सुप्रसिद्ध रशियन लेखक अंतोन चेखाॅव यांच्या Enemies/एनिमीज कथेचा हा भावानुवाद. ज्यानी वाचली नसेल त्यांच्यासाठी आणि वाचली आहे त्यांच्यासाठीही.कारण त्यांच्या अनुवादाबद्दलच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील ]
सप्टेंबर महिन्याच्या त्या काळरात्री सुमारे दहा वाजता, झेम्स्टवो डॉक्टर (जिल्हा प्रशासनाचा डॉक्टर) किरीलोवचा ,एकुलता एक,सहा वर्षांचा लहानगा अँड्री घटसर्पाने मरण पावला. डॉक्टरची पत्नी आपला लाडक्या मुलाच्या खाटे समोर गुडघे टेकून बसली आणि दुःखातिरेकाने तिने टाहो फोडला. इतक्यात दरवाजावरील घंटी कर्कशपणे वाजली.
ज्या दिवशी घटसर्पाची लागण झाली, अगदी त्याच सकाळपासून घरातील सर्व नोकरचाकरांना रजा दिली गेली होती. घंटेचा आवाज ऐकताच किरीलोव होता त्याच स्थितीत, दार उघडायला गेला .त्याच्या अंगात घरातला शर्ट होता, वेस्टकोटची बटणंही उघडीच होती. कार्बोलीक ॲसिडने भाजलेले हात त्याने धुतले होते तेही तसेच ओले होते. घामेजलेला चेहराही अजून त्याने पुसला नव्हता. हॉलमध्ये संपूर्ण काळोख होता. अंधारात किरोलोवने बघितलं की कुणीतरी मध्यम उंचीचा एक गृहस्थ उभा होता. त्याच्या गळ्यात असलेल्या पांढऱ्या स्कार्फमुळेच केवळ त्याचं अस्तित्व समजत होतं. आणि त्याहीपेक्षा त्याचा तो पांढराफटक पडलेला चेहरा....इतका पांढरा की त्यामुळे हॉल उजळून गेला.
डॉक्टरसाहेब घरी आहेत का?... अनोळखी गृहस्थाने विचारलं
हो मीच आहे डॉक्टर ...किरीलोव उत्तरला. काय हवं आहे आपल्याला?
ओहो, तुम्ही स्वतःच डॉक्टर आहात? वा! वा! फारच छान - अनोळखी गृहस्थ आनंदून जात म्हणाला. अंधारातच तो डॉक्टरांचा हात चाचपडू लागला. स्पर्श होताच त्याने तो घट्ट दाबून धरला, म्हणाला ...ही फारच चांगली गोष्ट झाली...फारच चांगली ! आपण यापूर्वी भेटलो आहोत . मी ॲबोजीन ग्नोशेव्ह ... तुम्ही स्वतःच भेटलात हे फार बरं झालं ....मेहरबानी करा आणि या वेळी येता येणार नाही असे म्हणू नका... माझी पत्नी अत्यवस्थ आहे... आणि मी मी सोबत घोडागाडी देखील घेऊन आलो आहे.
त्या गृहस्थांचा आवाज, बोलणं ,शरीराच्या हालचाली यांवरून अगदी स्पष्ट होतं की तो अत्यंत गोंधळलेला, चिंताग्रस्त होता. अगदी एखादा आगीत सापडलेला असावा किंवा एखादा पिसाळलेला कुत्रा मागे लागला आहे अशा अवस्थेतला असावा तसा ! बोलताना त्याचा श्वास जोरजोरात चालू होता. तो घाईघाईने आणि काप-या स्वरात बोलत होता. त्याच्या स्वरात बालकाचा भित्रेपणा होता पण बोलण्यात सच्चेपणा जाणवत होता. घाबरलेली, गोंधळलेली माणसं जशी तुटक तुटक बोलतात किंवा उगाचच अनावश्यक काहीतरी सांगत रहातात तसाच तोही बोलत होता.
