कोरोना काळात एका इंग्रजी लेखाचे हे मी केलेले स्वैर भाषांतर आहे. ते मी मायबोलीवर टाकले होते. पण मिसळपाववर टाकले नव्हते. ते आज लक्षात आल्याने इथे चिकटवत आहे.
महाभारतात कर्णाने भगवान श्रीकृष्णांना विचारले -
"माझा जन्म होता क्षणी माझ्या आईने मला सोडले. मी अनौरस मूल म्हणून जन्माला आलो. हा काय माझा दोष आहे?"
"मी क्षत्रिय नसल्यामुळे मला द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेता आले नाही.
याच्या उलट, मी कुंतीपुत्र म्हणजे क्षत्रिय असल्याचे कळल्यावर, परशुरामांनी मला शाप दिला. म्हणे "त्यांनी मला जे काही शिकवलं, ते मला आयत्या वेळेला आठवणार नाही."
"एकदा एका गायीला चुकून माझा बाण लागला. खरंतर त्यात माझा काहीच दोष नव्हता. पण तरीही त्या गाईच्या धन्याचा शाप मला झेलायला लागलाच."
"द्रौपदीच्या स्वयंवरात तर सूतपुत्र म्हणून चक्क माझी बदनामीच केली गेली."
"कुंतीनेही मला माझ्या जन्माचे रहस्य सांगितले. पण कधी सांगितले? सर्वात शेवटी. तेही तिच्या इतर मुलांना माझ्यापासून वाचवण्यासाठी."
"मला आजवर जे जे काही मिळाले ते फक्त दुर्योधनाच्या औदार्यामुळेच मिळाले आहे.
असे असताना, मी त्याची बाजू घेतोय, हे चुकीचे कसे काय असू शकते?"
** भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिले,
"कर्णा, माझा जन्म तुरूंगात झाला होता."
"जन्म झाल्यावर मृत्यू होतो. पण कंसाच्या रूपाने, माझं मरण माझ्या जन्माच्याही अगोदरापासून माझी वाट बघत होतं."
"ज्या रात्री माझा जन्म झाला, त्याच दिवशी माझी आई वडिलांपासून ताटातूट झाली. "
"लहानपणापासून तू तलवारी, रथ, घोडे, धनुष्य-बाणांचे आवाज ऐकतच मोठा झाला आहेस. मला फक्त गायींच्या कळपामध्ये गायींचे हंबरणे ऐकायला मिळाले. त्याच्यासोबत मिळालाय गोमूत्र व शेणाचा वास. मला चालायलाही येत नव्हतं, त्या वयांत माझ्यावर प्राणघातक हल्ले झाले आहेत."
"सगळ्यांच्या अडचणींना मीच कारणीभूत आहे, असंच लोकांना नेहमी वाटत असे.
ना मला योग्य शिक्षण मिळाल होतं, ना माझ्याकडे सैन्य होतं. अशा परिस्थितीत मी काय करू शकत होतो? त्यामुळे जरासंधापासून सगळ्यांना वाचविण्यासाठी मला माझा संपूर्ण समुदाय यमुनेच्या किनाऱ्यावरून लांब समुद्रकिनारी हालवावा लागला. पण मला मात्र त्यावरून पळपुटा ही पदवी कायमची चिकटली."
"जेव्हा तुमच्या शिक्षकांकडून तुमच्या शौर्याचे कौतुक केले जात होते तेव्हा मी मात्र शिक्षणाला पारखा झालेलो होतो. मला सांदिपनीं ऋषींच्या आश्रमात प्रवेश कधी मिळाला माहितेय? सोळाव्या वर्षी. हे काय वय आहे शिक्षणाला सुरवात करायचे?"
"तुम्हाला तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करता आलंय. पण जिच्यावर माझं खरंखुरं प्रेम होतं, तिच्याशी मी नाही लग्न करू शकलो. माझं लग्न अशा मुलींशी झालंय की ज्यांना मी पसंत होतो. पण माझ्या पसंतीचे काय? तुरूंगातून सुटलेल्या अभागी स्त्रियांबरोबर मला लग्न करावे लागलंय. ते ही, निव्वळ त्यांच्या आयुष्याचं मातेरं होऊ नये म्हणून. आणि ही जबाबदारी माझ्या गळ्यात का आली? तर मीच त्यांची तुरूंगातून सुटका केली होती. वारे खासा न्याय!!!"
"जर दुर्योधन युद्धात जिंकला तर तुला त्यातले बरेच श्रेय मिळेल. पण धर्मराजाने युद्ध जिंकल्यास मला काय मिळणार आहे? केवळ युद्धाचा दोष मला चिकटणार आहे आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व समस्यांबद्दल बोलताना माझ्याकडे बोट दाखवले जाणार आहे."
"कर्णा, एक गोष्ट लक्षात ठेव. प्रत्येकाच्या जीवनात आव्हाने ही असतातच. ही आव्हाने नेहमीच न्याय्य असतात किंवा सोपी असतात असं मी म्हणत नाहीये."
"योग्य काय? व अयोग्य काय? हे आपल्या अंतर्मनाला बरोबर ठाऊक असते. त्यानुसार योग्य तीच प्रतिक्रिया आपणाकडून अपेक्षीत असते. मला एवढेच कळते की, आपल्यावर किती अन्याय झाला, आपली किती वेळा बदनामी झाली वगैरेची सावली आपण घेत असलेल्या निर्णयावर पडली नाही पाहिजे."
"आपण पदोपदी आपल्या मनाला हे सांगितले पाहिजे की, माझ्यावर झालेला अन्याय, मला दुसऱ्यांशी अन्यायाने वागण्याची सवलत देत नाही. आपल्यावर झालेला अन्याय जेवढा मोठा, तेवढ्या प्रमाणात आपल्या मनाला हे समजवण्याची आपली जबाबदारी वाढत असते."
"एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला लागते. आपल्या जीवनांत अवघड प्रसंग येतात व जातात. पण ते प्रसंग आपले नशीब घडवत नसतात; तर त्या अवघड प्रसंगात आपण घेतलेले निर्णय आपले नशीब घडवत असतात."
-----------------------------------------------------------
कोरोना नव्हे तर घरातून बाहेर न पडण्याचा निर्णय, आपले व भारताचे नशीब घडवणार आहे.
प्रतिक्रिया
22 Aug 2024 - 10:09 pm | धर्मराजमुटके
छान !
शेवटच्या वाक्यात तुम्हाला पुर्ण कथेचे सार सांगायला जमले आहे बुवा ! माजी मुख्यमंत्र्यांचे तुम्ही एवढे मोठे चाहते आहात हे मला आजच कळाले.
तळटीप : वरील प्रतिसाद हा विनोदासाठी केलेली वाक्यरचना आहे याची कृपया नोंद घ्यावी.
23 Aug 2024 - 5:48 pm | कर्नलतपस्वी
हा.......हा........हा......
22 Aug 2024 - 11:35 pm | प्रसाद गोडबोले
पुरावा काय ?
सदर संवाद घडला ह्याला पुरावा काय ? महाभारतातील कोणत्या पर्वात आहे वरील संवाद ?
23 Aug 2024 - 8:49 am | प्रचेतस
असा संवाद महाभारतात नाही.
23 Aug 2024 - 5:56 pm | कर्नलतपस्वी
हल्लीच्या लेखकांचे रामायण, महाभारत वाचून असेच म्हणावे लागेल.
संवाद जरी काल्पनिक असला तरी त्यात तथ्य आहे.
लेख आगोदर वाचला होता आणी पटला सुद्धा.
रडगाणे गाण्यापेक्षा रणगाड्याचा उपयोग करून परिस्थिती वर मात करणेच उचित.
