प्रस्तावना :
१. सदर लेखन हे वैयक्तिक अनुभवांवर आधारीत असुन इथे कोणताही अभिनिवेषयुक्त प्रचार प्रसार करण्याचा उद्देश नाही.
लिहुन ठेवलेल्या गोष्टी जास्त चांगल्या स्मरणात राहतात हा आजवरचा अनुभव आहे. शिवाय "if you can't explain it simply, you don't understand it well enough." हे लहानपणी शिकल्याने किमान आपलं आपल्याला कळेल इतकं तरी सोप्प्या शब्दात वर्णन करुन सांगता येणे गरजेचे वाटते . म्हणुन हा लेखनप्रपंच .
२. सदर लेखनात स्थानाचा उल्लेख जाणीवपुर्वक टाळण्यात आला आहे. एखादे सुंदर स्थान प्रसिध्द झाले की लोकं त्याची कशी वाट लावतात हे आम्ही आमच्या "कास पठाराच्या" उदाहरणाने चांगलेच शिकलो आहोत. तुम्ही स्थान ओळखु शकलात तरी कृपया इथे जाहीरपणे लिहु नका, आपल्यापुरते मर्यादित ठेवा. सुवर्णसुत्राणि न उच्चारणीयानि ||
३. ह्या काही दिवसात इतकं प्रचंड शिकायला, अनुभवायला मिळालं की सारं स्मरणात ठेवणं जवळापास अशक्य होतं, तरीही जसे जसे जमत गेले तसे तसे लिहुन ठेवत गेलो. ह्याउपरही जे जे स्मरेल तेते लिहुन काढण्याचा प्रयत्न करेन.
४. आणि नेहमी प्रमाणेच - हे सारं स्वान्तःसुखाय आहे.
______________________
मला हिमालय प्रचंड आवडतो. हिमालय म्हणलं की पहिल्यांदा आठवतो आपला कालिदास -
अस्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः ।
पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थितः पृथिव्यां इव मानदण्डः ॥ - कालिदास
हिमालय म्हणजे कसा अगदी आपल्या आजोबांचा सारखा वाटतो. आजोबा म्हणजे आईचे बाबा. वडीलांचे बाबा म्हणजे सह्याद्री . राकट कणखर कठोर. लहानपणापासुन सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडलो, पण तिथलं प्रेम हे खरं म्हणजे भीतीयुक्त आदर आहे. पण हिमालयात एक वेगळं आपलंपण आहे. इथेही आदर आहेच पण इथं भिती नाही, किंवा कदाचित आधीच थंडगार वार्याच्या झुळुकांपासुन वाचण्यासाठी स्वेटर घातलेला असल्याने उबदार वाटत असतं , त्यामुळे लहानपणी आजोबांनी अलगद उचलुन हातात घ्यावं अन आपण शांत झोपी जावं अशा आठवणी जाग्या होतात.
आणि आजही जास्त फिरंणं सह्याद्रीतच होतं, हिमालय क्वचित , उन्हाळ्याच्या सुट्टीत. तरी बराच फिरलो. लेह लडाख, हिमाचल , उत्तराखंड . सर्वात सुंदर वाटला तो हिमाचल मधुन दिसणारा हिमालय. एकदम आजोबांचा सुंदर टुमदार वाडा होता तसा काहीसा . दुरवरुन दिसणारी हिमाच्छादित शिखरं मन मोहुन घेतात. मागच्या वर्षीच तिकडे जाऊन आलेलो होतो.
पण ह्यावेळेला हिमालयात जास्त वर पर्यंत गेलो नाही, त्यामुळे अगदी हिरवळ गर्द झाडी. सर्वत्र हिरवाईने नटलेले डोंगर. आजोबांच्या बागेसारखे. लेह लडाख मात्र काही आवडलं नाही. ते म्हणजे कोणीतरी निर्माणाधीन घरातील डबर आणुन टाकावे अशा रंगाचे डोंगर. कोठेही जिवंतपणाचे लक्षण नाही. मामाने आजोबांच्या वाड्याची तोडफोडकरुन सिमेंटच्या खोल्या उभाराव्यात अन सारं काही भकास निराशाजनक होऊन जावं तसं काहीसं . (त्याचे फोटो आहेत पण ते पाहुन देखील निराश व्हायला होतं म्हणुन टाकले नाहीत.)
