पहिलं प्रेम
------------
तो बारमध्ये शिरला. एकटाच.
रात्री उशिराची वेळ. रस्त्यावरची गर्दी मंदावलेली. आठवड्याच्या मधला दिवस. त्यामुळे आतही गर्दी कमी. त्याने अगदी कोपऱ्यातलं एक टेबल धरलं आणि तो आत सरकून भिंतीच्या आधाराने बसला. त्याला आधाराची गरज वाटत होती.
त्याने ऑर्डर दिली.
पेगमध्ये कोल्ड्रिंक ओतल्यावर ग्लासच्या काचेवर पाण्याचे नाजूक थेंब जमा झाले. अन तस्सेच त्याच्या डोळ्यांतही.
त्याचं सुरु झालं . थोड्या वेळाने एक वयस्कर माणूस आला. त्याच्याजवळ आला.
“बसू का ?” त्याने विचारलं .
“बसा “ , हा म्हणाला .
तो बसला. वेटरने त्याची ऑर्डर आणून दिली. न सांगताच. याच लक्ष नव्हतं.
अर्थातच तोही एकटा होता. शांत. शांतपणे एकेक घोट घेत .कुठेतरी विचारात गढलेली नजर .
तोही शांत, हाही शांत. एका शब्दाची देवाणघेवाण नाही की नजरानजर नाही . एक अस्वस्थ शांतता .
दोन पूर्ण वेगळी विश्वं- एकमेकांना न छेदणारी .
याचा पहिला पेग संपला. याने ऑर्डर रिपीट केली . पण ग्लास उचलता याच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं.
त्याने विचारलं.” काय रे ? काय झालं ?”
“काही नाही …”
“अरे- इथे नाही बोलणार तर मग कुठे? बोल बोल, मोकळा हो .”
“माझं… माझं ब्रेकअप झालंय. माझं पहिलं प्रेम. ते विसरण्यासाठी मी- मी…”
त्याने याला बोलू दिलं. हा जरा मोकळा झाला.
वेटरने त्याची ऑर्डर रिपीट केली. न सांगताच. आता याने त्या गोष्टीची दखल घेतली .
डोळ्यांतलं पाणी कमी झाल्यावर याने कोंडी फोडली.” रोजचे दिसताय ?”
“अर्थात ! मी रोजच येतो. इथे बसतो. ज्या जागेवर आता तू बसला आहेस, ती माझी जागा आहे. मी रोज पितो, का माहितीये ?”
याने फक्त प्रश्नार्थक मुद्रा केली.
“कारण - मी माझं पहिलं प्रेम विसरू शकत नाही. आजही नाही…म्हणून !”
त्याच्याही डोळ्यांत पाणी आलं . पुन्हा मोठा पॉझ . शांतता .
त्याने पेग संपवला .
नंतर त्याने पाकिटातून एक फोटो काढून याच्यासमोर धरला ,”हे बघ. “
तो जुना कृष्णधवल फोटो पाहून हा क्षणभर विचारात पडला आणि तिने एकदा दाखवलेला तो फोटो याने ओळखला .
“ही तर तिची आई !”…
त्यावर तो उत्तेजित स्वरात म्हणाला,” काय ?...कमालच झाली ! आई तशी पोरगी !”
मग दोघेही डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसत राहिले.
प्रतिक्रिया
6 Jul 2024 - 7:56 pm | कांदा लिंबू
आई तशी पोरगी !”
6 Jul 2024 - 8:11 pm | कर्नलतपस्वी
म्हजें आता मुलीच्या पत्रिके बरोबर आईची पण पत्रीका बघायची का?
8 Jul 2024 - 2:24 pm | बिपीन सुरेश सांगळे
कर्नलजी
खूप आभार
इतर वाचक मंडळी
आपलेही खूप आभार
8 Jul 2024 - 6:56 pm | सौंदाळा
शेवटचा ट्विस्ट अनपेक्षित आणि भारीच.
छोटेखानी कथा आवडली.