अपहरण - भाग ७

स्मिताके's picture
स्मिताके in जनातलं, मनातलं
6 Mar 2024 - 6:43 pm

भाग ६ - https://misalpav.com/node/51983

कर्नल एकटेच आपल्या केबिनमध्ये येरझारे घालत होते. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली यशाची मोहर दिवसेंदिवस दृढ होत होती. जगातल्या सर्वात सामर्थ्यशाली राष्ट्रावर त्यांनी मात केली होती. आधुनिक काळातील सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा त्यांच्यासमोर कुचकामी ठरली होती. त्यांची स्वतःचीच अफाट स्वप्नं फिकी पडावीत, इतकी संपत्ती आज त्यांच्याजवळ होती. तिच्या जोरावर मनात येईल ते पद त्यांना मिळवता आलं असतं. कदाचित त्यांना पूर्वेकडील एखाद्या देशावर राज्य करता आलं असतं. मग स्वप्नाळू डोळ्यांच्या सुंदर मुलींनी त्यांना मोरपिसांच्या पंख्याने वारा घातला असता. त्यांच्यासाठी मधुर स्वरात गाणी गायिली असती. अशी सुंदर भविष्यकाळाची स्वप्नं त्यांच्या डोळ्यांसमोर तरळत होती. अपहरणाचा धाडसी बेत बिनचूक तडीस गेला होता. आता उरलेलं आयुष्य चैनीत घालवता आलं असतं.

यश पायाशी असं लोळण घेत होतं. आणि अफाट यशानंतर येणाऱ्या ग्लानीने कर्नलना घेरून टाकलं होतं. त्यांची कल्पनाशक्ती, ऊर्जा नाहीशी झाली होती. कसली इच्छाच उरली नव्हती. थोड्याच दिवसांपूर्वी अतिशय सावध, चतुर, धाडसी, महत्त्वाकांक्षी असं त्यांचं वर्णन करता आलं असतं. पण आता ते स्वप्नांच्या दुनियेत राहू लागले होते. त्यांना यशाची धुंदी चढली होती. परिस्थिती गरिबीची असती, तर आपलं कर्तृत्व त्यांनी असं नष्ट होऊ दिलं नसतं. पण ते आता श्रीमंत होते. आणि श्रीमंतांनी ऐषारामात लोळायचं नाही, तर कोणी?

कर्नलच्या आलिशान केबिनमध्ये फक्त त्यांच्या मुलाला प्रवेश होता. पण वडिलांच्या भयंकर दुष्कृत्यांना आपण नकळत का होईना, तत्परतेने साथ देत होतो, या शरमेने त्याची प्रकृती खालावू लागली होती. वडिलांचा साहसी, उत्साही स्वभाव बदलून आता ते कपटी झालेले दिसत होते. वडिलांचं रहस्य समजल्यापासून गेल्या काही दिवसांत मुलाचा काहीही करायला तयार असणारा स्वभाव बदलून गेला होता. तो अपराध्यासारखा चिडीचूप राहू लागला होता. कर्नल आपल्या मुलाच्या नजरेला नजर भिडवायला कचरू लागले होते. आपण स्वतःला समजतो तसे युगपुरुष वगैरे नाही,असं स्वतःच्या दुष्ट मनाशी कबूल करायला लावणारा हा पहिला धोक्याचा इशारा होता.

