The Wise Woman of the Atlas ह्या मोरोक्कन दंतकथेचे मराठीत शब्दांकनः
खूप वर्षांपूर्वी मोरोक्को मधल्या अॅटलास पर्वतरांगेतल्या एका लहानशा खेड्यात गावकुसा बाहेर 'आयेशा' नावाची एक वृद्ध महिला रहात होती. औषधी वनस्पती आणि जडीबुटींच्या ज्ञानासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या आयेशाकडे निसर्गोपचार घेण्यासाठी दूरदूरहून रुग्ण येत असत.
एका वर्षी आयेशाच्या खेड्यात भयंकर दुष्काळी परिस्थिती उद्भवली. नदीपात्र कोरडे पडले, गावकऱ्यांच्या शेतातली उभी पिके पाण्याअभावी करपून गेली आणि सुकलेल्या जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या. शेतीवर उपजीविका अवलंबून असलेल्या गावकऱ्यांची उपासमार होऊ लागली आणि कुपोषणामुळे गावात रोगराईचा प्रादुर्भाव होऊन लोक आजारी पडू लागले.
ह्या आस्मानी संकटामुळे हवालदिल झालेले आणि कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रासलेले सर्व गावकरी मोठ्या आशेने आयेशाच्या घरी जमा होऊन सध्याच्या बिकट परिस्थितीतुन त्यांची सुटका करण्यासाठी तिच्या मदतीची याचना करू लागले. कनवाळू स्वभावाच्या आयेशाने सुहास्य वदनाने आपण आपल्या सर्वशक्तीनिशी गावकऱ्यांच्या मदतीसाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर करून सर्वांना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिच्या घरी येण्यास सांगितले.
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून वृद्ध आयेशाने काही गावकरी महिलांच्या मदतीने आपल्या औषधी वनस्स्पतींच्या बागेत फुललेली त्या मोसमातील शेवटची केशराची फुले खुडून आणली.
फुले घेऊन घरात आल्यावर आयेशाने देवाची व अॅटलास पर्वताची मनोभावे करुणा भाकून आपले ज्ञान आणि अनुभव पणाला लावून केशराच्या तंतूंपासून एक दिव्य केशरी काढा तयार केला आणि संध्याकाळी तिच्या घरी जमलेल्या सर्व गावकऱ्यांना तो थोडा प्राशन करण्यासाठी आणि थोडा त्यांच्या उजाडलेल्या शेतजमिनीवर शिंपडण्यासाठी दिला.
आयेशाने सांगितल्याप्रमाणे सर्व गावकऱ्यांनी आपापल्या शेतात त्या दिव्य काढ्याचे शिंपण केले आणि रात्री सर्वजण काढा प्राशन करून झोपले असता, एक चमत्कार घडला. अॅटलास पर्वतावर काळ्या ढगांची दाटी झाली आणि त्याच्या सर्व दऱ्या-खोऱ्यांतून त्या ढगांच्या गडगडाटाचा आवाज घुमू लागला. मध्यरात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि सकाळपर्यंत नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले, भेगा पडलेली कोरडीठक्क जमीन ओली होऊन तिच्या मृदगंधाने वातावरण अतिशय आल्हाददायक झाले. आयेशाच्या त्या दिव्य केशरी काढ्याच्या रूपात देवाने जणू गावाला वरदानच दिले होते.
त्या दिवसानंतर गावात समृद्धी आली. गावकऱ्यांनी कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांना नवसंजीवनी देणाऱ्या केशराच्या फुलांची शेती करायला सुरुवात केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून गावाला आणि गावकऱ्यांना बाहेर काढणाऱ्या आयेशाच्या ज्ञानाच्या आणि तिच्या महान कार्याच्या सन्मानाप्रीत्यर्थ गावात दरवर्षी केशर महोत्सव साजरा केला जाऊ लागला.
आजही आपले औषधी आणि सौंदर्यवर्धक गुणधर्म व अलौकिक चवीसाठी ख्यातनाम असलेले 'केशर' मोरोक्कोच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून, अॅटलासची 'ज्ञानी' स्त्री म्हणवल्या जाणाऱ्या आयेशाची कथा लोकांच्या स्मरणात आहे.
