'झंटी मॉल प्रॉब्लेम' ह्या गेम शोच्या दशकपूर्तीनिमित्त असलेल्या विशेष भागासाठी दहा वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या पहिल्या भागाचे चार स्पर्धक 'विशेष अतिथी' म्हणून मंचावर सपत्नीक स्थानापन्न झाले होते. धनंजय-माधुरी, शंतनू-सुषमा, सुधीर-मनीषा आणि परशुराम-कमळा अशा चारही जोडप्यांची झंटीने आपल्या आक्रस्ताळ्या शैलीत प्रेक्षकांना ओळख करून दिल्यावर मग पहिल्याच भागात दोन कार्स आणि दोन बोकड जिंकलेल्या ह्या चौघा स्पर्धकांना बक्षीस जिंकल्यानंतर गेल्या दहा वर्षांतील त्यांचे अनुभव आणि त्या अनुभवांच्या जोरावर आज ते 'झंटी मॉल प्रॉब्लेम' ह्या कार्यक्रमाकडे आणि त्यांना मिळालेल्या बक्षिसांकडे 'समस्या', 'समाधान' कि 'अमूल्य भेट' ह्यापैकी कुठल्या दृष्टिकोनातून पाहतात ह्यावर आपापली मते व्यक्त करण्याची विनंतीवजा आज्ञा दिली...
झंटीच्या ह्या विनंतीवजा आज्ञेचे पालन करत धनंजयने आपले मत व्यक्त करण्यास सुरुवात केली...
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला धनंजय हा फार काही महत्वाकांक्षी वृत्तीचा नसला तरी तो बोलघेवडा, मेहनती, व्यवहारचतुर आणि मिष्कील स्वभावाचा मनुष्य होता. लग्नापूर्वी तो ज्या दुकानात सेल्समन म्हणून नोकरी करत होता त्या दुकानाची मालकीण असलेल्या माधुरीशी प्रेमविवाह करून दुकानाचा सह-मालक बनला होता.
'झंटी मॉल प्रॉब्लेम' ह्या नव्याने सुरु होत असलेल्या 'गेम शो' ची वर्तमानपत्रातली पानभर जाहिरात वाचल्यावर केवळ गंमत म्हणून त्याने ह्या कार्यक्रमात भाग घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी जाहिरातीत दिलेल्या नंबरवर फोन करून आपला सहभाग नोंदवला होता, परंतु 'मर्सिडीज-बेंझ ई क्लास' कार सारखे बंपर इनाम जिंकण्याची संधी असलेल्या ह्या कार्यक्रमात पहिला स्पर्धक म्हणून आपली वर्णी लागेल असे त्याला स्वप्नातही कधी वाटले नव्हते. त्यामुळे निर्मात्यांकडून त्याची स्पर्धक म्हणून निवड झाल्याचे सांगुन त्याचे अभिनंदन करत, अमुक तारखेला तमुक वाजता सुरु होणाऱ्या पहिल्या भागाच्या चित्रीकरणासाठी 'फेमस स्टुडिओ'- महालक्ष्मी, मुंबई येथे उपस्थित राहण्याचे कळवणारा फोन आला तेव्हा धनंजयला आनंदापेक्षा आश्चर्य जास्ती वाटले होते. अशी सर्वसाधारण तत्कालीन पार्श्वभूमी असलेला धनंजय प्रांजळपणे आपले अनुभव कथन करत होता.
"मला ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायची संधी मिळेल आणि मी केवळ पहिला स्पर्धकच नाही तर बंपर पारितोषिक जिंकणारा पहिला विजेताही ठरेन असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते. तीन पैकी एका दरवाजाची निवड करण्यास मला सांगण्यात आले तेव्हा, गेम शोचा हा पहिलाच भाग, त्यात भाग घेणारा मी पहिला स्पर्धक आणि उपग्रह वाहिनीवर प्रसारण होणाऱ्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी कॅमेऱ्यासमोर येण्याची माझी हि पहिलीच वेळ त्यामुळे मुख्य पारितोषिक असलेली गाडी पण पहिल्याच दरवाजाच्या मागे असेल असा साधा तर्क लावून मी दरवाजा क्रमांक १ ची निवड केली होती, आणि 'झंटी मॉल' ह्यांच्या धांदरटपणामुळे पुढचा खेळ उत्कंठावर्धक न होता मी ती गाडी जिंकली होती. त्यांनी बोकड असलेला दुसरा दरवाजा उघडून दाखवून मला माझी निवड बदलण्याची संधी दिली असती तर मी नक्कीच दरवाजा क्रमांक १ हि माझी आधीची निवड बदलून दुसरा दरवाजा निवडला असता आणि गाडी ऐवजी बोकड घेऊन घरी गेलो असतो!"
धनंजयचे हे बोलणे ऐकून आणि मंचावरच्या एल.इ.डी. वॉल वर दाखवली जाणारी पहिल्या भागातील झंटीच्या बावळटपणाची क्षणचित्रे पाहून दहा वर्षांनी पुन्हा एकदा भर कार्यक्रमात झंटीच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले होते आणि त्याच्या अकलेचे आणखीन वाभाडे काढण्यापासून धनंजयला थांबावण्यासाठी "ते सगळं ठीक आहे, धन्यवाद. पण प्रेक्षकांना 'झंटी मॉल प्रॉब्लेम' ह्या कार्यक्रमाकडे आणि तुम्हाला मिळालेल्या बक्षिसाकडे तुम्ही 'समस्या', 'समाधान' कि 'अमूल्य भेट' ह्यापैकी कुठल्या दृष्टिकोनातून पाहता ते जाणून घेण्यात रस आहे त्यामुळे आता त्यावर बोला!" असे उद्गगारता झाला.
त्यावर धनंजयने दिलेल्या "मी 'झंटी मॉल प्रॉब्लेम' ह्या कार्यक्रमाकडे 'संधी' म्हणून आणि त्यात मला मिळालेल्या बक्षिसाकडे 'समाधानात परिवर्तित झालेली समस्या' ह्या दृष्टिकोनातून पहातो." अशा उत्तराने झंटीसहित चित्रीकरणादरम्यान स्टुडिओत उपस्थित असलेले सर्वजण बुचकळ्यात पडले.
'समाधानात परिवर्तित झालेली समस्या' हि काय भानगड आहे? जरा उलगडून सांगता का? असे विचारून उत्तराच्या अपेक्षेने धनंजयकडे पाहणाऱ्या झंटीच्या चेहऱ्यावर कुतूहलाचे नैसर्गिक भाव अगदी स्पष्ट दिसत होते.
"सांगतो!" असे म्हणून, टेबलवर ठेवलेल्या बाटलीतल्या पाण्याचा एक घोट घेऊन धनंजयने पुढे बोलायला सुरुवात केली.
दहा वर्षांपूर्वी मी ह्या कार्यक्रमात जेव्हा 'मर्सिडीज-बेंझ ई क्लास' सारखी महागडी गाडी जिंकलो त्यावेळी आम्हाला दुकानदारीतून मिळणारे उत्पन्न चांगले असले आणि उच्चमध्यमवर्गीय उत्पन्नगटात आमची गणती होत असली तरी निव्वळ हौस म्हणून हा आलिशान गाडीरूपी 'पांढरा हत्ती' पोसण्याएवढी आपली सांपत्तिकस्थिती मजबूत नाही ह्याची आम्हा उभयतांना चांगली जाणीव होती.
सर्व औपचारिकता पूर्ण होऊन गाडीची डिलेव्हरी मिळण्यास १५ ते २० दिवसांचा कालावधी लागेल असे तुमच्याकडून कळल्यावर सर्वप्रथम आम्ही त्या गाडीसाठी गिऱ्हाईक शोधण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले. पाच-पन्नास हजारांची वस्तू असती तर ती विकणे फारसे अवघड नव्हते पण पन्नास लाखांची गाडी, त्यातल्यात्यात चांगला भाव आणि एकरकमी पैसे देऊन खरेदी करू शकेल असा ग्राहक इतक्या कमी वेळात शोधणे हे फार मोठे आव्हान होते.
टीव्हीवर कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहिल्यावर आप्त-परिचितांचे अभिनंदनाचा वर्षाव करणारे असंख्य फोन आम्हा दोघांना येत होते आणि फोन करणाऱ्या प्रत्येकाला आम्ही "सुमारे पन्नास लाख रुपयांची ही नवीकोरी गाडी आम्हाला चाळीस लाख रुपयांना त्वरित विकायची असून आपल्या परिचयात कोणी सक्षम इच्छुक व्यक्ती असल्यास त्यांना हि माहिती जरूर कळवा" असे आवर्जून सांगत होतो, आणि त्याचा चांगला उपयोग झाला होता. अशा फोन करून अभिनंदन करणाऱ्यांमध्ये व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेला 'बलिदान भारद्वाज' उर्फ 'बल्ली' नावाचा माधुरीचा एक वर्गमित्र होता, त्याची आम्हाला ह्या कामी खूप मदत झाली.
पुणे जिल्ह्यातील अनेक नामवंत उद्योजक, व्यावसायिक आणि कंत्राटदारांच्या आर्थिक व्यवहारांचा लेखाजोखा ठेवणाऱ्या ह्या 'बल्ली' ने त्याच्या उच्च उत्पन्नगटातील मातब्बर क्लायंट्सच्या चोपड्या चाळुन, चालू आर्थिक वर्षाअखेरीस आयकर वाचवण्यासाठी त्यांच्यापैकी कोणाला नव्याने गाड्या खरेदी कराव्या लागणार आहेत त्यांची यादी तयार करून त्या सर्वांना आमच्या ऑफर बद्दल कळवले होते. त्यांच्यापैकी काहींचे एवढे बजेट नव्हते तर काहींना हिच्यापेक्षाही महागडी गाडी खरेदी करायची होती. सुदैवाने आमच्या रहात्या पुणे शहरातीलच त्याच्या एका क्लायंटने आमच्या ऑफरमध्ये रस दाखवला आणि त्यांचा एक प्रस्ताव बल्लीला सांगितला होता.
बल्लीचे क्लायंट असलेले 'विश्वास सरपोतदार' नावाचे हे रोखठोक स्वभावाचे सज्जन गृहस्थ आमच्या गाडीच्या बदल्यात पस्तीस लाख रुपये आणि पाच वर्षांपासून त्यांच्या वापरात असलेली, टॉप कंडिशन मधली 'होंडा सिटी' कार आम्हाला देण्यास तयार होते, जिची किंमत जुन्या बाजारात पाच लाख रुपयांच्या आसपास होती, तसेच दोन्ही गाड्यांच्या हस्तांतरणासाठीचा खर्च करण्याचीही त्यांनी तयारी दर्शवली होती. गाडीच्या बदल्यात गाडी आणि पस्तीस लाख रुपये असा विश्वासरावांचा हा प्रस्ताव बल्लीला आणि आम्हालाही व्यवहार्य वाटल्याने त्यांच्या 'जय लक्ष्मी' बंगल्यावर झालेल्या बैठकीत आम्ही अजिबात आढेवेढे न घेता तो स्वीकारला होता.
ठरलेल्या दिवशी गाडीची डिलेव्हरी घेण्यासाठी मी, माधुरी, विश्वासराव आणि त्यांची मुलगी असे चौघे शोरूम मध्ये गेलो होतो. गाडी ताब्यात मिळाल्यावर त्या नव्याकोऱ्या 'मर्सिडीज-बेंझ' मधून थेट विश्वासरावांच्या बंगल्यावर जाऊन आर.टी.ओ. एजंटला सोबत घेऊन तिथे पोचलेल्या बल्लीच्या उपस्थितीत दोन्ही गाड्यांच्या हस्तांतराच्या कागदपत्रांवर सह्या झाल्यावर विश्वासरावांनी दिलेला पस्तीस लाखांचा धनादेश आणि आता आमच्या मालकीची झालेल्या 'होंडा सिटी' कारमधून आम्ही घरी परतलो होतो.
तसा मी फार काही महत्वाकांक्षा बाळगणारा मनुष्य नव्हतो, परंतु माझ्या तोंडावर कोणी काही बोलत नसले तरी माझ्या पाठीमागे होणाऱ्या "मालकिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दुकानाचा सह-मालक बनलेला नोकर" अशा स्वरूपाच्या टीका टिप्पण्या ऐकण्यात आल्या कि माझा स्वाभिमान दुखावला जात असे. 'मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही' असे म्हणतात. त्यामुळे अशी टिका करणाऱ्यांची तोंडे बंद करण्यासाठी मला माझे स्वकर्तृत्व सिद्ध करणे आवश्यक होते.
