जमिनींच इनसाईडर ट्रेडींग, एक दुर्लक्षित प्रश्न

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
13 Apr 2024 - 10:48 am

इनसाईडर ट्रेडींग म्हणजे थोडक्यात गुप्त माहितीच्या आधारे सौदेबाजी. उदाहरणार्थ सार्वजनिक कंपनीच्या शेअर स्टॉक किंवा इतर सिक्युरिटीज (जैसे बॉण्ड्स किंवा स्टॉक ऑप्शन्स) च्या किमतींवर कंपनीच्या आर्थिक स्थिती आणि भावी प्रकल्पांची माहितीचा प्रभाव पडेल. अशी माहिती सर्व शेअर होल्डर्स पर्यंत अधिकृतपणे पोहोचण्या आधीच ज्यांच्या कडे ज्यांना कंपनीबद्दल गुप्त, महत्त्वाची माहिती आहे ते माहिती आधिकृतपणे जाहीर होऊन किमती वाढण्या किंवा कमी होण्या आधीच शेअरची खरेदी किंवा विक्री करून इतर सर्वसामान्य शेअर होल्डरच्या आधीच स्वतःच्या पदरात फायदा पाडून घेतात. हे गुंतवणूक केलेल्या शेअर होल्डर्सची अप्रत्य़क्षपण मोठी आर्थिक फसवणूक असते म्हणून बेकायदेशीर असते. त्यावर इनसायडर ट्रेडींग विरोधी विशेष कायदा आणि सेबी नावाची विषीष्ट स्वतंत्र संस्था लक्ष ठेऊन असते.

आता आपण जमिन या विषया कडे येऊ. केंद्र किंवा राज्यसरकार सरकार किंवा महापालिका आणि संबंधीत निमशासकीय संस्था विवीध पायाभूत प्रकल्प जसे कि रस्ते, विमानतळे औद्योगिक वसाहती इत्यादी उभारतात. या साठी मोठ्या प्रमाणावर जमिनींचे अधिग्रहण केले जाते आणि त्यातील बर्‍याच जमिनी सर्वसामान्य नागरीक आणि शेतकर्‍यांच्याही असतात. त्यांचे नुकसान होऊ नये आणि आंदोलने आणि कोर्ट कचेर्‍यात वेळ जाऊ नये म्हणून गेल्या एखाद दोन दशकांपासून सरकार अशा जमिनींना स्वतःहूनच मोठा वाढीव भाव देते. पण अशा प्रकल्पांची माहिती आधिकारीवर्ग आणि राजकारण्यांना मंजुरी देण्याच्या निमीत्ताने माहित झालेली असते. समजा जमिनीची किंमत १० लाख आहे त्याला शासना कडून ३० लाखाला खरेदी केले जाणार आहे तर होऊ घातलेल्या प्रकल्पाची माहिती मिळालेले अधिकारी किंवा राजकारणी सर्वसामान्यांना त्याची माहिती अधिकृत मिळण्यापुर्वीच अशा जमिनी शेतकर्‍यांना मोठ्या किमतीचे प्रलोभन दाखवून खरेदी करून घेतात. समजा शेतकर्‍याने अशी १० लाखाची जमिन भावी प्रकल्पाची कल्पना नसताना २० लाखाला विकली तर त्याचे दहा लाखांचे नुकसान होऊ शकते. आता असे व्यवहार आधिकारी किंवा सत्तेतील राजकारण्यांनी स्वतः केले तर भ्रष्टाचार विरोधी कायद्यात येऊ शकते पण तेही अंशतः. इतर नातेवाईक किंवा परिचितांच्या नावावर व्यवहार घडवले तर सध्याच्या कायद्याच्या कचाट्यातून सुटणे बरेच सोपे असावे.

एकी कडे मूळ सामान्य जमिन मालकाचे नुकसान होते दुसरी कडे कर देणार्‍या जनतेने भरलेल्या कराचा अपव्यय होतो किंवा अशा प्रकल्पासाठी शासनाने कर्जे घेतली असतील तर अधिकच्या किमतीवरील व्याजाचा परतावा हा अप्रत्यक्षपणे महागाईस कारणीभूत ठरणारा होऊ शकतो.

