तो लेखक होता.
तो कथा लिहित असे. मधून मधून एखादी कविताही लिहित असे.
“चुकलेल्या वाटा.” हा त्याचा एकमेव कथासंग्रह होता.
त्याच्या घरात त्याच्या शिवाय अजून दोन मेंबर होते. एक स्त्री आणि एक मुलगा.
दुपारी चार वाजता तो तयार झाला. कुठेतरी जायचे होते. कुठे?
जिकडे वाट फुटेल तिकडे, जिकडे पाय नेतील तिकडे.
तो जायला निघाला तेव्हा ती स्त्री आणि तो मुलगा टीवी बघत होते.
“मी जातोय.”
Nobody said anything.
जा, नका जाऊ, लौकर ये. टेक केअर. काही नाही.
कदाचित त्यांना ऐकू गेले नसावे.
कोणीतरी बोललेही असेल पण मग ह्याला ऐकू गेले नसणार.
टीवी फुल ब्लास्ट.
हलकेच दरवाजा बंद करून तो बाहेर पडला.
थोड्यावेळाने त्याच्या लक्षात आले कि आपण बस स्टॉपवर आलो आहोत.
इतका वेळ शहाण्या मुलासारखं चूप बसलेले जग एकदम खवळून उठले.
येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे आवाज. हजारो माणसांच्या बोलण्याचा कोलाहल.
--------
-------------
White noise. सफेद झूट. कुठे अर्थ शोधताय.
बस मोकळीच होती. कुठे बसावे बरं?
“हेलो, मी इथे बसू?”
“बसा, कुठेही बसा. ही बस काही माझ्या बापाची नाही...”
अरे बापरे. भारी काम दिसतंय. इथं नको. दूसरीकडं बसुया.
“हेलो, हाऊ आर यू.”
दाखल घेतली गेली नाही. हरवलेला, दुसऱ्या विश्वात.
ही पहा आजच्या सकाळचीच गोष्ट.
आज तो ऑफिसात लवकर जावे म्हणत होता. म्हणून लवकर उठून, उरकून घेतलं, ब्रेड भाजला, चहा करायला आधण टाकलं.
तेव्हढ्यात फोन वाजला. कोणी अनोळखी नंबर होता.
“कोण बोलतय?”
“मी.”
“बोला मी.”
“मी म्हणजे फिरके.”
“ओके. बोला फिरके. काय काम काढलं आहे माझ्याकडे?”
“काम वगैरे काही नाही. सहज आपलं. तुम्हाला राग तर नाही आलाना?”
“नाही. नाही. राग यायचे दिवस सरले. जर तुमचे बोलणे झालं असेल तर मी फोन बंद करू?”
“तुमच्याशी बोलताना मला प्रसन्न वाटले.” आता तो घाई घाईने बोलायला लागला. कदाचित त्याला भीती वाटत असावी कि तो फोन कट करेल. “माझ्कायप्र्ब्लेमाहेना,,,”
“एक मिनिट फिरके. घाई करू नका. तुम्ही आता काय बोललात त्यातला एक शब्द देखील मला समजला नाही.”
“सॉरी. मला तुमचा सल्ला पाहीज्याल.”
“फिरके, माझा नंबर तुम्हाला कोणी दिला?”
“कोणी दिला नाही. त्याचं काय आहे डॉक्टर, मी आपला एक रँडम नंबर फिरवला तो तुमचा निघाला. आपल्या ओळखीतल्या लोकांशी मन मोकळे करून बोलातायेत नाही. म्हणून मी अशी ट्रिक केली.”
“आयडीया छान आहे. बोला बिनधास्त बोला.”
“प्रोफेसर, मी प्रेमात. कसं सांगू?”
“हे पहा तुम्ही जर प्रेमात पडला असाल तर आणि वेळ निघून गेली नसेल तर जायचं आणि सांगायचं, “आय लव यू!””
“अहो, हेच बोलायचे आहे? तिने नकार दिला तर? त्याची भीती वाटते.”
हे सांगणं सोपं पण बोलणे किती कठीण. फोन कट झाला.
मला पण बोलायचं होत, पण शेवटपर्यंत बोलणं झालच नाही. ज्याला स्वतःला बोलता आल नाही तो दुसऱ्याला काय सल्ला देणार?
“माझे प्रश्न कोण सोडवणार? मी कुणाला फोन करू? ओ या.” तो स्वतःशी बडबडत होता.
फोन उचलला आणि त्याने स्वतःचाच नंबर डायल केला. म्हणाला बघुया काय होतंय.
“तुम्ही जो नंबर डायल केला आहे तो अस्तित्वात नाहीये.”
“म्हणजे पहा तुम्ही स्वतःशी सल्ला मसलत करू शकत नाही. हे टेलिफोन वाले माझी माझ्यापासून फारकत करायला बघत आहेत. ऐसा तो चालबे ना.”
मी डिरेक्टरी असिस्टंसला फोन लावला.
“मी आपली काय मदत करू शकतो?” (म्हणजे, “मी आपल्याला काय मदत करू?”)
“हा नंबर आहे, तो मला मिळत नाहीये. जरा कनेक्ट करून द्याल का?”
थोड्या वेळाने.
“हा नंबर भागो पाटील ह्यांच्या नावावर आहे का?”
