भैय्याची गर्लफ्रेंड
“मॅाम तू या चिंगीसाठी वेगळी रूम तयार कर.मला तिच्या बरोबर रूम नाही शेअर करायची.”
विराजस आईला सांगत होता पण चिंगी म्हणजे सिया मात्र भैय्याला वेडावून दाखवत होती.
“अरे पण आपल्याकडे कुठे इतक्या रुम आहेत.तुम्हाला रूम शेअर करावीच लागेल.” सानवीने विराजसला समजावण्याचा प्रयत्न केला.
“ए ,भैय्या तुला मी अशी सोडणार नाहीय.चांगलीच पिडणार आहे.” विराजसची मागणी मम्मीने न ऐकल्यामुळे आनंदलेली सिया बोलली.
“अगं मम्मी,मी याला रूममध्ये का नको असते माहित आहे का तुला?सारखा मला रुमच्या बाहेर काढत असतो.”सिया चुगली करणार तेव्हढ्यात विराजसने तिचं वाक्य मध्येच तोडले.
“चिंगे,छोटा पॅकेट बडा धमाका.गप्प बस नाहीतर तू त्यादिवशी काय केलंस ते सांगेन मम्मीला.”विराजसच्या या बोलण्याचा सियावर काहीच परिणाम झाला नाही.
“सांग,सांग मी नाही घाबरत कुणाला.मम्मी ती समोरची मुलगी आहे ,सारखी बाल्कनीत उभी राहून आपल्या घराकडे बघत असते.ती माझ्याकडे या भैय्याचा नं. मागत होती.तिला म्हणे एक गणित विचारायचं होतं.मी तिला सांगितलं,’माझं पण गणित चांगलं आहे.त्यात काय चुकलं?तर तिला राग आला आणि तिने माझे केस ओढले मग मी पण तिचे केस ओढले.मग झाली आमची मारामारी.ती ना भैय्यावर लाईन मारायला बघतेय.”सियाने एका दमात सगळं सांगितलं.
सानवी विस्फारल्या डोळ्यांनी आपल्या दोन्ही मुलांकडे पहात होती.बापरे आपली मुलं एव्हढी मोठी झाली?
“अगं पण चिंगे तुला लाईन मारणे म्हणजे काय ते माहित आहे?”सानवीचे डोळे विस्फारलेलेच होते.
“ अगं ती नाही का सिरियलमध्ये नखरेल मुलगी म्हणत असते,तसंच ही तिच्या मैत्रीणीला सांगत होती.’तो विराजस फक्त माझा आहे.’माझ्या मैत्रीणीने ऐकलं आणि मला सांगितलं.मग तू सांग मला मम्मी भैय्याला अशा मुलींपासून लांब ठेवायला नको?”
सानवीला आपल्या मुलांचे हे उद्योग नव्यानेच कळत होते.
“कुठची तुझी मैत्रीण?कुठे भेटली तुला?”सानवीने सियाला विचारले.
“अगं ती माया,माझ्या शेजारी बसते बघ वर्गात.तिने ऐकलं हे सगळं.तिला पण भैय्या आवडतो पण बॅायफ्रेंड म्हणून नाही हं.तिला पण वाटतंय ‘आपण दोघींनी मिळून भैय्याचं रक्षण केलं पाहिजे’ म्हणून आम्ही याच्या वर लक्ष ठेवून असतो.आधीच आपला भैय्या आहे बावळट.त्याला ना शिट्टी वाजवता येत ना डोळा मारता येत.त्याला काही चांगली मुलगी पटवता येणार नाही.”सिया मम्मीला आवेशात सांगत होती.
सियाचा आवेश बघून खरं तर सानवीला चक्कर यायला लागली होती.तिने फ्रिजमधली गार पाण्याची बाटली काढून घटा घटा पाणी पिऊन संपवली.
