अपहरण - भाग २

स्मिताके's picture
स्मिताके in जनातलं, मनातलं
17 Feb 2024 - 4:06 am

९ जूनला सकाळी अकरा वाजता वॉशिंग्टन पोलीस खात्याच्या प्रमुखांना बरोबर घेऊन इन्स्पेक्टर बायरन्स राज्यसचिवांच्या घरी गेले, आणि त्यांच्या खाजगी भेटीची मागणी केली. तिथे खूप गडबड उडाली होती. सर्व राजकीय महत्त्वाच्या व्यक्ती तिथे हजर होत्या. त्यांची व्हिजिटिंग कार्डं आत पाठवली जात होती. त्या भयंकर बातमीवर तावातावाने चर्चा झडत होत्या. टपाल खात्यातून येणाऱ्या तारांचा तर जणू पाऊस पडत होता. त्या भयानक घटनेमागे काहीतरी राजकीय कट किंवा कसलातरी बदला घेण्याचं कारस्थान असल्याचा संशय हळूहळू पक्का होऊ लागला होता. नेतेमंडळी उदास चेहऱ्यांनी एकमेकांशी कुजबुजत होती.

खाजगी भेट मागणारी ती दोन कार्डं पाहून राज्यसचिव हलकेच युद्धसचिवांना म्हणाले, "आता रहस्य थोडंसं तरी उलगडेल."
तिघांची एकांतात भेट झाली. वॉशिंग्टनच्या पोलीस प्रमुखांनी झट्कन विषयाला हात घातला. माजी सैनिक असलेले हे अधिकारी अत्यंत प्रामाणिक आणि रोखठोक होते.

"सचिव महाशय, गेल्या कित्येक वर्षांत दिसला नसेल, असा काळाकुट्ट दिवस आपल्या राष्ट्रात आज उगवला आहे. माफ करा, पण आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न
विचारणं आवश्यक आहे."इन्स्पेक्टर बायरन्स खिडकीकडे पाठ करून बसले होते. ही त्यांची नेहमीची पद्धत. खोलीत शिरताक्षणी त्यांनी मुसंडी मारून दोन खुर्च्या आणि एक टेबल यांच्या मधली जागा पटकावली होती. त्यामुळे राज्यसचिवांना नाईलाजाने खिडकीसमोर बसावं लागलं होतं. खिडकीतून पडणाऱ्या प्रकाशामुळे त्यांच्या निर्मळ चेहऱ्यावरचे अगदी सूक्ष्म हावभावदेखील इन्स्पेक्टरना स्पष्ट दिसत होते.

"सर, हे कार्ड आपल्या ओळखीचं आहे का?" बंदुकीच्या गोळीसारख्या भेदक प्रश्नाबरोबर ते कार्ड झपकन राज्यसचिवांच्या गुढघ्यावर पडलं, तेही नेमकं सुलट बाजूने. प्रख्यात जादूगार हॅरी केलर सुद्धा अशा सफाईने ही करामत करू शकला नसता. सचिवांनी त्या कार्डाकडे क्षणभर पाहिलं, आणि आश्चर्याने म्हणाले, "हो, माझंच आहे हे कार्ड."

"आपल्याजवळ अशी आणखी कार्डं आहेत का?" इन्स्पेक्टर बायरन्सनी प्रथमच तोंड उघडलं. हा प्रश्न ऐकून सचिव गोंधळले, पण त्यांनी खिशातल्या पाकिटातून आणखी काही कार्डं काढून इन्स्पेक्टरांच्या हातात दिली. इन्स्पेक्टरांनी आदराने झुकून ती स्वीकारली. क्षणभर त्या कार्डांची कसून तपासणी झाली.
"माफ करा, पण ही कार्डं आपण राष्ट्राध्यक्षांच्या भेटीसाठी वापरता का?" पोलीस प्रमुखांनी प्रश्न केला. इन्स्पेक्टर बायरन्सची नजर अजूनही त्या कार्डांवर रोखलेली होती.
"नाही, म्हणजे हो, वापरतो. कधी रात्री अपरात्री महत्त्वाच्या कामासाठी तातडीने भेटावं लागलं, तर वापरतो." सचिव म्हणाले. आता ते जरा अस्वस्थ वाटू लागले.

"आपण दोघे शेवटच्या वेळी कधी भेटलात ते कृपया सांगू शकाल?" इन्स्पेक्टर बायरन्सनी इतरांच्या नकळत हळूच वर पाहून अगदी सहज गप्पा मारण्याच्या स्वरात विचारलं. राज्य सचिवांचा चेहरा सैलावला. "हो, सांगतो. काल दुपारी तीन ते चार या वेळेत मी ब्ल्यू रूम मध्ये एका अनौपचारिक समारंभाला गेलो होतो. समारंभानंतर मी राष्ट्राध्यक्षांची खाजगी भेट घेतली. तीच आमची शेवटची भेट." हे बोलताना त्यांचे डोळे पाणावले नसतील कदाचित, पण आवाज भावनेने ओथंबला होता.

