रिलस्टार

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
3 Jan 2025 - 8:21 am

रिलस्टार
--------------------------------------------------------------------------------------------------------------
मला सोफ्यावर पडून लोळायला जाम आवडतं. मागे एक उशी घेतली की झालंच. मोबाईल बघावा.रिल्स पहावेत. मजा ! मध्येच डुलकी लागली तर बहार !
मी अशीच रिल्स बघत होते.एकामागे एक रिल्सची लाईनच असते. तुम्हाला वेगळं काय सांगायचं म्हणा त्यात. बघतच रहावंसं वाटतं. अक्षयपात्रच जणू. त्या आभासी जगात हरवून जायला होतं.
तुम्हीच बघा ना - सध्या ज्या काही घडामोडी आपल्याला स्क्रिनवर, कुठल्याही प्रकारच्या स्क्रिनवर पहायला मिळतात, त्या मला मसाल्यांच्या जाहिराती वाटतात. प्रत्येकजण सांगतो, आमचाच मसाला भारी ! बोंबलायला चव तर एकालाही नाही.मग कशाला पाहिजे तो फुकटचा मसाल्याचा ठसका ?
त्यापेक्षा रिल्स बरे. मनोरंजन अन वर डोक्याला शॉट नाही. आणि काय काय मजा असते त्या रिल्समध्ये. दुसरीकडे कुठे जायची गरजच नाही.ग्यानकी एक पुरी दुनिया !
एक हँडसम पोरगा आला.काहीतरी मोटिवेशनल वगैरे बोलायला लागला. तो असेच रिल्स टाकतो. मी बघते त्याचं आवडीने. तो काय बोलतो त्याच्याकडे माझं लक्ष नसतं. पण तो दिसायला अगदी राजबिंडा आहे. हे महत्त्वाचं.
पण त्यादिवशी तो काहीतरी सांगत होता, मोठी स्वप्नं बघा म्हणून.
त्यावर मी विचार करायला लागले. माझं मोठं स्वप्न म्हणजे, अंघोळीला गेल्यावर, वस्त्रहरण केल्यावर - हंहं - तुमचे विचार बाजूला ठेवा. मला फक्त एवढंच म्हणायचंय की नळाचं पाणी जाऊ नये. किंवा डोळ्यांत साबण गेल्यावर पाण्याचा मग हरवू नये.
त्यावरून आठवलं,आमचे हे म्हणजे तर गोंधळच सारा. एकदा अंघोळीला गेले अन घाईत माझी इनर घालून बाहेर आले. मी बसले शोधत अन हे दिवसभर तसेच ! त्यांना कळलं पण ते ऑफिसमध्ये वॉशरूमला गेल्यावर. इनरच्या लेसने बाहेर डोकावून त्यांना जेव्हा वाकुल्या दाखवल्या तेव्हा. पण करता काय? वेंधळे ! नशीब लेस बघून पुढच्या वेळी शेजारी लेडीजमध्ये गेले नाहीत.
हं ! तर स्वप्न म्हणजे ह्या बाबाने थोडं शहाण्यासारखं वागावं.
बेल वाजली. शेवंताबाई आली होती. माझी घुमा आली आणि कामाला लागली. ती असंच करते. मला तिला बरंच काही सांगायचं असतं आणि खरं म्हणजे तिने बिल्डींगमधल्या चमचमीत बातम्या मला देणं अपेक्षित असतं. पुढेपुढे नाचणारी, अक्कल पाजळणारी आमच्या बिल्डिंगमधली मंडळी म्हणजे घरात लुगडी अन बीचवर उघडी ! ती खालची परी - तिला जर हॉटेलमध्ये खायचं असेल अन नवऱ्याने तिला नेलं नाही तर ही शहाणी मग रात्रीची त्याला घास घालत नाही. मग त्याला पनीर नापसंदा ! म्हणजे बघा तिची डेरिंग. इति शेवंता.
कधीतरी शेवंता प्रसन्न होते. मग सांगते गंमतीजंमती.