इतकंच नव्हे, तर फरार गुन्हेगार असूनही कर्नलना आपण सुरक्षित आहोत असं वाटत होतं. कारण अमेरिकन सरकारने त्यांना वचन दिलं होतं ना! त्यांना शिक्षा होणं शक्यच नव्हतं. त्यांना स्वातंत्र्याचं आश्वासन मिळालं होतं. ते बिजलीच्या डेकवर जात. समुद्रावरच्या शुद्ध, खारट हवेत दमदार श्वास घेऊन छाती फुलवून रुबाबात येरझारे घालत. नजर जाईल तिकडे त्यांचं क्षितिज अमर्याद विस्तारलेलं दिसे. आपल्या देशातून ते हद्दपार झाले होते हे खरं, पण त्यांनी अफाट संपत्ती कमावली होती. दुसऱ्या कुठल्यातरी देशात आपली निश्चित वाहवा होणार, सन्मान होणार याची त्यांना खात्री होती. एका बँक दरोडेखोराची गोष्ट त्यांना आठवत होती. या फरार गुन्हेगाराने वुर्टेमबर्गच्या राजाकडून बॅरनचं पद विकत घेतलं होतं, आणि एक सन्माननीय नागरिक म्हणून तो तिथे थाटात राहत होता. कर्नलना वाटे, "आपल्याजवळ तर अमेरिकन नाणी आहेत, तीही सोन्याची. मग आपण विकत घेऊ शकणार नाही असं जगात काय असणार?"

असं असूनही त्यांचं मन अस्वस्थ होतं. असमाधानी होतं. त्यांना आपल्या कर्तृत्वाबद्दल वाटणारा अभिमान या भावना झाकोळून टाकत असत. कुठून येत असाव्यात या भावना ? त्यांच्या मुलाने त्यांच्याशी बोलणं टाकलं, म्हणून? की त्यांचं वर्चस्व उताराला लागलं होतं, म्हणून? म्हणजे तसं काही खलाशांनी बंड वगैरे केलं नव्हतं, किंवा त्यांच्या आज्ञेचा अवमान केला नव्हता. भरपूर पगार आणि पोटभर अन्नावर खूष असलेले खलाशी या थराला पोहोचले नव्हते. कदाचित तसं कधी घडलंही नसतं. पण स्वतः गुन्हेगार असल्याशिवाय माणसं एखाद्या दुष्ट किंवा फरार व्यक्तीच्या आज्ञा पाळत नाहीत.

एका अर्थी बिजली वरचा खलाशी चमू मालकाच्या विजयाने खूष झाला होता. अपहरणाचं गरळ त्यांच्या धमन्यांत भिनलं होतं. कर्नल ऑडमिंटन लवकरच आपलं खरं रूप दाखवतील. स्थापत्यशास्त्राचा सर्वोत्तम नमुना असलेल्या या जहाजाचं रूपांतर एका जबरदस्त लुटारू जहाजात करतील, अशी स्वप्नं ते पाहू लागले होते. आपण हे जहाज घेऊन एका दुर्गम बेटावर जाऊ. तिथे अतोनात संपत्ती असेल. स्त्रीसुखाची चंगळ असेल. निरंतर नशेत राहता येईल. या आशा मनाशी बाळगून ते कर्नलच्या आज्ञा तत्परतेने पण अलिप्ततेने पाळत होते. ही अलिप्तता पाहून कर्नल बुचकळ्यात पडत. पण त्यांच्या मनात संशय नव्हता. कारण ते स्वतःही स्वप्न पाहत होते, एका प्रतिष्ठित आयुष्याचं, जगात कोणाजवळ नसेल इतक्या चैनीच्या आयुष्याचं.

पुढचे दहाएक दिवस बिजलीने अटलांटिक समुद्रावर मनमुराद नर्तन केलं. अर्थात तिला कुठेतरी किनाऱ्याला लागणं भाग होतं. माणसाला सोन्याची नाणी खाऊन जगता येत नाही. त्याला अन्न लागतं. या अद्ययावत जहाजावर विजेची आधुनिक उपकरणं होती. बर्फ बनवणारी, खाऱ्या पाण्यापासून गोडं पाणी बनवणारी, वगैरे. पण त्यापैकी कोणतंच यंत्र लाकडापासून साखर किंवा कोळशापासून मांस बनवू शकत नव्हतं. किनारा गाठण्याच्या कल्पनेने कर्नलच्या अंगात उत्साह संचारला होता. पण दुसरीकडे त्यांना थोडी धाकधूक वाटत होती. लोकांना भेटण्याची भीती वाटत होती. सर्वांच्या नजरा आपल्यावरच खिळलेल्या असतील, अशी शंका प्रत्येक गुन्हेगाराला वाटते. कर्नलनाही तीच शंका छळत होती. अभय मिळाल्यामुळे अटक होणार नव्हतीच. पण आपलं स्वागत कशा प्रकारे होईल, याची भीती होती.

इकडे किनारा गाठायचा निर्णय ऐकून खलाशी आनंदाने बेभान झाले होते. कित्येक दिवसांनंतर ही सुवर्णसंधी आली होती. हातात भरपूर पगार होता. तो कधी एकदा दारूत आणि स्त्रीसुखात उडवतो अशा स्वप्नांत ते धुंद झाले होते. सर्व बंदरांमधून स्त्रिया आणि रम यांना बंदी आणणारा एखादा आंतरराष्ट्रीय कायदा लागू झाला, तर अखंड ब्रम्हचर्य पाळावं लागून सर्व खलाशांची किती पंचाईत होईल! पण बिजली किनाऱ्याजवळ पोहोचू लागताच कॅप्टन हॅन्स ख्रिश्चनने खेदाने मान हलवली.

रुपर्ट वडिलांपेक्षा निराळा होता. कर्नलचे सर्वच गुणदोष त्याला अनुवंशिकतेने मिळाले नसावेत. त्याचं हृदय निर्मळ होतं. आपली स्थिती किती लाजिरवाणी आहे, हे त्याच्या ध्यानात आलं होतं. कर्नलपासून सुटकेच्या ध्यासाने त्याची तब्येत खालावत चालली होती. मलूल डोळ्यांनी तो ब्रिटिश किनारा न्याहाळत होता. कदाचित, संधी मिळताक्षणी आपल्या कपटी वडिलांना सोडून पळून जावं असा बेत त्याने रचला असावा.

शेवटी एकदाचा किनारा दिसला. जगातलं सर्वात वेगवान जहाज आता आपल्या खऱ्या स्वरूपात जगासमोर उभं होतं. पुन्हा ते मेरी जेन स्टीमरचं रुपडं घेण्याचा विचारही कर्नलच्या मनात आला नव्हता. आता ना लपवाछपवीची गरज, ना पोबारा करण्याची. पेनझान्स नावाच्या त्या असंतुष्ट बंदरात बिजली हलकेच शिरली, तेव्हा नुकतीच पहाट होत होती.

बंदरावरच्या रहिवाशांचा दिवस भल्या पहाटे सुरु होतो. पेनझान्सचे तुकतुकीत अंगकाठीचे कोळीही भरतीबरोबर आपल्या होड्या समुद्रात ढकलायच्या तयारीत होते. त्यांनी नजरा वर केल्या मात्र, त्यांना ते महाकाय दिमाखदार जहाज शिडांशिवाय, वाफेशिवाय लाटांवर संथपणे हेलकावत येताना दिसलं. त्यांनी एकमेकांना साद घातली. सगळे तावातावाने ओरडू लागले. पुळणीवर भराभर प्रचंड जमाव गोळा होऊ लागला. त्यापैकी एकजण बंदरावरच्या पबच्या दिशेने धावत गेला, आणि जहाजाचं चित्र छापलेला एक कळकट कागद घेऊन आला. सरकारी जाहीरनामा होता तो.