“अगं पण नाही आली शिट्टी मारायला किंवा डोळा मारायला,मग त्यात काय एव्हढं?तुझ्या डॅडूला पण नाही येत हे सगळं.आणि डोळा मारणे,शिट्टी वाजवणे हे मवाली मुलं करतात.असू देत माझा विरू साधा भोळा.”सानवीने डोळा मारणे आणि शिट्टी वाजवणं कसं अयोग्य आहे हे सांगायचा प्रयत्न केला.
“अहाहा!म्हणे साधा भोळा.मम्मी तुला माहित नाहीयत याचे उद्योग.त्यानी पाठवलेले मेसेजेस् बघ.मग समजेल तुला.”सियाचं बोलणं मध्येच थांबवत सानवीने ,विराजसकडे त्याचा मोबाईल मागितला.
“मम्मी,तुझ्या या साध्या भोळ्या मुलाच्या मोबाईलमध्ये काहीच मिळणार नाही.”सियाने सांगितल्यावर सानवीने प्रश्नार्थक नजरेने विरूकडे बघितलं.पण त्याने फक्त खांदे उडवले.
“अगं मम्मी तुझा हा साधासुधा मुलगा त्यासाठी आजीचा फोन वापरतो.म्हणून त्याने डॅडूला मस्का लावून आजीसाठी हायफाय फोन घ्यायला लावला.आजीला काही तो फोन वापरता येत नाही त्यामुळे याचे उद्योग तिला कळत नाहीत.ती बाहेर जाते तेव्हा हा तिच्या फोनवर फॅारवर्डिंगचं सेटींग करून ठेवतो.”
सियाकडे विराजसची खडा न् खडा माहिती होती.
“आणि तू म्हणतेस ते डोळा मारायचं,शिट्टी वाजवायचं वाईट असतं पण हा भैय्याच मला सांगत होता डोळा मारायला आणि शिट्टी वाजवायला शिकव.”सियाच्या या बोलण्यावर सानवीचा वासलेला आ बराच वेळ तसाच होता.
सानवीने भानावर येऊन सियाला विचारलं.
“अगं पण तुला हे सगळं येतं?”
“मग काय हे बघ.”असं म्हणत सियाने दोन,तीन प्रकारची शिट्टी वाजवून दाखवली आणि दोन्ही डोळे पण मारून दाखवले.
“अगं पण तुला कधीपासून यायला लागलं हे सगळं?मग तू शिकवलंस का त्याला या तुझ्या कला?” सानवीने विचारले.
“अगं मम्मी तूच सांगितलं होतीस ना मला.नववीत आलीयस,याचं वर्षी सर्व व्यवस्थित शिकून घेतलं की पुढे सगळं सोप्पं जातं.म्हणून मी सगळं शिकून घेतलं.आणि मी काय कधीही तयार असते शिकवायला .तुला आणि डॅडूला पण शिकवीन.पण या भैय्याला नाही शिकवणार.आता मी त्याला शिकवून कंटाळले आहे. मग मी त्याला सांगितलं खिशात चिंच ठेव.चिंच खाताना डोळा बारीक होतोच कि नाही?तेव्हापासून तो खिशात चिंच ठेवतो.म्हणून बघ आतासुद्धा त्याच्या खिशात चिंच असेलच.”
सियाचं बोलणं संपलं आणि सानवीने विराजसचे खिसे तपासले.तर खरंच त्याच्या खिशात चिंचेची गोळी होती.
“हे झालं डोळा मारण्याचं पण शिट्टीचं काय?ती यायला लागली वाजवायला?”सानवीने विचारले.
“नाही गं मम्मी तुझा साधा भोळा विरू,साधा भोळा नाहीय तर यड बंबू आहे.त्याला मी शिट्टी आणून दिली होती ती पण त्याला वाजवता आली नाही नीट.मग मीच दोन,तीन शिट्ट्यांचे आवाज त्याच्या मोबाईलमध्ये रेकॅार्ड करून दिलेत.”सिया हसत हसत बोलत होती.
सियाला हसू आवरत नव्हतं पण इकडे सानवीचं ब्लड प्रेशर वाढत होतं.
“भैय्या मोठा आहे तुझ्यापेक्षा.त्याला बरं वाईट कळतंच असणार.”सानवी जरा समजावण्याच्या सुरात बोलत होती.
