शिवसृष्टी पुणे

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
6 Mar 2025 - 7:27 am

महाशिवरात्रीच्या दिवशी मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे त्यांना कुठे तरी नेऊन आणावं असा विचार आला. कात्रज रोडला असलेल्या शिवसृष्टीची आठवण झाली आणि तिथे जायचं ठरवलं.

i1

i2

छान अनुभव होता.

समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया शिवसृष्टी

अशी काहीशी त्यांची टॅग लाइन आहे आणि ती त्यांनी सार्थ केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून उभी राहिलेली ही शिवसृष्टी त्यांच्या लौकिकाला साजेशी झाली आहे. त्याचा आत्ताशी कुठे पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, उर्वरित भागाचं काम अजुन काही वर्ष चालेल.

i3

आत्ता अशात लल्लनटॉप या युट्युब चॅनलवर एका भारतीय इतिहासावर भरपूर संशोधन केलेल्या एका ब्रिटिश अभ्यासकाची मुलाखत पाहिली. ( लिंक )

इतिहासात रुची असणाऱ्या कोणीही आवर्जुन बघावी अशी हि मुलाखत होती. त्यात शेवटी त्यांनी भारतात इतिहासाकडे किती दुर्लक्ष केलं जातं, इतका प्राचीन आणि समृद्ध वारसा आपल्याकडे असुन त्याची किती वाईट अवस्था आहे, आपली संग्रहालये कशी देखरेखीविणा धुळ खात पडलेली असतात अशा गोष्टींवर खंत व्यक्त केली आहे.

त्याला अपवाद ठरावी अशी ही शिवसृष्टी झालेली आहे. तिच्या नावात त्यांनी सृष्टी हा शब्द जो वापरलाय तो फार समर्पक आहे. कारण इथे म्युझियम किंवा संग्रहालय म्हटलं की जो निर्जीव इतिहास समोर येतो तसं नाही तर शिवरायांचा इतिहास जिवंत करून दाखवण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे.

i४

बहुतांश ठिकाणी संग्रहालयामध्ये केवळ ऐतिहासिक काळातल्या अनेक वस्तु जसेकी शस्त्रास्त्रे, अवजारे, भांडी, झेंडे, दागिने, काही महत्वाच्या व्यक्तींच्या वैयक्तिक वापरातील वस्तु असतात, चित्रे किंवा छायाचित्रे असतात आणि माहितीचे फलक लावलेले असतात. सहसा आपण सुरुवातीला उत्सुकतेने काही फलक वाचतो आणि हळुहळु उत्साह ओसरत जातो आणि उर्वरित भागात पटापट नजर फिरवुन लोक निघतात. कारण फक्त माहितीचा भडीमार केला कि तोचतोचपणा यायला लागतो.

हे लक्षात घेऊन विकसित देशांमध्ये जी संग्रहालये आहेत तिथे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऐतिहासिक गोष्टींच्या सोबतीला आकर्षक देखावे, दृक्श्राव्य माध्यमातले खेळ, ऑडिओ गाईड असे प्रयोग केलेले असतात. भेट देण्यास आलेल्या लोकांमध्ये कुतूहल कसं जागृत ठेवता येईल, बाहेर पडेपर्यंत त्यांना कसं उत्साही ठेवता येईल यासाठी प्रयत्न केलेले असतात. संग्रहालयामध्ये काही विभाग कायमचे आणि काही जागेत वेगवेगळ्या विषयांवर (उदा. व्हिक्टोरिया कालखंड, नेपोलियन कालखंड ई.) विशेष मेहनत घेऊन मर्यादित कालावधीसाठी प्रदर्शन ठेवतात जेणेकरून आधी येऊन गेलेल्या लोकांनाही परत यावंसं वाटावं.

आपल्याकडची बहुतांश संग्रहालये सरकारच्या अखत्यारीत असल्याने लोक आले काय गेले काय फरक पडत नसल्यासारखं व्यवस्थापन असतं. त्यामुळेच खाजगी प्रयत्नातून शिवसृष्टीसारखे प्रकल्प उभे राहायला हवेत आणि त्याला लोकांचा पाठिंबा मिळायला हवा.

तुम्ही आजवर इथे भेट दिली नसेल तर तुम्हाला कल्पना यावी म्हणुन तिथे काय काय आहे याची सविस्तर माहिती देतोय:

संग्रहालय:

शस्त्रास्त्रे: पारंपरिक संग्रहालयाप्रमाणे इथेही एक विभाग शिवकालीन शस्त्रास्त्रांचा आहे.