मला धास्ती वाटत होती की तुम्ही घरी भेटता की नाही...तो म्हणाला.. मी इथे येत होतो तेव्हा मी खूपच घाबरलो होतो ... तेव्हा आता मेहेरबानी करून पटकन कपडे करा आणि आपण लगेच निघूया... .झालं काय पॅपचिन्स्की माझ्याकडे आला ... अलेक्झान्डर सायमिनोविच .... तुम्ही ओळखता त्याला..... तर आम्ही असे गप्पा मारत बसलो होतो. मग आम्ही चहा पिऊ लागलो. एवढ्यात माझी पली मोठ्याने ओरडली. तिने आपने हात छातीवर, हृदयाशी ठेवले होते आणि ती जवळ्याच खुर्चीत कोसळली. आम्ही तिला उचलून बिछान्यावर ठेवले. साल्वोलाटील ने तिचं कपाळ चोळलं. तोंडावर पाणी मारलं.पण ..पण .... डॉक्टर नाही हो... ती प्रेतासारखी पडली होती. मला ...मला वाटतं.. तिचा हार्टफेल झाला असावा .चला लवकर.. अहो तिचे वडील देखील हार्ट फेलनेच मेले होते.
जणू रशियन भाषा समजत नसल्यासारखं, किरीलोव हे सगळं निर्विकारपणे ऐकत होता.
ॲबोजीनने तुन्हा एकदा पॅपचिन्स्की आणि त्याच्या पत्नीच्या वडलांचा उल्लेख केला आणि पुन्हा एकदा त्यांचे हात आपल्या हातात धरले तेव्हा डॉक्टरांनी आपलं डोकं हलवलं आणि क्षीण, अनिच्छेच्या सुरात, संथपणे म्हणाले... क्षमा करा, पण मी येऊ शकत नाही. पाचच मिनिटांपूर्वी माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
'काय सांगता? ॲबोजीन पटकन मागे सरत पुटपुटला. अरे देवा! कुठल्या भयंकर क्षणी मी इथे आलो आहे! आजचा दिवस फारच दुर्दैवी आहे ..फारच दुर्दैवी! आणि काय हा योगायोग... या घटनेमागे काही कार्यकारण तर नसेल?
ॲबोजीनने दाराच्या कडीला धरले आणि मान खाली घालून तो चिंतीत उभा राहिला. स्पष्टच होतं की परिस्थिती जाणून घेतल्यावर पुन्हा एकदा डॉक्टरला विनंती करावी की नाही या दुविधेत तो पडला होता.
ऐका ना ..किरीलोवच्या शर्टाची बाही पकडत तो उतावीळपणे म्हणाला "तुमची परिस्थिती मी पूर्णपणे समजू शकतो. ईश्वर जाणतो की अशा वेळी तुम्हाला आग्रह करताना मला किती शरम वाटते आहे. पण विचार करा ना, मी या वेळी कुठे, कुणाकडे जाऊ? तुमच्या खेरीज इथे दुसरा कुणी डॉक्टर नाही. दया करा आणि या. आणि मी काही हे माझ्यासाठी सांगत नाही. असं नाही की मला काही होतंय!"
