बाईकवरचे बिऱ्हाड--लेखक अजित हरीसिंघानी-भाग २

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
6 Feb 2024 - 2:07 pm

मागचा भाग
दुवा

a

a

b

दिल्लीला अजितचा मुक्काम त्यांच्या मित्राकडे असतो. तिकडचा पाहुणचार घेऊन ते प्रथम करोल बागेत पोचतात आणि एन्फिल्डवाल्यांच्या मक्केतून बुलेटसाठी महत्वाचे पार्टस वगैरे बसवून घेतात. परंतु दिल्लीच्या गरमीत फार दिवस राहणे कठीण झाल्याने ते तिथून लवकर निघायचा बेत आखतात आणि आपल्या बुलेट ग्रुपला "मनालीला भेटूया " असा मेसेज टाकून निघतात. मनालीला जाणाऱ्या २ रस्त्यांपैकी सिमला नारखंड हा चढणीचा रस्ता टाळून ते चंदीगड,किरातपूरमधून जाणारा तुलनेने सोपा रस्ता निवडतात. वाटेत भेटलेला एक सरदारजी त्यांना किरातपूरच्या गुरुद्वारात फुकट राहायची सोय होईल असे सांगतो आणि त्यांची पावले तिकडे वळतात. खरेच तिकडच्या ऑफिसमध्ये त्यांची राहायची जेवायची सोय केली जाते. फक्त रात्री बुळे खोलीतच लावायचा सल्ला त्यांना खोली दाखविणारा तरुण देतो. प्रथमतः: त्यांना वाटते की सुरक्षेच्या कारणास्तव तो तसे सांगत आहे. परंतु रात्रीच्या सुमारास १० बसेस भरून शीख कुटुंबे तिथे मुक्कामाला येतात आणि खोलीबाहेरच्या व्हरांड्याच्या सर्व जागा व्यापून टाकतात तेव्हा अजितना त्यांच्या सूचनेमागचा अर्थ लागतो. पुढे प्रवासात कसोलला चहाला थांबलेले असताना तिथला एकजण त्यांना अमली पदार्थ असलेली सिगरेट देऊ करतो. अजितचा नकार ऐकून जरा बिचकतो आणि तुम्ही आर्मीवाले आहेत का? असे विचारतो. पण त्याची समजूत घालून ते पुढे निघतात. कसोल ला पार्वती नदीकाठी एका सुंदर हॉटेलात राहायची सोय असते. दिल्लीवाल्या मित्राच्या ओळखीनेच हि सोय झालेली असते. हॉटेलच्या सुंदर परिसरात जरा वेळ भटकून अजित रात्री मुक्काम करतात आणि दुसऱ्या दिवशी मणिकरण ला भेट देतात. इथेही एक गुरुद्वारा आणि गरम पाण्याचे झरे आहेत. एक दिवस तिथे घलवून ते मनालीला जायला निघतात. थाळीचा मुक्कामही व्यास नदीकाठच्या एका सुंदर हॉटेलात होतो. संध्याकाळी उशिरा त्यांच्या टीमचे इतरही लोक तिथे पोचतात. यापैकी एक अहमदाबाद , एक मुंबईचा आणि २ बंगलोरचे आहेत. सुदैवाने त्यातील एक बळेच तज्ज्ञ आहे आणि त्यामुळे दुसऱ्याच दिवशी अजितना बुलेटच्या बिघाडासंदर्भात त्याची उत्तम मदत होते. परंतु ही एक गडबड सोडता पूर्ण प्रवासात त्यांची बुलेट अजिबात त्रास देत नाही हे विशेष. आणि फार त्रास न होता सगळेजण त्यादिवशी ४००० मीटरवरील रोहतांग ला पोचतात.

