मॉल मधली थोडीफार खरेदी संपल्यानंतर बाहेर पडताना मोबाईल वाजला बघितला बघितला तर बबनचा फोन. घाईत होतो, त्यामुळे प्रश्न पडला फोन घ्यावा की नाही. पण मग घेतला फोन. उत्तरलो " मार्केट मध्ये शॉपिंगच्या गडबडीत आहे. घरी गेल्यावर फोन करतो "
बबन म्हणजे माझा जुना दोस्त. गेल्या अनेक वर्षाचा सहवास. आमचं बोलणं सुरू झालं की खूप वेळ चालायचं.. म्हणजे एक तासाच्या वरच. वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चा रंगायच्या.
शॉपिंग आटोपून घरी गेल्यावर त्याला फोन केला.
बबन : अरे... काय, कुठे आहेस तू ?
बबनचं असंच आहे. उलटतपासणी केल्यासारखा प्रश्न विचारतो.
मी : अरे, कुठे म्हणजे काय इथेच आहे. बोल काय म्हणतोयस ?
बबन : राव, खूप दिवसात कुठं भटकायला गेलो नाही ... जायचं का या रविवारी ?
मी : जाऊ या की, या रविवारी तसा विशेष कार्यक्रम नाही माझा.
बबन : मस्तच ... ठिकाण ठरवूयात... शरद सुद्धा येतोय का ते बघतो.
पुन्हा दोन दिवसांनी बबनचा फोन.
बबन : शरद येणारेय म्हणतोय ... बनेश्वरला जाऊया का ?
मी : येस्स .. नो प्रॉब्लेम ! मस्त ठिकाण आहे. मी माझे मित्र रूपकांत आणि विनोदला विचारतो.. मस्त ग्रुप होईल. मजा येईल आऊटिंगला.
शरद काळगावे हा बबनचा मित्र. एक दोन वेळा भेटीचा योग आला होता, समवयस्क आणि कलारसिक असलेल्या शरदशी लगेच मैत्री झाली.
तर रूपकांत मोकाशी अन विनोद भोईर हे माझे मित्र .. एका मित्र वर्तुळात दोघांची भेट झाली.. माझ्या पेक्षा ६-८ वर्षांनी लहान, अनेकदा घरी येणे जाणे झाले. मस्त ग्रुप झाला तिघांचा ! त्यांनीही यायची तयारी दाखवली.. मात्र सकाळी लवकर जाऊन जेवणाच्या आत परत येऊ असं त्यांचं म्हणणं,
शनिवारी सकाळी परत बबनचा फोन:
बबन : मी उद्या सकाळी ८ वाजता घरातून निघेन. आधी शरदला पिकअप करतो.. मग जाता जाता तुला.
मी: अरे मला कशाला पीक अप करतो ... उलटं पडेल तुला .. त्यापेक्षा मीच शिवाजी नगर किंवा स्वारगेटला पोहोचतो.. तुलाही त्रास नई अन वेळही वाचेल आपला,
बबन : अर्रर्रर्र ... ते तू सातारा रोडवरचं नसरापूर जवळचं बनेश्वर समजला की काय ? मी तळेगाव दाभाडे तले बनेश्वर मंदिर म्हणत होतो !
मी (स्वगत) : मी नीट ऐकलं नव्हतं की बबनेच नीट सांगितलं नव्हतं ? असो .. हे बनेश्वर तर हे ! ( उघडपणे) अच्छा ….. तू ते बनेश्वर म्हणतोय का .. चालेल की .. जाऊ या !
या बनेश्वर मंदिराची माहिती चार आठ वेळा ऐकलेली पण इथं जाण्याचा योग आजवर आला नव्हता.
हे पहायचं राहिलेलं मंदिर बघता येणार याचा मला आनंद झाला.