एकदा माणिकरावांनी शेजारच्या नरेशरावांना विचारलं - दिवाळीला कोकणात येता का ? नरेशरावांचा कुटुंबाबरोबर आधीच प्लॅन ठरला होता; तर म्हणतात कसे - नाही हो जमणार. आमचं फॅमिली प्लॅनिंग आहे ! आता त्या नरेशरावांच वय नाही तसल्या प्लॅनिंगचं. पण त्यांना नको त्या जागी चुकीचे इंग्लिश शब्द वापरायची सवय आहे.
तर अशा बातम्या मला ऐकायच्या असतात. त्यासाठी माझी अगदी तिला कॉफी करून पाजायचीपण तयारी असते. पण नाही. अशा बायकांना ती अपवादच आहे अन थोडीशी बिनधास्तपण.
मी तिला म्हणाले ,”अगं, आलीयेस तर बस जरा.”
ती बसली.
मी तिला पुढे म्हणाले,”शेवंता, माणसाने आयुष्यात काहीतरी करायला पाहिजे. मोठी स्वप्नं बघायला पाहिजेत.”
त्यावर ती म्हणाली,”अवं, स्वप्नं बघायला झोपायला लागंल. मला कुटं येळ ? ते तुम्हाला जमतं. अगदी छान जमतं !”
माझे तर डोळेच विस्फारले.
“ काहीपण बोलतेस का गं तू ? मी तुला एवढं चांगलं सांगते.”
“अवं ताई, काम नाय केलं तर तुम्हीच वरडाल मला. अन काम नाय केलं तर पोट भरायचे वांदे.त्यात नवरा दारुडा.” वर म्हणते कशी पुढे,” तुमच्या नवऱ्याने तुमच्याबद्दल मोठी स्वप्नं पाहिली असतील नाही का वं ताई ? लग्न झालं तेव्हा तुम्ही अगदी बारीक होता. आता चार वर्षात डबल झालाय !”
अशी बोलते शहाणी !
हं,आता झालीये थोडी खातेपिते घरकी. पण आहे गोड मी…
पुढे म्हणते कशी , " तुम्ही दोगंबी संगं झोपला तर मंग स्वप्नंबी डबल व्हत्यात का ? "
वात्रट आहे मेली !
शेवंता गेली. मी पुन्हा सोफ्यावर पडले. मोबाईल चालू केला आणि पुन्हा रिल्स. त्यात एक रील आलं-
त्यात रिलस्टार निताशा होती.निताशा म्हणजे शेवंताची पोरगी नीता. वयात आलेली, फटाका. रिल्स बनवण्यासाठी तिने ते खास नाव घेतलंय.तिला एक रिल्स बनवायचं वेड लागलं आहे.
कुठलं तरी गाणं घेते, त्याच्यावर डान्स करते. हे धो धो लाईक्स ! आज तिचं नवीन रील आलं होतं. मी बघतच राहिले…
त्यात एक टपोरी दिसणारा पोरगा होता. रंगीबेरंगी कपडे, पांढरेशुभ्र शूज घातलेला. वेडेवाकडे कापलेले केस आणि टाळूवर छोटीशी पोनी. होपलेस ! त्याला पाहून तर मी
नाकच मुरडलं. नीता त्याच्याबरोबर नाचत होती. मागे ठेकेबाज गाणं. त्यांनी स्वतः बनवलेलं.
सुरुवातीला ढिंच्याक संगीत. त्यामध्ये सुरुवातीला फक्त नाचणारी निताशा दिसते. नवनवीन फॅशन्सचे कपडे कुठून आणते ? कोणास ठाऊक ? तिच्या अंगावर मोरपंखी शरारा होता. मग बाकीच्या पोरी दिसतात. नाचत नाचत ती त्याला म्हणते-
शेंडी तुझी लटकती
मग शायनिंग कशाला
त्यावर त्या पोराची फक्त तालात हलणारी पोनीच काय ती दिसते. मग तो वळतो. आधी त्याच्या हातातली मादक पेयाची बाटली दिसते, ती तो तोंडाला लावतो. ती बाटली तिला ऑफर करतो आणि म्हणतो -
चिल मार जरा
कोरड पडली घशाला
गाणं कॅची होतं !... आणि व्ह्यूज ? चार दिवसात मिलियन्समध्ये पोचलेले. बापरे ! मी तर पाहतच राहिले.
आई नाही; पण पोरगी तर मोठी स्वप्नं पाहू शकत होती. नक्कीच !
-----
रिल्सचे तरी काय एकेक प्रकार.
कोण कुत्र्या मांजरांचे व्हिडिओ टाकतात-
