॥ हा अनुरागु भोगितां कुमुदिनी जाणे ॥
ज्ञानेश्वरी वाचतांना वाचकाचे काय होते माझा अनुभव सांगतो सर्वात अगोदर ज्ञानेश्वर आपल्याला मराठी पहिली च्या वर्गात बसवतात. आपलं मराठी भाषेचं ज्ञान तर जाऊच द्या शब्दसंग्रह कीती तोकडा आहे हे दाखवुन देतात. ज्ञानेश्वरीतल्या नुसत्या मराठी शब्दांवर एक फ़ार मोठं प्रकरण होइल. वाचतांना अनेक ठिकाणी सेरेनडिपीटी चा अनुभव येतो अनेक सुखद धक्के अनेक ओव्यांमधुन आपल्याला बसतच असतात.ज्ञानेश्वरी तशी सरळ वाचता येत नाही, एक झालं की दुसरां अध्याय अस होत नाहीच. अनेक ठिकाणी अनेक ओवींवर आपण थांबतो रेंगाळतो पुन्हा पुन्हा वाचतो "ये फ़ासले तेरी गलियों के हमसे तय ना हुये हज़ार बार रुके हज़ार बार चले " हा अनुभव नेहमीच येतो. ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतात पण मला तरी ते एखाद्या मुग्ध,आनंदी,स्वच्छंद विहार करणार्या लहान मुली सारखेच वाटतात. जी आनंदाने बेभान होऊन नाचत गात धावतेय आणि आपल्या मागे आख्खं घर फ़िरवतेय तशी. ज्ञानेश्वर आपल्याला भावभावनांच्या रोलरकोस्टर वर बसवुन जोरजोरात खाली वर फ़िरवतात आपण धुंद होऊन वाचतच जातो, अनेक रसांमधुन ते आपल्या मनाला भिजवुन चिंब करुन आणतात. बर इतकं सर्व भोगुनही आपली अवस्था " नीत घन बरसे, नीत मन प्यासा, नीत मन तरसे " सारखीच राहते. ज्ञानेश्वरीत उदासीनतेला अजिबात स्थान नाही त्यांचं मुळात व्यक्तीमत्वचं तसं नाही तरीही अगदी खणुन काढलं तर काही उदासीची गडद छाया असलेल्या ओवी सापडतात पण फ़ारच कमी उदा. का उचलिले वायुवशे, चळे शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे, परिभ्रमे । सारखी एखादी वा नातरी सरोवर आटलें, रानीं दु:खिया दु:खी भेटलें, कां वांझ फ़ुलीं फ़ुललें, झाड जैसे । किंवा कधीतरी , आतां जायांचे लेणे, जैसे आंगावरी आहाचवाणे, तैसे देह धरणे, उदास तयाचें. परिमळु निघालिया पवनापाठीं, मागे वोस फ़ुल राहे देठीं, तैसे आयुष्याचिये मुठी, केवळ देह. (अ-९ ओ-४१२-४१३) बस इतकेचं बाकी एरवी ज्ञानेश्वर म्हणजे ते "सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनि घ्यावें, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हांत हिंडावे " असाच प्रकार बहुधा असतो.
आणि मंडळी प्रेमळ भाव म्हणाल तर पुरेपुर हो, हा तर साध्या ओवींतुनही ओसंडुन वाहतो उदा. म्हणोनि सात्विक भावांची मांदी, कृष्णाआंगीं अर्जुनाआधीं, न समातसे परी बुद्धी, सांवरुनी देवे. मग पिकलिया सुखाचा परिमळु, कां निवालिया अमृताचा कल्लोळु, तैसा कोंवळा आणि सरळु, बोलू बोलिला. (अ-८ ओ-५६ ते ५७) काही ओवी तर छान रोमॅंटीक आहेत उदा. तेणें काजेंवीणही बोलावे, तें देखिलें तरी पाहावें, भोगितां चाड दुणावे, पढियंतयाठायीं । ऎसी प्रेमाची हे जाती, पार्थ तंव तेचि मुर्ती, म्हणोनि करुं लाहे खंती, उगेपणाची। (अ-१८ ओ-७९ ते ८०)
(अर्थ- ज्या प्रेमामुळे प्रिय व्यक्तीशी काही कारण नसतांनाहि बोलत राहावेसे वाटते, एकदा पाहिले तरी पुन्हा पुन्हा पाहतच राहावेसे वाटते, असा आवडत्या गोष्टीचा भोग घेतल्यावर अजुन भोग घेण्याची इच्छा अधिकच वाढते. अशी ही प्रेमाची जात असते, अर्जुन तर प्रेमाची मुर्तिच होता. म्हणुन तो देवाच्या गप्प राहण्याची खंत करु लागला.)
तर ही ज्ञानेश्वरी कशी अनुभवावी हे पहिल्याच अध्यायात सुरुवातीला ज्ञानेश्वर सांगतात ते असे.
जैसे शारदियेचे चंद्रकळेमाजी अमृतकण कोंवळे, ते वेंचिती मने मवाळे, चकोरतलगे । तियापरी श्रोतां, अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता, आणुनियां । हे शब्देविण संवादिजें, इंद्रिया नेणतां भोगिजे, बोलाआदि झोंबिजे, प्रमेयासी । जैसे भ्रमर परागु नेती, परी कमळदळे नेणती, तैसी परी आहे सेविती, ग्रंथी इये.। कां आपुला ठावो न सांडितां, आलिंगिजे चंद्रु प्रकटतां, हा अनुरागु भोगितां, कुमुदिनी जाणे । ऎसेनि गंभीरपणे, स्थिरावलेनि अंत:करणे, आथिला तोचि जाणे, मानुं इये ।
( अ-१ ओ-५६ ते ६१ )
शारदियेचे - इथे शरद ऋतु चा संदर्भ, प्रमेयासी- अर्थाशी, इंद्रिया नेणतां- इंद्रियांच्या नकळत, चकोरतलगे- चकोर या पक्ष्याची पिले ( हा संस्कृत काव्य कल्पनासृष्टीतला पक्षी, चंद्रामृत वगैरे च पितो. ढगातुन आलेलं चांदण ही चालत नाही असा गोड मामला आहे काहीतरी. संस्कृत मधले असे काव्य प्रतीकं अजुन कोणते ? जाणकारांनी दाखवले तर आनंद हॊइल. )
अर्थ- चकोरपक्ष्यांची पिले शरदरुतुतील चंद्रकिरणात असलेले कोवळे अमृतकण अत्यंत हळुवार मनाने वेचतात, त्याचप्रमाणे श्रोत्यांनो तुम्ही हळुवारपणा मनात आणुन ही कथा अनुभवा. शब्दांशिवाय यातील अर्थाशी संवाद साधावा, इंद्रियांच्या नकळत ही कथा भोगावी व ज्याप्रमाणे कमळाच्या नकळत भ्रमर परागकण घेऊन जातात, तसा हा ग्रंथ सेवन करावा. किंवा जशी आपले स्थान न सोडता तेथेच स्थिर राहुन , जेव्हा आकाशात प्रियकर चंद्र आगमन करतो तेव्हा त्याला आलिंगन देण्याची (जी कुमुदिनी ची हा अनुराग भोगण्याची शैली आहे.) ती तीलाच ठाऊक.
प्लॅटॉनिक लव्ह ( अशरीरी उदात्त पवित्र देवदासी शैलीतलं प्रेम ) च मराठमोळं उदाहरणं. कुमुदिनी ची सुंदर कल्पना रोमॅंटिसीझम चा कळस गाठते. सुनीताबाइंच्या जी.ए. ना लिहीलेल्या पत्र संग्रहाला प्रस्तावना देतांना अरुणा ढेरे यांनी यातल टायटल " आपुला ठावो न सांडिता " अस सुनीताबाइंच्या जी.ए. च्या रीलेशन संदर्भात समर्पक वापरलेलं आठवतय. त्याचा स्वर काहीसा मात्र आपलं स्वत्वं न सोडता असा होता.
॥ नागाचें पिलें कुंकुमें नाहलें ॥
योगशास्त्राच्या मान्यतेनुसार योग साधनेने योग्याच्या शरीरात सुप्तावस्थेत असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होते. तीचा उर्ध्वमुखी प्रवास मुलाधार चक्रापासुन सुरु होऊन, निरनीराळ्या चक्रांद्वारे फ़िरत ती अखेर सहस्त्रार या सर्वात वरच्या चक्रापर्यंत पोहोचते. हा शक्ती चा सुप्तावस्थेतुन जागृत होण्याचा व क्रमाक्रमाने खालुन वरच्या दिशेने होणारा प्रवास व त्याचे योग्याच्या मनोशरीरावर होणारे विवीध परीणाम आदि बाबींचे अत्यंत अदभुत, खिळवुन ठेवणारे, असे वर्णन ज्ञानेश्वर अतिवास्तववादी शैलीने ( सरीयलीस्टीकली ) करतात. या शक्तीसाठी ते नागाचे विलक्षण रुपक वापरतात. कुंडलिनी शक्ती जणु नागिण आहे असे रुपक. त्यातील हा अंश, पुर्ण वर्णन मुळातुनच वाचायला हवे इतके रोचक आहे.
तंव येरीकडे धनुर्धरा, आसनाचा उबारा, शक्ति करी उजगरा, कुंडलिनीये। नागाचें पिलें, कुंकुमे नाहलें, वळण घेऊनि आले, सेजे जैसे । तैशी ते कुंडलिनी, मोटकी औट वळणी, अधोमुख सर्पिणी, निजैली असे। विद्दुल्लतेची विडी, वन्हिज्वाळांची घडी, पंधरेयाची चोखडी, घोंटीव जैशी । तैशी सुबद्ध आटली, पुटीं होती दाटली, ते वज्रासने चिमुटली, सावध होय। तेथ नक्षत्र जैसें उलंडले, कीं सुर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुढले, अंकुरेशीं । तैशी वेढियातें सोडिती, कवतिकें आंग मोडिती, कंदावरी शक्ती, उठली दिसे । सहजें बहुतां दिवसांची भुक, वरि चेवविली तें होय मिष, मग आवेशें पसरी मुख, ऊर्ध्वा उजू ।
(अ-६ ओ-२२१ ते २२८)
औट- साडेतीन, पुटीं-लहानशा जागेत कंदावर- नाभिस्कंधावर मिष- निमीत्त
अर्थ- तेव्हा एकीकडे अर्जुना आसनाने निर्माण केलेल्या उष्णतेने, निद्रीस्त कुंडलिनी शक्ती जागी होते. केशराच्या पाण्याने न्हालेले नागिणीचे पिलु जणु काही वेटोळे घालुन शेजे वर निजलेले आहे. तशी ती कुंडलिनी शक्ती लहानशी साडेतीन वेटोळी घालुन, खाली तोंड केलेल्या सर्पिणीप्रमाणे झोपलेली आहे. ती जणु विजेची वाटोळी कडी, अग्निज्वालांची घडी, शुद्ध पंधराकशी सोन्याची घोटलेली लगडी आहे. तशी ती नाभिच्या द्रोणात व्यवस्थित जखडलेली होती, पण वज्रासनाने चिमटा घेतल्याने ती जागी होते. जसे नक्षत्रांनी आकाशातुन पडावे, सुर्याचे आसन ढळावे, किंवा प्रत्यक्ष तेजाचे च बी रुजुन त्याला अंकुर फ़ुटावा. त्याप्रमाणे ती कुंडलिनीरुपी नागिण, वेटोळे सोडत, कौतुकाने आंग मोडित, नाभीच्या कंदावर उभी राहते. ती बर्याच दिवसांची उपाशी आहे, आणि अस डिवचुन जागवल्याच निमीत्त झालय, याने संतापुन ती कुंडलिनीरुपी नागिण रागाने तोंड पसरते आणि वरच्या बाजुला सरकु लागते.
