बऱ्याच दिवसांनी टेकडीवर मॉर्निंग वॉक ला आलो होतो. थोडी चढण मग थोडीफार सपाटी, पुन्हा चढण आणि वर पठार. पठारावर तास भर चाललं कि घरच्या वाटेला लागणं हा कोव्हीड आधीचा नित्यक्रम होता. कोव्हीड मध्ये व्हेंटिलेटर वरून सुखरूप आलोय. अजूनही काही त्रास आहेत असे वाटते. आधीचा तोच स्टॅमिना परत कमावण्यासाठी टेकडीवरचा मॉर्निंग वॉक पुन्हा सुरु केला.
लोकसहभागातून आधीची माळरान टेकडी भरपूर झाडे लावून फुलवलेली दिसली. लौकर उगवणारी, मोठी होणारी बरीच झाडं नजरेस पडली. निरनिराळे पक्षी त्यांचे मनमोहक आवाज सारं काही सुखावणारं होतं. टेकडीवर, टप्या टप्यावर ५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसवलेल्या दिसल्या. परिसरातल्या हाऊसिंग सोसायट्यांचे STP/WTP चे पाणी त्यात मोटारीने चढवायचे आणि मग वर केलेल्या नळांमार्फत टेकडीभर फिरवायचे.
पठारावर शेवटच्या टोकापर्यंत आलो होतो. चालून थकल्यासारखं वाटू लागलं, सोबतच पायाखाली काहीतरी चिरडल्याचा आवाज आला म्हणून पाहायला गेलो तर एकदम भोवळ आली. पडू नये म्हणून आधारासाठी टाकीला हात लावला व तिथेच एका दगडावर बसलो. क्षणार्धात डोळे उघडले तो टाकीवर 'महाराष्ट्र वन विभाग, मनोरमा टेकडी, टाकी क्र ९.' 'सर्व काही नीट वाचलं, म्हणजे आपण पूर्ण शुद्धीवर आलो' असं स्वतःला सांगितलं; बॅग मधून पाण्याची बाटली काढली घोटभर पाणी पिलो आणि निघालो पठाराच्या शेवटच्या टोकाकडून घराकडे.
पठारावर चांगलीच बाग फुलवलेली होती. छोटंसं तळ देखील खणून, व्यवस्थित बांधलेलं होतं. काही पक्षी, खारूताई, बेडूक तळ्यात पाणी पिताना दिसले. मी दोन क्षण त्यांना न्याहाळण्यासाठी म्हणून थांबलो, तोच मागून आवाज आला"एक्सक्यूज मी" एक तरुण जोडपं. मुलगा वयाने वीस-बावीसचा, तर मुलगी देखील साधारण त्याच वयातली वाटली. दोघे कॉलेज वगैरेत जाणारे असावेत, कारण दोघांनी सॅक घेतलेल्या होत्या. सॅक कडे नीट पाहिलं तर गच्च भरलेल्या दिसल्या. माझं लक्ष त्यांच्या सॅक, कपडे, ई. कडे असतानाच मुलाने विचारलं "सर हि कोणती जागा आहे?"
मला समजेना कि ह्याला नेमकं काय विचारायचंय? मी उत्तरादाखल म्हणालो "मनोरमा टेकडी."
त्याच्या चेहऱ्यावर काहीच न समजल्याचे भाव होते. त्याने पुढचा प्रश्न विचारला "नाही, म्हणजे गाव कोणतं?"
आता हे जरा इंटरेस्टिंग होतं! तो एका मुलीसोबत, एका निर्जन ठिकाणी, व्यवस्थित शर्ट इन करून पहाटे पहाटे ज्या टेकडीवर आहे, ज्या गावात आहे त्याचे नाव माहित नसणे म्हणजे जरा कमालीचंच होतं. मी आपले चेहऱ्यावर संयत भाव ठेवून त्याला थोडे उपहासानेच उत्तर दिले, "मनोरमा टेकडी, हडपसर, पुणे, महाराष्ट्र, भारत." इतका वेळ काहीही न बोलणाऱ्या मुलीने भांबावलेल्या चेहऱ्याने त्याला "आपण पुण्यात कसे आलो?" म्हणून विचारलं. त्यांच्या बोलण्यावरून ते पुण्या मुंबईतले तरी वाटत न्हवते. मुलगी त्याच्याशी बोलताना कम्फर्टेबल वाटली म्हणून काही अनुचित नसावे असे वाटले. तिचा तो प्रश्न मात्र विचित्रच वाटला. माझ्याच शरीरात मला थकवा जाणवत होता. वेळीच घरी पोहोचावे म्हणून निघालो. पठारानंतरचा उतार उतरलो. छोट्या सपाटीवरून शेवटचा उतार उतरताना दोन्ही हातपाय वापरावे लागतात म्हणून जपून पाय ठेवतो इतक्यात, पायाखाली काहीतरी चिरडल्याचा आवाज आला म्हणून पाहायला गेलो तर एकदम भोवळ आली. पडू नये म्हणून आधारासाठी हात लावला व तिथेच एका दगडावर बसलो. क्षणार्धात डोळे उघडले तो समोर टाकी आणि टाकीवर 'महाराष्ट्र वन विभाग, मनोरामा टेकडी, टाकी क्र ९.' सर्व काही नीट वाचलं.