पुन्हा एकदा शांतता पसरली. किरीलोवने ॲबोजीनकडे पाठ केली. क्षणभर स्तब्ध उभा राहिला. बाहेरच्या दिवाणखान्यातून आतल्या दिवाणखान्यात आला. यांत्रिकपणे ,भान नसल्याप्रमाणे हालचाली करत त्याने टांगलेल्या दिव्याची शेड नीट बसवली आणि जवळच्याच टेबलावर पडलेल्या जाडजुड पुस्तकातून तो काहीतरी त्याला वाचू लागला. पण ही वेळ अशी होती की काही करण्याची गरज अथवा ईच्छा त्यांना नव्हती. तो काही विचार करण्याच्या मनस्थितीत नहता .कदाचित बाहेर कुणीतरी आपली वाट पहात उभं आहे हे देखील तो विसरला होता. दिवाणखान्यातील उदास, भयाण शांतता त्याला अधिकच विषण्ण करीत होती. दिवाणरवान्यातून अभ्यासिकेत जाताना तो आपला उजवा पाय उगाचच उंच उचलून टाकत होता. आधारासाठी दरवाज्याच्या फळ्या शोधत होता.त्याच्या हालचाली एखाद्या गोंधळलेल्या माणसासारख्या होत होत्या. जणू काही या ठिकाणी तो प्रथमच आला होता. कुठल्यातरी अनोळखी घरात जणू तो वावरत होता, चाचपडत होता. त्याच्या पुस्तकांच्या मांडणीवर प्रकाशाची एक तिरीप पडली होती. या प्रकाशासोबतच अभ्यासिकेत श्वास गुदमरवून टाकेल असा की कार्बोलिक ॲसिड आणि इथरचा तीव्र वास भरून राहिला होता. अभ्यासिकेच्या उघड्या दारातून तो बाजूच्या शयनगृहापर्यंत पसरला होता..... डॉक्टर टेबलाजवळील खुर्चीत धाडकन बसला. टेबलावर पसरलेल्या पुस्तकांकडे म्लान नजरेने पाहू लागला, मग थोड्या वेळने उठून शयनगृहात गेला.
इथे या शयनगृहात आणखीनच भयाण शांतता पसरलेली होती.खोलीतली अगदी क्षुल्लकातील क्षुल्लक गोष्ट देखील , काही वेळापूर्वी इथे आलेल्या वादळामुळे पसरलेली खिन्नता कथन करत होती. नाना प्रकारच्या औषधांच्या कुप्या,खोके आणि बाटल्या स्टूलावर पडल्या होत्या. त्यातच एक मेणबत्ती जळत होती. एका बुटक्या कपाटावर असलेल्या एका मोठ्या दिव्याने खोली उजळून निघाली होती. लख्ख प्रकाश पडला होता. खिडकीजवळ एक बिछाना होता आणि त्यावर एक लहानगा मुलगा पडला होता. त्याचे डोळे सताड उघडे होते आणि चेहऱ्यावर कसलंतरी आश्चर्य दिसत होतं. तो अजिबात हालचाल करत नव्हता पण त्याचे डोळे मात्र क्षणोक्षणी गडद होत होते आणि जणू खोबणी मध्ये खोल खोल जात होते. त्या मुलाच्या आईने आपले हात त्यांच्या अंगावर ठेवले होते आणि जमिनीवर गुडघ्यांवर बसून तिने आपला चेहरा बिछान्यावरच्या चादरीत खुपसला होता. त्या मुलाप्रमाणेच तीही निश्चल बसून होती . पण तरीही तिच्या त्या वेटोळं केलेल्या शरीरात कुठेतरी जिवंतपणाची खूण होती. मोठ्या प्रयत्नाने, तिच्या थकलेल्या शरीराला विसावा देणारी ही स्थिती तिला साध्य झाली होती आणि ती बिघडू नये यासाठी जणू ती तशी निश्चल बसली होती. रजया, कपडे, हात धुवायची भांडी, जमिनीवरचे ओघळ ,चमचे अशा नानाविध वस्तू आजूबाजूला विखुरल्या होत्या. लाईम वाॅटरची एक बाटली आडवी पडली होती. पण हे सारं सारं अगदी स्तब्ध होतं.
पँटच्या खिशात हात खुपसून डॉक्टर आपल्या पत्नीशेजारी येऊन उभे राहिले आणि मान कलती करून आपल्या मुलाकडे एकटक बघत राहिले. त्यांचा चेहरा निर्विकार होता परंतु त्यांच्या दाढीवर चमकणारे पाण्याचे थेंब सांगत होते की त्यांचे डोळे रडत होते.