रणांगण: शिवरायांच्या आयुष्यात त्यांनी सामना केलेल्या बहुतांश शत्रूंची चित्रे उपलब्ध आहेत. त्यांचा एक विभाग आहे.

i5

i6

या दोन्ही विभागात शिवसृष्टीचे मार्गदर्शक सविस्तर माहिती देतात. आपणच आपल्या चार वस्तु बघुन पुढे सरका असा प्रकार नाही. सर्व शस्त्रांची माहिती, ते कसे बनवतात, कुठल्या प्रकारचे योद्धे / सैनिक कुठल्या प्रसंगात वापरत असत याची माहिती सांगतात. सर्व शत्रूंच्या चित्रासमोर त्यांची माहिती थोडक्यात सांगतात.

दृक्श्राव्य खेळ:

जाणता राजा
"जाणता राजा" हे समर्थ रामदासांनी केलेल्या शिवरायांच्या वर्णनाचा एक भाग आहे. याच नावाचं बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं एक नाटक माझ्या लहानपणी महाराष्ट्रभर गाजलं होतं. खरेखुरे हत्ती घोडे, अस्सल वाटणारे किल्ले आणि दरबाराचे मोठाले सेट्स, मोठ्या संख्येत दाखवलेल्या सैनिकांमुळे खऱ्या वाटणाऱ्या लढाया अशा भव्य नेपथ्य आणि आयोजनामुळे नेहमीपेक्षा अतिशय वेगळा अनुभव देणारं हे नाटक होतं. त्यामुळे याला महानाट्य म्हणायचे. मला आठवतंय याचा एक दौरा छत्रपती संभाजीनगरला तेव्हा आला होता आणि काही दिवस सलग तिथे खेळ होते, आणि प्रचंड प्रतिसाद होता. मी रोज बाबांच्या मागे लागायचो पण त्याची तिकिटे आम्हाला मिळाली नाहीत.

तर या नाटकाच्या काही संपादित केलेल्या महत्वाच्या प्रसंगांची एक क्लिप सध्या इथे दाखवली जाते. शिवसृष्टीच्या पुढच्या टप्प्यात या नाटकासाठी कायमस्वरूपी नाट्यगृहाची व्यवस्था असणार आहे, आणि तिथे त्याचे नियमितपणे प्रयोग केले जातील. हे सुरु होईल तेव्हा लहानपणी हुकलेली हि संधी साधण्याचा प्रयत्न मी नक्की करेन.

i7

i9

सिंहासनाधिश्वर
शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला तेव्हा एक इंग्रज अधिकारी उपस्थित होता हे सर्वांना माहित आहे. तो शिवरायांना भरलेल्या दरबारात मुजरा असलेलं चित्र सुप्रसिद्ध आहे. तर या अधिकाऱ्याने त्या सोहळ्यात पाहिलेल्या गोष्टी आणि शिवरायांच्या आजूबाजूला असलेली राजचिन्हे याचं सविस्तर वर्णन लिहुन ठेवलं होतं. (आपल्याकडे अशा सविस्तर नोंदी करण्याची सवय फार आधी लागायला पाहिजे होती. अनेक ऐतिहासिक वादविवादांना कारण राहिलं नसतं.)

या वर्णनात आलेल्या वस्तु, छत्र चामरे, राजदंड, राजमुद्रा, शिवकालीन नाणी अशा गोष्टी इथे ठेवल्या आहेत आणि समोर या डायरीचे अभिवाचन एका स्क्रीनवर दाखवले जाते. राज्याभिषेकाच्या वेळेसचे रायगडावरचे वातावरण आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.

i10

श्रीमंत योगी
इथे शिवरायांच्या एका आज्ञापत्राच्या आधारे शिवरायांची स्वराज्य स्थापन करण्यामागे काय दृष्टी होती, काय स्वप्न होतं, त्यांनी कोणती मूल्ये जोपासण्याचा प्रयत्न केला हे स्वतः शिवरायांच्या मुखातुन ऐकायला मिळतं. शिवरायांचा एक पुतळा, रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या आधारे हालचाली करतो, बोलतो आणि आपल्याशी संवाद साधतो. त्यांच्या वेळेसची परिस्थिती आणि त्यांनी केलेल्या संकल्पाची माहिती देतो. शिवराय आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो.

i12

आग्र्याहुन सुटका
शिवरायांची आग्र्याहुन सुटका हा त्यांच्या आयुष्यातला प्रचंड महत्वाचा आणि परिचित असलेला प्रसंग. मिर्झा राजा जयसिंग याने त्यांना आग्र्यात जायला भाग पाडलं होतं आणि त्यांच्या सुरक्षेची आणि पाहुणचाराची जबाबदारी त्याचा मुलगा रामसिंग याकडे होती. तर या पितापुत्रांच्या चाकरीत असलेल्या एक कारकुनाने शिवराय आग्र्यात असताना परिस्थिती कशी बदलत गेली, कसं राजकारण घडत गेलं हे लिहुन ठेवलेलं आहे. तर त्याचा एक पुतळा समोर मध्यभागी आहे, एका बाजूला आग्र्याच्या दरबाराचा देखावा आहे, तिथे औरंगजेबाच्या लोकांचं राजकारण दिसतं आणि दुसरीकडे शिवरायांच्या आग्र्यातील निवासस्थानाचा देखावा आहे आणि तिथे घडणाऱ्या घडामोडी या सर्वांचं वर्णन त्या कारकुनाकडून ऐकायला मिळतं.