लिंबू हे माझे आवडते फळ, आणि त्यापासून बनणारे लिंबाचे सरबत, लिंबाचे लोणचे, लिंबाचा जॅम असे अनेक पदार्थ म्हणजे माझा जीव कि प्राण आहेत त्यामुळे माझ्या आवडीचे यशस्वी व्यवसायात रूपांतर करून आपले कर्तृत्व सिद्ध करावे असा विचार कित्येकदा माझ्या मनात येत असे पण त्यासाठी लागणारे भांडवल माझ्याकडे नव्हते आणि ते उभे करण्यासाठी माधुरीकडून आर्थिक मदत घेणे जसे मनाला पटत नव्हते तसेच बँकेकडून किंवा मित्रमंडळींकडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरु करणे माझ्या तत्वात बसत नव्हते, त्यामुळे तो विचार प्रत्यक्षात आणता येत नव्हता.
विश्वासरावांकडून गाडीच्या बदल्यात मिळालेल्या पस्तीस लाख रुपयांवर भरावा लागणारा आयकर न्यूनतम पातळीवर आणून जास्तीत जास्त रकमेचा वापर नव्या व्यवसायासाठी भांडवल म्हणून कशाप्रकारे करता येईल ह्याविषयी बल्लीने दिलेल्या सल्ल्याचे कसोशीने पालन करत लिंबाचे बाटलीबंद सरबत, लिंबाचे लोणचे, लिंबाच्या सालीपासून जॅम तसेच मार्मलेड आणि कॅण्डी सारखे विविध पदार्थ तयार करण्याचा एक लघुउद्योग सुरु केला. उत्तम दर्जा आणि वाजवी किंमत असल्याने आमची सर्व उत्पादने केवळ राज्यातच नव्हे तर देशाच्या अनेक भागांत अल्पावधीतच लोकप्रिय झाली. परिणामी नऊ वर्षांपूर्वी हडपसर इथल्या एका इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये भाडेतत्वावर घेतलेल्या दोन व्यावसायिक गाळ्यांमध्ये सुरु झालेला 'माधुरी फूड प्रोडक्ट्स' हा आमचा लघुउद्योग मध्यम उद्योगात रूपांतरित होऊन चार वर्षांपूर्वी शिरवळ एम.आय. डी. सी. येथे स्वतःच्या मालकीच्या प्रशस्त फॅक्टरीमध्ये स्थलांतरित झाला असून तिथे तयार होणाऱ्या आमच्या बावीस प्रकारच्या उत्पादनांची संपूर्ण भारतात तर विक्री होतेच पण त्याच बरोबर अनेक आखाती देशांमध्येही त्यांना चांगली मागणी असल्याने त्यांच्या निर्यातीतही सातत्याने वाढ होत आहे.
बक्षिस म्हणून मिळालेली महागडी गाडी भावनेच्या आहारी जाऊन केवळ हौस म्हणून पदरी बाळगली असती तर आमच्या अन्य हौशी-मौजी आणि इच्छा आकांक्षांना मुरड घालून पोसावा लागणारा हा 'पांढरा हत्ती' आमच्यासाठी एक मोठी समस्या ठरली असती परंतु वेळीच ती विकून मिळालेल्या पैशातून एक उद्योग उभा करण्याचा घेतलेला व्यावहारिक निर्णय आणि त्यातून आलेली सुबत्ता आणि कित्येक हातांसाठी निर्माण झालेला रोजगार ह्यातून मिळालेले समाधान अतुलनीय आहे.
असो, मला आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी ह्या 'झंटी मॉल प्रॉब्लेम' कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली त्यासाठी मी निर्मात्यांचे मनापासून आभार मानतो आणि ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक झंटी मॉल आणि पहिल्या भागातले माझे सहकारी स्पर्धक शंतनू, सुधीर आणि परशुराम ह्यांच्यासाठी आम्ही स्नेहपूर्ण भेट म्हणून आणलेल्या आमच्या सर्व बावीस उत्पादनांचा समावेश असलेल्या 'गिफ्ट हॅम्पर'चा त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती करतो.