प्लान फिक्स झाला. "आपल्याला तळेगाव दाभाडेंच्या बनेश्वरला जायचंय" याची रूपकांत-विनोदला कल्पना दिली. त्यांच्या वेळेत अगदी फिट बसणारे असल्याने त्यांनी आनंदानी होकार भरला. बबन आणि मी जुन्या मुं पु महामार्गाने अमरजा देवी मंदिराच्याच पुढे रोहित वडेवाले इथं पोहोचायचं. तिकडून डांगे चौक - रावेत मार्गे रूपकांत अन विनोद तिथं पोहोचणार. पाचही जण मस्त वडापाव चेपणार, चाय कटिंग मारणार आणि तिथून ९:३० च्या आत निघायचं.. १० च्या आततळेगावात बनेश्वर मंदिराला पोहोचायचं. १० ते दु १२:३० मंदिर भेट अन भटकंती.. नंतर जमल्यास एकत्र भोजन अन परत.
रविवारी सकाळी सकाळी सात वाजता बबनचा फोन :
बबन : अर्र यार .. एक गोची झालीय .. सकाळी सकाळी ८ वा शेजारच्या वहिनींना हॉस्पिटलला नेऊन आणायचं.
मी : अरे बाप रे .. आजचं आऊटिंग रद्द करायला लागणार की काय ?
बबन : तसं आम्ही १०-१०:३० वाजे पर्यंत परत येऊ ही... मग त्या नंतर जावं लागेल.
मी : चालेल .. पण रूपकांत अन विनोद त्यांना तर लवकर परतायचंय ... त्यामुळं ८ वाजता निघतील ही ते.
बबन : बरं... तू बघ ते कसं मॅनेज करायचं ते.
रूपकांत मोकाशीला फोन करून कल्पना दिली ... म्हटलं आम्हाला बनेश्वरला पोहोचायला बारा तरी होतील. तुम्ही निघा.
तुम्ही परतताना आम्ही बहुधा पोहोचूच.
बबन पिक-अप करे पर्यंत काहीतरी टाईमपास करणं आलं. बाहेर जायचं ही काही काम नव्हतं.. मग वाचत असलेलं पुस्तक पुढं वाचायला घेतलं.
साडे दहा वाजायच्या आधी निघत असल्याचा बबनचा फोन. ११ वा.
आल्यावर तो एकटाच. मी विचारलं "शरद नाही आला ?"
"त्याचं रद्द झालं" बबन उत्तरला.
मला पिकअप करून निघालो.
अमरजा देवीला हॉल्ट घेतला, ५ मिनिटात देवीचं दर्शन आटोपलं..
साडेअकराला रोहित वडेवाले गाठले .. गरमगरम वडापाव अन फर्मास चहा ... आहाहा !
हे चेपता चेपता रूपकांतचा फोन आला "कुठं पर्यंत पोहोचलात ?" आम्ही निघतोय आता. कामामुळे लवकर पोहोचावे लागेल"
मी म्हणालो : ठिकाय .. या वेळी भेटीचा योग चुकणार, असो. पुन्हा भेटू .
त्यांची भेट हुकलीच.
आता दोघेच उरलो, मी अन बबन.
१५ - २० मिनिटांत बनेश्वर मंदिर प्रवेशाला थडकलो.
बनेश्वर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताना हे अर्धस्तंभ दिसले. हे वीरगळ असावेत अथवा समाधी असावी.
प्रवेश करतानाच बनेश्वर मंदिराचे मुख्य शिवालय दृष्टीस पडले.
मूळ बनेश्वर मंदिर यादवकालीन असल्याचे सांगण्यात येते. सुमारे ३०० वर्षांपूर्वी या वास्तूचा जीर्णोद्धार सरदार खंडेराव दाभाडे यांनी केला. ते शिवशंकराचे भक्त असल्यामुळे त्यांनी अनेक शिव मंदिरे उभारली. त्यातीलच हे एक मंदिर.
बनेश्वर मंदिरात भाविक दर्शनासाठी ये-जा करत होते.
मंदिर नुकतेच दगडी (गडद करड्या) रंगात रंगवलेलं दिसले.
शिवालयाची पांढऱ्या रंगात रंगवलेली छताची नक्षिदार किनार लक्ष वेधून घेत होती.