रोहतांग पस नेहमीसारखाच पर्यटकांनी गजबजलेला असतो पण पुढे मात्र भयाण शांतता. दुपारी अजित खोकसारला जेवायला थांबतात.तिथून १०० किमी वर तंडी गाव. ह्याचे विशेष म्हणजे इथे शेवटचा पेट्रोल पंप आहे. इथून पुढे अंदाजे ४०० किमी पर्यंत पंप नाही. त्यामुळे अजित टाकीसकट गॅलनमध्येही पेट्रोल भरून घेतात. पुढे केलोंग आणि मुक्कामी दारचा गाव. या सगळ्या प्रवासातले हिमालयातील बदलत जाणारे रस्ते, निसर्ग, पक्षी, लोकजीवन यांचे संदर्भ लिखाणात येत राहतात आणि आपण मनाने तिथे पोचतो. दारचा गाव म्हणजे २-३ तंबू. त्यातील एक पोलिसांचा. उरलेल्या तंबूत हॉटेल. अजित तिथे मुक्काम करतात. त्यांचे साथीदार अजून तिथवर पोचले नाहीत. त्यामुळे नाईलाजाने दुसऱ्या दिवशी ते त्यांच्यासाठी निरोप लिहून ठेवतात आणि पुढचा प्रवास एकट्यानेच सुरु करतात. सुरज तलाव ओलांडून पुढे त्यांना सरचूला पोचायचे आहे ते बारालाचा खिंडीतून आणि २१ गटा लूपचा घाट रस्ता पार करून. आजूबाजूला सगळे ओसाड आहे. एकही झाड नावाला नाही.रेताड जमीन ,बर्फ आणि बोचरे वारे याचिवाय इथे काही टिकत नाही. आता अजितचा प्रवेश हिमाचलमधून लडाखमध्ये झाला आहे. बारालाचा खिंडीत धूर काढण्यासाठी थांबलेले असताना त्यांना एक जीन्सवाली हसरी तरुणी त्यांच्या दिशेने येताना दिसते. सततचा प्रवास आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपल्याला भास होऊ लागलेत असेत्यांना प्रथम वाटते. पण ती तरुणी फरझाना खरेच तिथे असते आणि गम्मत म्हणजे जालावरच्या लिखाणामुळे ती अजितना ओळखतही असते. १०० सीसी ची बाईक असल्याने आणि कठीण चढ असल्याने तिचा नवरा एकटाच मागून येत असतो. लवकरच तोही तिथे येतो आणि त्यांच्या बरोबर त्यांचा केरळचा एक मित्रही असतो. थोड्याफार गप्पाटप्पा आणि फोटो वगैरे झाल्यावर सगळेजण पांग मुक्कामी भेटायचे ठरवून निरोप घेतात. हे गाव म्हणजे पुन्हा ३-४ तंबूतील हॉटेले इतकेच. दोन तिबेटी स्त्रियांनी चालवलेल्या हॉटेलात सगळे राहतात. दुसऱ्या दिवशी मात्र अजित सवयीने लवकर उठून तांगलांग खिडीकडे प्रयाण करतात. वाटेत मोरे पठार पार करताना त्यांना धुळीचे वादळ आणि माफक बर्फवृष्टीचा सामना करावा लागतो. ते पार करत अजितचा प्रवास पुढे चालू राहतो. आता वाटेत बुलेटवरून निघालेले पण ट्यूब पंक्चर झाल्याने थांबलेले २ इस्त्रायली तरुण त्यांना भेटतात. त्यांना आपल्याजवळची जास्तीची ट्यूब अजित देऊन टाकतात आणि पुढे निघतात. दुपारच्या सुमारास ते तांगलांग खिंडीत पोचतात, परंतु तिथे केवळ सैन्याचे ठाणे असते. जेवायची सोय तिथून अर्ध्या तासावर असणाऱ्या रमतझे या ठिकाणी होऊ शकेल इतकी माहिती पदरात पडून ते निघतात. इथून साधारण १०० किमीवर लेह आहे. परंतु सुंदर रस्त्यांमुळे अजित संध्याकाळापर्यंतच तिथे पोचतात. मात्र इथे खच्चून भरलेल्या पर्यटकांमुळे हॉटेलचे दार आकाशाला भिडले आहेत. ते खिशाला परवडणारे नसल्याने अजित चहा पिता पिता काय करावे यावर विचार करतात आणि अखेर लष्करातल्या एका जुन्या मित्राला फोन करून अडचण कळवतात. काही वेळातच तो त्यांची सोय आर्मी कॅम्प मध्ये करून देतो तीही फुकट. एकदोन दिवसातच तिथे हेमिस उत्सव आहे त्यामुळे ही सगळी गर्दी आहे. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे थांगका . हा ६२ फुटी लांब सिल्कचा आणि रत्न मोती सोने इत्यादीने मढवलेला कापडाचा तागा १२ वार्चनी एकदा या दिवशी दर्शनाला बाहेर आणला जातो. त्यामुळे इथे मोठीच जत्रा भरली आहे. देशी विदेशी पर्यटक आहेत. दुकाने माणसे असे उत्सवी वातावरण आहे. इथे अजित दिवसभर भटकतात,खरेदी करतात, फोटो काढतात. रस्त्यात भेटलेले इस्त्रायली युवक त्यांना इथे पुन्हा भेटतात आणि गप्पा गोष्टी होतात. त्यांचा इथून पुढे दोव्यापर्यंत जायचा बेत ते अजितना सांगतात आणि त्यावर अजित वाटेत आपल्याकडे पुण्यात यायचे निमंत्रण त्यांना देतात. पुढे गावात भटकताना एका कोफी शॉपमध्ये त्यांना एक जर्मन तरुणी भेटते आणि नुब्रा व्हॅलीत त्यांच्या बरोबर येण्याचे इच्छा प्रकट काराइट. परंतु परदेशी असल्याने तिला फक्त ग्रुप व्हिसा मिळू शकतो त्यामुळे ती अजितबरोबर जाऊ शकत नाही.