मृत्यू म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर उभी रहाणारी भीषणता मात्र त्या खोलीत अजिबातच दिसत नव्हती. ती मूक शांतता, आईची निश्चल स्थिती, डॉक्टरच्या चेहयावरची निर्विकारता यात कुठे तरी सौंदर्याचा भास होता. मानवी दुःखाचे ते सूक्ष्म पण मायावी सौंदर्य हृदयाला हात घालणारं होतं. शब्दात ते व्यक्त होण अशक्य होतं. कदाचित संगीताला ते शक्य झालं असतं. त्या स्तब्धतेमध्ये देखील एक सौंदर्य होतं. किरीलोव आणि त्याची पत्नी रडत नव्हते पण त्यांच दुःख ,त्यांची स्थिती त्या दृष्यातून कथन होत होती. त्यांचं तारुण्य सरलं होतं आणि या मुलासोबत भविष्यात मुलाचं सुख मिळण्याबाबतची शक्यताही संपली होती. डॉक्टरांची चाळीशी उलटली होती आणि एवढ्यातच त्यांच्या शरीरावर वाढलेल्या वयाच्या खुणा दिसू लागल्या होत्या. त्यांची क्षीण पत्नी पस्तिशीला आली होती. ॲन्ड्री एकुलता मुलगा नव्हता पण वाचलेला मात्र एकमेव होता.
पत्नीच्या स्वभावाच्या विरुद्ध, डॉक्टरांचं मन दुःखी असेल तेव्हा त्यांना काहीतरी शारिरीक हालचाल करणं अत्यावश्यक वाटत असे. बायकोपाशी पाचच मिनिटं थांबून राहिल्यावर ते बाहेर पडले आणि पूर्वीप्रमाणेच उजवा पाय जरा उंच उचलत शेजारच्या एका खोलीत शिरले. एका मोठ्या दिवाणाने ती लहानशी खोली अर्धी व्यापून टाकली होती. तिथून ते पूढे स्वैपाक घरात गेले.फायर प्लेस जवळ ते थोडे घुटमळले आणि कुक बेडपासून एका लहान दारातून ते बाहेरच्या दिवाणखान्यात आले .
येताक्षणीच पुन्हा एकदा त्यांना पांढ-या स्कार्फचं आणि पांढ-याफटक पडलेलेल्या चेह-याचं दर्शन झाले.
अखेर! ॲबोजीनने निश्वास सोडला आणि दरवाज्याच्या कडीवरचा हात सोडत म्हणाला 'चला, निघायचं आपण?
डॉक्टरांनी त्याच्याकडे नजर टाकली आणि त्यांना आठवलं. क्षणभर ते थरथरले.
'हे बघा,मी यापूर्वीच सांगितले आहे की मी येऊ शकत नाही ' ते म्हणाले.'काहीतरीच विचित्र बोलणं तुमचं!'
'डॉक्टर, अहो मीही हाडामासांचा माणूस आहे. तुमची परिस्थिती मी चांगलीच समजू शकतो. त्याविषयी मला पूर्ण सहानुभूती आहे!' ॲबोजीन विनवणीच्या स्वरात म्हणाला.. 'पण असं बघा की मी काही माझ्यासाठी तुम्हाला यायला सांगत नाही. माझी बायको तिथे मृत्यूशी झुंजते आहे .तुम्ही जर तिचं ते ओरडणं, तिचा तो चेहरा बघितला असतात तर माझ्या ह्या आग्रहाचं कारण तुमच्या लक्षात आलं असतं! ईश्वरा ...अहो मला वाटलं तुम्ही कपडे घालून तयार होत आहात, चला चला, वेळ फार मोलाचा आहे. . चला निघू या. मी हात पसरतो तुमच्यापुढे.'
क्षणभर थांबून किरोलोव म्हणाले..'मी येऊ शकत नाही' आणि ते आतल्या दिवाणखान्यात गेले.
ॲबोजीन त्यांच्या मागे मागे गेला आणि त्याने त्यांच्या शर्टाची बाही पकडली. 'तुमचं दुःख मी समजू शकतो.पण मी काही तुम्हाला दाढदुखीवर उपचार करायला सांगत नाही किंवा एखाद्या गोष्टीसाठी तुमचं तज्ञ मतही विचारत नाही . हा एका माणसाच्या जीवनाचा प्रश्न आहे.' ... एखादया भिका-याप्रमाणे तो याचना करीत होता. माणसाचं जीवन हे वैयक्तिक दुःखापेक्षा अधिक महत्वाचे आहे .धीर धरा आणि मानवतेच्या दृष्टीने विचार करा.