एक बोका बसलेला आहे. त्याच्यासमोर एक उंदीर ऐटीत फिरतोय.मागे माणसांच्या आवाजात त्यांचे संवाद.
उंदीर- काय आज माझ्या मागे लागायचा विचार नाही वाटतं ?
बोका- आज माझा उपवास आहे.
उंदीर कुठल्यातरी ढिंच्याक गाण्यावर आनंदाने नाचायला लागतो.
बोका - लय नाचू नको ! उपवास सोडताना बघतो तुझ्याकडे उंदीरमामा. आज उंदीरमोमोच खातो.
सध्याच्या जगात कोण कधी कोणाचा मामा बनवेल, सांगता येत नाही. संधी मिळाली की पार्टी बदलली. जिथं भंडारा-खोबरं तिथं उदो उदो ! स्वार्थ आधी.
कोणीही उठते अन रेसिपीज टाकते. पार अर्ध्या चड्डीतल्या टकाटक पोरींपासून ते गावातल्या झम्परवाल्या म्हाताऱ्या आज्यांपर्यंत. ते मला बघायला खूप आवडतं. नुसतं बघायला जातंय काय. बनवतोय कोण? कोणी आयतं दिलं तर खायला मजा ना.कोणी प्रत्यक्ष पदार्थ चापण्याचे रिल्स बनवत बसतात. हे तुफान लाईक्स ! ही तर कमालच आहे. तो खाणार आणि पाणी आपल्या तोंडाला सुटणार. हे काय बाई ! पुन्हा त्याला लाखो व्ह्यूज. अशा खादाड बोक्याला पौराणिक मालिकेत बकासुराची भूमिका द्यायला पाहिजे. एखादी नकट्या नाकाची असते. चिनी मेली - ती स्वतःचं नाव चिकनी चमेली ठेवून वेगवेगळ्या गाण्यांवर ठुमकत असते. बापरे ! अन मग तिला केवढं तरी फॅन फॉलोविंग.
कुणी चावट रील टाकत असतं. भारी वाटतं. पण… आताशी यांचा चावटपणा बोंबलला आहे. आधीतरी कुठे होता म्हणा. हे म्हणजे आधीपासूनच पोक्त प्रकारात मोडतात. जरा रोमँटिकपणा नाही.
ती पुढच्या विंगमधली हटकरीण बघा. नवरा-बायको दोघानीं व्हीआरएस घेतलीये. खास रिल्स बनवण्यासाठी. त्यांना म्हणे रिलस्टार व्हायचं आहे. बिल्डिंगमधले लोक तिला नावं ठेवतात ,हसतात; पण बाहेरून येणाऱ्या कमेंट्स काय असतात - मोस्ट रोमँटिक कपल वगैरे. ती मारे रंगवलेले केस सोडून नाचते आणि तिचा नवरा म्हणजे टकले हटकर आजोबा, थ्री फोर्थ जीन्स आणि टीशर्टवर तिची री ओढायला.
तिचा नुकताच लग्नाचा वाढदिवस झाला. काय चिकटली होती नवऱ्याला मुंगळीसारखी. तो गुळाची ढेप अन तिची जणू पहिलीच खेप ! पण आमच्या ढेपेपेक्षा बरी. आमची ढेप ही ढेपच आहे. गचबशी ! आमचा बाबा माझ्याबरोबर कधी रील बनवणार ? हं हेदेखील स्वप्नच.
काय काय करत असतात ते हटकर. ती हटकरीण रुसते काय. अन तिचा नवरा तिला प्रेमाने मनवतो काय. सगळी धमाल. आजोबांचा अभिनय सहज वाटतो; पण हटकरीण म्हणजे ? ... असं वाटतं की तिला एक कानाखाली द्यावी मग ती चांगली फुगेल अन तिचं ते रुसणं खरं वाटेल.
तर कुठे एखादी सुंदरी स्फूर्ती देणारं काही बोलत असते. तत्वज्ञान, जीवनावर भाष्य वगैरे. ते बोलायचं वयही नसतं खरं तर बिचारीचं. पण बोलत असते. हे फॉलोवर्सचा पाऊस तिच्यावर. लोक तिचं ऐकत नाहीत.. ..लोकांना ‘वेगळं ‘ समाधान अन तिला पैशाचं !
बोलणाऱ्याची माती विकली जाते तशी सध्या दिसणाऱ्याचीसुद्धा !
पण सध्याचा जमाना असाच आहे.दिसतंय ते विकतंय ! गुणांना किंमत नाही. काही चांगले असतात.पण कमी.