लवकरच अजित पुढचा प्रवास चालू करता आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली खारडुंग ला खिंड पार करतात. जेवताना त्यांना अजून एक परदेशी जोडपे भेटते. ते लेहला चालले आहेत. त्यांना इतके फ्रेश बघून , अजितना आपल्या करपलेपणाची जाणीव होते. पुढे प्रवासात सियाचीनच्या जायची परवानगी नसल्याने अजित भारतीय हद्दीतल्या हुंदेर गावी एका शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करतात. त्याचे कुटुंब हेमिस उत्सवाला गेल्याने घर मोकळे आहे. इथे दुर्गम प्रदेशात ही माणसे कशी राहत असतील हे कुतूहल अजितना गप्पा बसू देत नाही. त्यावर शेतात पिकणारा भाजीपाला, एक दुभती गाय आणि सैन्याला सामान वाहायला मदत करून मिळणारे पैसे यावर त्यांचे घर चालत असल्याचे समजते. इथे त्यांना चक्क २ मराठी लातूरचे जावं भेटतात आणि त्यांच्या कडून फुकटात रमची बाटलीही मिळते. आता अजितचा लेहकडे परतीचा प्रवास सुरु होतो. मात्र वाटेत एका भयंकर प्रसंगाला तोंड द्यावे लागते. खारडुंग ला खिंडीकडे जाताना रस्त्यावर पडणाऱ्या धबधब्याखाली त्याची बुलेट एका खड्ड्यात अडकते आणि बाईक आडवी होऊन एकीकडे पेट्रोल गळू लागते तर दुसरीकडे कपडे पूर्ण भिजतात. एक दोन ट्र्क थांबवण्याचा ते प्रयत्न करतात मात्र इंजिन बंद पडेल म्हणून कोणी थांबत नाही. मात्र अखेर एक ट्रकवाला थांबतो आणि त्यांना बाईक वर काढायला मदत करून पैसेही न घेता निघून जातो. अखेर अजित लेहला पोचतात. इथे २ दिवसाच्या मुक्कामात एका निष्णात समजल्या जाणाऱ्या मेकॅनिक कडून ते बाईक पूर्ण तपासून घेतात आणि वाटेत लागणाऱ्या झोजी ला खिंडीला भिडण्याची मानसिक तयारी करतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रवासाला सुरुवात करून सिंधू नदीच्या साथीने द्रास कडे निघतात. मात्र वाटेत पावसाने पूर्ण धुवून गेलेला खडकाळ रस्ता लागतो. सैन्याचे ट्रक इथे अडकून पडलेले असतात. अजित आपली बाईक तीहून कशीबशी पुढे काढतात. पण इथे फार वेळ गेल्याने द्रास गाठायचे त्यांचे स्वप्न मात्र भंग पावते. मात्र त्याचमुळे त्यांना इथे चक्क फरझाना ,तिचा नवरा आणि ट्रेव्हर पुन्हा भेटतात. अखेर २६० किमीचा प्रवास करून सगळेजण द्रासला पोचतात. मात्र नुकत्याच झालेल्या कारगिल युद्धामुळे वातावरणात एक प्रकारचा तणाव आहे. इथल्या विश्रामगृहात एक बडा साब येणार असल्याने तिथला देखरेख करणारा माणूस त्यांना व्हरांड्यात थांबवून ठेवतो. अखेर तो साहेब येऊन गेल्यावर त्यांची राहायची छान सोय होते.