इडा पिंगळा एकवटती, गांठी तिन्ही सुटती, साही पदर फ़ुटती, चक्रांचे हे । शशी आणि भानु, ऎसा कल्पिजे जो अनुमानु, तो वातीवरी पवनु, गिंवसीतां न दिसे । बुद्धिची पुळिका विरे, परिमळु घ्राणी उरे, तोही शक्तीसवे संचरे, मध्यमेमाजी । तंव वरिलेकडोनि ढाळे, चंद्रामृतांचे तळें, कानवडोनी मिळे, शक्तिमुखीं । तेणे नातकें रस भरे, तो सर्वांगामाजीं संचरे, जेथिंचा तेथ मुरे, प्राणपवनु । तातलिये मुसे, मेण निघोनी जाय जैसें, कोंदली राहे रसें, वोतलेनि ।
(अ-६ ओ-२४४ ते २४९)
ढाळे- हळुच पडणे, कानवडोनी- कलंडुन, नातकें- नळीने, तातलिये मुसे- तापलेल्या मुशीत/ भट्टीत,
अर्थ- मग इडा व पिंगळा या दोन्ही नाड्या एक होतात, तीन गाठी (ब्रह्मा विष्णु रुद्र या तीन ग्रंथी) सुटतात, सहा चक्रांचे ( मुलाधार-स्वाधिष्ठान- मणिपुर-अनाहत-विशुद्ध-आणि आज्ञा )पदर अलग होतात. मग अनुमानाने कल्पिलेले सुर्य व चंद्र नाडितले हे दोन वायु नाकापुढे वात धरुन पाहिले असता दिसत नाहीत. बुद्धिच्या ज्ञानग्रहण क्षमतेचा विलय होतो, घ्राणेंद्रियात जो सुगंध उरलेला असतो मध्यमा त (सृषून्मेत) संचार करतो. आणि अगदी त्याच क्षणी वरच्या बाजुकडुन चंद्राच्या कलेचे अमृततळे कलंडुन वाकडे होते, आणि सरळ ते शक्तीच्या मुखात पडते.त्यामुळे जो अमृतरस आहे तो त्या शक्तीनळीत भरतो, तो सर्वांगात भरतो, त्यावेळी प्राणवायुने तो जेथल्या तेथेच मुरतो. तापलेल्या मुशीतील मेण आपोआप निघुन जाते, मग ती मुस ज्याप्रमाणे केवळ धातुरसाने भरुन राहते. ( हि मेण लेपलेली त्याकाळी प्रचलित मुस/ फ़र्नेस कुठली असेल ? सोनारांची अशी मुस असावी का ?)
मग काश्मीरांचे स्वयंभ , कां रत्नबीजा निघाले कोंभ, अवयवकांतीची भांब , तैवी दिसे । नातरी संध्यारागींचे रंग, काढुनि वळिले तें आंग, कीं अंतर्ज्योतिचे लिंग, निर्वाळीले.। कुंकुमाचे भरींव, सिद्धरसाचें वोतींव, मज पाहतां सावेव, शांतिची ते.। ते आनंदचित्रींचे लेप, नातरी महासुखाचे रुप, कीं संतोषतरुचें रोप, थांबले जैसें.। तो कनकचंपकाचा कळा, कीं अमृताचा पुतळा, नाना सासिंनला मळा, कोंवळिकेचा.। हो कां जे शारदियेचिये बोले, चंद्रबिंब पाल्हेलें, कां तेजचि मुर्त बैसले, आसनावरी.। तैसे शरीर होये, जे वेळी कुंडलिनी चंद्र पीये, मग देहाकृती बिहे, कृतांतु गा । वृद्धाप्य तरी बहुडे, तारुण्याची गांठी बिघडे, लोपली उघडे बाळदशा । कनकद्रुमाचां पालवी, रत्नकळीका नित्य नवी, नखें तैसी बरवीं, नवीं निघती.। दांतही आन होती, परि अपाडे सानेजती, जैसीं दुबाहीं बैसे पांती, हिरेयांची । मणिकुलियांचिया कणिया, सावियाची अणुमानिया, तैसिया सर्वांगी उधवती अणिया, रोमांचिया ।
(अ-६ ओ-२५३ ते २६४)
काश्मीरांचे- स्फ़टिंकाचे, पाल्हेलें- टवटवीत, कृतांत- यम, अपाडे- एवढेसे, बहुडे- मागे फ़िरते, कनकद्रुम - सोन्याचा वृक्ष, मणिकुलियांचिया- माणकांच्या, अणुमानिया- बारीक
अर्थ- मग शुद्ध स्फ़टिकांचे स्वयंभु लिंग जसे आहेत, किंवा जणु रत्नाचे बीज रुजुन त्याला अंकुर फ़ुटलाय ( तर ते कीती शुभ्र चमकदार दिसेल तसे ) तशी योग्याच्या कांतीची शोभा दिसु लागते. किंवा सायंकाळाच्या आकाशाचा लाल रंग रक्तिमा काढुन हे शरीर रंगवले की काय किंवा आत्मज्योतीचे लिंगच तयार केले की काय.? केशराचा घनवट आकार, किंवा चैतन्यरस शरीररुपी मुशीत ओतुन त्याने शरीराचा आकार धारण केलाय, असे भासणारे हे शरीर म्हणजे मुर्तिमंत शांतीच आहे. असे हे योग्याचे शरीर म्हणजे जणु आनंदरुपी चित्रांतला रंग, किंवा महासुखाचे रुप वा संतोषरुपी वृक्षाचे मुळ धरलेले रोपटे च असावे जणु असे हे शरीर भासते. तो देह जणु सोनचाफ़्याची मोठी कळी, अमृताचा पुतळा, वा जणु कोमलतेचा बहार आलेला मळा च होऊन जातो. शरदऋतु च्या ओलाव्याने टवटवीत झालेले चंद्रबिंब च जणु वा प्रत्यक्ष तेज जे आहे ते मुर्त होऊन सिंहासनावर बसलेले आहे. असे (कुंडलिनी जागृत झालेल्या योग्याचे ) शरीर होते त्यावेळी कुंडलिनी रुपी नागिण चंद्रामृत प्राशन करते मग अशी देहाची आकृती बघुन प्रत्यक्ष यमराज देखील भितो. म्हातारपण मागे फ़िरते, तारुण्याचा वियोग घडतो, लुप्त झालेले बालपण पुन्हा प्राप्त होते. योग्याच्या शरीराचा नविन जन्म होतो. सोन्याच्या वृक्षाला येणार्या पालवीत रत्नांची नित्यनुतन कळी उमलावी तशी योग्याला नविन सुंदर नखे फ़ुटतांत.
त्याला नविन दांत सुद्धा येतात परंतु ते आकाराने लहान (साने) असतात, ते असे चमकदार असतात की जणु तोंडात दोन्ही बाजुंनी हिरे ओळीने बसवले आहेत असे भासतात.सहजतेने मग माणकांच्या कणासारखी बारीक अशी रोमांचाची अग्रे सर्वांग रोमांचित होऊन उगवतात.
(इथे योग्याचे इतके सुंदर शरीर बघुन कृतांतु का बरे भीत असावा ? हे काही समजलं नाही. अंगावर उठलेल्या रोमांचाला माणकाच्या कणांसम अग्रे येतात हि सुंदर उपमा अशीच पुढे एका ओवीत ते नविन उपमा देतील बघा)
करचरणतळे जैसीं का रातोत्पले, पाखाळीं होती डोळे, काय सांगो.। निडाराचेनि कोंदाटे, मोतिये नावरती संपुटे, मग शिवणी जैशी उतटे, शुक्तीपल्लवांची.। तैशी पातिचिये कवळिये न समाये, दिठी जाकळोनि निघों पाहे, आधिलीची परी होये, गगना कळिती। आइके देह होय सोनियाचे, परि लाघव ये वायूचे, जे आप आणि पृथ्विचे, अंशु नाहीं.। मग समुद्रापैलाडि देखे ,स्वर्गीचा आलोचु आइकें, मनोगत वोळखे, मुंगियेचें।
(अ-६ ओ-२६५ ते २६९ )
रात्रोत्पले-रात्री विकसीत होणारी कंमळे, पाखाळीं- स्वच्छ , निडाराचेनि- पक्वदशा आल्यावर , संपुटे - शकले, उतटे- उकलते, जाकळोनि -व्यापुन, आलोचु- नाद
अर्थ- हाता पायांचे तळवे रात्री फ़ुलणार्या तांबड्या कमळांसारखे बनतात. डोळे किती स्वच्छ निर्मल होतात काय सांगु ? परिपक्वतेच्या स्थितीत आल्याने जसे मोती दोन शिंपल्यांच्या पोकळीत मावत नाहीत, व त्या वाढत्या आकाराने जशी शिंपीच्या पदराची शिवण जशी उकलते. तशीच योग्याची दिठी डोळे पापण्याच्या पोकळींत न मावता तीला व्यापुन मग ती बाहेर येऊ पाहते ( विशाल होते ) ती मोठी असते म्हणुन अर्धवटच बाहेर येते ( अर्धोन्मीलीत) पण ती ही गगनाला व्यापुन टाकते अशी असते. त्याचे अवघे शरीर सोन्यासारखे कांतीमान होते, परंतु तरीही ते हलके असते कारण त्यातील वायु व पृथ्वी चा जड अंश निघुन गेलेला असतो. मग असा योगी समुद्रापलीकडे काय आहे ते पाहु शकतो, स्वर्गीय नाद ऎकु शकतो, आणि मुंगीचे मनोगतही ओळखु शकतो.
नातरी वारयाचेनि आंगे झगटली, दीपाची दीठी निमटली, कां लखलखोनि हारपली वीजु गगनीं । तैशी ह्र्दयकमळवेर्ही, दिसे सोनियाची जैशी सरी, नातरी प्रकाशजळाची झरी, वाहत आली। मग तिये ह्र्दय्भुमी पोकळे, जिराली कां एके वेळे, तैसे शक्तीचे रुप मावळे, शक्तीचिमाजी। (अ-६ ओ-२८५ ते २८७)
अर्थ- अखेरीस जशी वायुच्या अंगाशी झोंबलेली दिव्याची ज्योत मालवते, किंवा आकाशात क्षणभर लखलखाट करुन वीज हरपते, किंवा ह्रदयकमळापर्यंत जणू कांही सोन्याच्या सरीसारखी दिसणारी किंवा प्रकाशरुप पाण्याच्या झर्या प्रमाणे वाहत आलेली, ती कुंडलिनी मग पोकळ अशा ह्रदयरुपी भुमीत एकदम जाऊन जिरुन जाते. अशा प्रकारे शक्तीचे स्वरुप शक्तीमध्येच विलीन होऊन जाते.
॥ रतीचिया बेटा, आदळती कामाचिया लाटा, जेथ जीवफ़ेन संघाटा, सैंघ दिसे ॥
ज्ञानेश्वर तसं श्रुंगारिक वा बोल्ड लिहतं नाहीत फ़ारसं ती त्यांची प्रकृतीच नाही मुळात. तरीही काही ठिकाणी बॅचलर ज्ञानेश्वर सुखद धक्के देतात उदा. कधी त्यांची रिगतां वल्लभांपुढे, नाहीं आंगी जींवीं सांकडे ,जिच्या अंगात कुठलाही संकोच राहत नाही, गळुन पडतो, अशी प्रियाच्या सहवासात फ़ुलुन येणारी स्त्री, तर माहेवणीं (गर्भवती) प्रयत्नेंसी. चुकविजे सेजे जैसी मधली शेजेला चुकवणारी , कधी तर सांडुनी कुळे दोन्ही, प्रियासी अनुसरे कामिनी, द्वंद्वत्यागें स्वचिंतनी, पडली तैसी मधली "कामिनी" येते. कधी प्रथमवयसाकाळीं, लावण्याची नव्हाळी, प्रगटे जैसी आगळी, अंगनाअंगी. तुन तरुण स्त्रीत ( अंगनाअंगी )येणारा लावण्याचा आगळा बहर देखील ते नोंदवतात. तर एक मायानदी चं भव्य रुपक आहे जे अर्थातच मुळातुनच वाचायला हवं इतक सुंदर आहे. त्यात रतीच्या बेटाची अनोखी उपमा येते. कल्पना फ़ार भव्य आहे. अखिल मानवजातीच्या संदर्भात आलेली अशी विशाल कल्पना आहे. "माया" अनेक धार्मिक ग्रंथात "समजावुन" सांगितलेली आहे पण असं सुंदर काव्यमय वर्णन अगदीच दुर्मिळ, हर्मन हेस्से च्या सिद्धार्थ मधल्या नदीची आठवण हमखास होते मात्र त्याचा विषय तसा वेगळाच आहे
तर मुळ गीतेत असा श्लोक येतो..
मुळ गीता अ-७ श्लोक क्र.१४ अन्वय- एषा दैवी गुणमयी मम माया हि दुरत्यया (अस्ति), ये मां एव प्रपद्यंते, ते एतां मायां तरंति.