गर्भगृहात प्रवेश करून बनेश्वर शिवपिंडीचे दर्शन घेतले. सकाळची पूजा झाल्याने शिवपिंडावर सुंदर पुष्प सजावट होती, वातावरण प्रसन्न होते. आतला सुखद गारवा तिथंच रेंगाळायचा आग्रह करत होता. तिथं तीन चार शिवभक्त ध्यानस्थ होऊन " ओम नमः शिवाय" चा धीरगंभीर आवाजात जप करत होते. मंदिराच्या या जुन्या पाषाण वास्तूत ध्वनी घुमत असल्याने वातावरण भारून गेले होते. आम्हीही बसकण मारली अन “ओम नमः शिवाय" चा जप केला. एका वेगळ्या अनुभूतीचा अद्भुत अनुभव घेऊन बाहेर पडलो.
शिवालयाला अर्धप्रदक्षिणा मारताना मागील गर्द झाडीने धरलेली सुंदर सावली सुखद अनुभव देत होती.
समोरच नंदी मंडप .. याचं दर्शन आधीच घेतलं होतं.
पाषाणातील चार खांबांवरील हा मंडप म्हणजे सूंदर आहे. येथील नंदीही सुंदर आहे.
समोरच शिवालयाच्या बरोबर समोर ही सुंदर पुष्करणी दृष्टीस पडली.
पुष्करणीत उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या आहेत. बांधकामही रेखीव आहे.
या पुष्करणीतील पाणी उपशासाठी मोट बांधलेली मोट लक्ष वेधून घेणारी आहे.
या जलाशयाचे पाणी शेती व पिण्यासाठी वापरले जात होते.
दुसऱ्या बाजूने दृष्टीस पडणारी मोट
मोटेची आणखी काही कोनातून काढलेली प्रचि
हे मोटेच्या कमानीतून काढलेलं प्रचि
मोटेच्या कमानीतूनच टिपलेली छबी, मॉडेल अर्थातच अर्थात बबन
बनेश्वर शिवालय, नंदी मंडप मागील गर्द झाडीत सरसेनापती सरदार खंडेराव दाभाडे यांची समाधी आहे.
परिसरात भरपूर वृक्षराजी अर्थानं बन आहे हे या प्रचि पाहून कल्पना येते.
या बना वरूनच बनेश्वर हे नाव मिळाले.
शिवालयाच्या शेजारीच, डाव्या हाताला झाडांच्या गर्द सावलीत सरसेनापती सरदार खंडेराव दाभाडे यांचे समाधी स्थळ आहे. याचा लाल रंग हिरव्या पार्शवभूमीवर उठून दिसत होता.
झाडीतील पक्षांचा किलबिलाट सुखद वाटत होता.
समाधीची डागडुजी करण्याचे काम सुरु होते त्यामुळं आजूबाजूस बांधकाम साहित्य ठेवले होते.
हे गाव मराठा साम्राज्यातील पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून इनामात मिळाले. त्यामुळेच या गावाला ‘तळेगाव दाभाडे’, असे नाव पडले आहे.
सरदार येसाजी दाभाडे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक होते. दाभाडे घराणे अत्यंत प्रामाणिक छत्रपतींचे निष्ठावंत सेवक म्हणून प्रसिद्ध होते. छत्रपतींच्या मर्जीनुसार हे घराणे सेनापती पदापर्यंत पोहोचले होते. सरदार येसाजी दाभाडे यांचे ज्येष्ठ सुपुत्र सरदार खंडेराव दाभाडे हे महापराक्रमी, शूर लढवैय्ये त्यांचे होते
पायऱ्या चढून देवळीत जाऊन स्वराज्याच्या या थोर शिलेदाराच्याच्या समाधीवर माथा टेकवला.
सरदार खंडेराव दाभाडे यांचा जन्म इ. स. १६६५ मध्ये मावळातील तळेगाव दाभाडे इथं झाला होता.