उशीर झाला म्हणून घरचे शोधायला निघाले होते. मी आधीच सांगून ठेवलं होतं म्हणून टेकडीवर त्यांनी मला शोधून काढलं. मी तापाने फणफणलेला, बेशुद्ध अवस्थेत होतो. आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होता. 'कसा काय पडलास? आता कसं वाटतंय?' वगैरे प्रश्नांचा वीट आलेला. मी आपला दोन्ही प्रश्नांना 'अशक्तपणा' इतकंच उत्तर देत होतो. माझी मुलगी मला, तिचं शाळेतलं काय काय सांगत होती. मधेच ति म्हणाली "बाबा तुला माहितीये तू बेशुद्ध पडला त्या दिवशी आय मिन त्याच्या आदल्या दिवशी काय झालेलं?" मी निर्विकारपणे 'काय?' म्हणून मन डोलावली. "न्यूजवर पण आलेलं. आउट ऑफ पुण्याचे एक कपल, म्हणजे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड त्यांच्या घरातून पळाले. मग त्यांच्या घरच्यांनी त्यांना शोधलं. पुण्याच्या बाहेरच त्यांना अन-कॉन्शस केलं आणि तुझी ती टेकडी आहे ना त्या टेकडीवरच्या एका वॉटर टॅंक मध्ये त्यांना मारून त्यांचे तुकडे करून टाकले. आय गेस्स नाईन नंबरच्या टॅंकमध्ये."
प्रतिक्रिया
29 Sep 2023 - 4:40 pm | भागो
अरे बापरे. आता तेथे फिरायला जाणे बंद करायला पाहिजे.
29 Sep 2023 - 5:04 pm | अमर विश्वास
सकाळी सकाळी भुते ?
कथेचे नाव
हँगओव्हर किंवा सकाळची भुते
29 Sep 2023 - 7:46 pm | विजुभाऊ
मह्या बिलंदर........... भूते कलंदर......
29 Sep 2023 - 5:22 pm | कर्नलतपस्वी
आमच्याच भागात आहे टेकडी, मी नेहमीच जातो तीकडे फिरायला. टाकी नंबर नऊ जवळच दगडांवर गप्पाचा अड्डा जमतो. केव्हांची गोष्ट आहे,हल्ली टि व्ही बघत नाही ना....
या वर्षी कोजागरी ला रात्री जायचंय म्हणतात मित्र पण तुमची कथा वाचली, आता विचार करावा लागेल.
पण बहुतेक फौजींना भुते काही करत नाही असे वाटते.कारण एकदा तीन महिने स्मशानात मुक्काम करावा लागला होता.....
नाव-भुतांचे दूर दर्शन!!!!
नाव सुचवल्या बद्दल काही बक्षीस असेल तर टाकी नंबर नऊ जवळच घेऊन या.
29 Sep 2023 - 5:45 pm | भागो
अरे नाव द्यायचं विसरलोच कि. ही घ्या,
"बिलंदर भुते."
किंवा "भुताळी टेकडी."
29 Sep 2023 - 5:51 pm | चित्रगुप्त
'कथेला नाव सुचवा' हे शीर्षकच छान आहे की.
29 Sep 2023 - 6:07 pm | कंजूस
सावधान पुणेकर.
वाटसपसाठीफक्त.
29 Sep 2023 - 7:22 pm | अहिरावण
मनोरमा
29 Sep 2023 - 7:32 pm | विजुभाऊ
चिरडले........... काहीतरी.
हे नाव कसे वाटतेय?
29 Sep 2023 - 11:41 pm | अमरेंद्र बाहुबली
म्हया बिलंदराच्या कान्दिशीक मिपाकरांना कान्दीशीक करण्याचे विकल मनोरथ.
30 Sep 2023 - 8:05 pm | म्हया बिलंदर
सर्वांना धन्यवाद. कथेला समर्पक नाव अजून सापडलेच नाही.
30 Sep 2023 - 8:13 pm | अमरेंद्र बाहुबली
१) टाकी क्रमांक ९
२) ते दोघं
३) भूताळी टेकडी
४) आवनर किलींग
थोडं लांब हवं असेल तर
५) मला आलेला ताप नी भेटलेली ती दोघं
30 Sep 2023 - 8:33 pm | चौथा कोनाडा
बाप रे ... खतरनाकच की !
😮
कथा आवडली !
कथे साठी नाव सुचवेन : टाकी नंबर नऊ !
1 Oct 2023 - 11:39 am | तुषार काळभोर
पण कथा आवडली.
आधी वाटलं भागो यांच्यासारखं दुसरी मिती, तिसरं विश्व, चौथी टाइम लाईन असा काही प्रकार आहे की काय. पण हा सुपर नॅचरल ट्विस्ट आवडला.
2 Oct 2023 - 7:52 pm | सिरुसेरि
छान भयकथा . १३ बी च्या धर्तीवर "मनोरमा ९" किंवा " ९ , मनोरमा हिल्स" असे नाव सुचले .
6 Oct 2023 - 2:44 pm | श्वेता व्यास
नावाचा विचार केला नाही पण कथा आवडली.