एक उनाड सकाळ....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
26 Oct 2024 - 8:28 pm

m1

नेहमीप्रमाणेच पहाटफुटणीला साखर झोपेतून जाग आली. परसदारातली कोकीळ दापंत्ये आणी बांग देणारा कडकनाथ अजून साखर झोपेतच होते.

विठ्ठल भक्त, मंदिरात कमळापतीची आराधना करत होते.(उगाच राजकीय संदर्भ शोधू नये.) पाण्याची बाटली,भ्रमणध्वनी आणी थोडा आळसावलेला,थोडा सुखावलेला देह घेऊन बाहेर बाल्कनीत येवून बसलो. मन मात्र त्वरेने मंदिरात पोहोचले.

मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥

लाकडी मंडपात काही पारंपरिक काही अधुनिक पोशाखात,सान थोर आया,बहीणी, टाळकरी,कमळापती व गरूडला मध्यभागी धरून रांगेत बसले होते.पखवाजी,पेटीवाला एकमेकाला माना डोलवत दाद देत होते.मी पण, म्हणजे माझे मन,तुळशी वृंदावनाचा आडोसा धरून बसले.तसे पण कुठेही बसा,
त्या सर्वव्यापी सावळ्यापासून कोण लपू शकलाय का? एखादा दुसरा पेंगताना दिसला. भजनाचे सूर कानात अमृत टाकत होते.गेली बारा वर्षे हाच माझा अमृतानुभव.

जय जय विठोबा रखुमाई,जय जय विठोबा रखुमाई.....

उठा उठा साधु संत| साधा आपुले हित|
जाईल हा नरदेह | मग कैचा भगवंत|| ||धृ ||

उठोनि वेगेसी | चला जाऊ राउळासी|
जळती पातकांच्या राशी| काकड आरती देखिलिया||१||

जागे करा रुक्मिणीवरा| देव आहे निदसुरा|
वेगे निंबलोण करा | दृष्ट होईल तयासी || ४ ||

पुढे वाजंत्री वाजती | ढोल दमामे गर्जती |
होते काकडा आरती |पांडुरंग रायाची || ५ ||

सिंहनाद शंख भेरी | गजर होतो महाद्वारी |
केशवराज विटेवरी | नामा चरण वंदितो|| ६ ||

वचन ऐका कमळापती | माझी रंकाची विनंती ||१||
कर जोडितों कथेकाळीं | आपण आसावें जवळीं ||२||
घेई घेई माझी भाक | जरी कां मागेन आणिक ||३||
तुकयाबंधु म्हणे देवा |शब्द इतुकाची राखावा ।
।।४।।

राग : शिवरंजनी + तिलंग
आरोह : सा रे ग प ध सा"
अवरोह : सा" ध प ग रे सा

सभोवार निरव शांतता.हळूहळू गाव जागे होत होते.सूर्योदया बरोबर भक्ता उच्चारवात सुरू झाले,

आरती ज्ञानराज,महाकैवल्य तेजा सेवती साधुसंत.

मग पसायदान, घालीन लोटांगण आणी नंतर प्रसाद.मी पटकन तयार झालो.सदेह मंदिरात पोहोचलो.

अकालमृत्यूहरणं सर्वव्याधिविनाशम् ।
विष्णूपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्हयहम् ।। 1 ।।
शरीरे जर्जरीभूते व्याधिग्रस्ते कलेवरे ।
औषधे जान्हवीतोयं वैद्यो नारयणो हरि: ।।

सारा विश्वास आणी श्रद्धेचा खेळ...तिर्थप्रसाद घेतला,समोरच बजरंगबलीचे दर्शन घेऊन टेकडीवरील ढगाई माता देवळा कडे निघालो.
हल्के धुके पसरले होते.मस्त गुलाबी थंडी,कुठे कुठे हल्के दवबिंदू होते. चहूकडे हिरवळ दाटली होती. पाऊलवाट पकडली.रमतगमत देवळा कडे प्रस्थान केले.
गुडघ्या एवढे कुठे कमरेपर्यंत गवत माजले होते.पक्षी,किटक, फुलपाखरे आणी गावातल्या काळ्या म्हशी व सोबत पांढरे बगळे पण दिसायला सुरवात झाली. माॅर्निग वाॅकर्स इकडे तिकडे लक्ष न देता गंतव्य स्थान जवळ करत होते. मंदिरात आईचे दर्शन घेतले.शेजारी खुल्या व्यायाम शाळेत आबाल वृद्ध कसरत करत होते. त्यांना बगल देऊन, तळ्याकडे मोर्चा वळवला.तळ्यात भरपूर पाढंरी कमळे उमलली/उमलत होती.

शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या, काही उनाड पोरं, सहा,सात, दहा वर्षाची टवाळ्या करत होती. त्यांचा म्होरक्या बाकीच्यांना पाण्यात मस्ती करण्यापासून थांबवत होता. कॅमेरा,दुर्बीण बघून माझ्या भोवती गोळा झाली. काका,काका म्हणत प्रश्न विचारत होते. त्यातली काही माझ्या तर्फे प्रश्नांची उत्तरेही देत होती.ते निरागस बालपण बघून मी भावविभोर झालो.मलाही माझे बालपण आठवले. दुर्बीण मागीतली,कुतुहलाने इकडे तिकडे बघीतले, कॅमेर्‍यात कसे फोटो घेत होतो ते कुतूहलाने बघत होते. त्यांचा चिवचिवाट पक्षांसारखाच. जास्त वेळ थांबू शकले नाहीत. ड्रॅगन फ्लाय सारखी तळ्याच्या काठाने फिरू लागली. थोड्याच वेळात ती मुलं माझ्या बरोबर खुप वर्षाची ओळख असल्या सारखे बिनधास्त बोलत होती. तळ्याच्या दुसर्‍या टोकावरून मला आवाज दिला ,काका,काका बदकाची पिल्लं आणी कासव बघायला या.... थोडावेळ त्या उनाड पोरांबरोबर मीही उनाड झालो.

उनाड पोरं-काका,तुम्हीं दररोज येता.आम्हीं दररोज येतो.
मी- कधी,कधी. आणी शाळा,मी विचारले.
उनाड पोरं- शाळा सुटल्यावर येतो.

ड्रॅगन फ्लाय सारखी उड्या मारत दिसेनाशी झाली.मी सुद्धा घराकडे परत निघालो. पायथ्याशी आल्यावर एकदा मोबाईल, चावी, पाकीट चेक करताना लक्षात आले, कॅमेऱ्याची स्पेअर बॅटरी कुठेतरी पडली. हायला,बोंबला हजार रुपयाचे नुकसान,मी पण जिद्दी, पुन्हा टेकडीवर निघालो.

शांताबाईचे गाणे आठवले,

जाईन विचारित रानफुला
भेटेल तिथे ग सजण(बॅटरी) मला !

भग्न शिवालय परिसर निर्जन
पळसतरुंचे दाट पुढे बन
तरुवेली करतिल गर्द झुला

एके ठिकाणी ड्रॅगन फ्लायचा मोबाईलने फोटो घेताना पडली असावी असा अंदाज. त्या जागेवर पोहचलो,बघतो तर काय!चंदेरी बॅटरी ओल्या गवतावर पहुडली होती.मला बघताच चमकली,आनंदीत झाली.(सुर्यकिरण परावर्तीत होत होते) जणू रडवेल्या सुरात विचारत होती,मला एकटीला सोडून कुठे गेलास. जेव्हढा आनंद मला झाला तेव्हढाच तीला पण...आता मात्र वेगाने खाली परतलो.पोस्ट ऑफिस शेजारील टपरीवर वडापाव आणी चहा ढोसला व घरी जाऊन गरम कांदापोहे रिचवले.