१७०५ ते १७१६ पर्यंत सरदार खंडेराव दाभाडे यांनी बडोद्यात मराठा साम्राज्याच्या सैन्याचे नेतृत्व केले. ते सातारा येथे परतल्यानंतर इ.स. १७१७ मध्ये शिवाजी महाराजांचे नातू शाहूजी यांनी त्यांना सरदार सेनापती (किंवा सरसेनापती, ड्यूक ) ही वंशपरंपरागत पदवी बहाल केली. त्याच बरोबर खंडेरावास सेनापतिपद देऊन चाकण आणि पारनेर येथे दोन मोठ्या जहागिऱ्या दिल्या.
मराठा साम्राज्याचे सरसेनापती सरदार खंडेराव दाभाडे यांचा पराक्रम :
दिल्लीच्या बादशहाने दक्खनचे सुभेदार सय्यद बंधूंमधील हुसेनअली याच्या विरोधात छत्रपती शाहू महाराजांकडे मदत मागितली त्यावेळी शाहू महाराजांनी ही जबाबदारी खंडेराव दाभाडे यांच्याकडे सोपवली त्यानुसार खंडेराव यांनी खानदेश आणि गुजरातवर स्वाऱ्या करून हुसेनअलीचा रस्ता अडवून धरला. हुसेनअली ने खंडेराव यांच्यावर फौज पाठवली असता खंडेराव यांनी आपल्या सैन्यासहित हुसेनअलीच्या सैन्यास एका ठिकाणी गाठून कापून काढले.
या लढाईत बचावलेल्या हुसेनअलीने एक दोन वर्षानंतर पुन्हा आपले सैन्य तयार करून खंडेराव यांच्यावर चाल करून आला त्यावेळी खंडेराव यांनी निंबाळकर आणि सोमवंशी या सरदारांच्या मदतीने हुसेनअलीचा कायमचा बंदोबस्त केला.
सय्यद बंधूंचा हस्तक असलेल्या अमलअली आणि निजाम यांच्यामध्ये १७२० साली बाळापूर येथे लढाई झाली त्यावेळी सय्यदांनी छत्रपती शाहू महाराजांकडे मदत मागितली त्यावेळी सुद्धा खंडेराव दाभाडे या मोहिमेवर गेले होते. १७२५ व १७२६ या वर्षांदरम्यान कर्नाटक येथे झालेल्या स्वारीत फत्तेसिंग भोसले यांच्यासहित खंडेराव दाभाडे सहभागी झाले होते.
मराठा सरदारांमध्ये कार्यक्षेत्राची वाटणी झाली त्यात खानदेशात बागलाण आणि गुजरातचा सुभा सेनापती दाभाडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. खंडेराव दाभाडे यांनी भिल्ल , कोळी या नव्या वन्य जातीची दोस्ती संपादन करून सैन्याचे संघटन केले.१७१९ मध्ये सुरतेवर स्वारी करून मोगली फौजांचा पराभव केला. सोनगड येथे कायमचे ठाणे स्थापन केले .तेथून पुढे हळूहळू दाभाडे यांनी गुजरात वर चौथाई आणि खंडणी लागू केली. खंडेराव दाभाडे यांनी गुजरात वर अनेक वेळा स्वाऱ्या करून एवढ्या खंडण्या वसूल केल्या की गुजरातमधील मोगलांची सत्ता खिळखिळी होऊन मोडकळीस आली.
खंडेराव दाभाडे यांनी आपल्या पराक्रमाने वसई ते सुरत हा कोकणातील प्रदेश काबीज केला होता. एका पत्रात खंडेराव यांच्याबद्दल शाहू महाराजांनी 'बडे सरदार मातब्बर, कामकरी हुशार होते' असा उल्लेख केला आहे.
खंडेराव दाभाडे यांनी आपल्या पराक्रमाने मराठा साम्राज्याच्या वाढीत मोलाचा हातभार लावल्याने छत्रपती शाहू महाराजांच्या अत्यंत जवळच्या माणसांमध्ये त्यांची गणना होत असे. खंडेराव दाभाडे एकदा आजारी असताना स्वतः शाहू महाराज त्यांना भेटण्यास गेले होते असे सांगितले जाते.
सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे १७२९ साली वृद्धापकाळाने निधन झाले.
सामाजिक / उल्लेखनीय :
वेदशास्त्रांच्या अभ्यासासाठी संस्कृत पाठशाळांना शिष्यवृत्ती म्हणून सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या मृत्युपत्रातील तरतुदीनुसार दक्षणा निधी मिळायचा यातून पुण्यात "संस्कृत पाठशाळा" उद्यास आली.
संस्कृत सह उच्च महाविद्यालयीन शिक्षण देता यावे म्हणून या पाठशाळेचा इ.स. १८५१ मध्ये विस्तार करून याचे नाव पुना कॉलेज असे ठेवण्यात आले.
पुढं सर कर्सेटजी जमशेटजी जिजिभाय यांच्या कडून भरघोस अशी एक लक्ष रुपयांची देणगी मिळाल्या नंतर १८६४ मध्ये याचं नाव डेक्कन कॉलेज असे करण्यात आले. संस्थेनं येरवडा इथं ११० एकर जागा घेऊन गॉथिक वास्तुशैलीतील सुंदर इमारत (सध्याची) बांधली. अल्पावधीत डेक्कन कॉलेज विश्वविख्यात झाले.
आज मितीस डेक्कन कॉलेज हे जगातील महत्वाचे कॉलेज गणले जाते.
सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या शौर्याला मुजरा करत अभिवादन करत समाधीला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली.
समाधी मंदिराच्या जोत्यावर चारही बाजुंनी रामायण, महाभारत आणि समकालीन ऐतिहासिक प्रसंग कोरलेले आहेत. त्यानुसार सुंदर प्रतिकं कोरली आहेत. असेच प्रसंग छतपट्टीवर ही कोरलेले आहेत.
सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे समाधी स्थळ:
मंदिर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे समाधी स्थळ आहे.
समाधी स्थळाच्या जवळचा माहिती देणारा फलक, जवळून.
माहिती फलकावरील मजकूर :
भारत वर्षातील प्रथम महिला सरसेनापती म्हणून सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे यांचे नाव अग्रगण्य घेतले जाते. इ. स १७३० मध्ये परकीयांचे सदैव भक्ष्य ठरलेल्या गुजरातेत खंडेराव दाभाडे यांनी मराठ्यांचा अंमल बसवला. इ.स.१७३२ मध्ये खान- ए - खान जोरावर खान बाबी याने गुजरातीत दहशत माजवली होती. स्वराज्यावर आलेल्या संकट निवारणासाठी उमाबाईंनी शस्त्र उचलले. जोरावर बाबीचे गुजरातीत जाऊन पराभव केला. एका स्त्रीचे पार्थ पराक्रम केला म्हणून साताऱ्यात खास दरबार भरून छत्रपती शाहू महाराजांनी सोन्याचे तोडे, रत्नजडित तलवार व वस्त्रे देऊन प्रथमतः एका महिलेचा सेनापती म्हणून गौरव केला.
वीरगती प्राप्त झाली मार्ग शु. ४ चार शके १६७५ बुधवार २८ नोव्हेंबर १७५३
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यांचे नेतृत्व :
सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे इ.स. १७२९ मध्ये तळेगाव दाभाडे येथे निधन झाले.
पतीच्या निधनाचे दुःख असले तरी मुलगे लहान असल्याने वतनाची जबाबदारी उमाबाईंनी अंगावर घेतली व समर्थपणे सांभाळली. केवळ दफ्तरी कामकाजच त्यांनी बघितले नाही तर सेनेचे अधिपत्य म्हणजे नेतृत्व केले.