-----
हटकर बाई दोन दिवस झाले दिसली नव्हती. म्हणजे रिल्सवर. आलं नवीन गाणं, झालं हिट की यांचं रील तयार. पार गुलाबी लुगड्यापासून ते काळ्या पडलेल्या पैठणीपर्यंत,सगळ्या गाण्यांवर. ती गाणीही घाबरतात खरं तर त्यांच्या तावडीत सापडायला. पण काय नाचतात दोघे टणाटण ! या वयातही . कधीकधी हसायला येतं. तर कधी राग येतो.
माझं स्क्रोलिंग चालू होतं. मध्येच त्यांचं एक नवीन रील आलं. मला जाम उत्सुकता. नाहीतर चुकचुकल्यासारखं वाटत होतं. ती गायब असल्याने.
अरे ! पण त्यांचं मळकट किचन नव्हतं. ही तर वेगळीच जागा होती. जंगलातली असल्यासारखी. कुठलीतरी पुरातन, जाडजूड हिरव्यागार वेलींनी सजलेली गुहा. तिच्यासमोर हे दोघे नाचत होते. होहोहाहा करून. आदिवासी कार्टून कुठले ! तो कुंभकर्ण आणि ही त्राटिका. मग मागची पाटी त्यांनी दाखवली. श्रीलंका ! तरीच! मी तर उडालेच . रामाचा बाण लागल्यासारखी …
माझं काय झालं असेल ? ... हं ! म्हणे स्वप्नं मोठी बघा... ! मी मनात ठरवून टाकलं . हे येडे लंकेला जाऊ शकतात तर आपण कुठेतरी आधुनिक ठिकाणी जाऊ या …
अन माझ्या मनात आलं दुबई. बुर्ज खलिफा !
बेल वाजली. मी आनंदाने दार उघडलं. नवरोबा आला होता.
त्याने डोळे मिचकावत, माझ्या उल्हसित मुखकमलाकडे पहात विचारलं ,“आज काय विशेष ? नाही तू मूडमध्ये दिसली की जरा बिचकायला होतं ! “
हे असंय ! दुसरा एखादा असता तर ? ...
“ अहो, ऐका ना. आपण बुर्ज खलिफाला जाऊ या.”
“ काय ?”
“ अहो, ते हटकर तर लंकेला गेलेत.”
“ अच्छा ! म्हणून होय ? हनुमानाने लंका जाळली त्यावेळी का नाही गेले ते तिकडे ? विषयच संपला असता.”
“ तुम्ही ना....”
“ बरं बघू. माझी आधीच बट खालिफा झालीये.”
“म्हणजे ?”
“ म्हणजे कामामुळे बट खाली फाटायची वेळ आलीये !”
हे असले यांचे पीजे. यांची बट म्हणे. ती काय बरीना बकूरची बट आहे ? आंतरजालावर प्रसिद्ध असलेली. यांना तर काय आकारच नाही. बाहेरून पण कळतो हां तो … सारखी पँट खाली घसरत असते बुडावरून.
-----
शेवंता कामाला आली अन तिच्या पोरीचा फोन आला.
शेवंता ओरडली,”निते पैसबियसे काय मिळणार नायत , कळलं ? “
“ आई, लय भारी रील बनवायचंय !”
“ते रील घाल चुलीत ! अगं, महिनाअखेर हाय आन तू काहीतरी डोक्याला ताप करतीये.”
शेवंता कामं करून घरी गेली आणि पोरीशी जाऊन भांडली. टंप्या टपोरी होताच तिथे. निताशाचा मित्र. तो शेंडीवाला,रील बनवणारा.
शेवंता म्हणाली ,” टंप्या , बिनखर्चाचं काम करता येत नाय का रे तुला ? चल मी नाचते तुझ्याबरोबर. खर्च नाय पाहिजे.”
मग काय ?
शेवंताचं वय काही फार नव्हतं ! चवळीच्या शेंगेसारखी होती ती. टंप्याला ती आयडिया जामच पटली आणि शूट करण्यात, एडिट करण्यात खरं तर ते पोरगं मास्टर होतंच.
संध्याकाळी शेवंताचं रील व्हायरल.
रिलमध्ये टंप्या. तो जास्त प्यायलाय आणि दारूची बाटली हातात घेऊन झोकांड्या खातोय.
शेवंता गाणं म्हणतीये, त्याला बघून.

