Before Satori, you chop wood and carry water. After Satori, you chop wood and carry water.
समाधीच्या आधी तुम्ही तुमच्या प्रापंचिक जीवनातील दैनंदिन कामे करत असता , समाधी साधल्यानंतर तुम्ही प्रापंचिक जीवनातील दैनंदिन कामेच करत असता !
__________________________
बाबा म्हणाले - डोन्ट टच द मनी . डोन्ट टच द मनी.
मी म्हणालो - पण महाराज , पैशाशिवाय माझे दैनंदिन व्यवहार कसे होणार , माझी पुस्तके , माझा प्रवास , माझें जेवण , खाणेपिणे , ?
बाबा म्हणाले - हां तेवढ्यापुरतं ठीक आहे , पण त्या व्यतिरिक्त, डोन्ट टच द मनी.
मी म्हणालो - ठीक आहे , प्रयत्न करतो . :)
__________________________
संध्याकाळाची वेळ . तेही पावसाळ्यातली . एकदम चिंब दमट भिजलेले वातावरण.
पेट्रोल पंपावर लाईन मध्ये उभा होतो. बरीच लाईन होती. नुकतीच पावसाची रिपरिप चालु झाली असल्याने लोकं दाटीवाटीने उभे होते, काही लोकं चिंब भिजलेले, ते कपडे झटकत होते , पलीकडे - "सुट्टे नाहीत ऑनलाईन करा, कार्ड चालत नाही " असा काहीसा गलका चालु होता दुसर्या पेट्रोल फिलर काऊंटरवर. इथें लोकांची गडबड चालु होती, "आवरा पटापट" , "इथंही पाऊस यायाला लागलाय", "अरे भर की पेट्रोल पटापट". वगैरे वगैरे. आणि ह्या सगळ्या कोलाहलात पेटोलपंपावरील कामगार , मुलगाच असावा वीसएक वर्षाचा . तो मात्र शांतपणे हातात पाच पन्नासहजार कॅश लीलया मोजत लोकांना सुट्टे पैसे देत होता.
आता हेच पहा - केवढी कॅश आहे ह्याच्या हातात . पण त्याला निश्चित ठामपणे माहीत आहे की ही कॅश त्याची नाही , पेट्रोलपंप मालकाची आहे. त्यातुनच आपला आपला काहीसा पगार निघणार आहे हे खरे पण बाकी पैसा मालकाचा आहे आपला नाही. हे एक अलिप्तपण आहे त्याच्या पैसे हाताळण्यात . आता ह्यामुळे , आपली स्वतःची मालकी नसल्यामुळे , तो पैशाविषयी निष्काळजी होतो का ? नाही . अजिबात नाही , उलट थोडा जास्तच सतर्क होतो . आहेत त्या पैशांचा व्यवस्थित हिशेब ठेवतो, शिवाय ते पैसे कसे वाढतील ह्याकडेही लक्ष देतो . योगक्षेम चालुच ठेवतो. पण त्याला ठामपणे स्मृती असते , हे पैसे आपले नाहीत .
तसंच समजा कधी नव्हे तें दरोडा वगैरे पडला अन एखादे बंडल कोणी चोरुन नेले , किंवा तुफ्फान पाउस आला अन पैसे भिजले तर कदाचित मालकाकडुन ओरडा पडला कदाचित नोकरी गेली तर त्याला त्याचे वाईट वाटेल पण पैसे गेले ह्याचे त्याला दु़:ख होणार नाही. जे काय नुकसान झालं ते मालकांचं . आपलं काय !
फायदा झाला तरी मालकाचा, नुकसान झालं तरी मालकाचं , पाण काय फक्त कॅश जमा करायची अकाऊंट कडे बस संपला आपला संबंध !
He is holding the money, but he is not "touching" it.
Voila ! That's what he meant by "Don't touch the money !"
पैसे हाताळा पण ते असं समजुन हाताळा की जणु ते तुमचे नाहीतच . मालकाचे आहेत . वाढले तरी मालकाचे , गेले तरी मालकाचे. आपलं काम फक्त व्यवस्थित हाताळणे अन काळजी घेणे बस्स.
पैसा म्हणजे काय तर माणसाचा वेळ आणि कर्म .
म्हणुन आता - आपलं कर्म असं कर की बस्स हे व्यवस्थितपणे करायचं आहे, बाकी त्यातुन लाभ हानी झाली तरी आपला त्याच्याशी संबंध नाही.
कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन । सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ॥ ९ ॥
न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते । त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ॥ १० ॥
हे अर्जुना, कर्तव्य म्हणून, जे नित्यकर्म आसक्ति (कर्तृत्वमद) सोडून आणि फलाकांक्षा सोडून केले जाते, त्याला सात्विक त्याग असे म्हणतात.
बुद्धिमान, संशय दूर झालेला आणि सात्विक त्यागाने युक्त असलेला त्यागी, अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही व शुभ कर्माचे ठिकाणी आसक्त होत नाही.
बस्स हीच सिध्दी आहे. हाच कर्मत्याग आहे, हाच मोक्ष आहे , संन्यास आहे , मोक्षसंन्यास आहे !
तू बस तुझे कर्म कर, आसक्ती ठेवु नको, कर्मफलाविषयी नको अन पैशाविषयीहीं नकों .
डोन्ट टच द मनी.
हातात खंडीभर बंडलं असु दे की ब्यँकेत खात्यात पडणारे आकडे. पाच पुज्य नसली तरी किमान तीन पुज्य पडत असतीलच की. अहो, कधी पडतात कधी बुडतात. आता तेवढं चालायचेंच .
