ढेरी पॉमपॉम
----------------------------------------------------------------------------------
माझी आई मला ना ढेरी पॉमपॉम म्हणते . असं म्हणतात का एखाद्याला ? आता आहे माझी ढेरी पॉमपॉम ! थोडीशी मोठी . थोडीशी गोलगोल .
मला नाही आवडत असं . ती ना थोडीशी खोडकर आहे . पण काय करणार ? आईसाहेब आहेत ना . हा शब्द मी कुठून घेतला ? तर - बाबा तिला बाईसाहेब असं म्हणतात .
अन गंमत सांगू ? - खरं तर बाबांची ढेरी तर जाम पॉमपॉम आहे . मग ती त्यांना असं म्हणत नाही ते . पण मी म्हणते बरं का बाबांना - ए ढेरी -ए पॉमपॉम ! पण ते ना माझ्यावर रागवत नाहीत .
पण एकदा गंमत झाली . आई त्यांनाही म्हणाली - ढेरी पॉमपॉम ! बाबा फक्त हसले . म्हणाले - असं आहे काय ? आता मी व्यायाम करतो . आणि जादू - पोट आत !
ते असं म्हणतात . करत काहीच नाहीत . मला माहितीये ना . पण एक गोष्ट आहे . आई त्यांना असं म्हणाली , ते मला नाही आवडलं .
पण देवाला सगळं कळतं . दुसऱ्यांना त्रास दिला की तो ... बरोबर शिक्षा करतो !
आणि मला असं लक्षात आलं की आईची ढेरीपण पॉमपॉम झाली आहे . पण मी काही बोलले नाही . आणि बापरे ! ती ढेरी पॉमपॉम झाली आणि आणि - ती पॉम पॉम पॉम झाली !
तेव्हा मला राहवलं नाही . मी चिडवलं तिला तसं . तेव्हा ती हसली . तिने मला जवळ घेतलं . माझा पा घेतला .मला असं आवडतं , बरं का ? मग काय म्हणाली ती, माहितीये ?
म्हणाली - आता आपल्याकडे एक नवीन बाळ येणार आहे . तुझ्याशी खेळायला .
अच्छा ! अस्सं होतं . आईच्या पोटात बाळोबा बसले होते . आणि म्हणून तिची ढेरी पॉम झाली होती तर . हे मला नवीनच कळलं .
मला तर एकदम मज्जा वाटली . खूप आनंद झाला . मग मी पळत बाहेर गेले . मला काय करावं तेच कळेना . मग मी गोलगोल फिरले . उड्या मारल्या . मग दमले, तेव्हा एका जागी बसले . छान छान कविता म्हणल्या .
मग मी विचारात पडले . मला त्या बाळाशी खेळावं लागणार . पण ते काही लगेच खेळणार नाही . मग आधी त्याला गाणीबिणी म्हणून दाखवावी लागणार . त्याच्याशी बोबडं बोबडं बोलावं लागणार .
पण काय झालं माहितीये ? माझ्या मनात आणखी एक विचार आला - त्या नवीन बाळाची ढेरी पॉमपॉम असली तर ? ...
हुय्या ! माझ्या जोडीला आणखी एक ढेरी पॉमपॉम !
--------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
11 Apr 2025 - 7:28 pm | अनन्त्_यात्री
आवडली.
12 Apr 2025 - 8:09 am | माहितगार
कथा लोभस आणि अप्रतिम झाली आहे.
हिच कथा जेमिनी एआयला देऊन जेमिनी एआय काय बदल देऊ शकते हे पाहिले जेमिनीने दोन व्हर्शन्स दिल्या
१
लहानगी राधा:
राधा, नाकात छोटीशी नथ, केसात मोगऱ्याचा गजरा, आणि रंगीबेरंगी फ्रॉक घालून अंगणात खेळत होती. तिचे गोल मटार डोळे आणि खळी पडलेले गाल खूपच गोंडस दिसत होते.
"आई, बघ ना बाबांची ढेरी किती गोलू मोलू आहे!" राधा हसत म्हणाली.
राधाचे बाबा, विनायकराव, धोतर आणि सदरा घालून पेपर वाचत बसले होते. तिला हसून म्हणाले, "अगं, माझी ढेरी नाही, माझं पोट आहे."
राधाची आई, जानकी, नऊवारी साडी नेसून स्वयंपाकघरात काम करत होती. ती हसत म्हणाली, "विनायकराव, तुमची ढेरी गोलू मोलूच आहे."
राधाला नवीन बाळ येणार आहे, हे ऐकून खूप आनंद झाला. ती म्हणाली, "आई, मला एक छोटी बहीण हवी आहे, जिची ढेरी माझ्यासारखी गोलू मोलू असेल."
२
माझी आई मला ना 'गोलू मोलू' म्हणते. असं म्हणतात का एखाद्याला? आता आहे माझी गोलू मोलू! थोडीशी मोठी. थोडीशी गोलगोल. मला नाही आवडत असं. ती ना थोडीशी खोडकर आहे. पण काय करणार? आईसाहेब आहेत ना. हा शब्द मी कुठून घेतला? तर - बाबा तिला 'राणीसाहेब' असं म्हणतात.
