स्लमडॉग मिलिनेअर

अनामिक's picture
अनामिक in जनातलं, मनातलं
31 Dec 2008 - 1:07 am

स्पॉइलर अलर्ट : चित्रपटातील कथानक ज्यांना माहीत करून घ्यायचे नाही त्यांनी लेख वाचण्याची तसदी घेउ नये.

झोपडपट्टीत राहणाऱ्या कोण्या एका चहावाल्या मुलाने 'कौन बनेगा करोडपती' मध्ये एक करोड रुपये जिंकलेत तर तुमचा विश्वास बसेल? नाही बसणार ना? वाटलंच! कारण काहीही असो, सामान्य माणसाच असामान्य कृत्य पाहून आपल्या मनात कौतुक नंतर, संशय पहिले येतो. कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय असं वाटतं. आणि असंच होतं स्लमडॉग मिलिनेअर या चित्रपटात. (या वीकएंड ला पाहिला आणि खरंच खूप आवडला!!)

चित्रपटातला नायक जमाल मलिक कॉल सेंटरमध्ये चहावाल्याचं काम करत असतो. आणि मिळालेल्या संधीमुळे कौन बनेगा करोडपतीमध्ये भाग घेतो. आश्चर्य म्हणजे तो १ करोड रुपये जिंकतो सुद्धा (दोन लाईफ लाइन्सची मदत घेतो तो नाही म्हणायला). अनिल कपुरने शो होस्टची भूमिका छान वठवली आहे. स्वतःमुळेच शो एवढा प्रसिद्ध आहे आणि आणि आपल्याच शो वर अजून कुणी (तोही एक चहावाला) जास्त प्रसिद्धी मिळवतोय हे बघून अनिल कपुरचा इगो दुखावतो. एकवेळ तो जमालला माघार घेण्यास सुचवतो तर एकवेळ संधी साधून जमालला चुकीच्या उत्तराची हिंट देतो. पण दोन्हीवेळी जमाल स्वतःची बुद्धी वापरतो आणि १ करोड रुपया पर्यंत मजल गाठतो. चहावाल्याने एवढी मोठी रक्कम जिंकणे काय लहान गोष्ट नव्हे. चहावाला नक्कीच कायतरी चिटींग करत असणार म्हणून त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात येते.

खरंतर 'कौन बनेगा करोडपती' चं कारण घेऊन दिग्दर्शकाने मुंबईतल्या झोपडपट्टीत जन्मलेल्या जमालचे आयुष्य अतिशय उत्तम रंगवले आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना जमालची रात्रभर कसून चौकशी केली जाते. इलेक्ट्रिक शॉकसुद्धा देऊन होतात. पण जिथे इंजिनिअर, डॉक्टर, प्रोफेसर सारख्या लोकांची मजल काही हजारांवर किंवा फार-फार तर काही लाखांपर्यंत जाते, तिथे एक अडाणी चहावाला १ करोड जिंकतोच कसे हा प्रश्न पोलिसांना सुटत नाही. शेवटी प्रामाणिक जमाल त्याला एकेका प्रश्नाचे उत्तर योगायोगाने का होइना पण आतापर्यंतच्या आयुष्यामुळे कसे माहीत याचे स्पष्टीकरण द्यायला लागतो, आणि प्रत्येक प्रश्नाच्या फ्लॅशबॅकमधून जमालचं बालपणापासूनचं आयुष्य चित्रपटात खुलायला लागतं.

लहानपणीच (म्हणजे ५-७ वर्षांचा असताना) दंग्यात आई मरते आणि जमाल व त्याचा मोठा भाऊ सलिम झोपडपट्टीवरून उकिरड्यावर येतात. तिथेच त्याची भेट त्याच्याच वयाच्या अनाथ लतिकाशी होते. मग तिघे वाट्याला येईल तसे उकिरड्यावरचे दिवस घालवत असतात. आणि एक दिवस अल्लाचा एक नेक बंदा त्यांना भेटतो व बरोबर घेऊन जातो. या अल्लाच्या नेक बंद्याचे इरादे अपंग बनवून भिकेला लावायचे आहे हे कळताच तिघेही त्यांच्या तावडीतून पळून जायच्या प्रयत्नात ट्रेनवर चढतात, पण बिचारी लतिका मागे पडते व त्यांची साथ सुटते. साथ सुटली तरी ति जमालच्या मनातून काही जात नाही, आणि तिला शोधायच्या अट्टहासाने दोघे भाऊ अनेकवर्षाने परत मुंबईत येतात. प्रयत्नांती लतिकाशी भेट तर होते पण तोपर्यंत तिला वेश्याबाजारात विकलेली असते. सलिमच्या मदतीने लतिका त्या बाजारातून सुटते खरी, पण आतापर्यंतच्या आयुष्यात आलेल्या अनुभवाने निष्ठुर झालेला सलिमच तिच्यावर आपला हक्क दाखवतो. आणि परत एकदा जमाल आणि लतिकाची ताटातूट होते.

