सर्व मिपाकरांना सप्रेम नमस्कार, विनंती विशेष,
श्री गणेश लेखमाला सफल संपूर्ण झाली की मिपाकरांना वेध लागतात ते आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असलेल्या "मिपा दिवाळी अंकाचे".
सदर धाग्याच्या माध्यमातून, मराठी आंतरजालावर सुमारे दीड दशकांहून अधिक काळ विविध विषयांना वाहिलेले दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करण्याच्या आपल्या समृद्ध आणि अभिमानास्पद परंपरेचे पालन करत यंदाच्या, म्हणजे मिपा दिवाळी अंक २०२४ ची घोषणा आणि सर्व मान्यवर लेखक मंडळींना लेखनासाठी विनम्र आवाहन करताना "टीम दिवाळी अंक"च्या सदस्यांचा ऊर आनंदाने आणि उत्साहाने भरून आला आहे.
मिपा दिवाळी अंकाची घोषणा आणि लेखकांना जाहीर आवाहन करणारा धागा प्रकाशित झाला की त्यातला सर्वात जास्त कुतूहलाचा भाग असतो तो म्हणजे दिवाळी अंकाची "थीम".
२०२४ हे वर्ष मराठी भाषिकांसाठी विशेष महत्वाचे ठरवणाऱ्या दोन गोष्टी यंदाच्या दिवाळीपूर्वी घडल्या आहेत तर एक गोष्ट दिवाळीनंतर घडू घातली आहे. ह्यातल्या घडलेल्या पैकी पहिली गोष्ट म्हणजे यंदाच्या गणेश चतुर्थीला मिपाने आपल्या वयाची १८ वर्षे पूर्ण करून 'प्रौढ' वयात पदार्पण केले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुकताच आपल्या प्राणप्रिय मायमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे, आणि दिवाळीनंतर घडू घातलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याची "विधानसभा निवडणूक".
वरीलपैकी पहिल्या दोन्ही गोष्टी 'मराठी अभिरुची आणि मराठी अस्मितेच्या' दृष्टीने मिपाकर आणि एकंदरीतच मराठी भाषाप्रेमींसाठी खचितच विशेष अभिमानास्पद आहेत तर "निवडणुका आणि राजकारण" हा तर बहुसंख्य मिपाकरांच्या अत्यंत आवडीचा चर्चा विषय आहे!
तर मंडळी ह्या तीनही महत्वपूर्ण गोष्टी/घटनांची विशेष दखल घेऊन यंदाच्या मिपा दिवाळी अंकासाठी जी "मिश्र थीम" ठरवण्यात आली आहे तिच्या विभागवार लेखन विषयांचे स्वरूप खाली दिल्याप्रमाणे,
- "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४"
- "मराठी: अभिजात भाषा दर्जा प्राप्तीचे संभाव्य फायदे / सकारात्मक परिणाम"
- "मिपा १८+" (चावट/शृंगारिक कथा, कविता आणि लेख)
गेल्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात "न भूतो, न भविष्यती" अशा अनेक घडामोडी घडल्या आहेत, ज्यात काही नवीन नैसर्गिक/अनैसर्गिक युत्या आणि आघाड्यांचा जन्म आणि अंत, प्रमुख प्रादेशिक पक्षांचे दुभंग आणि त्यातून निर्माण झालेले कायदेशीर पेच-प्रसंग, पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाविषयीच्या याचिका आणि खटले, आरोप-प्रत्यारोप अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.
वरील घटनांचे सर्वसामान्य मतदार आणि संबंधित पक्षांचे कार्यकर्ते ह्यांच्या मन:स्थितीवर आणि राजकीय दृष्टिकोनावर झालेले सकारात्मक/नकारात्मक परिणाम, तब्बल २८८ विधानसभा मतदारसंघांत होणाऱ्या ह्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या दोन राष्ट्रीय आणि चार मुख्य प्रादेशिक पातळीवरील पक्षांची प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती आणि जनमानसातील त्यांची प्रतिमा, पक्षांतर्गत हेवे-दावे आणि कुरघोड्या, संभाव्य बंडखोरीची शक्यता, मध्यंतरी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल असे अनेक पैलू असल्याने ह्या लेखन विषयाचा आवाका बराच मोठा आहे.