माझी ही माया जी त्रिगुणयुक्त आहे दैवी अशी आहे ती पार करणे मोठे कष्टाचे अवघड काम आहे, जे माझी भक्ती करुन मला प्राप्त होतात तेच हि मायानदी तरुन जातात.
जिये ब्रह्माचळाचां आधाडां, पहिलिया संकल्पजळाचा उभडा, सवेंचि महाभुतांचा बुडबुडा, साना आला । जे सृष्टीविस्ताराचेनि वोघें, चढत काळकलनेचेनि वेगें, प्रवृत्तिनिवृतीची तुंगे, तटे सांडी। जे गुणघनाचेनि वृष्टिभरें, भरली मोहाचेनि महापुरें, घेऊनि जात नगरें, यमनियमांची । जे द्वेषांचां आवर्ती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माजी प्रमादादि, तळपत, महामीन । जेथ प्रपंचाचीं वळणे, कर्माकर्मांची वोभाणे, वरी तरताती वोसाणे, सुखदु:खांची । रतीचिया बेटा, आदळती कामाचिया लाटा, जेथ जीवफ़ेन संघाटा, सैंघ दिसे । अहंकाराचिया चळीया, वरि मदत्रयाचिया उकळिया, जेथ विषयोर्मीच्या आकळिया, उल्लाळे घेती । उदो अस्ताचे लोंढे, पाडीत जन्ममृत्युचे चोढे, जेथ पांचभौतिक बुडबुडे, होती जाती । (अ-७ ओ-६९ ते ७६)
आधाडां- अर्धा तुटलेला कडा, उभडा- उगम , आवर्ती- भोवर्यात, चळिया- चिळकांड्या, आकळिया- लाटा- उल्लाळे-उसळी
एकी वयसेचे जाड बांधले, मग मन्मथाचिये कासे लागले, ते विषयमगरीं सांडिले, चघळुनियां । आता वृद्धाप्याचिया तरंगा, माजीं मतिभ्रंशाचा जरंगा, तेणें कवळिजताती पै गा, चहुकडे । आणि शोकाचां कडा उपडत, क्रोधाचा आवर्ती दाटत, आपदागिधीं चुंबिजत, उधवलां ठायीं । (अ-७ ओ-८५ ते ८७)
जरंगा- जाळ्यात, कवळिजताती- जखडले जातात, आपदागिधीं- संकटरुपी गिधाडे,.
अर्थ- ही मायानदी ब्रह्मरुपी पर्वताच्या अर्ध्या तुटलेल्या कड्यावरुन ( आधाडा) खाली कोसळली, मी अनेक रुपांनी व्हावे असा संकल्परुपी पाण्याचा पहीला लोट जिला आला आणि सोबतच पंचमहाभुतांचा लहानसा बुडबुडाही आला. जी मायानदी सृष्टीविस्ताराच्या ओघात, कालक्रमाने चढत्या वाढत्या प्रवृत्ती-निवृत्ती या दोन उंच तटावरुन सैरावैरा कोसळली. जी सत्व-रज-तम गुणरुपी मेघांच्या वृष्टीने, मोहाच्या महापुराने भरली जाऊन, तिच्या लोंढ्यात यम-नियमांची नगरे च वाहुन नेत आहेत. या मायारुपी महानदीत द्वेषाचे खोल भोवरे आहेत व मत्सराची जिला अनेक वळणे पडलेली आहेत आणि जिच्या प्रवाहात प्रमाद, मद, मोह इ. दोषरुपी मोठाले मासे चमकत आहेत. या मायानदीत कर्म अकर्माच्या पुरात वेगात, सुखदु:खांचा केरकचरा तरंगत असतो आणि जिच्यात संसाराची असंख्य वळणे आहेत. मायानदीत स्त्री-पुरुषांच्या मैथुनरुपी रतीचे बेट आहे, ज्या बेटावर काम वासनेच्या लाटा सातत्त्याने आदळत असल्याने तेथील किनार्यावर जीवरुपी फ़ेसांचे असंख्य पुंजके अडकलेले दिसुन येतात. या मायानदीत अहंकाराच्या चिळकांड्या उडत आहेत, त्यावर कहर तीन प्रकारच्या मदांच्या लाटा उकळत आहेत, आणि विषयरुपी उर्मींच्या लाटा उसळी मारत आहेत. या नदीत चंद्र-सुर्यांचे उदयास्तांचे लोंढे वरचेवर येत असतात, आणि या नदीत ती प्रत्येक ठीकाणी जन्ममरणांचे खळगे पाडीत जाते, यात देहादी पदार्थांचे पंचमहाभुतांपासुन झालेले अनेक बुडबुडे उत्पन्न होऊन नष्ट होत असतात.
कित्येकांनी तारुण्याची घट्ट कंबर बांधली, आणि मदनाच्या कासेला लागले, त्यांना विषयरुपी मगरींनी चघळुन फ़ेकुन दिले. आणि पुढे या मायनदीत जी म्हातारपणाची लाट येते त्यात जी बुद्दीभ्रंशाची अनेक जाळी आहेत त्यात अनेकजण अडकतात जखडले जातात. आणि पुढे ते शोकाच्या कड्यावर आदळतात. क्रोधाच्या भोवर्यात गटांगळ्या खाउ लागतात, त्या गाळातुन जर मुष्कीलीने कधी डोके वर काढण्यात यशस्वी झालेच तर संकटरुपी गिधाडे त्यांचा कडाडुन चावा घेतात.
॥ घरीं कुटुंबपण सरे, तरी वनी वन्य होऊनि अवतरे ॥
ज्ञानेश्वरीत काही ठीकाणी विचारांची असामान्य उंची गाठलेल्या क्रांतीकारी वाटाव्या अशा ओव्या येतात. या परिग्रहा संदर्भात जे.कृष्णमुर्ती यांच्या एका पुस्तकात फ़ार वर्षापुर्वी विचारसरणींची कशी आसक्ती असते, साधु नवा संसार कसा वसवतो ,सर्वसंगपरित्याग करणारा नविन त्यागाच्याच खेळात कसा गुंतत जातो इ. संदर्भात व नंतर एकदा रजनीश यांच्या एका ग्रंथात एका अती कडुन केवळ दुसरी अती गाठण्याकडे मनाची प्रवृत्ती कशी असते. इ. वाचले होते. तेव्हा पहिल्या परिचयात ते विचार प्रचंड हादरा देऊन गेले होते. नंतर जे.कृष्णमुर्तींनी जगतगुरु बनण्यास दिलेला नकार व त्यांना जगतगुरु घोषीत करु पाहणार्या संघटनेलाच विसर्जीत करुन दिलेले ते असामान्य भाषण, कोणीही गुरु तुमच्या मनातला अंधार दुर करु शकत नाही, सत्याला कुठलाच पथ नसतो इ. आदि खुप प्रभावित करुन गेले होते. पण याचीच एक आवृत्ती इथे ज्ञानेश्वरीत सापडेल अस कधीचं वाटल नव्हत. ही आणखी एक सेरेनडिपीटी. इथे पहा सर्वसंगपरित्याग करणारा साधु कसा शिष्य आश्रम विचारसरणी इ. च्या जालात गुरफ़टतो याचे वर्णन येते.
आणि समर्थु आपुला खोडा, शिसें वाहवी जैसा होडा, तैसा भुंजौनि जो गाढा, परिग्रहो । जो माथांचि पालाणवी, अंगा अवगुण घालवी, जीवे दांडी घेववी, ममत्वाची । शिष्यशास्त्रादिविलासें, मठादिमुद्रेचेनि मिसें, घातले आहाती फ़ांसे, निसंगा जेणे । घरीं कुटुंबपण सरे, तरी वनी वन्य होऊनि अवतरे, नागवीयाही शरीरें, लागला आहे । ऎसा दुर्जयो जो परिग्रहो, तयाचा फ़ेडुनि ठावो, भवविजयाचा उत्साहो, भोगीतसे जो । (अ-१८- ओ-१०६२ ते १०६६)
शिसें-डोक्यावर, भुंजौनि- भोग देऊन, पालाणवी- खोगीर, दांडी-काठी, मिसे-च्या निमीत्ताने.
अर्थ- बलशाली पुरुष जसा खोड्यात अडकविलेल्या होडा ला आपले ओझे वाहण्यास भाग पाडतो, तसा परिग्रहो जीवाला भोग देत असतो त्याच्यावर हावी होत असतो. हा परिग्रह जीवाच्या डोक्यावर खोगीर चढवतो, अंगावर अवगुणांचा पोशाख चढवायला लावतो, हातात ममतारुपी मायेची दांडि देतो ( जीवाला बैल बनवुन भोग भोगवतो). हा परिग्रह इतका बलवान आहे की याने संन्याशांनाही सोडले नाही तो, शिष्य-शास्त्र आदिंचा डोलारा उभा करुन, मठ-मुद्रा आदिंची सोंगे उभे करुन अगदि निसंगालाही( एका नव्या ) माया मोहाच्या जाळ्यात परत एकदा अडकवतो. जो परिग्रह घरामध्ये कुटुंबाच्या रुपाने जरी संपतो ( संन्यासी गृहत्याग करण्यात जरी यशस्वी झाला ) तरी पुढे तोच परिग्रह वनांत नव्या रुपाने प्रकट होतो. ( शिष्य विचारसरणी आश्रम आदिंच्या मोहात आसक्त्ती च्या रुपाने ) नव्या रुपाने प्रकट होतो. ( त्याने केवळ दिशा बदललेली असते.) हा अगदि दिगंबर झालेल्या नागव्या संन्याशालाहि चिकटलेला असतो. असा जिंकण्यास अतिशय अवघड असलेला हा परिग्रह आहे त्याचाही साधनेने ठावठिकाणा नाहीसा करुन, साधक संसारविजयाचा उत्साह भोगतो.
॥ आधीच द्रव्ये चुरमुरी ॥
सात्विक. राजस व तामस असे आहाराचे तीन प्रकार मानले जातात. त्यातील राजसगुण प्रधान व्यक्तीचा आहार कसा असतो/ त्याचा परीणाम काय होतो इ. या संदर्भात खालील ओव्या येतात. आध्यात्मिक अर्थ जो आहे तो महत्वाचा आहेच त्यावर काही म्हणण नाही. पण या ओव्या आजच्या काळातही छान लागु होतात. ज्ञानेश्वरांची मिष्कील शैली, विनोदबुद्धी यात दिसते. एखादा झणझणीत तिखट मिसळ हाणणारा माणुस नजरेसमोर आणा किंवा खालील ओव्या वड्यासोबतची हिरवी मिरची दातात अलगद दाबुन वाचुन पहा. नामदेवांनी म्हटलेलंच आहे एक तरी ओवी अनुभवावी या अक्षरश: अनुभवण्याजोग्या ओव्या आहेत. बघा
ऎसे खारट अपाडे, राजसा तया आवडे, उन्हाचेनि मिषे तोंडे, आगीचि गिळी । वाफ़ेचिया सिगे, वातीही लाविल्या लागे, तैसे उन्ह मागे, राजसु तो । वावदळ पाडुनि ठाये, साबळु डाहारला आहे, तैसे तीख तो खाये, जें घायेवीण रुपे । आणि राखेहुनि कोरडे, आंत बाहेरी येकें पाडे, तो जिव्हादंशु आवडे, बहु तया.। परस्परें दांता, आदळु होय खातां, तो गा तोंडी घेता, तोषो लागे। आधीच द्रव्ये चुरमुरी, वरि परिवडिजती मोहरी, जिये घेतां होती धुवारी, नाकें तोंडे। हे असो उगे आगीते, म्हणे तैसे राइते, पढिये प्राणापरौते, राजसासि गा.। ऎसा न पुरोनि तोंडा, जिभा केला वेडा, अन्नमिषें अग्नि भडभडां, पोटीं भरी। तैसाचि लवंघा सुंटे, मग भुई ना सेजे सांटे, पाणियाचे न सुटे, तोंडोनि पात्र । (अ-१७ ओ-१४१ ते १४९)
अपाडे- अतिशय, साबळु- पहार, परिवडिजती- उपयोग करीतात, पढिये- आवडते ( पढियंता -आवडता कृष्ण अर्जुनाला हे संबोधन वापरतो ) अन्नमिषे- अन्नाच्या निमीत्ताने,
अर्थ- असे खारट पदार्थ रजोगुण्याला (मि.हा.ला) आवडतात आणि गरम गरम पदार्थ (मिसळ) खाण्याच्या निमीत्ताने तो जणु तोंडाने आगच गिळत असतो. हे पदार्थ (मिसळ) इतके गरम असतात की यातुन तयार होणार्या वाफ़ेवर वात धरली तर तीही पेटु शकेल, इतके गरम पदार्थ (तडका) तो मागत असतो. प्रखर वावटळीस मागे टाकेल असे किंवा पहारीचा घाव घालावा (आणि घाव वजा जाता जो दाह होतो ) तसे तिखट तो खातो. आणि राखेहुनि कोरडे आत बाहेर सारखेच तिखट असलेल्या पदार्थांना खाऊन जो जिव्हादंशु होतो तो त्याला प्रिय असतो. आणि जे पदार्थ खातांना परस्परांवर दात आदळतात असे पदार्थही त्याला खुप आवडतात.( फ़ुटाणे का हो ?) पदार्थ मुळातच झणझणीत, त्यावर मोहरी इतकी घातलेली की खातांना नाका तोंडातुन वाफ़ा निघाव्यात. हे तर जाऊ द्या मंडळी, एक वेळ आगीला देखील जो गप्प बैस असे दरडावेल असे तिखट व दाहक रायते त्या रजोगुण्याला ( कितीरे गुणी माझा रज्जो बाळा ) प्राणापेक्षाही जास्त आवडते. इतके तिखट खाउनही ते तोंडाला पुरेसे न पडुन असा तो जिभेने वेडा केलेला अन्नाच्या निमीत्ताने जणु आगच भडाभडा पोटात भरत असतो. हे पदार्थ खाल्ल्यावर शरीराचा दाह होतो, मग त्याने तो तळमळतो तेव्हा त्याला ना भुई ना पलंग दोघांवर आराम मिळत नाही. आणि तोंडापासुन तर पाण्याचा पेला सुटता सुटत नाही.
कसल्याही नीरस विषयांवर संशोधन सध्या चालु असते मी ठरवलय ,राजसाला प्राणाहुनही प्रिय असणारे हे ज्ञानेश्वरकालीन रायते कुठले ? त्याची रेसीपी काय ? व त्याचा आजच्या मिसळीशी एक तुलनात्मक अभ्यास असा काहीतरी रसपुर्ण विषय घेऊन संशोधन करायचे.
॥ का कमळावरी भ्रमर, पाय ठेविती हळुवार, कुचंबैल केसर, इया शंका ॥
गीतेच्या १३ व्या अध्यायाचा ७ व्या क्रमांकाचा श्लोक ज्यात अमानित्व ,अहिंसा, शौच, आत्मनिग्रह आदि एकुण ९ लक्षणांचा जी ज्ञानी/संतात आढळतात त्याचे वर्णन येते. त्यात विशेषत: अहिंसा या तत्वावर, २१७ ते ३३७ जवळजवळ १२० ओव्या ज्ञानेश्वर एक जबरदस्त काहीसे क्लीष्ट, उत्कट असे आरग्युमेंट करतात.,यात अनेक धक्के ते देतात, यात ते एकाच वेळी वैदिकांची यज्ञातील पशुहिंसा आणि अवैदिकांची जैनांची आचरणातील दांभिक अहिंसा ( जी ज्ञानेश्वरांच्या मते हिंसाच आहे ) या दोघांतल्या हिंसे च्या दांभिकपणावर मुलगामी रॅडिकल म्हणावा असा स्वतंत्र स्वयंपुर्ण प्रज्ञेने प्रहार करतात. ते म्हणतात
परी ते ऎसी देखा, जैशा खांडुनिया शाखा, मग तयाचियां बुडुखा, कुंप कीजे, । तैसी हिंसाची करुनि अहिंसा निफ़जविजे हा ऎसा, पै पुर्वमीमांसा निर्णो केला। जे अवृष्टीचेनि उपद्रवे, गादलें विश्व आघवें, म्हणोनि पर्जन्येष्टी करावे, नाना याग । तंव तिये इष्टीचा बुडीं, पशुहिंसा रोकडी, मग अहिंसेची थडी, कैंची दिसे। पेरिजे नुसधी हिंसा, तेथ उगवैल काय अहिंसा, परि नवल बापा धिंवसा, या याज्ञिकांचा। (अ-१३ ओ-२१८ ते २२३)
अर्थ- वृक्षाच्या फ़ांद्या तोडून मग त्यांचाच वापर करुन त्या वृक्षासाठी कुंपण करावे ( याला काय अर्थ आहे ?) त्याप्रमाणे प्रत्यक्ष हिंसाच करुन अहिंसा निर्माण करावी असा चमत्कारीक निर्णय पुर्वमीमांसाकारांनी केलेला आहे. पाऊस न पडल्याने सर्व प्राणी गांजले जर्जर झाले, म्हणजे त्यावर उपाय म्हणुन विविध प्रकारचे यज्ञ करावेत. पण त्या यज्ञ-यागाच्या बुडाशी तर उघड उघड रोकडी पशुहिंसा च आहे मग अहिंसेची कड कशी लागणार ? जेथे केवळ हिंसाच जर पेरली जाते: तेथे शुद्ध अहिंसा कशी उगवेल ? परंतु या हिंसेला अहिंसा म्हणण्याच्या याज्ञिकांच्या धाडसाच नवल बघ बाबा
एकीं धर्माचिया वाहणीं, गाळुं आदरिलें पाणी, तंव गाळितया आहाळणीं, जीव मेले । एक न पचितीचि कण, इये हिंसेचे भेण, तेथ कदर्थले प्राण, तेचि हिंसा । एवं हिंसाचि अहिंसा, कर्मकांडी हा ऎसा, सिद्धांतु सुमनसा, वोळखें तूं।
अर्थ- एका धर्मात (जैन) अहिंसेच्या नावाखाली , पाणी गाळुन प्राशन केले जाते, पण त्या गाळण्याच्या त्रासाने काही जीव मेलेच ना. काही लोक हिंसा होईल या भीतीने अन्नकण शीजवत नाहीत तसेच कच्चे खातात, त्यामुळे अन्नावाचुन त्यांचे प्राण कासावीस होतात. अहो हिच तर मोठी हिंसा त्यांच्याकडुन घडते.
यात फ़ार रोचक उदाहरणे देत देत ते आश्चर्यजनक रीत्या दोन्ही पक्ष उडवुन लावतात विचार करा प्रत्यक्ष शंकराचार्य यज्ञातील पशुहिंसे चे जिथे दांभिक आग्रही समर्थन करत होते त्या पार्श्वभुमीवर त्याच यज्ञातील पशुहिंसेवर प्रखर आक्षेप ज्ञानेश्वर घेतात. इतकेच नाही तर वैदिकांच्या पुर्ण विरोधातील अवैदिक जैन (ज्यांना मुख्य भरच अहिंसेवर ) त्यांनाही त्यांच्या दांभिक तथाकथित अहिंसेलाहि ते सोडत नाही. या दोन्ही बाजु मांडुन झाल्यावर, आता ययावरी मुख्य जे गा, ते स्वमत बोलिजेल असे म्हणुन ज्ञानेश्वर आता मी माझे स्वमत काय आहे ते सांगतो असं म्हणतात आणि मग त्यांच्या स्वत:च्या मते अहिंसा व अहिंसक संत कोण ? याच अतिशय सुंदर काव्यमय अप्रतिम असे वर्णन करणार्या अहिंसक व्यक्तीच्या मानस आणि कृत्यांसंदर्भातील ओव्या येतात इथे ज्ञानेश्वर संपुर्ण स्वतंत्र अभिप्राय देतात कोणत्याही परंपरेच्या दांभिकतेच्या अवडंबराला ते स्वविवेका वर हावी होऊ देत नाहीत एकदम ओरीजीनल स्वतंत्र उच्चत्तम असा मुल्य निर्णय ते देतात तो ही अगदी मृदुपणाने शांतपणे. कुठलाही गाजावाजा न करता. अहिंसे वरचा ज्ञानेश्वरांचा स्टॅन्ड अत्यंत युनिक वेगळा व क्रांतिकारी आहे.
तैसे ज्ञानामनाचिये भेटी, सरिसेंचि अहिंसेचें बिंब उठी, तेंचि ऎसे किरीटी, परिस आतां। तरी तरंगु नोलांडितु, लहरी पायें न फ़ोडितु, सांचलु न मोडितु, पाणियाचा । वेगे आणि लेसा, दिठी घालुनी आंविसा, जळी बकु जैसा, पाऊल सुये । कां कमळावरी भ्रमर, पाय ठेविती हळुवार, कुचंबैल केसर, इया शंका। तैसे परमाणु पां गुंतले, जाणुनि जीव सानुले, कारुण्यामाजीं पाउले, लपवूनि चाले.। ते वाट कृपेची करितु, ते दिशाची स्नेहा भरितु, जीवातळी आंथरितु, आपुला जीव। ऎसिया जतना चालणे जया अर्जुना, हे अनिर्वाच्य परिणामा, पुरिजेना । पै मोहाचेनि सांगडे, लासी पिली धरी तोंडे, तेथ दांतांचे आगरडे, लागती जैसे । कां स्नेहाळु माये, तान्हयाची वास पाहे, तिये दिठी आहे, हळूवार जे । नाना कमळदळे, डोलविजती ढाळे, तो जेणे पाडे बुबळे, वारा घेपे। तैसेनी मार्दवे पाय, भुमीवरी न्यसीतु जाय, लागती तेथ होय, जनां सुख.। ऎसिया लघिमा चालतां, कृमीकीटक पांडुसुता, देखे तरि माघौता, हळुचि निघे.।( अ-१३ ओ-२४४ ते २५५ )
स्वये श्वसणेंचि ते सुकुमार, मुख मोहाचें माहेर, माधुर्या जाहले अंकुर, दशन तैसे.। पुढां स्नेह पाझरे, मागां चालती अक्षरें, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी । तंव बोलणेंचि नाही, बोलों म्हणे जरी कांही, तरि बोल कोणाही, खुपेल कां । (अ-१३ ओ-२६१-२६२)
मांडिली गोठी हन मोडैल ,वासिपैल कोणी उडैल, आइकोनिची वोवांडिल, कोण्ही जरी । तरि दुवाळी कोणा न व्हावी, कवणाची भुंवई नुचलावी, ऎसा भावो जीवीं, म्हणोनि उगा.। तैसे साच आणि मवाळ, मितले परि सरळ, बोल जैसे कल्लोळ अमृताचे । (अ-१३ ओ-२६५ व २६९)
सांचलु- साठा, लेसां-हळुच, आंविसा- भक्ष्यावर, सुये- ठेवतो, कुंचबैल- दुखावेल/दबेल, सानुले-लहानसे/सुक्ष्म. सांगडे- योगाने, लासी-मांजरी, आगरडे-टोके, दीठी- द्रुष्टी. ढाळे- हळुवार
अर्थ- ज्ञानाची आणि मनाची भेट झाली असता त्या मनात अहिंसेचे जे प्रतिबींब उमटते ते आता ऎक अर्जुना ते असे असते. लाटांच्या तरंगांना न ओलांडता, पायाने लहरींना न फ़ोडता, तसेच पाण्याचा साठा न मोडता, गतीने किंवा अत्यंत हळुवारपणे बगळा जसा आपल्या भक्षावर नजर ठेवतांना, जसा ह्ळूवारपणे पाण्यात पाऊल ठेवत असतो किंवा भ्रमर जसे कमळपुष्पावर कमळातील नाजुक पराग विस्कळीत तर होणार नाही या काळजीने जसे अत्यंत नाजुकपणाने पाय ठेवतो तसाच तो संत परमाणुत ही सानुले जीव आहेत हे जाणुन त्यांना इजा होऊ नये म्हणुन हळुवारपणे, दयेने, पावले हलकी टाकत चालत असतो. तो ज्या मार्गाने जातो ती दिशाच कृपेने संस्कारीत होत असते, तो इतर जीवांसाठी स्वत:चा जीव अंथरुन टाकत असतो. अशा रीतीने जो चालत असतो त्याचे वर्णन शब्दातीत आहे, त्यास कोणतेच परीमाण माप पुरे पडत नाही. मांजरीण जशी प्रेमाने मृदु दातांनी आपल्या पिलाच्या मानेला धरते, त्या वेळी ती तीक्ष्ण टोके पिलाच्या कोमल मानेला लागतात. किंवा एखादि प्रेमळ आई आपल्या तान्हुल्याची वाट पाहतांना तिच्या डोळ्यात जसे मृदु कोमल भाव असतात. किंवा जितका कमलपुष्पाच्या पाकळ्या पाकळ्या हळूवारपणे वार्याने हलविल्या जातात तेव्हा त्यापासुन निघालेला मंद सुंगधी वारा जितका डोळ्यांना झोंबेल. तितकेच हळूवारपणे संताचे पाय जमिनीवर पडत जातात, ते जिथे स्पर्श करतात तेथे असलेल्या जीवांना समाधान लाभते. अरे अर्जुना असा संत अशा हळूवार पायांनी चालत असतांनाही कदाचित जर कृमी कीटके समोर दिसली तर तो आपल्या हातुन ती मरु नये म्हणुन हळुवारपणे पाय मागे सारतो.
जो मंद श्वासोच्छवास करतो, त्यांचे मुख प्रेमाचे माहेर असते, आणि त्यांचे दात म्हणजे माधुर्याला फ़ुटलेले अंकुरच जणु असतात. स्नेहाचा पाझर पुढे आणि यांनी उच्चारलेली अक्षरे त्यामागुन जात असतात कृपा अगोदर आणि मग वाच्यता असा त्यांचा व्यवहार असतो. कदाचित काही अर्जुना तो सहसा कोणाबरोबर बोलत नाही पण काही बोलावेसे वाटलेच तर त्याचे शब्द इतके हळुवार असतात की ते कधीही कुणाला दुखवत नाहीत खुपत नाहीत. बोलण्याने एखाद्या महत्वपुर्ण विचारांची हानी होइल, ओरडण्याने पक्षी उडुन जातील, वा ऎकुन कोणी विचलीत होइल कदाचित म्हणुन तो अनावश्यक बोलणे टाळतो. आपल्या बोलांनी कोणाला दु:ख होउ नये, कोणी दु:खी होऊन तळमळु नये, किंवा रागाने कॊणाची भुवई उचलली जाऊ नये असा विचार करुन जो गप्प बसतो मौन पसंत करतो. अशा संताला कधी मग फ़ारच आग्रह झाला तर तो प्रेमापोटी बोलण्यास तयार होतो तेव्हा त्याचे बोलणे इतके पेमळ असते की ऎकणार्या श्रोत्याचा तो मायबाप च होऊन जातो. अशावेळी जणु काही अमृताच्या लाटा असाव्यात असे त्याच्या बोलण्यातील शब्द खरे, सरल आणि मृदु -मर्यादित असतात.
अशा रीतीने ते पुढे जाऊन यालागीं साचोकारें, मनीं अहिंसा पिकली दुती आदरे, बोभात निघे (अ-१३ ओ-३०४) ( अंत:करणात अहिंसा मोठ्या प्रमाणात बळावली तरच ती नैसर्गिकरीत्या बाहेर प्रगट होते जसे पिकलेल्या फ़ळाफ़ुलांचा सुंगध मोठ्या उत्साहाने बोभाटा करत बाहेर येतो तसा ) असे म्हणुन या मुदयापुरते तरी ते अगदी शंकराचार्यांचा हात सोडवुन घेऊन २० व्या शतकातल्या जे.कृष्णमुर्तीं शी हातमिळवणी करतांना दिसतात. अहिंसा या मुल्याचा हा वैचारीक उत्क्रांतीचा प्रवास मोठा रोचक आहे बघण्यासारखा आहे.
॥ उदंड सैंघ वाजते, भयानके खाखाते ॥
या खालील ओव्या वाचल्या तेव्हा सर्वात अगोदर आठवलं ते अनुराग कश्यप चा एक ग्रेट सिनेमा आहे " गुलाल " नावाचा त्यात वीर रसा ने काठोकाठ भरलेलं एक मस्त गाणं आहे. आरंभ है प्रचंड बोले मस्तको के झुंड आज जंग की घडी की तुम गुहार दो, आन ,बान शान या के जान का हो दान , आज एक धनुष के बाण पे उतार दो. हे गाण चांगल्या साउंड सिस्टीम मध्ये ऎकल तर लो बीपी / नैराश्य आदि जाऊन हाय बीपी / अति उत्तेजीत अशी मनाची अवस्था होते. ( दुसरं टोक ) पण गाणं म्हणजे गाणं आहे , शब्द भारदस्त दमदार अगदी तस्सच पहिल्या अध्यायात कवियांचे राजे ज्ञानेश्वर वीर रसाने परिपुर्ण अशा ओवी देतात. महायुद्धाचे वर्णन उत्तेजीत करणारे येते हे सर्व वर्णन अर्थातच मुळातुनच वाचण्यासारखे आहे. त्यातला हा काही भाग यात पितामह भीष्म गर्जना आणि शंखनाद करतात दोन्हीचा कसा भीषण परिणाम होतो इ. (बिरुदांचे दादुले तर भारीच ) व मग शेवटी हिरो ची कृष्णा ची एन्ट्री वगैरे होते. मग ते अर्जुनाच्या रथाचं वगैरे सुंदर वर्णन आहे.
या राजचिया बोला, सेनापति संतोषला, मग तेणे केला सिंहनादु । तो गाजत असे अदभुतु, दोन्ही सैन्यांआंतु , प्रतिध्वनि न समातु, उपजत असे । तयाचि तुलगासवें, वीरवृत्तीचेनि थावें, दिव्य शंख भीष्मदेवें आस्फ़ुरीला । ते दोन्ही नाद मिनले, तेथ त्रैलोक्य बधिरभुत जाहलें, जैसे आकाश कां पडिलें, तुटोनियां । घडघडित अंबर , उचंबळत सागर ,क्षोभले चराचर, कांपत असे । तेणें महाघोषगजरें, दुमदुमिताती गिरिकंदरे, तंव दलामाजि रणतुरें, आस्फ़ारिलीं । उदंड सैंघ वाजते, भयानकें खाखातें, महाप्रळयो जेथे, धाकडांसी । भेरी निशाण मांदळ, शंख काहळा भोंगळ, आणि भयासुर रणकोल्हाळ, सुभटांचे । आवेशे भुजा त्राहाटिती, विसणैले हांका देती, जेथ महामद भद्रजाती, आवरती ना । तेथ भेडांची कवण मातु, कांचया केर फ़िटतु, जेणें दचकला कृतांतु, आंग नेघे । एकां उभयांचि प्राण गेले, चांगांचे दांत बैसले, बिरुदांचे दादुले, हिंवताती । ऎसा अदभुत तूरबंबाळु, ऎकोनी ब्रह्मा व्याकुळु, देव म्हणती प्रळयकाळु, वोढवला आजी । ऎसी स्वर्गु मातु, देखोनि तो आकांतु, तंव पांडवदळाआंतु, वर्तले कायी । हो कां निजसार विजयाचे, किं तें भांडार महातेजाचे, जेथ गरुडाचिचे जावळियेचे, कांतले चार्ही । (अ-१ ओ-१२५ ते १३८)
धाकडांसी- धैर्यवानांना, विसणैले- चवताळलेले, भद्रजाती- बेभान हत्ती, बिरुदांचे दादुले - बिरुदे मिरवणारे योद्धे, तूरबंबाळु- वाद्यांचा ध्वनी, कांचया-कचरलेले, निजसार- माहेर, कांतले-जुंपले.
अर्थ- राजा दुर्योधनाच्या वचनांनी सेनापती भीष्माचार्यांना संतोष झाला, मग त्यांनी भयंकर असा सिंहनाद केला. तो अदभुत नाद दोन्ही सैन्यात असा दुमदुमला की त्याचा प्रतिध्वनी आकाशात कोठेही विरु शकला नाही तो नाद वारंवार निनादत राहीला घुमत राहीला. या घोषाचा नाद घुमत असतांनाच, वीरवृत्तीच्या आवेशात येउन भीष्मदेवांनी तितकाच तुल्यबळ नाद होणारा, दिव्य शंख त्यांनी वाजवला. भीष्माचार्यांनी केलेल्या दोन्ही महानादांमुळे अवघे त्रिभुवन बहिरे झाले. जणु काय आकाशच तुटुन पडले असा भास झाला. त्यामुळे आकाश गडगडले, सागर उसळी मारु लागले, सर्व चल अचल विश्व अस्वस्थ होऊन भयाने थरथरु लागले. त्या महानादाच्या आवाजाने पर्वत, गुहा, दणाणुन गेल्या, आणि त्याच वेळी सैन्यामध्ये दुसरीकडे रणवाद्यांचा भीषण कल्लोळ सुरु झाला. अनेक प्रकारची रणवाद्ये भयानकपणे, कर्कश आवाजात सर्वत्र वाजू लागली, तेथे धैर्यवानांना सुद्धा भय वाटुन जणु काय महाप्रलयच होत आहे असा भास झाला. त्या रणवाद्यांमध्ये नगारे, डंके, ढोल, शंख , झांजा, कर्णे, तुतारी यांच्या कर्कश आवाजाबरोबर महावीरांच्या रणगर्जना ही त्यात मिसळल्या. कित्येक योद्धे वीरवृत्तीच्या आवेशात येऊन दंड थोपटु लागले, त्वेषाने द्वंद्वयुद्धासाठी परस्परांना पुकारु लागले, तिथे तर मदोन्मत हत्ती देखील आवरणे कठीण होऊन बसले. तेथे भ्याडांची काय गती झाली असेल विचारता ? अहो कच्चे, दुर्बल तर पाचोळ्यासारखे कुठच्या कुठे उडाले त्या रणवादयांच्या भयंकर आवाजाने प्रत्यक्ष यम देखील दचकला तो भीतीने उभा राहीना. त्या ठीकाणच्या भीतीदायक वातावरणाने कीत्येकांचे उभ्यानेच प्राण गेले. कैक धैर्यवानांची दातखिळीच बसली. अतीरथी, महारथी आदि बिरुदे मिरवणारे योध्द्दे भयाने थरथरु लागले. रणवाद्यांचा असा भीषण अदभुत नाद ऎकुन प्रत्यक्ष ब्रह्मा व्याकुळ झाला. आणि स्वर्गातील सर्व देव म्हणु लागले की आला हो आज प्रलयकाळ आला. तो रणगजर ऎकुन स्वर्गात अशी गोष्ट चालु असतांना इतक्यात पांडवसेनेत काय घडले ? तर .जो रथ युद्धभुमीवरील जणु काही विजयाचे मुर्तिमंत रुप, महातेजाचे प्रचंड भांडार होता, ज्याला वेगाच्या बाबतीत गरुडाशी स्पर्धा करेल असे चार घोडे बांधले होते ( असा तो अर्जुनाचा रथ आला )
॥ पवनु अति निश्चळु मंद झुळके ॥
योग्याने योगाभ्यास करण्यासाठी कशी जागा निवडावी ? ते स्थान कसे असावे ? या संदर्भात गीतेत ६ व्या अध्यायात अशा अर्थाचा श्लोक येतो की, ( शुद्ध जागी, फ़ार उंच नाही, फ़ार सखल नाही असे दर्भावर मृगाजीन त्यावर वस्त्र असलेले स्थिर आसन स्थापित करुन -गी.अ-६ श्लो-११) किती साधा यात वर्णन कीती शुद्ध-उंची- वगैरे बघा मृगाजीन टाका बास. आता हा असा शुष्क श्लोक आमच्या रसिक माऊलींच्या हातात पडतो. आणि त्याला कशी सौंदर्याची पालवी फ़ुटते बघा , ते ग्रेस म्हणतात ना मी महाकवी दु:खाचा दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फ़ुल तस ज्ञानेश्वरांच्या हातात हा दगडी श्लोक पडल्यावर होतं त्यांची निवड बघा कसला चोखंदळ माणुस आहे हा आणि गोडवा भाषेतला शेवटी कसे म्हणता आम्ही ना न म्हणो आम्ही ना न म्हणो
अभ्यासुचि आपणयातें करी, ह्रदयाते अनुभव वरी, ऎसीं रम्यपणाची थोरी अखंड जेथ , ऎसेनी न राहातयाते राहवी, भ्रमतयातें बैसवी, थापटुनि चेववी, विरक्तीतें. (अ-६ ओ-१६६ व १६९) जेथ अमृताचेनि पाडें, मुळेहीसकट गोडें, जोडती दाट झाडे, सदा फ़ळती. पाउला पाउला उदके, वर्षाकाळींही परिचोखे, निर्झरें का विशेखें, सुलभे जेथ. हा आतपुही अळुमाळु, जाणिजे तरी शीतळु, पवनु अति निश्चळु, मंद झुळके. बहुतकरुनी नि:शब्द, दाट न रिगे श्वापद, शुख, हन ,षट्पद, तेउतें नाही. पाणिलगें हंसे, दोनी चारी सारसे, कवणे ऎके वेळे बैसे, तरी कोकिळही हो. निरंतर नाहीं, तरी आलीं गेलीं कांही, होतु कां मयूरेंही, आम्ही ना न म्हणो. ( अ-६ ओ-१७३ ते १७८)
अर्थ= असे स्थान असावे की जेथे साधकाकडुन योगाभ्यास आपोआपच सहज केला जातो, आणि तेथील रमणीयतेची थोरवी अशी की ज्याने ह्रदयाला आनंदाचा अनुभव होतो. असे स्थळ न राहणारालाही खिळवुन ठेवते, दिशाहीन भटकंती करणारा तेथे आल्याने स्थिरावतो, आणि जे स्थान एखादया उदासीन विरक्तालाही हलकेच चापटी मारुन जागे करते. जेथे मुळासकट अमृतासारखी गोड फ़ळे लागणारी दाट झाडे सदा सर्वकाळ बहरत असावीत. जिथे वर्षाकाळा व्यतिरीक्तही इतर वेळीही मुबलक पाणी असावे, खास करुन तिथे सहजपणे उपलब्ध असणारे शुद्ध पाण्याचे झरे असावेत. तेथे उनही किंचीत शीतलच जाणवले पाहीजे, वारा अत्यंत शांत वा फ़ार तर मंदगतीने झुळझुळणारा हवा. ते स्थान निशब्द असावे निरव शांतता असावी ( भयाण नाही ) हिंस्त्र प्राण्यांचा तेथे वावर नसावा, आणि इरीटेट करणारे पोपट भुंगे इ.देखील नसावेत. आणि काय असावे या स्थानात तर पाण्याच्या आश्रयाने राहणारे काही राजहंस, दोन चार सारसपक्षी, जेथे आढळतात, आणि हो कोकीळ ही असावा एखादा. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट नेहमीच नसले तरी चालेल पण अधुन मधुन ये जा करणारी दोन चार मयुरे ही असली तर आम्ही ना न म्हणो.
