स्वप्नं हे जुलमी गडे !

देवू's picture
देवू in जनातलं, मनातलं
29 Oct 2024 - 3:33 am

दिवस-रात्र मेंदूचा कितीही वापर केला तरी मेंदू थकत नसतो. मेंदूला आराम मिळावा म्हणून आपण झोप घेतो, खरं तर तेव्हाही मेंदू आराम घेत नसतो, आपल्याला स्वप्नं. दाखवायचे काम करत असतो. आपली इच्छा असो वा
नसो झोपेतही मेंदू आपली करमणूक करत असतो. कुठलीही वर्गणी न भरता रात्रभरात त्याच्या ओटीटी
व्यासपीठावरून तुमची इच्छा असो वा नसो , पाच ते सहा
स्वप्नमालीका दाखवतोच दाखवतो. त्यातही विविधता असते. दुःखी, आनंदी, रोमँटिक, बिभित्स , गोड अशी अनेक
प्रकारची स्वप्ने दाखवायचे काम तो करत असतो.

काही स्वप्नात मेंदूने आपल्याला निर्माता, दिग्दर्शक आणि
मुख्य पात्र बहाल केलेले असते शत प्रतिशत आपणच
असल्याने बजेटची काळजी नसते. त्यामुळे कधी कधी द्विमितीय , त्रिमितीय, ( खास चष्म्याशिवाय बरं का ) अशा
स्वरूपात स्वप्न बघायला मिळतात. कधीकधी अनपेक्षितपणे पुढच्या मितीही जेव्हा आपला स्वप्नांचा ताबा
घेते तेव्हा अगदी धांदल होते. अचानक शरीराला धरधरून घाम येतो हातापायाला झटके बसतात झोपमोड
होते. भयानक स्वप्न असेल तर हायसे वाटते. खोटं होतं हे सारं असे म्हणून पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी पटकन झोप लागते तर कधी अजिबातच झोप
लागत नाही. अशा वेळेला रात्र खूपच मोठी वाटू लागते.
काही स्वप्न हट्टी असतात. झोपमोड करतात. पुन्हा झोप
लागली की त्या स्वप्नमालिका पुन्हा आपल्याला
घाबरवायला तयार' रन लोला रन ' . कितीही प्रयत्न करा ते
स्वप्न तुटायचे नाव घेत नाही . शक्यतो परीक्षेच्या वेळी
अशी स्वप्न पडतात. हॉल तिकीट हरवले आहे , परीक्षेला
उशीरच झाला आहे , पेन विसरलो किंवा तयारी न
केलेल्या दुसऱ्याच विषयाचा पेपर समोर येणे . कोणा एका शास्त्रज्ञाला , स्वतःची शेपटी तोंडाने पकडलेल्या
सापाचे स्वप्न पडले आणि त्याला बेंझिन रिंगच्या रासायनिक रचनेचे कोडे उलगडले. असे रूपक स्वप्नं. परीक्षेच्या वेळी मला कधी पडल्याचे आठवत नाही किंवा
पडले असेल तरी त्याचे डिकोडिंग करण्याइतकी प्रतिभा
माझ्यात नसावी.

ही सगळी करमणूक फ्री असल्याने कुठली स्वप्ने पूर्ण
दाखवायची आणि कुठली मध्येच खंडित करायची हे सर्व
मेंदू ठरवतो. जसे Puberty अवस्थेत ( अवांतर : मराठीत ह्याला काहीतरी विचित्र शब्द आहे , जो मला कधीच
आवडला नाही. मुडदूस आणि पंडूरोग एकत्रित झाल्याची
अवस्था असावी असे वाटायचे. ह्या अवस्थेचे लॅटिनमध्ये
किती समर्पक नामकरण केले आहे. त्याचा शब्दशः
मराठीत अनुवाद केला तर अडाणी माणसालाही त्याचा
अर्थ समजण्यास सोपे गेले असते. या अवस्थेत नुकतेच हाताला खऱ्या अर्थाने ' काम ' मिळालेले असते. आतापर्यंत
स्वतःच्या हस्तस्पर्शाने टाळू सोडल्यास शरीराच्या
कोणत्याच भागास गुदगुल्या होत नव्हत्या , ह्या अवस्थेत शरीराच्या अजून एका भागाची त्यात भर पडते. त्याला
असे विचित्र.... जाऊ दे ! नको मला असली अभिजात भाषा. ) जी गोड स्वप्न पडायची, ज्यात हात, हार्मोन आणि मेंदू ह्यांची सुरेख महफिल जमून मोझार्डच्या सिंफनीप्रमाणे लयबद्ध स्वप्नं पडून ' पाणीपत ' होऊन स्वप्न भंग व्हायचे. ही स्वप्ने 5D - 7D दरम्यान असावीत. मेंदू ही स्वप्ने रिपीट मोडवर कधीच दाखवत नाही. पुन्हा झोप
लागली तरी ' ते ' स्वप्न किंवा त्याच प्रकारचे दुसरे स्वप्न
काही केल्या पडत नाही.