मनाने उध्वस्थ झालेला जमाल नव्या आयुष्याची सुरवात करतो खरा, पण लतिका त्याच्या मनातून जात नाही. कॉल सेंटरमध्ये काम करत असताना त्याला सलिमचा शोध लागतो. दरम्यान सलिम एका नामी अंडरवर्ल्ड डॉनच्या हाताखाली काम करतो. आणि लतिकाच्या नशिबी त्या डॉनची ठेवलेली बाई म्हणून राहायची वेळ येते. जमालला सगळे कळते, पण त्याच्या मनातील तिच्याबद्दलचे प्रेम तसूभरही कमी झालेले नसते. खरंतर कौन बनेगा करोडपतीवर येण्याचा त्याच्या उद्देश पैसे कमावणे हा नसून कदाचित लतिका आपल्याला बघेल आणि परत आपल्यापाशी येईल हा असतो.

कधी जमालच्या भूतकाळात नेणारा तर कधी वर्तमानात परत आणणारा 'स्लमडॉग मिलिनेअर' अप्रतिम चित्रपट आहे. दिग्दर्शक डॅनी बॉयेल यांनी जमालच्या आयुष्याचं अतिशय वास्तव चित्र उभं केलंय. देव पटेल, मधुर मित्तल, आणि फ्रेडा पिंटो तिघांनीही अनुक्रमे जमाल, सलिम, आणि लतिकाची भूमिका चांगली वठवली आहे. अनिल कपुर, इरफ़ान खान, आणि महेश मांजरेकर यांच जास्त काम नसलं तरी आपापल्या भूमिकेत योग्य वाटतात. ए. आर. रेहमाननं नेहमीप्रमाणेच उत्तम बॅकग्राउंड म्युझिक दिलंय. एकूण काय तर सगळा चित्रपट एकदा तरी आवर्जून पाहावा असा आहे.

काय मंडळी, मग कधी पाहताय हा चित्रपट?

अवांतर १: चित्रपट पाहताना 'सलाम बॉम्बे'ची नक्कीच आठवण येईल.
अवांतर २ : माझा हा लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे, तेव्हा काही चूक आढळल्यास माफ करा.
आणि हो, bhejafry.net आणि movie25.com इथे स्लमडॉग अवेलेबल आहे.

(चित्रपट प्रेमी) अनामिक

चित्रपटविचार

प्रतिक्रिया

प्राजु's picture

31 Dec 2008 - 1:18 am | प्राजु

मिळाला तर नक्कीच बघेन हा चित्रपट.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

31 Dec 2008 - 5:47 pm | टारझन

कोलबेरा साठी आपल्या टाळ्या !! लै भारी लिहीलंय परिक्षण ........
फुकट टोरंट मिळाला तर णक्की पाहिन

- टारझन फुकटे
(सर्वांणा णववर्षाच्या तशेच वाढदिवसाच्या हार्डिक शुभेच्छा)

घाटावरचे भट's picture

31 Dec 2008 - 1:25 am | घाटावरचे भट

खरोखर चांगला आहे चित्रपट. लैच ग्रेट वगैरे नाही पण.