या रोचक प्रकरणाचे तपशील आपल्याला रंजक पद्धतीने समजतात.

i13

रायगड सफारी (5D)
स्वराज्याची राजधानी रायगड हा भव्य असा किल्ला आहे. यावरचे मुळ महाल, कार्यालय, बाजारपेठ आता अस्तित्वात नसले तरी यांचे अवशेष इतर किल्ल्यांच्या तुलनेत बऱ्याच चांगल्या परिस्थितीत आहेत आणि त्यावरून किल्ल्यावरच्या त्याकाळच्या परिस्थितीची कल्पना येते. मी नुकताच रायगडावर जाऊन आलो आणि याआधीही २-३ वेळा गेलोय त्यामुळे तिथली दृश्य माझ्या डोळ्यासमोर होतीच.

ज्यांनी रायगड आजवर पाहिलेला नाही त्यांनाही तो जवळुन पाहिल्याचा अनुभव हा 5D शो देतो. तुम्ही इतर ठिकाणी असे 5D/6D/10D प्रकार पाहिले असतील तर तुम्हाला अंदाज असेलच. रायगडचं ड्रोन ने घेतलेलं चित्रीकरण, त्यावर ऍनिमेशनच्या साहाय्याने आता जिथे फक्त अवशेष आहेत तिथे प्रत्यक्षात कशा वास्तु असतील याची कल्पना केलेलं चित्रण (आता आलेल्या छावा चित्रपटातही या प्रकारचं चित्रण आहे) दिसतं. तिथली सर्व व्यवस्था समजते.

अशा दोन्ही प्रकारे चित्रण असल्यामुळे मला हा शो आवडला. फक्त माझ्या मते हा फक्त ३D चालला असता. युद्धप्रसंग नसल्यामुळे उगाच खुर्च्या पुढे मागे हलवुन बळजबरी ५D केला असं वाटलं. शिवसृष्टीमधे खटकलेली केवळ हीच एक गोष्ट.

दुर्गवैभव

मला प्रचंड आवडलेला हा विभाग. काही प्रमुख किल्ल्यांच्या मोठ्या आकारातल्या प्रतिकृती इथे बघायला मिळतात. पण इथेही त्याला सुंदर कल्पनांची जोड दिली आहे. प्रत्येक किल्ल्याच्या मागे पडद्यावर काही दृश्य दिसतात, तिथले गाईड किल्ल्याची माहिती सांगतात, आणि माहिती आणि दृश्याच्या अनुषंगाने किल्ल्याच्या प्रतिकृतीच्या त्या त्या भागात विशेष प्रकाशझोत टाकुन तो अधोरेखित केला जातो. किल्ल्याची माहिती फार नव्या आणि उद्बोधक पद्धतीने आपल्याला समजते.

i14

i15

पन्हाळगड - विशाळगड हे जवळ असलेले किल्ले, तिथला सिद्दी जौहरचा वेढा आणि एका पावनखिंडीतली ती शौर्यगाथा इतक्या चांगल्या प्रकारे कधीच समजली नव्हती. पावनखिंड या सिनेमात सुद्धा नाही. इथे उभ्या केलेल्या प्रतिकृती, विशिष्ट प्रकारे सांगितलेली माहिती, त्याला पूरक अशी प्रकाश योजना, हलत्या सावल्यांमुळे महाराजांचं पथक नेमकं कुठून कुठे गेलं, त्यांची आणि सिद्दीच्या सैन्याची गाठ कुठे कुठे पडली, बाजीप्रभू आणि बांदल सेनेने त्यांना कुठे थोपवून धरलं हा सगळा घटनाक्रम फार फार स्पष्टपणे समजतो.

i16

स्वराज्याच्या इतिहासात भूगोलाला, सह्याद्रीला, गनिमी काव्याला इतकं महत्व का आहे, हे इथे येऊन समजतं. माझ्या मते तरी या बाकी सर्व सुंदर विभाग तर आहेतच, पण या एका विभागासाठी सर्वांनी आवर्जून यावं.