बस इतना सा ख्वाब है मै ज्यादा नही मांगता. यातला जो थापटुनि चेववी विरक्तीते छानच आहे. विरक्त हा कसा अती उदासीन असतो त्याला केवळ स्लाइटली चेववण्याची (जास्तही नाही) गरज आहे बास, हे काय सुक्ष्म मार्मिक निरीक्षण आहे. आणि ते पोपट भुंगे मला अगोदर कळल नव्हत नंतर लक्षात आल की हे भुणभूण करुन इरीटेट फ़ार करतात आणि योग्याला ध्यानात अडथळा नको असतो म्हणुन ते तिथे नको. मात्र एखादवेळेस कोकिळ हवी बर्का , भइ वाह भइ वाह !
॥ एकें सावियाचि चुळुकीं, एकें लसत्कांचनसम पिंवळी ॥
विश्वरुपदर्शन च्या अध्यायात अर्जुनाला विश्वरुप दाखवतांना देवाने त्याची विवीध प्रकारची रुपे, नाना वर्णांची, नाना आकारंची दाखविली अशा अर्थाचा श्लोक आहे. त्यातील नाना वर्णाची दाखवली म्हणजे कशी त्याचे अतिशय सुंदर असे वर्णन ज्ञानेश्वर वेगवेगळे रंग व त्या रंगाला दर्शवेल अस उदाहरण देऊन करतात. इथे माऊली शब्दांची रंगपंचमी करुन उपमांची मुक्त हस्ते उधळण करतात.अस म्हणतात की संवेदनशील चित्रकार सामान्य माणसांपेक्षा एकाच रंगाच्या अनेक सुक्ष्म छटा पाहु अॅप्रीसीएट करु शकतो. आपण नुसतं निळ म्हणणार तो एक्वा ब्लु ,बेबी ब्ल्यु, नेव्ही ब्लु, कार्बन ब्लु, बर्लिन ब्ल्यु अॅलीस ब्ल्यु इ.म्हणेल असंच एक छान पुस्तक आहे अ डिक्शनरी ऑफ़ कलर - अ लेक्स्सीकॉन ऑफ़ द लॅंग्वेज ऑफ़ कलर त्यात अनेक छटा दिलेल्या आहेत नुसत्या रंगावरुन काय काय शब्द आले आहेत असही बरच काही रोचक वर्णन दिलेल आहे उदा. ही व्याख्या बघा Rajasthan reds A vivid way of describing pungent red hues along with ‘Kashmir blues’ and ‘Topkapi greens’. तर (यावर एक धागा चित्रगुप्त छान बनवु शकतील नाही का ?) तर आता आपल्या माऊली बघा किती सुंदर सुंदर चपखल उपमा वापरतात. उदा. इंद्रनील मण्यासारखी गडद निळी,
एवं नानाविधें परि बहुवसे, आणि दिव्यतेजप्रकाशें, तेवींचि एकएकाऎसे, वर्णेही नव्हे । एकें तातलें साडेपंधरे, तैंसी कपिलवर्णे अपारें. एकें सरागें जैसें सेंदुरे, डवरले नभ । एकें सावियाचि चुळुकीं, जैसें ब्रह्मकटाह खचिलें माणिकीं, एकें अरुणोदयासारिखीं, कुंकुमवर्णे.। एकें शुद्धस्फ़टिकसोज्वळे, एकें इंद्रनीळ-सुनीळे, एकें अंजनाचल सकाळे, रक्तवर्णे एकें। एकें लसत्कांचनसम पिंवळी, एकें नवजलदश्यामळीं, एकें चांपेगौरी केवळीं, हरितें एकें। एकें तप्तताम्रतांबडिं, एकें श्वेतचंद्र चोखडीं, ऎसीं नानावर्णे रुपडीं, देख माझीं । हे जैसे कां आनान वर्ण, तैसें आकृतींही अनारिसेपण, लाजा कंदर्प रिघाला शरण, तैंसे सुंदरे एकें । एकें अतिलावण्यसाकारें, एकें स्निग्धवपु मनोहरें, श्रुंगारश्रियेचीं भांडारे, उघडिलीं जैसी। एकें पीनावयव मांसाळे, एकें शुष्कें अतीविक्राळे, एकें दिर्घकंठे विताळें, विकटे एकें। (अ-११ ओ-१३१ ते १३९)
चुळुंकी- माणकांनी, तातले साडेपंधरे - तापलेल्या सोन्यासारखी पिंगट , इंद्रनीळ सुनीळे- इंद्रनील मण्यासारखी, सुनील -गडद निळा कृष्णासाठी वापरला जातो, लसत्कांचनसम- तेजदार सोन्याप्रमाणे, अंजनाचल सकाळे- काजळासारखी काळीभोर , लाजा कंदर्प - मदनही लज्जीत झाला असे सौंदर्य, पीनावयव- पुष्ट, विताळे- मोठ्या डोक्याची,
अर्थ-याप्रमाणे विविध प्रकारची, परंतु पुष्कळ आणि अलौकिक तेजाने प्रकाशमान असलेली, तसेच एकसारखा दुसर्याचा वर्ण नसलेली. कित्येक तापलेल्या शुद्ध सोन्यासारखी, तर काही रुपे अमर्याद काळ्या रंगाची, तर कित्येक सर्वांगावर शेंदुराने माखलेले जणु आकाश दिसावे (आरुषी) तशी शेंदरी रंगाची. कित्येक रुपे ब्रह्मांड माणिक रत्नांनी जडवलेली आणि स्वभावत:च चमकणारी अशी लहान लहान होती. कित्येक अरुणोदया सारखी लाल तर कित्येक केशरी रंगाची होती. अनेक शुद्ध स्फ़टिकाप्रमाणे शुभ्र, कित्येक इंद्रनील मण्याप्रमाणे गडद निळी, कित्येक काजळाच्या वर्णाप्रमाणे काळीभोर, आणी कीत्येक रक्तवर्णी लाल भडक होती. त्यातील काही तेजस्वी सोन्याप्रमाणे पिवळी, कित्येक पाण्याने पुरेपुर भरलेल्या नुतन मेघासारखी श्यामलवर्णाची (काळी नव्हे ही माझी प्रीत निराळी ,संध्येचे श्यामल पाणी मधील श्यामल) कित्येक चाफ़्याच्या फ़ुलाप्रमाणे गोर्या रंगाची, काही एक केवळ हिरव्या रंगाची होती. काही तापलेल्या तांब्यासारखी जणु तांबडी भडक होती, कित्येक चंद्रासारखी शुभ्र श्वेत रंगाची अत्यंत शीतल, अशी विवीध रंगाची माझी रुपे तु पहा. हे जसे विवीध रंग आहेत तसे विश्वरुपाच्या रचनेतही बदल आहे, वेगळेपण आहे, प्रत्यक्ष मदनाने ज्याची रुपे पाहुन लाजेने शरण जावे अशी एकाहुन एक विपुल सुंदर अशी रुपे आहेत. काही शरीर रुपे अत्यंत सुंदर बांध्याची आहेत, काही कोमल शरीराची, मनाला मोहित करणार्या आकृती, तर काही श्रुंगाररुपी संपत्तीची जणु भांडारे उघडलेली आहेत, अशा आकृती आहेत. कित्येक पुष्ट अवयवांच्या, तर अनेक वाळलेल्या, अतिभीषण, काही दिर्घकंठ, पसरट,मोठे डोके असलेली भयंकर कुरुप तर काही वेड्यावाकड्या आहेत.
वरील ओव्यांचा अनुभव घेण्याचा ,म्हणजे रंगाची उधळण समजुन घेण्याचा अजुन एक काहीसा निन्मस्तरीय मार्ग आहे, तो म्हणजे सोनालीचं जो हाल दिलका-सरफ़रोश, हे गाणं बघा किंवा गेला बाजार उर्मिलेचं चलो चले-सत्या किंवा शत्रुघ्नरुपी चिखलातुन उगवलेल्या कमलकलिका सोनाक्षीचं एक गांण.. असो. फ़ार लांबेल विषय मग
॥ कां सर्वसंहारे मातले मरण, तैसें अतिभिंगुळवाणेपण, वदनी तुझिये ॥
ज्ञानेश्वरांची काव्यप्रतिभा विश्वरुपदर्शनाच्या अंगणात उदंड उत्साहात फ़ेर धरते. हा विशेष अध्याय जणु त्यांच्या प्रतिभेच्या अविष्काराला वाव देण्यासाठीच बनवलेला आहे असे वाटते. त्यांनीच ज्ञानेश्वरीत इतर ठीकाणी म्हटल्याप्रमाणॆ भ्यासुर आणी सुरेख , हे रुपाचें स्वरुप देख, जे उपजवी सुखदु:ख, नेत्रद्वारे । तर भ्यासुर हे देखील रुपाचा च भाग आहे कुरुप शब्दात जसे रुप अंतर्भुत आहे तसे. अहो रुप कुरुप काय ज्ञानेश्वर तर बोलीं अरुपाचे रुप दावीन, अतींद्रिय परि भोगवीन, इंद्रियांकरवी. इतका कवीसुलभ आत्मविश्वास दाखवतात नाहीतर विटगेन्स्टाइन बघा तो विचारक आहे कवी नाही म्हणून तो आपला सबुरी धरुन बोलतो दॅट वुइच कॅनॉट बी सेड मस्ट नॉट बी सेड, याचे कारण तो कवी नाही इतकेच आहे. तर आता या खालील ओवीमध्ये वरील रुपा इतक्याच उत्कटतेने आणि प्रत्ययकारक असे वर्णन ते भयंकराचे/ कुरुपाचे कसे करतात ते बघा. ढसाळांच एक टायटल आठवतं बघा मी भयंकराच्या दारात उभा आहे अस काहीतरी त्याचा झटीती का काय म्हणता तो प्रत्यय या ओव्यांनी येतो.
