाच आपण.
- नाटक्या
31 Dec 2008 - 11:26 pm | रेवती
"शर्यतीत घोड्याने जिंकावे असे फक्त घोड्याच्या मालकाला आणि जॉकीला वाटत असते".
अगदी खरय.
आपला प्रतिसाद आवडला.
रेवती
31 Dec 2008 - 12:16 pm | यशोधरा
छोटुल्याचा मार्ग कठीण दिसतो एकंदरीत...
आई वडिल कडक इस्त्र्या दिसतात..:(
31 Dec 2008 - 12:22 pm | पिवळा डांबिस
मला सध्या मुंबईत काय परिस्थीती आहे ते ठाऊक नाही....
पण तुम्हाला मुंबईत एक चिंचेचा हिरवा फोक मिळू शकेल का हो?
जर मिळाला तर लगेच घ्या आणि...
त्या आई-वडिलांच्या कुल्यावर चार-चार हिरवेनिळे वळ उठवा हो!!!!!
आणखी सुचल्यावर नंतर कळवीन....
आपला,
डांबिसकाका
31 Dec 2008 - 12:38 pm | अवलिया
सहमत
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
31 Dec 2008 - 12:39 pm | चतुरंग
हातात चिंचेचा फोक घेऊन फटके देणारे प्रभू डोळ्यासमोर आले! (प्रभू, ह्यांना वाचव असे म्हणायची सुद्धा सोय ठेवली नाहीत हो! ;) )
चतुरंग
31 Dec 2008 - 3:12 pm | विनायक प्रभू
चिचेचा फोक मिळतो ठाण्यात. मागवला आहे.
1 Jan 2009 - 11:35 am | रामदास
मी तुम्हाला नेहमी असीस्ट करतो ना ? मग ..तुम्ही रमेशच्या कुल्यावर फटके मारा आणि मी...
कामं वाटून घ्यावी नाही का.?
1 Jan 2009 - 5:24 pm | विनायक प्रभू
चांगले असिस्टंट. फोक मला, वाटणे तुम्हाला
31 Dec 2008 - 12:36 pm | चतुरंग
मुलं म्हणजे आपल्याला हवी तशी दामटून घ्यायची तट्टे वाटणार्या पालकांना काय सांगावे?
मुलांना वेगवेगळ्या कलांमध्ये, खेळांमध्ये, अभ्यासात एकदमच पारंगत केल्याखेरीज काही खरे नाही असे ओझे शिरावर ठेवून जगणार्या पालकांनाच एकदा वेगवेगळ्या क्लासेसना एकाच दिवसात पाठवायला हवे.
एक महिनाभर घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे सकाळी ५ ते रात्री १० असे क्लासेस केले की मग मुलांवर काय अत्याचार होतात हे कळेल.
(अशा क्लासमधे कोचिंगसाठी मी जरुर येईन! X( )
चतुरंग
31 Dec 2008 - 12:45 pm | ब्रिटिश
माजा पोरगा वय वर्स ८
मी : पोरा जरा लोकांचे पोरन्कड बग, अब्यास कर,
ते सारेगम मदी बग तुज्यायेवडी कशे गानी म्हनतात,
कराटे शीक , स्पोर्टमदी भाग झे, कईतरी कर
पोरगा : बाबा तू यडा हाईस
सोताशीच : (मी ८ वर्साचा आसताना क केल व्हत ते आटवत न्हाई बगा)
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
31 Dec 2008 - 5:18 pm | लिखाळ
स्वतःला नक्की काय करायचे आहे याचा शोध न घेतलेले आणि त्याबद्दल विचारच न केलेले लोक आपल्या मुलांनी काय करायला हावे हे कसे ठरवणार?
प्रोत्साहन आणि अवास्तव अपेक्षा यांतला फरक कसा ओळखावा?
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'हे असंच चालू राहणार!' असली वाक्ये आपल्या 'अकार्यक्षमतेवर' पांघरूण घालायला उपयोगी पडतात.
31 Dec 2008 - 6:30 pm | विनायक प्रभू
आपण काहीही ठरवु शकत नाही हे सत्य जाणावे.
31 Dec 2008 - 6:31 pm | अवलिया
हे सत्य तुम्ही कसे ठरवलेत....
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
31 Dec 2008 - 6:33 pm | विनायक प्रभू
रोज बघतो ना.
31 Dec 2008 - 6:44 pm | लिखाळ
सर,
एक प्रश्न आहे. मी अनेकदा हे ऐकतो की सध्या स्पर्धा वाढली आहे. ती कशाची स्पर्धा आहे? (प्रश्न तात्विक नाही साधा आहे)
पोटापाण्याचा व्यवसाय निवडणे आणि सुखाने जगणे हे अवघड असेल पण त्यात स्पर्धा कुणाची आणि कसली आहे?
