रंगराव पाटील, जगन्नाथ कांबळे आणि मधुकर देशपांडे तिघंही सोसायटी ऑफिस मधील विसपंचवीस रिकाम्या खुर्च्यांकडे बघत बसले होते. अधूनमधून घड्याळाकडे नजर टाकत होते. तासभर होऊन गेला होता. बसून बसून बुडाला मुंग्या आल्या होत्या आणि उठायची तर सोयच नव्हती. जरा खुर्चीवरून उठायचा प्रयत्न केला की देशपांडे डोळे मोठे करून बघत. 'खबरदार, जागेवरून उठलात तर!' असा त्याचा सरळ अर्थ होता.
वेळ सरत नव्हती, खुर्च्या भरत नव्हत्या. देशपांडे उठू देत नव्हते आणि मुंग्या बसू देत नव्हत्या. देशपांडे तर प्रचंड संतापले होते. आणि का संतापू नये? परिस्थितीत होतीच तशी.
तब्बल दीड वर्षे देखभाल खर्चाच्या नावाखाली रहिवाश्यांना पिळल्यानंतर भाकड गाईसारखी अवस्था झालेली “चैतन्य” इमारत रहिवाशांच्या हाती देऊन बिल्डर नाहीसा झाला. एक हंगामी कमिटी स्थापन करून इमारतीमध्ये चैतन्य आणण्याची फार मोठी जबाबदारी रहिवाशांवर आली. पण एक अडचण होती, इमारतीत कुणालाही या कामासाठी वेळ नव्हता. बहुतेक नवीन लग्न झालेली जोडपी होती. लग्नाच्या दगदगीतून सावरण्यासाठी त्यांना वेळ हवा होता. त्यातील काहींनी पळून जाऊन लग्न केले होते. त्यामुळे इमारतीसाठी वेगळी पळापळ करण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. आपण बरे आणि आपली बायको बरी असं त्यांचं चाललं होतं. वेळ देऊ शकतील असे काही निवृत्त जेष्ठ नागरिक होते, पण त्यातील काहींनी, आपण आयुष्यभर कामच केलं, आता अजून काय वेगळं काम करायचं, असा विचार केला. उरलेले ज्येष्ठ नागरिक आयुष्यभर काहीही काम न करताच निवृत्त झाले होते. त्यामुळे त्यांना कामाची सवयच नव्हती. त्यांच्याकडून सोसायटी साठी काम करण्याची अपेक्षा ठेवली असती तर तो त्यांच्यावर अन्याय झाला असता.
तरुण आणि वृद्ध यांनी अगदीच असहकार केल्यामुळे कमिटी स्थापण्याची सारी जबाबदारी मध्यमवयीन वर्गावर पडली. मिटींगवर मिटींग होऊ लागल्या. 'तुम्ही चेअरमन व्हा, मी नको, त्यांना बनवा, तुम्ही सेक्रेटरी व्हा, खजिनदार मात्र मला बनवू नका', अशा चर्चाच भरपूर होऊ लागल्या आणि "पुढच्या मिटिंगमध्ये कमिटी निश्चित करण्यात येईल" असा निर्णय एकमताने होऊन आजच्या मिटींगा संपू लागल्या. प्रत्येक मीटिंग एकसारखीच, प्रत्येक वेळेस कमी होणारी गणसंख्या हाच काय तो फरक.
आज तर हद्द झाली! मीटिंगसाठी हजर फक्त तीन माणसे आणि विसपंचवीस रिकाम्या खुर्च्या! मिटिंगमध्ये बोलणार कोण आणि ऐकणार कोण? बरं तिघांतील दोघे तरी कुठे कमिटी बनवण्यासाठी आले होते? सहज म्हणून आले आणि अडकले.
इतर बहुसंख्य रहिवाश्यांप्रमाणे पाटील आणि कांबळे दोघेही आयुष्यभर चाळ आणि झोपडपट्टीत राहून कमाईचे सगळे पैसे टाकून इमारतीत राहायला आले होते. त्यांच्यासाठी हे सारं जग फार नवीन होतं. ही सोसायटीची कमिटी कमिटी म्हणतात ती नक्की काय भानगड असते हे पाटलांना काही ध्यानात येत नव्हते. पुढच्या मिटींगला समजेल म्हणून प्रत्येक मिटींगला ते हजेरी लावत तसे आजही आले होते.
कांबळे फक्त कुतूहल म्हणून पहिल्या काही मिटिंगच्या वेळेस आले होते. पुढे पुढे तो मीटिंगचा ताप नको म्हणून तापाने आजारी पडले होते. आतापर्यंत कमिटी तयार झालीच असेल असे वाटून त्यांचा ताप उतरला होता. सहज चक्कर टाकावी आणि कमिटी कमिटी म्हणतात ती दिसते तरी कशी ते पाहण्यासाठी म्हणून ते आले होते.
खरं तर देशपांडे ही एकच विभूती अशी होती ज्यांना कमिटी लवकरात लवकर तयार व्हावी असे वाटंत होते. त्यासाठी सुद्धा त्यांचं स्वतःचं असं एक कारण होतं.
देशपांडेंना लहानपणापासून वकील व्हायची फार इच्छा होती पण नियतीने अन्याय केला आणि त्यांना एका सरकारी खात्यात कारकुनी करावी लागली. तिथे नियम, शिस्त, कायदा या गोष्टींना मुळीच वाव नव्हता. परंतु कायद्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कायद्याचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करण्याकरिता सोसायटीची कमिटी ही उत्तम पर्वणी आहे असे वाटून देशपांडे कमिटी बनवण्यासाठी पुढाकार घेत होते. आपण एवढे जीव तोडून प्रयत्न करत आहोत आणि कोणीही सहकार्य करत नाही! नावच नुसतं “चैतन्य इमारत”, प्रत्यक्षात सगळी बोंबच! मग देशपांडेसारखा माणूस चिडणार नाही तर काय होणार?
शेवटी त्या मूक मिटिंगच्या शांततेचा भंग करत देशपांडे अचानक ओरडून म्हणाले,
"अरे हे काय चाललंय काय? हेच म्हणायचं का चैतन्य?"
दोन खुर्च्या अचानक दचकून लटपटल्या.
"बघा तरी, बसून बसून ढुंगणाला वारूळ लागायची वेळ आली", भानावर आल्यावर कांबळेंनी दुजोरा दिला.
"ते काही नाही, आज सोक्षमोक्ष लावूनच टाकू", देशपांडे काहीतरी ठरवून पक्के केल्यासारखे म्हणाले.
"तेच म्हणतो मी, ती कमिटीपण नको, ती मिटिंगपण नको आणि ते चैतन्यपण नको. चाललंय तसं चालू द्या", खुर्चीवरून घाईघाईने उठत कांबळे म्हणाले.
"शांत बसा", देशपांडेंच्या दोन शब्दात अशी जरब होती की, कांबळे जसे घाईघाईने उठले तसेच घाईघाईने बसले आणि देशपांडेंच्या तोंडाकडे टकमका बघत राहिले.
"मग काय करावं म्हणता?", पाटलांनी केविलवाणा चेहरा करून विचारले.
देशपांडेंनी समोरच्या भिंतीकडे पाहून क्षणभर विचार केला. एकदा पाटलांकडे आणि एकदा कांबळेंकडे पाहिले आणि म्हणाले,
"बस्स, ठरलं."
"काय ठरलं?", न उमगून कांबळेंनी विचारले.
"अजून काय ठरायचंय? पाटील चेअरमन, कांबळे खजिनदार आणि मी सेक्रेटरी", देशपांडे उठून उभे राहत आत्मविश्वासाने म्हणाले.
त्याबरोबर पाटील आणि कांबळेंच्या खुर्च्या पुन्हा लटपटल्या. आपल्या नशिबी हे असे काही वाढून ठेवले असेल हे दोघांच्या ध्यानीमनीही नव्हते.
"अहो पण...." कांबळेंचा सूर रडवेला होता आणि शब्द सुचत नव्हते. पाटील खांदे पाडून शून्य नजर लावून पाहत राहिले.
"आता पण नाही आणि बीण नाही. इतर सभासद मीच निवडतो. कमिटी स्थापन झाली. विषय संपला." देशपांडेंनी निर्णायक स्वरात जाहीर केले.
कांबळे आणि पाटील विषण्ण मनाने विचार करत राहिले. लांडग्याच्या तावडीत शेळी सापडावी असे झाले. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि आज मीटिंगसाठी आलो. चूक आपलीच. काय पडलं होतं आपल्याला 'कमिटी म्हणजे काय' ते जाणून घ्यायची? पण नाही नाही त्या गोष्टीत आपल्याला कुतूहल वाटते, मग गाढवपणा करतो आणि शेवटी खड्ड्यात पडतो. हा देशपांडे म्हणजे तर साक्षात दैत्य, काही बोलूच देत नाही. नशिबाचे भोग म्हणायचे अजून काय?
दोघांचीही निराशा देशपांडेंना जाणवली. आता ही दोन मंडळी नाहीच तयार झाली तर पुन्हा काम रखडेल. त्यामुळे आपल्या आवाजात जमेल तेवढा प्रेमळपणा आणून देशपांडेंनी दोघांचीही खूप समजूत काढली. हे कार्य कसे सरळ आणि सोपे आहे हे अगदी नीट सांगून त्यांना विश्वासात घेतले. ते दोघेही हे या पदांसाठी कसे योग्य आहेत हे समजावले. आपण तर मदतीला नेहमीच तयार आहोत हे निक्षून सांगितले. वातावरण थोडे हलके झाले. हळूहळू नवनियुक्त चेअरमन आणि खजिनदाराच्या हावभावात आत्मविश्वास जाणवू लागला.
देशपांडेंनी सहकारी क्षेत्र, त्याचा कायदा, तो गृहनिर्माण संस्थेला कसा आणि कुठे लागू होतो हे प्रदीर्घ स्पष्ट केले. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन आणि खजिनदार ही पदं आणि त्यांचे अधिकार हे नीट आणि कायदेशीररित्या अचूक पण अजिबात समजणार नाही अशा भाषेत सांगितले.
पाटलांनी आपली सात पिढ्यांची बुद्धी पणाला लावून अगम्य भाषेतील ते नवज्ञान समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला. खुपश्या गोष्टी समजायला कठीण होत्या. पण काही गोष्टी मात्र त्यांना निर्विवादपणे समजल्या होत्या.
चेअरमन हे "सहकारी गृहनिर्माण संस्था" का काय म्हणतात त्यातले सर्वोच्च पद आहे. नुसतेच सर्वोच्च नव्हे तर पावरफुल सुद्धा आहे. अशा पावरफुल पदासाठी एखादा पावरबाज माणूसच लागतो. उठला आणि झाला चेअरमन असं होत नाही. त्यासाठी तगडे शरीर असावे लागते. तरुणपणात भिजवलेले चणे खाऊन जोर बैठका काढल्यामुळे आपण या पदापर्यंत पोहोचू शकलो याबद्दल त्यांना स्वतःचा फार अभिमान वाटला. आपण यापूर्वीच चेअरमन झालो असतो तर किती बरं झालं असतं! कदाचित बढती मिळून आतापर्यंत आपण नगरसेवक किंवा कमीतकमी आमदार तरी झालोच असतो. पण आपलं वय फार नाही त्यामुळे अजून संधी गेलेली नाही हे एक बरं आहे.
कांबळेंना तर खजिनदाराचे अधिकार ऐकून फार आनंद झाला. लग्न झाल्यापासून फटाक्या खिशाची त्यांना कधीही अडचण वाटली नाही कारण त्यांची खाष्ट बायको त्यांच्या खिशात दहा रुपये ठेवेल तर शपथ. आणि आता तर खजिनदार म्हणून आख्ख्या सोसायटीच्या तिजोरीच्या चाव्या येणार होत्या. त्यांच्या सहीशिवाय सोसायटीचं पान सुद्धा हलणार नव्हते. सगळेजण आपल्याकडे चेक घेऊन येणार आणि आपण 'आज नको, उद्या या', 'आता नको, नंतर या', असे तंगवल्यानंतरच सही करणार. लहानपणापासून आपल्याला सगळेजण गिचमीड अक्षर म्हणून हिणवत होते, आता हीच माझी गिचमीड सही कसा इंगा दाखवते ते पहा! एवढा सन्मान आपल्याला आयुष्यात कधीच मिळाला नव्हता, असे विचार मनात येऊन कांबळेंना पोटात भयंकर गुदगुल्या झाल्या.
देशपांडे तर तयारीतच होते. असा कायद्याचा वचक ठेवतो की, सगळ्यांनी सेक्रेटरी-साहेब, सेक्रेटरी-साहेब असे म्हटले पाहिजे. गेटवरच्या शिपायाने तर जाता येता खुर्चीवरून उठून उभे राहून सलाम ठोकला पाहिजे. ड्युटीवर असताना बसलेला दिसला, की लाव शंभर रुपये दंड, रात्री झोपलेला सापडला, की लाव पाचशे रुपये दंड. सगळं कसं अगदी जागच्या जागी, टापटीप, स्वछ दिसलं पाहिजे. अशी शिस्त लावतो सोसायटीला की बघाच!
अशाप्रकारे एकदाची चेअरमन, सेक्रेटरी आणि खजिनदार यांची बिनविरोध निवड झाली. इतर सभासदांची तर त्यांच्या अनुपस्थितीतच निवड झाली आणि एकदाची हंगामी कमिटी स्थापन झाली.
“चैतन्य” इमारतीची “चैतन्य सहकारी गृहनिर्माण संस्था” झाली!
कार्य सिद्धीस गेले. आता परत मिटिंगची भानगड नसल्याने बिनधास्त बाहेर जाता येईल असे वाटू लागले. पण देशपांडे महाचिवट! दोन दिवस झाले नाहीत तोवर कमिटी नावाच्या नवीन जमातीची ओळख करून देण्यासाठी पुन्हा एक मीटिंग बोलावण्यात आली. अनपेक्षितपणे या नवीन कमिटीच्या दर्शनासाठी मिटिंगच्या वेळेच्या आधीच भरपूर गर्दी गोळा झाली. मीटिंग सुरू होता होता गर्दी एवढी वाढली, कि बसायला खुर्च्या अपुऱ्या पडू लागल्या. एकादोघांनी उदारपणे उठून आपल्या खुर्च्या दुसऱ्याना बसायला दिल्या आणि रिकाम्या झालेल्या दुसऱ्या खुर्चीवर आपली जागा पकडली. ते पाहून दुसऱ्याने पाहिल्याची खुर्ची पकडली. अशा प्रकारे खुर्च्यांची अदलाबदल होऊन सुद्धा जागा होईना तेव्हा स्वतः चेअरमन साहेबांना एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपली खुर्ची मोकळी करून द्यावी लागली. सत्तेची खुर्ची सांभाळणे सोपे नसते असे म्हणतात हे त्यांना मनोमन पटले.
आज उभे राहून बोलायचा खरा मान चेअरमन साहेबांचा होता, त्यामूळे देशपांडेंनी बसल्या बसल्याच आपल्या तांत्रिक आणि अगम्य भाषेत अर्ध्या तासाचे प्रास्ताविक पर छोटेखानी भाषण देऊन नविन चेअरमन साहेबांची ओळख जमावाला करून दिली. उभे राहून पाय अवघडल्यामुळे भिंतीला टेकून बेसावधपणे उभे राहिलेले चेअरमन आपले नाव पुकारल्यावर गडबडीने भिंत सोडून ताठ उभे राहिले आणि एक प्रसन्न हास्य पुढे खुर्च्यांवर ऐसपैस बसलेल्या जमावाला दिले. त्यांच्या तोंडातील चांदीचा एक दात चमकला आणि सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
देशपांडेंनी बसल्या बसल्याच सोसायटीच्या विकासासाठी एक धोरण आखले. विकासाचे सगळे मुद्दे त्यांच्या डोक्यात तयारच होते.
पहिला मुद्दा, 'शिस्तीला पर्याय नाही'.
हो हो, सगळ्या गोष्टी कशा शिस्तीत झाल्या पाहिजेत. घाई गडबड उपयोगाची नाही. पहिल्या मुद्द्याला सगळ्यांनीच अनुमोदन दिले.
पहिल्याच मुद्द्याला असा त्वरित होकार मिळाल्यामुळे देशपांडेंनी समाधानाने चेअरमन साहेबांकडे पाहिले. त्याबरोबर चेअरमन साहेबांनी घाईगडबडीने भिंत सोडून पुन्हा आपले प्रसन्न हास्य दिले, चांदीचा दात चमकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढे पुढे चेअरमन साहेबांचा तो चमकणारा दात आणि टाळ्यांचा कडकडाट असे समीकरणच बनून गेले!
शिक्षकी पेशातल्या एकाने सुचवले, एक भव्य वाचनालय सुरू करावे, म्हणजे ज्ञान मिळेल. लोक एकत्र येतील, विचारांची देवाणघेवाण होईल. मात्र वाचनालय भव्यच असले पाहिजे म्हणजे सगळीकडे सोसायटीचा गाजावाजा होईल.
सोसायटीच्या आवारात झाडे, फुलझाडे असावीत. हिरवा शालू पसरला आहे असे वाटावे, विविध रंगांची उधळण व्हावी.
दोनही मुद्दे सगळ्यांना फार आवडले.
वास्तुशास्त्राचा नाद असणाऱ्या एकाने सुचवले, आत येण्याच्या दिशेला वाहते पाणी असले की दुष्ट शक्तीचा नाश होतो. त्यासाठी गेटजवळ एक छोटे कारंजे लावू. दुष्ट शक्ती कोणाला हव्या असतात? त्यामुळे हा मुद्दा मान्य करायला हरकत नव्हती, पण एकाने पाणीटंचाईची आठवण करून दिली. त्यावर दुसऱ्याने नुसतं कारंजे बांधून काढू. ते पाहून दुष्ट शक्ती गेटवरून बाहेरच्या बाहेर पळून गेली तरी आपले काम होईल असा तोडगा काढला आणि हा मुद्दा सुद्धा सर्वमान्य झाला.
सर्वांचे अनुमोदन मिळणाऱ्या प्रत्येक मुद्द्यागणिक देशपांडे समाधानाने चेअरमन साहेबांकडे पाहत राहिले, दात चमकत राहिला आणि टाळ्यांचा कडकडाट होत राहिला!
देशपांडे भारीच सुखावले.
"आता विकासाचा पुढील मुद्दा...."
"चहा मागवा", कांबळेंनी देशपांडेंचे बोलणे मध्येच तोडले.
विकासाच्या या मुद्यावर गर्दीतून उस्फुर्त होकार आले. सर्वांगीण विकासासाठी चहा सोबत बिस्किटे, आणि सर्वसमावेशक विकासासाठी बिनसाखरेचा चहा सुद्धा मागवावा अशी मागणी पुढे आली. एवढेच नव्हे तर विकासाचा हा मुद्दा अजिबात वेळ न दवडता अंमलात यावा अशीही सूचना गर्दीतून आली. देशपांडेंना नाइलाजाने चर्चा थांबवून चहा मागवावा लागला.
हा चहापाण्याचा कार्यक्रम मात्र फार छान झाला.
"तुम्ही घ्या", "त्यांना द्या" असे करत करत भरल्या चहाचा एकेक कप चार चार जणांच्या हातून फिरला आणि पाचव्या माणसाच्या हातून पडून फुटला. पुन्हा नवीन कप गर्दीतून फिरले. एक कप चेअरमन साहेबांच्या पायाजवळ फुटून त्यांची पॅन्ट खराब झाल्यानंतर ही कप फिरवा फिरवी थांबली. या गोंधळात नेमका बिनसाखरेचा चहा चेअरमन साहेबांच्या हाती आला. बिस्किट बुडवून तरी चहाला गोडी येते का ते पाहावे म्हणून ते बिस्किटांची वाट पाहत राहिले. बिस्किटाने भरलेले ताट गर्दीतून फिरले आणि दोन तुटकी बिस्किटं आणि बराचसा चुरा उरलेले ताट कुणीतरी चेअरमन साहेबांच्या हातात दिले. एका हातात ताट आणि दुसऱ्या हातात चहाचा कप असताना बिस्किटं चहात बुडवायची कशी हा विचार करत चेअरमन साहेब दोन क्षण थांबले. हे पाहून चेअरमन साहेबांना बिस्किटं अजिबात आवडत नाहीत असा आगाऊ समज करून घेऊन कांबळेंनी बिस्किटांचे उरलेले तुकडे फस्त करून टाकले. मनातल्या मनात चरफडत चेअरमन साहेबांनी भिंतीला टेकल्या टेकल्याच, चुरा खाली पडू नये म्हणून डाव्या हातात ताट धरून उजव्या हाताने तो पाणचट आणि थंड झालेला चहा घश्याखाली ओतला. उभे राहून राहून त्यांच्या पायाला मुंग्या आल्याच होत्या, आता चहामुळे पँटला सुद्धा मुंग्या लागल्या.
चहापानाचा कार्यक्रम संपला आणि बरेच जण चेअरमनना स्वतः भेटले आणि आपण कसे खंबीरपणे नवीन कमिटीच्या पाठीशी उभे आहोत असे सांगून पाठ दाखवून निघून गेले.
शेवटी कार्यक्रम संपला. पूर्ण मिटिंगमध्ये एकही शब्द बोलण्याची संधी न मिळालेले चेअरमन निर्जीव झालेले पाय ओढत घरी गेले आणि पाय चोळत रात्रभर जागे राहिले. देशपांडेंना मात्र खूप वर्षांनंतर शांत आणि समाधानी झोप लागली!
देशपांडे कामाला लागले. जोडाजोड करून एक पत्र्याचे शेड उभारून "भव्य वाचनालय" अशी पाटी लावली. एकदोन वर्तमानपत्रे ठेवली. आतमध्ये नियम आणि तो मोडल्यास होणारा दंड याची भलीमोठी यादी लावली.
एकदोन दिवसात इमारती मधली वाचन संस्कृती वाढीला लागून विचारांची देवाणघेवाण नक्की होईल अशी त्यांची धारणा होती. पण एक दिवस गेला, दोन दिवस गेले, एक आठवडा उलटला तरी रहिवासी वाचनालायत फिरकेनात. दोन वयोवृद्ध नियमाने येत पण त्यातील एकाला मोतीबिंदू असल्याने त्यांचा वाचनाशी संबंध नव्हता आणि दुसऱ्याला अजिबात ऐकू येत नसल्याने त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण शक्य नव्हती. दोघेही येत, वीस पंचवीस मिनिटे एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसत आणि निघून जात. एकदोन दिवसांनी तेही येईनासे झाले. इमारतीतल्या दंगेखोर मुलांना वाचनालयाचा पत्ता लागल्यावर त्यांनी वर्तमानपत्राच्या कागदांची विमानं बनवून उडविण्याचा उद्योग आरंभला. विमानं उंच उडून खिडकीतून लोकांच्या घरात जाऊ लागली. लोकांना घरबसल्या पेपरातले ज्ञान मिळू लागले. संपादकीय अग्रलेखाचे विमान देशपांडेंच्या घरात घुसल्यावर मात्र त्यांनी गेटवरील शिपायांकरवी हा प्रकार थांबवला. या सर्व प्रकारामुळे एक मात्र बरे झाले. रहिवाश्यांना सोसायटीत वर्तमानपत्रे येतात याची खबर लागली. सोसायटीत काही लहानगी मुले होती, त्यातील काहींना शौचालयाची अजिबात सवय नव्हती. त्यामुळे आदल्या दिवशीचे पेपर त्यांना फार उपयोगी पडू लागले. नंतर नंतर त्यातील काही लहानग्यांना ज्या दिवशी वर्तमानपत्र येईल त्याच दिवशी शुचिर्भूत व्हावेसे वाटू लागल्याने आलेली वर्तमानपत्रे सकाळीच गायब होऊ लागली. वाचनालय ओस पडू लागले. पुढे पुढे मोकाट कुत्री मात्र आसऱ्याला वाचनालयात भरपूर येऊ लागली आणि एकमेकांवर भुंकून आपापसात विचारांची देवाणघेवाण करू लागली. रात्रीअपरात्री असा त्यांच्या विचारांचा भडिमार रहिवाश्यांवर होऊ लागल्यानंतर शिपायाने परस्परच वाचनालयला टाळे ठोकले.
विकासाच्या धोरणाची अंमलबजावणी करताना सुरवातीलाच असा अपशकुन झाला!
देशपांडेंना फार राग आला. ही एवढी बेशिस्ती खपवून घेणं त्यांच्या स्वभावातच नव्हते. त्यांनी तडकाफडकी एक कमिटी मीटिंग बोलावून लोकांना शिस्त नसल्याने कशी बजबजपुरी माजेल हे मोठमोठ्याने ओरडून सांगितले. विकासाचे इतर कोणतेही मुद्दे अंमलात आणण्याआधी बेशिस्तपणा थांबवला पाहिजे आणि यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे. आपलं दुर्लक्ष झाली तर इथे कायद्याचं राज्यच राहणार नाही. आता वेळ न घालवता आपण आतापासूनच सुरवात करून वरचेवर सोसायटीच्या आवारात गस्त घातली पाहिजे. जिथे जिथे बेशिस्तपणा दिसेल तिथेच तो थांबवला पाहिजे. यासाठी सगळ्यांचंच योगदान आवश्यक आहे.
सगळ्यांना हे पटत होतं पण हा बेशिस्तपणा थांबवण्यासाठी योगदान नक्की कसं करायचं हे मात्र ध्यानात येत नव्हते. कारण कोणी सांगून बेशिस्तपणा करत नाही. मग जर कळलंच नाही तर तो थांबवायचा कसा? आणि एकदा बेशिस्तपणा करून झाला की मग थांबवायचा प्रश्नच येत नाही. पण आता सगळेच सोबत आहेत तर गस्तीला जायला काय हरकत आहे?
मंडळींनी सुरवात गेटवरच्या शिपायाकडून केली, कारण बेशिस्तीचं उगमस्थान तेथेच असल्याचं देशपांडेंचं म्हणणं होतं.
शिपाई नेहमीप्रमाणे गेटजवळच्या खुर्चीवर बसला होता. एकदाचं आपलं जे काय योगदान करायचं असेल ते करून टाकू, मागनं या देशपांड्याची कटकट नको असे कांबळेना वाटले.
"कशी काय चाललेय तुझी शिस्त?", शिपायाकडे डोळे मोठे करत कांबळे म्हणाले.
शिपायाने एकदा कांबळेंकडे आदराने पाहिले आणि म्हणाला, "होय साहेब, पोरगा कामाला लागलाय तिकडं पुण्यात. आता काय दगदग न्हाई. सगळं कसं शिस्तीत चाललंय."
कोणाला या बोलण्याचा संदर्भ लागेना.
देशपांडे ओरडले, "ते असू देत, बेशिस्तपणा अजिबात चालायचा नाही. ड्युटी म्हणजे ड्युटी, समजलं?"
आता शिपायाला या बोलण्याचा संदर्भ लागेना. तरीही "होय साहेब, एकदम ओके, ड्यूटी म्हणजे ड्यूटी", असे म्हणून त्यानेच विषय संपवला.
मंडळी आसपास पाहू लागली. आसपास शिस्त लावण्यासाठी कुणीही नव्हते. मोठी माणसे कामाला निघून गेली होती. बायामाणसे घरकामात मग्न होती. फक्त कुणीतरी गावंढळ वाटणारी स्त्री इमारतीच्या आवारातच वेणीफणी करत बसली होती. गावाकडून येऊन कुणाकडे तरी उतरली असल्याचे शिपायाने सांगितले. देशपांडेंना हे अजिबात आवडले नाही. पाहुणी असली म्हणून काय झाले? तरी नियम म्हणजे नियम.
"अहो मॅडम, हे काय चाललंय?", देशपांडेंनी हटकले.
मॅडमने एकदा वळून पाहिले आणि म्हणाली, "काय न्हाई बाबा, बसलोया केस विंचरीत. घरी बसून किती येळ घालवायचा?"
"पण हे इथे चालायचं नाही", देशपांडे म्हणाले.
"का बरं? मी काय तरास दिला तुमाला?", बाईंनी थोड्या संशयाने विचारले.
"सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या उपविधी क्रमांक पासष्ट अ अनुसार, संस्थेच्या सामाईक जागेचा वैयक्तिक वापर हा दंडनीय अपराध असून, त्यासाठीच्या दंडवसुलीचे पूर्ण अधिकार संस्थेच्या लोकनियुक्त समितीला आहेत", देशपांडेंनी अगदी अचूक आणि कायदेशीर भाषेत सांगितले.
बाईंना त्यांचे बोलणे काही कळले नाही पण हे टोळके काहीतरी चावटपणा करण्यासाठीच इथे आले आहे हे मात्र तिच्या ध्यानात आले.
"इथे तुम्हाला केस विंचरता येणार नाहीत", देशपांडेंनी सोप्या भाषेत स्पष्टपणे सांगितले.
"काय होईल इंचरले तर?", बाई थोड्या फणकाऱ्यानेच म्हणाली.
"चेअरमन साहेबांचा दंड माहीत आहे का?", कांबळे मधेच तोंड घालून म्हणाले.
"वा रे भाद्दर! बाई माणसाला दंड बेडकुळी दाखवणार म्हण की तुजा त्यो चेरमन", बाई डोळे मोठे करून म्हणाली.
हे ऐकून बाजुला शांतपणे उभे असलेले चेअरमन एकदम दचकले.
या बाईचा समजून घेण्यात काहितरी गोंधळ झाल्याचे मंडळींच्या ध्यानात आले.
देशपांडे गडबडीने म्हणाले, "अहो आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं..."
"मग कसं म्हनायचं हुतं?", बाई उपहासाने म्हणाली.
"अहो ऐका तरी.."
"मग बोल तरी", बाई फार भडकली होती.
कांबळे स्पष्टीकरण देत म्हणाले, "आमचे जे चेअरमन आहेत..."
"त्यो मला बेडकुळी दाखीवनार असंच न्हवं? येक काम कर, त्या चेरमनला आनि तेच्या बाला माझ्या म्होरं आन. न्हाई दोघास्नीबी नागडं करून त्यांची गाढवावरनं धिंड काढली तर माझ्या बाचं नाव लावायची न्हाई"
हे ऐकून सगळे हतबुद्ध झाले. दोन क्षण शांततेत गेले.
"अहो मॅडम, काय तुमची ही भाषा!"
"आरं तुझ्या मी, थांब, चपलानं त्वांड फोडल्याशिवार तुला कळायचं न्हाई", असं म्हणून बाईनं खरंच आपल्या चपलाला हात घातला. हे पाहून सगळे तिथून पसार झाले आणि दूर उभे राहून एकमेकांकडे पाहत राहिले. गावरान बाई. कुणी सांगावं? बोलल्याप्रमाणे खरंच चार माणसांपुढे आपलं तोंड फोडायची!
बाईने असा घणाघाती हल्ला होता केला की सगळ्यांची तोंडंच बंद झाली. या बाईशी बोलण्यात काहीच अर्थ नाही हे त्यांच्या ध्यानात आले. काहीही कारण नसताना आपल्या आणि आपल्या तिर्थरूपांच्या अब्रूचे असे सर्वांदेखत धिंडवडे निघालेले पाहून चेअरमन साहेबांना कापरे भरले.
देशपांडे सगळ्यांना घेऊन ऑफिसमध्ये आले आणि सगळ्यांना समजावू लागले,
"झाला प्रकार हा अतिशय निंदनीय असून चेअरमन सारख्या जबाबदार व्यक्तीचा असा अपमान करणे हे बेकायदेशीर आहे".
"ते पण खरंच", कांबळेंनी दुजोरा दिला.
चेअरमन पडक्या चेहेऱ्याने ऐकत होते.
"रहिवाश्यांच्या या अशा वागणुकीला वेळीच चाप लावणे हे आवश्यक आहे. नाहीतर सोसायटीमध्ये अनागोंदी माजेल"
"मग आता काय करूया?", कांबळेंनी प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारले.
"पोलिसात जाऊ", देशपांडे ठाम आत्मविश्वासाने म्हणाले.
"ते अजून नसतं लफडं कशाला?", चेअरमन पडक्या चेहेऱ्याने आणि दबक्या आवाजात म्हणाले.
"कशाला म्हणजे? कोणीही येतो आणि चेअरमनचा अपमान करून जातो म्हणजे काय? आणि आपण गुमान ऐकून घ्यायचं? वा रे वा!", देशपांडे रागाने म्हणाले.
"पोलीस का ऐकतील आपलं?", एक अनुभवी माणसाने शंका विचारली.
"म्हणजे? चेअरमन म्हणजे काय साधंसूधं पद वाटलं का? एका गृहनिर्माण संस्थेचं लोकनियुक्त पद आहे ते. घटनेनंच ते बहाल केले आहे. झक मारून दखल घ्यावी लागेल पोलिसांना. काय चेष्टा आहे का?"
तरीही चेअरमन 'नको, नको' म्हणत राहिले आणि देशपांडे जोर लावू लागले. शेवटी देशपांडेंच्या कायदेविषयक ज्ञानाच्या दबावाखाली येऊन मंडळी पोलीस स्टेशनवर गेली.
हा एवढा मोठा घोळका अचानक पोलीस स्टेशनात आलेला पाहून हवालदार चिंतेत पडला. या सरकारी ऑफिसात धड पुरेशी जागा नाही की बसायला खुर्च्या नाहीत. आणि आता ड्यूटी संपायच्या वेळेला ही ब्याद आली. गेला आता दिवस पंचनाम्यात!
हवालदाराने सगळ्यांच्या तोंडाकडे बघत अंदाज घेतला.
एरवी एखाद दुसऱ्या माणसाला हवालदाराने दाद दिली नसती. पण हे एवढेजण एकाच वेळेस आल्याचे पाहून त्याने थोडे नमते घेतले.
समोरच्या एकुलत्या एक खुर्ची कडे बोट दाखवून हवालदाराने बसण्यासाठी हातानेच खूण केली.
मागच्या अनुभवावरून शहाणे झालेले चेअरमन घाई गडबडीने पुढे जाऊन खुर्चीवर बसले.
प्रत्यक्ष पोलीस आदराने बसायला सांगत आहेत हे पाहून मंडळींना भलतेच धैर्य आले. देशपांडे म्हणतात तसे कमिटी म्हणजे काही चेष्टा नाही हे खरेच. साक्षात पोलीस सुद्धा कायद्यापुढे मांजर होतात.
हवालदाराने ते कोण आहेत, कुठून आले आहेत याची चौकशी केली. मग मात्र त्याला काळजी वाटली नाही. या सामान्य जनतेची कशी सेवा करायची हे त्याला पक्के ठाऊक होते.
हवालदाराने विचारले, “आता पटापट बोलायचं तक्रार काय आहे ती.”
त्याबरोबर सगळ्यांनीच उत्साहाने एकाच वेळेस सांगायला सुरुवात केली. हवालदार गांगरला. त्याला काही नीट समजेना. तरीही या गलक्यातून काही अर्थ काढायचा तो प्रयत्न करत होता. पण त्याच्या डोक्यातला गोंधळ वाढायला लागला तसा तो ओरडला,
“का वरडायला लागला एकदम साप डसल्यागत? एकेकाने वरडा.”
कोणी काही बोलणार एवढ्यात, हा गलका ऐकून, आतल्या खोलीतून इन्स्पेक्टर साहेब बाहेर आले. हे एवढे जण आल्याचे पाहून दाराजवळच थांबून त्याने हवालदाराला आपल्या पोलिसी प्रेमळपणाने विचारले,
“हा कळप कशाला आलाय रे इथे?”
हवालदार गडबडीने इन्स्पेक्टरच्या जवळ जाऊन त्यांना काहीतरी सांगू लागला. मंडळींच्या कालव्यातून ऐकलेल्या “बेशिस्त”, “बाई”, “चेअरमन”, “दंड” अश्या मोजक्या शब्दाच्या भांडवलावर लोकांची तक्रार त्याला समजली तशी त्याने इन्स्पेक्टरच्या कानावर घातली.
त्या दोघातला संवाद मंडळींना काही ऐकू येत नव्हता परंतु इन्स्पेक्टरच्या चेहेऱ्यावरील राग मात्र स्पष्टपणे दिसत होता.
ते पाहून चेअरमनच्या कानाला लागून देशपांडे कुजबुजले, “सांगितलं नव्हतं तुम्हाला? बाई मरतेय आता.” असे म्हणून देशपांडे खुदकन हसले.
इन्स्पेक्टरने एकदा गर्दीवरून नजर फिरवली. सगळेजण एका खुर्चीवर बसलेल्या माणसाला घेरून दाटीवाटीने उभे आहेत आणि खुर्चीवरचा माणूस अंग चोरून नाखुषीने आल्यासारखा बसला आहे. अचानक इन्स्पेक्टरची खुर्चीवर बसलेल्या माणसाशी नजरभेट झाली, त्याबरोबर खुर्चीवर बसलेला माणूस तोंड फाकवून हसला आणि त्याच्या तोंडातील एक दात चमकला.
मंडळी हे सगळे शांतपणे पाहत होती. पण काय झाले कुणास ठाऊक? इन्स्पेक्टर अचानक तरतर चालत चेअरमन साहेबांच्या दिशेने आला आणि जवळ येऊन त्याने गचकन चेअरमन साहेबांची कॉलर डाव्या हाताने धरली. गोंधळलेल्या मनस्थितीत चेअरमन साहेबांचे उघडलेले तोंड उघडेच राहिले.
चेअरमन साहेबांना डाव्या हातानेच कॉलर धरून खुर्चीवरून अधांतरी उचलत, त्यांच्या भेदरलेल्या डोळ्यात आपले रागाने लाल झालेले डोळे घालत आपल्या पोलिसी आवाजात इन्स्पेक्टर गरजला,
“तुझ्या आयला तुझ्या, बेशिस्तपणे बाईच्या दंडाला हात लावूनच्या लावून वर माझ्याकडे बघून हसतोस? लय माजलास रे”
असे म्हणून पुढच्याच क्षणी इन्स्पेक्टरने आपल्या उजव्या हाताने चेअरमन साहेबांच्या मुस्काटात सणसणीत भडकावली. चांदीच्या दाताने आपली जागा सोडून, जमिनीवर टण टण अशा दोन चार उड्या मारल्या आणि शेवटी कांबळेंच्या पायाजवळ स्थिरावला.
चेअरमन साहेबांना तसेच खुर्चीवर ढकलून इन्स्पेक्टर गर्दीकडे वळून म्हणाला,
“आणि तुम्ही रे बैलांनो, या हारामखोराला तिथंच बडवायचं सोडून माझ्याकडे घेऊन आलात? पोलिसांना काय तुमच्या दावणीला बांधलंय काय रे? गप चालू पडायचं हितनं नाहीतर एकेकाचे मणके सुटे करून हातात देईन सांगून ठेवतो.”
हे ऐकल्याबरोबर कमिटीचे मेंबर, खुर्चीवर बसल्या बसल्या थरथर कापणाऱ्या चेअरमन साहेबांना तिथेच ठेवून पसार झाले. कुणीतरी धीट मेंबर चोरपावलाने दबकत पुन्हा आत आला आणि चेअरमन साहेबांच्या दंडाला धरून पोलीस स्टेशनाबाहेर ओढंत घेऊन गेला.
पोलिसी खात्याचा कायदेशीर पाहुणचार घेऊन कमिटी सोसायटी ऑफिसमध्ये निराशपणे येऊन बसली. चेअरमन साहेब आता बऱ्यापैकी भानावर आले होते. आपल्या सांध्यापासून हललेल्या जबड्याला हाताचा आधार देऊन बसले होते. कुणीही काहीही बोलत नव्हते पण सगळ्यांच्या मनात निराशा दाटून आली होती. झाला प्रकार फार अनाकलनीय आणि अतर्क्य होता. आपण करायला काय जातो आणि होतं भलतंच. आपण बोलतो एक आणि ऐकणारा ऐकतो दुसरंच. हा देशपांड्या तर मानगुटीवर भूत बसावं तसं बसलाय. पोपटाप्रमाणे स्वतः ढिगभर बोलतो. कुणाचं ऐकून मात्र घेत नाही. चेअरमन साहेब तर फारच निराश झाले होते. आपण एक शब्द बोलत नाही, मात्र भरपूर वाईट ऐकून घेतो. त्या गावरान बाई आणि फौजदाराने आपल्या सोबत आपल्या आईबापाचा सुद्धा उध्दार केला. फौजदाराने तर सगळ्यांसमोर अशी हाणली की मेंदू कवटीतल्या कवटीत हादरला. भविष्यात पुन्हा अब्रू जाण्यासाठी काहीही शिल्लक राहिली नाही. हे सगळं घडलं या अपशकुनी देशपांड्यामुळे. काही बोलावं तर याचा कायदा आलाच आडवा.
काही मिनिटे अशी शांततेत गेली आणि देशपांडेंनी बोलण्यासाठी आपले तोंड उघडले. सगळे जण सावध झाले.
“आज अशा काही घटना घडल्या आहेत ज्या फारच दुःखदायक आहेत. आपल्या सर्वांच्या अंतःकरणाला ज्या यातना होत आहेत त्या शब्दातीत आहेत”, देशपांडेंनी प्रस्ताविक दिले.
मंडळींची तगमग वाढू लागली.
देशपांडेंनी आपले बोलणे सुरू ठेवले, “लोकनियुक्त समितीची अशी कायद्याच्या संरक्षकांकडूनच झालेली हेळसांड ही फारच अपमानजनक आहे.”
मंडळींना हे सगळं असह्य होऊ लागलं. या मोक्याच्या क्षणी कांबळेंनी हळूच खिशातून आणलेला चांदीचा दात चेअरमन साहेबांपुढे ठेवला. असंख्य टाळ्या मिळवलेला तो आपला लाडका दात आपली साथ सोडून असा हताशपणे पडलेला पाहून चेअरमन साहेबांचा रागाचा पारा चढू लागला.
देशपांडे आपल्याच धुंदीत बोलत राहिले, “कायद्याची अशी पायमल्ली झालेली पाहून आपल्या सर्वांची मने निराशेने ग्रासली नाहीत तरच नवल. कायद्याच्या सन्मानासाठी आता आपण पोलीस कमिशनरकडे तक्रार….”
“देशपांड्या, तोंड बंद कर तुझं, सांगून ठेवतो”, चेअरमन असे भडकलेले कधी कुणी पहिले नव्हते.
“अहो पण उपविधी क्रमांक …”
“हाण हाण त्याला”, मंडळींपैकी कोणीतरी ओरडले.
त्याबरोबर चेअरमन देशपांडेंच्या अंगावर एकदम धावून गेले. देशपांडेंना उलटापालटा करून त्यांना एकामागोमाग एक असे पाच सहा गुद्दे हाणले. नंतर फौजदाराने मुस्काटात मारल्याची भरपाई म्हणून त्यांच्या एक थोबाडीत ठेऊन दिली. पडलेल्या चांदीच्या दाताच्या भरपाई साठी देशपांडेंकडे चांदीचा दात नव्हता. पण ती भरपाई त्यांचा चांगला सुदृढ दात पाडून केली. प्रतिकार म्हणून देशपांडेंनी चेअरमन साहेबांच्या शर्टाचे एक बटन तोडले.
या खळबळजनक घटनेची माहिती सोसायटीत वाऱ्यासारखी पसरली. काय झालं कसं झालं याचे तपशील जाणून घेण्यासाठी रहिवासी एकमेकांशी बोलू लागले आणि सोसायटीत आमूलाग्र बदल झाला. आपापसातला संवाद वाढू लागला. जसा संवाद वाढला तसे वाद सुद्धा वाढू लागले. नुसते अळणी वाद काय कामाचे म्हणून अधून मधून झोंबाझोंबी होऊ लागली. आणि यात कधी खंड पडला नाही. अगदी रोज ही भांडणे होत. यात बेशिस्ती अजिबात खपवून घेतली जात नसे. रोजच्या रोज होणाऱ्या भांडणाचे विषय चघळण्यासाठी पत्र्याचे वाचनालय फार सोईचे पडू लागले. वाचनालायत आल्यावर, आज कुणी कुणाला हाणले? कुणाचे कपडे फाडले? याचे ज्ञान मिळू लागले. विचारांची देवाणघेवाण होऊन कुणाचे उट्टे कसे काढावे हे समजू लागले. वाचनालायामुळे सगळीकडे सोसायटीचा गाजावाजा झाला.
त्या गावाकडून आलेल्या पाहुणीने वेणीफणी झाल्यावर आपली हिरवी पातळे आवारात सुकवायला सुरवात केली. या संधीचा फायदा इतर सौभाग्यवतींनी सुद्धा घ्यायला सुरवात केली. आणि खरोखरंच सगळीकडे हिरवा शालू पसरला आहे असे वाटू लागले. मग सोसायटीतल्या आजीबाई तरी का मागे राहतील? त्यांची जुनी, रंगीबेरंगी ठिगळे लावलेली गोधडी उन्हात चमकू लागली. त्यामुळे विविध रंगांची उधळण झाली. समस्त रहिवाशी आपल्या अधिकारांबद्दल फारच जागृत झाल्यामुळे कुणालाही जुमानेनासे झाले. या सोसायटीत सारेच दुष्ट असल्याची कीर्ती एवढी पसरली, की बाहेरच्या कोणत्याही दुष्ट शक्तीची आतमधे पाऊल टाकायची हिम्मतच झाली नाही.
कमिटीने ठरवलेल्या विकासाच्या सगळ्याच मुद्द्यांची अंमलबजावणी झाली आणि सोसायटीचे नाव सार्थ ठरले, “चैतन्य सहकारी गृहनिर्माण संस्था!”
------------------------
रमेश जितकर
(नवी मुंबई)
प्रतिक्रिया
17 Jan 2024 - 7:56 pm | तुषार काळभोर
लै वर्षांनी अशी दमामि स्टाईल कथा वाचायला मिळाली!
मस्त!
18 Jan 2024 - 9:32 am | वामन देशमुख
अगदी! हेच म्हणणार होतो!
अवांतर: मिपावर like बटन हवे.
17 Jan 2024 - 9:20 pm | मुक्त विहारि
कथा आवडली...
18 Jan 2024 - 4:48 am | कंजूस
अगदी वास्तववादी कथा.
सर्व उपविधी अमलात आणून लिहिलेली कथा.
18 Jan 2024 - 6:47 am | विजुभाऊ
झकास
18 Jan 2024 - 9:35 am | वामन देशमुख
कोपरखळी, विरोधाभास, उपरोध, उपहास, ... विनोदी लेखनाचे सर्वच अलंकार वापरलेत!
जाम आवडली कथा; अजून येऊ द्या.
18 Jan 2024 - 2:50 pm | श्वेता व्यास
मजा आली वाचून. मस्त खुसखुशीत कथा!
19 Jan 2024 - 2:53 pm | रम्या
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद!
19 Jan 2024 - 3:22 pm | टर्मीनेटर
मस्तच झाली आहे कथा... खूप आवडली 👍
19 Jan 2024 - 9:31 pm | आग्या१९९०
खुसखुशीत कथा आवडली. मिपावर ' चैतन्य ' आले.
20 Jan 2024 - 1:20 pm | रंगीला रतन
हहपुवा :=)
20 Jan 2024 - 4:23 pm | नठ्यारा
एकदम दमामि कथा, या वरील उद्गारांशी सहमत. आता पुढचा भाग लवकर टाका ही विनंती : “चैतन्य सहकारी गृह(कलह)निर्माण संस्था!”
-ना.न.
22 Jan 2024 - 11:08 am | सौंदाळा
भारीच एकदम
24 Jan 2024 - 4:22 pm | सुप्रिया
एकदम मस्त !! मजा आली वाचायला
25 Jan 2024 - 2:43 pm | सिरुसेरि
मजेशीर कथा . आवाज च्या दिवळी अंकामधील विनोदी कथांची आठवण झाली .
अलिकडेच युटुब वर एका खडुस सोसायटी ऑफिसचा व्हिडीओ बघितला . https://www.youtube.com/watch?v=9Wc17MmFGGg