ऍसिड हल्ला आणि तरुण, तरुणी

अन्वय's picture
अन्वय in जनातलं, मनातलं
27 Dec 2008 - 7:32 pm

आंध्र प्रदेशमधील वरंगळ जिल्ह्यात दोन तरुणींवर ऍसिड हल्ला केला गेला. हल्ला करणारे तीन तरुण सुशिक्षित होते. त्यांनी इतक्‍या टोकाची भूमिका का घेतली? ज्या तरुणींवर हल्ला झाला, त्यांचा दोष काय, यांसारखे अनेक प्रश्‍न या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहेत. स्वप्निका आणि प्रणिता या विद्यार्थिनी वरंगळ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. दहा डिसेंबर रोजी दुचाकीवरून घरी परतत असताना, त्यांना श्रीनिवास (23), संजय (22) व हरिकृष्ण (23) या तरुणांनी गाठले आणि काही लक्षात यायच्या आत त्यांच्यावर ऍसिड हल्ला केला. यात दोघी गंभीर जखमी झाल्या. यातील स्वप्निकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर प्रणिता सुदैवाने बचावली. या घटनेचे तीव्र पडसाद आंध्र प्रदेशात उमटले. महिला संघटनांनी सरकारला धारेवर धरून आरोपींवर कारवाईची मागणी केली. राज्याचे गृहमंत्री के. जन रेड्डी हे जखमी तरुणींची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात गेले असता, महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. त्यानंतर वेगात चक्रे फिरली आणि बारा डिसेंबर रोजी तीन तरुणांना अटक करण्यात आली.

सूडाची भावना
अटकेनंतर या तिघांनाही पोलिसांनी प्रसारमाध्यमांसमोर आणले. त्या वेळी आपल्या कृत्याबद्दल या तरुणांना जराही खेद वाटत नव्हता. श्रीनिवास याने पत्रकारांना सांगितले, की मला बदला घ्यायचा होता. स्वप्निकाच्या वडिलांना मी अनेक वेळा आर्थिक मदत केली होती. गरज असेपर्यंत तिने माझा वापर केला. नंतर मात्र तिने माझ्याशी संबंध तोडून टाकले. श्रीनिवासच्या कबुलीमुळे या घटनेला प्रेमप्रकरणाची पार्श्‍वभूमी असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या सहा महिन्यांपासून श्रीनिवास स्वप्निकाला भेटण्याचा प्रयत्न करीत होता. प्रेमसंबंध पूर्ववत करण्याची मागणी करीत होता. परंतु ती त्याला वारंवार टाळत असे. एकदा तिच्या वडिलांनी श्रीनिवासविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून त्याला अटकही झाली होती. दुसऱ्या दिवशी त्याला समज देऊन जामिनावर मुक्त करण्यात आले. त्यानंतर त्याने सूड घेण्याचा निश्‍चय केला. अखेर ऍसिड हल्ला करून त्याने आपला राग शांत केला; पण अनेक प्रश्‍नही निर्माण करून ठेवले.

दोष कुणाचा?
स्वप्निकाने प्रेमात फसवणूक केल्याचे श्रीनिवासला वाटत होते. अटकेनंतर पत्रकार परिषदेत "आपल्याला बदला घ्यायचा होता,' असे त्याने सांगूनही टाकले. आपल्या इच्छेनुसार कुणी वागले नाही म्हणून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करणे, याचे समर्थन करता येणार नाही. परंतु या प्रकरणात केवळ एकट्या श्रीनिवासला दोषी ठरवून चालणार नाही. स्वप्निकाचे दुटप्पी वागणेही ऍसिड हल्ला होण्यास तितकेच कारणीभूत आहे. गरज असेपर्यंत एखाद्याचा वापर करायचा, तिच्या या वृत्तीमुळे श्रीनिवासच्या सूडभावनेला खतपाणीच घातले गेले. तिची प्रवृत्ती तिच्यासाठीच प्राणघातक ठरली, अशी भावनाही राज्यात व्यक्त होत आहे.

पोलिस लक्ष्य
श्रीनिवास, संजय व हरिकृष्ण या तरुणांना बारा डिसेंबरला पोलिसांनी अटक केली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली ऍसिडची बाटली, मोटारसायकल व इतर शस्त्रे ताब्यात घेण्यासाठी पोलिस त्यांना त्याच दिवशी मामनूर जंगलात घेऊन गेले. तिथे आरोपींनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरोपी हिंसक झाले होते. त्यामुळे पोलिसांना प्रतिकार करणे भाग पडल्याने त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात तिघे जागीच ठार झाले, असे पोलिस दलाकडून सांगण्यात आले. या कारवाईबद्दल मानवी हक्क चळवळीतील कार्यकर्त्यांनी पोलिसांना लक्ष्य केले आहे. या तिघांचा "गेम' करण्यात आला असून, पोलिसांनी थंड डोक्‍याने केलेली ही हत्या आहे, असा आरोप करण्यात आला. त्याची राज्य सरकारला तत्काळ दखल घ्यावी लागली. या तिघांना मारण्यासाठी बनावट चकमक करण्यात आली किंवा काय, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

समाधान आणि शोक
ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणींच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे. प्रणिताने, "या तिघांच्या मृत्यूने आपले अजिबात समाधान झालेले नसल्याचे सांगून त्यांच्यावर ऍसिड फेकणे हीच त्यांच्यासाठी योग्य शिक्षा ठरली असती,' असे म्हटले आहे. श्रीनिवासच्या वडिलांनी "त्याला योग्य न्याय मिळाल्याने आमच्या दृष्टीने तो अध्याय संपला आहे,' अशी प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे, संजय आणि हरिकृष्णा यांचे कुटुंबीय मात्र शोकमग्न असून, कारवाईबाबत संतापयुक्त भावना व्यक्त करीत आहेत. संजयचे आई वडील निवृत्त शिक्षक आहेत. आपला मुलगा या कृत्यात सहभागी होता, हे मान्य करण्यास ते तयार नाहीत. परंतु जर त्याने गुन्हा केलाच असेल तर त्यांना शिक्षा करण्यासाठी कायदा आहे, न्यायालय आहे; मग त्यांना पोलिसांनी गोळ्या का घातल्या? पोलिसांचाच कायद्यावरील विश्‍वास उडाला आहे काय, असा सवाल ते करतात. हरिकृष्णाचे वडील सांबय्या यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ""माझ्या मुलाने गुन्हा केला असेल तर त्याच्या विरोधात खटला चालवायला हवा होता. न्यायालयाने दिलेली दहा-वीस वर्षांची शिक्षा त्याने भोगली असती; परंतु त्याला मारणे हा काही न्याय नाही!''

समाजलेख

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

27 Dec 2008 - 9:25 pm | सखाराम_गटणे™

http://www.navprabha.com/index.php?option=com_content&view=article&id=12...

----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

श्रीयुत संतोष जोशी's picture

28 Dec 2008 - 12:16 pm | श्रीयुत संतोष जोशी

नमस्कार,
झालं ते अगदी योग्य झालं असं माझं मत आहे.
पोलिसांच्या कारवाईला माझा पूर्ण पाठिंबा आहे.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.