“हो हो. प्लीज कनेक्ट करा.”
“माफ करा, पण भागो पाटील परागंदा आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. तुमच्या कडे जर त्यांच्या बद्दल काही माहिती असेल तर कृपा करून तुम्ही ताबडतोब पोलिसांशी संपर्क करा. मला तुमचा नंबर सागा बरं.”
Vvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvv
“हेल्लो.”
शेजारी बसलेल्याने भुवया चढवून त्याच्या कडे बघितलं, “येस? मला काही बोललात?”
“मी म्हणत होतो, हवा किती छान पडली आहे ना? ह्या वेदरमध्ये हायवे वर एखाद्या ठेल्यावर बसून गरमा गरम चहा पीत पावसाची वाट पहात बसावं. विजा चमकत असतील तर सोनेपे सुहागा. हवेत हळू हळू गारवा पसरतो आहे. तुफान वारं. तो पहिला पाउस. तो मातीच्या अत्तराचा वास!...” तो भान हरखून बोलत गेला.
बस स्पीडब्रेकरवरून धाडधाड करत गेली.
शेजाऱ्यानं मोबाईल काढला. त्यात बघितल्या सारखे केलं, कानाला लावला, “हेलो?”
लेखकाची लिंक तुटली. तो भानावर आला.
अरे ही तर नेहमीची ट्रिक.
कंडक्टर टिकटिक आला.
“तिकीट?”
“एक नोव्हेअर.”
“ऑ?”
“ओ सॉरी. द्या कुठलेतरी, लास्ट स्टॉपचं द्या.”
बस थांबली. “ओके. काळजी घ्या.”
आल्या स्टॉपला आपला लेखक उतरला.
समोर बघतो तर काय “क्रॉसवर्ड.”
गाळलेली अक्षरे भरा आणि एक अर्थपूर्ण शब्द बनवा. उभे आडवे एकमेकात अडकलेले शब्द!
ज्या प्रमाणे तो इथपर्यंत आला तसाच तो बुकशॉपमध्ये गेला.
सारं कसं शांत शांत.
तो वेड्यासारखी वाट बघत होता. आवाजांची. निखळ आरडा ओरडीची. उच्चरवात गप्पा मारणाऱ्या मित्र मंडळांची. फिदी फिदी हसणाऱ्या मुला मुलींची. कुजबुज करणाऱ्या प्रेमिकांची. ग्लासवर ग्लास चिअर्स. बांगड्यांची नाजूक किणकिण. मोटारींचे हॉर्न. आगगाडीची शिट्टी. वरातीचा बॅंड बाजा. पेटीची सरगम. गवय्याची तान. तंबोऱ्याचा षडज. शिल्पा राव. आरजीत. बेनी. केके. श्रेया, कहा हो तुम?
कैसे मुझे तुम मिल गयी,
कुणीतरी ओरडलं.
“हेलो.”
काचेच्या शांततेला तडा गेला. सिक्युरीटीचा एकजण आणि एक सफेद झूठ त्याच्याकडे धावत आले. पुस्तकं वाचणारे, बघणारे, चाळणारे. काही रिकामटेकडी मनं. आश्चर्य चकित. सगळेच दचकले.
दोन चार हळवी पुस्तकं रॅक मधून खाली कोलमोडून पडली.
“सर, थोडं पाणी प्या. मरणाचं ऊन. सरबत मागवू का? अरे गोविदा...”
“थँक्स, मी ठीक आहे.” त्याला विचारायचं होते कि आत्ता “हेल्लो” म्हणून कोण ओरडलं? पण विचारायचं धैर्य झालं नाही.
हळू हळू ऑर्डर वाज गेटिंग रीस्टोर्ड.
“मी भागो पाटील. लेखक आहे.”
“ओके. तुम्हाला पुस्तकं बघायची आहेत? इंग्रजी का मराठी? या असे इकडून. काही मदत लागली तर हा मी इथे आहे.”
त्याच्या प्रकाशकानं “चुकलेल्या वाटा.” च्या पाच कॉप्या ठेवायला दिल्या होत्या. त्यातली एखादी तरी खपली का? हे चेक करायचं होतं.
तो घरी परत आला,
हरलेला हरवलेला.
ती स्त्री आणि तो मुलगा अजून टीवी समोर बसले होते. त्याच्या डोक्यात लख्खन प्रकाश पडला. काय करायचे आहे त्याचे सम्यक ज्ञान झाले.
एक खुर्ची ओढून तो पण टीवी बघायला बसला.
सिनेमा, सिरिअल्स, वादविवाद, क्रिकेटचे सामने, मुलाखती...
अशी कित्येक युगे गेली. रोबोट आले नि गेले. अलीएन आले तेही कंटाळून निघून गेले.
एके दिवशी मात्र मजा झाली,
विजेचा सप्लाय फेल झाला.
“हायला सप्लाय गेला.”
“नेमका आत्ताच गेला. नशीब. पिक्चरचा शेवट बघायचं नशिबात नव्हतं.”
त्यानं बाजूला बघितलं. एक अनोळखी स्त्री आणि एक मुलगा बसले होते.
बहुतेक त्यांनी पण त्याला बघितले असावे.
तिघेही एकदम म्हणाले,
“तुम्ही कोण?”