अति घाई संकटात जाई
हळूहळू पी रे अक्काबाई
ए अक्काबाई ss

शेवटच्या अक्काबाईला कोरसमध्ये ओरडा !
अक्काबाई म्हणजे दारू. टपोरी भाषेत. शेवंता पोरीपेक्षा झकास नाचत होती. ती फार भारी दिसत होती. ती नेहमीची शेवंता वाटतच नव्हती. दणादण व्ह्यूज रीलला. तिला बघून,तिचा डान्स बघून मी जळले बाई.

माझी आताशी ट्यूब पेटली - मी पण रील बनवायला पाहिजे. आधी कधी हे सुचलं नव्हतं. पण शेवंताने तो ट्रिगर दाबला होता – ढिशक्यांव !

मीपण तिरमिरीत उठले. चापूनचोपून साडी नेसली.
सगळ्यांना झिंगवणारं ‘दोन घोट’ गाणं लावलं. आणि नाचले त्याच्यावर. वाट्टेल तशी नाचले !
टाकलं टीपीग्रामवर.
काय झालं असेल ?

मोजून चार कमेंट्स आल्या.

हटकरीण बाई - वॉशिंग पावडरची ऍड करताय का?..... नाही, गाऊन मळका दिसतोय.
नीट बघायचं नाही. लगेच ट्रोलिंगला सुरुवात. ही लंकेतील राक्षसीण साडीला गाऊन म्हणत होती . तिला नंतर बघून घेऊ या असं ठरवलं . तिच्या स्कर्ट्ला शूर्पणखेची वल्कलं म्हणून खिजवणार होते.
एक कोणी पेंटर- भिंती कळकट झाल्यात. कमी पैशात चकाचक रंगवून देऊ.
एक जिमची ऍड- हमखास वेट लॉस ! आमचं जिम जॉईन करा.
आणि कोणी टुकार - दोन घोट काय ? अख्खी बाटलीचं घेऊन येतो ना. दोन पेगच लावा टपाटप ! तुमच्यासाठी कायपण ! एकत्रच बसू. चखणा काय आणू ?
मी डोक्याला हात लावला. तेवढ्यात नवरोबा आला. धपकन सोफ्यावर बसत म्हणाला –“ दो घूंट मूझेभी पिला दे – पण पाण्याचे… अगं काय करतेस तू ? रील बनवतेस, टाकतेस. आणि पिटीचे हातवारे कसले करतेस ते ? ऑफिसमधले म्हणतात - वहिनी काय भारी नाचतात ! येडे कुठले ! कशालाही चांगलं म्हणतात. बाई दिसली की खलास. नाचली की झकास. अन तू पिणार ?”
“मी नाही पीत. तुम्हीच प्या अक्काबाईS असं ओरडत !”
“अक्काचं नाव कशाला मध्ये घेते ?” नवरोबा ओरडला .
“बरोबर,” मी म्हणाले. अक्का म्हणजे यांना यांची लाडकी बहीण वाटली होती.
हे असंय ! यांना काही कौतुकच नाही.
आणि हे ह्यांच्या सहकाऱ्यांनी ह्यांना का सांगितलं ? कमेंट्स का दिल्या नाहीत ? हे आभासी जग ना,खरंच काही कळत नाही.
मी म्हणाले,” पण मी तर छान साडी चापूनचोपून नेसून...”
“हं ! म्हणून तर पोट जास्त दिसत होतं ना !”
…जसं काही इतर वेळी माझं जास्तीचं पोट यांना दिसतच नाही.
------
दुसऱ्या दिवशी. सकाळी खोट्सऍपवर शेवंताचा मेसेज- मी काम सोडलं. मी आता रिलस्टार झालीये !
अरे देवा ! आता मी लोळणार कशी ? सरळ तिला फोन लावला. तिने उचलला नाही. पुन्हा तिचा मेसेज -रील बघा म्हणून.
शेवंता एका गाजलेल्या लावणीवर नाचत होती. काय बिजली होती तिच्या अंगात.मी बघतच राहिले. ती सजलेल्या रूपात, मेकअपमध्ये किती वेगळी, किती सुंदर वाटत होती. तर शेवंताचा फोन.
“ ताई, बघितली का लावणी ?”
“ हो. मस्त !”
“ म्हणून तर मी काम सोडलंय. ” माझी लावणी बघून एक बागायतदार फिदा झालाय माझ्यावर.”
“ बागायतदार, आं ?”
“ आता मी जाणार त्याच्या फार्महाऊसवर रहायला. कायमची ! राणीवानी राहणार. आणि रील बनवणार शेतात. पाटापाशी अन आंब्याच्या झाडापाशी. मागं झुलायला शेतातल्या कामवाल्या . नऊवारीत . मध्येच चूल अन मध्येच फूल. जाळ अन धूर संगटच ! ”