'मानवतेचा विचार तर तुम्हीदेखील केला पाहिजे' थोडंसं त्रासिकपणे किरोलोव म्हणाले. त्याच मानवतेच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही मला येण्याची विनंती करु नये. ईश्वरा! काम म्हणायचं या माणसाला! इथे मी माझ्या पायावर धड उभा राहू शकत नाही आणि तुम्ही मला मानवतेचे दाखले देता आहात? काही करण्याच्या स्थितीतच नाही मी आत्ता. मी कुठेही येणार नाही.माझ्या पत्नीला मी एकटी सोडू इथे? ...अशा परिस्थितीत?....नाही, नाही ....
किरोलोव हातवारे करत म्हणाले आणि मागे वळले.
'आणि हो .....' अस्वस्थपणे ते म्हणाले 'कायद्याप्रमाणे ...नियमावली खंड क्र. 13 प्रमाणे मी तुमच्याबरोबर यायला बांधील आहे आणि माझी मानगूट पकडून मला घेऊन जाण्याचा तुम्हाला अधिकार आहे.....ठीक आहे, तुम्ही ते करूही शकता ....पण ...काहीही करायला मी अक्षम आहे .माझ्याच्याने बोलवतही नाही...क्षमा करा."
"हे तुमचे असं बोलणं अजिबात योग्य नाही डॉक्टर" ॲबोजीन म्हणाला. आणि पुन्हा एकदा त्याने डॉक्टरांच्या शर्टाची बाही पकडली...
'तो तेरावा खंड गेला चुलीत!अशी बळजबरी करण्याचा मला काही अधिकार नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही या नाहीतर ईश्वर तुमचं रक्षण करो! मी तुमच्या इच्छेला नाही तर तुमच्या भावनेला आवाहन करतोय. एक तरुण स्त्री मरत घातली आहे! आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमचा मुलगा मृत झाला आहे.अशा वेळी माझी भिती, माझी परिस्थिती खरं तर तुमच्यापेक्षा दुसरं कोण जास्ती जाणू शकेल?
ॲबोजीनच्या आवाजात कंप होता आणि तो कंप शब्दांपेक्षा अधिक प्रभावी होता. ॲबोजीन खरे बोलत होता.पण त्याचं ते तत्वज्ञानाने भरलेलं, आत्माहीन (आत्ताचं डॉक्टरच्या घरातले वातावरण आणि त्याची स्वतःची मरत घातलेली पत्नी या संदर्भात अयोग्य वाटणारं )बोलणं डॉक्टरना आवडलं नाही आणि गैरसमज होऊ नये म्हणून जमेल तितक्या शांत आणि मृदू आवाजात त्यांनी पुन्हा एकदा नकार दिला. कारण हे त्रिकालाबाधित सत्य आहे की शब्द कितीही खोल, गंभीर झाणि सुंदर असले तरी त्याचा परिणाम फक्त त्यांच्यावर होतो ज्यांचा त्या शब्दांशी काहीही संबंध नसतो. आनंदी किंवा दुखी माणसाला शब्दांमुळे, आनंदात समाधान किंवा दुःखात सांत्वन नेहमीच मिळते असं नाही कारण आनंद किवा दुःखाचं सर्वांत प्रभावी प्रगटीकरण म्हणजे शांतता किंवा मौन हेच असतं . दोन प्रेमी जीव एकमेकांना मूकपणेच अधिक जाणतात. उत्कट, भावनाप्रवण असं, अंत्यसंस्काराच्या सभेत दिलेले भाषण हे इतरांना प्रभावित करत असलं तरी मृत व्यक्तीच्या विधवेला, मुलांना मात्र ते निरर्थक आणि नीरस वाटते
किरोलोव स्तब्धआणि शांत उभे होते. पण
ॲबोजीनने जेव्हा डॉक्टरच्या उच्च कर्तव्य आणि त्यागाविषयी बोलायला सुरवात केली तेव्हा डॉक्टरने कठोर आवाजात विचारलं
'किती दूर आहे तुमचं घर ? '
'तेरा चौदा व्हर्स्टस' (versts - Russian measure of length-1verst is about 1.1km) पण माझ्याकडे उमद्या घोड्यांची गाडी आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी तुम्हाला घेऊन जातो आणि एका तासात परत आणून सोडतो. फक्त एक तास!
