चतुर्थी, षष्ठी आणि प्रथमा.

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
15 Aug 2024 - 11:55 pm

प्रस्तावना : मला व्याकरण हा विषय , त्यातही विशेष करुन संस्कृत व्याकरण फार आवडते !
संस्कृत तर साक्षात देववाणी देवाची वाणी षष्ठी तत्पुरुष समास !
प्रत्येक शब्दाला , अक्षराला अर्थ आहे , व्युतप्त्ती आहे .

अभ्यास केला पाहिजे .
कळलं पाहिजे ... कळलं पाहिजे .

यदा वै विजानात्यथ सत्यं वदति नविजान्नस्त्यं वदति विजन्नेव सत्यं वदति विज्ञानं त्वेव विज्यसितव्यमिति विज्ञानं भगवो विजिज्ञास इति ॥ 7.17.1 छांदोग्योपनिषद ॥

when a person knows well, then he speaks what he knows to be the Truth
without knowing it well he does not speak of Truth.
knowing it well, one can speak of Truth
but one must seek knowledge in depth,

I seek knowledge in depth.

#स्वान्तःसुखाय ... नेहमीप्रमाणेच !
_____________________________________________________________________________

ॐ भूर्भुवः स्वः तत्स॑वि॒तुर्वरे॑ण्यं॒ भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि। धियो॒ यो नः॑ प्रचो॒दया॑त्॥

ह्या सुप्रसिध्द अशा गायत्री मंत्रामध्ये भर्गो देवस्य धीमहि असं म्हणलं आहे, देवाय धीमहि असे का नाही ? षष्ठी अर्थात संबंधवाचक विभक्ती का ? चतुर्थी अर्थात संप्रदान विभक्ती का नाही?

षष्ठी - चा , ची , चे चे , ची , च्या
चतुर्थी - स , ला , ते स , ला , ना , ते

कारण मुळातच चतुर्थी द्वैतवाचक आहे आणि षष्ठी अद्वैत वाचक.

देवाला नमस्कार करतो आणि देवाचे ध्यान करतो. ह्या दोन वाक्यात चतुर्थी आणि षष्टी ह्या छोट्याश्या विभक्ती भेदामुळे जमीन आसमानचा फरक पडतो.

देवाय नमः देवाला नमस्कार करतो असं म्हणलं तर देव कोणीतरी वेगळा आहे आणि मी कोणीतरी वेगळा आहे , म्हणुन मी त्याला नमस्कार करतो अशी चतुर्थी .
असे द्वैत मुळातच उभे राहते ते ह्या चतुर्थीमुळे !

पण षष्ठीचे तसे नाही , षष्ठी संबंध वाचक आहे, राहुचे शीर असे षष्ठी वापरुन म्हणले तरी त्यात राहु आणि शीर हे भिन्न नसते , एकच असते.

आपण माझा हात , माझे डोळे , माझे वाचन , माझे आकलन , माझे चिंतन असे माझे माझे ही षष्ठी विभक्ती वापरुन लिहित असतो तेव्हा ते माझे ही गोष्ट मी मध्येच अंतर्भुत असते ! माझे हात माझे डोळे माझे वाचन वगैरे सर्व "माझे" "माझे" ह्यांचा समुच्चय "मी" हाच असतो !

अगदी भौतिक जगातील - माझा परिवार , माझे घर , माझी गाडी , माझी धनसंपत्ती , हे सर्वच मिळुन आपली अशी आयडेंटिटी बनत असते , अर्थात हे सर्व घटक ही मी मध्येच अंतर्भुत असतात, मी च असतात.

तस्मात, भर्गो देवस्य धीमहि असे म्हणतो तेव्हा - भर्ग अर्थात अविद्येचा नाश करणाऱ्या देवस्य अर्थात देवाचे ... धीमहि अर्थात (मी) आकलन करतो , चिंतन करतो , असे म्हणतो तेव्हा आकलन करणारा (मी) , आकलन करणे हे दोन्हीही त्या देवाचेच भाग असतात ! त्या सवितृ देवाच्यातच अंतर्भुत असतो !

आणि एकदा ह्या भुमिकेवरुन पहायला लागल्यावर - आता काय आत काय बाहेर ? आता अंतर्बाह्य ... तत्वमसि ! तो तूच आहेस . !

अर्थात गायत्री मंत्र हा अद्वैताचेच अहं ब्रह्मास्मि ह्या महावाक्याचेच सरळ स्पष्ट विधान आहे .... साधन आहे .... साध्य आहे ... गंतव्य आहे !

उद्यन्तमस्तंयन्तमादित्यमभिध्यायन् कुर्वन् ब्राह्मणो विद्वान् सकलं भद्रमश्नुतेSसावादित्यो ब्रह्मेति ब्रह्मैव सन् ब्रह्माप्येति य एवं वेद ।
- तैत्तिरीयारण्यकम् - यजुर्वेद

असावादित्यो ब्रह्मः !

एवं ज्ञानाज्ञानें दोन्ही । पोटीं सूनि अहनी । उदैला चिद्गगनीं चिदादित्यु हा ॥ ८-१९ ॥

आता षष्ठी नाही, चतुर्थी तर फार पुर्वीच नष्ट झालेली होती ... आता केवळ प्रथमा !

हरि ॐ तस्त्सत् हरि ॐ तस्त्सत् हरि ॐ तस्त्सत्

___________________________________

सदर्भ : श्रीमदाद्य शंकराचार्य कृत गायत्री मंत्र भाष्य - https://archive.org/details/gayatri-mantra-bhashya-shankarachary/mode/2up

धर्मअनुभव

प्रतिक्रिया

अहं ब्रह्मास्मि ठीक आहे पण.....

परिस्थिती आहेच. जन्मापासूनच रडारड करावी लागते. त्याशिवाय काही होत नाही. संन्यासी साधूंची यातून सुटलेले नाहीत. आपण आणि अजुन एक कुणी किंवा समाज लागतोच. परमात्मा देव वगैरे लांबच्या गोष्टी आहेत.

अगदी, ज्ञान प्राप्त करतांना गुरू लागतो,ज्ञान वृद्धिंगत करतांना ज्ञानी लोकांचा सहवास लागतो.तेव्हा 'अहं ब्रह्मास्मि ' हे जाणणाऱ्याने इतरांमध्ये ब्रम्ह पहावा भले समोरच्याला 'अहं ब्रम्हास्मि' हे अजून ज्ञात झाले नसेल.
बाकी व्याकरणची ही बाजू ज्ञात नव्हती... सुंदर!