“ अन तुझा नवरा ?”
“ मरू दे त्या साल्याला ! दारुड्या काय कामाचा ? सोडला मी त्याला आता. अन थँक्स बरं का. तुमच्यामुळं मी मोठी स्वप्नं बघायची सुरुवात केली.”
ही तर हद्दच होती. माझ्या मनातही जाळ अन जेलसी संगटच .
-----
मी कोचवर पडले.लोळत नाही तर तळमळत. शेवंता करू शकते, तर मी का नाही ? शेवंता रिलस्टार होऊ शकते, तर मी का नाही ?…काहीतरी भारी.तिच्यापेक्षा भारी पाहिजे !
पण काय ? … आणि मला सुचलं- आपण बेली डान्स करू या. शेवंताच्या लावणीपेक्षा भारी होईल ! आणि सध्या जमानाही असाच आहे - आपलं सोडून दुसऱ्याचा उदो उदो ! सध्या बेली डान्सचं पेव फुटलंय. ती आयटेम सॉन्गवाली बाई - तोरा कुठेहीमुळे.
पण लगेच कमेंट्स आठवल्या –
नवरोबा म्हणेल - हा तर ढेरी डान्स !
हटकरीण म्हणेल - हा बेली डान्स नाही, हा तर मेली डान्स ! मेलीचा.
पण नाही- स्वप्नं मोठीच बघायला पाहिजेत.
या मळक्या भिंती झाकायला एक वॉलपेपर लावून घेऊया. तोपण नवीन… बुर्ज खलिफाचा ! वजन कमी करून स्लिम होऊया.बेली डान्सचा क्लास लावूया.तसे कपडे घालू या आणि जीवतोड डान्स करूया.
माझ्या डोळ्यांसमोर बुर्ज खलिफाचं मोठंसं सुंदर पोस्टर आलं. त्यासमोर माझा डान्स. एखादी कसलेली बेली डान्सर करेल त्यापेक्षा खतरा ! आणि माझ्या अंगावर बेली डान्सरचा खास कॉश्च्युम – बेदलाह. सोनचाफ्याच्या रंगाचा. मागं गाणं…मन गुणगुणायला लागलं-
पुढं नाचतो
सोनचाफा हो सोनचाफा
मागं
बुर्ज खलिफा होहो बुर्ज खलिफा
मग एक ठोक्यावर ठुमका . कंबरेचा मण्यांचा पट्टा सळसळवणारा.
आणि टंप्या- ह्या कामासाठी त्याला हाताशी धरलं पाहिजे.टपोरी असला तरी कामाचा आहे. लकी आहे. तुम्ही म्हणाल हे कसं काय ? तर मी सध्याच्या काळातील मनुष्यप्राणी आहे ना. जिथं मेवा तिथं देवा !
मग कमेंट्स,लाईक्स, व्ह्यूज ! कोणाकोणाला डान्स आवडेल. ते मरू दे जाऊ दे.
एखाद्या दुबईच्या अरबालादेखील आवडेल. भाळेल तो माझ्यावर. नवरोबा म्हणतो ना माझं पोट दिसतं म्हणून - तर बेली डान्सर चबीच असतात. उगा सुके बोंबील नाही. चपट्या नाही, तर चांगल्या भरल्या पोटाच्या. पण थुलथुलीत नाही. त्यामुळे मी अन माझा डान्स दोन्ही छान उठून दिसेल. जाईन कायमची दुबईला. ऐषोआरामात राहीन.बोलवेल मला तो अरब .त्याच्या वाळवंटातल्या फार्महाऊसवर. आजकाल मराठी नट्यापण नाही का दुबईला घरोबे करून राहतात.
अस्मानसे टपकी और खजूरमे अटकी ! राहीन मी, खाईन खजूर.फॉलोवर्स म्हणतील जी हुजूर ! मग स्वच्छ निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर माझे दणादण रिल्स.खजुराच्या झाडाखाली… मागे रबाब,डफ आणि दरबुका ड्रमचं खतरनाक अरेबिक संगीत.गुंगवून टाकणारं. वर माझे ठुमके अन कंबरपट्ट्याचे झटके.अहा!
अन नवरोबा, आमचा बुजुर्ग खलिफा- गेला उडत !
म्हणजे माझी सक्सेस स्टोरी शेवंतापेक्षा भारी.
रील छोटं असलं तरी स्वप्नं मोठी पहायला पाहिजेत.
---------------