इथे रात्री अंधारात कधीतरी त्यांचे मनालीहून निघालेले साथीदार येतात. त्यांचीही सोय केली जाते. दुसऱ्या दिवशी त्यांना काय काय संकटे आल्याने इतका उशीर झाला याची उजळणी होते. गप्पा होतात. दुसऱ्या दिवशी सगळे झोजी ला पार करून काश्मीर खोऱ्यात उतरतात. इथे काही ठिकाणी स्थानिक विरुद्ध लष्कर असे संघर्ष पाह्यला मिळतात. दर थोड्या अंतरावर लष्करी पहारे आहेत. एकंदरीत वातावरणात तणाव आहे. एका खंगलेल्या म्हाताऱ्याच्या सांगण्यावरून ते दल लेकमध्ये शिकार बघायला जातात. इथे त्यांची राहायची सोय होते, पण एकूणच इतका थकवणारा प्रवास आणि जेवणाची अबाल झाल्यावर श्रीनगरमध्ये जसा आराम आणि खाणे त्यांना हवे असते ते मात्र मिळत नाही. दुसऱ्याच दिवशी तेथील मुक्काम हलवून ते अनंतनागला जायला निघतात. वाटेत सर्वत्र सैन्याची गस्त आणि तंग वातावरण असल्याने त्यांना लघवीलाही थांबता येत नाही. शेवटी एका ठिकाणी थांबल्यावर तेथील सैनिकांशी थोड्या गप्पा होतात आणि मृत्यू त्यांच्या डोक्यावर कसा घिरट्या घालत आहे हे त्यांना नव्याने समजते. २ दिवसांपूर्वीच इथे बॉम्ब स्फोट झाला आहे आणि त्यात २२ सैनिक ठार झालेत असे तो सांगतो. त्याच्याबरोबर थोडा वेळ घालवून ते पुढे निघतात आणि एका वळणावर वरच्या बाजूला असलेल्या तंबूतून त्यांना जोरजोरात थांबायचे इशारे मिळतात. १०-१२ जणांचा एक समूह धावत त्यांच्याकडे निघालेला असतो. अजित एकदम सावध होतात. त्यांना वाटते कदाचित हे अतिरेकी असू शकतील. पण पर्याय नसल्याने अजित भीती आश्चर्य अशा सगळ्या भावना मनात ठेवून थांबतात. मात्र लवकरच सारा उलगडा होतो. हे सगळे मराठा बटालियनचे जवान असतात आणि अजितच्या बाईकचा एम एच १२ नंबर पाहून गाववाला भेटेल म्हणून त्यांना बोलावत असतात. अंधार होईतो मला जम्मूला पोचायचे आहे अशी विनंती करूनही ते ऐकत नाहीत आणि आग्रहाने त्यांना आपल्या तंबूत घेऊन जातात. अजित काही वेळ तिथे आनंदाने घालवतात. मात्र तिथून निघत आपण या लोकांना नशिबाच्या हवाली सोडून पळून जात असल्याची भावना त्यांना घेरते. या प्रतिकूल वातावरणात ही मुले किती काळ टिकतील? हा प्रश्न त्यांना भेडसावत राहतो. आणि बाईक रस्त्याला लागल्यावर हेल्मेटच्या सुरक्षित आवरणात त्यांना रडू आवरत नाही.