कोलबेर's picture

31 Dec 2008 - 1:27 am | कोलबेर

स्लमडॉग मिलनिअर धमाल चित्रपट आहे. एका टिपीकल बॉलीवुड फॉरम्युला कथेला हॉलीवुडच्या बाटलीत घालुन अजब रसायन बनवले आहे. तांत्रिक दृष्ट्या चित्रपट +१०० बनला आहे. छायाचित्रीकरण आणि संकलन अतीशय वेगवान असल्याने छोटीशी असली तरी कथा कंटाळवाणी वाटत नाही. आणि सगळ्यात प्रभाव पाडते ते रेहमनाचे अप्रतिम पार्श्वसंगीत. ह्यावेळेस आपल्या भातात्यातील सगळी शस्त्रे वापरुन रेहमानने अप्रतिम पार्श्वसंगीत दिले आहे. फिरंगी लोकांनी भरलेले थिएटर शेवटच्या पाट्या जाईपर्यंत उठले नव्हते. चित्रपट संपल्या नंतरचे गाणे देखिल गोर्‍यांना भयंकर आवडल्याची ही पावती. मुंबईच्या झोपडपट्टीचे अतिरंजीत चित्रीकरण आहे पण ते अवास्तव नाही. आणि कुठेही कसल्याही संदेशांचा उपदेशांचा डोस नसल्याने त्याच त्याच साचेबद्ध चित्रपटांप्रमाणे वाटत नाही.

जरुर पाहण्यासारखा चित्रपट.

(अवांतर: परिक्षणात कथेतले काही दुवे उलगडाताना 'स्पॉइलर अलर्ट' टाकायला हवा होता)

आजानुकर्ण's picture

12 Jan 2009 - 4:53 pm | आजानुकर्ण

चित्रपट एकंदर बरा वाटला.
अनेक गोष्टी फारच अतार्किक वाटल्या. पार्श्वसंगीत मात्र फारच फ्रेश आणि छान आहे. सुरुवातीचा ट्रेनच्या ठोक्यावर धरलेला ताल अतिशय सुरेख.

आपला
(संगीतकार) ए. आर. आजानुकर्ण

धनंजय's picture

31 Dec 2008 - 1:30 am | धनंजय

अनामिक तर चित्रपट आवडीने बघणारे दिसतात. अशीच आणखी परीक्षणे येऊ द्या.

हा चित्रपट मी दोन-तीन आठवड्यांपूर्वी बघितला. मला बर्‍यापैकी आवडला. चित्रपटाचे लक्ष्य-प्रेक्षक कोण होते, ते कळावेसे वाटते. भारताबद्दल फारशी माहिती नसलेले परदेशातले प्रेक्षक, की भारतातले प्रेक्षक?

अनामिक's picture

31 Dec 2008 - 1:43 am | अनामिक

भारतात हा चित्रपट अजून प्रदर्शित झाला की नाही ते माहीत नाही (कारण मी माझ्या भावाला विचारले असता त्याला या चित्रपटाबद्दल माहीत नव्हते). पण लक्ष्य-प्रेक्षक परदेशातलेच असावे असे वाटते. बऱ्याचदा वाईट याचेच वाटते की भारतावरील दाखवण्यात येणाऱ्या डॉक्युमेंट्रीज किंवा अश्या चित्रपटात 'स्लम' हा प्रकार जास्त दाखवण्यात येतो. त्यामुळे भारताबद्दलचा बऱ्याच परदेशस्थांचा दृष्टिकोन स्लम आणि गरिबी यापुढे जातच नाही. भारतात अजूनही लोक हत्ती/घोड्यांवर प्रवास करतात का असे विचारणारे बरेच नग मला भेटलेत.

कोलबेर's picture

31 Dec 2008 - 1:50 am | कोलबेर

पाश्चात्य चित्रपटात भारत म्हणजे 'स्लम' हा प्रकार जास्त दाखवला जातो.

जसे बॉलीवुडच्या चित्रपटांमध्ये अमेरिका म्हणजे फक्त चकचकीत स्काय स्क्रेपर्स, गाड्या आणि रोषणाई हाच प्रकार जास्त दाखवला जातो तसेच पाश्चात्य चित्रपटात भारत म्हणजे 'स्लम' हा प्रकार जास्त दाखवला जातो. कारण प्रेक्षकांना जे आपल्या इथे सहजी पाहयला मिळात नाही ते परदेशात पहायला हवे असते.

तसे पाहिले तर अमेरिकेत देखिल झोपडपट्ट्या आहेत आणि भारतात देखिल चकचकीत गाड्या आणि टॉलेजंग इमारती आहेत.