इतके बोलून आपले मनोगत थांबवल्यावर धनंजय आणि माधुरी त्यांच्या ड्रायव्हरने मंचावर आणून दिलेले गिफ्ट हॅम्पर्स मोठ्या आदराने त्या चौघांच्या हाती देत असताना स्टुडिओत उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनी उस्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट केला.
गेल्या दहा वर्षांत ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना अनेक वेळा स्पर्धकांकडून आणि प्रेक्षकांकडून केल्या गेलेल्या टिंगल-टवाळीचे तर काही वेळा अपमानास्पद वागणूक मिळण्याचे प्रसंग झंटीवर आले होते पण धनंजयच्या कृतीने पहिल्यांदाच मंचावर त्याला अशी सन्मानजनक वागणूक मिळाल्याने तो गहिवरला होता. त्या भारावलेल्या अवस्थेत पुन्हा कार्यक्रमाची सूत्रे हाती घेत आपली आक्रस्ताळी शैली विसरून मधाळ आवाजात बोलता झाला "धनंजयरावांची प्रेरणादायी यशोगाथा आपण सर्वानी अत्ता ऐकली. ज्या प्रकारे त्यांच्यासाठी समस्या ठरू शकणाऱ्या गोष्टीचे त्यांनी समाधानात रूपांतर केले ते सर्व खरोखर कौतुकास्पद आहे. आता आपण वळूयात आजच्या कार्यक्रमाचे आपले पुढचे विशेष अतिथी शंतनू ह्यांच्याकडे. मी शंतनू ह्यांना विनंती करतो आता त्यांनी ते 'झंटी मॉल प्रॉब्लेम' ह्या कार्यक्रमाकडे आणि त्यांना मिळालेल्या बक्षिसाकडे 'समस्या', 'समाधान' कि 'अमूल्य भेट' ह्यापैकी कुठल्या दृष्टिकोनातून पाहतात ह्यावर आपले मते व्यक्त करावे"
झंटीने शंतनूच्या नावाचा पुकारा केल्यावर त्याच्या शेजारी बसलेल्या सुषमाने तंद्री लागलेल्या शंतनूचा खांदा धरून हलवत त्याला भानावर आणले. आता आपली बोलण्याची पाळी आली आहे हे लक्षात आल्यावर घसा खाकरून शंतनूने आपले मत व्यक्त करण्यास सुरुवात केली.
"सी, रेशिओ आणि प्रपोर्शनचा विचार करता... "
क्रमशः
आधीचा भाग:
प्रतिक्रिया
25 Oct 2023 - 2:56 pm | चांदणे संदीप
ह्याला अहीबब चा कल्पनाविस्तार म्हणता येईल इतके चांगले झालेय. तुफान चाललंय. असेच चालूद्या.
पुभाप्र
सं - दी - प
26 Oct 2023 - 10:28 am | अथांग आकाश
असेच म्हणतो!
'बलिदान भारद्वाज' उर्फ 'बल्ली' = रेडीतला परेश रावल ना? चौधरीजना वर्षात बारा वेळा इन्कम टॅक्स भराला लावणारा सीए :)
25 Oct 2023 - 4:55 pm | मुक्त विहारि
मस्तच...
25 Oct 2023 - 5:19 pm | संग्राम
धनंजय रावांचे मनोगत अगदी अशोक सराफ स्टाईल वाचले ....
26 Oct 2023 - 4:07 pm | श्वेता व्यास
+१
27 Oct 2023 - 10:50 am | रंगीला रतन
+२७१०२३
मस्तच...
26 Oct 2023 - 1:30 pm | टर्मीनेटर
चांदणे संदीप | अथांग आकाश | मुक्त विहारि | संग्राम
प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏
@ अथांग आकाश
हो, अगदी बरोबर 😀
26 Oct 2023 - 4:04 pm | अथांग आकाश
चौधरीजना वर्षातुन बारा वेळा इन्कम टॅक्स भराला लावणारा सीए :-)
26 Oct 2023 - 2:38 pm | प्रचेतस
खल्लास एकदम
26 Oct 2023 - 4:08 pm | श्वेता व्यास
धनंजय रावांचे विचार आवडले. आता शंतनूच्या प्रतीक्षेत!