अशा संभावित प्रकल्पाच्या जमिनीचे खरेदी करून मग विक्री करून शेकडो कोटीचा नफा खिशात टाकून राजरोस पणे वावरण्याचा प्रकार भारतातील एका मोठ्या राजकीय परिवारातील नातेवाईकानेही केला. दुसरी कडे महाराष्ट्रातील एक मध्यम राजकीय नेता छोट्याशाच जमिनीचा असा व्यवहार करून आज एका राजकीय पक्षात उद्या दुसर्‍या असा तळ्यात मळ्यात करतो. तर आधिकारी वर्गाने केलेली प्रकरणेही क्वचित बातम्यात येऊन जातात. कायद्याचाच अंकुश नाही तर त्यांच्या नावांची आणि प्रकरणांची चर्चा करणे नामुष्किचे ठरते. दुसरीकडे घराणेशाही मग कोणत्याही पक्षातील असो असे विवीध फायदे खिशात घालत असतानाही सर्व सामान्य जनता अशा घराणेशाहीतील मंडळींचे हिरहिरीने आपल्याच घरची मंडळी असल्यासारखे टोकाच्या समर्थनातही उतरतात.

सध्याचा प्रकार म्हणजे शहाळ्याला (नारळ) भोक करण्याचा कायदा / प्रकल्प एका पक्षाने करायचा आणि सत्ता परिवर्तना नंतर दुसर्‍या पक्षातील लोकांनी येऊन शहाळ्यातले पाणि आणि मलई सेवन करायची. माध्यमात चुकून चर्चा झालीच तर सगळे कायदेशीरच किंवा पुरेशा पळवाटा असलेले असते . नैतिकतेच्या दृष्टीने चर्चा झाली तरी भोक तर तुम्ही पाडले होते विरुद्ध मलई तर तुम्ही खाल्ली अशी माध्यमांची टिआरपी वाढवणारे जनतेचे मनोरंजन करता येते. सर्वसामान्य कार्यकर्ते आणि कळफलक बडवणारे आपापसात भांडत रहातात. वर मात्र राजकीय विरोधक असलो तरी व्यक्तिगत संबध कसे मैत्रीचे आहेत याचे गुणगानही करून घेण्याचीही सोय राजकीय नेत्यांना असते.

एकीकडे गरीब बेकारच नाही तर करदाताही नाडला जात असतो आणि उरले सुरले घामाचे लुटले जाताना त्याचे त्यालाही समजत नाही हि दुरावस्था आहे. असो. कालाय तस्मै नमः

* अनुषंगिका व्यतरीक्त आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आभार
* व्यवस्थीत कायदेशीर खात्री शिवाय वादग्रस्त प्रकरणातील व्यक्तींची नावे नमुद करणे टाळा.
* उत्तरदायीत्वास नकार लागू

समाजलेख

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

13 Apr 2024 - 8:28 pm | कानडाऊ योगेशु

ह्याबाबतीत बेंगलोर एअरपोर्ट चे उदाहरण चपखल ठरेल.
सध्याचे देवनहल्ली इथले आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्याआधी राजकारणी लॉबी ने पध्दतशीर आवई उठवली कि संभाव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कनकपुरा रोडवर होणार आहे आणि तिथल्या जमिनी खरेदी करुन चढ्या भावात विकायला सुरवात केली व समांतरपणे देवनहल्ली इथल्या जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावला.(विमानतळ देवनहल्ली इथेच होणार आहे ही आतील बातमी राजकारण्यांना माहीती होती.).कालांतराने देवनहल्लीचा प्रकल्प सुरु झाला. चढ्या भावात कनकपुरा इथल्या जमिनी खरेदी करुन बसलेले नागरिक डोक्याला हात लावुन बसले व राजकारण्यांनी देवनहल्लीच्या जमिनींची मलई ही खाल्ली.