*****
केशर उत्पादन आणि व्यापाराचा मोरोक्कन इतिहास आणि सद्यस्थिती:
मोरोक्कोमधील केशर लागवडीचा इतिहास १२०० वर्षांपेक्षा अधिक जुना असून त्यात अरब व्यापाऱ्यांचे योगदान, वसाहत काळातील स्पॅनिश प्रभाव आणि विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील आधुनिकीकरण यांचा मोठा वाटा आहे. आजघडीला मोरोक्कोचा केशर त्याच्या उच्च गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे आणि देशाच्या सांस्कृतिक वारशाचा आणि अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे. मोरोक्कोमध्ये शतकानुशतके केशराची (क्रोकस सटिवस) लागवड केली जात असून त्या लागवडीचा इतिहास इस्लामिक सुवर्णयुगाच्या काळापासून सुरू होतो.
- प्रारंभिक इतिहास (८ ते १२ वे शतक):
- केशराच्या व्यापाराची सुरुवात (१३ ते -१५ वे शतक):
- स्पॅनिश प्रभाव (१६ ते १९ वे शतक):
- स्वातंत्र्य आणि आधुनिकीकरण (विसावे शतक):
- सद्यस्थिती (एकविसावे शतक):
- प्रादेशिक विविधता:
- आव्हाने आणि भविष्यातील संधी:
आठव्या शतकातील आपल्या उत्तर आफ्रिका विजयानंतर स्वाद, सुगंध आणि रंगासाठी खूप महत्त्व प्राप्त झालेले आणि स्वयंपाक, औषधोपचार आणि चलनाच्या स्वरूपातही वापर केला जात असलेले मूल्यवान केशर अरबांनी, विशेषतः अरब व्यापाऱ्यांनी मोरोक्कोमध्ये आणले आणि रिफ पर्वतरांगेत, प्रामुख्याने टेटुआन, शेफशॉवेन आणि टँजियर या भागांत पहिल्या केशर लागवडीला सुरुवात करण्यात आली.
१३ ते १५ व्या शतकादरम्यान केशर उत्पादनामुळे मोरोक्कोच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागला. तिथे उत्पादित होणाऱ्या केशराची निर्यात युरोपला, विशेषतः स्पेन, इटली आणि फ्रान्सला केली जात असे आणि तिथे त्याचा वापर स्वयंपाक, कापड रंगवणे आणि सुगंधी द्रव्यांच्या उत्पादनासाठी केला जाई. मोरोक्कोचा केशर त्याच्या गुणवत्तेसाठी आणि विशिष्ट चवीसाठी प्रसिद्ध असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला मोठी मागणीही होती.
१६ ते १९ व्या शतकादरम्यान स्पेनने मोरोक्कोवर नियंत्रण मिळवल्यानंतर केशर उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. स्पॅनिश लोकांनी नवे शेती तंत्र, सिंचन पद्धती आणि केशर वनस्पतीच्या विविध वाणांच्या लागवडीस चालना दिल्याने मोरोक्कोच्या केशराची गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होऊन टेटुआन शहर केशराच्या उत्पादन आणि व्यापाराचे मुख्य केंद्र बनले.
१९५६ मध्ये मोरोक्कोने फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर देशातील कृषी क्षेत्रात आधुनिकीकरणाची सुरुवात झाली. देशात संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करण्यात आल्यामुळे केशर लागवड पद्धतींमध्ये सुधारणा करण्यात मदत झाली. प्रशिक्षित शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे कापणी आणि प्रक्रियेसाठी नवीन तंत्रांचा अवलंब केल्याने केशर उत्पादनावरही त्याचा सकारात्मक परिणाम झाला.
केशर (क्रोकस सटिवस) लागवडीसाठी आवश्यक असलेले सुयोग्य हवामान आणि मातीची गुणवत्ता लाभलेला मोरोक्को हा आजघडीला जगातील प्रमुख केशर उत्पादक देशांपैकी एक असून जागतिक केशर उत्पादनात त्याचा सुमारे ३०% वाटा आहे. सुगंध, तेजस्वी रंग आणि स्वादामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेला दर्जेदार मोरोक्कन केशर प्रामुख्याने फ्रान्स, स्पेन, इटली आणि अमेरिकेत निर्यात केला जातो.
मोरोक्कोमधील अनेक प्रदेशांमध्ये केशराची लागवड केली जाते परंतु उत्पादन पद्धती, वनस्पतीचे वाण आणि गुणवत्तेमध्ये प्रादेशिक फरक आढळतो. टेटुआन, शेफशॉवेन, टँजिअर आणि मेकनेस या भागांत उच्च गुणवत्तेच्या केशराचे उत्पादन केले जाते.