आणि या कालावधीत घराण्याची धुरा खंडेराव दाभाडे आणि उमाबाई दाभाडे यांचे पुत्र त्र्यंबकराव दाभाडे यांनी सांभाळली. त्रिंबकराव दाभाडे हे नेमून दिलेल्या कामगिरीपासून थोडे निराळेपणाने वागू लागले, त्यांचा निजामास जाऊन मिळण्याचा विचार होता, त्यामुळे थोरल्या बाजीरावांना त्रिंबकरावांशी लढाई करणे भाग पडले त्यात त्रिंबकराव मारले गेला. ही डभईची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाली.
अहमदाबादच्या लढाईत उमाबाई दाभाडे स्वतः हत्यारबंद होऊन हत्तीवर बसून त्या लढाईत सहभागी झाल्या; मोठा पराक्रम केला. त्यांचा पराक्रम, वीरवृत्ती, स्त्री असूनही अंगी असणारे शौर्य बघून शाहू महाराज अतिशय प्रसन्न झाले व त्यांनी इ.स. १७३२ मध्ये सेनापतीपद व सेना सरखेल हे विशेष अधिकार त्यांना दिले. पहिल्या आणि एकमेव महिला होत्या.
उल्लेखनीय इ.स. १७१० मध्ये उमाबाईंनी नाशिकजवळ असलेल्या वणीच्या डोंगरा वरील सप्तशृंगी देवीच्या मंदिरावर पोहोचण्यासाठी डोंगरावर ४७० पायऱ्या बांधल्या
स्वराज्याच्या या शूर लढवैय्या स्त्री सेनापतीला अभिवादन करून मनोमन पावन झालो.
याच परिसरात दाभाडे राजघराण्यातील अनेक शूरवीरांच्या समाध्या आहेत. पण देखभाल अथवा दुरुस्ती केलेली नाही, त्यावर फलक नाहीत... यांची नावे सुद्धा विस्मरणात जातील...
आजूबाजूस गवत, रान माजले आहे.. त्यामुळं सहसा तिकडं कुणी जातही नाही.
मंदिर परिसर, पुष्करणीला प्रदक्षिणा मारत काही प्रचि टिपले.
पार्श्वभूमी मंदिराची, ऐट बबनची
बबनने आमची स्व-छबी टिपली.
चौथा कोनाडा शायनिंग ... मोटेच्या कमानीत टिपलेली छबी
इथं उभं राहिल्यावर लै मस्त, गार गार वाटत होतं ... फुल्ल नॅच्युरल एसी !
वाईड अँगलने टिपलेलं मंदिर आणि पुष्करणी
आता दुपारचे अडीच वाजून गेले होते. . सकाळी हाणलेला वडा पाव कुठल्याकुठे लुप्त झाला होता. पोटातले कावळे “मिसळपाव, मिसळपाव, मिपा मिपा” असं कोकलायला लागले होते.
मी आणि बबन अर्थात मिपाकर बबन तांबे, आम्हा दोघांचा एक द्विपक्षीय मिपा कट्टा फर्मास झाला होता.
बनेश्वर मंदिर (तळेगाव दाभाडे) भटकंती दिवस कायम लक्षात राहील असा गेला होता.
(पहिली दोन प्रचि आंजा वरून साभार, फक्त संदर्भासाठी. ऐतिहासिक माहिती आंजावरून साभार )
प्रतिक्रिया
29 Jan 2025 - 11:55 pm | अमरेंद्र बाहुबली
लेख आवडला!
31 Jan 2025 - 7:29 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, अमरेंद्र बाहुबली _/\_
30 Jan 2025 - 6:01 am | कर्नलतपस्वी
सहसा स्थानिक प्रेक्षणीय जागा बघितल्या जात नाहीत आणी बघितल्यावर कळते आपण काय मिस केले.
नसरापुर माझे अजोड आहे त्यामुळेच तेथील बनेश्वर.मंदिराचा कोपरा कोपरा माहीत आहे. हे मंदिर सुद्धा तसेच वाटते.
भटकंती आवडली.
31 Jan 2025 - 7:33 pm | चौथा कोनाडा
अगदी खरंय .. काखेत कळसा अन गावाला वळसा अशी अवस्था असते.
अॅण्ड येस .. आजोळ असल्यावर अजोड असणारच !