दुसऱ्या टप्प्यातले काही सुरु झालेले विभाग
आतापर्यंत सांगितलेले सर्व विभाग शिवसृष्टीच्या एकाच इमारतीत होते. तिचं नाव "सरकार वाडा" असं ठेवलं आहे. दुसरीकडे अद्याप बांधकाम चालु आहे. परंतु त्यातील काही विभाग नुकतेच सुरु झाले होते आणि भवानी मंदिराची प्राणप्रतिष्ठा तर अगदी आम्ही जायच्या दोन दिवस आधी झाली होती. त्यामुळे सुदैवाने हे भाग आम्हाला पाहता आले.

शिवरायांची अस्सल चित्रे
एका भव्य दालनात शिवरायांच्या समकालीन कलावंतांनी काढलेली त्यांची चित्रे मोठ्या आकारात लावलेली आहेत. शिवरायांनी इतर राजांप्रमाणे स्वतः कधी चित्रकाराला बोलवून स्वतः त्याच्यासमोर बसुन चित्र काढलं नाही. तेवढा निवांत वेळ त्यांच्या दगदगीच्या आयुष्यात मिळाला नसेल आणि त्यांच्या लेखी याला प्राधान्यही नसेल. आपल्या नशिबाने इतर लोकांनी वर्णनाप्रमाणे काढलेल्या चित्रांमुळे आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन होतं.

i17

चित्रांसोबत इथे त्यांनी स्वतः लढलेल्या लढायांची माहिती आहे.

या दालनाच्या मध्यभागी शिवसृष्टीची संपूर्ण संकल्पना दाखवणारं एक मॉडेल आहे. शिवसृष्टीचे लोक इथे पूर्ण संकल्पना आणि पुढे येऊ घातलेले विभाग यांची माहिती देतात.

i19

गंगासागर तलाव
रायगडावर असलेल्या गंगासागर तलावाची प्रतिकृती. इथे वेगवेगळ्या नद्या आणि किल्ल्यांवरचं पाणी आणुन टाकलेलं आहे.

i20

प्रतापगड सारखं भवानी मंदिर
आपण जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा देतो त्याचं कारण भोसले कुळाची आणि पर्यायाने स्वराज्याची कुलदेवता होती तुळजापूरची भवानी माता. शिवरायांच्या कालखंडात तुळजापुर आदिलशाही भागात असल्याने त्यांना तिथे जाण्यावर मर्यादा येत असाव्यात. त्यामुळे शिवरायांनी प्रतापगडावर भवानी मंदिर बांधलं होतं.

i21

त्या मंदिराची हि प्रतिकृती आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे हे फक्त देखाव्याचं मंदिर नाही. इथे पद्धतशीर प्राणप्रतिष्ठा पूजा करून मूर्ती बसवलेली आहे, त्यामुळे आपल्याला भवानीच्या मंदिरात जाऊन दर्शनाचा आनंद मिळतो.

i22

स्वराज्य स्वधर्म आणि स्वभाषा
शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलंच, पण स्वधर्म म्हणजे हिंदू/ सनातन धर्माला पुन्हा सन्मान मिळवून दिला. काही शतकांच्या अंतराने एक अभिषिक्त हिंदु राजा आपल्याला मिळाला. नेतोजी पालकर यांना पुन्हा हिंदु धर्मात घेऊन एक क्रांतिकारी पाऊल उचललं.

आणखी एक दुर्लक्षित योगदान म्हणजे त्यांची स्वभाषा मराठी यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न. शिवजयंतीला फेसबुकवर मी एक पोस्ट पाहिली होती त्यात दोन पत्रांची तुलना होती. एक शिवरायांच्या कारकिर्दी आधीचं जे मराठीत असुनही आपल्याला अजिबात कळत नाही कारण त्यात अर्धेअधिक शब्द आणि वाक्यरचना फारसी आहे. दुसरं शिवरायांच्या राज्याभिषेकानंतरचं. यातलं मराठी जुनं असलं तरी थोडा अर्थ लागू शकतो.

"न होता शिवाजी तो सुन्नत होती सबकी" हे एक प्रसिद्ध वाक्य आहे. त्याजोडीला "नसते छत्रपती शिवाजी तर नसती भाषा मराठी" असंही म्हणायला हरकत नाही. कदाचित मी फारसी ब्लॉगर झालो असतो.

i23

तर स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा यासाठीचं शिवरायांचं योगदान एका अनोख्या प्रयोगात आपल्याला बघायला मिळतं. एरवी नाटकात वेगळे सेट जरी असले तरी प्रेक्षक एकाच जागी स्थिर असतात आणि सेट फिरवतात. इथे आपण मध्यभागी प्रेक्षागृहात बसतो आणि संपूर्ण प्रेक्षागृह गोल फिरतं आणि वेगवेगळ्या स्क्रीन्स वर अगदी अस्सल वाटणारे देखावे आपल्याला बघायला मिळतात. इथल्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आशिया खंडातील हा असा एकमेव प्रयोग आहे.