मिपावर राजकीय घडामोडींवर अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक लेखन करणाऱ्या सिद्धहस्त लेखकांची मांदियाळी सर्वज्ञात आहे. प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती, जुने-नवे राजकीय संदर्भ, सामाजिक समीकरणे, जातीय-धार्मिक ध्रुवीकरण, ह्या आधीच्या निवडणुकांतील मतदानाची टक्केवारी/आकडेवारी ह्यापैकी एका किंवा अनेक अंगांना स्पर्श करत अभ्यासू लेखकांनी विश्लेषणात्मक लेख, निवडणूक निकालाविषयीचे आपले तर्काधारित अंदाज / भाकिते वर्तवून ह्या लेखन विषयाची शोभा वाढवणे अपेक्षित आहे.
अर्थात केवळ विश्लेषणात्मक लेख, अंदाज आणि भाकितांपुरती ह्या विषयाची व्याप्ती मर्यादित नसून राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सत्य/काल्पनिक कथा, कविता, व्यंगचित्रे, विनोदी किस्से आणि अनुभवाधारित, जसे की एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता ह्या नात्याने आपल्याला आलेले बरे-वाईट अनुभव तसेच कॉलेज/विद्यापीठ, ग्राम पंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगर पालिका, जिल्हा परिषद, विधानसभा/विधानपरिषद/पदवीधर किंवा शिक्षक मतदार संघातून आमदारकीची किंवा थेट खासदारकीची अशी कुठलीही निवडणूक पक्षाचा अधिकृत उमेदवार किंवा अपक्ष उमेदवार म्हणून लढवली असल्यास त्यात मिळालेल्या जय किंवा पराजयाचा किंवा उमेदवारीचा एकंदरीत अनुभव, निवडणूक प्रक्रियेत 'इलेक्शन ड्यूटी' बजावताना आलेले बरे/वाईट/गमतीशीर अनुभव व्यक्त करणाऱ्या लेखनाचेही स्वागतच आहे, फक्त विषय महाराष्ट्र राज्यापुरताच मर्यादित असावा एवढीच माफक अपेक्षा.
मंडळी, अकरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जवळपास अडीच हजार वर्षे प्राचीन आणि समृद्ध वारसा लाभलेल्या आपल्या मायमराठी भाषेला नुकताच 'अभिजात' भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो म्हणजे नक्की काय होते? तो मिळण्यासाठीचे निकष काय असतात? त्याचे भाषेच्या समृध्दीवर काय सकारात्मक परिणाम होऊ शकतात? भाषावृध्दीसाठी त्याचा काही उपयोग होऊ शकतो का? मराठीला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले? अनेक वर्षांपासुन सरकार दरबारी ही मागणी कोणी लावून धरली होती? अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारे माहितीपूर्ण लेखन "मराठी: अभिजात भाषा दर्जा प्राप्तीचे संभाव्य फायदे / सकारात्मक परिणाम"ह्या लेखन विषय विभागात अपेक्षित आहे.
नुकतीच मिपाने आपल्या वयाची १८ वर्षे पुर्ण केली आहेत. वयाने 'प्रौढ' झालेल्या मिपाला त्याबद्दल साजेशी मानवंदना देणे क्रमप्राप्त आहे!
तर लेखक मंडळी, "मिपा १८+" ह्या लेखन विषय विभागासाठी आपण चावट / शृंगारिक कथा, कविता, लेख आणि आपल्या विद्यार्थीदशेत ऐकलेल्या चावट विनोदांचा संग्रह पाठवू शकता. अर्थात ह्या लेखन विषय विभागासाठी पाठवलेले लेखन बीभत्स किंवा अश्लीलतेकडे झुकणारे नसावे ही एकमेव अट आहे ह्याची नोंद घ्यावी.
दिवाळी अंकाकरिता मिश्र थीम असली तरी थीम बाह्य लेखनाचेही (कथा, कविता, ललितलेखन, विज्ञान-तंत्रज्ञानाधारित लेख, प्रवासवर्णन, पाककृती, भाषांतर आणि व्यंगचित्रे इत्यादी.) प्रतिवर्षी प्रमाणे सहर्ष स्वागतच आहे!
