पुन्हा एकदा कोकणातला पाऊस

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
6 May 2024 - 11:04 pm

पुन्हा एकदा कोकणातला पाऊस.

मी पावसाला माझ्या जीवनाचा एक भाग केला आहे. आणि पावसाने मला माणूस म्हणून विकसित व्हायाला मदत केली आहे”.

कोकणात जन्माला आल्यामुळे मी जेव्हडा कोकणातला पाऊस पाहिला आहे तेव्ह्डा क्वचित कुणी पाहिला असावा.कोकणाच्या पावसावर मी बरेच लेख लिहिले आहेत.त्यात ही आणखी एक भर म्हणा.

मी कोकणात शिडकावा देणारा पाऊस पाहिला आहे.रिमझिमणारा पाऊस पाहिला आहे.आडवा-तिडवा येणारा पाऊस पाहिला आहे.कोसळणारा पाऊस मी पाहिला आहे.
उन्हात पडणारा पाऊस मी पाहिला आहे.अगदी मूसळधार पाऊस पाहिला आहे.महावृष्टित पडलेला पाऊस मी पाहिलेला आहे.तुम्ही कल्पना कराल असं कसलही पर्जन्य मी कोकणात पाहिलं आहे.
सतत ओतणार्‍या पावसात मी निरनीराळे पावसातले खेळ खेळलो आहे.भर पावसत होणार्‍या मोठ्या मोठ्या पुढार्‍यांच्या सभांना हजर राहिलो आहे.अगदी कडी म्हणजे प्रत्येक पावासाचा थेंब माझ्या संवेदना जागृत करेल अशा एखाद्या पावसात तासनतास मी उभा राहिलो आहे.

बर्‍याच लोकांचं पावसाबद्दल मत असतं की पाऊस त्यांच्या कार्यात खीळ घालतो किंवा अडचणी आणतो.मी मात्र अशा विचाराच्या लोकांशी मुळीच सहमत नाही.तसं पाहिलत तर इतरांसारखच माझं मत आहे असं म्हटलं तर गैर होणार नाही.म्हणजेच मला ही पाऊस पडत रहावा असं वाटत नाही.पण जर का मी कुठेही असताना एकाएकी पाऊस आलाच तर मी मोठ्या मरणातून वाचलो असं काही मला वाटत नाही.

कोकणातल्या पावसाची हिच तर मजा आहे,खासियत आहे की एकदा का तुम्ही धोधो पावसात अडकला की,तुमच्या शरीरावरचा एक ही भाग दिसणार नाही की त्या जागी तुम्हाला पावसाने ओलं चिंब केलं नाही आणि अशावेळी हे मला खरोखरच विस्मयकारक वाटतं.असा एखादा क्षण आला की माझ्या लक्षात येतं की,हा पडणारा पाऊस मला मुळीच भिजवत नसावा कारण मी जेव्हडा म्हूणून पाण्याने चिंब व्हायला हवा तेव्हडा झालेला आसतो आणि हा मूसळदार पाऊस पडतच नाही अशी गम्मतीची कल्पना माझ्या मनात डोकावते.तो पाऊस गेलाच असं वाटत असताना जणू काय तो पाऊस माझा हिस्सा आहे आणि मी त्या पावसाचा हिस्सा आहे असं वाटतं.प्रत्येक पावसाचा थेंब माझ्या अंगात उर्जा वाढवित असतो आणि मला अंमळ प्रबळ झाल्यासारखं वाटतं.

माझी ही भिजण्याची भावना खरोखरच जास्त परिणामकारक व्हायला जी आठवण माझ्या जवळ आहे ती आठवण म्हणजे मी एकदा आमच्या गावात बांधलेल्या उघड्या नाट्यगृहात झालेला गाण्याचा कार्यक्रमात हजर होतो तेव्हाची.प्रत्यक्ष नाटकाचा मंच पूर्णपणे शाकारला होता.बाकी श्रोत्यांचा बसण्याचा भाग पूर्णपणे मोकळा होता.उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा इथे कार्यक्रम होतात ते उकाड्याविना पाहायला मजा येतो हे निराळे सांगणे नकोच.

मे महिन्याचे दिवस होते.कोकणातला पाऊस “नेमिच येई सात जूनला” हे अगदी पक्क सगळ्यांना माहित होतं.अर्थात मेच्या अगदी अगदी शेवटी वळवाचा पाऊस येऊन जातो तो निराळा.त्यादिवशी सकाळी तर खूपच उकडत होतं.पाऊस येऊन जावा असं वाटत होतं.संध्याकाळचा काळोखातला तो कार्यक्रम होता.गाण्याचा कार्यक्रम ऐन रंगात आलेल्या क्षणी असा काही जोराचा वारा सुटला की खरोखरच सकाळच्या उकाड्यातून सुटका झाली असं वाटत होतं.आणि तसाच पाऊस सुरू झाला.

खरं तर प्रत्येकाच्या तोंडून “वा: वा: मस्त पाऊस पडतोय” असं काहीसं ऐकायला मिळेल अशी अपेक्षा असतानाच कुणी जागेवरून उठलं नाही.गाण्यात व्यत्यय यायला नको होता.प्रत्येकाच्या अंगात एक विशेष उर्जा आलेली दिसली.कोकणातल्या पावसाकडून मिळणारी ती उर्जा होती म्हणा.डोकीं भिजली जात असताना उर्जा वाढतच होती.

त्या दिवशी पावसात भिजत भिजत गाणं ऐकताना चिंब भिजून जाण्याच्या प्रक्रियेत असंच गाणं ऐकत रहावं आणि असाच पाउस पडत रहावा असा विचार माझ्या मनात आला आणि आजुबाजूला गाणं ऐकत असणार्‍या सर्वांच्या मनात तसंच आलं असावं असं मला राहून राहून वाटलं.

असे हे पावसात भिजण्याचे आठवणीत ठेवण्यासरखे क्षण माझ्या अयुष्यात बरेचदा येऊन गेले.आणि बरेच वेळा हे क्षण मी माझ्या जवळच्याबरोबर आनंदात घालवले आहेत.
आणि अशा जागेत की ज्याबद्दल मी अभिमानाने सांगवं की ते म्हणजेच कोकण.

मला पाऊस भावतो.पाऊस जीवनात विशेष अर्थ आणतो.तो आल्यावर आपत्ती येते पण ती ओलांडून जायला आपल्याला प्रयत्नात ठेवते.मी कोकणात असताना पावसाच्या दिवसात रहायला मला ते एक आव्हान वाटतं.ते आव्हान पेलणं कधीच सोपं नसतं आणि कधी कधी ते बिकट वाटतं.पावसावर मात करायची झाल्यास मी त्याला सरळ सरळ अंगीकारतो.पावसाला अंगीकारून,मी कोण,मी कुठचा आणि मला काय व्हायचं आहे या गोष्टी अंगीकारू शकतो.मी पावसाला माझ्या जीवनाचा एक भाग केला आहे. आणि पावसाने मला माणूस म्हणून विकसित व्हायाला मदत केली आहे.

इतिहासप्रकटन