मॅप लोकेशन

तिकीट: मोठ्यांसाठी (१६ वर्षे आणि वर) ६०० रु.
वय ५ ते १६: ३०० रु.
त्याखालील मुलांना तिकीट नाही.
संकेतस्थळ - तिकिटे बुक माय शोवरही उपलब्ध आहेत, पण ते अतिरिक्त शुल्कही आकारतात, त्यामुळे इथे येऊन काढलेलं बरं.

वेळ: सकाळी ९.३० ते ६
वर सांगितलेल्या सर्व गोष्टी बघायला जवळपास ४ तास लागतात. त्यामुळे तशा तयारीने यावे.

खाण्यापिण्याची सोय:
तिथे २-४ ठिकाणी वॉटर कुलर आहेत, त्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
एक छोटे उपहारगृह आहे तिथे काही मोजके पदार्थ मिळु शकतील.

i24

सर्व परिसर आणि वॉशरूम मधली स्वच्छता चांगली आहे.

आवाहन

इतका छान प्रकल्प आपल्याकडे सुरु होऊनही त्याला प्रतिसाद मोठ्या संख्येने दिसत नाही. आम्ही गेलो तो शाळेच्या सुटीचा दिवस असुनही काहीच गर्दी नव्हती. आम्ही सोडुन इतर १०-१५ लोक होते.

ह्याची खंत तिथल्या कर्मचाऱ्यांच्या बोलण्यातूनही व्यक्त झाली. बोलता बोलता त्या म्हणाल्या आमच्या इथे दुसऱ्या गावातुन, दुसऱ्या राज्यातून आलेले लोकसुद्धा येऊन गेले पण पुणेकर मात्र काही येत नाहीत.

तेव्हा पुणेकरांनो, सर्वांना विनम्र आवाहन. शिवरायांची कारकीर्द सुरु झालेलं ठिकाण म्हणजे पुणे. त्यांची जडणघडण इथल्या लालमहालात झाली. आपल्या इतक्या जवळ असा भव्य प्रकल्प असताना आपला प्रतिसाद उदंड असला पाहिजे, तर असे काम करणाऱ्यांना बळ मिळतं, तो इतिहास ती प्रेरणा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते. त्यामुळे नक्की वेळ काढुन इथे भेट द्या. मुलांनाही घेऊन जा.

पूर्ण होईल तेव्हा बघु असा विचार करू नका. आताच ४ तास सहज जातील एवढ्या गोष्टी आहेत. याचे पुढचे टप्पे सुरु होईल तेव्हा वेळही जास्त लागेल, तिकीट दरही वाढेल, तेव्हा नवीन गोष्टी पाहण्यासाठी परत या. आपल्या इतिहासासाठी आपल्या वारशासाठी आपणच सढळहस्ते हातभार लावला पाहिजे.

आणि इतर ठिकाणी राहणाऱ्या शिवप्रेमींनो, तुम्हीही पुण्यात याल तेव्हा शिवसृष्टीसाठी वेळ राखुन ठेवा. सुट्ट्यांमध्ये त्यासाठी खास पुण्यात या. लालमहाल, शनिवारवाडा, मंदिरे, सिंहगड आणि इतर किल्ले आणि याव्यतिरिक्त वेळ घालवायला पुण्यात बरीच आकर्षणे आहेत. त्यामुळे एक हेरिटेज ट्रिप पुण्यात होऊन जाऊ देत.

जय भवानी जय शिवराय

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

6 Mar 2025 - 11:37 am | धर्मराजमुटके

छान ओळख. एका चांगल्या उपक्रमाची ओळख करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद !
लवकर भेट देण्याचा प्रयत्न करतो.

Bhakti's picture

6 Mar 2025 - 12:38 pm | Bhakti

आम्ही दीड वर्षांपूर्वी गेलो होतो,दिवाळीत.तेव्हा नुकतेच सुरू झाले होते,पहिलाच टप्पा पूर्ण झाला होता.मला खुपच आवडले.मी परत जाणार आहे.

वर सांगितलेल्या सर्व गोष्टी बघायला जवळपास ४ तास लागतात. त्यामुळे तशा तयारीने यावे.

हे आम्हाला तेव्हा माहिती नव्हते,व उपहारगृह सुरू झाले नव्हते.त्यामुळे मुलं थोडी चुळबुळ करीत होती पण माहिती इतकी छान मिळत होती की हे पूर्ण पाहूनच जाऊ म्हणाली ;)

स्वधर्म's picture

6 Mar 2025 - 6:48 pm | स्वधर्म

धन्यवाद, आपण चांगली ओळख मोठी मेहनत घेऊन करून दिलीत.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Mar 2025 - 9:29 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद! आवडले.