"आता केवळ एक औपचारिक प्रश्न. कालच्या मध्यरात्रीपासून आज पहाटे दोन वाजेपर्यंत आपण कुठे होता?" पाणी मागावं, तितक्या सहजपणे इन्स्पेक्टर बायरन्सनी विचारलं.

"या प्रश्नांचा अर्थ काय? माझ्यावर संशय?" राज्यसचिवांनी जोरदार प्रतिप्रश्न केला. त्यांच्या डोळ्यांत विरोधाचा अंगार फुलला होता, आणि एकंदर प्रसंगामुळे उत्तेजित होऊन चेहरा पांढराफटक पडला होता.

"छे छे!! मुळीच नाही. शांत व्हा, सर. मी फक्त चौकशी करतो आहे. अशी औपचारिक चौकशी आम्हांला करावीच लागते." एखादी माशी उडवून लावावी तसा सहज हात हलवीत इन्स्पेक्टर म्हणाले. राज्यसचिवांनी किंचित विचार केला, आणि वळून एक बटण दाबलं. ताबडतोब एक गणवेषधारी सेवक आला. राज्यसचिवांनी हलकेच त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. त्या सेवकाने झुकून अभिवादन केलं आणि तो निघून गेला.

"क्षणभर थांबा. आता माझ्याभोवतीचं रहस्य उलगडणार आहे." राज्यसचिव अभिमानाने म्हणाले, "काल मध्यरात्रीपासून पहाटे अडीच वाजेपर्यंत मी या खोलीत होतो.
माझ्याबरोबर दोन सद्गृहस्थ होते. तुम्ही त्यांना ओळखता. हे पहा आलेच .." त्याचवेळी दारावर पडलेल्या थापेला "आत या." असं उत्तर मिळालं. युद्धसचिव आणि गृहसचिव आत आले. राज्यसचिव अत्यंत अदबशीरपणे म्हणाले, "इन्स्पेक्टर, कृपया आपला प्रश्न पुन्हा एकदा विचारता का?"
त्यांच्या उत्तरातून उघडकीला आलं, की पहाटे अडीच वाजेपर्यंत या तिन्ही सचिवांची अनौपचारिक बैठक चालली होती. कॅनडाबरोबरच्या युद्धाचा प्रश्न अमेरिकेला भेडसावत होता, त्याबद्दल ते चर्चा करत होते. हे समजल्यानंतर पोलीस प्रमुखांनी मनापासून माफी मागितली. इन्स्पेक्टर बायरन्स गंभीर विचारात पडले. पण मग जरा थांबून त्यांनी रोखठोक सवाल केला.
"अमेरिकेच्या इतिहासातली ही सर्वात रहस्यमय आणि विस्मयकारक घटना आहे. मी गोंधळून गेलो आहे." उपस्थितांना गोपनीयतेचा इशारा देऊन त्यांनी सगळी कहाणी ऐकवली, आणि राज्यसचिवांना विचारलं, "वॉशिंग्टनमध्ये किंवा इतरत्र, तंतोतंत तुमच्यासारखा दिसणारा कोणी माणूस तुम्हांला ठाऊक आहे का? त्याला पाहून दोन्ही पहारेकरी फसले असतील. हं.. दोघे जरासे पेंगत असल्यामुळे ते सोपं झालं असेलही."
तिघांनी खूप विचार केला, पण त्यांना असं कोणी ठाऊक नव्हतं. राज्यसचिव देखणे नसले, तरी चारचौघांत लक्ष वेधून घेण्याइतके रुबाबदार होते.
त्यांच्या गालावरचे शानदार कल्ले पाहणाऱ्याच्या डोळ्यात भरत असत. देशात दुसऱ्या कोणाचे कल्ले इतके शानदार नसतील, असा त्यांना अभिमान होता.

