Boys Played well..!

kool.amol's picture
kool.amol in जनातलं, मनातलं
1 Jul 2024 - 2:46 pm

हुश्श्श..शेवटी एकदाचा भारताने विश्वकप जिंकला! सामना कसा थरारक होता, कोण कसं खेळलं, कोणामुळे जिंकलो ही सगळी चर्चा बऱ्यापैकी करून झालीय, चालू सुद्धा आहे. थोड्या वेळासाठी असं वाटून सुद्धा गेलं की..झालं, खाल्ली माती ह्या संघाने परत एकदा. पण नंतर अगदी उलट झालं. क्रिकेट हा प्रचंड शक्यता असणारा खेळ आहे आणि अगदी क्षणाक्षणाला बदलत जाणारा खेळाचा balance ह्यात प्रचंड थरार निर्माण करतो. 20-20 फॉरमॅट मध्ये तर अजूनच जास्त! ग्रामपंचायत निवडणुका जास्त चुरशीच्या असतात म्हणे त्यासारखच काहीस म्हणता येईल.

मला काही गोष्टी विशेषत्वाने जाणवल्या. कोहली आणि शर्मा ह्या दोघांनी आपली निवृत्ती जाहीर केली पाठोपाठ जडेजाने सुद्धा! The wall सुद्धा प्रशिक्षक म्हणून निवृत्त झाला. यानिमित्ताने एक मोठा काळ आता आठवणींमध्ये राहणार आहे. गेल्या काही वर्षात क्रिकेट मध्ये प्रचंड पैसा आला आहे. अर्थात त्यामुळे स्पर्धा सुद्धा जीवघेणी झाली आहे. भारतात ती यापूर्वी सुद्धा होती आणि कित्येक दिग्गजांना त्यात टिकून राहणं नेहमीच कठीण गेलं होतं. असं असलं तरी सर्वोच्च पातळीवर आपण आहोत ह्याच सखोल भान ह्या दोघांना आहे, हे बघून छान वाटलं. सुरुवातीच्या काळात ह्या दोघांमध्ये असणारी स्पर्धा उघड होती. कारण दोघेही फलंदाज म्हणून संघात स्थिरावत होते पण नंतर दोघांनी आपलं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं. प्रचंड खेळलं जाणारं आणि म्हणूनच खूप दमवणार क्रिकेट सातत्याने इतकी वर्ष खेळण हे किती कठीण काम असेल ह्याची प्रचिती शेवटच्या मॅच नंतर ह्या सगळ्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याने दिली. भारतीयांच्या क्रिकेट विषयी असणाऱ्या सगळ्याच भावना ह्या प्रचंड टोकदार असतात. 15 वी ओव्हर झाल्यानंतर सामना शिल्लक असतानाच सोशल मीडिया वर ह्या सर्वांना शिव्याची लाखोली वाहायला सुरुवात सुद्धा झाली होती.

एकीकडे हे असं तर दुसरीकडे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारी स्पर्धा, त्याच दडपण अशा वातावरणात सर्वोच्च खेळ खेळणे म्हणजे महाकठीण काम. त्यात अगदी काही महिन्यांपूर्वीच 50 ओवर्स च्या वर्ल्ड कप मध्ये अंतिम सामन्यात झालेला पराजय ताजा असताना तो ताण वेगळा. पांड्या तर नुकताच बुकललेला अख्ख्या देशाने. त्यामुळे ह्या सगळ्यांना हा कप कितीतरी महत्वाचा होता.

कोहलीला जेव्हा विचारलं की इतकी वर्षे तू संघाचा भार सोसतो आहेस तेव्हा आता कसं वाटतं? ह्यावर कोहलीचे उत्तर छान होते माझ्यापेक्षा कितीतरी जास्त भार रोहितने उचलला आहे, तेव्हा त्याला विचारा. कदाचित कप्तान म्हणून त्याला काही काळ जे अपयश आलं होतं त्यामुळे हा आदर निर्माण झाला असावा. त्यानंतर दोघे जेव्हा भेटले तेव्हा काहीही बोलू शकले नाहीत.

अजून एक angle म्हणजे कोहली आणि द्रविड. इंग्लंडच्या मॅचमध्ये कोहली स्वस्तात आऊट झाला तेव्हा द्रविडची प्रतिक्रिया आणि अंतिम सामन्यानंतर जेव्हा ह्या दोघांची भेट झाली तेव्हा कोहलीनं त्याला मारलेली मिठी पाहता, द्रविडने त्याला दिलेला विश्वास कोहलीसाठी किती महत्वाचा होता हे दिसून आलं.

शेवटी महत्वाचे म्हणजे दडपणाखाली खेळ कसा खेळायचा ह्याच आणखी एक सुंदर उदाहरण भारताने निर्माण केलं. ज्याक्षणी आपण दडपण न घेता फक्त खेळाकडे परत गेलो त्याच क्षणाला जिंकलो होतो, बाकी सगळी औपचारिकता होती. थोडक्यात काय तर boys played well..!

अमोल कुलकर्णी

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

3 Jul 2024 - 10:26 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे....