सात आठशे वर्षांचा इतिहास असला तरी काहीसा दुर्लक्षित असा नव्या मुंबईतील बेलापूरचा हा किल्ला. नुकताच एका प्रतिसादात मी या किल्ल्याचा उल्लेख केला होता.
किल्ला सिद्धींनी १५६० ते १५७० या काळात बांधला. त्यानंतर पोर्तुगिजांनी याचा ताबा घेतला. १७३३/१७३७ मध्ये चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याचा ताबा मिळवला. त्यानंतर १९ व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांच्या ताब्यात गेला (माहिती आंतर्जालाहून साभार)
एक माहितीपर लेख येथे वाचावयास मिळेल.
काल संध्याकाळी अचानक आमच्या 'मॉर्निग वॉक' ग्रुपचा कट्टा येथे झाला.संध्याकाळी पाच वाजता नवी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीसमोर असलेल्या पोलीस चौकीजवळ सर्वजण जमलो. तेथून 'साती आसरा माता' देवस्थानला पोहचलो. महानगरपालिकेपासून पायी अगदी ५-१० मिनिटांच्या अंतरावरील छोटीशी देवराई म्हणता येईल असे हे ठिकाण. शहरी वर्दळीच्या जागेपासून आपण अचानक या शांत-नयनरम्य भागात येतो. (लेखातील काही फोटो गेल्या आठवड्यातील आहेत)
रस्त्यापासून खाली उतरत जाणाऱ्या पायऱ्या.
सुंदर रंगकाम केलेले छोटेसे मंदिर आणि त्यापुढे विहीर.
बाजूला छोटासा तलाव.
अजून एक वेली/झुडुपांमध्ये लुप्त होत चाललेली विहीर.
आजूबाजूला गर्द झाडी व छोटेसे बांबूचे बन.
थोडे थांबून पायऱ्या चढून परत रस्त्यावर आलो. मंदिराच्या विरुद्ध बाजूस सिडकोचे रेस्ट हाउस आहे.
त्याला लागूनच एक कच्ची चढती पायवाट किल्ल्याकडे जाते.
पाचच मिनिटात आपण किल्ल्याजवळ पोहचतो. प्रथम दर्शन होते एका बुरुजाचे.
किल्ला व बाजूची पडकी तटबंदी यामधील जागेतून आपण किल्ल्यात प्रवेशतो. बुरुजाच्या आत महादेवाचे मंदिर आहे.
शिवलिंग व नंदी आहे.मूर्ती मात्र अलीकडच्या काळातील वाटतात. भिंतीवर शिवाजी महाराजांचे फोटो आहेत. शिजयंतीला एखादा छोटासा उत्सव येथे होत असावा असे दिसते.
बुरुजाच्या ढासळलेल्या दगडांवर पाय ठेवत बुरुजावर चढून गेल्यावर एक ध्वज आहे त्याला वंदन करून पुढे निघालो.
तटबंदीतून खाडीकडच्या परिसरावर नजर टाकता येते.
काही ठिकाणची किल्याची शाबूत भव्य तटबंदी दिसते.
एक पाण्याचे टाके आहे.
पायऱ्या असलेले उंच दगडी चौथरे आहेत.
या चौथऱ्यावर बसून थोडावेळ गप्पा गोष्टी केल्या आणि निघालो.
आठवड्याचा मधला दिवस असल्यानेच कदाचित सर्व परिसर निर्मनुष्य होता. शहराचा मध्यवर्ती भाग असूनही अतिशय शांत प्रसन्न वातावरणात हा तास दीड तासाचा कट्टा पार पडला.
प्रतिक्रिया
1 Feb 2024 - 11:42 am | मनो
छान झालेला दिसतोय कट्टा, फोटो जोडल्याबद्दल धन्यवाद. चिमाजी अप्पांची ती पूर्ण मोहीमच रोमांचकारी होती. ज्यांना मुळातून संपूर्ण वाचायची असेल त्यांनी इथे वाचा
https://archive.org/details/vasacmohma00kelk/mode/1up
1 Feb 2024 - 12:32 pm | चौथा कोनाडा
व्वा ... मस्त्च !
किती सुरेख जागा !
किल्याची माहिती वाचली. भारी !
छान लिहिता तुम्ही, भटकंती धागे ही तुमची पेशालीटी बनू पहातेय !