बाकी सह्याद्री विषयी काही लिहायची सोय राहिली नाही आता. काकाने आजोबांची सगळी इस्टेट बळकावावी अन आपण हताशपणे पहात रहावं असं काहीसं झालेलं आहे इथे. जागोजागी दहशतवाद्यांचा इतका सुळसुळाट झाला आहे की हे लिहिताना, बोलुन दाखवतासुध्दा भीती वाटते. त्यामुळे मौन.
असो. ह्यावेळीस खुप दुर हिमालयात चाललो नव्हतो. ह्यावेळी अगदी सहज सोप्पे होते.
___________________
१९ मे २०२४ : दिवस ०
आजचा दिवस खूप हेक्टिक गेला. प्रवास खूप - अती - जास्त झाला. सकाळी पाचला घरातुन निघालो, दुपारी १२ ला गंतव्याजवळील मुख्यठिकाणी पोहचलो. इथुन ६ तासात आश्रमापर्यंत पोहचेन असे वाटत होते पण आश्रमात पोहचायला रात्रीचे ८:३० वाजले. मी एकटाच . सोबतीला कोणी नाही. वाघ बिबट्या रानडुक्कर साप विंचु अस्वलांचा वावर असलेलें किर्रर अनोळखी जंगल. रात्रीचा घनगर्द अंधार. त्यात मोबाईलची बॅटरी २०% पेक्षा कमी. नेटवर्क वीक. ज्या टॅक्सीवाल्याने सोडले तो म्हणाला - हे काय उजव्या हाताने चालत जावा फक्त ५०० मीटर असेल. पण तरीही व्हायचे तेच झाले रस्ता चुकलो. जंगलात भटकलो. भीतीने अक्षरशः बोबडी वळली होती असं सभ्य अभिजनांच्या भाषेत म्हणतात पण त्यातुन भावना व्यवस्थित व्यक्त करता येणार नाही म्हणुन असभ्य ग्राम्य भाषा वापराचा दोष स्विकारुन खरं खरं सांगतो - गां* फाटली होती.
कसं आहे की वेदांत कितीही अभ्यासला तरीही देहभाव आहे आहे तोवर देहाचे विकार हे राहणारच. आहार निद्रा भय मैथुन हे असणारच.
पण येताना महाराजांच्या मंदिराचे दर्शन झालेले होते. तो मनाला आधार होता.
"हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता "
हे खोलवर कुठेतरी ध्यानात होतेच. तेवढ्या आधारावर चालत राहिलो.
तितक्यात दुरवरच्या जंगलात एका घरातील दिवा दिसला , त्यातुन कोणीतरी डोकावुन बघत असल्याचे जाणवले. जवळ जाऊन त्यांना मदतीसाठी विनंती केली. त्यांनी येऊन आश्रमाचा मार्ग दार्खवला ! जेव्हा आश्रमाच्या पायर्या लागल्या तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला.
घनदाट जंगलातून ठार अंधारात जवळपास १ किमी अंतर उतरून आश्रमात पोहचलो. मध्ये वाट चुकलो तेव्हा जिम कॉर्बेटची आठवण मनात येऊन गेली होती. त्याला मनोमन दंडवत घालुन आश्रमात गेलो, लगेच नोंदणी करून स्वामींचे प्रवचन ऐकायला गेलो.