एक उनाड सकाळ मला ययाती सारखे उसने यौवन देऊन गेली......

m2!********m3
__
m4********m5
__
m6********m7
__
m8********m9
__
m9********m10
__
m11********m12
__
m13********m14
__
m15********m16
__
m17********m18

दिवळीच्या शुभेछ्या .

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

26 Oct 2024 - 9:46 pm | श्वेता२४

फुलपाखरांचे फोटो फारच सुंदर आले आहेत

कंजूस's picture

26 Oct 2024 - 10:23 pm | कंजूस

सुंदर.

फोटो छान.
भिमाशंकरला रात्री टोपी हरवली ती मिळाली त्यांची आठवण आली.

प्रचेतस's picture

28 Oct 2024 - 9:44 am | प्रचेतस

तुमच्या दोन्ही तिन्ही आवडी एकाच लेखात उत्तमरीत्या गुंफल्या आहेत.
फोटो एकदम मस्त

कर्नलतपस्वी's picture

28 Oct 2024 - 12:01 pm | कर्नलतपस्वी

वाटलं नव्हतं,वार्धक्य एव्हढं मस्त असतं
इथं दु:ख महाग आणी सुख स्वस्त असतं

ना जाने का डर ना खोने का गम
बांटो खुशीयौं बटोरो गम
यही है जिंदगी जीयो ठाटसे
मत सोचो चले जानेसे
किस कीस की आँखे होगी नम।

कर्नलतपस्वी's picture

28 Oct 2024 - 12:02 pm | कर्नलतपस्वी

मनापासून आभार.

यश राज's picture

28 Oct 2024 - 1:47 pm | यश राज

खुपच सुंदर लिहिलयं आणि फोटो पण छानच

गोरगावलेकर's picture

30 Oct 2024 - 4:27 pm | गोरगावलेकर

फुलपाखरं आणि इतर पक्षांचे फोटो आवडले .

बॅटरी हरवल्याचा किस्सा वाचून यंदाच्या पावसाळ्यात पालघरजवळील काळदुर्ग/ वाघोबाच्या डोंगरावर भटकंती केली होती त्याची आठवण झाली. डोंगर उतरतांना नवऱ्याने चारचाकीची किल्ली हरवली. डोंगर अर्ध्यापर्यंत उतरून झाला होता . आमचे एकदोन जण अजून डोंगर माथ्यावरचा होते . फोनचे नेटवर्क अधून मधून मिळत होते . फोन लागला. त्यांनी नुकत्याच वर आलेल्या लोकांकडे चौकशी केली. एकाने सांगितले मला रस्त्यात एक किल्ली दिसली पण मी उचलली नाही. निश्चित ठिकाण सांगता येणार नाही. किल्ली रस्त्यातच कुठेतरी आहे हे निश्चित झाले . माझ्यात परत वर जायचे त्राण नव्हते , नवऱ्याने एकट्यानेच परत डोंगर चढायला सुरुवात केली . तुरळक लोक असल्याने उतरणाऱ्या प्रत्येकाकडे किल्लीबद्दल विचारणा सुरु होती. कॉलेजवयीन चारपाच मुला - मुलींचा ग्रुप समोर आला. चौकशी करताच, हो आम्हाला सापडली आहे काका, आम्ही खाली मंदिरात देणारच होतो असे म्हणत किल्ली हवाली केली .

कर्नलतपस्वी's picture

30 Oct 2024 - 7:41 pm | कर्नलतपस्वी

भटकंती मधे बहुतेक सर्वांनाच काहीतरी हरवण्याचा अनुभव हमखास येतोच. काही भाग्यवान ज्यांना हरवलेले गवसले.

बडोद्याच्या सामाजीक बागेत बॅटरी हरवली होती पण ती सापडली.

गणपतीपुळे येथील लाॅजवर पेन ड्राईव्ह विसरला होता. सारे पासवर्ड, महत्वाची माहीती होती. अचानक आठवले. साठ किलोमीटर पुन्हा परत गेलो व मालकांकडून परत मिळाला.

प्रतिसाद व फोटो बद्दल धन्यवाद.