-- (संभ्रमित) लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
31 Dec 2008 - 7:18 pm | विनायक प्रभू
सर्वाना आपली मुले सुपर्बॉय किंवा सुपर गर्ल हवी असते. सर्वगुण संपन्न. म्हणजेच टॉपर. म्हणजे सर्व काही पुढचे सोपे होते हा समज
31 Dec 2008 - 8:26 pm | दिवोड
लेख आवद्ला.
31 Dec 2008 - 8:38 pm | प्राजु
मुलांना सगळ्या कलांची ओळख करून देण्यामध्ये काय चुकीचे आहे. त्यापैकी एकामध्ये जर त्याला जास्ती ओढ वाटत असेल तर त्याला त्यात पारंगत करण्यात आई-वडिलांची मदत व्हावी या मताची मी आहे.
पण सध्याचे जग बघता (स्पर्धा नव्हे) कोणत्या ठिकाणी कोणता राक्षस असेल जो मुलांना सावज करण्यासाठी टपलेला असेल सांगता नाही येत. त्यासाठी स्वसंरक्षणाचे शिक्षण जर दिले तर काय चूक आहे? प्रत्येक ठिकाणी आई-वडील मुलासोबत नसतात.
कोणत्याही प्रकारचा दबाव टाकणं कधीही चूकच पण म्हणून ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तरी नको लक्षात यायला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
31 Dec 2008 - 9:28 pm | अनामिक
मला वाटतं मुलांना कलांची ओळख करून देणे आणि 'तू हे केलंच पाहिजे' असा आग्रह करणे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्राजू ताई म्हणतेय त्या प्रमाणे मुलांना कलांची ओळख नक्कीच करून द्यावी, त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. परंतु शेजारचा मुलगा/गी कोण्या एका कलेत पारंगत आहे म्हणून आपल्या मुला/लीलासुद्धा ति कला अवगत असावी आणि त्यात आपल्या मुला/लीला काडीचाही इंट्रेस्ट नसला तरी 'तुला हे आलंच पाहिजे, शेजारचा बघ कित्ती छान चित्र काढतो. त्याचं कित्ती कित्ती कौतुक करतात सगळे. ' असं म्हणून जबरदस्ती करणे किती योग्य आहे? ह्यात मुलाचं कौतुक होतं म्हणून तुम्हाला आनंद मिळतो की ते मुलं आपलं आहे म्हणून आनंद मिळतो ह्यात फरक करता आला तर मिळवलं.
सद्य परिस्थितीत शाळेतच अभ्यासक्रमाचा एवढा ताण मुलांवर असतो तेव्हा मुलांना काय आणि किती झेपतंय हे बघूनच मुलांना कमी-अधिक प्रमाणात कलेची ओळख करून द्यावी. तसेच घरातील वातावरण पोषक असले किंवा प्रोत्साहन देणारे असले (जबरदस्ती नव्हे) तर आपोआपच मुलं वेगवेगळ्या कलांमध्ये इंट्रेस्ट घेतात. नाहीतर आई-वडील दोघेही १०-१२ तास घरातून बाहेर असतात आणि मुलांवर वेगवेगळ्या गोष्टींचा बोजा टाकून मोकळे होतात.
अनामिक
1 Jan 2009 - 1:31 pm | चंबा मुतनाळ
आपल्या मुलांना सगळ्या कलांची ओळख असावी असे पालकांना वाटण्यात काहिच गैर नाही. पण त्यासाठी जर त्यानी आपल्या पाल्याची शाळेतील प्रगती नीट डोळ्याखालून घातली तरी ते पुरेसे होईल असे वाटते. कारण बहुतेक शाळांमधून अजून चित्रकला, शारिरीक शिक्षण वगैरे विषय असतात. पालक त्यासाठी वर्गशिक्षकांना भेटून मुला/लीचा कल कुठल्या विषयाकडे आहे ते चर्चा करून ठरवू शकतात. मुख्य म्हणजे आपल्या पाल्याशी संभाषण असणे सर्वात महत्वाचे. ते जर असेल, तर पालकांना आपोआपच पाल्याचा कल कळेल. सगळ्या विषयांचे क्लासेस लावणे हा त्यासाठी पर्याय होत नाही.
31 Dec 2008 - 8:46 pm | दिवोड
AGE 5 is too early
31 Dec 2008 - 9:31 pm | विनायक पाचलग
आपण दोघे आजुबाजुला हेच बघतो तुम्ही शिक्षक म्हणून तर मी विद्यार्थी म्हणून
वास्तवदर्शी लेख
31 Dec 2008 - 10:58 pm | सखाराम_गटणे™
स्पर्धा वाढली आहे ह्या पेक्षा दुसर्याकडे आंधळे पणाने बघण्याची व्रुत्ती, वाढलेला हावरेपणा, आणि आपला पाल्य सगळ्यात पुढे गेला पाहीजे ही अतिअपेक्षा एकुनच जीवनाला आलेली अतिकृत्रीमता ह्या सगळ्या अभासी स्पर्धेमागची कारणे आहत.
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
31 Dec 2008 - 11:06 pm | शितल
पाल्यांने हे केलेच पाहिजे हा जो "च" असतो तो कमी केला तरी कॉम्पीटीशन कमी होईल.
:)
31 Dec 2008 - 11:32 pm | रेवती
लेख आवडला, समजला.
आमच्याकडे आधीपासून चिरंजीवच ठरवतात कोणत्या क्लासला जायचय ते.
रेवती
1 Jan 2009 - 12:15 am | पक्या
मुलांना वेगवेगळ्या कलांची ओळख करून देण्यात काहीच चूक नाही. उलट अभ्यासाव्यतिरिक्त इतर काहि खेळ, कला शिकण्याने अभ्यासाचा ताण हलका व्हायला आणि मन ताजेतवाने व्हायला मदतच होते. पोहणे, कराटे हे खेळ तर चांगलेच आहेत. पोहणे (साधारण ५ वर्षापासून पुढे) लहान वयात शिकले तर मुलांना पाण्याची भिती रहात नाही. मोठेपणी शिकायला अशक्य नसले तरी अवघड जाते. मुलांचा मेंदू लहान वयात अनेक नवीन गोष्टी शिकण्यास उत्सुक असतो. प्रौढ वयात लर्निंग ग्राफ कमी होत जातो.
हल्लीच्या फ्लॅट सिस्टिम मुळे मुलांना त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये खेळायला, वावरायला कमी वाव मिळतो. मुले घरात बसून तरी कितीवेळ एकटी खेळणार ...एकटे खेळणे किंवा मग टिव्ही समोर बसणे .
मुले जर एखाद्या क्लासला , खेळाच्या प्रॅक्टिस ला जाणे एन्जॉय करत असतील तर शाळे व्यतिरिक्त असे क्लासेस लावण्यात काहीच चूक नाही. फक्त त्यात मुलांवर जबरदस्ती नको. अवास्तव कलेचे प्रदर्शन नको. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. मुलांची आवड मुलांचे वेळापत्रक , येण्या जाण्याला लागणारा वेळ, क्लासेस ची फी (परवडते की नाही), क्लास मध्ये योग्य मार्गदर्शन मिळते की नाही वगैरे गोष्टींचा विचार करून आणि त्यांचा योग्य मेळ जमवून असे क्लासेस लावण्यात काही हरकत नाही.
माझ्या भावाची मुलगी (वय आठ ) शाळा आणि अभ्यासाव्यतिरिक्त कराटे, स्विमीग आणि कीबोर्ड वादन शिकत आहे. सुरवातीला पाण्याला जाम घाबरणारी ती आता स्विमींग क्लास चा दिवस कधी येतो ह्याची वाट बघत असते. कराटे क्लास ही एन्जॉय करते आणि घरी असताना मूड आला की किबोर्ड वर शिकवलेल्या धून चा स्वतःहून सराव करते. मुलांनी स्वतःहून इन्टरेस्ट दाखवला की पुढची शिकण्याची क्रिया सहज पार पडते. फक्त हे आलेच पाहिजे हा घोषा नको.
प्रभू सरांची लेखन शैली आवडली. धन्यवाद.
1 Jan 2009 - 6:57 am | सुनील
आपल्या आवडी-निवडी मुलांवर लादणे, आपण जे स्वतः करू शकलो नाही ते मुलांनी करायची जबरदस्ती करणे, हे चूकच.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
2 Jan 2009 - 2:28 pm | राघव
नुकतेच माझ्या ओळखीतल्या एका गृहस्थांच्या लहान मुलीला शाळेत घालण्यात आले. वय वर्षे ३. प्री-नर्सरी म्हणे बॉ. दिवसाला ३ तास फक्त. (काय शिकवतात देव जाणे!)
का बरे एवढ्या लवकर शाळेत घातलेत असे विचारले तर उत्तर आले,
"आजकाल सगळ्यांचीच मुले लवकर जातात शाळेत. मुलांनाही जरा शाळेच्या वातावरणाची सवय होते. आता मुलगी २-३ तास जाईल शाळेत तर 'हिलाही' जरा मोकळा वेळ मिळेल कामं आटपायला. पुन्हा, पुढे नर्सरी/केजी मधे ऍडमिशन मिळणे जरा सोपे जाते. नाही तर कसले ते अवाढव्य डोनेशन आणि पुन्हा वरचा ताप तो वेगळाच!"
आम्हीतर बुवा ६ वर्षांचे घोडे झाल्यावर शाळेत गेलो होतो. असो.
मुमुक्षु