संग्राम's picture

7 Mar 2025 - 1:28 pm | संग्राम

खूप छान माहिती मिळाली ...

कंजूस's picture

7 Mar 2025 - 7:05 pm | कंजूस

सुंदर. आहे.
चित्रे सुस्पष्ट आली आहेत.
पुतळे पाहण्यासाठी सहाशे रुपये फारच वाटतात. ( चरित्र वाचून महाराज अधिक समजतात. ) म्हणून गर्दी नसेल. तिकिट शंभर/पन्नास ठेवल्यास खूप जण येतील आणि खर्च लवकर वसूल होईल. उपहारगृहात पाटी लावावी लागणार नाही.

बरेचदा तुम्ही अगदी नावाला जागता हो :)

काकांशी सहमत आहे. इतिहास जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तिकीट कमी असणे आवश्यक आहे. ते जमणार नसेल तर महिन्यातून एक दिवस स्थानिक लोकांना फुकट किंवा माफक दरात प्रवेश द्यावा. दुसरा मार्ग म्हणजे एखादा कॉर्पोरेट किंवा श्रीमंत स्पॉन्सर मिळाला तर त्याच्या नावाने एक दिवस स्पॉन्सर करायचा, त्यावेळी कमी दरात किंवा फुकट प्रवेश देता येईल. त्या मार्गाने तिकीट परवडणारे आणि न परवडणारे या दोघांनाही इतिहास समजून घेता येईल.

माथेरानमधले शिवसंग्रहालय

माथेरानला बरेच पर्यटक येतात आणि शार्लोट लेकला जातात. तिथे वाटेवरच एक लहानसे शिवसंग्रहालय (शिवसृष्टी ) उभारले आहे. तिकीट फक्त दहा रुपये आहे. माथेरानच्या पन्नास रुपयांच्या प्रवेशात कितीतरी करमणूक आहेच त्यात हा एक लाभ. काही पुस्तके विकण्यासाठी ठेवली तर तीही पर्यटक घेतील.

https://youtu.be/DIYR3xDY0R8?si=Nhko1tgcd5BEN9RQ
(१४:००)

सर, लेख वाचल्याबद्दल धन्यवाद. पण फक्त पुतळे पाहण्यासाठी ५००-६०० रुपये खूप होतात हे वाचुन तुम्ही लेख आणि विभागवार माहिती पूर्ण वाचली का अशी शंका आली. 

पूर्ण वाचला असेल किंवा जाऊन आला असाल आणि तरी तुमचं असं मत असेल तर तुमच्या मताचा मी आदर करतो. मी असहमत आहे, आणि त्यामुळे प्रकल्पाच्या बाजूने काही मुद्दे मांडतो: 

इथे फक्त जाऊन काही मिनिटात पुतळे शस्त्रे बघुन बाहेर निघण्याचा प्रकार नाही, त्याव्यतिरिक्त किती गोष्टींवर मेहनत घेतलेली आहे, नवीन प्रयोग आहेत, त्यासाठी एवढी सचित्र माहिती लिहिली आहे. अर्थात फक्त फोटोमधुन पूर्ण अंदाज येत नाही आणि सगळ्याचे अथ: ते इति व्हिडीओ काढुन टाकले तर तिथे जायचे प्रयॊजन राहत नाही. 

तुम्ही दिलेला माथेरानचा व्हिडीओ पाहिला, आणि त्याठिकाणी १० रुपये तिकीट असलेल्या संग्रहालयाचा भाग पाहिला. त्यात आणि शिवसृष्टीत जमीन अस्मानचा फरक आहे. प्रकल्पाचा आकार, आवाका, विस्तार सर्वच शिवसृष्टीमधे फार मोठे आहे. 

माथेरानसारखे संग्रहालय सुद्धा असावेत पण सर्व तसेच आणि तेवढ्याच तिकिटात असावेत असं नाही. एक स्थायी वस्तूंचे संग्रहालय केवळ साफसफाई आणि लाईट्स एवढ्या मोजक्या गोष्टींवर चालु शकते. त्यावर नवा खर्च नसतो. 

शिवसृष्टीत प्रत्येक विभागाचे वेगळे विशिष्ट हेतूने बनवलेले प्रेक्षागृह आहे. वेगवेगळ्या तंत्राने बनवलेल्या चित्रफिती आहेत. गुंतवणुक प्रचंड आहे. आणि त्याला प्रतिसाद मिळत राहिला तरच आणखी गुंतवणूक आणि आणखी मोठे प्रयोग इथे आणि इतरत्र होऊ शकतील. 