छानच !
1 Feb 2024 - 5:45 pm | गोरगावलेकर
भटकंती धागे ही तुमची पेशालीटी बनू पहातेय !
मिपाकर सांभाळून घेतात म्हणून चाललेय छोटे छोटे प्रयत्न.
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.
1 Feb 2024 - 12:43 pm | राजेंद्र मेहेंदळे
छोटेखानी भटकंती मस्त!!
1 Feb 2024 - 1:06 pm | गोरगावलेकर
दुर्मिळ माहिती उपलभद्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद . सध्या फक्त बेलापूर किल्ल्याबद्दल माहिती वाचली. संपूर्ण पुस्तक सावकाश वाचेन. अतिशय धाडसी मोहीम. महिनाभर वेढा टाकून, शत्रूच्या कूटनीतीस बळी न पडता मराठयांनी मोहीम फत्ते केली.
1 Feb 2024 - 3:09 pm | Bhakti
वाह! मराठ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा असलेला किल्ला आणि भटकंती आवडली.
1 Feb 2024 - 4:35 pm | कंजूस
आताच दुपारी(२०२४_०२_०१) एक वाजता NMMCइमारतीसमोरच्या बेलापूर किल्ला नामक बुरुजापाशी होतो. प्रवेशद्वाराचे नाव कुठले देवीचे आहे. मोठी कमान आहे. पण किल्ला तिथूनच पुढे होता का? मी एकाला विचारले तर तो म्हणाला "हा काय." एका तुटक्या बुरुजाभोवती पत्र्यांचे कुंपण लावले आहे. मग तिथून सईवउड स्टेशनला चालत आलो. त्या अगोदर टी.एस.चाणक्य पाशी पक्षी बघायला गेलो. जागा बरोबर नाही. पण BNHSने इथेच ( चाणक्य अंडरपास) सकाळी आठ वाजता १७ फेब्रुवारीला पक्षी दर्शन कार्यक्रम ठेवलेला आहे. (८००रुपये,दीड तास). पूर्वीची शिवडीची जागाच बरी होती.
या नवी मुंबई भागात रस्त्यात कुणी दिसत नाही. कुणाला विचारावे तर माहीत नाही सांगतात. वाहनं मात्र सुसाट पळत असतात.
आजची फेरी वाया गेली.
बेलापूर किल्ला छान जागा दिसते आहे.
1 Feb 2024 - 5:27 pm | गोरगावलेकर
तुम्ही जवळजवळ येथे पोहोचलात पण पक्षी निरीक्षणाच्या ओढीने जास्त चौकशी न करता येथून पटकन निघालात असे वाटते.
हो, त्याच कमानीतून पुढे जाऊन उजवीकडे रस्ता वळतो. रस्त्यावरचा तो पत्र्याचा शेड लावलेला बुरुज दोनेक वर्षांपूर्वी डागडुजी करत असतांना ढासळला. त्यानंतर अजूनपर्यंत काहीच काम झाले नाही. नव्या मुंबईत खूप जण बाहेरून येऊन स्थायिक झाले आहेत त्यामुळे मूळ किल्ल्याविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. माझ्या ओळखीतल्या अगदी ३०-४० वर्षांपासून येथे राहात असलेल्या लोकांनाही येथे किल्ला आहे हे माहित नाही. गर्द झाडीमुळे किल्ला अगदी जवळ गेल्याशिवाय कुठूनच दिसतच नाही.
1 Feb 2024 - 4:39 pm | कंजूस
हल्ली मनीष कदम यांचे पक्षी निरीक्षणाचे विडिओ पाहतो. हा https://youtu.be/DgQabaLZoUA?si=qqfAKVr7IMqId7vq
बेलापूरच्याच डोंगरावरचा. इथे एकदा जायचे आहे.
1 Feb 2024 - 4:44 pm | कर्नलतपस्वी
एव्हढा इतीहास आणी पर्यटनाच्या सहज सोयी असतात फक्त त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन हवा.
भटकंती तुमची पेशालीटी या चौको भौंच्या विधानाशी सहमत.
मनो यांनी दिलेली लिंक डाऊनलोडली आहे सवडीनुसार वाचतो.
देता किती घेशील दो कराने....
प्रमाणे दोन डोळ्यांनी वाचणे,दोन पायांनी चालणे...
विंदा करंदीकर यांची' लागेल जन्मावे पुन्हा'' या कवितेतला भाव आठवतो. एव्हढं सगळेच पहाणे,वाचणे,भोगणे एका जन्मात शक्यच नाही.
2 Feb 2024 - 8:57 am | चित्रगुप्त
खूपच वाचनीय आणि प्रेक्षणीय. पूर्वी बेलापूरला बरेचदा जाणे झाले आहे परंतु ज्या मित्राकडे जायचो त्याला भटकंतीची आवड असूनही या किल्ल्याबद्दल ठाऊक नसावे.
2 Feb 2024 - 9:09 am | मुक्त विहारि
धन्यवाद
3 Feb 2024 - 11:18 am | प्रचेतस
सुरेख लिहिलंय. बेलापूर किल्ला सिद्धीने बांधला हे जरा विचित्र दिसतंय कारण सिद्धींचा अंमल ह्या प्रदेशात नव्हता माझ्या माहितीप्रमाणे पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला किंवा मूळचा कोळ्यांचा असावा.
बाकी एकदम हटके किल्ल्याची सफर घडवलीत.
3 Feb 2024 - 1:20 pm | गोरगावलेकर
बेलापूर किल्ला सिद्धीने बांधला हे जरा विचित्र दिसतंय
माहिती आंतरजालाहून साभार. जाणकार भर घालतीलच.
प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.
4 Feb 2024 - 4:32 pm | कंजूस
परवा परत बेलापूरला गेलो. पण सेक्टर ९ त्यापुढे ग्रीन व्हॅली पार्क आहे तिथे. अगोदर मनिष कदम यांच्या व्हिडिओची लिंक दिली आहे तिथे. बारा वाजले पोहोचायला. गेट बंद होतं. पण वाचमनला विनंती केली की लांबून आलोय आणि इतक्या लवकर इथे येता येणार नाही. जागा कशी आहे हे पाहता आलं तरी बरं होईल. त्याने आत सोडलं.( जागा सिडकोकडे आहे.) इतक्या दुपारीही पक्षी होते. शाल्मलीची लाल फुले होती ना. आत ओढे आणि झरे आहेत. पावसाळ्यात खूपच रम्य असणार. फक्त एक किमी रस्ता आहे. जागोजागी बाकडी ठेवली आहेत. बाजूच्या सायन_पनवेल हायवेचा आवाज येत नाही. फक्त पक्ष्यांची किलबिल.
सुंदर जागा.
4 Feb 2024 - 7:06 pm | गोरगावलेकर
आम्ही दोघे पती पत्नी देखील परवा सकाळी बेलापूरला होतो. आधी माहित असते तर वेळ ठरवून भेटता आले असते. बेलापूरला येऊन काय केले ते आपल्या फ्लेमिंगोच्या धाग्यावर लिहिते.
5 Feb 2024 - 2:53 pm | टर्मीनेटर
लेख आणि फोटो आवडले 👍
मुद्दाम जाउन बघावे असे काही वाटले नाही, पण जवळपास रहाणाऱ्यांनी पर्वती आणि तळजाई सारख्या ठिकाणी रोज किंवा अधुनमधून भेट देण्यासारखे ठिकाण निश्चितच आहे!
मनो, लिंक साठी आभार! बुकमार्क केली आहे सवडीने वाचतो.
5 Feb 2024 - 6:52 pm | कंजूस
नव्या मुंबईत भरपूर ऐसपैस रस्ते, फुटपाथ वेगळे मोठे आहेत तरी शालेय मुलांना सायकलींचे वेड फारसे दिसले नाही. जागोजागी पालक शाळेच्या बससाठी मुलांना घेऊन गप्पा छाटताना दिसले.
6 Feb 2024 - 2:51 pm | गोरगावलेकर
@राजेंद्र मेहेंदळे, Bhakti, कर्नलतपस्वी, चित्रगुप्त, मुक्त विहारि, टर्मीनेटर
प्रतिसादाबद्दल आपले तसेच इतर सर्व वाचकांचे खूप खूप आभार
15 Feb 2024 - 1:26 pm | पराग१२२६३
छान माहिती मिळाली. या ठिकाणी जायला नक्की आवडेल.