शितल's picture

31 Dec 2008 - 1:45 am | शितल

परीक्षण छान लिहिले आहे.
:)

नंदन's picture

31 Dec 2008 - 1:49 am | नंदन

परीक्षण. वरील प्रतिसादांशी सहमत आहे. सुरूवातीला परदेशातील प्रेक्षकांना लक्ष्य ठेवून बनवल्यासारखा वाटला, पण नंतर कोलबेररावांनी म्हटल्याप्रमाणे गतिमानता आणि हॉलिवूड + बॉलिवूड मिश्रणाची चांगली जमलेली भट्टी यामुळे आवडला. स्वतः अंध असणार्‍या सूरदासांच्या 'दर्शन दो घनश्याम' या गाण्याचा डोळे काढण्याच्या प्रसंगात केलेला वापर यासाठ्या बारीकसारीक गोष्टींकडेही लक्ष दिले आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

31 Dec 2008 - 7:46 am | सहज

परिक्षण छान. हा सिनेमा पाहीला. आवडला.

मीनल's picture

31 Dec 2008 - 8:29 am | मीनल

डॉग म्हणजे प्रामाणिक प्राणी
त्याच प्रमाणे या चित्रपटातील हिरो प्रामाणिक दाखवला आहे.तो झोपडपट्टीतला म्हणून स्लम डॉग. तो करोड्पती होतो म्हणून मिलिनेअर. नाव कथेला अनुरूप आहे
पण फार एक्झेगरेशन दाखवले आहे.
मी धारावीच्या आत कधीही गेले नाही. म्हणजे बाहेरूनच दर्शन फार झाले, ते आतून घ्यायची हिम्मत नाही.त्यामुळे नक्की माहित नाही. पण तरीही जरा जास्तच दाखवले आहे.परदेशी प्रेक्षक नक्कीच टार्गेट केला आहे.
यातील हा हिरो सोडाला तर बाकी बरेचसे अप्रामाणिक ,दगाबाज दाखवले आहेत.
खर दाखवता दाखवता अती झाल आहे अस मला वाटल.
मला आवडला किंवा न आवडला यावर भाष्य करण्यापेक्षा तो परदेशीं साठी माहितीपूर्ण ठरेल. त्यांना फारेशी कल्पना नसते. हे असच आहे ह्यावर ते सहजी विश्वास ठेवतील.
मला एक प्रेक्षक म्हणाली -- मला इंडियाला जावस वाटतय.पण हिंम्मत नाही .

तिला सिनेमात दाखवले सर्व भारतात आहे,म्हणजे भारतात असच आहे सर्व ठिकाणी असा समज झाला आहे.

मीनल.

विनायक पाचलग's picture

31 Dec 2008 - 2:04 pm | विनायक पाचलग

माझ्या माहितीनुसार हा चित्रपट भारतात यायचा आहे
तसा उल्लेख २ आठवद्यापुर्वीचा लोकप्रभात होता

कोलबेर's picture

17 Feb 2009 - 3:57 am | कोलबेर

डॉग म्हणजे प्रामाणिक प्राणी
त्याच प्रमाणे या चित्रपटातील हिरो प्रामाणिक दाखवला आहे.तो झोपडपट्टीतला म्हणून स्लम डॉग.

डॉग म्हणजे कुत्रा ह्या अर्थाने डॅनी बॉयलना दाखवायचे नाही आहे. इथे डॉग हे 'अंडरडॉग' ह्या अर्थाने वापरले आहे.

जमाल हा केबीसी स्पर्धेमधे अंडरडॉग असतो. तो जिंकणार असे कुणालाच वाटत नसते म्हणून तो अंडरडॉग.

आणि अंडरडॉग असणारा हा स्पर्धक जिंकणार असे वाटत नसले तरी जिंकावा असे नेहमीच प्रेक्षकांना वाटत असते.

म्हणून त्याला इतका पाठींबा/लोकप्रियता मिळतो.

थोडक्यात झोपडपट्टीतला अंडरडॉग म्हणून स्लमडॉग.

मदनबाण's picture

31 Dec 2008 - 2:27 pm | मदनबाण

छान परिक्षण.. जमल्यास नक्की पाहावयास आवडेल...

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

विसोबा खेचर's picture

1 Jan 2009 - 9:04 am | विसोबा खेचर

हेच म्हणतो..!

shweta's picture

31 Dec 2008 - 2:32 pm | shweta

हा सिनेमा कोणी हि बघु नये.
अतिशय कृत्रिम वाटतो. पैसे वाया घालवु नका. जास्त झाले असतील तर खरया गरीबांना वाटा येवढ्च सांगावे से वाटते.

गोगोल's picture

31 Dec 2008 - 5:31 pm | गोगोल

जरूर पहावा

अनामिक's picture

31 Dec 2008 - 7:20 pm | अनामिक

तुम्हाला चित्रपट कुठे कुठे कृत्रिम वाटला ते कळेल का?