मोरोक्कोच्या केशर उत्पादनाला दीर्घ इतिहास असूनही हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि इतर केशर उत्पादक देशांशी स्पर्धा अशा आव्हानांचा त्याला सामना करावा लागत आहे. मात्र नाविन्यपूर्ण शेती तंत्रांचा प्रचार आणि संशोधनाच्या माध्यमातून उत्पादन वाढवण्याचे आणि विविध बाजारपेठांमध्ये व्यापार विस्तार करण्याचे मोरोक्कोचे प्रयत्न सुरू आहेत.
मोरोक्कोतील केशराचे औषधी उपयोगः
मूळच्या बर्बर, रोमन आणि अरबी संस्कृतीचा प्रभाव असलेल्या मोरोक्कोमध्ये पारंपारिक नैसर्गिक उपचार पद्धतीला महत्त्व दिले जाते. वात, पोट फुगणे, अपचन, सर्दी, खोकला, दमा, मासिक पाळीतील वेदना, सूज, रक्तदाब, संधिवात अशा अनेक समस्यांवरच्या पारंपारिक औषधांमध्ये केशराचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
शास्त्रीय संशोधनांतून केशरातील क्रोकिन आणि सॅफ्रनल सारख्या जैविक संयुगांमध्ये नैराश्य आणि चिंता कमी करण्याचे गुणधर्म असल्याचे आढळून आल्याने मनोविकारांवरील आधुनिक मोरोक्कन औषधांमध्ये, जीवाणूनाशक गुणधर्मामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच्या आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्यवर्धनासाठीच्या उत्पादनांमध्ये आणि सौंदर्यप्रसाधांमध्ये केशराचा वापर केला जातो.
मोरोक्कन खाद्यसंस्कृतीतला केशराचा वापर:
मोरोक्कन खाद्यसंस्कृतीत होणाऱ्या केशराच्या मुबलक वापरातुन त्या देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब दिसून येते. स्वाद, सुगंध आणि रंग प्राप्त करून देण्यासाठी केशराचा वापर केला जाणारे काही निवडक पारंपरिक मोरोक्कन खाद्यपदार्थ,
- टॅजीन / ताजीन (Tagine / Tajine): शंक्वाकृती झाकण असलेल्या ज्या विशिष्ट प्रकारच्या मातीच्या भांड्यात शिजवला जातो त्या 'टॅजीन' ह्या भांड्याच्याच नावाने ओळखला जाणारा आणि विशेषतः चिकन, बीफ किंवा मेंढ्याच्या मांसापासून तयार केला जाणारा एक पारंपरिक मोरोक्कन अन्नपदार्थ.
- कुस्कुस (Couscous): कुस्कुस हा मोरोक्कोचा राष्ट्रीय खाद्यपदार्थ आहे. रव्यापासून तयार होणारा हा पदार्थ सहसा भाजलेल्या मांसासोबत खाल्ला जातो.
- बस्तिला / पास्तिला (Bastilla / Pastilla): पिठाच्या आवरणात, सहसा कबूतर किंवा कोंबडीच्या मांसाचे केशरमिश्रित सारण भरून तयार केला जाणारा गोडसर चवीचा एक पारंपरिक मोरोक्कन पदार्थ.
- हारीरा (Harira): हारीरा हे एक अत्यंत लोकप्रिय मोरोक्कन सूप आहे, ज्यामध्ये सुगंध आणि स्वादासाठी केशर वापरले जाते. चणे, मसूर, कांदा, टोमॅटो आणि मेंढ्याचे मांस किंवा बीफ किंवा चिकन ह्या मुख्य घटकपदार्थांचा वापर करून तयार करण्यात येणारे हे मसालेदार सूप वर्षभर घरोघरी बनवले जात असले तरी रमादान काळात उपवास (रोजे) सोडताना हे सूप नसेल तर मोरोक्कन लोकांना चुकल्या चुकल्या सारखे वाटते इतके त्यांच्या खाद्यसंस्कृतीत हरीराचे महत्व आहे.
- ह्या आणि इतर अनेक खाद्यपदार्थांप्रमाणेच बकलावा, घरीबा, आणि मकरौड सारख्या मिठाया, डेझर्ट्स आणि चहातही स्वाद, सुगंध आणि रंगासाठी केशराचा वापर होतो.
एकंदरीत पाहता मोरोक्कोच्या सामाजिक परंपरा आणि आदरातिथ्याचे प्रतीक असलेले केशर हे मोरोक्कोच्या संस्कृतीमध्ये खूप खोलवर रुजलेले दिसते. त्याची लागवड कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासाला हातभार लावतानाच देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचेही जतन करते आणि केशराच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातून मोरोक्कोच्या अर्थव्यवस्थेलाही चांगली चालना मिळते.