मेंदूने दाखवलेली बरीचशी स्वप्ने विसरून जाण्याच्या
माझ्या सवयीमुळे मेंदूला स्टोरेज करायला भरपूर मोकळी
जागा मिळत असावी असा माझा समज आहे. काहींच्या
मेंदूत स्टोरेज कॅपॅसिटी अमर्याद असावी, कारण त्यांना
बरीचशी स्वप्ने स्पष्टपणे आठवतात. ' स्वप्नवेल्हाळ ' व्यक्तींना त्यांना पडलेली स्वप्ने तपशीलवारपणे सांगण्याचा
छंद असतो . आमच्या घरात आईला आणि आजीला हे
वरदान लाभले असावे. सकाळी झोपेतून उठले की एखादी
शुभ किंवा अशुभ अशी त्यांना पडलेली स्वप्न सांगायची
स्पर्धा असते दोघींमध्ये . ' स्वप्नवेंधळा ' असल्याने मला
तपशीलवारपणे स्वप्ने सांगता येत नाही. मी फक्त
ऐकायचे काम करतो. एकदा आमच्या घरात स्वप्न
कथनाचा कार्यक्रम चालू असताना आजोबांनी त्यांना
वारंवार पडणारी तीन चार प्रकारची विचित्र स्वप्ने
सांगितली. माझ्या बाबांनी त्यांना अशाच प्रकारची स्वप्ने
नेहमी पडतात असे सांगितले. आश्चर्य म्हणजे मलाही त्या
दोघांसारखी डिट्टो स्वप्ने वारंवार पडतात , जसे स्वतःच्या
जबड्यातील दात ओढल्यास सहज निघून येणे . कोणीतरी आपला पाठलाग करतोय आणि कितीही प्रयत्न
केला तरी फार जोरात धावता येत नाही आणि अचानक
पक्षाप्रमाणे हवेत तरंगत सुसाट वेगाने उडणे. घनदाट
जंगलात खूप आतपर्यंत न संपणारा प्रवास करत राहणे अशी स्वप्ने मलाही पडतात . परंतु तसे मी काही त्यांना बोलून दाखवले नाही. बहुतेक करून ही स्वप्नांची आनुवंशिकता माझ्यात आली असावी.

विज्ञान काय म्हणते ते मला ठाऊक नाही परंतु
मनोविश्लेषक सिग्मंड फ्राईड आणि इतर मनोविश्लेषकांनी
स्वप्नांची उत्पत्ती ही शारीरिक उद्दिपणावर मानली आहे.
बऱ्याचशा स्वप्नातील घटकांचा शरीरातील अवयवांच्या
स्थितीचा , मूत्राशय भरण्याचा किंवा लैंगिक उत्तेजनांशी
जवळचा संबंध असतो . दात निघून येणे किंवा ओढणे
हे स्वप्न आतड्यातील उद्दीपनामुळे तयार झालेले आहे.
मनोविश्लेषकांनी स्वप्नात दात पडणे किंवा निघून येणे ही
हस्तमैथुनासाठी केलेली शिक्षा , असा निष्कर्ष काढलेला
आहे . ताठरता व्यक्त करण्यासाठी लिंगाला शरीराचा
अगदी आवश्यक असा भाग बनवला जातो. त्याचा परिणाम म्हणून स्वप्न पाहणारा गुरुत्वाच्या नियमाच्या
विरुद्ध जाऊन उडत असतो. जननेंद्रियानवरच्या केसांचे प्रतीक म्हणून जंगल किंवा झाडी असं सूचित केलं जातं.
स्त्रीचे जननेंद्रिय अतिशय गुप्त स्थानी असल्यामुळे
नैसर्गिक दृश्य त्याचे प्रतीक म्हणून बघितले जाते .
मनोविश्लेषक पृथ्वीला स्त्री लिंगाची प्रतीक मानतात. अच्छा! म्हणून माझ्या स्वप्नात Tera ( Patrick ) येत
असावी.