तर सर्व मान्यवर लेखक मंडळींनो, मिपा दिवाळी अंक २०२४ची घोषणा करण्यास झालेल्या काहीश्या विलंबासाठी दिलगिरी व्यक्त करून आपल्यापाशी उपलब्ध असलेल्या कमी वेळात आपल्या सक्षम लेखण्या सरसावून प्रतिवर्षीप्रमाणेच यंदाचा दिवाळी अंकही वैविध्यपूर्ण आणि बहारदार करण्यासाठी आपापले योगदान देण्याची आग्रहपूर्वक विनंती ह्या जाहीर आवाहनाच्या माध्यमातून करीत आहोत.
थोडक्यात पण महत्वाचे:
- लेखन देण्याची अखेरची तारीख २० ऑक्टोबर २०२४ आहे.
- दिवाळी अंकासाठी कृपया कुठलेही पूर्वप्रकाशित लेखन पाठवू नये.
- आपले लेखन आपण साहित्य संपादक आयडीवर व्य,नि. द्वारे पाठवू शकता (त्यासाठी येथे क्लिक करा)
- किंवा sahityasampadak.mipa@gmail.com ह्या आयडीवर ईमेलद्वारेसुद्धा लेखन पाठवू शकता.
- आपण जर ईमेलद्वारे लेखन पाठवले असेल तर प्रेषक म्हणून आपला "मिपा आयडी" लिहायला कृपया विसरू नका.
लेखक मंडळी, सकस लेखनसाठी आपणा सर्वांना भरघोस शुभेच्छा!
आपल्या दर्जेदार लेखनाच्या प्रतीक्षेत आहोत,
- टीम मिपा दिवाळी अंक
प्रतिक्रिया
6 Oct 2024 - 6:36 am | प्रचेतस
लैच भारी.
6 Oct 2024 - 10:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिवाळी अंकासाठी शुभेच्छा. अठरा प्लसच्या गोष्टी, कथा, अनुभव वाचायला आवडतील.
-दिलीप बिरुटे
7 Oct 2024 - 1:07 pm | आग्या१९९०
प्रमाण भाषा सोडून रांगड्या, पांढरपेशांना अश्लील वाटू शकणाऱ्या आपल्या बोलीभाषेत लिहिणाऱ्या मिपाने उडविलेल्या आयडींचे सदस्यत्व पुनर्जीवित करावे. मिळमिळीत शृंगारिक लेखात मजा नाय.
6 Oct 2024 - 5:03 pm | जव्हेरगंज
क्या बात है !!! खतरनाक . आजपर्यंतचा सगळ्यात डेयरींगबाज विषय ;)
6 Oct 2024 - 6:11 pm | चौथा कोनाडा
व्वा...
आलं एकदाचं निवेदन.
चावट शृंगार कथा.. लै भारी विषय... कोण कोण काय काय लिहितेय याची उत्सुकता आहे.
सर्व सहभागी लेखकांना लेखानासाठी भरभरून शुभेच्छा.
या वर्षी मिपा दिवाळी अंक येणार की नाही ही चिंता आणि अनिश्चितता संपली... ऑल डी बेस
6 Oct 2024 - 7:17 pm | अमरेंद्र बाहुबली
शुभेच्छा. माझा अंक आजच राखून ठेवतो.
6 Oct 2024 - 7:48 pm | कपिलमुनी
या अभिजात मराठीतून थीम शब्द वगळा.. रूपरेषा, विषय वगैरे वापरा..
6 Oct 2024 - 10:52 pm | नठ्यारा
आयशप्पत,
हे कसं शक्यंय ?
हे म्हणजे दारू प्यायला हवीये, पण इथेनॉल नको. ऐसा कैसा चलेगा भिडू ? इथेनॉल नायतर मिथेनॉल थोडंच पिणार ?
-नाठाळ नठ्या
8 Oct 2024 - 2:18 pm | चौकस२१२
दारू ढोसणे = अश्लील बीभत्स
दारूचा आस्वाद घेणे = शृंगारिक / मादक
जयंत दळवीनचच्य्या कथेतील कामुकता किंवा आरती प्रभूंचं कथेतील कामुकता आणि पिवळी पुस्तके यतिल फरक जो तोच
शृंगारिक , मादक = आज पहाटे श्रीरंगाणने मजला पुरते लुटले ग
साखरझोपेमध्येच अलगद प्राजक्तासम टिपले ग
बीभत्सेकडे कडे झुकणारे = पोरी जरा जपून दांडा धर
7 Oct 2024 - 9:36 am | सुबोध खरे
सुंदर चेहऱ्याचा मुका कोणाला आवडत नाही?