लवकरच ते जवाहर बोगदा पार करतात. इथे अमरनाथ यात्रेहून परतणारे हल्लागुल्ला करणारे लोक, जे इतरवेळी डोक्यात जातील , मात्र इतक्या तणावातून आल्यावर अजितना ते हवेसे वाटतात. आता प्रवास संपत आला आहे, पण हाताशी एक दोन दिवस आहेत म्हणून अजित पटणी टॉपला एक मुक्काम करतात. इथे मात्र त्यांना उबदार आसरा,भरपेट आणि चवदार जेवण असे सगळे मिळते. तिथल्या मालकाशी मैत्री करून आणि नको असलेल्या हातमोजे वगैरे वस्तू त्याला देऊन ते दुसऱ्या दिवशी पुन्हा निघतात आणि मजल दरमजल करीत जम्मू तावी एक्स्प्रेस गाठण्यासाठी दिल्लीला पोचतात. (समाप्त)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Feb 2024 - 2:52 pm | मुक्त विहारि

आत्माराम परब, यांचे ह्याच प्रवासावर लिहिलेले एक पुस्तक, मी वाचले आहे.

https://www.google.com/imgres?imgurl=http%3A%2F%2Fwww.bookspace.in%2Fcdn...

श्वेता२४'s picture

6 Feb 2024 - 3:32 pm | श्वेता२४

खुपच छान लिहिले आहे. आपणहि लेखकाबरोबर सफर करित आहोत असे वाट्ते. ओघवते लिहिले आहे.

अरे वाह!छान आहे पुस्तक परिचय.वाचायला पाहिजे हे पुस्तक.अजित यांचा ब्लॉग/व्लोग आहे का?

मात्र लवकरच सारा उलगडा होतो. हे सगळे मराठा बटालियनचे जवान असतात आणि अजितच्या बाईकचा एम एच १२ नंबर पाहून गाववाला भेटेल म्हणून त्यांना बोलावत असतात.

हा हा :)

गोरगावलेकर's picture

8 Feb 2024 - 8:22 am | गोरगावलेकर

भटकंती विषयावरील असल्याने जास्तच आवडले.

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Feb 2024 - 7:19 pm | राजेंद्र मेहेंदळे

@मुविकाका--आत्माराम परब यांचे पुस्तक मिळवुन वाचायचा प्रयत्न करेन.

टर्मीनेटर's picture

9 Feb 2024 - 11:35 pm | टर्मीनेटर

पुस्तक परिचय आवडला!
पण पुस्तक प्रकाशित झाले असल्याने मूळ लेखकाने (कदाचीत प्रकाशकाच्या सांगण्यावरून) काहि गोष्टी प्रामाणिकपणे लिहिण्याऐवजी प्रकाशकिय दबावाला बळी पडून ‘कॅरॅक्टर बिल्डींग‘च्या हेतुने लपवल्या असाव्यात असे वाटले 😀
तसे नसल्यास ह्या आधूनिक विश्वामित्राला सलाम!