पोटात कावळे ओरडत होते, पण आधी प्रवचन ऐकले. प्रवचन संपलं तेव्हा किचन बंद झालेले पण एका स्वयंसेवकांनी मला ते उघडून दिलं. दाल भात आणि कसलीतरी भाजी होती. प्रचंड भूक असल्याने समाधानाने जेवलो. परत एकदा ५०-६० पायऱ्या चढुन रूममध्ये आलो. खूप पायऱ्या असल्याने खूप जास्त चालायला होते इथे. चांगलं आहे. मला योगायोगाने सर्वात उंचावर असलेली , आणि नुकतीच नव्याने बांधलेली डॉर्मेटरी मिळाली होती.
पाठ टेकवली तेव्हा लहानपणी आजोबांनी शिकवलेले , भयमुक्त करणारं वाक्य मनात डोकाऊन गेलं . त्यानंतर झोप कधी लागली कळलंच नाही.
आस्तिक आस्तिक आस्तिक... तुला कालभैरवची धुई आहे.
प्रतिक्रिया
30 May 2024 - 3:42 am | चित्रगुप्त
सुरुवात जबरदस्त झालेली आहे. अगदी पहिल्या प्रतिमेत दिसणार्या रंगांच्या छटा अद्भुत आहेत, अगदी पेंटिंग बनवण्यासारख्या. अंधारातली प्रतिमा पण सुंदर. त्यात खालच्या बाजूला दिसणारा त्रिकोण कसला आहे हे आधी समजले नव्हते, पण वळणावरची खालच्या दरीच्या बाजूची दगडी भिंत आहेसे दिसते.
तुम्हाला आजोबांचा चांगला सहवास लाभलेला दिसतो. खूप नशीबवान आहात. (या बाबतीत आमच नशीब फुटके. दोन्हीकडले आजोबा आणि आज्या आमचे आई-वडील लहान असतानाच निवर्तले).
लेखाचे लहान लहान भाग पण छान वाटतात.
30 May 2024 - 5:52 am | कर्नलतपस्वी
हिमालय नवरसांची अनुभुती देतो. अप्रतिम आहे. एकदाच काय होईना हिमालय बघायला हवा. नोकरी मुळे बर्याचश्या छटा अनुभवायला मिळाल्या.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
30 May 2024 - 6:45 am | कंजूस
तुमचं हिमालय प्रेम जाणवत आहे.
जागेची नावं सांगितली की त्यांची वाट लागते हे बरोबर.
((हिमालयाबद्ल ( म्हणजे उत्तराखंड आणि हिमाचला प्रदेश) वाचून आणि त्याचे अंतर, प्रवास माहिती यातून ठरवून टाकले की हिमालय पर्यटन करायचे नाही. अगदी एकदा कधीतरी गेलोच तरी आवडला म्हणून वारंवार जाणे शक्य नाही. ))
लेख वाचणार. पर्यटनावर अध्यात्मिक विचारही मांडता.
30 May 2024 - 8:50 am | प्रचेतस
सुरेख सुरुवात प्रगोसर, येऊ द्यात बयाजवार.
30 May 2024 - 11:29 am | गोरगावलेकर
आश्रम नाही पण मंदिर पहिले आहे.
2 Jun 2024 - 5:47 pm | चौथा कोनाडा
व्वा, सुंदर लिहिलंत ! आणि प्रचि ही समर्पक !
वाह, क्या बात ! हे खूप आवडलं !
3 Jun 2024 - 9:42 pm | किसन शिंदे
फोटो दिसले नाहीत पण एकुण लेखनावरून तुझ्यासोबत तिथे फिरून आल्याचा भास झाला.
4 Jun 2024 - 2:35 pm | चौथा कोनाडा
च्यामारी ... फोटो खरंच गायबले की !
मी प्रतिसाद दिला तेव्हा होते की !
आता "URL signature expired" असं दिसतंय !
प्रगो भाऊ, नक्की काय अडचण येतेय ?
बघा, जमतंय का काही !
4 Jun 2024 - 8:43 pm | प्रसाद गोडबोले
मलाही दिसत नाहीयेत फोटो =))))