स्लमडॉग मिलेनिअरला तीन "गोल्डन ग्लोब' पुरस्कार .
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक , सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट संगीत (ए. आर. रेहमान) .
स्लमडॉग च्या सर्व कलाकारांचे अभिनंदन.
पुरस्कार सोहळ्याला अनिल कपूर उपस्थित असलेला पाहिला.

नीलकांत's picture

12 Jan 2009 - 3:39 pm | नीलकांत

आताच हा चित्रपट पाहिला आणि तो आवडला. चित्रपटाला छान गती आहे. हॉलीवूड आणि बॉलीवूडचं छान मिश्रण आहे.
गाण्यांसाठी कथा थांबत नाही हे पाहून किती बरं वाटतं !

नीलकांत

मदनबाण's picture

12 Jan 2009 - 5:08 pm | मदनबाण

अनामिक राव /ताई..
लयं भारी चित्रपट हाय हा...
छुवा छुवा हे छोट गाणं आणि त्याच संगीत तर जबराटच..
(जमालचा पंखा)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

सुचेल तसं's picture

22 Jan 2009 - 9:37 am | सुचेल तसं

छान आहे पण सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळावा एवढा काही भारी नाही.

मला जमाल, सलीम आणि लतिकाचं बालपण पहाताना परिंदाची खूप आठवण येत होती. (सलाम बॉंम्बे पाहिला नाही त्यामुळे त्याच्याशी किती साम्य आहे ते माहिती नाही.)

हा चित्रपट क्यू & ए ह्या विकास स्वरूप ह्यांच्या कादंबरीवर आधारीत असला तरी चित्रपट बनवताना कथेत काही ठळक बदल केले गेले आहेत. उदा: कादंबरीमधे अनिल कपूर हा बॉलिवूड अभिनेता दाखवला असून जमाल (कादंबरीतला राम मोहम्मद थॉमस) त्याच्याकडे कामाला असतो. सलीम हा त्याचा मित्र असून तो पुढे बॉलिवूड मधे जातो. जमालला विचारलेल्या प्रश्नातला फक्त पहिला प्रश्न (अमिताभ वाला) कादंबरीत आहे. बाकी सगळे प्रश्न बदलले आहेत.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

जनोबा रेगे's picture

22 Jan 2009 - 11:58 am | जनोबा रेगे

मागच्याच आठवड्यात पाहिला. चा॑गला आहे पण थोडे एक्झॅजरेशन वाटते.

भडकमकर मास्तर's picture

28 Jan 2009 - 11:34 pm | भडकमकर मास्तर

चांगला सिनेमा आहे...
आवडला...
पण दहा ऑस्कर नामांकने म्हणजे अति वाटते...
उदा. गुलझार आणि रहमान यांचे हे बेस्ट वर्क मानायला काय हिंमत होत नाही...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अनामिक's picture

29 Jan 2009 - 12:14 am | अनामिक

यंदाच्या ऑस्कर नामांकन मिळालेल्या इतर चित्रपटापैकी अजून एकही बघून झाला नाही, त्यामूळे स्लमडॉगला मिळालेले १० नामांकनं योग्य आहेत की नाही ते माहीत नाही, तरीही स्लमडॉगचा समावेश त्यात असणार या बद्दल थोडीशी खात्री होती. बॉलीवूड मसाला घालून तयार केलेला हा चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत (जरी अपेक्षीत शेवट असला तरी) आपण काय होणार हे बघण्यास उत्सुक असतो (निदान मी तरी होतो). भारतियांना बॉलीवूड मसाल्यामूळे चित्रपट नेहमीचाच वाटण्याची शक्यता आहे... पण परदेशस्थांसाठी हा एक 'हटके' प्रकार आहे/होता. एका गेम-शो वर झळकणार्‍या साध्या चहावाल्याची कथा रंगवण्यात दिग्दर्शक कुठे कमी पडला असे वाटले नाही. सोबतीला रेहमानचं संगीतही जबरा आहे. तेव्हा या चित्रपटाला आणि विशेषतः रेहमानला ऑस्कर मिळावं हि मनापासून इच्छा, आणि शुभेच्छा!

(रेहमानच बेस्ट वर्क नाही म्हणनार, पण माझ्या हापीसातल्या लोकांना तरी गाणी आवडलीत. आणि त्यांना रेहमानची अजून गाणी ऐकायची आहेत. मागे बहुतेक 'इनसाईड मॅन' मधे 'चल छय्या छय्या' बॅकग्राऊंडला वापरलं होतं, तेही या लोकांना आवडलं होतं.)