यात दोन अर्थ आहेत पण तरीही हे अश्लील किंवा बीभत्स वाटत नाही.
7 Oct 2024 - 5:15 pm | चौथा कोनाडा
लै भारी...
हे वाक्य पहिल्यांदाच ऐकलं / वाचलं...
हा हा आ
हसलो...
द्विअर्थी चित्रपट पुरस्कार विजेते दादासाहेब कोंडके यांना विनम्र अभिवादन
9 Oct 2024 - 9:11 am | भागो
आणि हे एक,
"अकरा वाजले. चला, जवळजवळ झोपायची वेळ झाली आहे."
24 Oct 2024 - 2:30 pm | चौथा कोनाडा
या विनोदाबद्द्ल https://www.misalpav.com/node/52548 या धाग्यातल्या यु ट्युब लिन्क मध्ये खतरनाक किस्सा आहे !
हा हा हा !
25 Oct 2024 - 7:27 pm | आग्या१९९०
' जवळजवळ झोपायची वेळ झाली ' हा विनोदी संवाद सत्तरच्या दशकात ' गाढवाचं लग्न ' ह्या वगनाट्यातील सावळा कुंभार आणि गंगी ह्यांच्यामुळे खूप फेमस झाला होता.
26 Oct 2024 - 6:24 pm | चौथा कोनाडा
हा .... हा .... हा .... !
' गाढवाचं लग्न ' आणि "विच्छा माझी पुरी करा" म्हंजे नुसता दंगा असायचा. काय धम्माल यायची .. प्रेक्षक गडाबडा लोळायचे .. हसुन हसुन मुरकुंडी वळायची !
प्रासंगिक सामाजिक आन राजकिय पंचेस अफलातुन असायचे !
गेले ते दिवस !
7 Oct 2024 - 10:29 am | Bhakti
बाई...आधीच इथे पुरूषांचा वावर अधिक,आणि ही' थीम :) यावं की नाही इथे दिवाळीत ;) एखादा पुरुषाच्या नावाचा डूआयडी काढून ठेवायला पाहिजे होता.
खुप खुप शुभेच्छा!
मराठी भाषेचा इतिहास वाचायची उत्सुकता _/\_
8 Oct 2024 - 5:24 pm | प्रसाद गोडबोले
हा हा हा
अहो भक्ती ताई, तुम्हाला म्हाहीत नाही पुर्वी इथे पाशवी शक्तींचा इतका सुळसुळाट होता कि मिपा प्रशासनाने त्यांना स्वतंत्र दालन काढुन दिलं होतं !
महा म्हणजे त्याला जे नाव दिलेले होते ते एका कोळ्याच्या प्रजातीचे नाव होते , बेकार हसलेलो. पण तोही प्रतिसाद उडवण्यात आला होता . त्याकाळी कित्येक मिपाकर वैतागुन लिहायचे बंद झाले होते तेव्हा :(
असो , मिपावरचे कोळी गेले, जळमटं हटली , आता कुठे थोडी मोकळी हवा खेळेल अशी आशा निर्माण झाली आहे . मला नाही वाटत की कोणीही सभ्यता सोडुन काहीही अश्लाघ्य असे लेखन करेल .
रादर , शॄंगारिक लिहिता येणे हीच मुळात एक परिक्षा असते कारण त्यात अश्लीलता असभ्यता आणि शॄंगार आणि मादकता ह्याती सीमा सांभाळावी लागते . बघु किती जणांना जमते ते !!
8 Oct 2024 - 5:46 pm | चौथा कोनाडा
मिपाकर कन्या/महिला गौरी देशपांडे शैलीत "धीट" कथा लिहू शकतात्च की ...किंबहुना लिहावीच आणि आपल्यातील प्रतिभेचे दर्शन घडवावे.. उत्तम संधी आहे व्यक्त होण्याची !