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

बिपीन सुरेश सांगळे's picture

3 Jan 2025 - 11:27 am | बिपीन सुरेश सांगळे

नवीन वर्षाला ...

आणि

सगळ्या वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

चौथा कोनाडा's picture

4 Jan 2025 - 7:13 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा .... ! एकसे एक भारी किस्से.....
लै भारी लिव्हलंय !

मोबाईल कॅमेरा, रील्स वै मुळे प्रत्येक जण मुव्ही मेकर झालाय .... अन विषय अगणित, अनंत .. अन ह्यो समदा प्रकार लईच विंटरेष्टींग .. डोळे खिळून राहतात ... किती वेळ गेला तेच समजत नाही !

एकदा अंघोळीला गेले अन घाईत माझी इनर घालून बाहेर आले. मी बसले शोधत अन हे दिवसभर तसेच ! त्यांना कळलं पण ते ऑफिसमध्ये वॉशरूमला गेल्यावर. इनरच्या लेसने बाहेर डोकावून त्यांना जेव्हा वाकुल्या दाखवल्या तेव्हा. पण करता काय? वेंधळे ! नशीब लेस बघून पुढच्या वेळी शेजारी लेडीजमध्ये गेले नाहीत.

एक नंबर हा .... हा .... हा .... !

टर्मीनेटर's picture

4 Jan 2025 - 11:27 pm | टर्मीनेटर

मजेशीर लेखन आहे 😀

खेडूत's picture

5 Jan 2025 - 7:48 am | खेडूत

लई भारी..!
जाळ अन् धूर संगटच.

नव्या वर्षाच्या शुभेच्छा!!

अकिलिज's picture

6 Jan 2025 - 5:56 pm | अकिलिज

लेखिकेच्या शब्दात लिहिलंय. जाम भारी. आवडलं.

बिपीन सुरेश सांगळे's picture

8 Jan 2025 - 8:17 am | बिपीन सुरेश सांगळे

चौको
टर्मिनेटर
खेडूत
अकिलीज

आणि सर्व वाचक

खूप आभारी आहे