नुकताच डॉक्टर्स डे साजरा झाला. डॉक्टर लोकांविषयी आपल्याकडे सर्व प्रकारच्या भावना आणि मतं आहेत. मी स्वतः डॉक्टर नाही. डॉक्टर होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक गुणवत्ता मी सिद्ध करू शकलो नाही पण माझे मित्र, मैत्रिणी आणि काही नातेवाईक डॉक्टर आहेत. मी जिथे काम करतो त्या टिम मध्ये मी सोडून सगळे डॉक्टर आहेत त्यामुळे ह्या क्षेत्रातल्या बातम्या, चर्चा रोज कानावर पडत असतात. त्यामुळे माझ्याकडे ह्या क्षेत्रातील थोडी माहिती असते.
काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकारी मैत्रिणीकडून कोणाचा तरी उल्लेख IDIOT syndrome चा बळी असा करण्यात आला. मी उत्सुकतेने विचारलं तर एकाचवेळी गमतीशीर आणि विचार करायला लावणारी माहिती मिळाली. आश्चर्य म्हणजे आपल्यापैकी कित्येक जण आणि जणी ह्याचे बळी असतील अशी शंका आली.
नेमका आहे तरी काय हा Syndrome?
'The Internet Derived Information Obstructing Treatment' त्याचंच लघुरूप म्हणजे 'IDIOT'! थोडक्यात काय तर महाजालावर उपलब्ध असणारी माहिती वाचून, तिला खरं मानून एखाद्या रोगावर मिळणाऱ्या उपचारांवर शंका घेणे किंवा त्यामध्ये बदल सुचवणे. अर्थात हा अगदीच तंतोतंत अर्थ आहे असं माझं म्हणणं नाही. ह्या अडचणीचा रोज सामना करणारी डॉक्टर मंडळी ह्याविषयी जास्त चांगलं सांगू शकतील.
मी कॉलेजला शिकत असतानाच एक वाक्य गुळगुळीत झालं होतं, ते म्हणजे सध्या माहितीचा पूर आला आहे. खरं म्हणजे तसा तो तेव्हा आला नव्हता. गेल्या काही वर्षात आला आहे. त्यामुळे Wednesday चित्रपटात नसरुद्दीन शहा म्हणतो तसा बॉम्ब कसा बनवायचा ह्याची माहिती देखील महाजालावर उपलब्ध आहे ( मी काही तपासून पाहिलेली नाही ही माहिती पण नक्कीच असेल). त्यामुळे इतर बाबींची काय कथा! एखाद्याला साधी सर्दी किंवा पडसं झालं असेल किंवा थेट कॅन्सर झाला असेल तरी ते नेमकं कशामुळे झालं आहे आणि त्यावर काय करायला हवं हे सांगण्यासाठी डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडेच जायला हवं. उत्सुकतेपोटी त्याची माहिती मिळवण्याचा आपल्याला अधिकार सुद्धा आहे. काही तुसडे आणि कावलेले अपवाद वगळता बरेचसे डॉक्टर ही माहिती आजकाल देत सुद्धा असतात. पण आपण आता थेट निदान करायला लागलो आहोत, इतकी माहिती आपल्याला सहज उपलब्ध आहे आणि तिथेच हा syndrome जन्म घेतो.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की ती सगळी माहिती आहे, ज्ञान नाही. ज्ञान डॉक्टर लोकांकडे आहे आणि ते त्यांनी काही वर्षे शिकून, वेळोवेळी अद्ययावत करून आणि खूप वर्षे अनेक रुग्ण तपासून सिद्ध केलं आहे. ते देखील चुकतात नाही असं नाही पण ती चूक कशी दुरुस्त करायची ह्याचंदेखील ज्ञान त्यांना आहे. इथे तो विषय नाही. आपण उपलब्ध माहितीच्या आधारे स्वतः डॉक्टर होऊन जेव्हा मला हेच झालेलं आहे आणि त्यावर हे उपचार उपलब्ध असताना डॉक्टर काहीतरी वेगळंच आणि त्यामुळे चुकीचं सांगत आहेत असा समज करून घेतो तेव्हा मामला गंभीर होतो.
एका ठराविक मर्यादेनंतर कुठलंही क्षेत्र हे फक्त तज्ञांचं असतं, इतर कोणाचंही नाही. माझ्या सहकाऱ्यांनी त्यांना आलेले कित्येक अनुभव सांगितले आणि ही बाब त्यांच्यासाठी आता गंमतीची नसून चिंतेची झाली आहे. कारण डॉक्टर आणि रुग्ण ह्यांच्या नात्यात असणाऱ्या विश्वासावरच ह्यामुळे घाव बसतो आहे. येणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यापेक्षा डॉक्टर लोकांना त्याच्या अर्धवट माहितीवरच डोकेफोड करावी लागते आहे. काही अनुभव तर असे होते की पेशंटने हट्टाने काही महागड्या चाचण्या करून घेतल्या डॉक्टरला त्याची आवश्यकता वाटत नव्हती.
आपल्या आरोग्याच्या बाबतीत सजग असणं, झालेल्या आजाराची माहिती घेणं ह्यातच काहीच गैर नाही पण त्याला डॉक्टरांच्या सल्ल्याची जोड असेल तर अधिक चांगलं. काही मोठी रुग्णालय आता अशा केसेस कशा हाताळायच्या ह्यावर डॉक्टर लोकांना प्रशिक्षण देत आहेत म्हणे. असं असेल तर कठीण आहे. ह्यात फक्त पेशंटची चूक आहे असं नाही, डॉक्टर पेशन्ट संवाद देखील महत्वाचा आहे. ह्या निमित्ताने तो सुसंवाद झाला तर अजून चांगलं.
मला वाटत मुळात ह्या समस्येला अनेक कंगोरे आहेत जसं की उपलब्ध असलेले अनेक पर्याय, गरजेपेक्षा खूप जास्त आणि सहज मिळणारी माहिती आणि उपचारांचा वाढलेला खर्च ही काही ठळक म्हणता येतील अशी कारणं. त्यामुळे एखाद्याला मोबाईल घ्यायचा असेल किंवा CT scan करायचा असेल, तरी उत्तर एकाच दिशेने शोधण्याची सवय लागली आहे. ह्याचाच अतिरेक म्हणजे हा syndrome. डॉक्टर लोकं त्यांची बाजू बघतीलच पण आपण मात्र त्यांच्या बाजूला जाण्याच्या प्रयत्नात आपलंच नुकसान करतो आहोत हे मात्र नक्की. त्यामुळं एखाद्या डॉक्टरनं इडियट म्हणलेलं मला तरी आवडणार नाही, (दोन्ही अर्थाने)!
-©️अमोल कुलकर्णी
प्रतिक्रिया
8 Jul 2024 - 7:02 pm | कर्नलतपस्वी
तंत्रज्ञान विकसित होत असताना सुखसोई बरोबर इतरही ड्राबॅक्स आणत असते.
माहितीचा पुर आला तर पुरात अनेकजण वाहून जाणारे असतात.
नाईलाज आहे.
8 Jul 2024 - 9:25 pm | मुक्त विहारि
लेख आवडला...