समुद्रातल्या मोठाल्या खडकांवर लाल कोटधारी ब्रिटिश सैनिक उभे होते. ते जहाजाकडे बोट दाखवून कुजबुजत होते. नकारार्थी मान हलवत होते. काहीतरी अघटित घडणार होतं नक्कीच. बिजलीने नांगर टाकेपर्यंत पेनझान्स मधले एकूण एक रहिवासी बंदरावर हजर झाले होते. प्रत्येकजण बिजलीकडे बोट दाखवून जोरजोराने हातवारे आणि शिवीगाळ करत होता.
"हेच ते जहाज. या चित्रात दिसतो आहे तसाच डेक, इथे लिहिली आहेत तीच मापं. उडवा त्या हरामखोरांना. इथे ब्रिटनमध्ये थारा मिळणार नाही म्हणावं."
"बिली.. धर जा त्या साल्या कर्नलला. इथे बंदरावर येऊन तर दाखव म्हणावं, पार समुद्राच्या तळाला पाठवू xxxला."
बिजलीने नांगर टाकला. जहाजाच्या मागच्या बाजूला दिवा नव्हता. डोलकाठी नव्हती, त्यामुळे कसल्याही खुणेचा झेंडा लावायला जागा नव्हती. जहाजाच्या मध्यभागी युनियन जॅकसुद्धा लावणं शक्य नव्हतं. वाफेच्या बोटीवर असतो तसा एक खांब होता. तो वापरता आला असता.
पण "ही काही रात्रीची वेळ नव्हे. काही गरज नाही झेंडेबिंडे लावण्याची." असं कर्नलनी खलाशांना समजावलं होतं.
"मग युनियन जॅक लावू या का?" कॅप्टन हॅन्स ख्रिश्चनने विचारलं.
कर्नल भडकले. "xxx! नको म्हटलं ना, कसलाच झेंडा नको."
जहाजावरचे खलाशी किनाऱ्यावर उडालेला गोंधळ पाहत होते. पण त्यांना त्यात काही विशेष वाटलं नाही.

खंडणीची रक्कम घेऊन पोटोमॅक नदीतून निसटताना, शंभरेक कॅमेरे आपल्यावर रोखलेले होते याचा कर्नलना विसर पडला होता. या कॅमेऱ्यांच्या कार्यक्षम प्लेट्स एका सेकंदाच्या दोन हजाराव्या भागात बिनचूक प्रतिमा पकडू शकतात. जगातली सर्वात वेगवान बिजलीसुद्धा या वेगाशी स्पर्धा करू शकली नाही. डुप्लेक्स शटर हे एखाद्या सराईत गुन्हेगारापेक्षा तरबेज असतं. कॅमेऱ्याचा वेग तोफेच्या गोळ्याला सुद्धा हरवू शकतो.

अमेरिकन सरकार जगातल्या सर्व मित्र राष्ट्रांना तारेने जाहीरनामा पाठवू शकेल, हे कर्नलच्या ध्यानात आलं नव्हतं. हा जाहीरनामा तुमच्या सर्व बंदरांत पाठवा, अशी विनंती करण्यात आली होती. जाहीरनाम्यात बिजलीचं छायाचित्र आणि कर्नलचं वर्णन होतं. कोणत्याच देशाने त्यांना अपाय करू नये, पण त्यांचा पाहुणचारही करू नये अशी विनंती त्यात होती. कर्नल समुद्रावर सफर करत असताना ही बातमी तारेद्वारे सर्व देशांत पोहोचली होती. प्रत्येक देशाच्या वेगवान लाईनर जहाजांनी ती बंदराबंदरातून पोहोचवून सर्वांना सावध केलं होतं.

तर अशा रीतीने लाखो लोक बिजलीची वाट बघत होते. त्यांच्या मनात बिजलीविषयी दयामाया नव्हती, आदर नव्हता. महिलावर्गाला गुन्हेगाराविषयी अनुकंपा नव्हती, असं प्रथमच दिसलं. या गुन्हेगाराने राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला कैदेत ठेवलं होतं ना! त्यामुळे समस्त महिलांची मृदु हृदयं दगडासारखी कठीण झाली होती.

थोडक्यात, कर्नल ऑडमिंटन आणि त्यांच्या खलाशांना संपूर्ण जगाने हद्दपार केलं होतं. सर्वात अलिप्त असणारे देश सुद्धा अमेरिकेच्या विनंतीला मान देऊन जाहीरनाम्याची अंमलबजावणी करायला उत्सुक होते.

(भाषांतर) क्रमश:

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

स्मिताके's picture

10 Mar 2024 - 7:14 pm | स्मिताके

diggi12 - आपण प्रत्येक भाग वाचून प्रतिसाद देत आहात, मनःपूर्वक धन्यवाद!