16 Oct 2024 - 7:40 pm | अकिलिज
शेक्सपिअर नावाचा 'क्ष' चित्रपटात कामं करणार्या नटाची मुलाखत होती. त्याने सांगितलं की अश्या चित्रपटांना दिग्दर्शित करणार्यांमध्ये स्त्रियांचे बर्यापैकी प्रमाण आहे. उगाचच टॅबू बनवून ठेवला आहे.
23 Oct 2024 - 4:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महिला आयडी घेऊन महिलांना व्यनीमनीच्या गोष्टी करणारे मिपावर होऊन गेले आहेत.
होऊन गेले आहेत म्हणजे आताही अदलून बदलून येत असतील वाटतं. =))
-दिलीप बिरुटे
=))
7 Oct 2024 - 11:06 am | सौंदाळा
जबरदस्त विषय आहेत.
अंक नेहमीप्रमाणेच बहारदार होणार यात शंकाच नाही.
7 Oct 2024 - 12:54 pm | अथांग आकाश
भारीच! अंकाची वाट बघतोय!!
लेखक आणि दिवाळी अंक टीमला शुभेच्छा!!!
9 Oct 2024 - 8:30 am | भागो
अंक?
ओह. अंक होय. माझा गैरसमज झाला!
7 Oct 2024 - 8:36 pm | मनिष
मी लिहितो यावेळेला.
या तीन थीम पलीकडचे लेखन चालेल ना?
9 Oct 2024 - 10:19 am | चौथा कोनाडा
चालेल का.? म्हणजे काय.. अहो धावेल.. पळेल..
असं आवाहनात म्हटलंच आहे की.
सहर्ष स्वागत आहे. जरूर लिहा )
(एक टीप : राजकारण अति झालंय, टीव्ही, यू ट्यूब फेसबुक सोशल मीडिया यां वर सतत हेच ऐकून माझा जीव कंटाळलाय.. मी तरी राजकारणावरील वाचेन असं वाटत नाही.
१८+ साहित्य .. त्ते तर आमचे जीवन सत्व आणि जवान सत्व.. डॉक्टरांनी लिहून दिलंय म्हणजे तो डोस तर घ्यायलाच हवा )
कोणत्याही विषयावर बिनधास्त लिहा.. नक्की वाचणार आणि कमेंट देणार शुअर.
होऊन जाऊ द्या लेखन सुरू
8 Oct 2024 - 2:07 pm | चौकस२१२
" महाराष्ट्र्र विधानसभा गेली ५ वर्षे" यावर लिहावे म्हणतो त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची घटना कुठे मिळेल काय ?
9 Oct 2024 - 3:25 pm | राघव
पक्षघटने बद्दल माहित नाही. पण लिहायचे असेल तर जास्त कष्ट न घेता लिहिता येईल की.. :-)
फार नाही.. अबांचे दोन-तीनशे प्रतिसाद संगतवार लावून छापून द्यायचे.. हाय काय नि नाय काय!
हघे. ;-)
9 Oct 2024 - 3:49 pm | चौथा कोनाडा
खरं तर त्या त्या पक्षाच्या संकेतस्थळावर हवी !
पन मी काय म्हंतो ....... सध्याच्या परिस्थितीत राजकिय पक्ष आन त्यांच्या घटना / संविधान यांचा संबंध येतोच कुठे ? (रोज एकमेकांवर वाट्टेल ते आरोप करत असतात.. आन त्यातला एक ही सिद्ध होत नाही ! ) कधी तरी अडचणीत आले आन सारवासारव करायला काही नसलं की पक्षघटनेची यांना आठवण येते !
हे पक्षघटनाच्या नादी लागलं नाही तर लेख लिहिण्याच्या वेळ वाचेल ... अन मिळालीच तर ते मुद्दे नंतर कसे जोडता येतील हे बघता येईल !
10 Oct 2024 - 5:00 am | चौकस२१२
राजकिय पक्ष आन त्यांच्या घटना / संविधान यांचा संबंध येतोच कुठे ?
येतो त्यावर तर मला लिहायच आहे आणि संपादकांची काही हरकत नाही( नागरिक शास्त्राच्या दृष्टितनेतून) मुळात गोम तिथेच आहे हा मुद्दा आहे माझा कसे ते सविस्तर आणि इतर समांतर उद्धरणे देऊन पण त्यासाठी आधी या घटना हाती पडल्या तर पुढे
10 Oct 2024 - 8:23 pm | चौथा कोनाडा
व्वा .... मंग तर भारीच व्हईल की !
10 Oct 2024 - 8:23 pm | चौथा कोनाडा
व्वा .... मंग तर भारीच व्हईल की !
10 Oct 2024 - 8:38 am | अथांग आकाश
इथे मिळेल https://www.eci.gov.in/constitution-of-political-party
8 Oct 2024 - 9:34 pm | चित्रगुप्त
सध्या AI निर्मित शृंगारिक चित्राबद्दल बरेच प्रयोग रसिक मंडळी करत आहेत, त्यातलाच मीही एक. अर्थात तसली चित्रे मिपावर कितपत चालतील ही शंकाच आहे. यात "बीभत्स किंवा अश्लीलतेकडे झुकणारे नसावे ही एकमेव अट" असली तरी अश्लीलतेची नेमकी मर्यादा कुठून सुरु होते, याबद्दल काही मार्गदर्शन मिळाल्यास उत्तम. वाटल्यास अशी काही चित्रे व्यनिद्वारे सध्या पाठवू शकतो. कळवावे.
9 Oct 2024 - 4:20 pm | सौंदाळा
दिवाळी अंक आणि शृंगारिक चित्र म्हटले की 'आवाज' हा दिवाळी अंक पटकन डोळ्यासमोर येतो. अजुनही मगदूम आणि पाटकर दोघांचेही 'आवाज' दिवाळी अंक आवर्जून वाचतो.
9 Oct 2024 - 6:45 pm | राघव
आवाज, जत्रा.. !
तसंच मला त्या "बोलक्या रेषा" पण आठवल्या पटकन!
10 Oct 2024 - 8:21 pm | चौथा कोनाडा
अगदी खरंय ! 'आवाज' हा दिवाळी अंकाने इतिहास रचला अन मग बाकी त्याचे अनुकरण करू लागले.
मेनकाने देखील शृंगारिक साहित्य प्रकारात स्वतः एक उच्च दर्जा राखला होता हे ही आठवते.
आता मिपा दिवाळी २०२४ मधील या विभागाला पुढील पैकी एखादं नाव देता येईल !
10 Oct 2024 - 8:39 pm | प्रचेतस
पूर्वी 'काकोडकर दिवाळी' नामक दिवाळी अंक तसल्या साहित्यासाठीच प्रसिद्ध होता असे इथल्या चोखंदळ वाचकांना स्मरत असेलच.
11 Oct 2024 - 8:16 pm | चौथा कोनाडा
येस्स... आठवला...
जाणकार मिपाकरांनी या वर एक लेख लिहायला हरकत नाही.
नाव, उदाहरणार्थ :
दिवाळी अंकातील शृंगारिक अभ्यंग स्नान
9 Oct 2024 - 5:50 am | कर्नलतपस्वी
उत्सुकतेने वाट बघतोय.
सर्व लेखक वाचक मिपाकरांना शुभेच्छा.
14 Oct 2024 - 11:34 pm | बिपीन सुरेश सांगळे
संपादक मंडळ ,
कथा नक्की पाठवतो .
विषय १८+
मर्यादा राखतो तरी पाहून घेणे .
आभार
17 Oct 2024 - 10:10 pm | बिपीन सुरेश सांगळे
संपादक मंडळ ,
नमस्कार .
सगळ्यात आधी ,या वर्षीचे विषय आपण भारी निवडले आहेत . तिन्ही .
आपल्या अंकासाठी मी - चांदके पार - ही कथा पाठवली आहे . १८ + साठी .
अंकाला खूप शुभेच्छा !
25 Oct 2024 - 10:23 am | भागो
हा घ्या अजून एक.
माझ्या मित्राने बेडरूम मध्ये एका नग्न स्त्रीचे कॅलेंडर आणून लावले.
बायको म्हणाली, "अरे तू म्हणजे अगदी ताळतंत्र सोडलेस. नागड्या बायकांची कॅलेंडरं लावतो आहेस."
"अगं ती नागडी थोडीच आहे? नीट बघ. पायात मोजे घातले आहेत बघ."