हे अनंत चारु चरण, बहुउदर आणि नानावर्ण, कैसें प्रतिवदनीं मातलेपण, आवेशाचे. हो कां जे महाकल्पाचां अंती, तवकलेनि यमें जेउततेउतीं, प्रळयाग्निचीं उजितीं, आंबुखिलीं जैसीं. नातरी संहारत्रिपुरारीचीं यंत्रे, कीं प्रळयभैरवाचीं क्षेत्रें, नाना युगांतशक्तींचीं पात्रे, भुतरिवचा वोढविलीं. तैसी जियेतियेकडे, तुझीं वक्त्रें जीं प्रचंडें, न समाती दरिमाजीं सिंहाडे, तैसे दांत दिसती रागीट. जैसे काळरात्रीचेनि अंधारे, उल्हासत निघतीं संहारखेचरें, तैसिया वदनीं प्रळयरुधिंरें, कांटलिया दाढा. हे असो काळे अवंतिलें रण, कां सर्वसंहारे मातले मरण, तैसें अतिभिंगुळवाणेपण, वदनी तुझिये, हे बापुडी लोकसृष्टी, मोटकीये विपाइली दिठी, आणि दु:खकालिंदीचां तटी, झाड होऊनि ठेली. तुज महामृत्युचां सागरीं, हे त्रैलोक्यजीविताची तरी, शोकदुर्वातलहरी, आंदोळत असे. (अ-११ ओ-३४१ ते ३४८)
चारु- सुंदर , तवकलेनि- रागावलेल्या, जेउततेउतीं- जिकडे तिकडे, उजितीं- होळ्या, आंबुखिलीं- पसरली, वक्त्रे- तोंडे, संहारखेचरे- संहारक पिशाचे, कांटलिया- किडलेल्या, अतिभिंगुळवाणेंपण- भयंकर, मोटकीये- किंचीत, क्षणभर, तरी-छोटी नाव, शोकदुर्वातलहरी- शोकरुपी झंझावातात
अर्थ- विपुल आणि सुंदर बाहू व पाय आणि पुष्कळ उदरे आहेत, प्रत्येक अवयवांचा रंग वेगळा आहे, आणि प्रत्येक मुखावर विकारांच्या आवेशाचा माज दिसत आहे. जणु काही प्रलयकाळाच्या अखेरीस संतापलेल्या यमाने जिकडे तिकडे प्रलयाग्निंच्या भयंकर होळ्या च जणु पसरलेल्या आहेत. किंवा त्रिपुरासुराचा संहार करणार्या शंकराची विनाशक यंत्रे च जणु, किंवा प्रलयकालीन भैरवांची निवासस्थानेच आहेत, किंवा अवघ्या युगाचा अंत करणार्या कालशक्तीची भुतांना खाण्याकरीता वाढुन ठेवलेली अन्नाची पात्रेच जणु पुढे सरकवलेली आहेत. याप्रमाणे सर्वत्र तुझी प्रचंड मुखे असुन ती फ़ारच मोठी असल्याने कुठेही मावत नाहीत, गुहेत सिंह जसे बसलेले असतात तसे तुझ्या तोंडात रागीट दांत दिसत आहेत. जशी काळरात्रीच्या अंधारात पिशाचे (खेचरे) उत्साहाने बाहेर निघतात, त्याप्रमाणे प्रलयकाळाच्या रक्ताने किडलेल्या दाढा तुमच्या तोंडात दिसत आहेत. हे असो जसे काळाने युद्धाला आमंत्रण द्यावे, वा संहारकाळी मरणाला जसा माज चढतो, तशी भयानकता तुझ्या मुखात दिसत आहे.या गरीब बिचार्या सृष्टीकडे जरा नजर टाकली तरी दु:ख कालिंदीच्या तटावर ती झाड होऊन उभी असलेली दिसते. तुझ्या महामृत्युरुप सागरांत त्रैलोक्याच्या आयुष्याची तरी (नौका) शोकरुपी वार्याच्या झंझावातात हेलकावे खात आहे.
॥ आंतुलिया सुखोर्मीचेनि बळे , बाहेरि कांपे ॥
मागे इथेच एका चर्चेत श्री. कोल्हटकर सरांनी अष्टसात्विक भाव कसे व कोणते याचं एक सुंदर विवेचन आणि उदाहरण दिलेल आठवतय. त्याला मनोबा यांनी ही तर तंतरलेल्याची लक्षणे वाटतात अस काहीस म्हटल होतं. तर तस वाटतं प्रथमदर्शनी हे खर आहे. मात्र सुक्ष्म निरीक्षण केल्यास असं लक्षात येईल की. कुठलाही अतीसंवेदनशील व्यक्ती जेव्हा कुठल्याही उत्कट सत्यम शिवम सुंदरम चा अनुभव घेत असतो तेव्हा तो भावनांच्या रोलरकोस्टर वर वेगाने फ़िरत असतो. तेव्हा असं डोळ्यात पाणी येणे, धडधड होणे, घाम येणे, अती उत्तेजीत होणे असे वरकरणी कंट्रोल आऊट झाल्याची लक्षणे वाटु शकतात मात्र तसे नसुन तो संवेदनशील व्यक्तीचा उत्कट अनुभवाला सामोरं जातांना उत्कट प्रतिसादा चा केवळ साधा नैसर्गिक परीणाम असतो मुख्य म्हणजे तो तत्कालिक असतो. व तत्कालिक असण्यात काहीच गैर नाही नंतर अर्थातच माणुस सावरतो. मला तर कैक ओवी वाचतांना मन भरुन येतं, कैक सिनेमाचे सीन बघतांना डोळे पाणावतात , जैशीं जवळिकेंची सरोवरें, उंचबळलिया कालवती परस्परे, हा उंचबळण्याचा अनुभव तर आपल्या सर्वांनाच येतो की, तर या अशा भावांच एक नितांत सुंदर उदाहरण माऊली खालील ओवीतुन देतात, हे अष्टसात्विक भावां च सुंदर देशीकारं लेणं आहे. विश्वरुपदर्शन बघितल्यावर अर्जुनाची कशी अवस्था झाली होती ते बघा,
वार्षिये प्रथमदशे, वोहळल्या शैलांचे सर्वांग जैसे, विरुढे कोमलांकुरी तैसे, रोमांच आले. शिवतला चंद्रकरीं, सोमकांतु द्रावो धरी, तैसिया स्वेदकणिका शरीरीं, दाटलिया. माजीं सांपडलेनि अलिउळे, जळावरी कमळकळिका जेवीं आंदोळे, तेवीं आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें, बाहेरि कांपे. कर्पुरकेळीचीं गर्भपुटें, उकलतां कापुराचेनि कोंदाटे, पुलिका गळती तेवीं थेंबुटे, नेत्रेनि पडती. ऎसा सात्विकांही आठां भावं, परस्परे वर्ततसे हेवा, तेथ ब्रह्मानंदाची जीवा, राणीव फ़ावली. उदयलेनि सुधाकरें, जैसा भरलाचि समुद्र भरे, तैसा वेळोवेळां उर्मिभरें, उचंबळत असे. (अ-११ ओ-२४६ ते २५२ )
अर्थ- अंत:करणात ब्रह्मानंदाला जागृती आली, परंतु बाहेर सर्व अवयवांतले गांत्रातले बळ हरपुन गेले, आणि आपादमस्तक सर्व शरीर रोमांचित झाले. पावसाळ्याच्या पहील्या सुरुवातीच्या वर्षाव झाल्यानंतर पाझर सुटलेल्या पर्वताचे सर्व भाग कोमल तृणांकुरांनी वेढलेले दिसतात, तसे रोमांच ( रोमांचाचे दुसरे उदाहरण वादा पुरा हुआ ) अर्जुनाच्या अंगावर आले. चंद्रकिरणांच्या स्पर्शाने जसा चंद्रकांत मणी द्रवतो, तसे अर्जुनाचे शरीर घर्मबिंदुंनी (घामाने) दाटले होते.(हा चंद्रकांत/ सोमकांत /चकोर समजावुन द्या हो कोणीतरी डिटेलमध्ये ) कमलकोशात अडकलेल्या भ्रमराच्या (अलि) हालचालीने कमल कलिका जशी पाण्यावर इकडे तिकडे डोलत असते, त्याप्रमाणे अर्जुनाचे शरीर आंतरीक सुखाच्या उसळीने बाहेर कांपत होते. कापुर ज्या केळीत तयार होतो, त्या केळीची गाभ्यावरील सोपटे उकलीत असता, आत कापुर कोंदल्यामुळे प्रत्येक सोपटांतुन कापराचे कण खाली पडतात, त्याप्रमाणे अर्जुनाच्या डोळ्यांतुन आनंदाश्रु पडत होते. भरलेल्या सागराला चंद्रोदयाने जशा भरत्या येतात, तसा तो अर्जुन सुखाच्या भावनेने प्रत्येक क्षणी उचंबळून आला. याप्रमाणे आठ सात्विक भाव परस्परांशी जणू काय चढाओढ करीत त्याच्या अंगी भरले, आणि त्यामुळे अर्जुनाच्या जीवाला ब्रह्मानंदांचे साम्राज्य च प्राप्त झाले.
सच्चिदानंद बाबा हे ज्ञानेश्वरांचे लेखकु होते ज्ञानेश्वर खांबाला टेकुन सांगत असत आणि बाबा लिहुन घेत. मला एक प्रश्न पडतो बाबांच लाइव्ह ज्ञानेश्वरी ऎकतांना काय झाल असेल ? प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांच्या मुखातुन तर पुर्ण भावांसहीत ओव्या येत असतील. आता कीती पान ओली झाली असतील कीती वेळा शाइ फ़ाकली असेल बाबांची ? ज्ञानेश्वरीतच संजय कृष्णार्जुन संवाद ऎकतांना कसा उत्तेजीत होतो त्याच वरीलप्रमाणे अष्टसात्विक भावांच वर्णन आहे. तस बाबा च झाल असेल का ? कारण कीती ओव्या आहेत जिथे बाबांना उचंबळुन आलं असेल ?
॥ व्याधाहातोनि सुटला, विहंगमु जैसा ॥ ज्ञानेश्वरांचे सेल्फ़ पोर्ट्रेट !
गीतेच्या भक्तियोगाच्या अध्यायात भक्त संत कसा असतो त्याची लक्षणे अनपेक्ष: दक्ष: सर्वारंभपरित्यागी इ. येतात त्या संताच्या व्यक्तिमत्वाची चर्चा करतांना. इथे ज्ञानेश्वर स्वत:च च एक शब्दांच्या साहाय्याने नकळत सेल्फ़ पोर्ट्रेट काढतात. ही सर्व वर्णने त्यांच्या च एकंदर व्यक्तिमत्वाची आहेत जणु असे भासते.
पार्था जयाचां ठायीं, वैष्यम्याची वार्ता नाही, रिपुमित्रां दोन्ही, सरिसा पाडु । कां घरिंचिया उजियेडु करावा, पारखियां आंधारु पाडावा, हे नेणेंचि गा पांडवा, दीपु जैसा । जो खांडावया घावो घाली, कां लावणी जयाने केली, दोघां एकचि साऊली, वृक्षु दे जैसा । नातरी इक्षुदंडु, पाळितया गोडु, गाळितया कडु, नोहेंचि जेवीं । अरिमित्रीं तैसा, अर्जुना जया भावो ऎसा, मानापमानीं सरिसा, होतु जाय । तिहीं त्रुतुं समान,जैसें कां गगन, तैसा एकचि मान ,शीतोष्णी जया.। दक्षिण उत्तर मारुता, मेरु जैसा पांडुसुता, तैसा सुखदु:खप्राप्ता, मध्यस्तु जो । माधुर्ये चंद्रिका, सरीसी राया रंका, तैसा जो सकळिकां, भुतां समु । आघवियां जगा एक , सेव्य जैंसे उदक , तैसें जयाते तिन्हीं लोंक, आकांक्षिती,। जो सबाह्यसंगु, सांडोनियां लागु, एकाकीं असे आंगु, आंगी सूनी. (अ-१२ ओ-१९७ ते २०६)
हे पार्था ज्याच्या ठायी भेदभावाची वार्ताच नसते, जो शत्रु व मित्र दोघांना समानच लेखतो. अरे अर्जुना जसे घरातल्या माणसांसाठी उजेड करावा , बाहेरच्या परक्यांसाठी अंधार पाडावा हा भेद दिवा जसा जाणत नाही. जो तोडण्याकरीता कुर्हाडिचे घाव घालतो, किंवा जो परिश्रमाने पाणी इ. घालुन लावणी करतो, त्या दोघांनाही वृक्ष जसा एकाच प्रकारची सावली देतो. अथवा ऊस जसा पाणी देऊन जोपासणार्याला गोड आणि चरकांत घालुन गाळणार्याला कडु होत नाही. हे अर्जुना शत्रुमित्राच्या बाबतींत ज्याची अशी समान भावना असते आणि मान वा अपमानाला जो समान भावाने बघतो. उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ॠतु जसे आकाशासाठी सारखे च असतात त्याप्रमाणे थंड वा उष्ण इ. द्वंद्वांची किंमत ज्याच्या ठायी समान असते. दक्षिण व ऊत्तर या परस्परविरुद्ध दिशांकडुन वाहणार्या वार्याचे धक्के दोन्ही बाजुंनी बसत असता मेरु पर्वत जसा अविचल असतो, त्याप्रमाणे तो सुख वा दु:खा ची प्राप्ती झाली तरी तो अविचल असतो स्थिर (मध्यात संतुलनात ) असतो. ज्याप्रमाणे चांदणे हे राजा आणि भिकार्याला सारखेच आल्हाददायक असते, त्याप्रमाणे तो सर्व जीवमात्रांना सारखाच प्रेमळ असतो. अरे अर्जुना ज्याप्रमाणे सर्व जगाला सेवन करण्यासाठी पाणीच आवश्यक आहे, त्याप्रमाणे सर्व त्रैलोक्य ज्याची उत्कट इच्छा करतात. जो अंतरबाह्य संग टाकुन आणि असंग म्हणजे अपरिग्रहाचा संग करुन एकटाच असतो.