तुमचे चरित्र वाचुन महाराज आणखी समजतात हे मत योग्यच आहे. मी स्वतः बखरी आणि संदर्भग्रंथ वाचले नसले तरी चरित्रात्मक ऐतिहासिक कादंबऱ्या आवडीने वाचल्या आहेत.

पण ऐतिहासिक साधने वाचणाऱ्यांपेक्षा कादंबऱ्या वाचणाऱ्यांची संख्या जास्त, कादंबऱ्या वाचणाऱ्यांपेक्षा मालिका चित्रपट बघणाऱ्यांची संख्या जास्त.. असेच असते. आणि अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतिहास पोहोचवण्यासाठी अशा प्रयोगांची गरज असते. 

हि चरित्रे कित्येक वर्षांपासुन बाजारात आहेत, तरीही छावा चित्रपट आल्यावर आम्हाला संभाजी महाराजांची एवढी माहितीच नव्हती असे म्हणणारे भरपूर लोक आहेत. 
छावा वरून आठवलं.. छावा आणि पुष्पा २ या चित्रपटांचा फक्त महाराष्ट्रातला गल्ला २५० कोटींच्या वर असल्याचं वाचलं. म्हणजेच महागडी तिकिटे घेण्यासाठी खर्च करणारे लोक आपल्याकडे आहेत. :-) पण हाच गल्ला छत्रपती संभाजी महाराजांवर दोन मराठी चित्रपट येऊन गेले त्यांना जमला नाही. 

मराठी लोकांनी मराठीत बनवलेला चित्रपट चालला नाही, हिंदी लोकांना हिंदीत घेऊन केला तेव्हा मराठी कलाकार मिळाला नाही का अशी टीका झाली पण चालला तोच. म्हणजे दुसऱ्यांनी येऊन आपल्याला आपला इतिहास दाखवला कि मग आपण प्रतिसाद देतो. 

तान्हाजी हा चित्रपट चालला नसता तर छावावर एवढी गुंतवणूक हिंदी मध्ये आली असती का? या दोन्ही चित्रपटांची निर्मितीमूल्ये मराठीपेक्षा सरस आहेत हे खरंच. शेवटी निर्मितीमूल्ये वाढवलं तर अपेक्षा वाढते आणि प्रतिसाद मिळाला तर आणखी गुंतवणूक येते. 

त्यामुळे मला वाटतं आपल्या लोकांनी असे महत्वाकांक्षी प्रकल्प केले कि आपण त्याला उचलुन धरलं पाहिजे. 

आणखी एक उदाहरण आनंदनगरी आणि इमॅजिका सारख्या थीम अम्युझमेंट पार्कचं. शहरात येणाऱ्या आनंदनगरीमधले खेळ स्वस्त असतात, त्याच प्रकारचे खेळ आणखी मोठ्या प्रमाणावर, आणखी रोमांचक पद्धतीने इमॅजिका मध्ये असतात तिथे तिकीट जास्त असतं. दोन्हीकडे भरपुर प्रतिसाद असतो. 

आणखी एक मुद्दा म्हणजे फुकट किंवा स्वस्तात मिळालेल्या गोष्टींची किंमत कमी होते. कमी तिकीट असले तर सगळे विभाग पाहुयात, प्रत्येक फलक वाचूयात अशी इच्छा होत नाही. पण तेच जास्त तिकीट असेल तर आपल्याला तिकिटात मिळणारं सगळं वसुल करायचंय, सगळे खेळ बघायचे आहेत असं वाटतं. 

त्यामुळे मला वाटतं सर्व प्रकारच्या गोष्टींची स्पेस आहे. आपला इतिहास फक्त सरकारी अनुदानावर, सरकारी संस्थांवर अवलंबुन नसला पाहिजे. त्याला जिवंत रोमांचक आकर्षक पद्धतीने पुढे पोहोचवण्यासाठी आपण पदरमोड केली पाहिजे. 

मुद्देसूद प्रतिसाद आवडला आणि पटला

विस्तृत प्रतिसाद आणि उत्तर आवडले आहे.
पण शेवटी बजेटचा प्रश्न येतोच.
आज दहा लोकांनी सहाशे रुपये देऊन प्रवेश घेतला तर आवक झाली सहा हजार रुपये. पन्नास/शंभर रुपये देऊन शंभर प्रेक्षक आले तर आठ दहा हजारांचा गल्ला जमा होईल ना? हा माझा मुद्दा आहे.