परिक्षण वाचणार्‍या सगळ्यांचे आभार!

अनामिक

स्वानन्द's picture

1 Feb 2009 - 9:41 am | स्वानन्द

ठीक वाटला.. पण जेवढं दोक्यावर घेतलंय तेवढा ही काही 'भारी' वाटला नाही. असो...हल्ली एलेक्ट्रॉनीक मीडिआ मुळे एकदम डोक्यावर घ्यायचं नाहीतर एकदम जमीनीवर आपटायचं हे नेहमीचंच झालंय..

जय हो पेक्षा ही अनेक उत्तम गाणी रेहमानने दिली आहेत. असो..या गाण्याला तरी मिळतोय ना ऍवॉर्ड्..स्वानन्द आहे.

प्रभाकर पेठकर's picture

2 Feb 2009 - 3:57 am | प्रभाकर पेठकर

चित्रपट ठीक वाटला. (आपल्याला हिन्दी चित्रपटातील अविश्वसनीय गोष्टींवर विश्वास ठेवायची सवयच लागली आहे म्हणून.)
पण आंतरराष्ट्रीय पातळीवर दिग्दर्शनाला मिळालेले पारितोषिक पाहून आश्चर्यच वाटाले.

अमिताभचे हॅलीकॉप्टर येते म्हणून जमाल संडासातल्या मैल्यात डोक्यापर्यंत बुडून संडासाबाहेर पडतो ह्या सिनचे प्रयोजन कळले नाही. संडास वरून उघडा (छप्पर नसलेला) असताना जमाल खालच्या मैल्यात का उडी मारतो कळत नाही. लाकडी फळ्यांच्या भींतींवर आडव्या फळ्याही ठोकलेल्या असल्याने ६-७ फूट उंचीच्या भींतींवरून बाहेर पडणे सहज शक्य होते. ( रन-वे वरून पोलिसांचा पाठलाग चुकविताना त्याहून उंचावरून उड्यामारून, चढून तो पळू शकत असतो. ) तो घाणेरडा प्रकार फारच अनाकलनीय आहे.
रोजच्या जीवनात येणार्‍या प्रसंगांमधून जमालला उत्तरे सुचत जातात आणि तो कॉन्टेस्ट जिंकतो असे दाखवले आहे.
१०० डॉलरच्या नोटेवरील चित्र, रिव्हॉल्व्हरचा जनक, कवी सूरदासचे नांव इत्यादी गोष्टी त्याच्या आयुष्यात कधी न कधी येऊन गेल्या होत्या पण त्या त्या काळात त्यांचे त्याला काहीच महत्त्व नव्हते. त्यामुळे त्या लक्षात राहणे अगदिच असंभव आहे. तरी पण आठव्या - नवव्या वर्षी फक्त एकदाच ऐकलेली नांवे (ज्यांचे त्या वयात त्याला काहीच महत्त्व नव्हते) लक्षात ठेवून १८ - १९व्या वर्षी तो सर्व उत्तरे बरोबर देतो ह्यावर विश्वास ठेवणे जरा कठीणच आहे. असे वाटते की १०-१२ वर्षांनंतर येणार्‍या 'कौन बनेगा करोडपती' स्पर्धेतील प्रश्न त्याला आधीच ठावूक होते आणि त्याने उत्तरे पाठ करून ठेवलेली होती. (तरीही ऐनवेळी आठविणे असंभवच).
इतक्या कुशाग्र बुद्धीचा, इंग्रजी भाषेचा जाणकार, कॉलसेंटरच्या मुलांपेक्षाही अधिक माहिती असणारा जमाल चहावाल्या पोर्‍याचे काम करीत असतो, ह्यावरही दिग्दर्शक म्हणतो म्हणून विश्वास ठेवायचा. अशा बर्‍याच गोष्टी आहेत जिथे दिग्दर्शकाचे वाभाडे काढता येतील. चित्रपट गतीमान ठेवण्याच्या आणि झोपडपट्टीतील जीवन अधोरेखित करण्याच्या नादात चित्रपट वास्तवापासून दूर जातो. त्यामुळेच चित्रपट संपल्यावर मनामध्ये 'ठीऽऽक आहे' अशीच प्रतिक्रिया उमटते.