जयाचां ठायी पांडवा, अपेक्षे नाहीं रिगावा, सुखासि चढावा, जयाचे असणे । मोक्ष देऊनि उदार, काशी होय कीर, परी वेचे शरीर, तिये गांवी । हिमवंतु दोष खाये, परि जीविताची हानि होये. तैसे शुचित्व नोहे, सज्जनाचें । शुचि शुचि गांग होये, आणि पापतापही जाये, परि तेथें आहे, बुडणे एक । खोलिये पारु नेणिजे, तरी भक्ती न बुडिजे, रोकडाचि लाहिजे, न मरतां मोक्षु । संताचेनि अंगलगे, पापातें जिणणे गंगे, तेणे संतसंगे, शुचित्व कैसे । म्हणोनि असो जो ऎसा, शुचित्वे तीर्थां कुवासा, जेणें लंघविले दिशा, मनोमळ. । आंतु बाहेरि चोखाळु, सुर्य तैसा उजाळु, आणि तत्वार्थींचा पायाळु, देखणा जो.। व्यापक आणि उदास, जैसें कां आकाश, तैसें जयाचे मानस, सर्वत्र गा.। संसारव्यथें फ़िटला, जो नैराश्ये विनटला, व्याधाहातोनि सुटला,विहंगमु जैसा ।(अ-१२ ओ-१७२ ते १८१ )
अर्थ - हे अर्जुना ज्याच्या ठीकाणी इच्छेला प्रवेश नसतो, ज्याचे अस्तित्व म्हणजे सुखाचीच भरती होय. पवित्र काशी क्षेत्र हे जीवांना मोक्षप्राप्ती करुन देण्यासाठी उदार आहे खरे मात्र तेथे प्राण खर्च करावे लागतात. ( मृत्युनंतरच तिथे मोक्ष मिळतो ) हिमालया वर गेले असता तोहि पापाचा नाश करतो दोष निर्मुलन करतो परंतु त्या ठीकाणी मरण्याची भीती आहे. त्याप्रमाणे माझ्या पवित्र भक्ताचे पावित्र्य नाही. गंगाजल सर्वात पवित्र आहे त्यात डुबकी मारल्याने सर्व प्रकारच्या ताप व पाप यांपासुन मुक्ती होते हे खरे मात्र तेथेही बुडि मारणे आवश्यक असल्याने बुडुन मरण्याची भीती आहेच. माझ्या भक्ती ची खोली कीती अपार आहे ते समजु शकत नाही मात्र त्या ठीकाणी माझे भक्त कधीच बुडत नाही त्यांना जीव न गमवावा लागता याचि देही प्रत्यक्ष मोक्ष प्राप्त होत असतो. ज्या संतांच्या केवळ अंगाच्या स्पर्शाने , गंगा आपल्यातील पापांना जिंकु शकते, त्या अशा या संतांच्या ठिकाणी त्यांच्या संगतीने भक्ताला कीती पावित्र्य प्राप्त होत असेल बरे. म्हणुन अशा प्रकारचा तो भक्त जो आपल्या पावित्र्याने तीर्थांना आश्रय असतो आणि ज्यांनी मनातील पातकांना देशोधडीस लावलेले असते. ज्याप्रमाणे सुर्य आतबाहेर शुद्ध असतो त्याप्रमाणे तो मनाने शरीराने आत बाहेर शुद्ध असतो, आणि ब्रह्मरुपी भुमिगत धनाला पायाळू मनुष्याप्रमाणे पाहणारा असतो.हे अर्जुना जसे आकाश सर्व जगात व्यापलेले असुनही कशातच लिप्त होत नाही त्याप्रमाणे हा भक्त मन परब्रह्मस्वरुप झाल्याने व्यापक होतो आणि त्याचे मन कशातच गुंतत नाही. ज्याप्रमाणे फ़ासेपारध्याच्या तावडितुन निसटलेला पक्षी जसा निर्भय आणि आनंदित होतो, तसा हा भक्त जन्म-मरणरुपी संसाराच्या चक्रातुन व्यथेतुन निसटुन, निरीच्छेने सुशोभित झालेला असा भयमुक्त व आनंदि होतो.
काल्याचे कीर्तन - स्वत:शीच खेळे चंद्रबिंब !
तर मग असे सर्व झाल्यावर एक दिवस ज्ञानेश्वर एकटेच आपल्यातुन उठुन निघुन गेले. एक दिन सपनोका राही सपनोसे आगे यु चले जाए कहॉ सारखं, ते कसे गेले आणि या निघुन जाण्याचा परिणाम काय व कसा झाला यावर दुसरे एक महाकवी अरुण कोलटकर काय म्हणतात ते त्यांच्या या कवितेत बघु. या.
स्वच्छ निळसर रिकामे अंबर
नारद तुंबर अभ्र विरे
कधी केले होते गंधर्वांनी खळे
स्वत:शीच खेळे चंद्रबिंब
पांगले अवघ्या वैष्णवांचे भार
ओसरला ज्वर मृदंगाचा
मंदावली वीणा विसावले टाळ
परतुन गोपाळ घरी गेले
स्थिरावला हार वाळली पाकळी
गुंतली फ़ासळी निर्माल्यात.
या असामान्य , विलक्षण सुंदर अशा औदूंबरीय कुळातल्या कवितेचा एक अर्थ अत्यंत तरलतेने डॉं. दिलीप धोंडगेनी उलगडून दाखवलाय ते व्हर्जन तो अर्थ त्यांच्याच शब्दांत असा
कोलटकरांनी एका वेगळ्या वास्तवात आपली भावस्थिती जुळविली आहे. हे वास्तव आकाश ते ज्ञानदेवांचे समाधिस्थान असे व्यापक आहे. आभाळाकडे क्लोज अप नेऊन कोलटकर त्याला क्रमाने तीन विशेषणे वापरतात. स्वच्छ, निळसर,व रिकामे आणि पहिल्या कडव्याचा शेवट अभ्र विरे या क्रियेने करतात. अभ्र विरे या क्रियेला संलग्न अशी नारद व तुंबर या दोन नामांची योजना आहे. नारद व तुंबराच्या गायनाने घनगर्द झालेले वातावरण स्तवनाचे म्हणजे ज्ञानदेवांच्या स्तवनाचे विरते आहे. कधी केले होते गंधर्वांनी खळे - ह्या विधानात नकार आहे. गंधर्व व खळे यातही विरोध आहे. चंद्राला खळे पडणे हा अभ्राच्छादित आकाशाच्या पार्श्वभुमीवर संकेत आहे. ह्या संकेताला अरिष्टसुचक अर्थ असतो. पण असे कधी सुचित झाले नव्हते. चंद्रबिंब स्वत:शीच खेळत असे. ज्ञानदेवांच्या शांतशीतल व्यक्तिमत्वाचे चंद्रबिंबाशी सानिध्य आहे. ह्या चंद्रबिंबाचे स्वत:शीच खेळणे म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या मोठेच अर्थपुर्ण आहे. हे चंद्रबिंब आताही आपला पुढील साध्यात्मक खेळ एकटाच खेळेल. म्हणून आतापर्यंतचा भागवत संप्रदायातला तुम्ही- आम्हीचा खेळ संपलेला आहे. वैष्णवांची गर्दि पांगलेली आहे. टाळमृदुंगाचा घोष निनादणे बंद झाले आहे. निरोपाला आलेले गोपाळ घरी परतुन गेले आहेत. इथे कोलटकरांनी ज्ञानदेवांचे चैतन्य ज्या भागवतधर्मात खेळत होते, ज्या भागवतधर्मातल्या घटकांत संक्रमित केले होते, त्या घटकांवर केंद्रित करुन त्यांची चैतन्यशुन्यता काही विशीष्ट पण अत्यंत नेटक्या क्रियापदांद्वारा सुचित केली आहे. इतके दिवस वैष्णवांचा घोषकारक भार, झणात्कारणारी वीणा, गणगणारे टाळ हे स्वयमेव आपल्या क्रियांपासुन परावृत्त झालेले आहेत. त्यांच्यावरच हा दु:खाचा प्रसंग थेट गुदरलेला आहे; व ते सुतकी झालेले आहेत. चैतन्याने रसरसणारा हार स्थिरावुन चैतन्याचा ओघच आटल्यामुळे आता त्याची पाकळी पाकळी वाळली आहे. आणि ज्ञानदेवांचा संबंध देहच - फ़ासळी -निर्माल्यात गुंतली आहे.
एका महाकवीच्या जाण्याचं अस सुंदर वर्णन दुसरा महाकवी करतो त्याचा अर्थपुर्ण सुंदर उलगडा डॉ.धोंडगे सर करतात. आता मला अस वाटतं की हो बरोबरच आहे धोंडगे सर तुमच म्हणणं ज्ञानेश्वर चंद्रबिंब च होते यात काहीच शंका नाही, सर्व गोपाळांना सोडुन तुम्ही आम्ही चा गोड खेळ थांबवुन ते निघुन गेले स्वत:शीच खेळण्यासाठी हे ही खरयं, मात्र अजुन एक सत्य आहे सर, हे चंद्रबिंब अजुनही झरत च आहे, स.ह. देशपांडेंनी अरुण कोलटकरांच्या कवितेला "एक सीनीकल गारठा " असे संबोधले होते, तर मी म्हणतो देशपांडेंना दुर्देवाने वरील "श्रीज्ञानेश्वरसमाधीवर्णन" मधील उब जाणवलीचं नाही. तर माझ्याही गोठलेल्या संवेदनांच्या हिमार्त झालेल्या मनात असाच एक सीनीकल गारठा आहेच मात्र तरीही माझ्या मनाच्या उजाड माळरानावर हे ज्ञानेश्वरांचे चंद्रबिंब अजुनही झरतच आहे आणि कायम झरत राहील. त्यासाठी मी ही रॉबिन्सनीय शैलीत माझ्या बेटावर एक वॉर्नींग चा फ़लक टांगुन देतो. आणि उधारीत माझ्या मतलबासाठी आणखी एका महाकवी "ग्रेस" च्या ओळी सोयिस्कररीत्या वापरत त्यावर कायमच्या उमटवुन देतो.
मंद टाक पाऊले
नी शीळ घाल लिलया
चंद्रबिंब झरतसे
हिमार्त माळरानी या .!!!
प्रतिक्रिया
3 May 2025 - 10:10 am | अनन्त्_यात्री
पूर्वी ऐसी अक्षरेवर आलेला हा लेख पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे. या लेखाचा भाग १ ही इथे प्रकाशित करावा ही श्री. मारवा यांना विनंती
3 May 2025 - 1:07 pm | प्रसाद गोडबोले
निव्वळ अप्रतिम
लोकोत्तर लेखन आहे हे !!
___/\___