अन गंमत सांगू? - खरं तर बाबांची ढेरी तर जाम गोलू मोलू आहे. मग ती त्यांना असं म्हणत नाही ते. पण मी म्हणते बरं का बाबांना - ए ढेरी -ए गोलू मोलू! पण ते ना माझ्यावर रागवत नाहीत.
पण एकदा गंमत झाली. आई त्यांनाही म्हणाली - ढेरी गोलू मोलू! बाबा फक्त हसले. म्हणाले - असं आहे काय? आता मी व्यायाम करतो. आणि जादू - पोट आत! ते असं म्हणतात. करत काहीच नाहीत. मला माहितीये ना. पण एक गोष्ट आहे. आई त्यांना असं म्हणाली, ते मला नाही आवडलं.
पण देवाला सगळं कळतं. दुसऱ्यांना त्रास दिला की तो... बरोबर शिक्षा करतो! आणि मला असं लक्षात आलं की आईची ढेरीपण गोलू मोलू झाली आहे. पण मी काही बोलले नाही. आणि बापरे! ती ढेरी गोलू मोलू झाली आणि आणि - ती गोलू मोलू मोलू झाली!
तेव्हा मला राहवलं नाही. मी चिडवलं तिला तसं. तेव्हा ती हसली. तिने मला जवळ घेतलं. माझा मुका घेतला. मला असं आवडतं, बरं का? मग काय म्हणाली ती, माहितीये?
म्हणाली - आता आपल्याकडे एक नवीन बाळ येणार आहे. तुझ्याशी खेळायला.
अच्छा! अस्सं होतं. आईच्या पोटात बाळोबा बसले होते. आणि म्हणून तिची ढेरी गोलू मोलू झाली होती तर. हे मला नवीनच कळलं.
मला तर एकदम मज्जा वाटली. खूप आनंद झाला. मग मी पळत बाहेर गेले. मला काय करावं तेच कळेना. मग मी गोलगोल फिरले. उड्या मारल्या. मग दमले, तेव्हा एका जागी बसले. छान छान कविता म्हणल्या.
मग मी विचारात पडले. मला त्या बाळाशी खेळावं लागणार. पण ते काही लगेच खेळणार नाही. मग आधी त्याला गाणीबिणी म्हणून दाखवावी लागणार. त्याच्याशी बोबडं बोबडं बोलावं लागणार.
पण काय झालं माहितीये? माझ्या मनात आणखी एक विचार आला - त्या नवीन बाळाची ढेरी गोलू मोलू असली तर? ...
हुय्या! माझ्या जोडीला आणखी एक गोलू मोलू!
जेमिनीच्या पुर्नलेखनाला काही झाले यरी बिपीन सुरेश सांगळे यांच्या मूळ लेखनासारखा फिल येत नाही. ढेरी पॉमपॉम मधला फिल नुसतेच गोलूमोलू शब्दाला येत नाही. म्हणजे अजून तरी कृत्रिम लेखन नैसर्गिक लेखनाची बरोबरी करू शकत नाही. या प्रतिसादातील जेमिनी पुर्नलेखनाचे प्रताधिकार सुद्धा श्री बिपीन सुरेश सांगळे यांचे स्वाधिन करत आहे.
12 Apr 2025 - 8:42 am | माहितगार
ढेरी पॉमपॉम बडबड गीत प्रेर्ना अर्थातच बिपीन सुरेश सांगळेंच्या उपरोक्त कथेची
12 Apr 2025 - 2:00 pm | विजुभाऊ
ही कथा बालकथा या ऐवजी "बाळ" होण्याची कथा म्हणता येईल
12 Apr 2025 - 4:28 pm | माहितगार
भावंड होण्याची कथाय हो, बाळ होण्याची कथा आई-बाबांची असते, बहीण भावांची असते ती भावंड होण्याची कथा !!
12 Apr 2025 - 8:13 pm | कंजूस
लहानांचं मन बरोबर पकडलंय. शीर्षकही आवडेल असं नाद असलेलं.
14 Apr 2025 - 11:40 am | बिपीन सुरेश सांगळे
मुलांच्या गोष्टीला इतका प्रतिसाद . आनंद आहे मंडळी
खूप आभार
पण ज्यांच्याकडे बच्चे कंपनी आहे , त्यांना ही गोष्ट ऐकायला मिळावी ही अपेक्षा
मोठ्या मंडळींना पुन्हा धन्यवाद
14 Apr 2025 - 11:44 am | बिपीन सुरेश सांगळे
सर्व वाचक मंडळींचे खूप आभार
विशेषतः
माहितगार
खूप छान , मजा वाटली .
तुम्ही घेतलेल्या ए आय गंमतीसाठी आणि दीर्घ प्रतिसादासाठी . तसेच नोंदवलेल्या निरीक्षणांसाठी सलाम .
15 Apr 2025 - 7:47 am | माहितगार
__/\__