आधीचे भाग :
- केशर : गाथा आणि दंतकथा - १ (विहंगावलोकन)
- केशर : गाथा आणि दंतकथा - २ (इराण)
- केशर : गाथा आणि दंतकथा - ३ (ग्रीस)
टीप: लेखातली सर्व चित्रे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित चित्रनिर्मिती सुविधा देणाऱ्या (Bing) Image Creator ह्या वेबसाईटचा वापर करून तयार केली आहेत.
प्रतिक्रिया
11 Nov 2024 - 4:40 am | कंजूस
एकूण ही लेखमालिका चांगलीच झाली आहे.
खाण्याच्या पदार्थाला रंग देणे याबरोबरच औषधी उपयोग या दोन कारणांमुळे केशर महत्त्वाचे झाले. काही विशेष हवामानाच्या देशांतच केशराचे झाड चांगले वाढते आणि ते देश फारच थोडे आहेत. महाग होण्याचं हे कारण.
पुढील विषय - मोती.
11 Nov 2024 - 7:35 am | आंद्रे वडापाव
नेहेमीप्रमाणेच छान माहिीपूर्ण लेखं...
पुण्यात म्हणे एका तरुणाने ट्रक चा हवाबंद वातानुकूलित कंटेनर घेऊन त्यात केशराचे रोपटी तयार केलियेत... केशर लागवडीमध्ये हे रोपटे तयार करणे किचकट असते म्हणे, तुलनेने मग रोपट्यापासून पुढील शेती करणे कमी किचकट...
आता ही छोटी रोपटी काश्मिरी शेतकरी त्याच्याकडून घेवून शेती करू शकतात..
खरे खोटे सोशल मीडिया जाणे...
12 Nov 2024 - 3:12 pm | टर्मीनेटर
कंकाका | आंद्रे वडापाव
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
व्यावहारीकदृष्ट्या ते शक्य नाही. काश्मिरमधले केशर उत्पादन सातत्याने घटत चालल्याने २०१०-२०११ मध्ये केंद्र सरकारने The National Saffron Mission (NSM) सुरु केले. त्या अंतर्गत तिथल्या केशराची लगवड करणाऱ्या शेतकऱ्यांना केशराचे कंद, लागवडीशी संबंधीत सोयी-सुविधा, सरकारी अनुदाने वगैरे मिळतात त्यामुळे त्यांना बाहेरुन अशी रोपे खरेदी करणे परवडणारे नाही, आणि अशा रोपांचे पुनर्रोपण यशस्वी होण्याची शक्यताही नाही. (भारताविषयीच्या भागात त्यबद्दलची माहिती येइलच...)
ते सोशल मीडिया वरचे महापंडीत परवडले एकवेळ, पण मुख्यप्रवाहातली माध्यमे म्हणवल्या जाणाऱ्यांनी 'Digital Content Creator' अशा हुद्द्याखाली जे महाभाग पोसायला घेतले आहेत ते जास्त वात आणतात 😀
ही मंडळी सोशल मीडियावरच्या पोस्ट्स, व्हिडिओज वाचुन/पाहुन त्या प्रयोगांची व्यावसायीक व्यवहार्यता वगैरे काहीही न तपासता बेधडकपणे "अमुक एक ठिकाणचा/ची तमुक एक तरुण/तरुणी ढमुक एक करुन महिन्याला कमावतेय इतके-तितके लाख रुपये" अशा मथळ्याखाली काय वाट्टेल त्या जिलब्या पाडत असतात.
11 Nov 2024 - 9:28 am | वामन देशमुख
टर्मी भौ,
केशरी लेखमालेतील हे फूल देखील नेहमीप्रमाणेच छान फुललंय!
---
मोत्यासाठी कंकाकांना अनुमोदन देतो.
- केशरप्रेमी द्येस्मुकराव
11 Nov 2024 - 1:29 pm | श्वेता२४
लेख नेहमीप्रमाणेच माहीतीपुर्ण आहे. आतीशय नवीन माहिती या निमित्ताने मिळत आहे.
12 Nov 2024 - 12:04 pm | कर्नलतपस्वी
आपल्या लेखनातून विचार मांडणी कशी करावी हे शिकण्या सारखे आहे.