"सचिव महोदय, कृपया आणखी एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल का?" इन्स्पेक्टर बायरन्स अदबीने म्हणाले, "पहारेकऱ्याने तुमच्या बग्गीचे घोडे ओळखले. म्हणजे रात्री बारा ते पहाटे दोन या वेळात तुमची बग्गी तुमच्या घराजवळ होती, की नव्हती? गाडीवान कधीकधी विचित्र वागतात."
सचिवांनी गाडीवानाला बोलावणं पाठवलं. "मी मध्यरात्रीपर्यंत एका मित्राच्या घरी होतो, तिथून सरळ इथे आलो." ते म्हणाले.
"हे मित्र कोण?" भर्रदिशी आलेल्या या प्रश्नात अदब होती, पण इन्स्पेक्टरांचा माग काढण्याचा स्वभाव लपत नव्हता.
"पॅटागोनियाचे राजदूत." सचिवांनी प्रौढीने उत्तर दिलं, "गाडीवान मला सोडून परत गेला. त्याला मी आज सकाळी अकरा वाजता बोलावलं होतं."
पण गाडीवान अजून आलेला नव्हता. सकाळपासूनच्या या गोंधळात राज्यसचिवांचं अकरा वाजता ठरलेलं काम रद्द झालं होतं. अर्धा तास उलटून गेला. पोलीस प्रमुखांनी निरोपावर निरोप पाठवले. शेवटी एकदाचा गाडीवान उतावीळपणे वाट बघणाऱ्या त्या पंचकडीच्या समोर हजर झाला. पण हे काय? नेहमी वाखाणल्या जाणाऱ्या रुबाबदार रुपाऐवजी आज त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. त्यावर पट्ट्या बांधल्या होत्या. घाईने कसेबसे कपडे चढवून तो आला होता. तो अपराधी स्वरात काहीतरी बरळू लागला. माफी मागू लागला.
"यात माझा काही दोष नाही, सर. यात सैतानाचा हात आहे. घोडे बरे आहेत, बग्गी ठीक आहे. शुद्ध आली तेव्हा मी गटारात होतो, सर. माझी पाठ रक्ताने भिजली होती.
घोडे आज सकाळी सापडले. मला नोकरीवरून काढू नका सर. पंधरा वर्षं ही बग्गी चालवतोय मी. अरे देवा! माझं काय होणार आता?" नेहमी शुद्ध, नेटकं बोलणाऱ्या गाडीवानाचे शब्द रात्रीच्या घटनेमुळे कसेतरी भेलकांडत होते.

गाडीवानाच्या जबानीनुसार, तो रात्री बग्गी आणि घोडे घेऊन तबेल्याकडे चालला होता. धुकं पडलं होतं. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाने त्याला हाक मारली. रस्त्यात चिटपाखरू नव्हतं. पलिकडच्या गल्लीतही कोणी नव्हतं, फक्त काळोख पसरला होता. गाडीवान थांबला. समोर खुद्द राज्यसचिव पाहून त्याला फार आश्चर्य वाटलं. ते त्याला खुणा करत होते, "थांब. खाली उतर." त्यांचा चेहरा अंधारात होता, आणि आवाज अस्पष्ट येत होता. गाडीवान खाली उतरताच त्यांनी एक चांदीचा पेला त्याच्यासमोर धरला. "किती दमट हवा आहे. घे, यातला एक घोट घे." ही त्यांची अनपेक्षित आज्ञा ऐकून गाडीवान चकित झाला होता,
पण त्यांचा अवमान कसा करणार? त्याने एक घोट घेतला होता. लगेच त्याला भोवळ येऊ लागली होती. भुतांसारख्या आणखी दोन तीन काळ्या आकृत्या त्याच्या डोळ्यांसमोर दिसू लागल्या होत्या. यानंतर आपण पळून जायचा प्रयत्न केला, की बग्गीत चढायचा, ते त्याला नीटसं आठवत नव्हतं. त्यावेळी एक विचित्र वास त्याच्या मस्तकात पोहोचला होता, आणि त्याची शुद्ध हरपली होती. पहाटे सुमारे चार वाजल्यानंतर त्याला शुद्ध आली होती. त्यानंतर तो कसाबसा धडपडत तबेल्यात पोहोचला होता, आणि घोडे गायब झालेले पाहून हतबुद्ध झाला होता. मग त्याच्या एका परिचिताने तासभर सगळं परिसर पालथा घातला होता, आणि त्याला स्मिथसोनियन संस्थेजवळ दोन्ही घोडे चरताना सापडले होते. ते पळून गेले असावेत, असा त्या परिचिताचा समज झाला. गाडीवानाने त्या परिचिताला पाच डॉलर दिले होते, आणि बजावलं होतं, "याबद्दल कुठे बोलू नकोस." आपल्याला नोकरीवरून काढून टाकतील, अशी भीती त्याला वाटत होती. राष्ट्राध्यक्षांचं अपहरण झाल्याचं त्याने ऐकलं होतं, आणि आता या प्रकरणात आपण गोवले जाऊ या विचाराने तो हादरला होता.