शेवटच्या या शब्दांनी डॉक्टरांना अधिक प्रभावित केलं. अगदी मानवता आणि डॉक्टरच्या कर्तव्यांच्या संदर्भापेक्षा जास्त! क्षणभर विचार करून त्यांनी उसासा सोडला आणि म्हणाले - 'ठिक आहे, जाऊया आपण'
ते पटकन पण अडखळत्या पायांनी आत अभ्यासिकेत गेले आणि आपला लांब कोट घालून बाहेर आले. ॲबोजीन आनंदला आणि त्यांच्या भोवती अधीरतेने घोटाळला. त्यांचा लांब कोट चढवायला त्याने मदत केली आणि हात धरून त्यांना बाहेर घेऊन आला. बाहेरही खूपच अंधार होता पण दिवाणखान्यांपेक्षा उजेडच होता.त्या अंधारात किंवा उजेडात डॉक्टरांचा वाकलेला देह, खुरटी दाढी आणि गरुडासारखं नाक स्पष्ट दिसत होतं. तसंच ॲबोजीनचा पांढरा पडलेला, रुंद चेहरा, जेमतेम डोके झाकणारी लहानशी कॅपही दिसत होती. त्यांचा तो पांढरा दिसणारा स्कार्फ फक्त पुढेच पांढरा दिसत होता. मागे मात्र त्याच्या मानेवर रुळणा-या लांब केसांनी तो पूर्ण झाकून गेला होता. ' 'विश्वास ठेवा तुमच्या सहृदयतेचा मी आदर करतो.' ॲबोजीन पुटपुटला आणि डॉक्टरांना घोडागाडीत बसायला मदत करु लागला. 'आपण अगदी वेगाने जाऊ. ल्यूक, राजा, जेवढ्या वेगाने गाडी हाकता येईल तेवढी हाक!'
गाडीवानाने गाडी हाकायला सुरवात केली.सुरवातीला हॉस्पिटल यार्ड मधल्या इमारतींची रांग होती. सगळीकडे अंधारच होता. पण यार्डच्या शेवटी असलेल्या एका इमारतीच्या खिडकीतून थोडा उजेड बाहेर पडला होता. तिथून पुढे मात्र अंधारच होता.घनदाट झाडीच्या भागातून जाताना झाडांची सळसळ ऐकू येत होती आणि दमट, कुबट मशरूमचा वास नाकाला जाणवत होता .चाकांच्या खडखडाटामुळे रूक पक्षी (कावळ्यासारखा दिसणारा पक्षी.ज्याचं ओरडणं अशुभ मानत) झाडाच्या पानांतून जागे झाले आणि उदास, आर्त स्वरात ओरडू लागले. जणू काही त्यांना समजलं होतं की डॉक्टरांच्या लहानग्याचा मृत्यू झाला आहे आणि ॲबोजीनची पत्नी आजारी आहे.. जरा पुढे आल्यावर झाडी थोडी विरळ झाली आणि मग थोडी खुरटी झूडपं दिसू लागली.तळ्याचं पाणी चमकत होतं आणि त्यात काळ्याशार सावल्या पडल्या होत्या. हळूहळू गाडी सपाट रस्त्याला लागली. आता रुक पक्ष्यांचं ओरडणं अगदी हलक्या स्वरात ऐकू येत होते. आणि थोड्या वेळात सारं काही शांत झालं.