घरातील तीन पिढ्यांच्या स्वप्नांचा सारखेपणा
अनुवंशिकतेने माझ्यात आला आणि त्याचे विश्लेषण मला
माहित झाले. आपल्याला पडलेले स्वप्न सांगून आपण
स्वतःच्या सुप्त इच्छा, सवयी , स्वभाव नकळतपणे उघड
करत असतो. आता मी दुसऱ्यांची स्वप्ने कान देऊन ऐकत
असतो. सिग्मंड फ्रॉइडची फुटपट्टी लावून मापात बसतात का ते बघतो. बरेच अंदाज बरोबर ठरतात. बऱ्याचदा
त्याचा मला व्यावहारीक फायदा होतो. त्या विषयावर
सविस्तर लिखाण करीन . सदर लेखाचा विषय ' स्वप्न '
असल्याने आणि मी ' स्वप्नवेंधळा ' असल्याने स्वप्नाप्रमाणे
मांडणी विस्कळीत झाली आहे. घ्या सांभाळून.

XXX

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

29 Oct 2024 - 5:48 am | कर्नलतपस्वी

ही उक्ती खरी असावी. मला सहसा स्वप्ने पडत नाहीत. दिवसभर मनात चाललेला हलकल्लोळ झोपण्याच्या आगोदर लाल बासनात बांधून मेंदूच्या एका कोपर्‍यात ठेवण्याची सवय पूर्वी पासूनच आहे.

तरीसुद्धा भावनांची तीव्रता वाढली की कधी कधी स्वप्नं पडतात पण ती सुद्धा माझ्याच आयुष्यातील निगडित गोष्टींचीच. मृत नातेवाईक, मित्र मंडळी अर्थात जागृतावस्थेत चर्चा झाल्यास किंवा आठवण झाल्यास.निसर्ग नियमानुसार काही स्वप्ने पडणे स्वाभाविकच.त्याला मी अपवाद नाही.

झोपेची एक नियमित वेळ पाळल्याने उठण्याची वेळही निश्चित आहे. या वेळेत गाढ झोप लागते.

मात्र एका विशिष्ट स्वप्नाची अधून मधून जरूर पुनरावृत्ती होते. जागा,वेळ,प्रसंग एक सारखेच.

लेख आवडला. विस्कळीत पणा विषयानुरूप.....

कानडाऊ योगेशु's picture

29 Oct 2024 - 7:01 pm | कानडाऊ योगेशु

जबड्यातील दात ओढल्यास सहज निघून येणे

ह्या प्रकारची स्वप्ने मलाही बर्याच वेळेला पडली आहेत. दात जणु सीताफळाच्या बिया असल्यासारखे सहज निघतात. बर्याच वेळेला झोपेतुन उठल्यावर दात जागेवर आहेत का हे पाहतो.

गवि's picture

29 Oct 2024 - 7:54 pm | गवि

+१

दात पडणे (आपोआप सर्व दात) विना वेदना थेट सर्व दात निघून येणे हे स्वप्न नेहमीचेच. सहा महिने वर्षातून एकदा पडते.

तरुणपणातील "चुका" (जडीबुटीवाल्या वैदू लोकांना स्मरून) उर्फ स्लिप ऑफ हॅण्ड या दात पडण्याच्या स्वप्नांसाठी जबाबदार असतात असे लेखातून कळले.

अर्थात तारुण्यातल्या इतर अनेक चुका या जागेपणी देखील दात पडण्यास कारणीभूत होऊ शकतात हे सांगणे नलगे. त्यापेक्षा हे बरे. दोन्हीकडे स्वप्नरंजन.

सौंदाळा's picture

30 Oct 2024 - 2:52 pm | सौंदाळा

+२
मला दातांची स्वप्ने आधी पडत नसत. पण पिचूफेम तांबेंच्या एका लेखात होते की मृत्यु जवळ आला याची आयुर्वेदातील लक्षणे : त्यात दात पडल्याचे स्वप्न हे एक लक्षण होते.
तेव्हापासून ही दात पडण्याची स्वप्ने पडू लागली.
लेख आवडला. स्वप्नवेंधळा, स्वप्नांची अनुवंशिकता वगैरे मस्तच

पहाटेची स्वप्ने खरी होतात :) पण पहाटेच REM-rapid eyes movement अवस्था असते असे वाचनात आले.मग बऱ्याच लोकांना स्वप्न पहाटेच पडणार ना.. जसं वय वाढतं तसं बऱ्याच भावनांचा योग्य प्रकारे निचरा झालेला असतो.तेव्हा NREM पिरियड वाढून स्वप्न कमी पडतात.
I am lucky, क्वचित स्वप्न पडतं, महिन्यातून एकदाच!