12 Nov 2024 - 12:53 pm | Bhakti
अगदी सुंदर, भौगोलिक जिज्ञासा पिकांच्या उत्पादन अभ्यासाने पूर्ण होते.इराण,ग्रीस इथे मुबलक मिळते त्यामुळे भरभरून जेवणात वापर होतो,तेवढंच काय ते केशरी सुख ;)
पुढील पिकं पिस्ता,सर्व सुकामेवा पिकांवरही छान लेखमालिका होईल.काजू तर भारताचाच प्रसिद्ध सुकामेवा आहे.
12 Nov 2024 - 3:26 pm | टर्मीनेटर
केशरप्रेमी द्येस्मुकराव। श्वेता२४ । कर्नल साहेब । भक्ती
प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
काजू भारतातला प्रसिद्ध सुकामेवा असला तरी तो ही मुळचा 'भारतीय' नाही. काजुला ब्राझिलमधुन भारतात आणण्याचे श्रेयही पोर्तुगीजांना जाते...
मोती आणि पिस्त्याची नोंद घेतली आहे, त्याला मुहुर्त कधी सापडतो ते बघावे लागेल 😀
12 Nov 2024 - 7:49 pm | अथांग आकाश
सुंदर माहिती! कृ.बु. चित्रेसुद्धा छान आहेत!!
12 Nov 2024 - 11:33 pm | वामन देशमुख
कृबु चित्रे लेखाशी इतकी एकरुप झाली आहेत की ती काही विशिष्ट prompts देऊन कृबु वेगळी तयार करून घेतली आहेत असे वाटत नाहीच. झाडांवर फुलं दिसणं जसं स्वाभाविक वाटतं तशीच स्वाभावीक या लेखमालेतील चित्रे वाटतात.
---
बाकी, केशर गाथा सुरु आहे पण "दाने दाने में केसर का दम" चा उल्लेख नाही ये बात कुछ हजम नहीं हुई!
;-)
- (रजनीगंधा प्रेमी) द्येस्मुक राव
---
साँस तेरी मदिर-मदिर
जैसे रजनीगंधा
प्यार तेरा मधुर-मधुर
चाँदनी की गंगा
12 Nov 2024 - 11:37 pm | वामन देशमुख
काही विशिष्ट prompts देऊन कृबुकडून वेगळी तयार करून घेतली आहेत असे वाटत नाहीच.
13 Nov 2024 - 11:51 am | टर्मीनेटर
भारता विषयीच्या भागात 'भारतात होणारा केशराचा वैविध्यपूर्ण वापर' मध्ये त्याचा उल्लेख करतो 😀
13 Nov 2024 - 8:41 am | प्रचेतस
हा भागही सखोल माहिती देणारा. नुसते केशरच नव्हेतर त्या त्या प्रदेशातील विशिष्ट खाद्यसंस्कृतीदेखील तुम्ही आमच्यासमोर आणत आहात.
13 Nov 2024 - 12:03 pm | टर्मीनेटर
अथांग आकाश | प्रचेतस
प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
कृबु चित्रे बनवायला अजूनही शिकतोच आहे... परंतु लेखातल्या चित्रांची आपण दखल घेतलीत आणि ती आवडल्याचे कळवलेत त्यासाठी अथांग आकाश आणि (रजनीगंधा प्रेमी) द्येस्मुक राव आपले विशेष आभार!
13 Nov 2024 - 3:29 pm | सौंदाळा
हा भागही छानच.
नविन माहिती मिळत आहे. मध्य आशिया आणि दक्षिण अमेरीकेतून बरीच पिके, पदार्थ जगात पसरली हे ढोबळ मानाने बरोबर आहे का?
13 Nov 2024 - 4:18 pm | टर्मीनेटर
हो! फक्त पिकेच नाहीत तर, गुरा-ढोरांची आणि अनेक आजारांचीचीही देवाणघेवाण त्या काळात जगभरात झाली.
13 Nov 2024 - 3:50 pm | चंद्रसूर्यकुमार
मोरोक्कोमध्येही केशर होते हे माहीत नव्हते. एक गोष्ट कळत नाही. काश्मीरसारख्या थंड हवामान असलेल्या ठिकाणी केशर होते त्यावरून केशरासाठी थंड हवामान गरजेचे आहे असे वाटत होते. पण मोरोक्कोसारख्या वाळवंटी प्रदेशातही केशर होते? म्हणजे केशराला थंड हवामान असलेच पाहिजे असे नसते का?
13 Nov 2024 - 4:26 pm | टर्मीनेटर
मोरक्कोलाही भारतlप्रमाणेच सर्व प्रकारचे हवामान लाभले आहे. तिथे समुद्रही आहे, वाळवंटही आहे आणि हिमाच्छादित पर्वतशिखरेही आहेत!