तररी कृष्ण कर्ण संवाद वाचून एक जाहीरात आठवली.....
"तेरी कमीज से मेरी कमीज जादा मैली क्यों है..."
23 Aug 2024 - 5:40 pm | कॉमी
महाभारताचे वास्तव दर्शन नामक पुस्तक तुम्हाला व प्रचेतस ह्यांना आवडेल असे वाटते. (वाचलेही असेल) अनंत दामोदर आठवले हे लेखक आहेत. महाभारतावर आधारीत ज्या काही कथा कादंबऱ्या आहेत त्यावर सडकून टीका केली आहे. मला लेखक आक्रस्ताळी वाटला पण करमणूक झाली.
23 Aug 2024 - 8:06 pm | कर्नलतपस्वी
महाभारताचे वास्तव दर्शन” चकटफू पिडीऐफ अंतरजालावर आहे.उतरून घेतले आहे वाचतो.
1 Sep 2024 - 11:11 am | प्रसाद गोडबोले
पुस्तकाची पीडीएफ इन्टरनेट वर मिळाली, वरवर चाळत असताना पुस्तक आवडले असल्याने हार्डकॉपी विकत घेऊन वाचेन !
सुंदर पुस्तक सुचवल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद :)
1 Sep 2024 - 7:02 pm | कॉमी
वेलकम.
23 Aug 2024 - 1:26 am | श्रीगणेशा
संवाद आवडला!
तो खरोखर घडला असेल किंवा नाही, काहीच फरक पडत नाही. तो लिहिला आणि वाचला गेला, हे महत्त्वाचं.
23 Aug 2024 - 12:32 pm | कंजूस
पौराणिक कथा माहीत असतात त्या एक दोन वाक्यांत सांगून कोण कसा बरोबर किंवा चुकिचा वागला सांगण्याचा प्रयत्न आहे. तसं काही घडलं का नाही गौण आहे.
लेखाचा मुद्दा काय तर अवघड समयी कसे वागावे किंवा निर्णय घ्यावा. याबाबतीत काही उदाहरणे आपल्याला काही उद्योगपतींच्या चरित्रांतून मिळतील. म्हणजे काय अडचणी आल्या आणि त्यांनी कसा मार्ग काढला. शेट लालचंद हिराचंद, किर्लोस्कर, धिरूभाई अंबानी, टाटा , घनश्याम बिर्ला इत्यादी.
काही प्रसिद्ध लोकांचीही उदाहरणे आहेत. शरद बाविस्कर, वि.द.घाटे, प्र. के. अत्रे इत्यादी.
23 Aug 2024 - 7:38 pm | प्रकाश घाटपांडे
कृष्ण व कर्ण यांना वेगळे संवाद देउन अजून काही कथा निर्माण होउ शकतात. बर्याचदा बोधकथा लिहिणार्याला अगोदर काय बोध द्यायचा आहे हे माहित असते त्यानुसार तो कथा पाडतो. त्यामुळे एक तत्वक्रीडा म्हणून याकडे पाहता येईल
24 Aug 2024 - 1:41 pm | Bhakti
असे पौराणिक, ऐतिहासिक कथांसंबंधी स्वैर लेखन करतांना लेखकाने तिथे 'याचा ... ग्रंथाशी कोणताही संबंध नाही,विचार पूर्णपणे लेखकाचे आहेत ' हे नमूद करणं खुप महत्वाचे आहे.ज्ञानाचा प्रसार व्हावा,अज्ञानाचा नाही!
आताच उठो द्रौपदी' ही पुष्यमित्र उपाध्याय यांची प्रसिद्ध कविता मला अटलबिहारी वाजपेयी लिखित म्हणून कायप्पावर मिळाली आहे... हम्म!
24 Aug 2024 - 1:44 pm | Bhakti
सुनो द्रौपदी*
26 Aug 2024 - 6:31 am | चित्रगुप्त
लेखातील काल्पनिक संवाद आवडला.