“हो का?त्याला बरं वाईट कळतं का? अगं तसं असतं तर मला काहीच काळजी नव्हती त्याची.पण...........
त्याला विचार त्याचा पॅाकेटमनी दहा तारखेलाच कसा संपतो?मग तो तुझ्याकडून नाहीतर डॅडूकडून पैसे मागतो आणि ते झालं कि माझ्याकडून उधार घेतो.ते उधार तो परत कधी करतच नाही.पण मला दया येते त्याची मग मीच देते त्यानी मागितले की.नाहीतर मग कॅालेजला जाताना सायकलवर जातो.परवा याने आजीला सांगितलं सायकल चालवली की तब्येत चांगली रहाते.आजी किती कौतुक करत होती.पण तिला काय माहित याचे पेट्रोलचे पैसे त्या मैत्रीणीला पाणीपुरी खायला घालण्यात खर्च झालेत.
मग तूच सांग तुम्ही दोघं ॲाफीसच्या कामात बिझी,आजी कायम घरात.मग याच्यावर लक्ष ठेवून याचं रक्षण नको करायला?” सियाचं आर्ग्युमेंट एकदम करेक्ट होतं.
“बरं बरं माझे आई या वेळेस मीच तुला राखी बांधेन.तू माझं रक्षण चांगलं करावस म्हणून.आता कळलं तुला मम्मी,मला वेगळी रूम का हवीय?मला काही प्रायव्हसीच नाही राहिलीय.हिचं सगळीकडे बारीक लक्ष असतं.मग कुणी माझ्याशी मैत्री करायला हात पुढे केला.तर हिचं ॲप्रुव्हल लागतं.माझी रुम वेगळी असली की मीच त्या रुमची साफसफाई करेन पण कुणाची लुडबुड नको.” विराजसने वेगळ्या रूमची मागणी कशी रास्त आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला.
हे सगळं ऐकून सानवीला गरगरल्यासारखं व्हायला लागलं म्हणून ती खूर्चीवर बसली आणि तिने विराजसला पंखा बंद करून एसी चालू करायला सांगितला.
“मम्मी तू ठिक आहेस ना?एव्हढं कुठे गरम होतंय?” विराजसने पंखा बंद केला आणि एसी लावता लावता सानवीला विचारलं.
“ हो रे माझ्या सोन्या,बरी आहे मी पण तुम्हा दोघांचे या वयातले बोलणे ऐकून मला घाम फुटलाय.आणखीन काही दिवसांनी काय काय ऐकायला मिळेल कोण जाणे?तुम्ही शाळा कॅालेजात शिकायला जाता की बॅायफ्रेंड/ गर्लफ्रेंड शोधायला? “ सानवीने जरा काळजीच्या स्वरात विचारले.
“अगं मम्मी आम्ही दोन्ही गोष्टी करतो.नुसता अभ्यास केला की बोअर होतं.” नववीतल्या लेकीचं बोलणं ऐकून सानवीने कपाळावर हात मारून घेतला.
“मी अभ्यासच करतो मम्मी.पण हिला उगीच वाटतं मला खूप मैत्रीणी आहेत असं.”विराजस सानवीला समजावण्याचा प्रयत्न करत होता.
“हो का?मग सांगू का मम्मीला तुझं सीक्रेट?मग बघ ती बेशुद्धच होईल.” सियाने भैय्याला चॅलेंज केलं.
“ हो सांग सांग.मी नाही तुझ्या धमक्यांना घाबरणार.आणि तुझी ती यडपट मैत्रीण आहे ना ती माझी गर्ल फ्रेंड कधीच होऊ शकणार नाही.” विराजसने शेवटचा निकराचा प्रयत्न केला.
एव्हढं सगळं बोलणं झाल्यावर सिया रूमबाहेर गेली.थोड्यावेळानी ती थंड पाण्याचा बाटली आणि साखरेचा डबा घेऊन आली.
“आता हे सगळं काय आहे?” सानवीने सियाला विचारलं.
“ लागेल तुला हे सगळं,माझं बोलणं पूर्ण झाल्यावर.नंतर धावाधाव नको म्हणून आधीच आणून ठेवलं.” सियानी शांतपणे सांगितलं.
“मी जातो.माझी क्लासची वेळ झालीय.” विराजसच्या लक्षात आलं,प्रकरण आपल्यावर शेकणार,म्हणून तो पळवाट शोधत होता.
“भैय्या,तू कुठेही जाणार नाहीयस.तू काही गुन्हा केलेला नाहीयस.फक्त तुझी निवड चुकलीय.”सियाने गंभीरपणे म्हटलं आणि विराजसला हाताला धरून मम्मीशेजारी बसवलं.
“मम्मी,आपल्या भैय्याला कॅंपसमधून ॲपल कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून अपॅाइंटमेंट केलं हे तुला माहित आहेच.नोटीस बोर्डवर ॲपल तर्फे निवड झालेली फक्त चार नांवं होती.त्यातल्या दोन मुलांच्या आधीपासून गर्लफ्रेंड होत्या.एक जण बिचारा गांवाहून इकडे शिकायला आला होता.मग राहता राहिला आपला स्वभावाने गरीब,अभ्यासू भैय्या.आपला भैय्या ,हे सगळ्या चालू मुलींसाठी चांगलाच पर्याय होता.मग त्यांनी याच्यावर जाळं टाकायला सुरूवात केली.”
“ एक मिनीट,एक मिनीट.चिंगे हे तुला कसं माहित?” सियाला मध्येच थांबवत सानवीने विचारलं.
“अगं सिंपल आहे.तिचा बॅायफ्रेंड आहे आमच्या कॅालेजमध्ये.”विराजसने खूप मोठे गुपित उघड करत असल्याचा आव आणला.
“ए भैय्या,उगीच काही तरी सांगू नकोस मम्मीला.माझा बॅायफ्रेंड नाहीय तो.माझा सिनियर आहे.मला कधी काही अडलं तर शिकवतो एव्हढंच.”सियानी स्वत:ची बाजू मांडली.
“ तर त्या मुलींच्या पैकी एक मुलगी भैय्याला पण आवडायला लागली.आणि ती एक नंबरची लालची आणि चालू होती.मी रोज रात्री भैय्याचं आणि तिचं बोलणं ऐकायची.ती मुलगी भैय्याकडे आयफोन मागत होती.आणि भैय्या तिला सांगायचा की तो ट्रेनी म्हणून काम करणार आहे.तरी ती ॲपल प्रोडक्ट मागायची.”
सिया गंभीर होऊन सांगत होती.
“अगं पण नोकरी लागायच्या आधीच?” सानवीने विस्फारल्या डोळ्यांनी विचारले.
“अगं ती मुलगी कॅालेजला येते ती अभ्यास करायला नाही काही.तिला असाच कुणीतरी श्रीमंत बकरा पाहिजे असतो.तिला वाटले ॲपल कंपनीची नोकरी म्हणजे सगळे ॲपल प्रोडक्ट याला फुकट मिळणार.म्हणून ती साडी गोडी लावत होती.”सिया कृतक् कोपानी थरथरत होती.
इकडे सानवीने थंड पाण्याची बाटली तोंडाला लावली आणि घटाघटा पिऊन संपवली.
“अगं पण मग ह्याचे ऊत्तर काय असायचे?याला कळलं नाही का ती मुलगी चांगली नाही ते.” सानवी पाणी पिऊन झाल्यावर जरा सावरली होती.
“अगं मम्मी,बिचारा भैय्य नुसता गयावया करायचा.’अगं शोना असं करू नको.माझी नोकरी चालू झाली की देईन मी तुला सर्व ॲपल प्रॅाडक्ट.हीच टेप चालू असायची.’ आणि ती मुलगी ती काही ऐकायची नाही.मी झोपेचं सोंग घेऊन सगळं ऐकत असायची.मग काय मी आणि मायानी ठरवलं ,’आपल्या भैय्याची या चालू मुलीपासून सूटका केलीच पाहिजे’मग आम्ही एक प्लॅन आखला.”सिया स्वत:वरच खूष होत मम्मीला सांगत होती.
आता आपल्याला काय ऐकायला मिळणार म्हणून सानवीने आवंढा गिळला आणि मनाची तयारी केली.
“काही खास नाही गं मम्मी,त्या मुलीचा फोन नं.घेतला आणि तिला मेसेज् करून एका ठिकाणी बोलावलं .मग माझा तो सिनियर आहे ना त्याने एक पार्सल तिला दिलं.ते पार्सल मी आणि मायानी तयार केलं होतं.पार्सल बरोबर लाल गुलाब आणि आय लव्ह यू चं कार्ड.ते पार्सल घेताना ती जरा साशंक होती.ह्या विराजसने पार्सल दिलंय.सारखं विचारत होती ‘ विरू डार्लिंगनी माझ्यासाठी पार्सल दिलंय.आय काण्ट बिलिव्ह’ पण त्याने तिला पटवलं की ‘ होय विराजसने पार्सल दिलंय.’मग काय ती लगेच घरी पळाली.त्या रात्री भैय्याला एक पण मेसेज् आला नाही.भैय्या सारखा सारखा मोबाईल चेक करत होता.” सिया आता जरा गंभीर झाली होती.
सियाला गंभीर झालेलं बघून सानवीच्या पोटांत गोळा आला.
“मग? मग काय झालं?आवडलं का गिफ्ट तिला.” सानवीने विचारले.
सियाने बोलायला सुरूवात केली पण बोलताना तिला हसू फुटत होतं.
“मम्मी,ती खूष झाली? भरपूर खूष झाली आणि आपल्या खूषीचं प्रतिक पण दिलं भैय्याला.”सिया म्हणाली.
“अरे वा,विरू काय दिलं रे तिने तुला ?” सानवीने विराजसला विचारलं.
सानवीचा प्रश्न ऐकून,विराजसने आपला गाल चोळला.
आणि सिया जोर जोरात हसायला लागली.
“अगं मम्मी,ते गिफ्ट बघून ती एव्हढी रागावली होती की दुसऱ्या दिवशी कॅालेजमध्ये सगळ्यांच्या समोर तिने भैय्याला चांगल्या चारपाच लगावल्या.आणि परत तुझं तोंड बघणार नाही असं सांगितलं.”
“अरे पण गिफ्ट मिळल्यावर खूष व्हायला पाहिजे ना? मग ती का चिडली?काय गिफ्ट पाठवलं होतंस?”सानवीने जरा काळजीतच विचारलं.
“काही खास नाही गं.तिला जे पाहिजे होतं ते ,सगळे ॲपल प्रोडक्ट दिले तिला.जेव्हढी ॲपल प्रॅाडक्ट बाजारात आहेत ती सगळी दिली तिला.परत कुणाकडे तिला ॲपल प्रॅाडक्ट मागायला नको म्हणून.”सिया शांतपणे बोलत होती.
“अगं पण तुझ्याकडे एव्हढे पैसे कुठून आले? सगळे ॲपल प्रॅाडक्ट म्हणजे दोन तीन लाख रुपये सहज लागणार .तू कुठून आणलेस एव्हढे पैसे.”सानवीने जरा रागातच सियाला विचारलं.
“अगं मम्मी तुला ॲपल प्रॅाडक्ट म्हणजे काय वाटलं?” विराजसला खूप वेळानी बोलायला मिळालं होतं.
“ॲपल प्रॅाडक्ट म्हणजे आय फोन,आय पॅड आणि ॲपल वॅाच ना?”सानवीने साधेपणानी विचारलं.
यावर विराजसने कपाळावर हात मारून घेतला.
“अगं मम्मी,या गधडीने आणि तिच्या दिडशहाण्या मैत्रीणीने त्या पार्सलमध्ये ॲपल,ॲपल ज्यूस,ॲपल जॅम आणि ॲपल केक ठेवला होता.”विराजसच्या बोलणं संपले तेव्हा सानवीचा आ वासला होता आणि सिया जोरजोरात हसत होती.
सानवी पण शॅाक मधून बाहेर आली तेव्हा तिला हसू आवरत नव्हतं.
“मम्मी तू हसतेयस पण आता कोण मुलगी माझ्याशी मैत्री करेल?”विराजस जरा वैतागला होता.
“ पण भैय्या तू नको काळजी करूस.ती गेली तरी बऱ्याच मुली तुझ्यावर खूष आहेत.ती मुलगी सगळ्या मुलांवर असं जाळं टाकते म्हणून कुणालाच आवडत नव्हती.मी तुला मस्त गोरीगोरी पान मैत्रीण पटवायला मदत करीन”
सिया समजावण्याच्या सुरात म्हणाली.
“हं,गोरी गोरी पान म्हणजे तुझी ती मैत्रीणच ना?” विराजसने वैतागून विचारले.
“अरे नाही नाही,तिला तू आवडतोस.पण बॅायफ्रेंड म्हणून नाही.कधी तरी पाणी पुरी खायला किंवा तुझ्याकडून चॅाकलेट घ्यायला आवडेल तिला.पण बॅायफ्रेंड बनण्या एव्हढा तू हॅाट नाहीयस.त्यासाठी तुला प्रॅापर ट्रेनिंग द्यावं लागेल.”सिया डोळे मिचकावत म्हणाली.
आता सानवीला कळत नव्हते आपण हसावं की रडावं.
तिला प्रश्न पडला होता आपली मुलगी स्मार्ट आहे म्हणून आनंद मानावा कि आपला मुलगा साधा आहे म्हणून त्याची काळजी करावी.
“अगं पण चिंगे हि ॲपल प्रोडक्टची आयडिया तुझ्या डोक्यात आलीच कशी?”सानवीने सियाला विचारलं.
“मम्मी,अगं तू तिचे मेसेज् वाच.नुसतं आपलं ॲपल प्रॅाडक्ट,ॲपल प्रॅाडक्ट दुसरं काहीच नाही.माझ्या डोक्यातच गेली ती.मग मी प्लॅन केला ,आता आपल्या भैय्याला आपण त्याच्या गर्लफ्रेंडपासून लांब करायचंच.पण मम्मी माझी आयडिया कशी वाटली तुला?”सियाने उत्सुकतेने विचारलं.
“अगं मस्तच होती तुझी आयडिया.सगळ्यांच्या समोर विरूला थोबाडीत मारून उलट तिने स्वत:चंच हसं करून घेतलं असेल.हे मस्त काम केलंस तू.आज तुमच्या डॅडूला सांगूया आईस्क्रीम आणायला.ही व्हिक्टरी सेलिब्रेट करायलाच पाहिजे.आणि विरू तुला वेगळी रूम नाही मिळणार.तू सिया बरोबर आणि सिया तुझ्या बरोबर सुरक्षित आहात.केस डिसमिस.”
सानवीने आपला निर्णय सांगितल्यावर विराजस पाय आपटत बाहेर निघून गेला.
तिघंही बराच वेळ हसत होते.नंतर सानवीने संकेतला फोन लावला आणि सांगितलं “रात्री येताना आईस्क्रीम घेऊन ये.तुझ्या लेकीने म्हणजे विरूच्या भाषेत ‘ छोटा पॅकेट बडा धमाकानी’ केलेला पराक्रम सेलिब्रेट करायचा आहे.”
दोघी हसत असतानाच बेल वाजली.
सियाने दरवाजा उघडला आणि जोरात ओरडली,” मम्मा आजी आलीय.आजी ,काय आणलंयस माझ्यासाठी?”
“अगं हो हो,मला आत तर येऊ दे.हे घे ही पिशवी दे आईकडे तुझ्या आणि तिला सांग माझ्यासाठी चहा कर.”
सुंदराबाईंनी पिशवी सियाच्या हातात दिली.सियानी पिशवी उघडून बघितलं तर तिला हसू आवरेना.
“ काय गं नुसती हसत काय बसलीयस.दे ती पिशवी इकडे मी ठेवते.”सानवीने पिशवीत तर पिशवीतली लाल बूंद सफरचंद तिच्याकडेच बघत होती.तिने हसत हसत सफरचंद बाहेर काढली तर तिच्या हाताला एक बाटली लागली.ॲपल जॅमची बाटली होती ती.
दोन्ही बघून मायलेकी हसत होत्या तेव्हढ्यात सुंदराबाई आंत आल्या.
“सिया तू परवा कुणाला तरी सांगत होतीस ना ॲपल जॅम,ॲपल ज्यूस आणि ॲपल पाहिजेत म्हणून.मी आणलंय सर्व.ज्यूस नाही आणला.सानवी देईल तुला ज्यूस करून.”
सुंदराबाई बोलत होत्या आणि सगळे जोर जोरात हसत होते.
सुंदराबाईंना कळत नव्हतं यांत एव्हढं हसण्यासारखं काय आहे……….
“वेड लागलंय का तुम्हा तिघांना हसताय काय वेड्यासारखे?”सुंदराबाईंनी विचारलं.
“ कळेल,कळेल आई तुम्हाला रात्री.आणि विरू हिला छोटा पॅकेट बडा धमाका का म्हणतो ते पण कळेल.” सानवीने सांगितलं आणि ती चहा करायला वळली.
सौ सरिता सुभाष बांदेकर
प्रतिक्रिया
8 Nov 2023 - 2:30 pm | भागो
येणारी प्रत्येक नवीन पिढी अधिक अधिक स्मार्ट होत चालली आहे.
बाब्याने आईला विचारले, "आई, मुल कशी होतात?"
"अरे आम्ही देवाला प्रार्थना करतो मग देव आपल्याला मुल देतो."
बाब्याने वडिलाना विचारले,आजीला विचारले, आजोबांना विचारले सगळ्यांनी त्याला थातूर मातुर सांगून समजूत काढली.
बाब्या शाळेत मित्राला काय सांगतो, "आपल्या आधीच्या दोन पिढ्या वाया गेल्या. एव्हढी वये वाढली पण ह्यांना अजून मुले कशी होतात हे माहित नाही."
लेख मात्र छान जमला आहे.
8 Nov 2023 - 4:04 pm | वामन देशमुख
एक नंबर लेख लिहिलाय!
काहीतरी लिहिलं असेल असं म्हणून वाचायला घेतलं आणि शेवट होईपर्यंत थांबू शकलो नाही.
वर्जन टू पॉईंट झिरो पण येऊ द्या!
8 Nov 2023 - 4:44 pm | प्रसाद गोडबोले
कोणाच्या तरी दुसऱ्याच्या चुकी मुळे कोणीतरी पोरगी कॉलेज मध्ये सर्वांच्या समोर एखाद्या मुलाला चार पाच चपराक लावत असेल तर त्या मुलाच्या आत्मविश्वास चे काय होईल ? तेही त्याची स्वतची काही चूक असेल तर कदाचित समजून घेता येईल, पण काहीच चूक नसताना असे झाले तर त्याचे भविष्यात भयंकर परिणाम होतील हे मी पैज लाऊन सांगतो.
त्यातही तो मुलगा साधभोला आहे , मग तर तो हा प्रकार प्रचंड मनाला लाऊन घेईल ह्यात शंका नाही, एकतर सुसाईड करेल नाहीतर अँसिड फेकेल. दोन्ही केस मध्ये त्याला दोषी धरता येणार नाही , काहीही चूक नसताना त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल.
आणि हे सगळे ऐकून आई हसू कशी शकते हे अनाकलनीय आहे. आपल्या भोळ्या पोराला कोणीतरी पोरगी चपराक लावते हे ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकात जायला हवी. हेच का स्त्री मुक्ती चळवळ चे फलित ? एका मुलीने दुसऱ्या मुलीच्या कारस्थानामुळे एका निष्पाप भोळ्या मुलाला सर्वांसमोर कानाखाली लाऊन अपमानित करावे अन् हे आईला कळल्यावर तिने हसावे ? वाह. # मुलगी शिकली प्रगती झाली.
कथा आवडली नाही. कथेचा पुढील भाग लिहिलात तर त्यात तो भोळा मुलगा सुसाइड करतो की जबरदस्त सूड उगवतो ह्यावर जरूर लेखन करा.
पू.ले.शू
8 Nov 2023 - 7:01 pm | अहिरावण
सहमत आहे.
कथा बिनडोक आहे. सत्यकथेचा काही अंश असेल तर हे जगणे करंटेपणाचे द्योतक आहे.
असलेच लिहिणार असाल तर पुलेशु नाही.
8 Nov 2023 - 8:56 pm | सरिता बांदेकर
धन्यवाद भागो,वामन देशमुख,प्रसाद गोडबोले,अहिरावण तुमच्या प्रतिसादाबद्दल.
आणि प्रसादजी ज्या मुलाची बहीण इतकी सतर्क आहे तो मुलगा नक्कीच आत्महत्या करणार नाही.
पुढे काही अजून तरी सुचलं नाहीय. पुढे बघूया सुचली तर लिहेन.
आणि अहिरावणजी तुमच्या सुचनेची नोंद घेतली आहे.
पुढे नाही लिहीणार.कळकळीच्या सुचनेबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
8 Nov 2023 - 9:12 pm | प्रसाद गोडबोले
वाह, म्हणजे ह्यातही बहिणीच्या सतर्कतेचे कौतुक . मुलाचा स्वाभिमान गेला तेल लावत.
हा आपला दृष्टिकोन आवडला.
बहिण प्रँक करत आहे, जी मुलगी आवडते ती चारचौघात कानाखाली लावत आहे आणि आईला कळल्यावर तीही हसत आहे. धन्य आहे ही फॅमिली.
त्या मुलाला लहानपणीच "बडवून" घेतलेले आहे का ?
9 Nov 2023 - 2:14 am | वामन देशमुख
भारी!
9 Nov 2023 - 4:42 pm | सरिता बांदेकर
धन्यवाद गोडबोलेजी,
माझा असा समज होता कि कुंभार मडकं भाजून घेतलं कि ते पक्कं झालंय का बघायला ‘बडवून ‘ बघतो.
पण मुलांबरोबर हिंसाचार मी बघितला नाही कुठे.
तुमच्या भावना पोचल्या आहेत.
तुम्हाला कथा नाही आवडली हरकत नाही. मला पण खूप वेळा नाही आवडत.
पण ते आत्महत्येचं तुमच्या डोक्यात का यावं हे मला कळत नाहीय.
मी यापुढे माझ्या लिखाणामुळे असं काही होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
आणि परत सांगते तो मुलगा नक्कीच आत्महत्या करणार नाही कथेच्या पुढच्या भागात.
10 Nov 2023 - 2:44 pm | अनामिक सदस्य
मुलांबरोबर हिंसाचार तुमच्या कथेतच आहे. का तो 'मुलग्याबरोबर' आहे म्हणून हिंसाचार वाटत नाहिये तुम्हाला?
ही कथा का आवडली नाही हे तुम्हाला समजतय का?
8 Nov 2023 - 10:48 pm | मुक्त विहारि
मस्तच....
9 Nov 2023 - 4:34 pm | सरिता बांदेकर
धन्यवाद मु वि जी.
10 Nov 2023 - 2:40 pm | अनामिक सदस्य
पुरुशाने स्त्रीला मारले की तो हिन्साचार, स्त्री ने पुरुशाला मारले की तो विनोद?
लेखिका ताई, एखाद्या कथेत मुलानी मुलिला मारले असे लिहिले असेल तर तुमची अशीच प्रतिक्रिया असेल का?
पुरुशाना किती सहज बावळट, बिन्डोक, मार खाणारे दाखवले जाते.
मुलाचा यात काय अपमान झाला याची स्त्री लेखिकेला काही कल्पनाच नाहिये!
10 Nov 2023 - 7:29 pm | सरिता बांदेकर
धन्यवाद. तुमच्या भावना पोचल्या. वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.