माहितगार's picture

13 Apr 2024 - 8:42 pm | माहितगार

:) हे तर अजून हुशार! केवढी बुद्धीमत्ता पण वस्तुंचे उत्पादन करून निर्यातवाढ वगैरेत लावण्याऐवजी अशा सामान्यांचे नाव घ्यावे आणि त्यांनाच लुटण्याचा व्यवसाय पिढ्यान पिढ्या चालवावा या कडे लागलेले असते.

सर टोबी's picture

14 Apr 2024 - 10:28 am | सर टोबी

दाढीचे खुंट वाढलेले गरीब शेतकरी, कुडाचं छप्पर असलेली झोपडी, शेंबडी, उघडी पोरं, एखादी कातर आवाजातली कॉमेंट्री (“काळ्या आईची लेकरं” वगैरे) असं काही असतं तर मजा आली असती.

जमीन चांगला परतावा मिळावा म्हणून खरेदी करणारी माणसं ही रविवारी सकाळी मंडईत मटार खरेदी करायला येणारी मध्यमवर्गीय असतात आणि अपेक्षित भाव मिळाला नाही की हाय खाऊन मटकन बसतात असं काहीसं चित्र रंगवलं आहे.

आताही पुण्यात नविन विमानतळ चाकणला होणार की पुरंदरला होणार याची उत्सुकता आहे. यात तो पुरंदरला झाला तरी चाकणला गुंतवणूक करणारे उघड्यावर पडतील असं नाहीय. तेथे आत्ताच मोठी एमआयडीसी आहे आणि गुंतवणूक वाया जाण्याची शक्यता नाही. यात गुंतवणूक करणारे मोठे व्यावसायिक असतात की जे कोणतेही सरकार असले तरी नेहमी फायद्यातच असतात.

बाकी लेख हा खूप सामाजिक तळमळीतून लिहिला आहे असं वाटू शकतो. परंतू नुकताच अप्रकाशित झालेल्या लेखात लेखक अगदी सामान्य माणसासारखे वाकुल्या दाखवण्याच्या पातळीवर उतरतात हे लक्षात आले. तरी पण ज्या झिलकाऱ्यांना सामिल व्हायचं आहे त्यांना शुभेच्छा.

माहितगार's picture

14 Apr 2024 - 5:39 pm | माहितगार

आपल्याला गणित येतं? गणितीय उदाहरण लेखात मांडून दाखवले आहे. 'सुपातले हसतात .. ' अशा अर्थाची एक म्हण मराठी भाषेत आहे.

सर टोबी's picture

14 Apr 2024 - 8:03 pm | सर टोबी

एकदम उत्तम! बाकी जी गृहीतकं आहेत ती गंडली आहेत. अमुक एका ठिकाणी विकास करायचा याचे ठराव आणि लिखापढी सर्व कारकून पातळीवर होते. अगदीच काही नाही तरी तलाठ्याला पहिली जमीन केवढ्याला विकली गेली आहे ते समजते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रकल्पाच्या जमिनींवर आरक्षण पडते.

या उलट लोक नियुक्त सरकार फोडणं, निवडणूक रोख्यांच्या बाबतीत जनतेला काहीही माहिती असण्याचा अधिकार नाही असा दावा करणं अशा मग्रूरीला आळा घालण्यासाठीचे उपाय यावर चर्चा जास्त अर्थपूर्ण झाली असती आणि आपला निस्पृहपणा अधोरेखित झाला असता.

'धागा लेखास संबधीत नसलेली मी एवढी व्हॉट अबाऊटरी का करतोय? इतर विषयावर वेगळे धागा लेखन करण्यास माझे हात तर कुणि धरले नव्हते' (पुन्हा पुन्हा अनंत वेळ वाचण्यासाठी)

सर टोबी's picture

15 Apr 2024 - 12:49 pm | सर टोबी

मोठे भगदाड सोडून लहान छिद्र दाखवताय एवढंच सिद्ध करायचं आहे.