जवजवळ पूर्ण रस्ताभर किरिलोव आणि ॲबोजीन गप्प होते. अगदी क्वचित एकदा ॲबोजीन उसासला आणि पुटपुटला होता 'ही फारच जीवघेणी वेदना आहे.'
एखाद्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याची वेळ येत नाही तोवर त्या व्यक्तीवर आपण तितकं प्रेम करत नाही.
गाडी जेव्हा नदीपार होत होती तेव्हा इतका वेळ शांत आसलेले किरिलोव अस्वस्थपणे हालचाल करू लागले. जणू काही खळाळणा-या नदीच्या पाण्याचं त्यांना भय वाटत असावं. 'मला जाऊदे, 'ते व्यथित होत म्हणाले. 'मी नंतर येईन तुमच्याकडे.मला कुणातरी परिचराची व्यवस्था करु दे आधी .माझी पत्नी तिथे एकटीच आहे.'
ॲबोजीन काहीच बोलला नाही. घोडागाडी वेगाने आणि दगडातून खडबड करत, कधी वाळूतून जात पुढे जात होती.किरीलोव अस्वस्थपणे चुळबुळ करत होते. आजूबाजूला काही तरी शोधत होते. रस्त्यावर चांदणं पडलेले दिसत होतं. विलो वृक्षांच्या झालरीतून नदीकाठ हळूहळू अदृष्य होत होता .उजवीकडे एक सपाट, विस्तीर्ण मैदान होतं. आणि तिथे अंतरा अंतराने मंद दिवे पेटले होते. कदाचित तिथे हिरवळ असावी. डावीकडे रस्त्याच्या पलिकडे एक टेकडी पसरलेली होती. त्यावर लहान लहान झुडपं होती .टेकडी मागे अष्टमीचा चंद्र प्रकाशत होता.काहीसा तांबूस, धुक्याने वेढलेला आणि विरळ ढगांनी आच्छादलेला होता.
एकूणच सारा परिसर निरुत्साही, उदास होता. एखादया हतभागी अधः पतित स्त्रीने अंधा-या खोलीत बसून आपला भूतकाळ विसरायचा प्रयल करावा किंवा पृथ्वीने वसंत ऋतूचे सरते अवशेष सांभाळण्याचा प्रयल करावा आणि अटळ अशा थंडीची नाईलाजाने वाट पहावी त्याच प्रकारे नजर फिरवाल तिथे अंधार, औदासिन्याची खोल दरी होती ज्यातून किरोलोव किंवा ॲबोजीन, अगदी त्या तांबूस अर्धचंद्राचीही सुटका नहती.
घोडागाडी ईच्छित स्थळाच्या जसजशी जवळ येऊ लागली तसतसा ॲबोजीन उतावीळ होऊ लागला. तो जागेवरच उठून उभा राहिला आणि गाडीवानाच्या डोक्यावरून समोर पाहू लागला.अखेरीस घोडागाडी एका दिमाखदार पाय-यांपाशी येऊन थांबली.
प्रतिक्रिया
18 Feb 2024 - 12:03 pm | मुक्त विहारि
वाचत आहे
28 Feb 2024 - 11:53 am | श्वेता व्यास
वाचत आहे
आनंदी किंवा दुखी माणसाला शब्दांमुळे, आनंदात समाधान किंवा दुःखात सांत्वन नेहमीच मिळते असं नाही कारण आनंद किवा दुःखाचं सर्वांत प्रभावी प्रगटीकरण म्हणजे शांतता किंवा मौन हेच असतं .
हे आवडलं
29 Feb 2024 - 11:57 pm | नूतन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
2 Mar 2024 - 12:12 pm | चौथा कोनाडा
अतिशय रोचक सुरुवात...
खूप सुंदर अनुवाद
वर्णन शैली मुळे जबरदस्त वातावरण तयार झाले आहे कथेत.
आता पुढं काय होणार याची उत्सुकता.
3 Mar 2024 - 12:42 pm | नूतन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद