पोपटवाला
सकाळची वेळ. नऊ वाजलेले. आकाश धुरकट रंगाचं. बरसो - ह्या ऑर्डरची वाट पहात थांबलेले ढग . पण नुसतेच .
शनिवार वाड्याचा पूल गजबजलेला होता . मागे आकाशाचा हे विस्तीर्ण पट .
कालच्या अती पावसाचा पूर गायब झालेला .
पुलावर भविष्य सांगणारा शंकरण्णा बसलेला होता .पोपट घेऊन .
गेले दोन दिवस पडण्याऱ्या पावसामुळे तो वैतागला होता. त्याला पुलावर बसता आलं नव्हतं. बरं - पुलासारखा धंदा दुसऱ्या ठिकाणी आणि कुठे नव्हता.
आज पाऊस नव्हता आणि त्याच्या खिशात पैसाही ! त्याला भूक लागली होती. पोटात कावळे कोकलत होते. त्यामुळे तो गिऱ्हाईकांची चातकासारखी वाट पहात होता. पहिलं गिऱ्हाईक झाल्याझाल्या तो एक गरमागरम वडापाव खाणार होता,एक स्पेशल चहा पिणार होता.एकदम कडक ! म्हणजे पुढच्या गिऱ्हाईकाला पटवायला त्याला जोम आला असता .
समोरून एक तरुण येत होता . आनंदात , उत्साहात . हूडी घातलेला . त्याने त्याला थांबवलं. तोही थांबला . शंकरअण्णाने पिंजऱ्याचं दार उघडलं. त्याचा तो लहानसाच पोपट बाहेर आला. त्याने समोर पसरलेल्या चिठ्ठ्यांकडे पाहिलं व डौलात एक चिठ्ठी काढली आणि तो परत त्याच्या पिंजऱ्यात गेला .
काय असेल त्या चिठ्ठीत ? …
आज तुम्हाला जीवनसाथी भेटेल !
तो तरुण खूष झाला त्याने विचारलं , ' किती झाले ?'
‘पन्नास ‘.
‘पन्नास ? पाच मिनिटं थांब शंभर देतो ... ‘
असं म्हणून तो तरुण भरभर कॉर्पोरेशन बसस्टँडच्या दिशेने निघूनही गेला . शंकरअण्णा विचारात पडला .त्याला कळायच्या आत तो गेलाही होता . तो परत येण्याची काही गॅरंटी नव्हतीच .
तो तरुण पुलावरून खाली स्टॅंडकडे जाणाऱ्या लोखंडी जिन्याच्या पायऱ्या पटापट उतरू लागला. तो स्टॅन्ड मोठा होता . अनेक ठिकाणी जाणाऱ्या बसेसचे अनेक स्टॉप तिथे होते .तिथे त्याची आवडती पोरगी थांबलेली असायची . ह्या वेळेला रोज , तिच्या स्टॉपवर . आज तिच्याशी काय ते एकदाचं त्याला बोलून टाकायचंच होतं .
त्यात ती चिठ्ठी !
तो पायऱ्या उतरतच होता . इतक्यात -
ती एका बाइकवाल्याच्या मागे बसून जाताना त्याला दिसली. तिने एक नजर याच्याकडे टाकली . तिला तो तरुण माहिती होता . आणि तिच्या त्या नजरेत सगळं चित्र सामावलेलं होतं… त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना .
तो तिरमिरीत पायऱ्या चढून पुन्हा पुलावर आला. शंकरअण्णाकडे बघत तो जाऊ लागला . शंकरअण्णाने त्याला हात केला; पण तो पोरगा रागाने डोळे मोठे करत, त्याच्या अंगावरून सरळ निघून गेला. त्याच्या डोळ्यांत पाणी होतं .
त्या पोराचं काहीतरी बिनसलंय, हे अण्णाच्या लक्षात आलं; पण त्याने मग काही त्याला थांबवलं नाही .
पोरगा लांब गेला .
अण्णा त्याच्या पेरू खाणाऱ्या पोपटाला म्हणाला , ' त्या देवाकडे कुठला पोपट आहे कोणास ठाऊक ? त्याने चुकीचीच चिट्ठी काढलीये साली ! माझ्या नशिबाची !'
तो डोक्याला हात लावून नजर खाली घालून बसला .
त्याच्या पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांचाही आता पोपट झाला होता.
xxx
प्रतिक्रिया
12 Aug 2024 - 11:43 pm | बिपीन सुरेश सांगळे
वाचक मंडळी खूप आभारी आहे .
13 Aug 2024 - 6:33 am | कर्नलतपस्वी
लहानपणापासून पुणे महानगर पालिकेत समोरच्या शिवाजी पुलावर एक पोपटवाला नेहमीच बसायचा. आता माहीत नाही.
तो नेहमीच लोकांचे पोपट करायचा मग देव कधी कधी त्याचा.....
कान साफ करणारे,पोपट भविष्य वक्ते, फुगे विकणारे यांचे आयुष्य खरोखरच कठीण आहे. चरितार्थ कसा चालतो ते भगवंतालाच माहीत.
14 Aug 2024 - 2:16 pm | चौथा कोनाडा
व्वा.. सुंदर ...काहीसं चटका लावणारं !
रस्त्यावर रोज कमाई करुन जगणार्यां विषयी सहानभुती वाटते खरंच कसे कसे जगतात लोक !
एकदा एका वडापाव स्टॉलवर वडापाव खाताना चमकदार लालतांबड्या डगल्यातले वादक गप्पा मारत होते
"आयला आज पण वडापाव वर काढावा लागणार दिवस "
"हां ना राव गेले दहा बारा दिवस हेच खातोय"
"मला तर संडास बी झाली नाय ४-५ दिवस.. आता वडापाव बी नकू झालाय"
हे ऐकताना त्यांच्या चेहर्यावरचे भाव बघवत नव्हते !
14 Aug 2024 - 5:10 pm | गवि
उत्तम जमली आहे छोटीशी कथा. अतिशय संवेदनशील आणि आपल्या आसपासच्या जगातून सदैव काहीतरी टिपण्याची क्षमता असलेले मन आहे तुमचे. त्यातूनच असे लेखन साधते.