नसरापुर बनेश्वरचं बन अणि परिसर या बनेश्वर पेक्षा जास्त निसर्गरम्य आहे.
धन्यवाद, कर्नलतपस्वी !
30 Jan 2025 - 9:47 am | सोत्रि
भटकंती आवडली.
- (भटक्या) सोकाजी
31 Jan 2025 - 7:33 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद सोकाजी.
30 Jan 2025 - 10:48 am | सुमो
BMTD22 हा फोटो दिसत नाहीये. लिंक मधे 729 या आकड्याने घुसखोरी केलेली दिसते. 🙂
2 Feb 2025 - 8:27 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, सुमो.
त्रुटी लक्षात आणुन दिल्याबद्द्ल थॅन्क्यु !
30 Jan 2025 - 10:18 pm | चित्रगुप्त
छान झाली भटकंती. लेख आणि फोटो मस्त. आता तब्येत बरी झालेली दिसतेय. शुभेच्छा.
2 Feb 2025 - 8:29 pm | चौथा कोनाडा
हो, तब्येत बरीय आता.
मनःपुर्वक धन्यवाद, चित्रगुप्त जी _/\_
30 Jan 2025 - 10:41 pm | कपिलमुनी
याच फेरीत गावातील प्रसिद्ध पाच पांडव मंदीर, ब्राह्मण डोह, केदारेश्वर मंदिर पाहता आले असते.
या वास्तू पण प्राचीन आहेत.
शिवाय नवीन बांधलेले पार्श्व प्रज्ञालग हे सुंदर शिल्पकला असलेले जैन मंदीर पाहता आले असते
2 Feb 2025 - 8:35 pm | चौथा कोनाडा
पुढच्या वेळाच्या फेरीसाठी ही ठिकाणं हेरून ठेवलीत.
नक्की पाहिन.
या सुंदर सुचवणी साठी धन्यवाद कपिलमुनी.
पार्श्व प्रज्ञालय आणि शंखेश्वर जैन मंदिर हे दोन्ही पाहिलंय !
या दोन्ही ठिकाणी वेळेत पोहोचले तर रास्त दरात भोजन आणि नाश्त्याची सोय होते. इथली स्वच्छता आणि पाळली जाणारी शिस्त वाखाणण्याजोगी असते.
(अशीच सोय नारायणी मंदिर (हे बहुधा मारवाडी / माहेश्वरी लोकांचे आहे) लोणावळा इथे ही आहे, रहायची सोय देखील आहे)
विथ फॅमिली भेट द्यायला उत्तम ठिकाण !
धन्यवाद !
31 Jan 2025 - 8:29 am | प्रचेतस
तुम्ही फार कमी लिहिता अशी आमची प्रेमळ तक्रार आहे.
भटकंतीसारख्या वर्णनात्मक लेखालाही तुम्ही संवाद, छायाचित्रे, इतिहास इत्यादी विविध अंगांद्वारे सजीव करून सोडलं आहे.
31 Jan 2025 - 8:51 am | कर्नलतपस्वी
कुंचले जास्त चालतात, लेखणी कमी...
चौको भौ ,झोपलेल्या द्रौपदीचे मंदिर बघीतले का?
31 Jan 2025 - 9:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही फार कमी लिहिता अशी आमची प्रेमळ तक्रार आहे.
+१सहमत.
-दिलीप बिरुटे
4 Feb 2025 - 8:25 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, प्रचेतस, कर्नलतपस्वी आणि प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.
अनेक उचापती एकाच वेळी करत असल्यानं सगळंच थोडंथोडं आहे.
जॅक ऑफ मेनी ट्रेड्स ... हा .... हा .... हा .... !
31 Jan 2025 - 10:23 am | बिपीन सुरेश सांगळे
चौको
मस्त !
लेख , लेखन , फोटो सगळं आवडलं .
आणि विशेष आभार
जुन्या आठवणी जाग्या केल्या .