वाचनालयात इतिहासावर बरीच पुस्तके असतात. ती चाळून आवडलेली विकत घेऊन संग्रही ठेवू शकतो. त्यासाठी सिनेमाचं पाहायला हवा असं नसतं. विविध घटनांवरही पुस्तके असतात. त्यावर वेगवेगळ्या लेखकांची वाचली पाहिजेत. केवळ आपल्याला आवडलेलाच इतिहासाचा आपल्या आवडत्या लेखकाने लिहिलेला भाग वाचून काय होणार? पानिपतचे युद्ध किंवा तिथे झालेल्या तीन लढाया, १८५७ चा उठाव यावरही शाळेत चार ओळीत माहिती घेतली. सावरकरांचे ही पुस्तकं वाचले. पण William Darlymple याचेही the Last Mughal वाचले पाहिजे. पानिपतावर मिपाकर मनो यांनीही वेगळी माहिती त्यांच्या पुस्तकात दिली आहे.
इतिहासाचे वाचन सैन्यदळालाही करावे लागते अभ्यासम्हणून. लढाईतील शस्त्रे, बळ, वाहतूक, सैन्याची तयारी आणि क्षमता,व्यूहरचना, इतर राजांची मदत, वातावरण यांचा अभ्यास. राज्याला शत्रू असतात तसे राजाला आंतरिक शत्रूही असतात तेसुद्धा लढाईचा निकाल फिरवतात. हे सर्व पुतळे पाहून कळणार नाही.
मुलांच्यामध्ये इतिहासाची गोडी निर्माण करणे, अभ्यासुपणा वाढवणे इकडे लक्ष द्यायला हवे.

चौथा कोनाडा's picture

14 Mar 2025 - 2:22 pm | चौथा कोनाडा

अपला मुद्दा लक्षात आला...

माझ्या मते अश्या ठिकाणी जास्त पर्यटक / शिवभक्त यावेत म्हणून नक्कीच प्रवेशदर कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
हाच प्रयत्न शिवसृष्टी वाल्यांनी ही केला असेल अशी आशा करतो.

सुरूवातीला तर कमी ठेवायलाच लागतात नाही तर पर्यटक फिरकत नाहीत आणि प्रकल्प बंद पडतात !

चौथा कोनाडा's picture

10 Mar 2025 - 7:30 pm | चौथा कोनाडा

छान माहितीपुर्ण ट्रॅव्हलॉग व्हिडिओ !
धन्यवाद, | कंजूस जी |

चौथा कोनाडा's picture

7 Mar 2025 - 8:20 pm | चौथा कोनाडा

नितांत सुंदर स्थळ दर्शन वृत्तांत....
...... प्रचि तर सुंदर आहेतच....
.............पण लेखनही अतिशय सुंदर !

कोणालाही या शिवसृष्टीला भेट द्यायची असेल तर हा धागा बघावाच लागेल.
धन्यवाद आकाश खोत !
असेच लेखन येत राहू देत

जुइ's picture

7 Mar 2025 - 10:11 pm | जुइ

धन्यवाद या ठिकाणाची ओळख करुन दिल्याबद्दल. अवश्य जावू येथे.

अतिशय सुंदर ठिकाण आहे. तिथे इतकं काही असेल आणि इतका वेळ लागेल असं माहित नव्हतं. आम्ही बंद व्हायला दीड तास शिल्लक असताना गेलो होतो. तरी वेळ संपल्यावर सुद्धा तिथल्या लोकांनी आम्हाला आणखी दीड तास सगळं व्यवस्थित दाखवून सांगितलं. काही exhibits अगदी अमेरिकेतल्या थीम पार्क मध्ये असतात तशा होत्या. निर्मितीमूल्ये उच्च आहेत. तिथले माहिती देणारे लोक व्यवस्थित युनिफॉर्म मध्ये असतात आणि त्यांना चांगली माहिती आहे. अतिशय प्रोफेशनल पद्धतीने सर्व दाखवले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुण्यात असूनसुद्धा तिथले माहिती देणारे व्यवस्थित मराठी बोलत होते! इथे जायचं तर चार तास (आणि मध्ये खायचं वगैरे असेल तर त्याचा आणखी वेळ) धरून जायला हवे.
ज्यांना आवड आहे, किंवा मुलांना काही वेगळं, माहितीप्रद, स्फूर्तिदायक दाखवायचं आहे त्यांना सहाशे रुपयांना सुद्धा नक्कीच worthwhile आहे. जनरल पब्लिकच्या दृष्टीने सिनेमा नाटकाच्या तिकिटाच्या दरा इतके competitive तिकीट ठेवले तर जास्त लोक येतील.

आकाश खोत's picture

10 Mar 2025 - 2:32 pm | आकाश खोत

सर्व वाचकांचे आभार. प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार.
ज्यांनी वाचुन जायचं ठरवलं त्यांचे पुन्हा आभार. तुम्ही जायचं ठरवलंत त्यात या लेखाचा उद्देश सफल झाला. :-)

प्रसाद गोडबोले's picture

26 Mar 2025 - 1:43 pm | प्रसाद गोडबोले

६०० रुपये.

थॅन्क्स बट नो. थॅन्क्स.