'महाकोटी भगदाड दाखवून कोटींची छिद्रे लपवणे' व्हॉटाबाऊटरीचे व्हवच्छेदक वर्णन करणारा वाकप्ररासाठी उदाहरण पुरवण्यासाठी अनेक आभार.

रोजच्या उपजिविकेसाठी जगणार्‍या भुरट्याचोरांना आणि दरोडेखोरांनी करू नये असे दुसर्‍र्‍याचे नुकसान करून स्वतःचा फायदा साधणे नैतिक असते की अनैतीक? अनैतिकपणे केलेले छिद्रही अनैतीक आणि अनैतिकपणे केलेले भगदाडही अनैतीक.

अगम्य's picture

16 Apr 2024 - 1:12 am | अगम्य

माहितगार साहेब, तुमचे लेख नेहमी माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारे असतात. हा विषय दुर्लक्षित आहे हे खरेच. त्यामुळे त्याची चर्चा जर होत असेल तर चांगलेच आहे.
अमेरिकेत स्टॉक act नुसार लोकप्रतिनिधींना आणि काँग्रेस मध्ये काम करणाऱ्यांना नॉन पब्लिक माहिती उपलब्ध असेल तर संबंधित शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्यास काही प्रतिबंध आहेत. इनसाईडर ट्रेडिंग हे अमेरिकेत फार गंभीरपणे घेतले जाते. भारतात हे कितपत केले जाते माहित नाही. जमिनीशी संबंधित निर्णय घेणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन त्यांना असेलेल्या गुप्त माहितीच्या आधारे जमिनीत गुंतवणूक करून प्रचंड फायदा करून घेऊ शकतात/ घेतात. ह्यावर काही नियामक बंधने आली, आणि त्यांच्या जमीनविषयक व्यवहारांचा त्यांना असलेल्या गुप्त माहितीशी संबंध आढळल्यास कारवाई करण्याची तरतूद झाली तर गैरप्रकारांना थोडा आळा बसू शकेल. पण हे खूप किचकट आहे, बेनामी मालमत्ता वगैरे करून त्यातूनही पळवाट काढली जाऊ शकते. हा विषय सोपा नाही. पण कायद्याची थोडी का होईना आडकाठी असली तर चांगलेच.

प्रकल्प आणि जागा ठरल्यानंतर त्या तारखे अगोदर पाच वर्षांत कुणी कुठे किती जमिनी घेतल्या यांची यादी जाहीर करावी.

सुबोध खरे's picture

18 Apr 2024 - 12:27 pm | सुबोध खरे

जमिनी विकत घ्यायच्या, त्यावरील आरक्षण उठवायचे आणि चढ्या भावाने विकायच्या.

प्रकल्प होणार हि माहिती हाती आली कि जमिनी विकत घ्यायच्या आणि चढ्या भावाने विकायच्या.

जे विकत देत नसतील त्यांच्या गळयावर सूरी ठेवून करा करवून घ्यायचे.

आणि जे विकणार नसतील त्यांच्या जमिनीवर खोटे दावे लावून न्यायालयात अडकवून ठेवायचे आणि शेवटी जेरीस येऊन याने जमीन विकली कि खटले काढून घ्यायचे.

असले व्यवहार सर्रास सर्व राजकारणी गेली सत्तर वर्षे करत आले आहेत.

यात नवीन किंवा आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.

त्यात भूखंड आणि श्रीखंड आवडणारे नेते सर्वात पुढे आहेत.

अहिरावण's picture

18 Apr 2024 - 12:32 pm | अहिरावण

>>>त्यात भूखंड आणि श्रीखंड आवडणारे नेते सर्वात पुढे आहे

ते सगळ्यांचे गुरु आहेत.
भ्रष्टाचार, जातीपातीत भेद, धर्माधर्मात तेढ, आदीवासींवर अत्याचार हेच तर केले त्यांनी