या गावात मी लहान असताना वर्षभर राहिलो आहे . माझ्या त्या आठवणी - रंगीत चित्रं - या लेखात मांडल्या आहेत
तेव्हा हे गाव लहान . हे मंदिर गावाबाहेर . गावाच्या टोकाला काका राहायचे . आम्ही लहान मुलं त्यांच्याकडे जायचो . त्यांचीही मुलं लहान . त्यांच्या घरापासून हे मंदिर चालत पाच मिनिंटावर . मग काय ? ते आमचं खेळण्याचं ठिकाण होतं नेहमीचं . आत निरव शांतता . एक माणूस नाहि . तेव्हा निवांत खेळायचो अन आकर्षण त्या पुष्करणीच खूप . खाली जायचं पाण्यात पाहायचं , भीती वाटायची . .. जर पाण्यात पडलो तर पोहता येत नाही आणि मदतीला एक माणूस नाही . एक गूढ आकर्षण ! ...
फार छान वाटलं
4 Feb 2025 - 8:29 pm | चौथा कोनाडा
व्वा .. भारीच की !
सुंदर जुन्या आठवणी !
थरारक ! हे पुन्हा अनुभवायला मिळणार नाही ! आपण कशाकशाला पारखे होत आहोत हे आता जाणवतं.
मनःपुर्वक धन्यवाद,बिपीन सुरेश सांगळे_/\_
1 Feb 2025 - 6:43 am | चित्रगुप्त
लवकरच मी पुण्यात येणार असल्याने हा लेख वाचून Baneshvar Temple, PUNE' असा गूगल मॅप वर शोध घेता किमान तीन तरी वेगवेगळी बनेश्वर - बाणेश्वर मादिरे दिसली. (तळीगव-दाभाडे, नसरापूर आणि बाणेर मधील) आणखीही आहेत बहुतेक.
कृपया कोणीतरी यापैकी कोणकोणती आवर्जून बघण्यासारखी आहेत (माझी रुच 'धार्मिक' पेक्षा निसर्गरम्यत्व, वास्तुकला, मूर्तीकला यात आहे) हे सांगितले तर फार मदत होइल. धन्यवाद.
1 Feb 2025 - 8:03 am | प्रचेतस
तिन्ही पाहिलेली आहेत, यापैकी बाणेरचे सर्वात प्राचीन, ती राष्ट्रकूटकालीन (पाताळेश्वरला समकालीन) खोदीव लेणी आहे (बहुधा नववे शतक). कातळ फोडून लेणीत जायचा मार्ग तयार केला आहे, आवारात वीरगळ आहेत आणि इतर कुठेही सहसा न दिसणारी बलीवेदीचा चौकोनी दगड आहे ज्याच्या चारी बाजुंना बकऱ्याची मस्तके कोरलेली आहेत.
1 Feb 2025 - 8:30 am | चित्रगुप्त
मी बाणेरलाच मुक्काम करणार असल्याने तिथे जाईनच, शिवाय अन्य दोन्ही बघण्याचा प्रयत्न करेन.
3 Feb 2025 - 12:11 pm | नचिकेत जवखेडकर
वर्णन आणि फोटो दोन्ही भन्नाट.भटकंती आवडली.
7 Feb 2025 - 7:34 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, नचिकेत जवखेडकर.
3 Feb 2025 - 1:24 pm | यश राज
सुन्दर लिहिलयं, यत्ता तिसरी का चौथीत असताना आमची शालेय सहल बनेश्वरला गेली होती.
7 Feb 2025 - 7:35 pm | चौथा कोनाडा
एकदा पुन्हा जाऊन यायला संधी आहे.
धन्यवाद, यश राज.
4 Feb 2025 - 12:28 pm | गोरगावलेकर
फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले
5 Feb 2025 - 3:06 am | मुक्त विहारि
फोटो पण मस्त आले आहेत...
5 Feb 2025 - 4:16 am | जुइ
सुंदर फोटो आणि माहिती. या बनेश्वर मंदिराबद्दल फारसे ऐकले नव्हते, या लेखामुळे ओळख झाली. धन्यवाद!