किती का पडेनात की बुडेनात, आपल्याला काय फरक पडतो - आता आपला पैशाचा संबंधच नाही. आपण बस आपलं नेमुन दिलेलं काम अलिप्तपणे करत राहु.
म्हणौनि करावा स्वधर्मु । जो करितां हिरोनि घे श्रमु । उचित देईल परमु ।पुरुषार्थराजु ॥
हाच मोक्ष आहे , हीच समाधी आहे.
अन समाधीच्या आधी तुम्ही तुमच्या प्रापंचिक जीवनातील दैनंदिन कामे करत असता , समाधी साधल्यानंतर तुम्ही प्रापंचिक जीवनातील दैनंदिन कामेच करत असता ! तुम्ही आधीही पैसे हाताळत असता आणि आताही हाताळत असता. तुम्ही आधीही कर्म करत असता , आणि नंतरही कर्म करतच असता.
आधी पैसे हाताळताना काळजीपुर्वक खर्च करत असता , आणि आताही काळजीपुर्वकच खर्च करत असता. आधीही मन लाऊन कष्ट करुन, बुध्दी वापरुन पैसे कमावत असता वाढवत असता, आणि आताही तेच करत असता !
आता फक्त पर्स्पेक्टीव्हचा बदल झालेला असतो !
आता ह्यात फक्त "मी" , "माझे" एवढी खाडाखोड झालेली असते बस.
कर्ता - कर्म - क्रियापद मधील कर्ता कधीच कधीच नाहीसा झालेला असतो, (विशेषण , क्रियाविशेषण तर फार पुर्वीच निघुन गेलेले असतात )
आता फक्त कर्म आणि क्रियापद .
आता अहंब्रह्मास्मि ही नाही,
आता फक्त ब्रह्मास्मि .
पण ह्यातील अस्मि ह्या क्रियापदातच अहं हा कर्ता अध्याहृत आहे म्हणुन अस्मि ही नाही .
आता फक्त ब्रह्म.
पण आता अहं नाही म्हणजे अनुभवता नाही, अस्मि नाही म्हणजे अनुभवणेही नाही मग हे ब्रह्म हे अनुभाव्य हे आहे हे कळणार तरी कोणाला , म्हणुन
आता ब्रह्मही नाही.
आणि हा अनुभवही नाही . आणि हे नाही नाही म्हणणेही नाही.
आहे म्हणतां द्या काही । ’नाहीं’ शब्द गेला तो ही । नांहीं नांहीं म्हणता कांही । उपजेल कीं ॥ श्रीराम ॥
(ब्लँक स्पेस )
गाड्या पुढे सरकत सरकत माझा नंबर आला. आणि विचाराच्या तंद्रीत खिषातुन ५०० ची नोट काढत म्हणालो - पेट्रोल - फुल्ल - कॅश !
आणि तो उस्फुर्तपणे म्हणाला - "नो चेंज सर , ओनलाईन करा की , नो कार्ड - नो कॅश " -
डोन्ट टच द मनी .
:)
_______________________________________________________
Before Satori, you pay money and fill the petrol, after Satori you pay money and fill the petrol.
प्रतिक्रिया
21 Jul 2024 - 5:40 pm | मुक्त विहारि
तुमचे Do Not Touch The Money....
तसेच मीपाचे पण कधी तरी...
We do not allow duplicate ID... असे धोरण होईल तो सुदिन....
21 Jul 2024 - 11:50 pm | मारवा
आशयगर्भ लिखाण आवडले.
22 Jul 2024 - 8:44 am | प्रचेतस
मोजक्या शब्दांत गहन विचार.
22 Jul 2024 - 1:25 pm | गवि
आशय चांगला. जमेल तितके पाळावे इतके तरी पटावे लोकांना. अर्थात या attitude मध्ये मोजणी कारकून होता येईल पण उद्योजक होऊन यशस्वी व्हायला जी भूक आणि पॅशन आवश्यक असते ती याने येणार नाही. कोणीतरी तो वाईटपणा घेणे आवश्यक असेल.
ऑन अ लायटर नोट, यासाठीच आता यूपीआय वर भर आहे सर्वत्र ;-)
22 Jul 2024 - 2:11 pm | प्रसाद गोडबोले
धन्यवाद गवि.
भूक आणि पॅशन , प्रचंड महत्त्वाकांक्षा बाळगून , काहीतरी भव्य लक्ष्याकडे वाटचाल करत असतानाही ज्याला हे अलिप्तपण जपता येतं त्याला "श्रीमंत योगी" म्हणतात.
आणि देवाच्या कृपेने आपल्याकडे तसा एक आदर्श आहे !
अर्थात "मी त्यांच्यासारखा होणार" असं "आम्ही" म्हणालो तर मोठ्ठा गहजब माजेल. #आता_मला_दहशत_वाटते .
नकोच.
पण ठीक आहे, अगदी श्रीमंत नाही होता आले तरी आपण योगी तरी निश्चितच होऊ शकतो.
चरैवाति चरैवाति ।।
बाकी आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
आपण जो विचार करतो तो अगदीच ridiculous आणि अनाकलनीय नाही , आपल्याला व्यवस्थित अभिव्यक्त होता येतंय हा दिलासा मिळतो तुमचे प्रतिसाद पाहून. हे खूप मोठ्ठं यश आहे माझ्यासाठी !
_/\_
22 Jul 2024 - 2:12 pm | प्रसाद गोडबोले
धन्यवाद
वल्ली सर , मारवा आणि मुवी.
:)