गाडीवानाची उलटतपासणी घेण्यात आली, त्याच्या परिचिताचं नाव नोंदवून घेण्यात आलं, आणि "तुझी नोकरी सुरु राहील. घाबरू नकोस, घरी जाऊन विश्रांती घे." असं सांगून त्याला सोडून दिलं गेलं. बग्गीची कसून तपासणी करण्यात आली. पण ती अगदी काळजीपूर्वक स्वच्छ करण्यात आली असावी. तिथे काही भयंकर घडल्याचा मागमूस नव्हता, अगदी रक्ताचा डागदेखील नव्हता. तर ही इतकी माहिती महिन्याच्या चौदा तारखेपर्यंत गोळा झाली होती. संपूर्ण अमेरिकेतल्या गुप्तहेरांनी एकत्रितपणे केलेलं हे काम होतं. अनेक धागेदोरे हाती लागले होते, आणि त्यांचा निकराच्या वेगाने पाठपुरावा करण्यात आला होता. पण अजून काहीही हाती लागलं नव्हतं. असंख्य लोकांना अटक करण्यात आली होती, पण कोणावरच आरोप सिद्ध होत नव्हता. समजलं होतं ते इतकंच.. कोणातरी खलनायकाने राज्यसचिवांचा वेष धारण करण्याचं धारिष्टय केलं होतं. त्याच्या हुबेहूब वेषांतराने तीन नोकर फसले होते. त्या खलनायकाने आपल्या साथीदारांच्या साहाय्याने राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नींची अगदी त्यांच्या अंथरुणातून उचलबांगडी केली होती. कदाचित बळाचा वापर झाला असावा. अत्यंत थोड्या वेळात हे घडलं असावं, पण दोघांना आपले काही कपडे आणि रोजच्या वापराच्या वस्तू घेण्याची मुभा मिळाली असावी. अपहरणकर्त्यांनी या निर्घृण कृत्यासाठी सरकारी बग्गी वापरण्याचं धाडस केलं होतं. त्यांनी कसलाही माग सोडला नव्हता. त्यातून त्या रात्री धुकं आणि पाऊस असल्यामुळे ते कुठल्या दिशेने गेले, हेही समजलं नव्हतं.

ते उघडपणे रेल्वेतून दूर जाऊ शकणार नाहीत, अशा विचाराने वॉशिंग्टन आणि आजूबाजूच्या पंधरा मैलांचा परिसरातलं प्रत्येक घर धुंडाळण्यात आलं होतं. तसंच नदीत, खाडीत काही तरंगताना दिसतंय का, ते शोधण्यात आलं होतं. प्रत्येक रस्त्यावर पहारा बसवला गेला होता. होते कुठे ते खलनायक आणि त्यांची ती अमूल्य लूट?

थोडक्यात, संपूर्ण सुसंस्कृत आणि प्रगत जगाला भयभीत आणि हताश करणारी घटना घडली होती. अमेरिकेचे माननीय राष्ट्राध्यक्ष आपल्या पत्नीसह गायब झाले होते. त्यांचं अपहरण झालं होतं.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

17 Feb 2024 - 10:17 pm | टर्मीनेटर

नेहमीप्रमाणेच सुरेख भाषांतर!
आधीचा भाग वाचनातुन निसटला होता, अत्ता दोन्ही भाग वाचले. क्रमशः लिहायचे राहिले आहे की कथा पुर्ण झाली आहे ह्या बाबतीत मात्र थोडा गोंधळलो आहे!

स्मिताके's picture

18 Feb 2024 - 5:59 pm | स्मिताके

प्रतिसादाबद्दल आभार.
क्रमश: लिहायचं राहून गेलं. आणखी भाग लवकरच येत आहेत.

मुक्त विहारि's picture

18 Feb 2024 - 6:09 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

श्वेता व्यास's picture

19 Feb 2024 - 4:50 pm | श्वेता व्यास

पुभाप्र, पुढील भागाच्या म्हणण्यापेक्षा समाप्त च्या प्रतीक्षेत.
क्रमश: चा इतर अनुभव फार चांगला नसल्याने समाप्त आले की सगळे एकदम वाचणार :)

स्मिताके's picture

19 Feb 2024 - 9:40 pm | स्मिताके

मुक्त विहारि: प्रतिसादाबद्दल आभार.
श्वेता व्यास : लवकरच पुढचे भाग येतील. फार थांबावं लागणार नाही! :)

diggi12's picture

25 Feb 2024 - 4:03 am | diggi12

सत्यकथा आहे का ही ?

कर्नलतपस्वी's picture

25 Feb 2024 - 4:46 pm | कर्नलतपस्वी

हा साहित्य प्रकार आवडत नाही. पण यातील विदेशी नावे स्थळं जर देशी नावाने बदलली तर कथा अनुवाद न वाटता तुम्हींच लिहीली असेल इतका सटिक अनुवाद केला आहे. अभिनंदन.

स्मिताके's picture

26 Feb 2024 - 1:26 am | स्मिताके

diggi12 - सत्यकथा नसावी असा माझा अंदाज! पण कदाचित गुप्त राखली गेलेली अशी एखादी घटना इतिहासात घडली असेलही!
कर्नलतपस्वी - नावडता लेखनप्रकारही वाचून आवर्जून कौतुकपर प्रतिसाद दिल्याबद्दल अनेक आभार!